Sarita Sawant Bhosale

Inspirational

4.7  

Sarita Sawant Bhosale

Inspirational

सक्षम आई

सक्षम आई

10 mins
1.5K


 आई ही फक्त आई असते

   दुजाभाव जिथे शून्य असतो

   प्रेम, वात्सल्याची ती मूर्ती

   परमेश्वर तिच्या हृदयी वसतो

  

    आई म्हंटल की ईश्वर आणि आत्म्याचं पवित्र संगम. अनेकदा आपण ऐकतो,बघतो, अनुभवतो देखील की स्त्री आई झाली की तिच्यात प्रेमरूपी वात्सल्य आणि दुर्गारूपी शक्ती दोन्ही एकाच वेळी वास करत असतात. आपल्या लेकरांसाठी ती स्वतःची ओळख विसरून फक्त एक आई होते आणि प्रत्येक संकटापासून आपल्या जीवाला वाचवण्यासाठी समर्थ होते. आज अशाच एका समर्थ आईची सत्य कथा आपण वाचणार आहोत.

     

    वयाच्या बाविसाव्या वर्षी माया रुपेशशी लग्न करून मुंबईला म्हणजे मायागरीत आली. लिहिता वाचण्यापूरत शिक्षण झाल्यावर आई वडिलांनी तिचं लग्न लावून दिल. रुपेश सारख्या एका अनोळखी व्यक्तीशी आयुष्यभराची गाठ बांधून माया मुंबईला आली. पुढे काय वाढून ठेवलंय हे तिच्या निष्पाप मनाला काय माहीत. जादुई मुंबईत पहिल्यांदाच पाऊल ठेवलेल्या मायाला या मुंबई नगरीनेही आपलंस केलं. काही दिवसांनी तिथे रुळल्यानंतर काहीतरी नोकरी करावी किंवा कसलतरी पुढे शिक्षण घ्यावं अशी इच्छा मायाने रुपेशला बोलून दाखवली. पण मी कमावतोय त्यात आपलं चांगलं भागतय त्यामुळे तू नोकरी करायची गरज नाही असं सांगून रुपेशने मायाच्या नोकरीला नकारच दर्शवला आणि आता शिकून काय करायचंय..मुलं बाळ होतील त्यांना सांभाळायचं अस बोलून तिच्या शिकण्याच्या इच्छेलाही पूर्णविराम दिला. नवरा म्हणतोय तेही बरोबर आहे असं मानून माया संसारात रमली.


     एकटीला मायाला कधीही बाहेर न जाऊ देणारा नवरा, कोणाशीही बोलू न देणारा नवरा सुरुवातीला आपल्यावर असणाऱ्या प्रेमापोटी असा वागतोय असे वाटायचे पण काही दिवसांतच त्याचा स्वभाव संशयी वृत्तीचा आणि पुरुषी अहंकार गाजवणारा आहे हे कळलं. त्याच्या या वागण्याला कधी विरोध केलाच तर तो मायावर हात उचलायलाही कमी करायचा नाही. कित्येकदा तिला वाटायचं जावं सोडून त्याला पण त्याच्यावर असलेल्या निस्सीम प्रेमापोटी तिने घराबाहेर कधीच पाऊल ठेवलं नाही. याच प्रेमाने आज ना तो उद्या नक्की बदलेल असा विश्वास होता तिचा. अशीच लग्नाची दोन तीन वर्षे गेली तरीही माया गोड बातमी देत नव्हती म्हणून रुपेशच्या घरून तिच्यावर दबाव वाढत राहिला...रुपेशही घरच्यांचं ऐकून मायाशी भांडू लागला..आई होण्यास ती समर्थ नाही अशी दूषणे देऊ लागला. घरात तर तिच्यावर वांझोटे पण लादलच गेलं पण हळूहळू समाजही मायाला वांझ म्हणू लागला. आई होण्यासाठी माया उपास,तापास, नवस, कोणी काय सांगेल ते श्रध्दा अंधश्रद्धा उपाय करू लागली. रुपेश आणि तिच्यातील नातं आता फक्त मुल जन्माला घालायचं या उद्देशा पुरतच उरलं होतं. मायाने मनापासून केलेली विनवणी एक दिवस देवाने ऐकली आणि घरात नवीन पाहुणा येणार कळताच सगळ्यांना मायाप्रति अचानक प्रेम उफाळून आलं. रुपेशही तिला कुठे ठेवू कुठे नको इतकं प्रेम करू लागला. नऊ महिने पोटात जीवापाड जपलेला जीव जगात आला. मुलगा झाला म्हणून रुपेश जरा जास्तच खुश झाला. 


    मुलाचं संगोपन करण्यात माया पूर्ण गुंग झाली होती. रुपेशही तसा थोडा बरा वागत होता त्यामुळे मुलाच्या येण्याने हरवलेला आनंदच परत आला अस मायाला वाटत होतं म्हणून तिने मुलाचं नावही आनंद ठेवलं. आनंदसोबत तिचं आयुष्य आईपणाच्या नव्या वळणावर पाऊल ठेवत होतं जे तिला सर्वाधिक सुखावत होतं. आनंदची चालण्यापासून पळण्यापर्यंतची दुडूदुडू पावलं बघून मायाच्या चेहऱ्यावर हसू फुलत होतं पण नियतीला कदाचित तिचं हसणं मान्य नसावं. आनंद जसजसा वयात येऊ लागला तशी त्याला वेगळीच चाहूल लागत होती. शाळेत असताना मुलांसोबत खेळण्याऐवजी मुलींसोबत खेळणे,गप्पा मारणे त्याला आवडू लागले. घरी असल्यावर आईची साडी नेसणे, मेकअप करणे , स्वतःला आरशात निरखून पाहणे असे प्रकार त्याचे चालायचे. मायाने खूपदा त्याला रागावल, दटावलं की तू मुलगा आहेस मुलींसारखं वागू नकोस. 


  आनंद मात्र तो नक्की मुलगा की मुलगी याच प्रश्नासोबत झगडत होता. जो तो आहे ते त्याला नको होतं आणि मनातून त्याला जे हवं होतं तसं समाज त्याला स्वीकारू शकत नव्हता. त्याच्या अस्तित्वाशीच त्याची लढाई चालू असताना एक दिवस अचानक त्याला रक्तस्त्राव सुरू झाला. आधीच शरीराचं आणि मनाचं द्वंद्व चालू असताना या विपरीत,अनपेक्षित परिस्थितीचा सामना कसा करावा हे आनंदलाही कळत नाही. काहीसं घाबरून, बैचेन होऊन मायाला त्याने घडलेली घटना सांगितली. मायाच्या तर पायाखालची जमीन सरकली. आनंद शरीराने पुरुष होता पण मन मात्र स्त्रीचं होतं हे आनंदने मायासमोर कबूल केलं. पण आता शरीरानेसुद्धा त्याला स्त्रीची ओळख द्यायला सुरू केलेल.


पुरुषाला मासिक पाळी येणारा आनंद हा पहिला मुलगा नव्हता पण माया रुपेशच्या घरातील तो पहिला मुलगा जगावेगळा होता. डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना सगळी परिस्थिती सांगून आनंद हा पुरुष नसून तृतीय लिंगी समूहातील आहे हे स्पष्टपणे कळले. घडलेला सगळा प्रकार रुपेशपर्यंत पोहोचतो. आई वडील आपले आहेत ते नक्की समजून घेतील अशी वेडी आशा आनंदला असते पण ती खोटी ठरते.


    सामान्य जगात आणि माझ्या घरात राहण्यासाठी तू लायकीचा नाहीस अस म्हणत रुपेश स्वतःचा अंश असलेल्या मुलाचा काडीमात्रही विचार न करता त्याला एका हिजडा समूहात विकून येतो. मायाचा जीव मुलासाठी तुटत असतो...आईचं काळीज शेवटी...रात्रंदिवस फक्त आनंदच्या नावाचा जप करत राहते. आनंदला शोधायला ती घराबाहेर पडू नये म्हणून रुपेश कामावर जाताना तिला घरात कोंडून जात असे.

    चार दिवस अन्न पाणी सोडून मायाने देव पाण्यात ठेवले होते. तिच्या ममतेपुढे अखेरीस देवालाही हार मानावी लागली. एक दिवस खिडकीतून शेजारच्या मुलाला बाहेरून दरवाजा तोडायला सांगून ती स्वतःची सुटका करुन घेते आणि अनवाणीच आनंदला शोधायला बाहेर पडते. फोनवर रुपेश आनंदबद्दल कोणाकडे तरी त्याची चौकशी करताना तिने गुपचूप ऐकलं होतं त्यावरून तो कुठे असावा याचा अंदाज तिला आला होता. ती तडक त्या वस्तीत जाते. आजूबाजूला टाळ्या वाजवत उभे असणारे स्त्री वेशातील पुरुष बघून ती आधी घाबरते. आजपर्यंत या लोकांबद्दल जे ऐकलं होतं ते भयानक आणि भीतीदायक होतं त्यामुळे त्यांची भीती वाटणं साहजिकच. तरीही मोठ्या हिंमतीने माझा आनंद कुठे आहे ओरडत ती वस्तीत फिरत असते...मायाचा आवाज ऐकून आनंद एका खोलीतून पळत "आई" ओरडत बाहेर येतो आणि मायाला घट्ट मिठी मारतो. 

  

      दोघे माय लेक आसवांनीचं फक्त बोलत होते. दोघांची ती स्थिती पाहून तिथे असणारे सगळ्यांचेच डोळे पाणावले. आनंदची आई हात जोडून पाया पडून त्याच्या सुटकेसाठी विनवणी करते. त्या समाजातील गुरू मायाला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात की तुमच्या सामान्य समाजात आनंदला काही स्थान नाही...त्याला फक्त अवहेलना सहन करावी लागेल. तो जर इथे राहिला तर तो इतरांपेक्षा वेगळा आहे असं वाटणार नाही आणि सुरक्षितही राहील. आम्ही त्याची योग्य काळजी घेऊ. पण माया शेवटी एक आई होती..."किती काही झालं तरी आनंद माझा जीव आहे...त्याच्यापासून मी दूर नाही राहू शकत. त्याची जी ओळख आहे ती ओळख स्वीकारून मी त्याला चांगलं जीवन जगण्यास प्रवृत्त करेन पण माझ्यापासून दूर करणार नाही. तुमचे पैसे हवं तर मी कसही करून परत आणून देईन पण माझ्या मुलाला माझ्यापासून तोडू नका" अशी विनंती माया त्यांच्यासमोर करते.


     एका आईच्या हट्टापुढे आणि अश्रूंपुढे सगळेच झुकले. माय लेकाच्या प्रेमापुढे पैसा मोठा नाही असं म्हणत त्यांनी आनंदला सोबत न्यायला परवानगी दिली. काही झालं तरी आम्हाला हाक मारा अस सांगायला देखील विसरले नाहीत. माणूस न मानता ज्यांना आपण झिडकारतो आज त्याच माणसातील माणुसकी आणि आपुलकीचा प्रत्यय मायाला आला होता. आनंदला परत मिळवून तिने एक लढाई तर जिंकली होती पण खरी लढाई आता सुरू झाली होती. माया रुपेशकडे न जाता आनंदला घेऊन सरळ माहेरी जाते. माहेरीही आनंदच सत्य कळल्यावर तेही आनंदला स्वीकारण्यास असमर्थता दर्शवतात. माया तिथूनही आनंदला घेऊन बाहेर पडते. परत मुंबईला येऊन राहायला घर आणि काम शोधण्यासाठी वणवण फिरण्याचा प्रवास तिचा सुरू होतो. मुंबईतल्याच एका नातेवाईकांनी रुपेशला माहीत न होता तिला भाड्याने एक रूम बघून दिली आणि एकेठिकाणी कपडे भांडीचं कामही मिळवून दिलं. इथून मायाच्या मातृत्वाचा आणि आनंदच्या अस्तित्वाचा खरा खडतर प्रवास सुरु होतो.


    रुपेशने इकडे माया आणि आनंदला शोधण्यास सुरुवात केली होती. आनंद ज्यांच्या हातात विकला होता तिकडे गेल्यावर त्याला कळतं की माया त्याला स्वतःसोबत घेऊन गेली आहे. कधी घराबाहेरही न पडणाऱ्या मायाची हिंमत बघून रुपेशला मोठा धक्का बसला होता. आनंदला विकून मिळालेले पैसे आता परत मागतील या भीतीने तो काही न बोलता तिथून सटकायच्या उद्देशात असतानाच आम्हाला आमचे पैसे परत नको पण आनंद आणि त्याच्या आईला काही होता कामा नये अशी समज दिली. पण मायाने त्याचा शब्द मोडून त्याचा अपमान केला होता,त्याचा पुरुषार्थ डीवचला गेला होता. काही दिवस शांत बसून रुपेशने पुन्हा मायाचा शोध घेण्यास सुरुवात केली.


     माया दिवसभर कपडे धुण्याचं काम करून संध्याकाळी एका हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्टचं काम करायची. आनंदला खूप शिकवून मोठं करायचं तीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिवस रात्र मेहनत करत होती. आनंदची स्वतःची एक लढाई समाजासोबत सुरू झाली होती. एकच दिलासा होता की ज्या आईने जन्म दिला त्या आईने त्याला तो जसा आहे तसा स्वीकारून त्याच्या भवितव्य यशस्वी करण्यासाठी त्याच्यासोबत होती. परिस्थितीचा सामना करत कसंबसं शालेय शिक्षण पूर्ण करून त्याने कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. कॉलेजमध्ये त्याची ओळख फार दिवस लपून राहिली नाहकी त्याने तसा प्रयत्नही केला नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो जे आहे ते नैसर्गिक होतं... त्याच्या हातात ते नव्हतं त्यामुळे समाजानेही कोणतीही आडकाठी मध्ये न आणता त्याला माणूस म्हणून मानाने स्वीकारावं हीच अपेक्षा. पण प्रत्यक्षात मात्र त्याची उपेक्षाच झाली. कॉलेजमध्ये मुलं त्याला छक्का म्हणून चिडवायची, एकट्याला गाठून नको तसे स्पर्श करायचे, त्याला नाचायला सांगायचे. त्याने विरोध करताच त्याला मारायचे. डोळ्यातील अश्रू लपवत सारं दुःख तो आईकडे बघत सहन करत होता. मनातल्या मनात घुसमटून जात होता. यातूनच त्याने एक दिवस आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण माया वेळेत पोहचल्यामुळे त्याच्या जीवाला काही झाले नाही. त्यादिवशी मायाने पहिल्यांदा आनंदच्या कानाखाली लगावली. डोळ्यात अश्रू आणि मनात भयंकर राग घेऊन ती बोलत होती,


      "तू तुझीच ओळख स्वाभिमानाने घेऊ जगू शकत नाहीस तर लोक कसे स्वीकारतील तुला? आणि त्यांच्या स्वीकारण्या न स्वीकारण्यावर तुझं जगणं अवलंबून आहे का?? मी माझा नवरा, माझे आई वडील सगळे सोडून फक्त तुझ्यासाठी तुझ्यासोबत आहे त्या कपड्यानिशी घराबाहेर पडले ते तुझी हार बघायला नाही. लोकांच्या छळणाऱ्या नजरा आणि कुत्सित हास्य रोज सहन करते ते फक्त तुझ्याच साठी. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुला परत माझ्या जवळ आणून एक सुरक्षित छत दिलं ते फक्त तुझ्यासाठी. स्वतःला संपवताना हा जीव तुझा नाहीतर माझा आहे हे विसरू नकोस. 


    एक जिद्द मनात ठेव की तू जिंकणारच.... मग कोणी सोबत असो नसो.... हा रस्ता काट्यांचा आहे त्यावरून चालूनच तुला एक दिवस फुलांचा हार ही गळ्यात भेटेल हे लक्षात ठेव. इथून पुढे हे मिळालेले जीवन संपवण्याचा विचार करायचा नाही." त्यादिवशी आनंदने आता न हरता फक्त जिंकेनच असे वचन मायाला दिले आणि त्याची जी कुचंबणा होत होती त्याला धीराने तोंड देत तो पुढे चालत राहिला. माया प्रामाणिक पणे निष्ठेने स्वतःच काम करत असते.. सगळी संकट दूर झाली अस वाटत असतानाच एक दिवस रुपेश त्या दोघांसमोर उभा ठाकतो. मायाचे हातपाय थरथरू लागतात तरीही ती हिंमत एकटवून त्याला उत्तर देत असते. रुपेश तीच काही न ऐकता तिला मारझोड सुरू करतो. आईला वाचवायला आनंद मध्ये पडताच त्याचाच गळा आवळून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न रुपेश करताच माया घरातील धारदार चाकूने त्याच्या हातावर वार करते. पत्नी म्हणून तिने त्याचे अत्याचार सहन केले पण मुलाचा जीव वाचवण्यासाठी ती झाशीची राणी झाली. पुन्हा इकडे फिरकलास तर तुझाच जीव घेईन हे बोलण्याची हिंमत एका आईत आली. रक्ताने भिजलेला हात रुपेश तिच्या घरातून बाहेर पडला तो कायमचाच.

 

आनंद आणि माया दोघेही घडल्या घटनेतून सावरत, एकमेकांना साथ देत, दरदिवशी समोर येणाऱ्या नव्या आव्हानांचा सामना करत, आजूबाजूचे टोमणे ऐकत पण हसत जगत होते. मायालाही आता चांगला पगार मिळत होता. आनंदला शिक्षण घेण्यात खूप अडचणी येत होत्या, खूप अवहेलना, अपमान सहन करावा लागत होता पण वेळोवेळी आईचा खंबीर पाठिंबा, सामाजिक संस्थेची मदत व स्वतःची प्रबळ इच्छा या जोरावर एलएलबीच शिक्षण त्याने पूर्ण केलं. यासोबतच एका सामाजिक संस्थेसोबत जोडून त्याच्या सारख्या व lgbt समूहातील मुलांना समुपदेशन देण्याचं मोलाचं कामही करत होता आणि या मुलांच्या पालकांना धैर्य, आत्मविश्वास देण्याचं काम, मुलांना प्रेमाने स्वीकारण्याचं आणि वाढवण्याचं समुपदेशन माया करत होती.


    ज्या दिवशी आनंदने एलएलबी पूर्ण केलं त्या दिवशी एका संस्थेकडून त्याचा सत्कार होणार होता. त्यादिवशी त्याने आईला कार्यक्रमासाठी स्वकमाईतून साडी घेतली. मायाच्याही डोळ्यांचे पारणे फिटत नव्हते. खूप खुश होती ती. स्वतःच्या गळ्यात फुलांचा हार पडताना बघून आनंदला काही वर्षांपूर्वी आईने बोललेले शब्द आठवले "या काट्यावर चालूनच एक दिवस तुझ्या गळ्यात फुलांचा हार पडेल". आनंद भारावून गेला होता. त्याचा इथवरचा प्रवास व्यक्त करताना गो या यशाचं सारं श्रेय फक्त आईला देतो. भरल्या डोळ्यांनी तो म्हणतो, 


    "जर आई माझ्यासोबत नसती तर कदाचित मी कोणत्या तरी रेल्वे स्टेशन वर किंवा रस्त्यावर टाळी वाजवत पोटाची खळगी भरण्यासाठी हात पसरत उभा राहिलेला दिसलो असतो. पण आईने खूप कष्ट करून, जगाची बोलणी खाऊन, सगळी नाती तोडून, सात जन्माच्या नात्याने बांधलेला पती सोडून तिने फक्त माझ्यासारख्या मुलाला साथ दिली ज्याला ती मुलगाही बोलू शकत नाही आणि मुलगीही. येता जाता रोज तिला समाज "ती बघ त्याची का तिची आई" असं म्हणत जोरजोराने हसायचा...तिला चिडवायचा. मुलाला जन्म देत तू हिजडा जन्माला घातलास असं हिणवायचा पण ती शांत बसून सहन करत राहिली फक्त माझ्यासाठी. कित्येकदा कोपऱ्यात जाऊन तिने डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली पण माझ्यासमोर ती नेहमीच खंबीर आणि सक्षम आई बनली. मी तिची कमतरता नसून ताकद आहे हा विश्वास तिने मला दिला. तिच्यामुळेच हा पुनर्जन्म मला लाभला आणि मी स्वतःची ओळख, स्वतंत्र अस्तित्व बनवण्याचं स्वप्नं पूर्ण करू शकलो. आई आहे म्हणून मी आहे नाहीतर मी शून्य आहे".

    

   आनंदच्या मुखातून आपलं कौतुक ऐकून मायाचे आनंदाश्रू थांबत नव्हते.नवऱ्याला सोडून, आई वडिलांना सोडून एक आई म्हणून ती इतकी वर्षे झटत होती... रात्र दिवस मुलाच्या यशासाठी कष्ट करत होती त्याच आज चीज झाल्यासारख वाटलं. मुलाचं यश डोळ्यांत साठवून घेत होती. 'तिची आई की त्याची आई' या लेबल पेक्षा ती एक सक्षम आई होती जी आपल्या मुलाची ढाल बनून नेहमी सोबत असते. आज आनंदची आई म्हणून तिला खूप मान मिळत होता यातच तिच्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं तिला वाटत होतं.


    कथा सत्य घटनेवर आधारित आहे. आईसाठी तिचा मुलगा कोण आहे यापेक्षा तो तिचा जीव आहे न ती त्याच रक्षण स्वत:च्या जीवापलीकडे करते, त्याची ढाल बनते हे या कथेतून उमगत. समाजासोबत पालकांनीही वंचित ठरवलेल्या, वाळीत टाकलेल्या मुलांना गरज आहे अशा सक्षम आईची.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational