Sarita Sawant Bhosale

Inspirational

3  

Sarita Sawant Bhosale

Inspirational

मलाही गोरी व्हायचंय...

मलाही गोरी व्हायचंय...

4 mins
463


    मंजिरी तशी साधी पण हुशार. नाकी डोळी नीटस आणि रंग सुमार म्हणजे फार सावळी पण नाही आणि फार गोरी पण नाही. उंची जेमतेम साडेचार फूट. शिक्षण पूर्ण झालं आणि घरातल्यानी लगेच लग्न लावून दिलं...जन्मापासून गावाकडे राहिलेली मंजिरी लग्नानंतर मुंबईत आली. मुंबई स्वतःमध्ये कोणालाही सामावून घेते.. तस मंजिरीलाही तिने सामावून घेतलं. काही दिवसातच मंजिरीच्या संसारात गोड लक्ष्मीचं आगमन झालं.

त्यावेळी मी रितीप्रमाणे बाळाला फ्रॉक,अंगठी, मंजिरीलाही ओटीच सामान घेऊन बघायला गेले. "मुलगी खूपच सुंदर आहे ग तुझी...नाक किती सुरेख आहे आणि ओठ तर कसले नाजूक आहेत." 

माझी ही वाक्य ऐकून तिच्या डोळ्यात पाणी तरळलं.


मंजिरी - ताई तुम्ही पहिल्या जे माझ्या लेकीचं एवढं कौतुक करताय नाहीतर घरच्यांसोबत इतरही जण आधी तिचा रंग बघून म्हणतात "जरा कलरला डावी आहे नाही का??" नाही ती गोरी माहीत आहे पण शेवटी आईच काळीज माझं त्रास तर होतो.


मी - लोकांचे विचार कधी बदलतील माहीत नाही पण तू आई आहेस ना मग तू तरी काळा गोरा असा भेद करू नकोस तिच्यात कधी. आईच्या नजरेत आपलं मूल सुंदरच असतं आणि तुझी ही सुंदर नजर कायम अशीच ठेव.


त्यावेळी तिला ते कितपत कळलं माहीत नाही पण माझ्या बोलण्यावर तिने होकारार्थी मान हलवली होती.


    अलीकडेच एका कार्यक्रमाच्या निमिताने फार वर्षांनी तिच्याकडे जाणं झालं. आता तिची मुलगी अडीच तीन वर्षाची झालेली. तिच्या बोबड्या बोलांनी ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. दुदुदुडू पावलांनी गाणी बडबडत संपुर्ण घरात गिरक्या घालत होती...मध्येच ती जाऊन साबणाने तोंड धुवून यायची. असं तासाभरात तरी तीन चार वेळा तिने केलं..मला वाटलं गंमतीने अस करत असावी किंवा पाण्यात खेळणं आवडत असावं किंवा आईनेच स्वछतेची अशी सवय लावली असावी. पाचव्यांदा ती पुन्हा साबण लावून तोंड धुवून आली. आता मी तिला विचारलंच, "अगं इतक्या वेळ जाऊन हात, पाय,तोंड धुवायला तू मातीत कुठे खेळतेस?"


"नाय नाय ग मावशी...साबणाने तोंड धुतल ना की मी गोली गोली दिसणार म्हणून मी सालखी सालखी जाऊन साबण लावते तोंडाला"- 

ती तिच्या बोबड्या बोलात.


मी - तुला हे कोणी सांगितलं?


ती - मम्माने.... ती पण धुते सारखी साबणाने तोंड आणि ती फेयलनलव्हली पण लावते. पप्पा तिला रोज बोलत असतात ती क्लिम लाव मग जरातरी गोरी दिसशील. आजी पण मला सांगते ती क्लिम लावायला.


त्या छोटीच्या वाक्यांनी खरंतर काय बोलावं हेच सुचत नव्हतं. तितक्यात मंजिरी तिथे आली आणि मी पुन्हा तिला मागच्या वाक्यांची आठवण करून दिली. तुझी नजर गोऱ्या रंगाच्या पलीकडे आपल्या मुलीसाठी सुंदर ठेव आणि गोऱ्या रंगापेक्षा तीच मन अधिक स्वच्छ, प्रामाणिक व ती कर्तृत्ववान कशी होईल यावर भर दे असंही सांगून आले.


    त्या छोटीच्या बोलण्यावरून मला माझ्या नात्यातल्या लहान बहिणीची आठवण झाली. तीही तिच्या सावळ्या रंगामुळे शाळेत, बाहेर कुठेच मित्र मैत्रिणी मध्ये मिसळत नव्हती. तासनतास आरश्यात स्वतःला न्याहाळत बसायची...मलाच असा का रंग दिला देवाने म्हणून अजाणत्या वयात रडतही बसायची. तिच्या रंगापुढे तीच हुशार असणं, शाळेत पहिला नंबर पटकावण, शाळेकडून तीच कौतुक होणं हे सगळं गौणच वाटायचं. पण जसजस तिला कळायला लागलं तेव्हा पासून तिला हेच समजावत आलो की तुझा रंग ही तुझी ओळख नाही. तुझे गुण, संस्कार, तुझे विचार, तुझं कर्तृत्व,तुझी बुद्धिमत्ता,तुझी कलात्मकता, तुझा स्वभाव ही तुझी ओळख असणार आहे व हीच तुझ्या यशाची गुरुकिल्ली देखील असणार आहे. योग्य वेळी घरून मिळालेल्या प्रेमामुळे, आत्मविश्वासामुळे ती कायमच तिच्या कर्तृत्वाने तिच्या क्षेत्रात झळकत राहिली. आपल्या मनातले रंग चेहऱ्यावर उमटतात आणि त्यातूनच आपलं सौंदर्य खुलत हे तिला मनोमन पटत गेलं.


   मुलीच्या सौंदर्यावर कोणत्या एका रंगाच वर्चस्व नसतं आणि ते नसावही..पण सौंदर्य म्हणजे गोरेपणा असच आपल्या जाहिरातीतून दर्शवणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हरला ही तब्बल ४५ वर्षांनी महिलांनी त्यांच्या प्रोडक्टला अनेकदा केलेल्या विरोधातून हे लक्षात आलं आणि त्यांनी 'फेयर' हे नाव क्रिमच्या नावातून वगळून त्याजागी 'ग्लो' शब्द वापरायचं ठरवलं. हा निर्णय उशिरा का होईना पण स्वागतार्ह ठरला.


   सौंदर्याची वाटचाल वैचारिक झगमगाटाकडे नेणारी ठरते असं सध्या दिसत जरी असलं तरी गोरेपणालाच सौंदर्याच मापदंड मानणाऱ्या या विचारांची पाळमूळ मंजिरीच्या सासुच्याही आधीच्या पिढीपासून इतकी खोलवर रुजली आहेत की ती मंजिरीच्या नंतरच्या पिढीतही खट्टून रुजवली गेलीयेत व पुढे ती अजून कितीतरी पिढ्या रुजवतच जाणार. फेयर न लव्हलीने ४५ वर्षे स्त्री सौंदर्यावर आणि पुरुष सौंदर्यावरही गोरेपणाचे जे संस्कार केले आहेत ते 'ग्लो' या शब्दाने नक्कीच एका रात्रीत बदलणार नाहीत. 


    आपण सुंदरवती मग सूनही गोरीगोमटी, चार माणसात उठून दिसणारी हवी अशी मागणी करणारी सासू...स्वतःच्या चेहऱ्यावर कितीही काळे ढग जमा झालेले असले तरीही गोरा रंग लेऊन इंद्रधनुष्याचेही रंग घेऊन सुंदर परी आयुष्यात अवतरावी या अपेक्षेत असणारा नवरा, फक्त रंग सोडून सगळे गुण घ्यावे लेकीने अस म्हणत आपल्या सुमार रंगाने अख्ख आयुष्य झाकोळल्या अंधारात काढलेली आई,.... सिनेमात,मालिकेत,जाहिरातीत इतरांपेक्षा आपण वरचढ दिसावं, नंबर एकवर आपलीच वर्णी लागावी, चाहत्यांच्या हृदयात फक्त आपणच राज्य करावं या मोहक इच्छां पायी लाखोंच्या फेयरनेस ट्रीटमेंट घेणाऱ्या हिरोईनी, मुलींच्या नजरेत एका क्षणात आपणच भराव म्हणून भरभक्कम क्रीम तोंडावर फासणारे तरुण ( यात तरुणीही कमी नाहीतच) ही सगळीच सुंदरतेच्या गोरेपणाच्या व्याख्येकडे झुकत चाललेली वळणं एका क्षणात,निमिषात किंवा एका रात्रीत 'ग्लो' या रस्त्यावर वळणार नाहीत. 


  सौंदर्य म्हणजे गोरेपणा नसून तुमचं अंतर्मन, तुमचं प्रेम, तुमचं निखळ हास्य, तुमचा खरा आनंद, तुमचे आचार विचार, तुमचा संयम, तुमचे संस्कार, तुमची बुद्धीमता, तुमचं कर्तृत्व,तुमचं यश या सगळ्यांचा एकत्रित मेळ असतो ज्यात तुमचं प्रतिबिंब झगमगत..एक वेगळी चमक जी पांढऱ्या रंगापेक्षा कितीतरी अनमोल आणि आकर्षक असते.


   वर्णभेद मुलीबद्दल असो की मुलाबद्दल कोणत्याही क्रिमच्या नावावरून हटण्यापेक्षा कालपासून आजपर्यंत व उद्याच्याही पिढीतून समूळ नष्ट झाला तर कोणत्याही मुलीवर ' साबण लावली की मी गोरी दिसते' किंवा मलाही गोरी व्हायचंय बोलण्याची गरज पडणार नाही. 


Rate this content
Log in