Sarita Sawant Bhosale

Drama Tragedy

4  

Sarita Sawant Bhosale

Drama Tragedy

लिपस्टिक

लिपस्टिक

5 mins
935


   आज कितीतरी महिन्यांनी मायाने मनाचा हळवा कोपरा उलगडला. मी पुन्हा कोलमडेन, कसाबसा सावरलेला अश्रूंचा बांध पुन्हा वाहू लागेल, पुन्हा स्वतःला त्या जगात हरवून बसेन या भीतीने कित्येक दिवस तिने तिच्या हृदयाच्या,मनाच्या अगदी जवळ असलेल्या दुर्लक्षित केलेल्या त्या रवीच्या बॅगला तिने आज हात लावला. आवडीच्या, आठवणीत राहाव्या, जपून ठेवाव्या अशा सगळ्या वस्तू रवी त्या बॅगेत ठेवायचा आणि जेव्हा कधी जुन्या आठवणीत हरवून जावंस वाटायचं तेव्हा एकांतात तो ती बॅग उघडून बसायचा. त्यावेळेस माया त्याच्या आजूबाजूला असली तरी त्याला ते जाणवायचं नाही इतका तो त्या संग्रहित आठवणींमध्ये हरवायचा. माया टोमण्यात कधीतरी त्याला म्हणायची देखील माझ्यापेक्षा महत्वाच्या अशा काय वस्तू आहेत त्यात की तू मलाही विसरून जातोस...त्यावर रवी तिला हसत म्हणायचा यात मीच आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावरचा मी तुला इथे सापडेन. माझ्या जीवापाड, हृदयाजवळच्या वस्तू यात आहेत. कधी माझी आठवण आली तर ही बॅग उघड..मी तुला इथेच सापडेन.

    रवीचा आवडता शर्ट,बेल्ट,जुने नाणी,लहानपणापासून मिळालेली प्रशस्तीपत्रक, ट्रॉफीज सगल्यावरून हात फिरवताना मायाला रवीच ते वाक्य आठवतं आणि पापण्याआड लपवलेल्या अश्रूंना वाट आपसूकच मोकळी होते. विस्कटलेले आयुष्य जसं सावरण्याचा प्रयत्न ती करत होती तशी ती सगळं सामान बॅगेत नीट ठेऊ लागली. एक नजर एका कोपऱ्यात पडली आणि तिला तिचा मेकअप बॉक्स दिसला. जो तिच्यासाठी जितका खूप खास तितकाच रवीसाठीही होता. भरल्या डोळ्यांनी तिने तो हातात घेऊन उघडला. फाउंडेशन, आयशँडो,मस्कारा,ब्लशर.. विविध रंगाच्या छटा बघून कितीतरी दिवसांनी रंगांशी पुन्हा ओळख होते असं वाटलं तिला. मेकअप बॉक्सचा दुसरा खण उघडला आणि सर्वात आवडते लिपस्टीकचे रंग तिला खुणावू लागले. खरंतर तिला बाकी मेकअप कधी आवडलाच नाही पण ओठांसोबत चेहऱ्याच, व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य खुलवणारी लिपस्टिक आणि तिचे रंग हे नेहमीच मायावर जादू करायचे.

  लिपस्टीकचा मोह म्हणा किंवा एखादी गोष्ट आपल्याला सहज मिळत नसेल तर त्या गोष्टीच मुळातच आकर्षण आपल्याला जास्त असतं तसंच कदाचित मायाचं झालं असावं. कुटुंब ग्रामीण भागात राहणार..वडिलांची अमाप शेती..घरात संपत्ती तशी चांगलीच नांदत होती म्हणायला हरकत नाही पण वडिलांचा कडक, शिस्तखोर आणि काहीश्या जुन्या विचारांना धरून असलेला विचित्र स्वभाव सगळ्यावर हावी व्हायचा. मुलींचं नटण मुरडन त्यांना अजिबात खपायच नाही. त्यांचा दरारा इतका होता की मायाची आई ते घरात असताना स्वतःला आरश्यात बघायलाही घाबरायची. नववी दहावीत असताना कोणत्यातरी कार्यक्रमानिमित्त मायाने मैत्रिणीची लिपस्टीक लावली होती आणि घरी येताना ती मेकअप उतरायला विसरली. मायाला त्या रुपात पाहून तिच्या वडिलांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि तिथेच तिच्या कानशिलात लगावली. "लाल चोच रंगवून कुठे नाचायला चाललीस का?? थोबाड रंगवून कुठे गेली होतीस??" या भाषेत तिला बरीच स्तुती सुमने ऐकावी लागली होती. आपल्याच घरचं अस वातावरण का?? बाकी काही नको पण लिपस्टीकही साधी लावू शकत नाही इतकं काय वाईट त्यात..यात काय नक्की चुकीचं?? अशी बरीच प्रश्न आईला ती विचारायची आणि "मुलीने साधं राहावं..हे असली रंगरंगोटी करून फिरू नये...चांगल्या घरच्या मुलींची लक्षण नसतात अशी" असे घरचे काही बाही नियम आई। त्यावर मायाला सांगायची पण त्या कोवळ्या वयात तिच्यापुढे फक्त लिपस्टीकचे रंग नाचायचे आणि सोबत बाबांचे लालभडक डोळे.

   पुढे कॉलेजच्या शिक्षणासाठी होस्टेलवर राहायला लागल्यावर एक दिवस मायाचे आई बाबा तिला नेहमीप्रमाणे भेटायला आले. मैत्रिणींसोबत फिरायला जायचं म्हणून मस्त तयार झालेली माया अचानक बाबा समोर दिसल्याने दचकली आणि डोळ्यात काजळ, ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टिक लावलेली माया दिसताच बाबा चांगलेच चरफडले. होस्टेलमध्ये तमाशा नको म्हणून त्यांनी स्वतःचा राग आवरला पण त्यांच्या नजरेतला तो जळजळीत राग मायाला ओरबाडत होता. आल्यापासून जाईपर्यंत बाबा मायाशी अवाक्षरही बोलले नाहीत. निरोप घेताना आईने मायाला बाजूला घेऊन समजावलं, "कितीदा सांगितलं मुलीच्या जातीने मेकअप वगैरे केलेलं आपल्या घरात, तुझ्या बाबांना चालत नाही. तुझी शिकायची इच्छा बघून त्यांनी तुला बाहेर शिकायची परवानगी दिली पण अशा वागण्याने तुझं शिक्षणही बंद पडणार नाही याची काळजी घे. नीट राहा"". आईच्या त्या बोलण्याचा मायाच्या मनावर खोल परिणाम झाला आणि तिने पुन्हा कधीच लिपस्टिकचा मोह धरला नाही. ते रंग आपल्या आयुष्यात नाहीत असंच मनावर बिंबवून ती लिपस्टिकला फक्त डोळ्यात साठवत जगली.

   लग्न होऊन माया सुखवस्तू,संपन्न अशा घरात आली. सासरे शेतीत गुंतलेले,सासूबाई गृहिणी आणि देशसेवेला स्वतःला अर्पण केलेला नवरा रवी अशा या त्रिकोणी कुटुंबात सुंदर, सालस मायाचं चौथ पान आनंदाने मिसळून गेलं. आर्मीत असलेल्या नवऱ्यासोबत लग्नानंतर तिला बाहेरचं जग मोकळेपणाने अनुभवता आलं. लग्नानंतरच्या पहिल्याच दिवाळीला रवीने तिला पहिली खास भेट म्हणून मेकअप बॉक्स दिला होता ज्यात हर तऱ्हेचे लिपस्टिकचे शेड्स होते. ते पाहून मायाच्या चेहऱ्यावर आनंद तर उमटला आणि झरकन तो नाहीसाही झाला. त्या लिपस्टीक पुढे तिला बाबांचे रागाने भरलेले डोळेच दिऊ लागले. रवीच्या नजरेतून तिची उदासीनता,भीती लपली नाही. प्रेमाने तिचा हात हातात घेऊन म्हणाला, "माफ कर पण तुझं लिपस्टीक वरच प्रेम आणि हे तुला मृगजळ वाटणार जग मला तुझ्या डायरीतून कळालं. तुला हेच गिफ्ट करायचं कारणही हेच आहे की मी तुला कोणत्याही बंधनात नाही ठेवणार. तुला जे आवडतं, कस आयुष्य जगावस वाटतं तस जग. तुझं अस्तित्व इतरांच्या नियमांशी, लादलेल्या विचारांशी बांधून न घेता तुला हव्या त्या रंगात जग. तू अशीही खूप सुंदर दिसतेस पण थोडा शृंगार केल्याने आणि या लिपस्टीकच्या रंगांनी या सौंदर्यावर अनोखा साज चढेल ज्यात तुझा मनापासून आनंद एकरूप झालेला असेल. या रंगांची साथ तुझ्या ओठांवर कायम झळकूदे..मी असो व नसो."

   माया ओठांनी न बोलता अश्रूंनी सारं बोलत होती...अकल्पित असं सुख आणि नवरा मिळाला म्हणून मनोमन देवाचे आभार होती. तिथून पुढचा तिचा प्रत्येक दिवस रवीच्या प्रेमात आणि लिपस्टिकच्या नवनवीन रंगात न्हाऊन निघत होता. रोज ओठांवर नवीन रंगाच हास्य खळाळत होतं.. पण नियतीला तीच ते हसणं मान्य नसावं की काय म्हणून एक दिवस रवी बॉर्डर वर असताना शहीद झाल्याची अचानक बातमी येते आणि मायाच्या आयुष्यात सगळे रंग फिके पडतात. रवी गेल्यानंतर घरच्यांचे नियम, पुन्हा बाबांचा दरारा आणि नवरा गेलेल्या बाईला समाजाने घालून दिलेली चौकट यात मायाचं आयुष्य पुन्हा पांढऱ्या रंगाच कोरं पान झालं होतं. रवीच्या आठवणी तिला जगण्याची उभारी द्यायच्या...तू मनापासून तुझी राहा..तू तुझ्यासाठी जग ही त्याची वाक्य सदा तिच्या कानात घुमून पुन्हा जगण्याची उमेद जागवायची पण लिखित अलिखित काही समाजातील प्रथा तिला पुन्हा हरवायच्या.

   पण आज हिंमत करून ती उठलीच...रवीची बॅग उघडली...त्याच्या आठवणीत त्याला जगली..त्याला अनुभवलं. मनाशी काहीतरी ठाम निर्णय घेऊन ती लिपस्टीकच्या रंगांना न्याहाळत बसली.

    दोन दिवसांनीच दिवाळीची सुरुवात झाली. रवीला जाऊन सहा महिने झाले होते पण त्याच्या आठवणी अजूनही ताज्याच होत्या.प्रत्येक दिवाळीला नवीन गिफ्ट देणारा रवी यावर्षी मायासोबत नव्हता..साहजिकच हे दुःख पचवणं तिला कठीण होतं पण शहीद जवानाची बायको ही वीरपत्नी असते. नरकचतुर्दशीच्या दिवशी मायाने सकाळीच अंगणात सडा टाकून सुंदर रांगोळी काढली. चेहऱ्यावरचं दुःखाच मळभ झटकून टाकून हसतमुख चेहऱ्याने घरात वावरत होती. पहिल्या दिवाळीला रवीने दिलेली हिरव्यागार रंगाची साडी नेसून, कपाळावर साजेशी टिकली लावून,डोळ्यात काजळ भरून आणि ओठांवर रवीनेच दिलेली लाल शेडची लिपस्टीक लावून ती दिव्यातील ज्योत लावत होती. तिला स्वतःची लेकच मानणारे सासू सासरे आणि तिला भेटायला आलेले तिचे आई वडील तिच्या आयुष्यातले हरवलेले रंग परत आलेले बघून खुशच झाले. इतकी महिने दुःखाच्या काळोखात झाकोळून गेलेला चेहरा नव्याने जगायची उमेद त्या ज्योतिच्या प्रकाशात उजळत होता. आज तिच्या नाजूक ओठांवरील लिपस्टिकचे रंग तिच्या बाबांना बोचत नव्हते तर तिच्या जगण्याचं तेच बळ आहे म्हणून समाधानी पावत होते.

    लिपस्टीकच्या रंगांनी मायाच्या आयुष्यात नवीन आत्मविश्वास,नवीन प्रबळ इच्छाशक्ती, नवा उत्साह,जगण्याची नवीन प्रेरणा आणली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama