Nisha Thore

Drama

4.5  

Nisha Thore

Drama

खरंच न्यायदेवता आंधळी असते??

खरंच न्यायदेवता आंधळी असते??

27 mins
3.2K


आज सोमवार.. आठवड्याचा पहिला दिवस होता. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर कोर्टाचे कामकाज सुरू झाले होते. त्यामुळे आज कोर्टात जरा जास्तच वर्दळ होती.. कोर्टासमोर आरोपी, फिर्यादी हजर होत होते. पुढच्या तारखा पडत होत्या.. काहींचे निकाल लागत होते. काही वकील आपल्या अशीलासोबत विचारविनिमय करत होते. काही बाहेर बसून आपला नंबर येण्याची वाट पाहत होते. तिथे येणाऱ्या प्रत्येक चेहऱ्याची कहाणी वेगळी.. तो सगळ्यांना न्याहाळत होता.. त्याला ते आता सवयीचं झालं होतं.. पहिल्यांदा जेव्हा तो आईसोबत आला होता तेव्हा खूप घाबरला होता. एखादा आरोपी असल्यासारखं वाटलं होतं.. 


आजही तो कोर्टाच्या आवारात येरझाऱ्या घालत होता.. कोर्टाने पुढची तारीख दिली होती.. तो त्याच्या वकिलाची वाट पाहात होता. फेऱ्या घालून थकल्यावर तिथेच तो एका ठिकाणी खाली बसला.. वयाच्या तिशीतच तो वृद्ध वाटू लागला होता. डोळ्याखाली काळ्या वर्तुळांनी जागा घेतली होती.. डोक्यावरचे केस विरळ झाले होते.. खूप दमल्यासारखा वाटत होता तो. डोळ्यात पाणी होतं.. गेली दोन वर्षे तो अशाच कोर्टाच्या वाऱ्या करत होता.. मनात प्रश्नांचं काहूर.. काय चूक होती माझी?? कशाची शिक्षा? पाण्यात दगड मारावा आणि पाण्याचा तळ ढवळून निघावा तसं झालं.. जीवनपट एखाद्या चित्रपटासारखा त्याच्या डोळ्यांसमोर तरळत होता.. 


'आकाश' एक हरहुन्नरी मुलगा.. एका मध्यमवर्गीय कुटुंबातला.

आकाशचे वडील खासगी नोकरीतून निवृत्त झालेले आणि आई गृहिणी.. एक मोठा भाऊ, वहिनी, दोन भाचरे.. दोन बहिणी त्यांची लग्ने झालेली.. खूप श्रीमंत नाही पण समाधानी कुटुंब.. आकाशचा मोठा भाऊ 'कॉम्प्युटर इंजिनिअर' एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये चांगल्या पदावर, त्याच्या पत्नीलासुद्धा चांगली नोकरी होती. आकाशची मोठी बहीण लग्न करून पुण्यात स्थायिक झालेली नोकरी करत होती. धाकट्या बहिणीचंही लग्न झालेलं.. आता फक्त आकाशच लग्नाचा राहिला होता.. त्याच्यासाठी वधुसंशोधन सुरू होतं. सगळे जवळचे नातेवाईक त्याच्यासाठी मुली पाहू लागले होते. 


आकाशला लहानपणापासूनच शिक्षणात गोडी फारशी नव्हती. त्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलं.. तरीही एका खाजगी कंपनीत नोकरी होती.. पगारही ठीक होता. रंगाने काळासावळा तरी दिसायला छान होता. स्वभावाने बोलका, गप्पिष्ट.. पटकन मैत्री व्हायची त्याची.. मोठा मित्रपरिवार.. लहानथोर सगळ्यांचा लाडका आवडता होता तो.. मुली सांगून येत होत्या पण शिक्षण कमी, कधी आर्थिक परिस्थिती साधारण, कधी त्याचा काळा रंग, कधी पत्रिका, कधी त्याची खाजगी नोकरी तर कधी धकाधकीचं मुंबई शहर.. अशा अनेक कारणांमुळे लग्न जमत नव्हतं.. 


आकाश आपल्या मोठ्या बहिणीकडे, स्मिताकडे काही दिवसांसाठी सुट्टीला राहायला आला होता.. नवीन शहर असूनही त्याची सगळ्यांची ओळख झाली.. तिथेच स्मिताच्या शेजारच्या काकूंनी एक स्थळ आणलं होतं.. पत्रिका जुळली.. आरती नाव होतं तिचं.. पाच बहिणींच्या पाठीवर परत झालेली.. पितृछत्र लहानपणीच हरवलं होतं.. आई कोणत्यातरी छोट्या सरकारी बँकेत साफसफाई, चहा देण्याचं काम करत होती.. परिस्थिती हलाखीची.. 


मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला. स्मिता आणि आकाश आरतीला पाहायला गेले. आरती फार सुंदर नव्हती पण दिसायला शांत.. मितभाषी वाटली.. आकाश आणि स्मिताला वाटलं की, गरिबाघरची मुलगी, तिला परिस्थितीची जाण असेल.. मोठ्या कुटुंबात सगळ्यांना सांभाळून राहील.. स्मिताला आणि आकाशला मुलगी पसंत पडली…


स्मिता आणि आकाशला आरती आवडली होती. स्मिताने घरी आई-बाबांना फोन करुन तसं कळवलं. आरतीचा फोटो व्हाट्सएपवर पाठवून दिला. त्यांनाही ती आवडली. आकाश तसा साधा सरळ... त्याला तशीच साजेशी मुलगी मिळाली होती..


एक मध्यमवर्गीय कुटूंब.. पुण्यात भाड्याचं घर.. आरतीचे मामा, दोन मावश्या तिथेच जवळपास राहात होते. आरतीची आई आपल्या पाच मुलींसोबत राहात होती. आरतीची आजी कधी तिच्या मामाकडे तर कधी आरतीच्या घरी राहायची. मुलगा हवा, वंशाचा दिवा होण्याच्या हव्यासापोटी पाच मुली लागोपाठ झालेल्या.. आजीनेच या सगळ्या बहिणींचे संगोपन केलं होतं. घरची हलाखीची परिस्थिती.. पदरात पाच मुलींना टाकून वडिल अकालीच देवाघरी गेलेले.. एकटी आरतीची आई कमवती.. मग अश्या वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलींच्या लग्नासाठी स्थळं कोण पाहणार!! 


आरतीच्या मोठ्या बहिणीने स्वपसंतीने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. तीही तिच्या नवऱ्यासोबत तिथेच जवळपास राहत होती.. तिला दोन लहान मुलं.. एक मुलगा मतिमंद.. आईकडेच सारखी ऊठबस.. आरती दोन नंबरची.. आरती वाणिज्य शाखेतून पदवीधर झाली होती.. आर्थिक ओढाताण.. अजून तीन बहिणी लग्नाच्या.. एक दोन वर्षांच्या अंतराने.. एकंदरीत काय!! तर आरतीच्या लग्नाने घरातलं खाणारं एक तोंड कमी होणार होतं. तिच्या आईचा आर्थिक भार कमी होणार होता..


मुलांची पसंती झाल्यावर आरतीच्या घरचे मुंबईला आकाशच्या घरी आले.. मुंबईसारख्या शहरात आकाशच्या वडिलांचं स्वतःचं घर, सुसंस्कृत कुटूंब, गावी वडिलोपार्जित थोडी शेती, मोठ्या भावाचं स्वतःचं घर.. ही सारी सुखवस्तू पाहून आरतीच्या घरचे सगळेच आनंदून गेले होते. त्यांच्याकडून होकार होता. सगळे खूप छान बोलत होते.. आकाशच्या घरच्यांनाही वाटलं.. गरीब कुटूंब आहे.. आरती मोठ्या कुटुंबात राहिलेली.. या कुटुंबात सामावून राहील.. आणि म्हणतात ना!! ‘मुलगी द्यावी श्रीमंताच्या घरी आणि सून आणावी गरिबांच्या घरची..’ म्हणून त्यांनाही या स्थळाची पसंती दर्शवली.


आकाशलाही वाटलं, आपलं शिक्षण कमी.. दिसायला सर्व साधारण, नोकरी ही अशी.. आधीच या कारणांमुळे नकार मिळालेले.. आरतीकडून होकार आल्यावर तो आंनदी झाला होता.. वाटलं त्याला.. आरती शिकलेली.. छान सांभाळून घेईल.. दोघे मिळून नोकरी करू.. सुखा समाधानाने संसार करू..अशी बरीच स्वप्नं त्याच्या डोळ्यासमोर फेर धरू लागली.. 


काही दिवसांनी लग्नाची पुढील बोलणी करण्यासाठी स्मिताने आरतीच्या घरच्यांना फोन केला. दोन्ही कुटुंबाच्या सवडीने बोलणी करण्यासाठी एक दिवस निश्चित केला. आकाशच्या घरातली त्याचे काका-काकी, मामा-मामी, सगळी थोर मंडळी आरतीच्या घरी गेले. बोलणी सुरू झाली..


अजूनही आपल्या समाजात वरपक्षातली मंडळी हुंडा, मानपान, सोनं नाणं, दागदागिने, देणंघेणं, सोनंनाणं, मुलाचा पोशाख, लग्नाचा खर्च, जेवण या सगळ्या गोष्टींचं ओझं मुलींच्या कुटुंबावर खुशाल टाकून मोकळं होतात. या गोष्टींचा मुलीच्या कुटुंबावर किती आर्थिक ताण येत असेल याची पुसटशी कल्पना ही त्यांना येत नाही किंवा येतेही पण ती मुलींच्या घरच्यांचीच जबाबदारी आहे अशाच अविर्भावात असतात.


आरती खरंच नशीबवान होती. आकाश आणि त्याचे कुटूंब खूप समजुतदार होते. आकाशच्या मोठ्या काकांनी स्पष्टपणे सांगून टाकले,"दोन्ही कुटूंब मध्यमवर्गीय आहेत आम्हाला हुंडा नको.. मुलीची आई एकटी कमवती आहे.. त्यांचा विचार करता लग्नाचा हॉल, जेवण, लग्नाला येणाऱ्या नातेवाईकांची येण्या जाण्यासाठी बसची सोय, लग्नाचा सगळा खर्च अर्धा अर्धा वाटून घेऊ.. तुम्हालाही आर्थिक ताण नको आणि आम्हालाही नको.." आरतीच्या घरच्यांना खूप आनंद झाला. जिथे संपूर्ण लग्नाची जबाबदारी घ्यावी लागली असती तिथे वरपक्षानेच हा प्रस्ताव मांडला होता.. त्यांनी पटकन होकार दिला.. सुपारी फुटली… साखरपुडा झाला.. लग्नाची तारीख काढण्यात आली..१ डिसेंबर लग्नाची तारीख ठरवण्यात आली.. गोड जेवणाच्या पंगती उठल्या.. एकमेकांना गळाभेट करून आकाशच्या घरच्यांनी त्यांचा निरोप घेऊन आपल्या घरी मुंबईला परतले..


दोन्ही कुटुंबातील मंडळी खुष होती.. दोन्ही कुटूंब लग्नाच्या तयारीला लागले.. लग्नाचा बस्ता, दागदागिने, भांडीकुंडी, खरेदीची तयारी सुरू झाली.. 


इकडे आकाश आणि आरती एकमेकांशी फोनवर बोलत असायचे.. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते.. आकाश आपल्या घरच्यांबद्दल, नातेवाईक मित्रमैत्रिणींबद्दल, नोकरीबद्दल भविष्याच्या नियोजनाबद्दल भरभरुन सांगत असायचा.. हे सगळं घडत असताना आकाशच्या एक गोष्ट लक्षात आली की, आरती फारशी बोलायची नाही.. फक्त हो हो करायची, ती कधीच भावी संसाराविषयी बोलायची नाही.. कधीच इतर मुलींसारखी करियरबद्दल बोलायची नाही.. खूप मितभाषी, संथ वाटायची.. एकदा आकाशने हे स्मिताला बोलूनही दाखवले. तेव्हा स्मितानेच त्याला समजावले.. हा प्रेम विवाह नाही अरेंज मॅरेजमध्ये असंच असतं.. समजून घ्यायला वेळ लागतो.. ती आधीच लाजाळू म्हणून कमी बोलत असेल.. आकाशलाही तिचं बोलणं पटलं.. आणि त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं..


लग्नाचा दिवस जवळ येत होता.. लग्नाची लगबग दिसू लागली.. आकाशही खूप उत्साहात होता.. आकाशची बहीणही ऑफिसच्या कामातून वेळ काढत आरतीच्या घरच्यांना मदत करत होती.. स्मिताने आरतीच्या बहिणीला सोबत घेऊन पाच सहा कार्यालये पाहिले.. त्यापैकी साधं आणि दोन्ही कुटुंबाला परवडेल अशा एका कार्यालयाची निवड केली. ऍडव्हान्स पेमेंटचा चेक स्मितानेच दिला. पुढे जाऊन साधी फुलांच्या सजावटीची ऑर्डर दिली. लग्नातल्या पंगतीला साधा मेनु निश्चित केला.. तिच्या सर्वात धाकट्या आणि लाडक्या भावाचं लग्न होतं.. ती खूप आनंदाने प्रेमाने सगळं पाहात होती..


आकाश आणि आरती दोघेही फोनवर एकमेकांशी बोलत होते. लग्नाच्या दिवसाची वाट पाहण्यात गुंग होते.. आकाशच्या आईनेही आरतीसाठी छान मंगळसूत्र, नेकलेस, सोन्याच्या बांगड्या केल्या.. आरतीच्या घरच्यांची परिस्थिती नाजूक असल्याने आकाशसाठी सोन्याची साखळी, अंगठीही केली.. लग्नाचा बस्ता बांधला. आकाशच्या वहिनीचीही तिच्या लग्नात तिची फारशी हौस झाली नव्हती म्हणून तिने छान साडी घेतली. मुलांसाठी कपडे, नणंदासाठी छान साड्या, सासू-सासऱ्यांसाठी कपडे घेतले. नवऱ्यासाठी सूट घेतला.. सगळी तयारी झाली.. मेहंदीसाठी पार्लरमध्ये जाऊन आली.. हळदीच्या दिवशी आकाशने मोठी जंगी पार्टी दिली. बॅंडबाजा डीजे, गाणी लावून सगळे खूप नाचले. आनंदाला जणू उधाण आलं होतं..


अखेर लग्नाचा दिवस उगवला. सकाळी लवकर मुंबईवरून बस करून आकाशचं कुटुंब नातेवाईक, मित्रपरिवार सगळे कार्यालयात हजर झाले.. लग्नातही आरती शांतच होती, उत्साह दिसत नव्हता. नव्या नवरीचं तेज चेहऱ्यावर दिसत नव्हतं. आकाशच्या घरच्यांना वाटलं लग्नाच्या दगदगीमुळे दमली असेल म्हणून चेहरा कोमजला असेल. ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी न झाल्यामुळे आकाशच्या पाहुण्यांची गैरसोय झाली.. नीट व्यवस्था होऊ शकली नाही. वरपक्षाकडून आलेले अर्ध्याहून अधिक पाहुणे लग्न होईपर्यंत उभेच.. आकाशच्या घरच्यांनी तरीही समजून घेतलं.. घरात कर्ता पुरुष नाही, आरतीची आई एकटी कुठे कुठे पाहणार..!! थोडं घेऊ संभाळून.. अखेरीस लग्न पार पडलं.. आरतीच्या घरच्यांचा निरोप घेऊन सगळी वरपक्षातली मंडळी मुंबईला निघाली..


आरतीने माप ओलांडून गृहप्रवेश केला.. आकाशच्या घरच्या मंडळींनी नव्या नवरीचे मोठ्या थाटात स्वागत केले.. आरतीबरोबर तिची धाकटी बहीण पाठराखीण म्हणून सोबत आलेली.. लग्नानंतरच्या विधी आटपून घेतल्या.. सगळे देवदर्शनासाठी, कुलदेवतेची पूजेसाठी त्यांच्या गावी जाऊन आले. गावचं घर, शेतीवाडी पाहून झालं. देवदेव झालं. आणि सगळे मुंबईला घरी परतले. स्मिताने लग्नात भेटवस्तू देण्यापेक्षा आकाश आणि आरतीसाठी केसरी टूरकडून गोवा ट्रिपची दोन तिकिटं काढून दिली. आकाश आणि आरती फिरायला गोव्याला निघून गेले.


आकाश आणि आरती गोव्याला फिरायला गेले दोन दिवसांतच परत आले. घरातले सगळे विचारत होते. का लवकर आलात? आकाशने कामावर लवकर रुजू होण्याचं कारण सांगितलं. पण दोघेही शांतच.. दुसऱ्या दिवशी आरतीला माहेरी पाठवणी करायची होती. आकाशच्या आईने आरतीच्या बहिणीला नवीन ड्रेस घेतला, आहेर देऊन पाठवणी केली.. सोबत आकाशही पुण्याला आला.. आरती माहेरी आली.. तिला माहेरी सोडून आकाश स्मिताला भेटायला आला. 


आकाश घरी आल्यापासून शांतच होता.. स्मिताची बडबड सुरू होती.. लग्नातल्या गंमतीजंमती सांगत होती. पण त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्षचं नव्हतं.. काहीतरी बिनसलंय हे स्मिताच्या लक्षात आलं. आकाशच्या खांद्यावर हात ठेवत तिने त्याला विचारलं, "काय झालंय रे आकाश?" तसा आकाशचा बांध फुटला.. त्याच्या डोळ्यांत पाणी होते.. स्मिताला काळजी वाटत होती.. ती पुन्हा पुन्हा त्याला विचारू लागली.. तेव्हा कुठे आकाश बोलता झाला.


तो सांगू लागला,"ताई!! आरतीचं काहीच समजत नाही गं!! कधी प्रेमाने बोलते, कधी उगीच चिडते.. आम्ही गोव्याला गेलो तेव्हाही तसंच.. कुठेतरी एकटक शुन्यात बघत असते.. बाहेर जेवायला गेलो तरी तिथेही तसंच.. इतका वेळ ताटात हात घालून उगीच अन्न चिवडत बसली.. माझं जेवण होऊन एक तास बसून राहिलो होतो तरी तिचं संपत नव्हतं. शेवटी मी कंटाळुन म्हटलं आवर लवकर.. किती हळूहळू जेवतेस.. तिला त्याचा राग आला.. तशीच अर्धवट जेवण टाकून उठली. रात्री तिला जवळ घेतलं तर दूर केलं.. ढकलून दिलं.. आणि मग मी झोपी गेल्यावर मध्यरात्री उठून अंगाशी लगट करू लागली.. आम्ही खूप जवळ आलो.. सकाळी उठलो तर परत तशीच एकटीच बसून काहीतरी पुटपुटत होती. कुठेतरी शून्यात पहात होती. मी तिला हात लावला तशी माझ्यावर जोरात धावून आली विचित्र डोळे करू लागली.. मी घाबरलो आणि ट्रिप अर्धवट सोडून परत घरी निघून आलो..”


स्मिता आकाशकडे आश्चर्याने पाहू लागली.. तिच्यासाठी सगळं हे नवीनच होतं.. तरी त्याला धीर देत म्हणाली,"मी बोलते आरतीशी.. तुम्ही एकमेकांसाठी अनोळखीच.. नवीन असताना असं होऊ शकतं. तिला आपल्यात सामावून घ्यायला थोडा वेळ लागेल.. थोडा वेळ जाऊ दे.. सगळं ठीक होईल.." बहिणीच्या शब्दांनी आकाशला धीर आला. सगळं ठीक होईल ही आशा मनात जागवून गेली..


आकाशच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. स्मिताने धीर दिला खरा पण तीही मनातून थोडी घाबरली होती.. भावाचं लग्न करून आपण चूक केली नाही ना?? मनात शंका येऊन गेली. ‘हे देवा!! माझ्या भावाचं रक्षण कर’ असं म्हणत तिने देवापुढे हात जोडले. 


दोन दिवसांनी स्मिता आणि आकाश आरतीच्या माहेरी तिला परत घेऊन जाण्यासाठी आले. तिच्या घरच्यांनीही छान आदरातिथ्य केले. स्मिताने आरतीच्या आईजवळ आरतीचा विषय काढला.. त्या म्हणाल्या,"नाही तसा काही प्रॉब्लेम नाही. फक्त ती कमी बोलते शांत आहे.. लग्नाच्या दगदगीने दमली असेल म्हणून चिडचिड केली असेल.. काळजी करण्याचं काही कारण नाही.." त्यांचं बोलणं स्मिताला पटलं. ती आरतीला घेऊन तिच्या घरी आली.


स्मिता आरतीला म्हणाली,"आरती, मी तुझी नणंद नसून बहिणीसारखीच आहे. तू माझ्यासोबत सगळं शेअर करू शकते. तुझं हे लग्न तुझ्या मर्जीनेच झालंय ना? आकाश आणि तुझ्यात काही मतभेद नाही ना?" आरती शांत होती.


ती हळू आवाजात बोलली,"नाही तसं काही.. हे लग्न माझ्या मर्जीनेच झालंय. आमच्यात काहीच वाद नाही..”


आकाश आणि आरती स्मिताचा निरोप घेऊन मुंबईला परतले. आकाश नेहमीप्रमाणे लवकर कामावर जात असे. आकाशचा मोठा भाऊ व वहिनी दोघेही लगेच त्याच्या मागोमाग कामावर निघून जात. मुलांची सकाळची शाळा. दिवसभर घरी फक्त आकाशचे आईबाबा आणि आरती तिघेच. मुलं दुपारी शाळेतून घरी यायचे थोडा वेळ जेवण करून झोपी जायची परत संध्याकाळी क्लासला.. आकाशचे भाऊ वहिनी रात्री आठ वाजता घरी यायचे.. आणि आकाश दहा वाजता.. खाजगी कंपनी असल्याने खूप काम असायचं. त्यात लग्नामुळे आकाशच्या बऱ्याच रजा झाल्या होत्या त्यामुळे कामाचा व्याप जास्त होता. 


सुरुवातीचे काही दिवस आकाशची आई, वहिनी आरतीला काम सांगत नसत. नवीन आहे अजून सासरच्या पद्धती अंगवळणी पडायला वेळ लागेल म्हणून तिला समजून घेत होत्या. लहान आहे जेवण बनवता येत नसेल म्हणून आकाशची आई तिला जेवण बनवायला शिकवत होती.. पण त्यांच्याही लक्षात आलं की आरती फार संथ गतीने काम करते.. नवीन असेल म्हणून होत असेल. असं स्वतःचीच समजूत घालत होत्या. पण त्याही थकल्या होत्या. त्यांचही वय झालं होतं. घरातली सर्व कामं झेपत नव्हती. आणि सून घरात असूनही त्यांनाच सर्व काम करावे लागायचे. 


हळूहळू सगळ्यांच्याच हे लक्षात येऊ लागलं. आरती फारशी कोणाशी बोलायची नाही. एकटीच तिच्या खोलीत बसून राहायची. एकटक शुन्यात पाहत.. कितीही आवाज दिला तरी तिला ऐकूच जायचं नाही. मग एकदम ‘ओ’ द्यायची झोपेतून जागं व्हावं तसं.. आकाशच्या आईला वाटायचं निदान आकाशचं, आपल्या नवऱ्याकडे तरी तिने बायको म्हणून लक्ष द्यावं. पण तसं घडायचं नाही. त्याचे कपडे, त्याचा डब्बा सगळं आईच करायच्या. आरती कोणत्याच कामाला स्वतःहून हात लावत नसायची... सांगेल तितकंच करायची. जेवण बनवता येत नसल्यामुळे सगळा भार आकाशच्या आई आणि वहिनीवर पडू लागला. घरात आरती असतानाही ऑफिसवरून येऊन घरातलंही तिलाच पाहावं लागल्यामुळे घरात दोघा नवरा-बायकोमध्ये कुरबुर होऊ लागली. त्याचे पडसाद सर्व कुटुंबावर उमटू लागले. 


घरातली शांतता भंग पावली.. आकाशच्या आईने स्मिताला सांगितले. त्याचबरोबर आरतीच्या आईलाही सांगितले. स्मिताने तिच्या आईला घरी बोलवून घेतले. सगळं सविस्तर सांगितलं. त्या ही गोष्ट मान्य करतच नव्हत्या. ती शांत आहे फक्त बाकी काही प्रॉब्लेम नाही असचं बोलत राहिल्या. स्मिता म्हणाली,"ती कामाला चपळ नाही. खूप सावकाश काम करते. तिला घरातलं काहीच काम येत नाही. तुम्ही आम्हाला सर्व खोटं सांगितलं की आरतीला सगळं येतं. कामाचं जाऊ दे निदान घरात सर्वांशी मिळून मिसळून तरी राहायला हवं ना. एकटीच आपल्या खोलीत बसून असते. सगळ्यांच नको कमीत कमी नवऱ्याचं तरी पाहायला हवं ना. थोडी मंद आहे जशी. काही बोललेलं समजत नाही. स्वतःच्या धुंदीत असते.. असं कसं चालेल?" 


झालं!!! भांडण करण्यासाठी इतकंच कारण पुरेसं झालं. त्या तावातावाने भांडू लागल्या. ''तुम्ही चंचल मुलगी पाहायची होती. माझ्या मुलीला मोलकरीणीची कामे देता. धुणीभांडी करायला सांगता. माझी मुलगी काय वेडी आहे का?? असं कसं तुम्ही बोलता?" आणि त्या रागाने निघून गेल्या. स्मिता गोंधळून गेली..

तिला असल्या वादाची सवय नव्हती. त्या तिलाच खूप काही बोलून गेल्या.. एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं आपण चुकीच्या लोकांशी सोयरीक केलीय.. कोणाशी बोलणार.. सगळ्यांच बायका बोलायला गेलं की भांडायला उठायच्या.. काय करावं तिला काय कोणालाच समजत नव्हतं.


आकाश दिवसेंदिवस अशक्त होत चालला होता. काळजीने प्रकृती ढासळत चालली होती. बायको म्हणून त्याला आरतीकडून कोणतेच सुख मिळत नव्हतं. बाहेर ऑफिसची चिंता आणि घरी आल्यानंतर आईकडून आरतीविषयी ऐकायला मिळायचं.. तो खूप वैतागला होता. कोणी मित्राने त्याला सांगितलं की दारू पिल्याने दुःख कमी होतं. म्हणून तो दारू पिऊ लागला. चांगला मुलगा असा देशोधडीला लागला होता. दारू पिऊन आला की तो कोणाशीच न बोलता न जेवता झोपी जायचा. तो कोणालाच त्रास देत नव्हता पण स्वतःलाच त्रास करून घेत होता..


लग्नाला तीन महिने झाले होते पण घरात आनंद नव्हता. आरती तशीच वागत होती.. तिला इथे राहायचं नव्हतं तिने तसं आकाशला सांगितलं.. त्यालाही वाटलं रोज वाद घालण्यापेक्षा तिला तिच्या घरी सोडून आलेलं बरं म्हणून तो तिला तिच्या माहेरी सोडून आला


आरती माहेरी आली.. काही दिवसांनी तिच्या आईचा आकाशच्या घरी फोन आला आरतीला बरं वाटत नव्हतं.. आकाश लगेच आरतीला भेटायला आला.. स्मिता बरोबर होतीच. आरतीला जवळच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेला. तिच्या काही टेस्ट झाल्या.. आरतीला दिवस गेले होते.. लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात ही बातमी.. खरंतर बातमी आनंदांची होती.. पण आकाश चिंताक्रांत झाला.. आरतीला स्वतःला नीट सांभाळता येत नव्हतं ती अजून एक जबाबदारी घेऊ शकेल का?? प्रश्नांचं काहूर माजलं होतं.. 


स्मिताने आकाशला पुन्हा एकदा धीर देत सगळं नीट होईल अशी खात्री दिली.. ती म्हणाली,"लग्न झालंय आता निभावून नेलं पाहिजे.. एखादं मुल झालं, जबाबदारी पडली की सुधारेल.. आई झालं की सगळंच बदलतं बाळा!" तिच्या बोलण्याने आकाशला पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला.. कदाचित सुख येईल असं वाटू लागलं.. 


आरती आणि आकाश काही दिवस स्मिताकडे राहिले.. स्मिता नेहमी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायची.. स्मिताच्या आयुष्यात काही वाईट घटना घडून गेलेल्या.. समाजात वावरताना आलेले वाईट अनुभव आरतीला सांगायची.. आताही घरात फक्त चार माणसंच होती सगळे कामानिमित्त बाहेर असायचे.. ती एकटीच घरात… फक्त चार माणसांचं काम करावं लागायचं.. पण तरीही ती निरुत्साही असायची.. स्मिता तिला समजावून सांगायची, "छान दिसावं नवऱ्याला आवडेल असं राहावं.." पण सगळं जैसे थे.. सुधारणा नव्हतीच..


आरतीला सहावा महिना सुरू झाला होता.. तिची आई घरी येऊन आरतीला घेऊन गेली.. तेही वाद करून.. गणपतीच्या दिवसात घरी देव बसलेले.. तरीही वाद झालाच.. अगदी आकाशची बायको सांभाळण्याची लायकी काढण्यापर्यंत.. भाड्याने घर घेण्याची ऐपत नाही.. बऱ्याच गोष्टी बोलून गेल्या.. आता मात्र स्मिता संतापली.. तिच्या भावाची लायकी काढण्यापर्यंत मजल गेली होती.. म्हणून तीही वादाला पेटली.. शब्दाने शब्द वाढत गेला.. एकमेकांच्या घराण्यावर, चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले.. आणि नात्यात दुभंग पडत गेला.. 


आरतीची आई आरतीला तिच्या घरी घेऊन गेली.. पण त्याही अवस्थेत आकाशने आरतीची साथ सोडली नाही.. त्याने स्मिताशी वाद घातला.. गरोदर बायकोला झालेला त्रास पाहून त्यालाच वाईट वाटले होते.. तो रागाने स्मिताच्या घरातून परत मुंबईला निघून गेला..


बरेच दिवस दोघे भाऊ-बहिण एकमेकांशी बोलत नव्हते.. सगळी नाती एक नातं जपण्यासाठी विस्कळीत झाली होती.. एकत्र कुटुंब विभाजित झालं होतं.. घरातला आनंद शांतता लोप पावली होती..


आरतीने एका मुलीला जन्म दिला.. गोड सुरेख मुलगी.. सोनपरी जन्माला आली.. इवलेसे डोळे, गोरा रंग.. सोनपावलांची नाजूक जिवनीची सुंदरी.. सोनचाफ्याची पाकळी जशी.. आरतीच्या घरची परिस्थिती नाजूक म्हणून आकाशने हॉस्पिटलचा खर्च म्हणून तिला दहा हजार रुपये दिले.. आई आणि बाळ दोन्ही सुखरूप होते.. 


सगळं ठीक झाल्यानंतर आरती हॉस्पिटलमधून घरी आली.. घरी आल्यावर तिला परत त्रास होऊ लागला.. म्हणून त्यांनी तिला दुसऱ्या डॉक्टरांना दाखवून घेतलं.. तेव्हा लक्षात आलं की आरतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळेस काही अडचणी आल्या.. आणि शस्त्रक्रिया चुकीची झाली.. हे कळल्यावर तर तिच्या घरच्यांचा पारा अजूनच चढला आणि त्यांनी रागाच्या भरात हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनाचं मारहाण, तोडफोड केली.. हॉस्पिटलमधल्या स्टाफने पोलिसांना फोन केला.. पोलिसांनी त्या सर्वांना पोलीस कोठडीत तीन दिवस बंद केले.. पेपरमध्ये बातमी छापून आली..


आता काही दिवसांनी आकाश त्याचे आई-वडील, मोठा भाऊ, वहिनी सगळे जण आरतीला परत मुंबईला घेऊन जायला आले.. आरतीने आपलं सगळं समान पॅक केलं आणि छोट्या बाळाला घेऊन मुंबईला आली..


आकाश आपल्या कुटुंबासोबत आरती आणि मुलीला घेऊन आपल्या घरी मुंबईला आला.. लहान मुलीच्या येण्याने घरात पुन्हा एकदा आनंदी वातावरण निर्माण झालं.. सोनपरी ती.. तिचं गोड लोभसवाणे हसणं अगदी भुरळ पाडण्यासारखं.. आकाशच्या भावाची मुलंही लहान बाळाच्या येण्याने खुष होती.. आजी-आजोबा नातीचं करण्यात व्यस्त झाली.. सगळं छान झालं असं वाटत होतं.. पिल्लूच्या येण्याने स्मिताही राग विसरून आपल्या भाचीच्या गोड किमया पाहण्यात गुंग झाली.. मागचं सगळं विसरून परत आकाशशी बोलू लागली..


सर्वांना वाटलं आता आरतीमध्ये सुधारणा होईल. आईची जबाबदारी अंगावर पडली की बरोबर तिला समजू लागेल.. पण तसं काहीच घडलं नाही.. उलट ती जास्तच वेंधळेपणा करू लागली.. मुलीला भरवणं, तिचं आवरणं तिला जमेना.. ती कोणाला मुलीला हात लावू देईना.. दोन दोन दिवस मुलीला आंघोळ नसायची.. दोघी मायलेकींच्या केसात ऊवा झालेल्या.. स्वतःची बेडरूमही आवरण्याचं भान तिला नसायचं. आता मात्र आकाशच्या आईची चिडचिड होऊ लागली.. 


आरतीच्या एकंदरीत वागणुकीला सगळेच कंटाळून गेले होते.. अमेय आकाशचा जीवलग मित्र.. नेहमी हसतमुख असणाऱ्या आपल्या मित्राला उदास पाहून तो काळजीत पडला. खूप खोदून विचारल्यावर आकाशने सगळी कर्मकहाणी सांगितली. अमेयने त्याला धीर दिला तो म्हणाला,"घाबरून जाऊ नकोस. काही झालेलं नाही. तू वहिनीला मानसोपचारतज्ज्ञाकडे का घेऊन जात नाहीस?" हे ऐकून आकाश अमेयवर खूप चिडला.


रागावून म्हणाला,"तुला काय म्हणायचं माझी बायको वेडी आहे?.. डोकं फिरलंय का तुझं??"


अमेय शांतपणे म्हणाला,"आकाश तिथे उपचार घेणारी माणसं वेडी असतात असं कोण म्हणतं? मनावर कधी कधी आघात होतो. आणि संयम सुटतो.. भान हरपतं.. काही नसेल तर ठीक आहे.. दाखवून घ्यायला काय हरकत आहे?" आकाशला त्याचं म्हणणं पटलं. अमेयने त्याच्या माहितीतल्या मानसोपचारतज्ज्ञाचा पत्ता दिला.


आकाश आरतीला घेऊन मानसोपचारतज्ज्ञाकडे आला. त्यांनी आरतीच्या काही टेस्ट केल्या. एकांतात तिच्याशी चर्चा केली.. आणि त्यांना दुसऱ्या दिवशी यायला सांगितले.. दुसऱ्या दिवशी आरती आणि आकाश क्लिनिकमध्ये पोहचले.. त्यांनी रिपोर्टस पुन्हा एकदा शांतपणे तपासले.. दीर्घ श्वास घेत म्हणाले,"आकाश शांतपणे ऐक, आरती मतिमंद नाही.. स्वमग्न स्वरूपातील हा आजार.. ही मुलं शांत असतात..स्वतःमधेच मग्न असतात.. पण त्यांना आजूबाजूला काय सुरू आहे ते समजतं. वरवर शांत दिसणारी ही मुलं कधी कधी उद्विग्न होतात.. तेव्हा आपल्याला सांभाळून घ्यावे लागते. आरती औषधोपचाराने ठीक होऊ शकते घाबरण्याचं कारण नाही.." हे सगळं ऐकून आकाश एकदम सुन्न झाला. काय बोलावं त्याला समजेना. आता त्याला आरतीच्या आतापर्यंतच्या वागण्याचा अर्थ समजू लागला. डोळ्यात पाणी होतं. त्याने डॉक्टरांच्या निरोप घेतला. मेडिकलमधून लिहून दिलेली औषधे घेतली आणि रिक्षा करून आरतीला घेऊन घरी आला.


आकाश घरी आला. शांतपणे आपल्या खोलीत बसून होता.. आई कधी खोलीत आली त्याच्या लक्षातच आले नाही. आईने मायेने पाठीवरून हात फिरवत विचारलं, “काय झालं बाळ ??"


त्याला खूप भरून आलं होतं.. “आई आपण फसलो गं!!" एवढेच शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले. आणि तो आईला पोटाशी घट्ट मिठी मारून धाय मोकलून रडू लागला. आकाशने सारा वृत्तांत आईला सांगितला.. आईला कळून चुकलं होतं. आपली फसगत झालीय. चुकीच्या लोकांशी सोयरीक केलीय. तिने आकाशला समजावले.


धीर देत म्हणाली,"बाळ आकाश..!! लग्न झालंय.. एक मुलगी आहे.. ती तुझी बायको आहे.. त्या लोकांनी फसवलं हा विचार डोक्यातून काढून टाक.. समज लग्नानंतर झालं असतं तर स्वीकारलं असतं ना.. मग तसंच समज. आपण तिच्यावर उपचार करू ती बरी होईल. स्वामी आपल्या पाठीशी आहेत काही काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल.” आईच्या शब्दांनी त्याला धीर आला.


त्यानंतर दोन-तीन दिवस शांतपणे गेले. सगळ्यांचं रात्रीचं जेवण आटोपलं.. भांडीकुंडी घासून आकाशची आई, वहिनी सगळे आपापल्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेले.. आकाशची छोटी चिऊ शांतपणे गाढ झोपली होती.. गोड पिल्लू ते.. निरागस.. आकाशलाही झोप लागतच होती.. अचानक आरती रडू लागली.. "मला माझ्या आईकडे जायचं आहे.. आताच्या आता.. मला घरातलं काहीच जमत नाहीये.. नाहीतर मी इमारतीवरून उडी टाकून आत्महत्या करेन.. माझी मुलगी आहे कोणी हात लावायचा नाही.. सोडा मला माझ्या आईकडे.." ती खरंच खूप उद्दिग्न झाली होती.. आकाशने खूप आवरण्याचा प्रयत्न केला पण ती आवरत नव्हती.. शेवटी आकाशने घरातल्या सगळ्यांना उठवलं. आणि अमेयला बोलवून घेतलं आणि त्याच्याचं कारने आईला सोबत घेऊन तिला माहेरी घेऊन आला.


आकाशने घरी आल्यावर आरतीच्या आईला सगळ्या घटना सांगितल्या.. पण त्या ते मान्य करायला तयार नव्हत्या.."तुम्हीच माझ्या मुलीला त्रास दिला असेल म्हणून ती अशी वागत असेल.. इथे ती व्यवस्थित होती." आणि त्या वाद घालू लागल्या..


आकाशने समजावून सांगितले.. "तिला मुंबईला राहायचं नाहीये. तुम्हीच विचारा तिला." आरतीने मान हलवली.. तिच्या आईचा मग नाईलाज झाला.. आणि त्यांनी आरतीला ठेवून घरी ठेवून घेतले. 


आरती माहेरी आली होती.. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती.. एकटी आई कमावती होती. आणि आता लहान बाळही घरात.. घर चालवणं कठीण झालं होतं. परी एक वर्षाची झाली होती. आरतीच्या घरच्यांनी तिचं नाव 'काव्या' ठेवलं. पहिला वाढदिवस झाला. त्यांनी आकाशला त्याच्या घरच्यांना निमंत्रण सोडा साधं कळवलंही नाही.. आकाश खूप दुःखी झाला. वडील म्हणून तो आपल्या बाळासाठी काहीच करू शकत नव्हता. त्या छोट्याशा बाळाला तिचे बाबासुद्धा माहीत नव्हते.. 


आरतीच्या घरच्यांच्या वागण्याचा आकाशला खूप त्रास झाला. वादाच्या वेळेस वापरलेले अपशब्द त्याला सारखे आठवत राहायचे.. मुलीशी बोलण्याची इच्छा असूनही तो बोलू शकत नव्हता.. जेव्हा जेव्हा तो तिच्यासाठी फोन करायचा.. ती झोपलीय. ती फोन घेत नाही.. असं त्याला सांगितलं जायचं. आकाशला खूप वाईट वाटायचं... कशी घेणार ती फोन.? तिला आपले वडील कोण हे सुद्धा माहीत नाही तर तिला प्रेम कुठून वाटणार..?? त्याचेच त्याला पडलेले प्रश्न.. येईल परत कधीतरी.. रक्ताचं नातं आहे.. इतक्या सहजासहजी कसं तुटेल?? तो स्वतःचीच समजूत काढायचा.


आणि एक दिवस एक वादळ आलं.. सगळं नेस्तनाबूत करण्यासाठी.. आकाशला उद्ध्वस्त करण्यासाठी.. आकाश आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रास देण्यासाठी.. त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी आरतीच्या घरच्यांनी एक शक्कल लढवली. कोर्टाची नोटीस आकाशच्या हातात पडली.. आरतीच्या घरच्यांनी आकाशवर आणि त्याच्या कुटुंबियांवर कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केली. त्याचबरोबर महिला मानव अधिकार मंडळातही केस दाखल केली. यात आकाश, आकाशची आई, स्मिता, धाकटी बहीण, आकाशची वहिनी या सगळ्यांना गोवण्यात आलं. पहिली नोटीस स्थानिक पोलीस चौकीत गेली.. तिकडून आकाशला फोन आला. आणि सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं.. कधीही पोलीस चौकीत पाऊल न ठेवलेले कुटूंब आज पोलीस स्टेशनमध्ये उलट सुलट प्रश्नामुळे हैराण झाले होते… आणि कोर्टाच्या तारखा पडू लागल्या.. सारखं पुणे-मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागत होत्या.. 


काही दिवसांनी कोर्टात दोघांचं समुपदेशन झालं.. काय त्रास होतोय हे आरतीला सांगताच येत नव्हतं.. खरंतर तिची मोठी बहीण तिचा झालेला खोटा त्रास सांगत होती.. न घडलेल्या घटनांचा उल्लेख त्या नोटीसमध्ये होता.. मुलगी झाली म्हणून सासू त्रास देते.. मोलकरणीची कामे सांगतात.. नवरा दारू पिऊन मारहाण करतो, अनैसर्गिक शारीरिक संबंध.. मोठी नणंद त्रास देते.. जाऊबाई कामावरून बडबडत असते आणि बरंच काही.. हे सगळं वाचून, ऐकून आकाशचा संयम सुटत चालला होता. ज्या मनोरुग्ण मुलीला आपण इतकं सांभाळून घेतलं ती अशी बोलतेय..?? त्याची तळपायाची आग मस्तकात जात होती. वयोवृद्ध आईला होणारा प्रवासाचा त्रास.. काही मार्गच सापडत नव्हता. 


सन्मानिय न्यायालयासमोर आरती आणि आकाशला प्रश्न विचारले गेले. चौकशी करताना न्यायाधीशांच्या लक्षात आलं की आकाशच्या घरचे सगळे सुशिक्षित, मोठी नणंद खाजगी संस्थेत मोठ्या हुद्यावर.. पुण्याहून ती कधी त्रास द्यायला गेली असेल? आरतीला विचारणा केल्यावर आरती गोंधळली. तिने मग आपलं विधान बदलून धाकट्या नणंदेचं नाव सांगितलं. आकाशने रागाच्या भरात आरतीच्या घरच्यांनी डॉक्टरांना केलेली मारहाण आणि त्यांना झालेल्या तीन दिवसांच्या पोलीस कस्टडीबद्दल सांगितले. तशी बातमी छापून आलेलं वर्तमानपत्रातलं कात्रण दाखवलं.. त्यांचं पितळ न्यायालयासमोर उघडं पडलं. आरतीच्या आईने आणि आजीने घातलेल्या गोंधळामुळे त्यांना न्यायालयाने बाहेर जाण्याचे आदेश दिले. 


न्यायाधीश महोदयांनी आरतीला काय त्रास दिला? असा प्रश्न विचारला.. ती गोंधळून गेली. ती काय त्रास झाला हे सांगू शकली नाही.. न्यायालयाने आरतीला नांदायला जायला तयार आहेस का? असा प्रश्न विचारला. आरतीने होकारार्थी मान हलवली. आकाशलाही विचारलं, "ही परत नांदायला आली तर तुमची काही हरकत नाही ना..?" मुलीसाठी आकाशही हो म्हणाला. न्यायाधीशांनी सुनावणी करताना म्हटले,"आरतीला नेमका त्रास काय आहे हे सांगता आले नाही. आरतीच्या घरच्यांमुळे तिचा संसार तुटतोय. तरी त्यांनी मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये. आरतीने नांदायला जावं. तीन महिने देखरेखीखाली ही केस राहील.. तेव्हाही आरतीला त्रास झाला आणि तिने तसं न्यायालयासमोर सांगितलं तर केस पुढे चालू राहील.." न्यायालयाने आरतीला घेऊन जाण्याचे आदेश दिला. 


आकाशने आरती मनोरुग्ण आहे हे त्याच्या वकिलाला सांगितले पण वकिलांनी पुरावा मागितला. ती मनोरुग्ण असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट आहे का? असं विचारलं.. ती घटना एक वर्षापूर्वी घडलेली.. ना कोणते रिपोर्ट्स ना कोणता पुरावा.. काय सांगणार.?? तो नाही म्हणाला.. आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत मुलीसाठी आकाश आरतीला परत घेऊन जायला तयार झाला.


आरती आपल्या मुलीला घेऊन परत मुंबईला आली. स्मिताने तिच्या आईला, मोठ्या वहिनीला आणि आकाशला समजावून सांगितलं, "जे झालं ते विसरून जा.. आपल्या बाळासाठी सगळं सहन करा.. सोन्यासारख्या मुलीचा यात काय दोष?? आई तू तिला काहीच बोलू नको.. चिडचिड करू नको तुला जितकं जमतं तितकं काम कर.. नाहीतर कामाला बाई ठेव. पण आरतीकडून कोणत्याही कामाची अपेक्षा करू नकोस." सगळ्यांना तिचे म्हणणे पटले. सगळे त्या चिमुकल्या बाळाकडे बघून सहन करत राहिले.


घरकामात आरतीची कोणतीच मदत होत नव्हती. आकाशची आई तिला जमेल तितकी कामे करत होती. नातीच्या बालकिमया पाहण्यात रमून जायची. जो तो आपापल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त झाला. 


तीन महिन्यांनी आरती आणि आकाशला पुन्हा न्यायालयासमोर हजर व्हावे लागले. तेव्हा आरतीला विचारण्यात आले. आरतीला कोणताच त्रास नव्हता. काय सांगणार होती? आरतीने सगळं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. मी आनंदात आहे असं सांगितलं. त्यामुळे सगळे निर्दोष म्हणून आरोप बरखास्त केले. न्यायालयाला केस बरखास्त करावी लागली..


आरती पुन्हा घरी मुंबईला आली. काव्या अडीच वर्षांची झाली होती.. लग्नानंतरच्या तीन वर्षांच्या काळात आरती सलग सहा महिनेही सासरी नांदली नव्हती.. वारंवार माहेरी जाणंयेणं होतंच. आकाश आपला मोडलेला संसार सावरण्याचा प्रयत्न करत होता.. वैवाहिक सुख तर कधीच संपुष्टात आलं होतं. ते विसरण्यासाठी जडलेलं व्यसन.. त्याची प्रकृती ढासळत चालली होती. पण त्याचं स्वतःकडे लक्षच नसायचं.. मुलीच्या सुखासाठी सगळं सहन करत होता.. 


काव्याचं बालवाडीत नाव टाकायचं ठरलं. घराशेजारीच एक छोटी शाळा होती. तिथे आकाशाची आई पैसे भरून ऍडमिशन करून आली. पिल्लू शाळेत जाणार होतं. नवीन शाळेचा युनिफॉर्म, बूट, दप्तर पाटी पेन्सिल सगळी खरेदी झाली. फोटो काढण्यात आले. सगळे खुष होते. 


स्मिता वरचेवर घरी फोन करायची. आरतीची विचारपूस करायची. आरती फक्त तिच्याशीच बोलायची. "काम जमत नाही. मोठं कुटुंब असल्यामुळे गडबड होते माझी. मला वेगळं राहायचं आहे. मी नीट राहीन सगळं नीट सांभाळेल.." स्मिता तिला धीर द्यायची. आकाशला स्मिताने समजावून सांगितलं,"नाही जमत तिला मोठ्या कुटुंबात. तू वेगळा संसार कर.. तू तुझ्या कुटुंबाला घेऊन भाड्याने घर घेऊन राहा. काही प्राॅब्लेम होण्यापेक्षा स्वतंत्र होणंच चांगलं.."


आकाशलाही ते पटलं. स्मिताने आरतीला समजावून सांगितलं,"हे बघ आरती.. तुला मोठ्या कुटुंबात काम जमत नाही म्हणून आपण भाड्याने राहू.. तुला जमेल ना!! नीट राहशील ना.. काव्याला नीट संभाळशील ना." आरती हो म्हणाली. मग आकाशने त्याच्या भावाच्या घराजवळच भाड्याने घर शोधायला सुरुवात केली.. म्हणजे आई-वडिलांना येता येईल. दोन्ही घरावर लक्ष ठेवता येईल. आकाशचा पगार तुटपुंजा असल्यामुळे त्याच्या आवाक्यातील भाड्याचं घर शोधणं गरजेचं होतं.. घराचा शोध सुरू होता. 


काव्या शाळेत जायचं म्हणून खुष होती. उद्यापासून शाळा सुरू होणार होती. वरवर पाहता सगळं छान शांत होतं. पण ही तर वादळापूर्वीची शांतता होती. कोणती तरी गोष्ट आरतीच्या मनात धुमसत होती.. 


आकाश रात्री कामावरून दमून घरी आला होता. आराम करण्यासाठी थोडा पलंगावर आडवा झाला. आरती खोलीत आली त्याला म्हणाली,"मला आईकडे जायचं.. मला तिची आठवण येतेय.." आकाशने ऐकून घेतलं आणि शांतपणे म्हणाला,"उद्यापासून काव्याची शाळा सुरू होईल.. नंतर जा.." आरती ऐकायलाच तयार नव्हती.. आकाश चिडला. आधीच त्या लोकांनी इज्जतीचे धिंडवडे काढल्याने तो त्यांच्याविषयी रागातच होता. सगळं ठीक असताना का जायचं हिला? त्याने आईला आवाज दिला म्हणाला, "हिला आईकडे जायचं.. एवढं सगळं रामायण घडूनही मी हिचा स्वीकार केला. हिने केलेले आरोप पोटात घेतले.. फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी,.. आता तिचंही नुकसान करायला निघालीय.. मी फक्त इतकंच म्हणतोय की तिला सुट्टी असते शनिवार-रविवार तेव्हा जाऊ पण हिला आता ताबडतोब जायचंय... हा काय खेळ आहे का?? दर दोन महिन्यांत माहेरी जाते. सासरी सलग सहा महिने तरी राहिलीय का? ही जर आत्ता गेली तर मी हिला परत घेऊन येणार नाही..”


आईने स्मिताला फोन केला आणि सगळा वृत्तांत सांगितला. स्मिताने आरतीला फोन द्यायला सांगितलं. तिने आरतीला विचारलं,"काय झालं?? का जायचं तुला? कोण काही बोललं का?" ती नाही बोलली. पण तिला आईकडे जायचं होतं. स्मिताने खूप समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला. “आता गेलीस तर आकाश तुला परत आणणार नाही. मुलीची शाळा सुरू होतेय. तिच्या भविष्याचा विचार कर.. एकटं राहणं इतकं सोप्प नाहीये गं!! आकाशचा राग शांत झाल्यावर जा. मी सांगेन त्याला. वाटल्यास माझ्याकडे या.." जवळ जवळ तासभर ती फोनवर आरतीला समजावून सांगत होती. पण आरती काही ऐकायला तयार नव्हती. तिला घरी जायचंच होतं.


स्मिताने आरतीच्या मामाला फोन केला. तिचा मामा थोडा सुशिक्षित वाटला. प्राॅब्लेम ऐकून घेतला. त्यांना माहीत होतं चूक आकाशची किंवा त्याच्या कुटुंबियांची नाहीच. त्यानेही आरतीला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण सगळं व्यर्थ!!! मग तोही दमला. त्याने आकाशला सांगितलं, "ती ऐकत नाहीये. तुम्ही तिला गाडीला बसवून द्या.." त्याच्या सांगण्यानुसार आकाशने तिला गाडीला बसवून दिले. त्या ड्रायव्हरला प्रवासाचे पैसे दिले. त्यांना त्याचा नंबर घेतला. पोहचल्यानंतर कॉल करायला सांगितलं.. 


अर्ध्या वाटेत गेल्यावर आरतीने तिच्या आईला फोन केला. आईने तिला तिथेच थांबायला सांगितले. आणि पुण्याहून तिची आई, मावशी, तिची मोठी बहीण खासगी गाडी करून मुंबईला निघाले. आरती थांबली होती तिथे सर्वजण पोहचले.. तिची मोठी बहीण म्हणाली, “असं नाही सोडायचं त्याला. सगळ्यांना दाखवून देते काय आहे ते?” आणि तिने अचानकपणे आरतीच्या कानाखाली मारली.. तिला ढकलून दिले. तिला बोचकारले. तिचे कपडे फाडले. डोक्यावर तिच्या हातात असलेली पर्स फेकून मारली.. आरतीला डोक्यावर टेंगुळ आलं.

आणि त्या अवस्थेत ती आरतीला घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गेली. आणि पुन्हा एकदा आकाश आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली. आणि त्यांची कारवाई सुरू केली.


आकाश घरात बसला होता. पोलिसांनी त्याला कॉल करून पोलीस स्टेशनमध्ये यायला सांगितले. आकाश हताश होऊन पटकन खाली बसला त्याला घेरी आली. त्याचे सगळे कुटुंबीय पोलीस स्टेशनला पोहचले. आरतीच्या नातेवाईकांनी तिथेच आकाशला शिव्या द्यायला सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना बाहेर बसायला सांगितले. पोलिसांनी आरतीची मेडिकल तपासणी केली आणि रिपोर्टमध्ये झालेल्या जखमांची नोंद केली. आरतीच्या घरच्यांनी आपल्याच मुलीला मारून जो बनाव केला होता तो एक पुरावा म्हणून समोर आला. आणि आकाशला अटक झाली. न केलेल्या गुन्ह्यात तो गोवला गेला. आरती आणि तिचे नातेवाईक रात्रीचे दोन वाजेपर्यंत बाहेर बसून होते. आकाश आणि त्याच्या कुटुंबियांना अटक झाल्यानंतरच ते घरी पुण्याला परत गेले. 


आकाशचे सगळे कुटुंब पोलीस कस्टडीत रात्रभर.. आकाशच्या मोठ्या भावाने त्याच्या एका मित्राला फोन करून बोलवून घेतले. आणि जामीन करून घेतला. आकाश आणि त्यांच्या घरच्यांची जामिनावर सुटका झाली. 


आकाश आणि त्याच्या कुटुंबियांची जामिनावर सुटका झाली. पहिल्यांदा एखाद्या गुन्हेगारांना डांबून ठेवावं तसा भास त्यांना झाला.. समाजात, नातेवाईकांत शरमेने मान खाली झुकवावी लागली. सोसायटीमध्ये छि थू झाली. घरातले वाद चव्हाट्यावर आले.. या सगळ्या संकटामुळे तो उदास राहू लागला. सतत दारू पिऊ लागला. दारूचं व्यसन वाढत चाललं होतं. सतत घरीच बसून राहू लागला.त्यामुळे त्याची चांगली नोकरी गेली.


इकडे आरती पुण्याला आईकडे राहू लागली.. तिने कौटुंबिक हिंसाचार आणि घटस्फोटासाठी सिव्हिल कोर्टात दोन केसेस फाईल केल्या. घटस्फोट घेण्यासाठी तिने अर्जामध्ये महिन्याला पोटगी आणि मुलीच्या खर्चासाठी दहा लाख रुपये मागितले. इतके रुपये कुठुन आणायचे? इतकी मोठी रक्कम देण्याची त्याची ऐपत नव्हती. आणि काहीही चूक नसताना त्याने ही शिक्षा का भोगावी? 


आज केस चालू होऊन दोन वर्षे होऊन गेली. आकाश कोर्टाच्या बाहेर त्याच्या वकिलाची वाट पाहात बसून होता.. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे सगळे प्रसंग डोळ्यासमोर तरळत होते. आज लग्नाला पाच वर्षे झाली. आरती कधीही सलग तीन महीने सासरी राहिली नव्हती. आकाशच्या आयुष्यात सुख आलं नाहीच.. काव्या चार वर्षाची झाली होती. बाप म्हणून मुलीसाठी काहीच करू शकला नव्हता. त्या निरागस बाळाला ना आपले वडील कळत होते ना त्यांच्याविषयी प्रेम होतं. 


दोन केसेसच्या तारखेला हजर राहता राहता जीव हैराण झाला. गाडीखर्च, वकीलाची फी, कुटुंबियांना मनःस्ताप.. आकाश हताश झाला.. आत्महत्येचा प्रयत्नही केला पण ईश्वराच्या कृपेने वाचला किंबहुना अजून भोग भोगायचे होते म्हणून की काय देवानेच वाचवले.. कोर्टाच्या वाऱ्या वाढल्या होत्या. अजूनही न्याय मिळालेला नव्हता.. मिळणार की नाही कोणास ठाऊक!!! आकाश पुरता कोसळला होता. काय करावं समजत नव्हतं. काय चूक होती त्याची?? काय चूक होती त्याच्या कुटुंबियांची? या प्रश्नांची उत्तरे अजूनही त्याला मिळाली नाहीयेत.. ही एक शोकांतिका..


ही कर्मकहाणी एका आकाशची.. न्यायव्यवस्थेवर प्रचंड विश्वास असलेल्या गरीब मुलाची.. न्यायासाठी चाललेल्या संघर्षाची.. मानसिकरित्या खचलेल्या एका हरहुन्नरी मुलाची.. आपल्या चिमुकल्या मुलीसाठी तडफडणाऱ्या एका बाबांची..

ही कथा आहे घटस्फोटामुळे वडिलांच्या प्रेमाला दुरावलेल्या मुलीची.. तुझ्या बाबांनी तुझ्या आईवर अन्याय केला हे विष पेरणाऱ्या नातेवाईकांची..


आजही आपल्या समाजात असे अनेक आकाश अशीच एखादी कर्मकहाणी घेऊन फिरत आहेत.. न्याय मिळवण्यासाठी कोर्टाच्या चकरा मारत आहेत पण अजूनही न्याय मिळत नाही कधी कधी ही लढाई दहा-दहा वर्ष चालू राहते. पण न्याय होत नाही.. न्यायालयीन कामकाजाच्या विलंबामुळे सारी हयात कोर्टाची पायरी झिजवण्यात जाते..


कथेतील आरती कधीच वाईट नव्हती.. आजारी होती.. तिच्यावर ट्रिटमेंट झाली असती तर ती यातून बाहेर आली असती.. पण ती सासरी राहिलीच नाही.. आणि माहेरच्या लोकांना आपली मुलगी आजारी आहे हे मान्यच नव्हतं.. तिच्या बाळंतपणात झालेल्या त्रासामुळे ती सैरभैर झालेली.. आणि हे आरतीच्या कुटुंबियांनीही मान्य केलं होतं.  


ही कथा लिहित असताना मी एक स्त्री म्हणून खूप अस्वस्थ झाले.. कथेचे विविध पैलू समोर आले.. चांगल्या वाईट प्रतिक्रिया आल्या.. एका ऑटिझम मुलीचे लग्न, तिला मूल होऊ शकत नाही असं बरंच काही.. कथेतील आरती मतिमंद नव्हती तर ती मनोरुग्ण होती.. मानसिक धक्का पोहचलेली..  


मी कथेतील आरतीच्या भूमिकेत जाऊन विचार करत होते. समजा आरती नॉर्मल मुलगी होती. आरती शांत होती.. संसार म्हणजे काय कळत नसावं? आकाशच्या घरचे खूप वाईट होते.. तिला त्रास देत होते.. पण मग स्मिता जीव तोडून सांगत होती,"नको पडू घराच्या बाहेर.. मुलीच्या भविष्याचा विचार कर.. मी आहे तुझ्या सोबत कायम. एकटी स्त्री आपल्या मुलांचं संगोपन नाही करू शकत.. हे मी माझ्यावरून सांगते तुला. तुझा नवरा चांगला आहे न त्याच्याकडे बघ.. मी तुला स्वतंत्र होण्यास मदत करते.. मी तुला भाड्याने घर घेऊन देते.." मग एका नॉर्मल मुलीने का नाही मुलीच्या भविष्याचा विचार केला.?? तिला त्रास होता सासरच्या लोकांचा म्हणजे नेमकं काय? त्यांच्या बोलण्याचा?? आपल्या स्वतःच्या आधी का नाही विचार केला मुलीच्या भवितव्याचा?? आरतीला स्वतंत्र राहायचं होतं मग भाड्याने घर घेईपर्यंत तिला धीर नव्हता का? की ती समर्थ होती मुलीचं संगोपन करण्यासाठी..?? आणि जर होती मग आज पोटगी आणि मुलीच्या खर्चासाठी अवास्तव मागणी कोर्टात दाखल केली ती का? कधीही तिला त्रास न देणाऱ्या नवऱ्यावर किती घृणास्पद आरोप, अगदी नवरा बायकोच्या नाजूक नात्याला अनैसर्गिक संबंध असं हीन नाव द्यावं?? वकीलही एक माणुसच असतो ना.. मग आपल्या अशीलाची बाजू मांडताना अशी बीभत्स भाषा वापरताना काहीच वाटू नये?? प्रश्न मुलीच्या संगोपनाचाच असेल तर इतकी मोठी रक्कम देऊ न शकणाऱ्या आणि एका बाप म्हणून मुलीची जबाबदारी घ्यायला तयार असणाऱ्या आकाशला ती मुलगी देऊ शकेल?? जर उत्तर नाही असेल तर मग मुलगी हे साधन असावं का पैसे उकळण्याचं?? आणि खरंच संसाराची चाड असेल तर ती येईल का परतून सासरी?? 


आरतीच्या घरच्या लोकांनी का नाही थोडा समंजसपणा दाखवला? मुलगी जरा रडली.. सासरी कामाचा त्रास होतो म्हणाली, सासरची लोकं त्रास देतात म्हणाली तर त्याचा शहानिशा न करता लगेच आई म्हणणारी पदरानं लेकीचे डोळे पुसायला निघाली.. क्षणभर विचार केला तर खरंच आकाशच्या घरचे इतके वाईट होते? आरतीच्या आईने का नाही निक्षून सांगितलं,"बाळ तेच तुझे आई-बाबा, तेच तुझं घर..सहन कर थोडं.." उलट ये निघून घरी तू.. पण असंच नाही यायचं राडा करूनच घरी यायचं.. आकाशला धडा शिकवूनच. ही त्यांची भाषा.. मुलीच्या घटस्फोटाचा अर्ज दाखल करणाऱ्या आरतीच्या घरच्यानी तिचा संसार टिकवण्यासाठी किती प्रयत्न केले?? आरतीला पोलिसात तक्रार करण्यास कोणी उद्युक्त केले?? आकाशला आणि त्याच्या घरच्यांना पोलीस कस्टडीत डांबूनच त्यांचा आत्मा शांत होणार होता?


असेल ही आकाशच्या घरच्यांची चूक.. पण संसार हा दोघांचा होता ना.., किती सामंजस्याने केला? किती विचार केला तो टिकवण्यासाठी.. आणि समजा आकाश वाईट होता. तर त्यालाच शिक्षा व्हायला हवी न.. सगळ्या कुटुंबाला वेशीला टांगण्यात काय अर्थ?? की ही फक्त सूड बुद्धी..?? आजकाल घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहे याचं मुख्य कारण म्हणजे हरवत चाललेलं प्रेम, दोघांमधला संवाद आणि संयम.. पूर्वीही भांडणं होत होती, रुसवे, फुगवे असायचे. एकत्र कुटूंब असायची. सासू, जावा बोलायच्या, एकत्र म्हटल्यावर भांड्याला भांडं लागायचंच.. असं समजून परत राग लोभ विसरून एकत्र नांदायचे. पण नातं तुटत नव्हतं.. पूर्वी आदर होता नात्यात.. तो आता संपलाय.. 


रस्त्यावर एखादं जोडपं भांडत असेल आणि पुरुष त्या स्त्रीला मारत असेल तर बघणारे म्हणतील, किती दुष्ट माणुस आहे बायकोवर हात उचलतो आणि एखादी स्त्री जेव्हा पुरुषाला मारत असेल तर बघणारे म्हणतील, नक्कीच पुरुषाचा दोष असेल, त्यानेच काहीतरी केलं असेल.. म्हणजे काय तर प्रत्येक वेळेस पुरुषच दोषी, तोच नालायक.. कसा हा कायदा?? एकीकडे स्त्री पुरुष समान म्हणून आपण नारेबाजी करायची आणि दुसरीकडे स्त्री म्हणून कायद्याचा गैरफायदा घ्यायचा..!!! तोच कायदा, न्याय सर्वांसाठी समान असायला नको का? का घ्यावा त्याचा फायदा एक स्त्री आहे म्हणून??


मी कोणत्याही वाईट वागणाऱ्या पुरुषाचं समर्थन करत नाही. वा कोणत्याही व्यथित स्त्रीचा अपमानही करत नाही.. जर एखाद्या स्त्रीवर खरोखरच अन्याय होत असेल तर नक्कीच पेटून उठायला पाहिजे.. अन्यायाविरुद्ध लढायला हवं.. पण ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.. कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे म्हटल्यावर गैरफायदा घेऊ नये.. अशा काही स्त्रियांमूळे ज्यांच्यावर खरोखरीच अन्याय झालाय त्यांना न्याय मिळत नाही.. कोणत्याही चुकीच्या व्यक्तीची बाजू ग्राह्य धरून कोणावर अन्याय होऊ नये.. इतकंच सांगायचं.. मनातलं थोडं..


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama