Nisha Thore

Others

2.9  

Nisha Thore

Others

तिची कथा.. तिची व्यथा

तिची कथा.. तिची व्यथा

3 mins
721


"हिला बरा वेळ मिळतो. आपल्याला तर श्वास घ्यायला ही वेळ नसतो. हिला काय काम असत नाहीतरी? रात्री उशिरापर्यंत फेसबुकवर ऑनलाइन असते.हल्ली जरा जास्तच फोनवर असते. काहीतरी सुरु आहे वाटत".. कानावर कुजबुज पडली. डोळ्यात पाणी अन मनांत खूप संताप. काय करायच अश्या उपद्रवी लोकांच?


आता कुठे ती आपला छंद जोपासु लागली होती. एक दिवस तीला एक शब्दमित्र भेटला. त्याने तिला तिच्यातल्या सुप्त गुणांची जाणीव करून दिली. तिचीच तिला नव्याने ओळख करून दिली. तिलाच माहीत नव्हतं की तिच्याकडे इतकी शब्दसंपत्ती,शब्दांच वैभव होत.त्याने तिला शब्दांवर प्रेम करायला शिकवलं. ती पुन्हां लिहायला लागली होती. व्यक्त होत होती.


आताशी कुठे ती मोकळा श्वास घेऊ लागली होती. अश्यातच अनोळखी मैत्रिणींचा थवा तिला भेटला. जणु जन्मोजन्मीचे बंध असावेत तसा. त्या थव्याने मुक्त संचार करायला शिकवल. ह्या खळखळत्या झऱ्याने व्यक्त व्हायला शिकवलं. आपला आनंद मिळवायला शिकवल. तिच्या लिखाणासाठी तिला मुक्त व्यासपीठ मिळवुन दिल. पण म्हणतात ना खळखळून हास्यालाही भय असत.पौर्णिमेच्या चंद्रालाही अमावस्येचा शाप. तसच तिच्या आनंदालाही ग्रहण लागल.


तिने सारख रडणं आत्ता सोडुन दिल होत. तीच विश्व बदलत होत. सतत होणारी तिची चिडचिड कमी झाली होती. एक नवीन चैतन्य आलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्या खळखळून हसण्यात दिसू लागला होता. तिच्यातला बदल जाणवत होता. आणि म्हणूनच की काय सगळ्यांनी मिळून तिच्या सुखाला सुरुंग लावायचं ठरवलं जणु. 


ऑफीस मधले सहकारी तिला तिच्या माघारी बोलत होते.त्यात महिला सहकाऱ्यांनी तर भंडावून सोडले होते. एक स्त्रीच दुसऱ्या स्रीच्या दुःखाच कारण बनते. तीच समजून घेत नाही. या बायकांचं काही कळतच नाही. ऑफिस मधल्या गोस्सीपींग मध्ये भाग घेतला की चांगलं. नाहीतर तीच होते गोस्सीपींग चा विषय. चेहरा दुःखी करून बसलं तर काय हिच नेहमीच रडगाणं. आनंदी असलं तर हिला काही वाटतं का? नवरा गेलाय तरी कशी मस्त राहतेय. असे अनेक शब्दांचे हृदयावर प्रहार.  


सोसायटीतल्या बायकांना दुसऱ्यांच्या घरात जास्त इंटरेस्ट. त्यांचे गोस्सीपींग चे विषय तर एकदम भन्नाट.आमक्याचा मुलाच तमक्याच्या मुलीसोबत सूत, शेजारची रीना लिव्ह इन रेलेशनशिप मध्ये, सासू सासरे दीर नणंद नवरा कसे वाईट अगदी रंगवून चघळण्याचे सगळे विषय. तिला नाही आवडायचं. नवरा हा विषय निघाला की तिला त्रास व्हायचा. त्यांचं एकमेकींच्या नवऱ्यावरून ऐकमेकींना चिडवण तिला अपूर्णत्वाची जाणीव करून द्यायचं. सगळं असूनही रितेपणाची जाणीव व्हायची. हळदीकुंकू,मंगळागौर सुहासिनींच्या प्रत्येक शुभकार्यात तिला मुद्दाम टाळलं जायचं. 


म्हणून मग तिने तीच कव्हरेंज क्षेत्रच बदलून टाकलं. ती शब्दांच्या विश्वात रमत होती. व्यक्त होत होती. मनातले भाव पानावर उतरवत होती. काय चुकलं तिचं? का तिच्या हसण्यावर निर्बंध?. का आनंदावर विरजण? तीच छान राहणं, तीच असणं, तीच दिसणं का डोळ्यात खूपत होतं साऱ्यांच्या?


एखादी स्त्री रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन असेल तर ती वाईटच करत असते का? मग हाच प्रश्न पुरुषांना विचारला जातो का हो? पुरुषांना अश्या प्रसंगाना सामोरे जाव लागत का हो? त्याच्या एकटे राहण्यावर कोणी आक्षेप घेतलाय? त्याच्या स्वैर वागण्याला आजवर कोणी जाब  विचारलाय? तो विदुर आहे म्हणून कोणी त्याचा उपहास केलाय? त्यालाही होते का अपूर्णत्वाची जाणीव? नाही ना.. मग तिलाच का सगळे प्रश्न? का तिला द्यावी लागते अग्निपरीक्षा सीतेसारखी.. का तिच्या अब्रूचे धिंडवडे द्रौपदी सारखे?? का तिच्या चारित्र्यावर शिंतोडे? 


एकटी स्री म्हटली की सगळे लचके तोडायला तयार.. जंगली श्वापदे सारी. पण खरंच प्रत्येक घराला, मादीला नराच संरक्षण हवच का? का ती नाही का तितकी सक्षम स्वतःच रक्षण करण्यासाठी? तिने स्वतःसाठी जगायचं ठरवलं तर काय चुकलं तीच? 


सर्व स्त्रियांची हीच कथा मग ती विधवा असो, घटस्फोटीता असो, वा कोणी परित्यक्ता असो किंवा लग्न न झालेली एकटी रहाणारी स्त्री असो प्रत्येंकीची कहाणी थोड्या फार फरकाने सारखीच.  

खरच आजही स्त्री बंदिनीच. कधी संपणार हे सगळं? कळेल का कोणाला तिची ही कथा.. तिच्या मनाची व्यथा..


मैत्रीणींनोंं मी समाजातल्या अश्या अनेक स्त्रियांची व्यथा मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला त्यावरचे तुमचे मत टिप्पणीमध्ये लिहा....


माझ्या लिखाणाची पद्धत व विषय आवडत असतील तर नक्की प्रतिकिया द्या. 


तुमचा प्रतिसाद माझे लिखाण प्रगल्भ करेल यात शंका नाही...



Rate this content
Log in