Nisha Thore

Inspirational Others

3  

Nisha Thore

Inspirational Others

अरे संसार संसार..

अरे संसार संसार..

11 mins
838


रविवारचा दिवस, सकाळची वेळ होती..इतक्यात फोन खणखणला..," हॅलो, मी संपादक मिथिला.. 'आम्ही उद्योजक' पत्रकाची, मिस्टर सुहास जोशी आपले खूप अभिनंदन.. या वर्षीचा बहूचर्चित असलेला 'सर्वोत्तम उद्योजक' हा अवॉर्ड तुम्हाला देण्यात येणार आहे..आताच तसं घोषित करण्यात आलं आहे. मनापासून अभिनंदन.. त्या निमित्ताने तुमची एक मुलाखत घ्यायची आहे आज दुपारची वेळ देऊ शकाल का?" सुहासच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.. त्याने त्यांचे आभार मानत मुलाखतीसाठी होकार कळवला. तो उठून वृद्ध आजारी असलेल्या आईच्या, कावेरीच्या खोलीत आला. बराच वेळ तिच्या पायाशी बसून राहिला.. डोळ्यातल्या आसवांचा पाऊस तिच्या पायावर पडत होता.कावेरीला जाग आली.. तिने सुहासला खुणेनेच जवळ बोलावले.. सुहास तिचा हात हातात घेत म्हणाला," आई तू पाहिलेलं स्वप्नं आज साकार झालं ग..!! तुझ्या सुहासचा सर्वोत्तम उद्योजक म्हणून सत्कार होणार आहे. आपल्याला जायचं आहे बरं का समारंभाला.!!" कावेरीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळू लागले..आनंद डोळ्यातून ओसंडून वाहू लागला..तिने अलगद सुहासच्या डोक्यावर हात ठेवत 'यशस्वी हो' पुटपुटली भरल्या डोळ्यांनी अंतःकरणापासून आशीर्वाद दिला. तिच्या साऱ्या कष्टाचं चीज झालं होतं. माऊली धन्य झाली होती.. 


दुपारी सुहासची मुलाखत घेण्यासाठी 'आम्ही उद्योजक' या पत्रकाची पत्रकार आणि त्यांची टीम घरी आली.. सर्वांचे चहापाणी झाल्यानंतर मुलाखत सुरू झाली.. "तुमच्या यशाचं श्रेय कोणाला?" या प्रश्नावर सुहास बोलू लागला,"या यशाचे संपूर्ण श्रेय माझ्या आईला जाते..तिच्याच कष्टाचं फळ आहे. मी खूप नशीबवान आहे की मी तिचा मुलगा आहे.".तिच्या बद्दल बोलताना त्याचा ऊर अभिमानाने भरून आला.आणि नकळत तो भूतकाळात गेला.


कावेरी एका श्रीमंत कुटुंबातली मुलगी, तिचे वडील शहरातले नामांकित वकील होते..राजकीय लोकांत त्यांची ऊठबस होती. कावेरी दिसायला सुंदर अभ्यासातही खूप हुशार. सौन्दर्य आणि बुद्धिमत्ता यांचा दुर्मिळ संगम..स्वभावाने लाघवी, सालस कष्टाळू, त्यावेळची 'कॉलेज क्विईन' होती ती. सगळया शिक्षकांना, विद्यार्थ्यांना खूप आवडायची. तिच्या या लाघवी स्वभावामुळे सर्वांची लाडकी होती.. स्नेहसंमेलनाच्यावेळी सुधाकर आणि तिची भेट झाली.. सुधाकर शेवटच्या वर्षाला होता. सुधाकर कावेरीच्या पाहता क्षणी प्रेमात पडला. तिच्या लाघवी बोलण्याची जणू त्याला भुरळ पडली होती..प्रेमात पडण्याचंच वय ते.. फुलपाखरांचे उडण्याचे दिवस.. कधी चुकण्याचे, शिकण्याचे दिवस.. पुढे भेटी वाढत गेल्या.. बोलणं होत गेलं. प्रेमाची कबुली दिली गेली. कधी न सोडून जाण्याच्या शपथा,आणाभाका घेतल्या गेल्या..काही दिवसांनी त्यांच्या प्रेमाची खबर घरापर्यंत पोहचली.. आंतरजातीय असल्याने दोघांच्याही घरात त्यांच्या लग्नासाठी विरोध होता. मग एक दिवस कावेरी आणि सुधाकर यांनी घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि एका मंदिरात जाऊन ते दोघे विवाहबद्ध झाले.. 


एका मित्राच्या मदतीने सुधाकर कावेरीला दुसऱ्या शहरात घेऊन आला. भाड्याने घर घेतलं. आणि मग दोघांनी एक नवीन शहरात आपला संसार थाटला. गरजेपुरत्या वस्तू घेतल्या.नव्या आयुष्याला सुरुवात झाली..सुरुवातीचे दिवस खूप छान होते.. दोघे एकमेकांच्या प्रेमात अगदी डुंबून गेले होते.. नवीन जोश होता, नवी उमेद होती..नवी स्वप्नं होती.. पण हळूहळू प्रेमाची नशा उतरू लागली.. आणि वास्तव जीवन समोर येऊ लागलं.. खऱ्या आयुष्यातले चटके बसू लागले.. प्रेमाचं स्वप्नाळू जग आणि वास्तविक सत्यातलं जग यात खूप तफावत होती. फक्त प्रेमाने पोट भरणार नव्हतं..कामधंदा करायला हवा होता. दोघांना वाटलं होतं की नोकरी सहज मिळेल पण कॉलेज अर्धवट सुटल्याने तीही मिळत नव्हती. रोज उठून सुधाकर नोकरीच्या शोधात निघायचा आणि संध्याकाळी हताश परत यायचा. आता तर घरातून आणलेले पैसेही संपत आले होते..काय करावं समजेना..अंगमेहनतीच्या कामाची सवय नसल्याने ते काम पण जमेना. सुधाकरला या अपयशाचा सामना करता येईना..तो जास्तच नैराश्याने ग्रासला गेला आणि रोज दारू पिऊ लागला...कावेरी समजून सांगण्याचा खूप प्रयत्न करत होती आधार देत होती पण सुधाकरवर काहीच परिणाम होत नव्हता..दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले.. कधीकधी सुधाकर रागात, भांडणात तिला मारहाण करू लागला.. कावेरीला आईवडिलांना सोडून आल्याची चूक उमजली होती. पण परतीच्या वाटा बंद झाल्या होत्या.. आता ती तिचं नशीब ज्या दिशेने घेवून जाईल तिकडे ती जात होती..सुधाकरला सांगून काहीच फरक पडत नव्हता.. दिवसरात्र तो नशेत घरात झोपून असायचा..


अश्यातचं कावेरीला दिवस गेले..नव्या पाहुण्याची चाहूल लागली.. खरंतर कावेरी आई होणार या भावनेने सुखावली होती. पण सुधाकरला अजिबात आनंद झाला नव्हता. इथे दोघांचेच भागत नव्हते त्यात अजून एक भर.. तो कावेरीशी सारखा भांडू लागला.. हे मूल नको म्हणून वाद घालू लागला. पण कावेरी ठाम होती.. तिला आई व्हायचं होतं.. पोटात वाढणाऱ्या जीवाला तिला जगवायचं होतं. सुधाकरला नोकरी मिळत नव्हती..आता दोन वेळच्या जेवणाचे वांदे होऊ लागले होते..कावेरी दोन जीवांची.. मग तिने ठरवलं आपणच काम शोधू..आणि या विचाराने ती नोकरीच्या शोधात घराबाहेर पडली. शिक्षण अर्धवट सुटलं होतं नोकरी मिळत नव्हती. काही ठिकाणी तिचा सुंदर चेहरा पाहून नोकरीचं आमिष दाखवून तिचं शीलहरण करू पाहत होते..समाजाचा खरा चेहरा समोर येत होता.. पण कावेरी मोठी धीराची.. शील गमावून तिला नोकरी मिळवायची नव्हती.. 


घराचे भाडे थकले होते.. घरमालकाने सर्व सामान घराबाहेर फेकून दिले आणि घरातून हाकलून दिले.. काय करावं..!! काहीच समजत नव्हतं. कावेरीने हिंमत सोडली नाही.. शेजारणीच्या ओळखीने जवळच्या वस्तीत तिला कमी भाडे असलेली खोली मिळाली होती. एका श्रीमंत घरात लाडाकोडात वाढलेली नाजूक कावेरी आज एका झोपडीत राहू लागली होती.आणि तिथेच त्याच झोपडपट्टीत तिचा जीवनाचा संघर्ष सुरू झाला..पोटात वाढणाऱ्या जिवासाठी तिला जगायचं होतं. म्हणतात ना.!! या जगात आईपेक्षा श्रेष्ठ योद्धा नाही. ती जमेल ते काम करू लागली. घरी लहान मुलांच्या शिकवण्या घेऊ लागली..थोडे फार पैसे हाती येऊ लागले. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत मिटली होती.. पण नियती अजूनही तिचा पाठलाग सोडत नव्हती.. सुधाकर तसाच काहीही कामधाम न करता दिवसभर नशेत घरीच पडून राहायचा. व्यसनाच्या इतका आहरी गेला होता की तो कावेरीच्या या अवस्थेतही तो पैशासाठी तिला मारहाण करत होता..मिळालेले पैसे चोरून तो दारू पीत होता.. त्याच्या अश्या वागण्याने तिला मिळालेल्या शिकवण्याही बंद पडू लागल्या..शेजारचे मुलांना घरी पाठवायला घाबरू लागले..आत्ता मात्र जगणं कठीण झालं होतं.बाहेर जाऊन काम शोधण गरजेचं होतं. नवऱ्याच्या भरवश्यावर राहून कसं चालणार?? तिला तिचा मार्ग शोधायचा होता. ती घराच्या बाहेर पडली.


कावेरीला नववा महिना सुरू झाला. कावेरीचे दिवस भरत आले होते. दुपारचं कडकडीत उन्ह पडलं होतं. गेली दोन दिवस तीच्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता.. उन्हाने तिला भोवळ आली..आणि रस्त्यावर मधोमध ती चक्कर येऊन एका गाडी समोर कोसळली.. त्या गाडीमधून एक मध्यमवयीन महिला पटकन बाहेर आली.चाळीस-पंचेचाळीसच्या दरम्यानची असावी. तिने आजूबाजूच्या लोकांची मदत घेतली.तिला गाडीत बसवून दवाखान्यात घेऊन आली.. कोण होती ती युवती? एखाद्या देवदूतासारखी ती तिच्या आयुष्यात आली होती..


काही वेळाने कावेरीला शुद्ध आली.. शेजारी बसलेली ती महिला मायेने तिच्या केसांवरून हात फिरवत होती. ती म्हणाली," कशी आहेस बाळा, तुला भोवळ आली होती रस्त्यात.. माझ्याच गाडीसमोर तू आली होतीस.. मी श्रुती देसाई..मी एक डॉक्टर आहे. हे क्लिनिक माझंच आहे. तुझं नाव काय बेटा? कुठे राहतेस? आणि या अवस्थेत का फिरत आहेस उन्हात?" कावेरीला भरून आलं. इतक्या आत्मीयतेने आजवर कोणीच विचारलं नव्हतं. ती धाय मोकलून रडू लागली..तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत त्यांनी कावेरीला रडू दिलं.. कावेरीला आता मोकळं वाटत होतं.. योग्य औषधोपचार करून तिला तिच्या घरी स्वतः सोडवायला आल्या. वाटेत जाता जाता कावेरीने आपली सर्व कर्मकहाणी त्यांना सांगून टाकली. डोळ्यांतले मेघ रिते होत होते.


कावेरीची कहाणी ऐकल्यावर तिच्या विषयी त्यांच्या मनात करूणा निर्माण झाली.आधी नवरा मग तरुण वयात कँसरने दगावलेल्या आपल्या एकुलत्या एका मुलीची आठवण झाली. डोळे पाणावले. त्या तिला म्हणाल्या,"कावेरी..!! या अवस्थेत तू कशी काम करणार बाळ? थोडे दिवस थांब. नंतर पाहू आपण काय करता येईल.. हे माझं व्हीसीटिंग कार्ड ठेव.. कधी काही लागलं तर मला फोन कर मी येईन". त्यांनी तिला थोडे पैसे दिले. घरात महिनाभर पुरेल इतकं समान घेऊन दिलं.कावेरी दोन्ही हात जोडून उभी आसवं डोळ्यात.. किती अन कसे आभार मानावे तिला समजत नव्हतं.. भरल्या डोळ्यांनी पण आनंदाने तिने त्यांना निरोप दिला. पण त्याचं येण आता वरचेवर होऊ लागलं.. त्या तिची काळजी घेऊ लागल्या.. त्या तिच्या कधी माई झाल्या हे त्यांनाही कळलं नाही.


अचानक एका रात्री कावेरीच्या पोटात दुखू लागले..सुधाकरला ती आवाज देत राहिली पण तो नशेत धुंद..शुद्ध कुठे होती त्याला? तो गाढ झोपला होता. तो उठलाच नाही., मग तिने शेजारच्या तिच्या मैत्रीणीला, कुसुमला आवाज दिला..कुसुम आणि तिच्या नवरा तिच्या मदतीला धावून आले.तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आणि कावेरीने एका गोंडस मुलाला जन्म दिला.. दुःखाच्या आभाळाला सुखाची झालर. त्याच्या गोड हास्याने कावेरीच्या जीवनात नवचैतन्य आलं होतं.आतापर्यंत भोगलेलं दुःख विरून जात होतं. श्रुती मॅडम तिला भेटायला आल्या. बाळासाठी नवीन कपडे, कावेरीसाठी खाण्याचे जिन्नस घेऊन आल्या..मोठया उत्साहाने त्यांनी बाळाचे नाव 'सुहास' ठेवले.


सुहासच्या येण्याने कावेरी सुखावली होती..घर हसू लागलं होतं.त्याच्या बोबड्या बोलांनी, दुडक्या चालींनी घर भरून गेलं. सुधाकर सुधारण्याची काहीच चिन्ह दिसत नव्हती..हाच का तो सुधाकर? ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम केलं होतं..तिचा तिलाच प्रश्न पडायचा.. तिच्या आयुष्याची तर परवड झाली होती पण आता सुहासच्या भविष्याचा विचार करायचा होता. म्हणून ती आपल्या लहानग्याला घेऊन श्रुती मॅडमच्या घरी गेली. श्रुती मॅडम घरीच होत्या. आधी त्यांनी कावेरीला बसायला सांगितलं कांदापोहे चहा झाला.मग त्या म्हणाल्या," कावेरी शिक्षण कमी असल्यांने बाहेर नोकरी मिळणं कठीण आहे.त्यात बाळ पण अजून लहान आहे.सुहास थोडा मोठा होईपर्यंत तू माझ्या घरी घरकाम आणि स्वयंपाक ही कामे करशील का? म्हणजे काम होईल आणि सुहासकडे तुझं लक्षही राहील. कावेरीला त्यांचं म्हणणं पटलं आणि ती सुहासला घेऊन कामावर येऊ लागली..


छोटया सुहासच्या येण्याने श्रुती मॅडमच्या आयुष्यातही हरवलेला आनंद परत आला होता. पती आणि मुलीच्या निधनानंतर त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलाच घर बनवले होते.आता घरी येणाची ओढ होती सुहासचं निरागस बोलणं मोहवून टाकत होतं. सुहास हळूहळू मोठा होत होता. सुहास आता शाळेत जाऊ लागला होता.अभ्यासात हुशार असल्याने सगळ्या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता. 


कावेरीने पूर्ण संसाराचा गाडा एकटीचा खांद्यावर पेलला होता. श्रुती मॅडमच्या ओळखीने आजुबाजुची अजून दोन तीन स्वयंपाकाची कामे तिला मिळाली होती.. सुधाकर अजूनही तसाच त्रास देत होता. व्यसनामुळे दिवसेंदिवस प्रकृती ढासळत चालली होती.. बाहेरची कामे, सुहासचं संगोपण, आणि नवऱ्याचं आजारपण यात कावेरी बुडून गेली..सुधाकरची प्रकृती सुधारत नव्हती.. आणि एक दिवस त्याची प्राणज्योत मालवली..कावेरीच्या प्रेमाचा एक बंध निसटून गेला होता.. दुःखाचा महापर्वत कोसळला होता..तरीही कावेरी डगमगली नाही..डोळ्यातल्या अश्रूंना आवरत ती पुन्हा कंबर कसून नवीन संघर्षासाठी उभी राहिली. सुहासच तिच्या जगण्याचं कारण बनला. त्याचं भवितव्य घडवणं हेच तीच ध्येय बनलं.. सुहास दहावीला असताना शाळेत पहिला आला. आपल्या मुलाचे यश बघून त्या माऊलीच्या डोळ्यांचे पारणे फिटलं होतं.. डोळ्यांतून आनंदाश्रू बरसू लागले..


पण अजून तिला बराच लांबचा पल्ला गाठायचा होता. सुहासच्या पुढील शिक्षणाची तयारी करायची होती. तीची अजून कष्ट करण्याची तयारी होती. अजून काय काम करावं याचा विचार करू लागली. घरगुती असा काही काम करावं जेणेकरून तिची जुनी कामे सुटणार नाहीत आणि ज्यादाचे पैसे मिळतील तिच्या मनात विचार घोळू लागले. आणि मग तिने पापड लोणची मसाले बनवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कावेरी घरी पापड, लोणची, मसाले बनवायची आणि तिच्या ओळखीच्या लोकांना द्यायची. त्यांना तिच्या हातचे पदार्थ आवडू लागले.मग लोकांनी तिच्याकडूनच पापड मसाले, कुरडया, लोणचे विकत घ्यायला सुरुवात केली. श्रुती मॅडमनीही या कामात तिला मदत केली. सुहासही आईला मदत करू लागला.. तिला मदत करता करता सुहास महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत होता..सुहास पदवीधर झाला होता.. अजून एक सुखाचा क्षण कावेरीच्या खडतर वाटेवर येऊन तृष्णा भागवून गेला.. झालेल्या आनंदामुळे तिला आकाश ठेंगण झालं होतं. 


त्यानंतर मात्र कावेरीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. श्रुती मॅडमच्या सांगण्यावरून कावेरीने लघुउद्योगाचे प्रशिक्षण घेतले.सुहासच्या मदतीने तिने लघुउद्योग योजनेतून कर्ज घेऊन लागणारे भांडवल मिळवले. उद्योगासाठी भाड्याने जागा घेतली आणि आपला घरगुती पदार्थ बनवण्याचा छोटा उद्योग सुरू केला.. श्रुती मॅडमच्या हस्ते उद्योगाचे नामकरण करण्यात आले. सुहासने सुचवल्याप्रमाणे 'कावेरी उद्योग' या नावाने व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात दोघांत काम होऊन जायचं पण नंतर मागणी वाढल्याने उत्पादन करण कठीण होऊ लागलं.. मग कावेरीने तिच्या वस्तीतल्या काही गरजू बायकांना मदतीला घेतलं.. त्या बायकांनाही रोजगार मिळाला होता. त्याही स्वावलंबी बनल्या होत्या. कावेरीच्या उद्योगाचा व्याप वाढू लागला.. श्रुती मॅडमना कावेरीचा वाढलेला व्याप दिसत होता. त्यांनीच कावेरीला घरकाम करण्यास मनाई केली आणि व्यवसायाकडे लक्ष देण्यास सांगितले.. तरी अधून मधून कावेरी आणि सुहास श्रुती मॅडमना भेटायला यायचे..कावेरी त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ करून आणायची. फार कमी अवधीत तिचा उद्योग नावारूपाला येऊ लागला होता.. सुहास आता पूर्णपणे व्यवसायात लक्ष घालू लागला. एका शहरातून दुसऱ्या शहरात तिचा माल पोहचू लागला.. कावेरी उद्योगाचे नाव देशभर उमटू लागले होते.


सुहासने 'कावेरी उद्योग' हे नाव कानाकोपऱ्यात पोहचवले होते. साऱ्या व्यवसायाची धुरा तो अतिशय उत्कृष्टपणे संभाळत होता.. पुढे जाऊन त्याने एम.बी.ए करून व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलं..आईच्या उद्योगाला अजून नवीन जोडधंदे सुरू केले. विणकाम, शिवणकाम करणाऱ्या बायकांसाठी 'कावेरी गारमेंट्स' या नावाची नवीन शाखा उघडली. तिथे बनलेल्या ड्रेसेसना परदेशातून मागणी येऊ लागली..कावेरी उद्योग हे नाव आता जगभरात गुंजू लागले..2000 कोटींची उलाढाल करणारी, 5000 कामगार असणारी देशातली सर्वात मोठी कंपनी बनली. नामांकित व्यावसायिकांमध्ये कावेरी उद्योगाचे नाव मोठ्या आदराने घेतले जाऊ लागले. 


काही दिवसांनी सुहासने आलिशान बंगला बांधला.त्याला आपल्या आईचे 'कावेरी निवास' हे नाव दिले. आणि तो आईबरोबर बंगल्यावर राहायला आला. त्याने नवीन मोठी गाडी घेतली. घरात आईच्या सेवेसाठी नोकर चाकर होते. कावेरीला सगळं वैभव सुहासने मिळवून दिलं होतं. पुढे सुहासला त्याच्या सारखीच छान सहचारिणी मिळाली.. मृदुला नावाप्रमाणेच मृदू होती. तीही सुहासला व्यवसायात मदत करू लागली दोघेही आईची काळजी घेत होते.. कावेरी आता थकली होती वृद्धपणाच्या खुणा चेहऱ्यावर दिसू लागल्या होत्या. आणि रुपेरी कडा केसामधून हळूच डोकावू लागली होती..


सुहासला आपल्या व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकीचंही भान होतं.. तसे आईचे संस्कारच होते.'आपण या समाजाचे देणं लागतो हे कधीही विसरू नकोस'. हे तिचं वाक्य कायम त्याच्या लक्षात राहिलं. कामगारांसाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कावेरी उद्योगा तर्फे अनेक उपक्रम राबवले जात होते..दरवर्षी गरजू गरीब मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च कंपनी घेत असे.. 'कावेरी अनाथाश्रम', 'कावेरी वृद्धाश्रम', सुरू झाले..समाजातल्या तळागाळातील वंचित लोकांना, अनाथ मुलांना निवारा दिला. समाजात सुहास जोशी हे नाव सन्मानाने घेतलं जाऊ लागलं.. आणि सर्वोत्तम उद्योजक म्हणून त्याला सन्मानित करण्यात येणार होतं.


सुहासच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. आईबद्दलचं प्रेम, कृतज्ञता, आदर त्याच्या डोळ्यात दिसत होता. एखादया  चित्रपटाप्रमाणे त्याचा जीवनपट उलगडत गेला होता. मुलाखती साठी जमलेल्या सर्व लोकांचे डोळे पाणावले होते.. सुहासने एक दीर्घ श्वास घेतला, शब्द फुटत नव्हते.. डोळ्यांतले आसवं आवरत तो म्हणाला," मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे.. तिच्या मेहनतीमूळे हे शक्य होऊ शकलं.. तिने रूजवलेलं कावेरी उद्योग नावाचं एक छोटंसं रोपटं आता वटवृक्ष झालं आहे.. मी तिचा आयुष्यभर ऋणी राहीन..तिचे पांग या जन्मीतरी फेडता येणार नाही.. आणि म्हणूनच हा सत्कार माझा नसून माझ्या आईचा आहे". सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात कावेरी आणि सुहासला मानवंदना दिली.. कावेरीच्या, सुहासच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले.. आणि सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत दोघे प्रत्येकाचे आभार मानत होते.. 


कावेरीचा जीवन संघर्ष किती खडतर होता.. अजाणत्या वयात झालेलं प्रेम, अर्धवट सोडलेल्या शिक्षणामूळे करीयरची झालेली वाताहत, आईवडिलांचा विचार न करता सोडलेलं तिचं स्वतःच्या माणसांचं हक्काचं घर, ज्याच्यावर प्रेम केलं त्याने केलेली दुर्दशा, परतीच्या बंद झालेल्या वाटा, तरीही खंबीरपणे उभी राहिलेली कावेरी फक्त सुहास साठीच नाही तर सर्वांसाठी एक आदर्श बनली.. प्रतिकूल परिस्थितीतही डगमगून न जाता आपल्या पोटच्या मुलासाठी कावेरी मधली योध्दा आई जीवनातली प्रत्येक लढाई लढली होती आणि जिंकलीही होती..एकाच चाकावर चाललेला संसार तिने यशस्वीपणे पुढे ओढला होता.. संसाराचं एक चाक गळून पडलं होतं तरीही कावेरीने हार मानली नाही.. लढत राहिली.. संसाराचं हे धनुष्य एकटीच्या खांद्यावर पेलत राहिली.. 


मैत्रिणींनो, ही कथा एका कावेरीच्या जीवन प्रवासाची. आपल्या समाजात अश्या अनेक कावेरी आपल्याला पदोपदी पाहायला मिळतील.. सर्वांची व्यथा जरी वेगळी तरी दुःख सांधण्याची कला त्यांना कोठून अवगत होते कोण जाणे..!! अश्या प्रत्येक कावेरीस माझा मानाचा मनापासून सलाम..!!! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational