Nisha Thore

Others

2.4  

Nisha Thore

Others

उंबरठा

उंबरठा

19 mins
1.2K


..


"नका ओ मारू.., का मारताय? काय चुकलंय?.. आईई!!" ती मोठमोठ्याने आक्रोश करत होती. तिच्या नाका तोंडातून रक्त वाहत होते. आणि तो तिला एखादया जनावरासारखा मारत होता. दारू पिऊन शुद्ध हरपलेला तो. तोंडात घाणेरड्या अर्वाच शिव्या.. लथाबुक्क्यांनी तो तिला बदडून काढत होता.. ती विव्हळत, आक्रोश करत होती. जीव वाचवण्यासाठी ती या घरातून त्या घरी पळत होती आणि हा तिचा मागे.एखाद्या कसयासारखा...  


रोज रात्री असंच घडायचं. तो रोज दारू पिऊन यायचा. एखादं शुल्लक कारणही त्याला पुरेसं असायचं किंबहूना तो कारणं शोधायचा मग काय!! हातात जे येईल त्याने तिला मारायचा. पूर्वी शेजारीपाजारी तिला सोडवायला, तिच्या मदतीला यायचे पण तो त्यांनाही शिव्या द्यायचा.. शेजारच्यांचं नाव तिच्या बरोबर जोडून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा. आणि मग अजून तो चेकाळून तिला खूप मारायचा..जोपर्यत तिला जखमा होत नाहीत.. जो पर्यंत तिचं रक्त वहात नाही तो पर्यंत तो तिला मारत राहायचा.. तिच्या रक्ताला चटावलेला नरभषका सारखा.. तीच रक्त पाहून जणू त्याला एक आसुरी आनंद व्हायचा. शेजारचेही कंटाळून गेले होते. हल्ली शेजारच्यांनीही दोघांच्या भांडणामध्ये पडणं सोडून दिलं होतं. नवरा बायकोच्या भांडणात नको पडायला असा विचार करून.. प्रत्येकाला आपला प्रपंच. पोटाची भ्रांत.. मग कोणीही मध्ये पडायचे नाही. आणि ती गुराढोरांसारखी मार खात राहायची निमूटपणे..


आजही असंच घडलं होतं. नेहमीसारखा तो पिऊन आला होता. जेवणात मीठ कमी पडलं होत.. आज त्याला तिला मारायला हे कारण सापडलं होतं.. त्याच्या हातातला चामड्याचा पट्टा पाहून तिला तीच मरण दिसू लागलं होतं ती पुरती भेदरून गेली होती आणि तो सुरू झाला. तिला एखाद्या जनावरांसारखं मारायला.. तिच्या माहेरच्या लोकांचा उद्धार करत, शिव्यांची लाखोळी वाहत.. मारत सुटला होता. तीचा गगनभेदी टाहो आसमंतात घुमत होता.. तिचा तो आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता.. पण त्या नराधमाला तिची दया येत नव्हती. शेवटी तिला मारून मारून त्याला दम लागला.. धाप लागली त्याला.. आणि मग तिथेच पलंगावर तो उताणा पडला.. ती एका कोपऱ्यात आसवं गाळत निपचित पडली होती. आपल्याच अंगावर पडलेल्या काळ्या निळ्या डागांकडे पाहत.. का असं नशीब? देवा!!कोणत्या रे पापाची शिक्षा? देवाला जणू ती विचारात होती डोळ्यातून अश्रूधारा वहात होत्या. अनुराधा गणोजीराव आणि पार्वतीबाईंचं शेवटचं अपत्य..तिला आपले आई बाबा आठवू लागले 


सारा भूतकाळ डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारखा तरळत होता..


एका छोट्याश्या खेडेगावात शेतकरी कुटुंबात गणोजीराव यांचा जन्म झाला. ते अवघे दहा वर्षाचे असताना एका अल्पशा आजाराने त्यांच्या आईचे देहावसान झाले. आणि तो दुःखद वियोग सहन न झाल्याने अवघ्या दोन वर्षात वडीलही देवाघरी निघून गेले.. दोन भाऊ आणि एक बहीण यांची जबाबदारी त्यांच्यावर टाकून कायमचे सोडून गेले. 


डोंगरएवढं दुःख उरात ठेवून गणोजीराव खंबीरपणें उभे राहिले. शेती करू लागले. काळी आई दरवर्षी प्रसन्न होत होती. सढळ हस्ते दान देत होती. दरवर्षी शेतीतुन छान उत्पन्न निघत होते. हळू हळू शेतीही वाढत गेली. छोट्या घराचा मोठा वाडा झाला. वाड्यात गाई-म्हशी, जिवाशिवाची बैलजोडी एकत्र नांदू लागले. लक्ष्मी घरात सुखा समाधानाने पाणी भरू लागली. घरात सुबत्ता आली समाजात मान मिळू लागला. गावातल्या मोठ्या आसामींसोबत ऊठबस होऊ लागली. 


गणोजीरावांची धाकटी बहीण आता लग्नाच्या वयाची झाली होती. तिच्या वरसंशोधनाला सुरुवात झाली. मुंबईचं एक चांगलं स्थळ तिच्यासाठी सांगून आलं. मुलगा दिसायला छान.. कापड गिरणीत नोकरीला.. सोयरीक जमली. आणि मग गणोजीरावांनी आपल्या धाकट्या बहिणीचं मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं. ती तिच्या सासरी निघून गेली. पुढे दोन भावंडांचीही लग्न झाली. सगळे आपापल्या जागी स्थिरावले. आपल्या भावंडांचा सुखी संसार बघून ते आनंदी व्हायचे. मनात यायचं.. आता आईबाबा हवे होते. घराचं गोकूळ झालेलं पाहून त्यांना किती आनंद झाला असता.. आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागायच्या. गावातली मंडळी आता त्यांच्या लग्नाबद्दल विचारू लागली. करायचं ना..असं हसून उत्तरं देऊन निघून जायचे. काही दिवसांनी जवळच्या नातेवाईकांकडून गणोजीरावांसाठी पार्वतीबाईच स्थळ सांगून आलं.. गणोजीरावांसारखा गुणी मुलगा कोणाला जावई म्हणून आवडला नसता.. एकमेकांची पसंती झाली. सोयरिक जमली. आणि लग्न झालं..  


गणोजीराव आणि पार्वतीबाईं यांचा सुखी संसार सुरू झाला आणि खऱ्या अर्थाने घराचं नंदनवन झालं. काही वर्षांतच संसारवेल बहरून आली. तीन गोंडस मुलांचा जन्म झाला. 'अनुराधा' सर्वात धाकटी..दोन मुलांच्या पाठीवर झालेली.. गोरीपान.. गोंडस, चिमुकल्या पावलांनी आलेली, सोनपरी.. सारे आनंदून गेले होते. एकुलती एक मुलगी..भावंडांची ताई आली होती. दोघ मुलं खूप खुष होती. दोघे पतिपत्नी सुखाने नाहून निघाले होते.. ईश्वराच्या या कृपेसाठी त्याचे आभार मानत होते.. 


सगळं सुरळित चालू होत.. आयुष्य छान पुढे सरकत होत. गुण्यागोविंदाने संसार सुरू होता अगदी दृष्ट लागण्याजोगा.. आणि नेमका नियतीने डाव टाकला.. सुखी संसाराला ग्रहण लागलं. एके दिवशी मित्राकडे जेवणाचं आमंत्रण होतं. म्हणून गणोजीराव मित्रांसोबत बाहेर गेले. जे गेले ते कायमचंच.. परत कधीच न येण्यासाठी.. घरी परतत असतांना रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.. आणि जागीच त्यांची प्राणज्योत मालवली.. 


साऱ्या गावाभर शोककळा पसरली.. एक चांगली व्यक्ती, घरचा कर्ता पुरुष सोडून गेला होता. पार्वतीबाईंवर तर दुःखाचं जणू आभाळ कोसळलं.. 'अनुराधा'  फक्त दोन वर्षांची होती.लक्ष्मीच्या पावलांनी माप ओलांडून घरी आलेल्या पार्वतीबाईंचं रूपच पालटलं.. आणि खरी सुरुवात झाली आयुष्याच्या परीक्षेला.. 


पार्वतीबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पदरी तीन मुलं. काय होणार पुढे? बाबा आता परत कधीच येणार नव्हते. चिमुकल्या मुलांना काय सांगणार होती ती माऊली? खूप प्रश्न..अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या. दोन्ही मुलं आईच्या पदराखाली रडत बसली होती चिमुकल्या अनुराधाला तर कळतही नव्हतं.  


नववधूच्या रुपात गृहप्रवेश केलेल्या पार्वतीबाईंचं रूप, आयुष्यच एकदम पालटून गेलं होतं. सौभाग्य अलंकार काढून घेतांनाचा त्यांचा गगनभेदी टाहो काळजाला पिळ पाडत होता. ठसठशीत कुंकु लावणारी माऊली पांढरं कपाळ घेऊन वावरत होती. पुर्ण आयुष्य एक तरुण विधवा म्हणून जगायचं होतं.समाजाला सामोरं जायचं होतं. चिमुकल्यांसाठी जगायला हवं होतं. गणोजीराव असतांना कधीही उंबरठ्याबाहेर त्या पडल्या नव्हत्या. बाहेरची सगळं कामे गणोजीरावच करायचे. लिहता वाचता येत नसल्यामुळे कोणत्याही व्यवहारात त्यांचा सहभाग नव्हता. गणोजीरावांनीही कधी काही सांगितले नव्हते. काही दिवस नातेवाईक येत राहिले. सांत्वन करत राहिले. आम्ही आहोत ना!! असं म्हणणारे नंतर हळुहळु पांगत गेले. 


आता उरलं होतं एक भकास जीणं..मन घट्ट करून डोळ्यातली आसवं पुसून ती माऊली परत उभी राहिली.आपल्या मुलांसाठी..म्हणतात ना.. घर बदललं की घराचे वासेंही बदलतात. कोणीच कोणाचं नसतं. आपण फक्त आपलेच. आता माणसांचे खरे रंग दिसायला लागले होते. पुर्वी प्रेमाने वागणाऱ्या जाऊबाई आता जाच करू लागली. सगळी कामे त्यांना सांगू लागली. धाकट्या दिराने गोड बोलून संपत्तीच्या पेपरवर त्यांचा अंगठा उठवून घेतला आणि सगळी स्थावर मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली.. विश्वासाने त्यांचा गळा कापला होता. एक तरुण विधवा, पदरी तीन मुलं आणि गावातल्या पुरुषांच्या वाईट नजरा, जावेचे सततचे टोमणे.. जगणं असह्य झालं होतं. शेवटी मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या नणंदेला त्यांची दया आली. त्या त्यांना घेऊन मुंबईला आल्या.


नवीन शहर.. नवीन प्रवास.. नवीन आयुष्य.. बैठी घरांची छोटीशी वस्ती, पोटापाण्यासाठी त्यांच्या गावाकडील बरीच लोकं तिथे येऊन वसली होती. एक भाड्याने घेतलेली छोटीशी बैठी खोली.. आणि आपल्या मुलांच्या सोबतचा संसार.. शेजारी नणंदेची खोली, तिचा नवरा तिची चार मुलं, नणंदेचा दिर, जाऊबाई तिची तीन मुलं असं मोठं कुटुंब. सुरुवातीला काही दिवस नणंदेने सांभाळ केला. पण नंतर तिलाही ते जमेना. तिचा नवरा एकटाच कमवत होता. खाणारी तोंडं जास्त.. खर्च भागत नव्हता. पार्वतीबाईंनाही बसून खाणं रुचेना.. कामाच्या शोधात त्या घराबाहेर पडल्या. शिक्षण नव्हतं कुठे नोकरी मिळणार?? मिळेल ते काम करू लागल्या. कधी मोलमजुरी, कधी धुणीभांडी, कधी इमारती बांधकाम करताना रेती सिमेंट वाहून नेण्याचं मजुरी काम करू लागल्या. जिवंत राहणं महत्त्वाचं होतं..मुलांसाठी.. त्यांना जगवणं गरजेचं होतं.


'अनुराधा' आपल्या भावंडांसोबत हळूहळू मोठी होत होती. भावांपेक्षा थोडी जास्तच समंजस होती. पार्वतीबाई लवकर कामावर जायच्या रात्री उशिरा घरी यायच्या. पार्वतीबाईंनी मुलांची सरकारी शाळेत नावं दाखल केली. मुलांची शाळा सुरू झाली. इथे रोजच्या पोटाची भ्रांत.. तिथे अजून एक नवा खर्च वाढत होता. अजय, विजय आणि अनुराधा मोठी होऊ लागली. शरीरासोबत पोटाची भूकही वाढत होती. सकाळी न्याहारी करायला ही सगळी दहा भावंडं एका रांगेत बसायची. आत्या ताटात एक पोळी आणि कपभर चहा द्यायची. वय वाढत होतं. पण पोळी मात्र एकच. दिवसभर एका पोळीवर चिमुकली मुलं आपल्या आईची वाट पहात बसायची.


आईचे कष्ट पाहून अजयने शाळा सोडली. तो आईबरोबर मजुरीच्या कामावर जाऊ लागला. विजय आणि अनुराधा शाळेत जात होते. एकच दप्तर दोघांत.सकाळी विजय दप्तर घेऊन जायचा आणि मग तेच दप्तर रिकामं करून आपली वह्या पुस्तक भरून दुपारी अनुराधा शाळेत जायची. वयाच्या मानाने लवकरच समंजस झाली होती. खडतर वाटेवरचा प्रवास. पोटभर अन्न नाही की घालायला नवीन कपडे नाहीत.कोणीतरी वापरलेले कपडेच नवे समजून घालायची. गुणी मुलं होती. कधीही तक्रार करायचे नाहीत. 


अनुराधा तिसरीत आणि विजय पाचवीत होता. भूक लागायची.आईची किती वेळ वाट पहाणार? मग दोघे जेवण बनवायला शिकू लागली. एवढासा जीव तो नाजूकश्या हातांनी छोट्या छोटया भाकरी थापून देई. मग विजय तव्यावर भाकरी टाकून भाजून द्यायचा. चटके बसायचे तेंव्हा कुठे भाकरी मिळायची.. पाट्यावर वाटण वाटताना तळहातांची आग व्हायची. विजय तेल लावून द्यायचा. हळूहळू अनुराधा जेवण बनवायला शिकली. अवघ्या दहाव्या वर्षी उत्तम जेवण बनवू लागली. पार्वतीबाईंची एक चिंता कमी झाली. घर सांभाळून शाळेतही जात होती. शाळेची आवड होतीच. हुशार विद्यार्थिनी म्हणून अनुराधा शाळेत ओळखली जाऊ लागली. मोत्यांसारखे सुंदर हस्ताक्षर वहीवर फेर धरू लागले. सहावीत असताना अनुराधा शाळेत पहिली आली. खूप आनंद झाला होता तिला. 


मग आलं एक वादळ.. तिला नेस्तनाबूत करण्यासाठी.. दुःखाचा प्रवास संपलेला नव्हता. अजून एका वादळाशी तिला झुंज द्यायची होती.. 


अनुराधा आज खूप आनंदात होती. शाळेतल्या मुख्याध्यापिकांच्या हस्ते तिला पारितोषिक मिळालं होतं. त्यांनी तिचं तोंडभरून कौतुक झालं होतं. कधी एकदा घरी येतेय आणि आईला सांगतेय असं झालं होतं तिला!!! पण नशीब कसं असतं ना!! आज नेमकं पार्वतीबाईना मजुरी काम मिळालं नव्हतं.. अन्न काय शिजवावं?हा प्रश्न.. भुकेलेल्या मुलांचे चेहरे डोळ्यासमोर येत होते. संताप दुःख सगळं उफाळून येत होतं. आज शाळेत कार्यक्रम असल्याने अनुराधाला घरी यायला उशीर झाला.. त्यामुळे घर आवरलेलं नव्हतं. केर काढायचा होता, भांडी घासायची होती. घराचा अवतार पाहून त्या अजूनच चिडल्या. आणि आनंदाने आईला बिलगलेल्या अनुराधाला त्यांनी मारायला सुरुवात केली. "कुठे गेली होतीस हुंदडायला?.. घर मोकळं टाकून?" बिचारी अनुराधा रडत राहिली. निमुटपणे मार खात राहिली. तशीच उपाशी पोटी झोपी गेली.


रात्री विजयने तिला मिळालेल्या पारितोषिकाविषयी सांगितले. आईला खूप हळहळ वाटली. दुसऱ्यांचा राग चिमुकलीवर निघाला म्हणून खूप यातना होत होत्या. अनुराधाला त्यांनी जवळ घेतलं. जखमांवर हळद लावत, हलकेच कपाळावर चुंबन.. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या.. झालेल्या चुकीबद्दल अनुराधाकडे क्षमा मागत होत्या.. 


आयुष्य पुढं सरकत होतं..रोज नवीन संकटांना सामोरे जात जात जीवन प्रवास सुरू होता. पैशांची चणचण, मजुरी मिळाली तर पोटभर जेवण, नाहीतर अर्ध्या पोटी.अंग झाकलं जातंय ना म्हणून कपडे.. बाकी हौस आवड हा प्रकार नव्हताच मुळी.. 


अनुराधा आता सातवी इयत्तेत गेली होती आणि एक दिवस ऋतूचक्राने कौल दिला..अनुराधा मोठी झाली..शहाणी झाली होती.आता पार्वतीबाईं समोर अजून एक चिंता फेर धरू लागली. तिच्या लग्नाची.. कोण लग्न करणार एका गरीब पितृछत्र हरपलेल्या मुलीशी..? कोण बघणार सोयरीक..? पार्वतीबाईं तर दिवसभर मजुरी करण्यासाठी घराबाहेर. कसं जमणार होतं? अनुराधाला तर इतक्यात लग्न करायचंच नव्हतं. तिला शिकायचं होतं..पण तीच कोण ऐकणार होतं?


वस्तीत त्यांच्या गावाकडची बरीच माणसं रोजगारासाठी आलेली होती.. त्यापैकीच एक सदाशिव व त्याचा भाऊ राघव आपल्या कुटुंबासोबत त्यांच्या शेजारी रहात होता..वस्तीत सर्वात जास्त शिकलेला सरकारी नोकरीला असलेला सदाशिव..गावाला थोडी शेती होती. गाई, म्हशी, जनावरं होती.श्रीमंत नामांकित घराणं..चार भाऊ आणि चार बहिणी, आई वडील एकत्र मोठं कुटुंब.. सगळ्या बहिणींची लग्न झालेली. सर्वात लहान अविवाहित भाऊ.. शिक्षण घेत होता. गावी दोघे भाऊ शेती करत होते आणि हे दोघे मुंबईत. 


राघव शिकलेला नव्हता. गावी उनाडक्या करत फिरायचा म्हणूनच सदाशिव त्याला मुंबईला घेऊन आला होता.गावात कुस्ती खेळलेला, गावात मोकळ्या वातावरणात कमावलेलं बळकट शरीर. गावाकडे बायको लक्ष्मी तिसऱ्या बाळंतपणाला माहेरी गेलेली. पहिल्या दोन मुली पदरी.. नणंदेचा नवरा आणि सदाशिव चांगले मित्र झालेले. घरी येणं जाणं होतं. 


एक दिवस अचानक सदाशिवच्या गावावरून तार आली. बातमी खूप वाईट होती. राघवच्या बायकोच्या लक्ष्मीच्या मृत्यूची. बाळंतपणात एका लहानग्या मुलीला जन्म देऊन ती देवाघरी निघून गेली. सगळे दुःखद वातावरण. सदाशिव राघवला घेऊन गावी आला. राघव सैरभैर झाला. पत्नीचा अंतिम विधी झाला. आईच्या दुधाविना कसं जगणार होता तो जीव..? अवघ्या आठवड्याभरातच आईच्या वाटेने ते मूल निघून गेलं..लक्ष्मीच्या माहेरचे दोन मुलींना त्यांच्या घरी घेऊन गेले. राघव या दुःखाने वेडापिसा झाला. रोज दारू पिऊ लागला.. नशेत गावात लोकांना उगीच शिवीगाळ करू लागला, भांडणं घरापर्यंत येऊ लागली.. 


म्हणून मग सदाशिव राघवला घेऊन परत मुंबईला आला. राघवला नोकरी शोधून दिली. पण राघव पुरता वाया गेला होता. चार दिवस कामावर तर बाकीचे दारू पिऊन घरी पडलेला असायचा. तशीच शिवीगाळ, तशीच भांडणं इथेही. लोक मारायला घरापर्यंत येऊ लागले. 


एक दिवस सदाशिवने अनुराधाला नळावर पाणी भरताना पाहिले. सालस, सुंदर गोड मुलगी, घरच्या जबाबदाऱ्या उत्तम संभाळून घेणारी अनुराधा त्याला आवडली. त्याने आपल्या भावासाठी, राघवसाठी आपल्या मित्राकरवी पार्वतीबाईंना अनुराधास मागणी घातली..


एक बीजवर विधुर माणूस, तीन मुलींचा बाप, अनुराधापेक्षा पंधरा वर्षांनी मोठा. एक व्यसनी.. अनुराधा फक्त तेरा वर्षाची.. पार्वतीबाईंच्या मनाची घालमेल सुरू झाली. श्रीमंत घराणं.. आपल्यासारखी वणवण अनुराधाला नको.. इथे आजवरचं आयुष्य गरिबीत गेलं. यापुढे तरी सुखात राहील. मन सांगू लागलं.. कोण लग्न करेल तिच्याशी? कोण स्थळ आणेल तिच्यासाठी ?? प्रश्नांनी भंडावून सोडले होते. 


त्यात नणंदेचा नवरा म्हणू लागला,"निदान पोटभर जेवायला तरी मिळेल. विधुर असला म्हणून काय झालं. व्यसनी असला म्हणून काय झालं?लग्न झाल्यावर सुधारेलच की.." त्यांना त्याचं म्हणणं पटलं.. आणि पार्वतीबाईंनी लग्नाला परवानगी दिली. 


काही शेजारच्या लोकांना म्हणजे त्यांच्याच नातेवाईकांना हे लग्न मान्य नव्हतं. एक तीन मुलांच्या बापाला एक तेरा वर्षाच्या मुलगी द्यायची. एक निष्पाप कोवळ्या मुलीची आहुती द्यायची.. मनाला पटत नव्हतं. काही जीव हळहळत होते. पार्वतीबाईंना समजावत होते. पण त्यांचा निर्णय झाला होता. खरंतर अनुराधालाही हे लग्न करायचं नव्हतं.. तिला शिकायचं होतं. पण तिचं आईपुढे काहीच चालेना.. 


लोकांनी अनुराधाला विचारलं,"तुझं जबरदस्तीने लग्न लावून देताहेत का? देत असतील तर सांग.. बघतो आम्ही तुझ्या मामाकडे आणि आईकडे सुद्धा.. बळजबरीने लग्न करत असतील तर जीव घ्यावा लागला तुझ्या आईचा तरी घेऊ.. तू सांग फक्त.. तुला हे लग्न मान्य आहे की नाही?"


अनुराधा घाबरली…आपण जर नकार दिला तर आपल्या आईला जीवे मारतील म्हणून धास्तावली.. आणि आईसाठी लग्न तिच्या मर्जीने होतंय म्हणून कबुली दिली.. मग कोण काय करणार होतं? मुलीनेच होकार दिला म्हटल्यावर.आणि ती लग्नाच्या बोहल्यावर चढली..मांडवात दारूच्या नशेत झोकांड्या घेणाऱ्या राघवच्या गळ्यात पुष्पहार टाकून विवाहबद्ध झाली. अनुराधाने स्वतःहून या अग्निकुंडात उडी घेतली होती.. स्वतः च्या मर्जीने ही वादळवाट निवडली होती..


शिक्षण अर्धवट सोडून अनुराधा तिच्यापेक्षा वयाने पंधरा वर्षानी मोठा,व्यसनी, विधुर तीन मुलांच्या बापाशी, राघवशी विवाहबद्ध झाली. अनुराधाने स्वतःहून या अग्निकुंडात उडी घेतली होती. गावी जाऊन अगदी मोजक्याच लोकांसमवेत साध्या पध्दतीने त्यांचा विवाह संपन्न झाला. सदाशिवनेही वस्ती सोडून चांगल्या ठिकाणी एक घर बुक केलं आणि तो आपल्या पत्नीमूलांसोबत नवीन घरी राहायला गेला.. राघव तिथेच वस्तीत राहू लागला.अनुराधा राघवशी लग्न करून त्याच्या घरी आली. उंबरठ्यावरचं माप ओलांडून गृहप्रवेश झाला. उंबरठा.. हीच तुझी चौकट जणु सांगू पाहत होता. उंबरठ्याच्या आतलं एक वादळ दबा धरून बसलं होतं. 


हिरवा शालू, हिरवा चुडा, गळयात मंगळसुत्र, कपाळावर कुंकू आधीच सुंदर असलेली अनुराधा अजूनच छान दिसत होती. हळदीचा पिवळा रंग खुलून आला होता.. हातावरच्या मेहंदीचा हलकासा सुगंध तिचा तिलाच जाणवत होता. वय अवघे तेरा वर्षं.. भातुकली खेळण्याचं वय तीचं.. पण तिचं आयुष्यच एक भातुकलीचा खेळ झालं होतं. नवरा म्हणजे कोण? संसार म्हणजे काय? पतीपत्नी मधील नाजूक नात्यांचा बंध एवढ्याश्या लहान जीवाला कसा कळणार होता? 


बरीच रात्र झाली होती. तो घरी आला नव्हता. अनुराधा त्याची वाट पहात बसलेली.. खूप उशिरा मध्यरात्री झोकांड्या घेत नशेत तो घरी आला. दरवाजा ठोठावु लागला. अनुराधाने पटकन जाऊन दार उघडले. त्याच्या तोंडाचा दारूचा घाणेरडा दर्प तिला जीवघेणा वाटला. त्याला पाहून अनुराधा खूप घाबरली होती. त्याने तिला ओढत पलंगाजवळ आणले आणि धाडकन तो तिच्या अंगावर कोसळला. अनुराधाला नेमकं काय चाललंय ते समजेना.. तो काय करतोय तिला कळत नव्हतं. तिने त्याला दूर करण्याचा खूप प्रयत्न केला..पण त्याच्या ताकदीपुढं तिचं काहीच चालेना..तिचा विरोध करणं त्याला अपमानास्पद वाटले.त्याच्या पुरुषार्थाला आव्हान जणू.. रागाने त्याने जोरात तिच्या कानाशिलात मारली.. ती ओरडली, नको नको म्हणू रडू लागली..तिच्या अंगावरचे कपडे ओढून फाडून..तो तिच्यावर तुटून पडला.. जनावरासारखा.. एक नराधम.. शरीरातला सैतान शांत होईपर्यंत तिच्या देहाशी खेळत राहिला.. एक अबोध कळी अमानुषपणे कुस्करली गेली.. देहाबरोबर मनावरही जखमा झाल्या होत्या.तिच्या मनातल्या नाजूक भावनांचा चक्काचूर झाला होता.. 


अनुराधा रात्रभर तशीच पडून होती..निपचित..आणि तो शेजारी घोरत झोपला होता.. नवरा नावाचा श्वापद.. हातातल्या बांगड्या फुटल्या होत्या.. बांगड्यांची काच लागल्याने रक्त येत होतं. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. काय होतं ते.. माहीत नाही.. 


सकाळ झाली. अनुराधाचं सगळं अंग दुखत होतं. ती तशीच धडपडत उठली. कपडे बदलले आणि तडक आपल्या आईकडे गेली. आईच्या गळ्यात पडून रडू लागली. आईला झालेला सगळा प्रकार सांगितला. "मला परत त्याच्या घरी जायचं नाही.. नको मला नवरा." हात जोडून काकुळतीला येऊन सांगत होती. विनवणी करत होती. पार्वतीबाईं तिला समजावून सांगू लागल्या.. "नवरा असाच असतो गं! लग्नानंतर असंच घडतं सगळं. एकदा का लग्न झालं मुलीचं.. तिने मरेपर्यंत तिथेच राहायचं.. आता तेच घरं.. आणि नवरा हाच तिचा परमेश्वर.. तो उंबरठा हीच तुझी मर्यादा..तू उंबरठा ओलांडशील ते फक्त तुझ्या अंतिम प्रवासालाच" आणि परत अनुराधाला राघवकडे घेऊन आल्या. 


रोज रात्री हेच घडतं होत. त्याचं रोज दारू पिऊन येणं..रोज होणारा अत्याचार.. हो अगदी समाजमान्य.. तिला ओरबाडून चोळामोळा करणं त्याला सवयीचं झालं होतं. त्या गोष्टीला तिचा नकार आणि त्यामूळे त्याचं तिला मारहाण करणं अगदी रोज घडू लागलं. इतकं मार खाऊन, रात्रभर जागे राहूनसुद्धा ती सकाळी उठून राघवला जेवणाचा डब्बा करून द्यायची.. तो उपाशी राहू नये म्हणून.. पण त्या पाषाणहृदयी माणसानं कधीच तिची काळजी केली नाही. कधी विचारपूस केली नाही. 


सुंदर देखणी बायको त्यात वयाने लहान.. राघवच्या डोक्यात कायम संशयाचं भूत...कायम तिच्यावर पाळत ठेवून असायचा. तशी अनुराधा फारशी कोणाशी बोलायची नाही. पण कधी ओळखीच्या लोकांशी बोललीच तर तेही त्याला आवडायचं नाही. घरी आल्यावर तो तिला बेदम मारायचा. इतकंच काय तर तिने आईकडे गेलेलंही रुचायचं नाही.. त्यावरूनही तो तिला शिवीगाळ करायचा, मारायचा.. कामावर जातांना तिला घरात कोंडून दाराला बाहेरून कुलूप लावून जायचा.. वस्तीत शौचालय बाहेर असायची. कधीकधी पंचायत व्हायची. सार्वजनिक नळावर पहाटे पाणी यायचं. तिला कोणी पाहू नये म्हणून तो तिला पहाटेच पाणी भरायला सांगायचा. थंडीत कुडकुडत ती पाणी भरायची..


पार्वतीबाईंना आता त्यांची चूक कळून चुकली होती. एक निष्पाप मुलीचा आपण आपल्या हाताने बळी दिला हे शल्य त्याना जगू देईना..अनुराधाला परत घरी बोलावण्याचा प्रयत्न केला. पण स्वाभिमानी अनुराधा परतली नाही..पुन्हा आपल्या आईलाच त्रास..लग्न झालेली मुलगी परत माहेरी कशी? लोक बोलतील म्हणून ती नाही गेली.. राघवच्या त्रासाला सहन करत जगत होती. 


एक दिवस अनुराधाला बरं नव्हतं. शेजारच्या काकू तिला दवाखान्यात घेऊन गेल्या. एक आनंदाची बातमी तिला समजली. निसर्गाने संकेत दिला होता. अनुराधाला मातृत्वाची चाहूल लागली.. प्रेमाचं प्रतीक नसलं तरी आईपणाच्या भावनेने ती मोहरली. दुःखाच्या आभाळाला सुखाची किनार मिळावी.. ग्रीष्मात पावसाची एक सर यावी अगदी तसं झालं होतं तिला.. घरी येऊन राघवला सांगितलं. पण तो शुद्धीत कुठे होता. त्याला कुठे तिचं कौतुक असणार?? 


दिवस सरत होते.. अनुराधा अजूनच छान दिसू लागली होती. देहामध्ये बदल घडत होते. गरोदरपणाचं रूप अजूनच खुलून आलं होतं. अनुराधाला सातवा महिना सुरू झाला. पार्वतीबाईं पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी घेऊन जायला आल्या होत्या. राघव घरी येण्याची वाट पाहत बसल्या होत्या. राघव नेहमीसारखाच दारूच्या नशेत धडपडत घरी आला. त्यांनी त्याला अनुराधाला माहेरी घेऊन जाण्याबद्दल विचारले. रागाने तो त्यांना म्हणाला," घेऊन जायचं असेल तर कायमचंच घेऊन जा, परत पाठवू नका" दोघीही रडू लागल्या. पार्वतीबाईं विनवणी करू लागल्या. पण राघव ऐकायला तयार नव्हता. त्याने त्यांना घराबाहेर हुसकावून लावले. अनुराधाला तश्या अवस्थेतही मारत होता.. इतका संतापला होता की," कशी जातेस ते बघतोच. जीव घेतो तुझा." नशेत बरळत होता. आणि तो काय करतोय त्यालाच भान नव्हतं.. स्वयंपाकघरातून रॉकेलचा डब्बा घेऊन आला आणि अनुराधाच्या अंगावर रॉकेल ओतून दिलं. अनुराधा भीतीने थरथरत होती..आक्रोश करत होती.. पोटातल्या बाळासाठी विनवणी करत राहिली. पण तो ऐकत नव्हता. काडेपेटी शोधू लागला.. 


अनुराधा रॉकेलमध्ये निथळत होती. रॉकेलमध्ये ओलीचिंब..दारूच्या नशेत राघव एका गरोदर स्त्रीला पेटवून द्यायला निघाला होता. पार्वतीबाई ओरडत होत्या. शेजारचे गोळा झाले. दरवाजा वाजवू लागले. राघव काडेपेटी घेऊन बाहेर आला. काडी पेटवणार.. इतक्यात दरवाजा तोडून शेजारी आत आले. आणि त्यांनी अनुराधाला उचलून बाजूला नेलं.काही तरुण मुलांनी राघवला मारायला सुरुवात केली.. शेजारी मध्ये पडले म्हणून राघव बचावला होता. अनुराधा स्तब्ध.. सर्व अंग चुरचूर करत होत. लांबसडक केसात, अंगभर रॉकेलचा वास.. पार्वतीबाईंनी तिला आंघोळ घातली.. दोन घास जेवण भरवलं.. मुलीच्या नशिबावर अश्रू ढाळत.. 


अनुराधाचे दिवस भरत आले होते पार्वतीबाईंनी इस्पितळात नाव दाखल केले..आणि एक दिवस अनुराधाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. गोरीपान, नाजूकशी, इवल्याशा डोळ्यांची.. काळेभोर केस. गोड सोनपापडी.. अनुराधाने त्या इवल्याशा जीवाला अलगद जवळ घेतलं.. डोळ्यांतून आनंदाश्रू झरत होते. "आशा" तिच्या जगण्याची, तिच्या दुःखी जीवनातली आनंदाची रिमझिम सर.. आणि तिच्या मनाने त्याच दिवशी चिमुकलीचं आशा नाव ठरवून टाकलं होतं..


पण अनुराधाची खडतर वाट अजून सरली नव्हती..राघवला पहिल्या बायकोपासुनच्या पहिल्या दोन मुली आणि आता परत तिसऱ्यांदाही मुलगीच.. सासरचे नाराज.. वंशाला दिवा हवा होता.. मग काय राघवला अजून एक कारण मिळालं तिला त्रास देण्यासाठी.. परत दारु पिऊन येणं तिला मारहाण, शिवीगाळ करणं सवयीचं झालेलं.. कधी कधी तिलाच प्रश्न पडायचा का सहन करतोय? मग तिचेच मन तिला सांगायचं.. नवऱ्याला सोडून गेली तर लोकं म्हणतील वाईट चालीची असेल म्हणून पळून गेली..आणि इथला उंबरठा ओलांडलाच नाही आणि इथेच मरण आलं तर सौभाग्यवती म्हणून मरेन.. लोकं सुलक्षणी म्हणतील..संस्कारी होती म्हणून राहिली.. नाहीतर गेली असती पळून असं विचित्र बडबड करतील तर?? ..बरेच विचार तिच्या मनात यायचे.. लोक निंदेला घाबरून घेतलेला तिच्या या निर्णयाने ती खरंतर जगायचं विसरून गेली होती..


दिवसामागून दिवस जात होते, वर्षे सरत होती.. देव देव झालं उपास, व्रतवैकल्ये, नवस झाले..आणि अनुराधाला पुन्हा दिवस गेले..तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. दोन मुले झाली..सगळे आनंदी..राघवसुद्धा.. मुलगे झाले म्हणून खूप आनंदात.. मित्रांना पार्टी..फुल्ल दारू पिऊन.. अगदी बॅंडबाजा लावून जल्लोषात स्वागत.. वस्तीतील लोकांना जेवण, धुमधडाक्यात बारसं केलं.. सुशांत, समीर नावं ठेवली.. अनुराधा मुलांचं करण्यात गुंग झाली..दुःखातही मुलांच्या चिवचिवाटानं आनंदून जात होती.. तिची मुलं ती मायेची सावली बनून राहत होती.


तिचा वनवास अजून संपला नव्हता.. दिवाळीचा सण होता. मुलांना घेऊन अनुराधा मुलांसाठी करंज्या करत होती पेपरवर करंज्या करून तळण्यासाठी मांडल्या होत्या.. आजही राघव पिऊन आला होता. कशाला केलंय म्हणून तिला शिवीगाळ करू लागला आणि अक्षरशः तो नशेत त्या करंज्याच्या पेपरवरून चालत गेला.. सगळ्या करंज्या मोडल्या..मुलाच्या मुखातला घास त्याने ओढून घेतला होता.. त्याने रागाने अनुराधाला मारायला सुरुवात केली.. सगळीकडे आनंदीआनंद होता पण अनुराधाच्या घरी आक्रोश.. मुलं पण आईला मार खाताना पाहून घाबरून रडू लागली.."चालती हो घरातून" असं म्हणत त्याने तिला घराबाहेर काढले.. मुलं आत घरात आई आई म्हणून रडत होती.. 


तिचे डोळे पाण्याने डबडबले होते.. एका निर्णयापर्यंत पोहचली होती..तिने तिच्या मोडक्या घराचा उंबरठा आज ओलांडला होता.. अनवाणी पायाने वाट फुटेल तिकडे ती वाऱ्याच्या वेगाने निघाली.. कुठे तिलाच माहीत नव्हतं.. एका जंगली श्वापदापासून सुटका करून घ्यायची इतकंच तिच्या डोक्यात सुरू होतं.. 


घरापासून दूर आल्यावर ती अचानक एक वळणावर थबकली. तिला आठवलं.. आपली चिमणी पाखरं घरात...त्यांना सोडून कुठे जाणार? मी स्वतःची सुटका करून घेईन पण माझ्या चिमुकल्यांना कोण सांभाळेल?? या सगळ्या विचारांनी ती व्याकूळ झाली.. आणि पावलं मागे परतली.. दारापाशी तशीच बसून राहिली.. थंडीने ती कुडकुडत होती. सकाळ झाली आणि त्याने दरवाजा उघडला.ती रडत घरात आली मुलांना जवळ घेतलं.. मुलंही तिला बिलगली.. 


परत एकदा आई श्रेष्ठ ठरली.. आईसारखी महान योद्धा कोणी नाही या जगात हे सिद्ध झालं.. पुढेही असं अनेक वेळा घडत राहिलं. अनुराधा आत्ता मुलांसाठी सगळं सहन करत होती.. मन कसं असतं नाही!! लहान होती तेव्हा वाटलं लग्न झाल्यावर सुख येईल..नंतर वाटलं मुलं झाल्यावर सुख येईल आणि मुलं झाल्यावर ती मोठी झाल्यावर सुख येईल... सुखाची प्रतीक्षा काही संपली नाही.. वाट पाहणं काही संपलं नाही.. प्रत्येक टप्प्यावर उंबरठा अजूनच बळकट होत गेला.. तिची चौकट अजून घट्ट होत गेली..


पुढे अनुराधाच्या भावांची लग्ने झाली. नात्यातल्याच मुली भेटल्या. अजय आपल्या कुटुंबासोबत आईला घेऊन गावी स्थिरावला. विजय आपल्या कुटुंबासोबत मुंबईतचं राहिला. एकुलती एक बहीण असूनही राघवच्या भितीने ते कधी अनुराधाला भेटायला येऊ शकले नाहीत की कधी राखी बांधायला आले नाहीत.. अनुराधा कायम माहेरच्या सुखाला मुकलेलीच.. पार्वतीबाईंची प्रकृती हल्ली सारखी बिघडायची. त्यांची चूक त्यांना खूप त्रास द्यायची.. अनुराधाच्या तर आयुष्याची तर राख रांगोळीच झाली होती. पण तिने आजवर कधी तक्रार केली नाही.. 


अनुराधाची मुलं आता मोठी झाली.. आशा सीए झाली. सुशांत कॉम्प्युटर इंजिनिअर, आणि समीर एम.बी.ए झाला. आईच्या कष्टाचं चीज झालं. आतापर्यंत जे दुःख सहन केलं ते या आनंदात सगळं वाहून गेलं.. अनुराधा थोडी मोकळा श्वास घेऊ शकत होती. मुलांच्या लग्नाबद्दल आता विचार करायला हवा होता. शेजारी, नातेवाईक स्थळ घेऊन येऊ लागले होते..आशा अजून लहान होती., म्हणून अनुराधाने मुलांच्या लग्नाचा निर्णय घेतला.. 


सुशांत चांगल्या कंपनीत कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणून नोकरीला लागला.. समीरलाही छान नोकरी मिळाली..आशा एक सी.ए. फर्म मध्ये प्रॅक्टिस करू लागली.. सगळी मुलं आपापल्या पायांवर उभी राहिली.. मुलांनी आईचं नाव उज्ज्वल केलं. एका आईला अजून का हवं असतं!!


सुशांत ने चांगल्या ठिकाणी फ्लॅट बुक केला. आणि वस्तीला निरोप देऊन तो सर्वाना घेऊन नवीन घरी रहायला आला. पुढे दोन्ही मुलांचे विवाह झाले.. उंबरठ्यावरचे माप ओलांडून आता सुना घरी आल्या. अनुराधा आपल्या सुनांमध्ये स्वतःचा हरवलेला आनंद शोधू लागली.. पुन्हा नव्याने पालवी फुटावी तशी.. आशासाठीही वरसंशोधन सुरू झाले. काही महिन्यानी घरात नवीन पाहुण्याची चाहूल लागली.., सुशांत बाबा झाला. अनुराधा आजी झाली.. घराचं गोकुळ झालं. बाळाच्या येण्याने घर आता हसू लागलं होतं.,, 


अनुराधाला वाटलं, संपला वनवास.. आता सुखच सुख.. पण अजून नियती माघार घ्यायला तयार नव्हती.. तीचं प्राक्तन.. तिचा पाठलाग सोडत नव्हतं.. 


राघव अजूनही तसाच दारू पिऊन अनुराधाला त्रास द्यायचा.. म्हणतात ना!! जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.. मुलं मोठी झाली, सुना आल्या, नातवंडे आली तरी राघव बदलला नाही.. काळ पुढे निघून गेला.. वय झालं तरी तो तसाच.. नराधम..अनुराधाचा वनवास अजून संपला नव्हता.. सुनांसमोर तो तिचा अपमान करायचा.. शिवीगाळ करायचा.. कधी कधी मारहाणही.. अनुराधा आसवं गाळत बसायची.. जेव्हा नवरा किंमत देत नाही त्यावेळीस त्या स्त्रीला समाजात, घरात, नातेवाईकांत काहीच किंमत नसते.. दारुड्या नवऱ्याची बायको म्हणून आजवर सहन केलेली अवहेलना अजूनही सहन करावी लागत होती.. सुशांतही हल्ली बायकोचं ऐकून आईवर आवाज चढवून बोलू लागला..अडाणी आईला काय कळतं? असं त्याला वाटू लागलं होतं.. 


अनुराधाला खूप वाईट वाटायचं. मुलांसाठी उंबरठा ओलांडला नाही, तेंव्हा तो निर्णय घेतला असता.. मुलांना वाऱ्यावर सोडून जगली असती ती.. पण तिच्यातली आई कशी जिवंत राहीली असती?? तेंव्हा उंबरठा ओलांडला नाही कारण मुलांची चिंता..आणि आज तिचा मुलगा सुशांत तिचा आदर करत नव्हता. आई हवी फक्त घरातल्या कामांसाठी, मुलांना सांभाळण्यासाठी.. एका मोलकरणीसारखी अवस्था होती तिची..चोवीस तास फुकट राबणारी.. आईने सहन केलेलं दुःखाचा त्याला विसर पडला होता...कित्येक दिवस आई आणि मुलामध्ये संवादही व्हायचा नाही..अनुराधा तेंव्हा उंबरठा ओलांडू शकली नाही आणि आजही.. तेंव्हा चिंता मुलांची आज नातवंडांची.. तेव्हा आई आणी आज आजी.. दुधावरची साय.. प्रत्येक वेळीस उंबरठा अजून मजबूत होत गेला..


एक दिवस राघव दारू पिऊन आला. अनुराधाला शिवीगाळ करू लागला. काय झालं कोणास ठाऊक!! त्याने शेजारी पडलेली काठी घेतली.. आणि तिला मारू लागला.. सोबतीला लाथाबुक्क्या.. ती कळवळली.. आता मात्र आशाला सहन होईना..आईचा आक्रोश कानठळ्या बसवणारा.. हृदय पिळवटून टाकत होता.. तिच्यात बळ कुठून आलं कोणास ठाऊक!! जणू वीज कडाडली, वाऱ्याच्या वेगाने ती राघवच्या अंगावर धावून गेली. त्याच्या हातातली काठी हिसकावून घेतली जोरात ओरडली," खबरदार!! माझ्या आईला जर मारलं तर!! मी पोलिसांना सांगेन..तुमच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद करेन.. परत जर तिला हात लावलात तर तुरुंगात पाठवेन".. मुलीचं पहिल्यांदाच असं रौद्र रूप पाहून राघव घाबरला.. गुपचूप एका कोपऱ्यात बसला..


अनुराधा रडत होती..आशाने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली,"आई!! मी आहे तुझ्यासोबत.. मी राहीन तुझ्या सोबत कायम.. चल या उंबरठ्याबाहेर.. खुप सुंदर जग आहे.. मी दाखवेन तुला ते.. या पुढे तू काहीही सहन करणार नाहीस.. मोकळं आभाळ तुझं आहे फक्त.. कोणीही तुला त्या घरातून हुसकावून लावणार नाही.. सोड तो उंबरठा"!!!  


आणि आशा आपल्या आईला घेऊन घराबाहेर पडली.. अनुराधा मोकळा श्वास घेऊ शकणार होती.. जणू आशा तिची आई झाली होती. आणि अनुराधा मुक्त झाली.. अखेरीस आपल्या मुलीच्या मदतीने अनुराधाने उंबरठा ओलांडला होता… अखेरीस एक बंदिनी कारावासातून मुक्त झाली...


माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो.. ही कथा होती एका अनुराधेची.. एक सत्यकथा..ज्या अनुराधेने मला जगायला शिकवलं. दुःखाशी लढायला शिकवलं. तिची कथा.. मी कथेचा शेवट गोड केला. पण वास्तविक आजही आपल्या समाजात अनेक राघव व्यसनाधीन होऊन स्त्रियांवर अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार करताना दिसतात, अश्या कित्येक अनुराधा त्याच परिस्थितीत उंबरठ्याआडचं जीवन निमुटपणे जगत आहेत.. कथेतल्या अनुराधेच्या पोटी तिची मुलगी आशा होती.. प्रत्येकीच्या नशिबी आशा असतेच असं नाही.. म्हणून अनुराधेलाच खंबीर व्हायला हवं.. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा ही तितकाच गुन्हेगार असतो..आपल्या दुःखाला कारणीभूत असतो.. म्हणून कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.. निमुटपणे सहन करता कामा नये.. हा उंबरठा,, ही चौकट मर्यादा दर्शविते.. पण जेव्हा जीवघेणा प्रवास सुरु होतो.. तेव्हा हा उंबरठा ओलांडून गेलेलंच बरं नाही का!!! इतकंच मनातलं..


Rate this content
Log in