Nisha Thore

Drama Romance Tragedy

4  

Nisha Thore

Drama Romance Tragedy

त्या वळणावर...

त्या वळणावर...

19 mins
1.0K


सायंकाळची वेळ होती.. सागराला आलेली भरती किनाऱ्याला ओलेचिंब करत होती.. तो एकटक फेसाळलेल्या समुद्राकडे पाहत होता.. सागराची गाज जीवाला त्याच्या कातर करत होती.. आज तो तिला भेटणार होता तब्बल अठरा वर्षांनी.. त्याच नेहमीच्या ठिकाणी ठरलेल्या वेळेआधीच येऊन तो तिची वाट पाहत बसला होता.. खूप सारे प्रश्न मनाला भेडसावत होते.. आज सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो तिला विचारणार होता.. हो अन तेही अगदी खडसावून.. का केलंस असं? का वागलीस असं? काही झालं तरी सगळं सगळं मनातलं आज विचारायचंच, पक्क मनाशी ठरवलं होतं.. जुन्या आठवणींची गर्दी होऊ लागली.. डोळ्यातलं आभाळ रीतं होवू लागलं.. सगळं एखाद्या चित्रपटासारखं डोळ्यासमोर तरळत होतं.. जणू काही काल परवाच घडलेली गोष्ट असावी.. 


कॉलेजचे सोनेरी दिवस होते. स्वप्नांचा वेध घेणारे.. फुलपाखरांचे पंख लावून उडण्याचे.. प्रेमात वेडं होण्याचे, फुलायचे दिवस, झोपाळ्या वाचून झुलायचे दिवस.. मंदार इंजिनिअरिंग कॉलेजच्या दुसऱ्या वर्षांला होता.. कॉलेजमध्ये तो सगळ्यांच्या चर्चेचा विषय असायचा.. दिसायला देखणा, रुबाबदार, अभ्यासात हुशार.. कॉलेजमधल्या प्रत्येक गोष्टीत उत्स्फूर्तपणे सहभाग असायचा.. स्वभावाने थोडा मिश्कील.. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा..थट्टा मस्करी करणारा, शिक्षकांचा आवडता विद्यार्थी.. मुलींचा चॉकलेट हिरो.. मुली अगदी मंदारसाठी वेड्या व्हायच्या.. मंदारला साहित्याची आवड होती.. कविता लिहायचा. त्याच्या कविता म्हणजे त्याच्या मित्र मैत्रिणींचा आवडता विषय असायचा.. सगळ्यांना आश्चर्य वाटायचं इतकं छान लिहिणारा मुलगा इंजिनिअरिंगला कसा काय? कशी ही आवड जोपासतो. कोणास ठाऊक..?? पण मंदारला आवडायचं.. अभ्यास सांभाळून तो आपले छंद जोपासायचा.. आणि एक दिवस एक सोनपरी त्याच्या आयुष्यात आली.. आणि त्याचं आयुष्यच बनली.. कोण होती ती राजकन्या.. रुपसुंदरी..


जून महिना सुरू झाला. पावसाळा सुरू झाला होता. इंजिनिअरिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या मुलांचा पहिला दिवस होता.. मंदार आणि त्याचे मित्र कॉलेजच्या आवारात थांबले होते. इतक्यात दोन मुली त्याच्या दिशेने येताना दिसल्या. त्यापैकी एक मुलगी दिसायला खूप सुंदर होती गुलाबी रंगाचा चुडीदार ड्रेस घातलेली.. गोरा वर्ण.. नाक चाफेकळी. गालावर गोड खळी, पाणीदार काळेभोर बोलके डोळे, नाजूक गुलाबी ओठांच्या पाकळ्या.. हातात नाजूक सोन्याचं ब्रेसलेट, काळेभोर केस मोकळे सोडलेले. मध्येच तिला त्रास देणारी ती अवखळ बट मागे सारत, मधेच तिचं ते गोड मधाळ हसू.. हृदयाचा ठोका चुकवणारा तिचा तो कटाक्ष.. ओहो.. सुरेख..!!! मंदारच्या मुखातून कौतुकाने आपसूक शब्द बाहेर पडले. तो तिच्याकडे पाहतच राहिला.. त्याच्या लक्षात आलं.. ती काहीतरी शोधत होती.. 


मंदार तिच्या जवळ आला. मोठ्या अदबीने त्याने तिला विचारलं, "excuse me, I am Mandar, May I help you?" ती स्मित हास्य ओठांवर आणत आपल्या मधुर आवाजात म्हणाली,"वर्ग शोधतेय, पहिलं वर्ष.." त्याने विचारलं,"शाखा कोणती?" ती म्हणाली,"इलेक्ट्रिकल" त्याने समोर बोट दाखवत वर्ग दाखवला.. ती पण हसून म्हणाली,"धन्यवाद मंदार..!! मदत केल्याबद्दल.. मी आरुषी पोतदार, महाडवरून आलेय शिक्षणासाठी.." दोघांनी स्वतःची ओळख करून दिली आणि इतकं बोलून तिचा निरोप घेत मंदार तिथून निघून गेला.. खरंतर तो फक्त शरीराने तिथून निघाला होता पण मनाने तर तो तिथेच होता.. मन तर अजून तिथेच थिजून राहिलं होतं.. तिच्याभोवती घुटमळत राहिलं..


मंदारला आरुषी खूप आवडली होती.. पाहता क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता.. रम्य तो क्षण..!!, जणू तिथेच थांबलेला.. तिचं बोलणं, तिचं ते मधाळ हसू.. त्याला पुन्हा पुन्हा आठवत होतं.. काहीतरी विलक्षण गोड मंदारच्या आयुष्यात घडत होतं.. एक अनामिक हुरहुर मनाला.. पहिल्यांदा त्याला इतकं कोणीतरी आवडू लागलं होतं.. सारखं त्याचं मन तिच्याकडे धाव घेत होतं. रोज मंदारचे डोळे आरुषीचा शोध घेत असायचे.. ती दिसली की आनंद व्हायचा.. एक हलकीच गोड कळ हृदयात यायची.. कशात लक्ष लागायचं नाही.. सतत तिचाच विचार यायचा.. तिच्या असण्याचा भास व्हायचा.. तिच्याशिवाय त्याला कुठेच चैन पडायचं नाही.. मग मंदारला स्वतःलाच प्रश्न पडायचे,"हे प्रेम तर नाही ना? का इतका हळवा होतोय मी.. आरुषीसाठी? ती मला हवीय माझ्या आयुष्यात कायम.. येईल का? देईल का साथ जन्मभरासाठी..? तिच्याही मनात हेच असेल का? तिचंही माझ्यावर प्रेम असेल का? आणि प्रेम नसलं मग ती माझी मैत्रीही तोडून जाईल?" या अनेक प्रश्नांनी त्याचा जीव व्याकुळ झाला होता.


एव्हाना त्याच्या मित्रांच्याही हे लक्षात येऊ लागलं होतं. मंदारला आरुषी आवडते हे त्यांनी जाणलं होतं. ते मंदारला आरुषीवरून चिडवायचे.. अभिषेक मंदारच्या मित्रांपैकी सर्वात जिवलग मित्र.. अगदी शाळेत असल्यापासूनचे.. एकदम जिगरी दोस्त.. आणि आता आरुषी आणि तिच्या मैत्रिणींचाही चांगला मित्र झालेला.. त्यामुळे आरुषीशी तो मनमोकळेपणाने बोलू शकत होता.. मंदारच्या मनातलं आरुषीविषयीचं प्रेम त्याला ज्ञात होतं.. तिच्यासाठी व्याकुळ होणं तो जाणून होता. अभिषेकला मंदारची होणारी घालमेल, दिवसरात्र होणारी तडफड आता सहन होत नव्हती. तिच्या आठवणीत मंदार रात्र रात्र जागायचा.. तोच तर होता या गोष्टींचा एकमेव साक्षीदार.. मित्राच्या प्रेमाखातर अभिषेकने आरुषीशी या संदर्भात बोलायचं ठरवलं.. मंदारच्या मनाची अवस्था त्याने आरुषीला सांगायचं ठरवलं.. मंदारच्या प्रेमाची जाणीव आरुषीला करून द्यायचं ठरवलं.. मंदारच्या वतीने तो तिच्याकडे त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव मांडणार होता.. दोन जीवांना एकत्र आणू पहात होता..


दुसऱ्या दिवशी अभिषेक कॉलेज संपल्यानंतर आरुषीची वाट पहात थांबला. आरुषी आणि तिच्या मैत्रीणी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चालल्या होत्या.. इतक्यात अभिषेकने आरुषीला आवाज दिला,"हाय आरुषी, कशी आहेस? थोडं थांबशील? मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, एकटीशीच.."आरुषीने मैत्रिणींना मी येतेच तुम्ही व्हा पुढे असं म्हणत पुढे कँटीनमध्ये जायला सांगितलं. आणि अभिला म्हणाली,"काय झालं अभि? सगळं ठीक आहे ना? काय सांगायचं तुला?" 


तो थोडा थांबून दीर्घ श्वास घेत म्हणाला,"अरु!!..मी जे तुला सांगणार आहे ते तू प्लिज शांतपणे ऐकून घे.. चिडू नकोस किंवा चुकीचा अर्थ घेऊ नकोस.. मंदारविषयी मला तुझ्याशी बोलायचं थोडं.. मी इतक्या दिवसांपासून पाहतोय.. आणि मला जाणवतंय.. मंदार तुझ्यावर खूप प्रेम करतोय. त्याला तू आवडतेस.. दिवस रात्र फक्त तुझाच जप करत असतो.. तुला काय वाटतं त्याच्याविषयी.. तुझ्याही मनात तेच आहे का?" आरुषी शांतपणे त्याचं बोलणं ऐकून घेत होती.. 


आरुषीने अभिषेकचं सर्व बोलणं शांतपणे ऐकून घेतलं.. एक गोड स्मित हास्य करत ती त्याला म्हणाली,"अभि..!! तू तुझ्या मित्राबद्दल सांगितलंस, मी ऐकून घेतलं..पण तू त्याला बोलायला सांग.. त्याच्या तोंडून मला ऐकायचं आहे.. माझं उत्तर मी त्यालाच देईन.. उद्या संध्याकाळी त्याला समुद्र किनाऱ्याला लागून जे गणपती बाप्पाचं मंदिर आहे न तिथे यायला सांग.. मी उद्याच सांगेन काय ते.. चल मी आता निघते.." असं म्हणत तिने त्याचा निरोप घेतला..


खरंतर आरुषीसाठी हा सुखद धक्का होता कारण आरुषीलाही मंदार आवडू लागला होता.. त्याचं तिच्याकडे पाहणं, काळजी करणं तिला आवडत होतं. त्याचं अदबीने वागणं, बोलणं तिला आवडू लागलं होतं.. मुलींविषयी त्याच्या मनात असलेला आदर त्याच्या वागण्यात, बोलण्यात आरुषीला नेहमी जाणवायचा.. त्याच्या कविता ऐकताना, वाचताना ती भान हरपून जायची.. जणू कवितेतून तो तिला भेटायचा आणि तिला त्याची ओढ वाटू लागली. प्रेम वाटू लागलं.. पण मनातलं ओठांवर नव्हतं आलं.. पाहिलं पाऊल कोण टाकणार ?मुलगी असून मी कसं बोलू? हा प्रश्न तिला छळायचा.. अभिषेकच्या बोलण्याने खरंतर तिला खूप आनंद झाला होता.. मंदारलाही आपण आवडतो त्याचंही आपल्यावर प्रेम आहे हे ऐकून ती मनोमन खुष झाली. पण तिला मंदारला भेटायचं होतं.. त्याच्या तोंडून ते ऐकायचं होतं.. उद्याची भेटीची स्वप्नं ती मनोमन रंगवू लागली.. त्याच्या स्वप्नांत रंगून गेली.


घरी परत आल्यानंतर अभिषेकने मंदारला झालेला सगळा वृत्तांत सांगितला आणि आनंदाने म्हणाला,"मंदार तुला आरुषीने उद्या भेटायला बोलवलंय गणपतीबाप्पाच्या मंदिराजवळ, तू नक्की जा.." मंदारलाही खूप आनंद झाला. उद्या तिला भेटायचं या आनंदाने रात्री नीट त्याची झोप झाली नाही.. मिलनाची स्वप्नं पडत होती जणू...


दुसऱ्या दिवशी जसजशी संध्याकाळ जवळ येत होती तसतशी त्याची आतुरता वाढत चालली होती. त्याचबरोबर दडपणही आलं होतं.. मंदार तिला भेटायला जाण्यासाठी तयार होत होता.. काळ्या रंगाची जीन्स त्यावर क्रीम रंगाचा शर्ट घातला. हलकासा सुगंधी परफ्यूम मारला.. किती रुबाबदार दिसत होता. त्याने आरुषीसाठी एक छान भेटवस्तू घेतली.. गुलाबांच्या फुलांचा गुच्छ घेतला. ठरलेल्या वेळेआधीच तो तिथे पोहचला.. तिथेच कोपऱ्यातल्या एका बाकावर जाऊन बसला. एक अनामिक हुरहुर मनात दाटून आलेली.. एक ओढ होती भेटीची.. उसळणारा समुद्रही जणू तिच्या येण्याची वाट पहात होता.. सूर्य मावळतीच्या प्रवासाला निघालेला.. सोनेरी किरणांची आरास अथांग सागरावर पसरलेली.. आणि दुरून सोनपावलांनी ती सोनपरी येत होती.. आरुषी पांढऱ्या रंगांच्या घोळदार ड्रेसमध्ये खूप मोहक वाटत होती.. ती जसजशी त्याच्या जवळ येत होती त्याच्या हृदयाची धडधड वाढली.. इतक्या थंड वातावरणातही मंदारला घाम फुटला.. कसं बोलू? काय सांगावं? या विवंचनेत..


आरुषी त्याच्या जवळ आली.. मंदार उठून उभा राहिला. त्याच्या हातातला गुलाबाच्या फुलांचा गुच्छ स्वीकारत ती मिश्कीलपणे हसून म्हणाली,"बोल आता.. काय म्हणत होतास? आणि अभिला का पाठवलंस? तुला बोलायला काय झालं? तो काय वकील आहे का तुझा?" हाय!! पुन्हा तिचं ते घायाळ करणारं मधाळ हसू.. स्वतःला त्या गोड धक्यातून सावरत तो म्हणाला,"आरुषी.. तू मला खूप आवडतेस. अगदी पहिल्या दिवसापासून.. तुझं हसणं, बोलणं अगदी सगळं खूप आवडतं.. सतत तुझाच विचार डोक्यात असतो बघ.." थोडंसं थांबून पुढे म्हणाला," आरुषी हे आवडणं क्षणिक नाहीये ग.. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.. माझी जीवनसंगिनी होशील?? कायम साथ देशील??" गुडघ्यावर थोडंस खाली बसून हातातली भेटवस्तू तिच्या समोर धरत मंदार म्हणाला,"I Love you Aarushi, माझी होशील?" आरुषीच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य असे संमिश्र भाव उमटले.. डोळ्यांतून अलगद आनंदाश्रू ओघळले.. आणि तिने त्याच्या हातातली भेटवस्तू स्वीकारली.. आणि त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला.. आरुषी थोडी लाजत हळूच त्याच्या कानात कुजबुजली,"I Love you too Mandar.." 


मंदारला अतिशय आनंद झाला.. तिच्या होकाराने तो इतका खुश झाला की जोरात त्याने शीळ घातली.. त्याने तिचा हात अलगद आपल्या हातात घेतला.. म्हणाला,"अरु, या अस्ताला जाणाऱ्या भास्कराला साक्षी ठेवून मी तुला वचन देतो तू जो विश्वास माझ्यावर टाकलाय न त्याला कधीच धक्का लागणार नाही.. तुझा हात मी कधीच सोडून जाणार नाही.." त्याचा हात अजून घट्ट पकडत आरुषी अलगद त्याला बिलगली आणि म्हणाली,"मंदार.. मीही कायम सोबत राहील तुझ्या. कधीही सोडून जाणार नाही तुला मी वचन देते.." मंदारने तिला जवळ घेतलं आणि तिला घट्ट मिठीत घेत अलगद तिच्या भाळावर आपले हलकेच ओठ टेकवले.. तशी ती मोहरली.. लाजली.. त्याला येऊन अजूनच बिलगली.. पावसाची हलकीच रिमझिम सुरू झाली जणू त्या दोघांना प्रेमाच्या बरसातीत नाहून काढत होती.. नभात ऊन-पावसाचा प्रेमाचा खेळ सुरू झाला. श्रावणसरी बरसू लागल्या. नभातला रवीही त्यांच्याकडे पाहून हळूच हसत होता.. केशरी रंगाची उधळण करत होता.. उदंड हस्ते आशीर्वाद देत होता जणू.. मग ती दोघे गणपतीबाप्पाच्या मंदिरात गेली.. बाप्पाला नमस्कार केला. त्याचा आशीर्वाद घेतला.. एकमेकांना सोडून घरी जाण्याची इच्छा नव्हती पण निरोप तर घ्यावा लागणारच होता.. उद्या परत भेटण्याचं आश्वासन देऊन ती दोघे आपापल्या घरी गेली.. मनात खूप साऱ्या गोड आठवणी साठवून..


एक सूंदर वळण त्यांच्या दोघांच्याही आयुष्यात आलं होतं.. रोज नवीन आनंद जीवनात रंग भरत होता.. स्वप्नांना जणू पंख लागले होते.. मंदारसाठी तर तीच सुरुवात आणि तिच्यातच शेवट.. असं काहीसं झालं होतं. रोज फोनवर बोलणं व्हायला लागलं होतं.. मंदार आणि आरुषी एकमेकांच्या प्रेमात अगदी नखशिखांत चिंब भिजून गेले होते.. स्वप्नमयी जगात रंगून गेले होते.. दोघेच एकमेकांसाठी एकमेकांचे विश्व झाले होते.. आरुषीसाठी कितीतरी कविता त्याने रचल्या त्याचं समुद्र किनारी तिला बोलून दाखवल्या.. त्याच्या प्रेमात तीही रंगून गेली होती. आनंदी होती.. दिवस आनंदात सरत होते..भेटी होत होत्या. कधी कॉलेजमध्ये, कॉलेज कॅन्टीन, कधी लायब्ररीत, तर कधी समुद्र किनारी.. कधी बाईकवरून रपेट, तर कधी उगीच रानावनातून भटकंती.. किती स्वप्नं डोळ्यांत साठवलेली.. किती चर्चा झाल्या, कितीतरी विषय बोलले गेले होते.. भविष्यात काय करायचं, करियर काय निवडायचं..?? सगळं ठरवून झालं होतं..आधी करियर मग त्यानंतर बाकीचं.. या मतावर ते दोघेही ठाम होते.. त्याच दिशेने पाऊल टाकत होते.. 


त्या त्यांच्या स्वप्नांचा तो समुद्रकिनारा साक्षीदार होता.. तोच नेहमीचा बसण्याचा बाक त्या प्रेमात घेतलेल्या वचनांचा साक्षीदार होता. तोच भास्कर सोनेरी किरणांनी त्यांच्या स्वप्नांत रंग भरत होता.. आरुषी मंदारच्या कुशीत विसावताना जणू किनाऱ्याला लाट बिलगल्याचा भास होत असावा.. अलगद एखादी लाट त्यांच्या पावलांना स्पर्शून जायची.. त्या संथ निळ्या पाण्यात नकळत त्यांच्या पाऊलखुणा पाण्यात विरून जायच्या..

सगळं सुरळीत सुरू होतं.. 


आरुषी आणि मंदार दोघे खूप आनंदात होते.. आता कॉलेजमध्येही त्यांचं प्रेमप्रकरण सर्वांना माहित झालं होतं.. सगळीकडे कॉलेजभर त्यांच्या नावाची चर्चा सुरू असायची. पण त्यांना त्याची काही फिकीर नव्हती.. म्हणतात न.." प्यार किया तो डरना क्या??" अगदी तसंच काहीतरी झालं होतं दोघांचंही.. आयुष्याचा जोडीदार म्हणून एकमेकांना निवडलं होतं त्यांनी. मग का घाबरावं? 


वार्षिक परीक्षा सुरू झाल्या..मंदार आणि आरुषीने आपलं सगळं लक्ष परीक्षेवर केंद्रीत केलं.. परीक्षा उत्तम रीतीने पार पडल्या. दोघांनाही पेपर चांगले गेले होते.. अजून निकाल बाकी होता.. त्या आधी वार्षिक स्नेहसंमेलन होणार होतं. सगळी मुलं त्याच्या तयारीत होते.त्या वर्षीचं वार्षिक स्नेहसंमेलन लक्षात राहण्यासारखं होतं. मंदार आणि आरुषी उत्सवमूर्ती होते. दोघांनी मिळून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करत आपापल्या कलागुणांचं प्रदर्शन केलं.. मंदारने त्याच्या स्वरचित चारोळ्या बोलून दाखवल्या. त्याचं काव्यवाचन संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याच्या कविता सर्वांना खूप आवडल्या. आरुषीने 'वह कौन थी' सिनेमातलं हिंदी गाणं गाण्यास सुरुवात केली.. "लग जा गले के फिर ये हँसी रात हो ना हो.. शायद फिर इस जनम मुलाकात हो ना हो.." तिच्या गोड आवाजात गाणं इतकं सुरेख झालं.. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.. मंदारलाही गलबलून आलं.. आवाज इतका गोड लागला की गाणं संपलं तरी कोणाला भानच राहिलं नाही.. अगदी खुर्चीला खिळवुन ठेवणारा परफॉर्मन्स झाला.. क्षणभराच्या शांततेनंतर सर्वांनी जोरात टाळ्यांच्या गजरात तीचं कौतुक केलं.. कार्यक्रम संपला.. 


सगळेजण घरी परतण्यासाठी निघाले. कॉलेजच्या सभागृहात दोघेचं राहिले होते.. आरुषी खाली मान घालून शांत जमिनीकडे पहात बसली होती.. मंदार तिच्या जवळ आला आणि म्हणाला, "अरु काय झालं गं?? घरी जायचं न..?” ती एक नाही की दोन नाही.. शांतच.. त्याने तिच्याकडे पाहिलं तर काय!!! आरुषीचे डोळे पाण्याने डबडबले होते.. डोळ्यांत आसवं होती.. तो थोडा पुढे सरकला तिचा हात हातात घेऊन म्हणाला,"ऐ वेडाबाई काय झालं गं रडायला.?" 


या प्रश्नाने आरुषीला अजूनच भरून आले पाण्याच्या धारा डोळ्यातून वाहू लागल्या.. डोळ्यातलं आभाळ मोकळं होऊ लागलं. रडू आवरत म्हणाली,"मंदार.. आज कॉलेजचा शेवटचा दिवस.. पुन्हा दोन महिन्यांनंतर कॉलेज सुरू होईल..मी घरी गावाला चाललीय.. तुझ्याशिवाय एक क्षण पण मी दूर राहण्याचा विचार करू शकत नाहीये रे.. दोन महिने कशी राहू रे तुझ्याशिवाय? नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय.." ती पुन्हा हमसून हमसून रडू लागली.. मंदार तिला समजावणीच्या सुरात म्हणाला,"त्यात काय इतकं रडण्यासारखं? कायमस्वरूपी थोडं दूर चाललोय.. तू पण न.. वेडीच आहेस बघ.. अगं..!! दोन महिन्याचा तर प्रश्न.. असे निघून जातील..आणि समज तुला आठवण झाली तर तू मला फोन करत जा.. मी आहे तुझ्या सोबतच, असेन कायम, चला डोळे पुसा बरं!!" असं म्हणत मंदारने तिचे डोळे पुसले.. आणि तिच्या केसांवरून हात फिरवू लागला.


मंदारने तिला जवळ कुशीत घेतलं.. तशी ती अजून रडू लागली.. त्याच्या बाहुपाशात तिची मिठी घट्ट होऊ लागली.. तोही भारावून गेला. तो जरी तिला समजावत होता पण खरंतर त्याच्यासाठीही हा विरह परीक्षा पाहणाराच होता.. त्याच्या कवेत सामावत आरुषी थोड्या वेळापूर्वी म्हटलेल्या गाण्याच्या ओळी गुणगुणायला लागली,"पास आइयें के हम नही आयेंगे बार बार.. बाहें गले मे डाल के हम रो ले जार जार.. आँखोसे फिर ये प्यार की बरसात हो ना हो.." मंदारच्या डोळ्यांतही आसवं तरंगू लागली.. मंदारने तिचा चेहरा आपल्या दोन्ही ओंजळीत धरला.. हनुवटी अलगद उचलून वर करत तिच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या ओठांनी अलगद टिपून घेतलं.. नंतर तिच्या गुलाबी ओठांवर आपले ओठ टेकवत एक दीर्घ चुंबन घेतलं.. तिची काया थरथरली. सर्वांगावर रोमांच उभे राहिले.. श्वास श्वासात मिसळून जात होते.. हृदयात धडधड.. श्वासांची गती वाढत होती.. तो तिला कपाळावर, गालावर, ओठांवर पुन्हा पुन्हा चुंबन करत राहिला आणि तिची मिठी घट्ट होत होती.. दोघे एकमेकांच्या मिठीत बराच वेळ.. डोळ्यातलं आभाळ रीतं होत होतं..


अचानक कोणीतरी आल्याची चाहूल लागली आणि तिची रेशमी मिठी सैल झाली.. मंदारने तिला बाईकवरून तिच्या होस्टेलवर सोडलं.. तिला निरोप देऊन त्याच्या घरी आला.. मनात तरी त्याच आठवणी वारंवार फेर धरत होत्या.. आरुषीची मिठी, तिला केलेलं पाहिलं चुंबन.. अंगावर उभा राहिलेला रोमांच.. तिच्या ओठांचा हळूवार स्पर्श.. सगळं सगळं आठवत होतं.. सारी रात्र तिच्या आठवणीत जागून काढली.. 


दुसऱ्या दिवशी आरुषीने त्याला फोन केला आणि गावाला जायला निघतेय म्हणून सांगितलं.. मंदार तिला गावाला सोडण्यासाठी, गाडीत बसवून देण्यासाठी एसटी स्टॅन्डवर आला.. तिला गाडीला बसवून दिलं.. पुन्हा एकदा आसवांचं बरसणं सुरू केलं. अश्रूपूर्ण नयनांनी एकमेकांना निरोप दिला.. गाडी दूरवर जाईपर्यंत.. नजरेआड होईपर्यंत तो हात उंचावून हात हलवत तिला निरोप देत होता..डोळ्यात पाणी राहून राहून येत होतं..


गावी तिच्या घरी आल्यावर आरुषीने सुखरूप पोहचल्याचं मंदारला फोन करून कळवलं.. त्याची काळजी मिटली होती.. "स्वतःची काळजी घे,वेळेवर जेवण कर, रडत बसू नको.." असं सूचनावजा समजावून, बोलून त्याने फोन ठेवून दिला पण त्या दिवसानंतर काय झालं कोणास ठाऊक?? आरुषीने एकदाही मंदारला फोन केला नाही. त्यानंतर दोघांत काहीच बोलणं झालं नव्हतं.. मंदारने फोन केला तरी तिचा फोन बंद लागत होता.. गावाकडे नेटवर्कचा प्राॅब्लेम असेल असं म्हणत त्याने स्वतःचीच समजूत घातली आणि तीच्या परतण्याची वाट पाहू लागला. विरहाची घटिका संपत येणार होती. दोन महिन्यांनी कॉलेज पुन्हा सुरू झालं.. आज आरुषी त्याला भेटणार होती. तिला भेटण्यासाठी तो आतुर झाला होता.. कधी एकदा तिला भेटतोय असं झालं होतं..मंदार सकाळी लवकरच कॉलेजवर पोहचला..


कॉलेजच्या प्रांगणात तो मित्रांसोबत थांबला होता.. पण त्याची नजर मात्र आरुषीचा वेध घेत होती. आणि इतक्यात त्याला समोरून आरुषी येताना दिसली.. त्याला खूप आनंद झाला. त्याने पटकन मित्रांचा निरोप घेतला आणि तिच्या दिशेने येऊ लागला.. पण आरुषीने पाहून न पाहिल्यासारखं केलं.. आणि न बोलता निघून गेली.. मंदारला वाटलं होतं दोन महिन्याच्या विरहानंतर आरुषी भेटणार होती.. तीही मंदारला भेटण्यासाठी आतुर झाली असेल.. ती रडेल, फोन केला नाही म्हणून चिडेल, रागवेल, ओरडेल पण तसं काहीच झालं नाही.. सगळं सुरळीत सुरू असताना अचानक त्यांच्या प्रेमाला जणू काही दृष्ट लागावी तस होऊ लागलं.. आरुषीने अचानक बोलणं बंद केलं.. मंदारला वाटू लागलं की ती त्याला टाळतेय..


मंदार खूप अस्वस्थ झाला होता.. काय नेमकं झालं होतं कळायला काहीच मार्ग नव्हता.. आरुषी का असं वागतेय? समजत नव्हतं. तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता तरीही ती बोलत नव्हती टाळत होती. मंदारने आरुषीच्या जिवलग मैत्रिणींना विचारलं.. तिच्याशी बोलायला सांगितलं, अभिषेक दोघांचा मित्र होता त्यालाही सांगितलं..पण आरुषी काहीच बोलत नव्हती.. त्याने तिला अनेक पत्र लिहिली तरीही तिने काहीच उत्तर दिलं नाही.. मंदार खचून गेला.. जिच्यावर इतकं प्रेम केलं ती सोडून गेली..कारण न सांगता..त्याचं सर्वस्व हरवून गेलं होतं.. 


त्या दोघांच्या प्रेमाचे किस्से पूर्ण कॉलेजला माहीत होतं.. आणि त्याची थोडी कुणकुण त्यांच्या घरी सुद्धा लागली होती. त्यामुळे घरातलं वातावरण तणावाचं होतं. आरुषीच्या गावातली काही मुलं मंदारला मारण्यासाठी कॉलेजवर आली होती.. मंदारच्या मित्रांनी सगळं प्रकरण सांभाळून घेतलं. त्याच कॉलेजमध्ये आरुषीच्या गावातला एक मुलगा, सुहास तिथे शिकत होता. एक दिवस त्याने मंदारकडे येऊन आरुषीबद्दल काही गोष्टी सांगितल्या.. ते ऐकून मंदार मुळासकट उन्मळून पडला. तिने आपल्याला फसवलं या भावनेने, तिच्या विचारांनी वेडापिसा झाला होता.. मित्रांनी आधार दिला.. त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. पुढे कॉलेज संपलं.. जो तो आपापल्या मार्गाने निघून गेला. प्रपंच मागे लागला आणि त्यात मैत्री मागे पडली..


पुढे काही वर्षांनी मंदारची आई त्याच्या खूप मागे लागल्यानंतर त्यांच्याच जवळच्या नात्यातल्या एक मनमिळावू मंजुषा नावाच्या मुलीसोबत मंदार विवाहबद्ध झाला. त्यांच्या जीवनाच्या वंशवेलीला एक अर्णव नावाचं गोंडस फुल.. सगळं छान होतं.. पण मनात कुठेतरी आरुषी डोकवायची. तिची उणीव जाणवायची. खरंतर ती स्मरणातून गेलीच नव्हती.. मंदारच्या मनात आरुषीबद्दलचा आकस.. तिने असं का केलं, का सोडून गेली? या प्रश्नांचा ससेमिरा पाठलाग सोडत नव्हता.. मंदारला ते प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हते. 


एक दिवस दिवस त्याने तिचा शोध घ्यायचं ठरवलं. तो तिच्या गावी गेला. तिचं घर शोधून काढलं.. घरात तिची आई होती. मंदारने आपली ओळख करून दिली म्हणाला,"काकू, मी मंदार आरुषीचा कॉलेजचा मित्र, आलो होतो इकडे म्हटलं भेटून जावं आरुषीला. आहे का घरात आरुषी?" आरुषीच्या कॉलेजमधला मित्र हे ऐकून आरुषीच्या आईने मंदारला आत यायला सांगितलं.. चहापाणी केलं. तिच्याकडून मंदारला समजलं की आरुषीचं समीर नावाच्या मुलासोबत लग्न झालं. जवळच्याच गावात तिला दिलं होतं. तिला एक काव्या नावाची मुलगी होती.. मंदार म्हणाला,"तिचा फोन नंबर मिळेल का?" तशी तिची आहे थोडी शांत होत म्हणाली,"तुम्ही तुमचा नंबर द्या, तिचा फोन आला की मी नक्की सांगेन आरुषीला.." मंदारने आपला मोबाईल नंबर त्यांना दिला आणि त्यांचा निरोप घेतला.. डोळ्यांत आसवं.. मनात वेदना घेऊन.. तिची भेट झालीच नाही.. 


आणि एक दिवस एका अनोळखी नंबरवरून मंदारला फोन आला.. मंदार इकडून हॅलो, हॅलो करत होता.. तिकडून काहीच आवाज येत नव्हता.. निःशब्द शांतता.. फोन कट झाला. मंदारने तो नंबर पुन्हा डायल केला म्हणाला,"हॅलो कोण बोलतंय? कोणाचा नंबर आहे हा? मला कॉल आला होता या नंबरवरून." समोरून आवाज आला,"हॅलो" तो आवाज ऐकता क्षणी मंदारच्या डोळ्यातून जलधारा वाहू लागल्या.. शब्द फुटेना.. तिकडूनही मुसमुस ऐकू येऊ लागली.. त्याने भावनांचा निचरा होऊ दिला.. डोळ्यातलं पाणी आवरत मंदार म्हणाला,"आरुषी.. कशी आहेस??" ती म्हणाली,"मी ठीक, लगेच ओळखलंस.. अजूनही मी तुझ्या लक्षात आहे का रे?" तिच्या त्या प्रश्नांनी तो व्याकुळ झाला.. डोळे झरू लागले, तो म्हणाला,"विसरलो कधी होतो? आजही तशीच आठवतेस.. रोज प्राजक्त ओघळताना.. मोगरा फुलताना, समुद्राची गाज ऐकताना.. तू आठवतेस गं..!! मला तुला भेटायचंय.." ती म्हणाली,"नको रे..!! आता माझं लग्न झालंय." मंदार काकुळतीला येऊन म्हणाला,"एकदाच भेट..परत कधीच नको.. काही प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. त्याशिवाय मला चैन नाही पडणार. प्लिज एकदा ये.. तुला शपथ आहे माझी.."

त्याच्या बोलण्याने आरुषीला गहिवरून आलं.. आणि तिने मंदारला भेटण्याचं ठरवलं.. आणि त्यांची भेट ठरली. त्याच समुद्र किनारी.. गणपती मंदिराशेजारी.. 


आज तब्बल अठरा वर्षांनी मंदारला पुन्हा एकदा सगळं आठवत होतं. जुन्या जखमा उसवून गेल्या.. डोळ्यातलं तळ वाहू लागलं. इतकी वर्षे लोटली तरी जखम अजून तशीच ताजी होती.. जणू काही कालपरवाच घडलेली गोष्ट असावी.. अठरा वर्षांनंतर मंदिराचा परिसर खूपच बदलला होता. मंदिराचाही जीर्णोद्धार झाला होता.. भाविकांसाठी बऱ्याच सुखसोयी उपलब्ध करून दिल्या होत्या.. आता ते मंदीर, तो परिसर एक पर्यटन स्थळ झालं होतं.. पण कोण जाणे कसं काय !!! ते दोघे बसायचे तो बाक आजही तिथेच होता.. जणू त्यांच्या प्रेमाचं प्रतीक असल्यासारखा..


मंदार बाकावर येऊन बसला.. समुद्राच्या लाटा बेधुंद होऊन किनाऱ्याला स्पर्श करत होत्या.. मंदार फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटांकडे एकटक पाहत होता.. इतक्यात दूरवर त्याला आरुषी येताना दिसली.. त्याच्या आवडत्या गुलाबी रंगाची साडी तिने नेसली होती. तिचे मोकळे वाऱ्यावर भुरभुरणारे केस, गोरा रंग.. चाफेकळी नाक.. कानात डुलणारे नाजूक मोत्यांचे झुमके, गळ्यात मोत्यांची माळ, हातात हिरव्या बांगड्या.. मावळतीच्या सोनेरी रविकिरणांनी समुद्राची शोभा वाढवली होती. तीच आरुषी, तेच सौंदर्य, तोच समुद्रकिनारा, अन तोच मंदार.. सगळं तेच होतं फक्त आता परिस्थिती बदलली होती.. तिच्या गळ्यात दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र होतं, कोण्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावाच्या हिरव्या बांगड्या होत्या.. आणि ते त्याला सलत होतं.


आरुषी त्याच्याजवळ येऊन बसली.. आजही तितकीच सुंदर दिसत होती.. परिस्थितीमुळे थोडंसं चेहऱ्यावर प्रौढत्व जाणवत होतं पण सौन्दर्य आजही तसंच अबाधित.. दोघेही शांत.. मग मंदारनेच बोलायला सुरुवात केली.,"छानच दिसतेयस.. नवऱ्याने छान सांभाळलंय.. चांगला श्रीमंत आहे म्हणे.. कशाचीच कमतरता नसेल ना.. सुबत्ता दिसतेय चेहऱ्यावर.. यासाठीच सोडून गेली होतीस तर..!! मी काय गरीब देऊ शकलो असतो का तुला.. छान निर्णय घेतलास तू.. पण सांगून गेली असतीस तर बरं झालं असतं." डोळ्यातलं पाणी, तो आक्रोश खूप संयमाने आवरत होता. आरुषीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली,"आजही तसाच आहेस.. खोचक बोलणारा, चिडणारा, काही बदलला नाहीस बघ तू.. कधी जाणून घेतलंस का मी अशी वागले?" 


तो चिडून म्हणाला,"सांगितलंस कधी? सोडून गेलीस न सांगता.. एकट्याला टाकून गेलीस..किती फोन केले, किती मेसेज केले, मैत्रिणींना तुझ्या बोलायला सांगितलंस.. ऐकलंस कोणाचं? किती फिरलो तुझ्या मागे.. तू टाळलस मला.. हा समीर आला होता न तुझ्या जीवनात? त्याचा पैसा तुला दिसला, सुखसोयी दिसल्या, तो भेटल्याबरोबर मला विसरून गेलीस.. टाकून गेलीस मला.. मला सुहासने तेव्हाच सगळं सांगितलं होतं. पण मी विश्वास नाही ठेवला. तुला विचारणार होतो.. पण तू गेलीस न सांगता… माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी, मला जीवे मारायला गुंड मुलं पाठवलीस.. हेच प्रेम होतं तुझं माझ्यावर?" तो डोळ्यातल्या जलधारा आवरत बोलत राहिला..


तो पुढे म्हणाला,"कसा जगलो असेन तुझ्याशिवाय.. कधी विचार केलास? तुटून गेलो होतो.. माझ्या रक्ताची शाई करून तुला पत्र लिहिलं.. पाहिलंस तू? कदर केलीस का कधी त्या प्रेमाची? तुझ्या आठवणीत रात्र-रात्र जागून काढायचो.. झुरत राहायचो, रडत राहायचो.. काय चुकलं होतं माझं? जन्मभरासाठी साथ देण्याचं वचन दिलं होतंस.. हा किनारा, हा समुद्र., हा रवी, हे गणेशाचं मंदिर, आणि हा बघ.. आपण बसलोय तो बाक.. त्या सगळ्या आठवणींचे, त्या प्रत्येक क्षणांचे, त्या मोहरलेल्या भेटींचे साक्षीदार आहेत. विचार त्यांना तेच तुझ्या माझ्या प्रेमाची ग्वाही देतील. या बाप्पाच्या मंदिरात वचन दिलं होतंस मला असं पायदळी तुडवण्यासाठी? का केलंस असं आरुषी? का फसवलंस? सांग मला?. आज मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं हवी आहेत.. सांग.." 


आरुषीने शांतपणे त्याचं सगळं ऐकून घेतलं. डोळे पाण्याने तुडुंब भरले होते.. डोळ्यातलं पाणी पुसत ती म्हणाली,"मंदार मी तुला नाही फसवलं रे.. मी अगतिक झाले होते. मी गावी घरी आले.. समीरने मला पाहिलं. त्याला मी आवडले होते. त्याने घरी मागणी घातली.. आई पूर्णपणे कर्जात बुडाली होती. आमचं राहतं घर कर्जाची परतफेड न करू शकल्याने हातातून जाणार होतं. तेव्हा समीरने मदत केली. कर्ज फेडण्यासाठी आईला मोठी रक्कम दिली. आम्ही घर सोडवून घेतलं. आणि या उपकाराच्या ओझ्याखाली आम्ही दबून गेलो. आणि आईने त्याला माझ्याकडून होकार कळवला.”


दीर्घ श्वास घेत, हुंदका आवरत आरुषी पुढे सांगू लागली,"तुझ्या माझ्या प्रेमाबद्दल घरी समजलं होतं.. समीरशी लग्न करण्यासाठी आई दबाव टाकत होती.. कारण त्याच्या उपकारांची परतफेड मला करायची होती.. समीरलाही आपल्याबद्दल समजलं होतं. मी जर लग्नाला नकार दिला तर त्याने तुला जीवे मारण्याची धमकी दिली. मला खरंच माहीत नव्हतं त्याने तुला मारायला मुलं पाठवली होती ते. त्याने मला सांगितलं होतं कॉलेजला परत गेल्यानंतर जर त्याच्याशी बोललीस तर तो या जगातून जाईल. तो दिवस मंदारच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल एवढं लक्षात ठेव,, मी घाबरले आणि तुझ्या जीवासाठी.. तुला काही होऊ नये म्हणून तुझ्यासोबत कधीच बोलले नाही.. सुहासने तुला खोटं सांगितलं आणि मलाही. सुहासने एकीकडे माझ्याबद्दल तुला वाईट सांगितलं आणि दुसरीकडे तुझ्याबद्दल मला.. तू माझ्यासारख्या अनेक मुलींना फसवलं आहे तो तुलाही फसवेल.. त्याचं प्रेम वगैरे काही नाही निव्वळ तुझ्या सोबत वेळ घालवतोय असं बरंच काही.. मंदार..!! मी एक मुलगी होते रे इज्जत, आईची प्रतिष्ठा हेही महत्त्वाचं होतं माझ्यासाठी.. मी खरंच घाबरले रे!!”


आरुषी सांगू लागली,"मंदार.. मी या लग्नाला तयार नव्हते रे…!! माझ्या आईने मला घाबरवलं, तिने स्वतः जीव देण्याची मला धमकी दिली.. मी माझ्या आईच्या जिवासाठी, लहान बहिणीच्या शिक्षणासाठी, तिच्या करियरसाठी स्वतःच्या प्रेमाची आहुती दिली.. आणि समीरशी लग्न केलं. आजही त्याला वाटतं माझ्या मनात तूच आहेस. मी त्याच्यासोबत तडजोड म्हणून राहतेय. तुझ्यावरुन बोलतो खूप, टोमणे मारतो.. तुमचं नातं कुठवर होतं.. असे बरेच प्रश्न.. मी शांत राहते.. त्याला उत्तर देत नाही.." आरुषी धाय मोकलून रडू लागली.. 


मंदार हे सगळं ऐकून एकदम सुन्न झाला.. इतकं सगळं आरुषी सहन करत होती.. एकटी.. आपलं दुःख तिने कोणालाच नाही सांगितलं.. मी विनाकारण तिच्यावर संशय घेतला.. तिने मला फसवलं म्हणून गैरसमज करून घेतला.. किती चुकीचा होतो मी..!! इतकी वर्षे या रागाच्या, द्वेषाच्या, गैरसमजाच्या आगीत होरपळत राहिलो.. तिच्यापासून दूर होत गेलो आणि आरुषीच्या खऱ्या प्रेमाला मुकलो. मंदारने आपले दोन्ही हात जोडले.. तिच्या पायावर अश्रूंचा अभिषेक करत म्हणाला,"अरु.. माझं चुकलं गं.. नाही समजू शकलो तुझ्या प्रेमाला.. मला क्षमा करशील का ग..?? इतकं एकटी सोसत राहिलीस अगदी निमुटपणे.. तू जे माझ्यावर प्रेम केलंस त्यासाठी कशी उतराई होऊ? कसे पांग फेडू? अरु.. मी स्वतःला भाग्यवान समजतो की तुझ्या सारखी मुलगी माझ्या आयुष्यात होती..इतकं प्रेम करत होती.. अरु आपण मित्र म्हणून राहू शकतो का ग? इतकंच प्रेम राहील का गं कायम माझ्यावर? “


आरुषी थोडी गंभीर झाली. शांतपणे म्हणाली,"मंदार आज परिस्थिती खूप वेगळी आहे.. समीरला काय वाटतं मला माहीत नाही. पण आपला संसार ही आपली पहिली जबाबदारी आहे आणि आपल्या दोघांनाही आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडायला हवी.. आपापली कर्तव्ये पार पाडायला हवीत.. 

आता आपण दोघेही एका वेगळ्या वळणावर आहोत हे वळण जर नीट नाही सांभाळलं तर अपघात निश्चितच..!! मंदार..!! फक्त सोबत असणं म्हणजे प्रेम नसतं रे..!! दूर राहूनही आपल्या माणसांची काळजी करणं म्हणजे प्रेम…!! प्रेमात समर्पण म्हणजे प्रेम.. तुझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळाली असतील अशी आशा करते. मंदार.. या नंतरही जर मी तुला भेटत राहिले तर मी तुझ्यात गुंतेन रे!! हा मोहाचा क्षण टाळता यायला हवा.. ही आपली शेवटची भेट.. या नंतर आपण कधीही भेटणार नाही.. आपलं प्रेम कस्तुरीगंधासारखं एकमेकांच्या मनात दरवळत राहील.. वचन दे मला या नंतर आपण कधीच भेटणार नाही आजच्या नंतर आपापल्या मार्गाने मार्गास्थ होऊ.."


शेवटचा तिचा तळहात हातात घेऊन मंदारने तिला परत कधीही न भेटण्याचं वचन दिलं.. आणि एकमेकांना साश्रूपूर्ण नयनांनी निरोप देत आपला मार्ग निश्चित केला.. आणि शेवटचं त्या किनाऱ्याला, सागराला, मावळत्या भास्कराला वंदन करून आपापल्या प्रवासाला निघाले.. आपली अधुरी प्रेमकहाणी तिथेच सोडली.. त्याच वळणावर.. कायमची.. कर्तव्याच्या अग्निकुंडात झोकून देण्यासाठी.. दूर कुठेतरी "लग जा गले के फिर ये हँसी रात हो ना हो..शायद फिर इस जनम मुलाकात हो ना हो.." गाण्याचे स्वर कानांवर पडत होते.. मनात झिरपत होते..


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama