बंध
बंध
सुट्टीचा दिवस म्हणून ब्रंच करून मोहित दिवसभर लोळत पडून होता तर रियाची आठवड्याची कामं चालू होती, संध्याकाळ झाली म्हणून रिया मोहितला उठवायला गेली आणि अजूनही निद्रिस्थ असलेले आपले पतीदेव पाहून ओरडायलाच लागली.. किती रे झोपायचं ते!! चल उठ , काय सुरेख संधीप्रकाश पडलाय! दुपारी ढग आले होते पण पाऊस काही पडला नाही पण मस्त वारं सुटलंय बघ! सारखं त्या ए सी च्या हवेत पडून अंग जड होऊन जातं!
मोहित उठून बसला आणि खोलीतून बाहेर पडणाऱ्या रियाला म्हणाला रियाss चहा दे ना आणून प्लिज!
मुळीच नाही! बाहेर चल मस्त बाल्कनीत बसून दोघेही चहा घेऊया.
मोहित उठून तोंडावर पाणी मारून बाल्कनीत आला आणि रियाने बनवलेल्या फ्रेशली बेक्ड कूकीज आणि चहा घेत बाल्कनीतून दिसणारी बाग आणि दरवळणार्या सोनचाफ्याच्या सुगंधाने तरतरीत होऊन गेला.
बोला रिया देवी काय प्लॅन आहे? बाहेर जाऊया का? नवीन फूड जॉईंट झालंय , थाई क्युझीन मस्त आहे तिथलं असं रोहन सांगत होता.
त्यावर रिया म्हणाली नको रे आज !आपण मनू आली की तिला घेऊन जाऊया तिथे , तिला थाई फार आवडत ना!
या वीकएंड ला येणार म्हणाली होती पण काय झालं आणि अचानक फोन करून म्हणाली मी उद्या येत नाहीये बाबाला सांग उगाच वाट पाहू नको आणि फोनही करू नको.
हम्मम मनू म्हणजे लहरी कारभार सगळा , त्यात हट्टी!! अगदी आमच्या मातोश्रींवर गेलीय. आईला पण किती वेळा सांगतो इथे ये राहायला म्हणजे मनू पण आपल्या बरोबर राहील पण आई कुठली ऐकतीय !
मोहित किती वर्ष लोटली रे! पण आईंनी अजून मला स्वीकारलं नाही!
रियाsss बास नको तो विषय! दोघांनाही त्रास होतो अजून.
तेवढ्यात बेल वाजली म्हणून रिया दरवाजा उघडायला उठली.. दरवाजा उघडून बघते तर समोर मनू!!
"हेss रिया वॉट्स अप"
अरेsss मनूsss तू आज येणार नाही म्हंटली होतीस ना?
याss बट अचानक प्लॅन चेंज झाला , आलेsss
मी येऊन तुम्हाला डिस्टर्ब केलं का? असं अचानक येऊन? सॉरी सॉरी यु पीपल कॅरी ऑन, मी जाते हवं तर! मी येणारच नव्हते पण आजीचा हट्ट तिने हे नारळी पाकचे लाडू केले होते तिच्या लाडक्या लेकासाठी!! ते आजच दिले पाहिजेत गं त्याला हे असे ताजे ताजे फार आवडतात अँड ऑल!! म्हणून यावं लागलं हे घे मी जाते लगेच.
मनूsss आगं हो हो लगेच जाण्याच्या गोष्टी कशाला गं? बरं झालं आलीस ते! मनू च्या हातातलं सामान घेत रिया तिला म्हणाली . अरे वा!! लिंबाचं गोडं लोणचं!!
मनू : हो तुला आवडतं ना म्हणून आजीनी दिलंय
रिया : आई पण ना, सगळ्यांच्या आवडी महितीयत त्यांना!
माझ्या आवडीचं लोणचं पाठवतात नेहमी पण मला सून म्हणून स्वीकारत नाहीत अजून. आणि तू देखील…. मधेच थांबत रिया म्हणाली जाऊ दे बरं झालं तू आलीस.. आपण मस्त बाहेर जाऊ जेवयला तुमच्या पिताश्रीना आज थाई खायचा मूड आलाय.
मनू बाल्कनीत जात हाय बाबज!
मोहित : या या मनू ताई , हे काय केसांना निळा रंग आता??
आणि अजून किती टॅटूंची भर पडलीय ??
काय रे बाबज हा कलर ट्रेंडीय एकदम आजकाल! आँसम दिसतोय ना?
वाव रिया आमंड कूकीज!! सुपर्ब
आगं तू येणार म्हणून बनवल्या होत्या, मला माहितीय तुला आवडतात ते.
हो ग , हे असलं आजीला काही बनवता येत नाही , ते लाडू अँड घारगे असलं काहीतरी देते खायला.
घेऊन जा बरोबर जाताना.
मोहित : सो काय म्हणताय? ऑफिस कसं चाललंय?
मनू : ऑल वेल!! याsss एक गुड न्युज आहे!
मे बी नेक्स्ट मंथ मध्ये मला सियाटेल ला जावं लागेल , न्यू प्रोजेक्ट!! And that's my dream project!! After that I'll promoted as a DGM of a company!!
Hey… wish me luck!!
आमचे आशीर्वाद नेहमीच राहणार तुझ्या पाठीशी . तुला हे प्रमोशन नक्की मिळणार!! मोहित तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला, तर आनंदाने मनूला जवळ घेत रिया तिला म्हणाली wish you all the best beta!! You will be successful! You are a blessed child!
मनू तिच्यापासून बाजूला होत म्हणाली काय blessed? डोंबल!!
डोंबल!! असं का? इतकी एन्थु मुलगी आमची नेहमीच टॉपर असलेली!! खरंच बेटा you are a blessed child!!
मनूला पुन्हा जवळ घेत रिया तिला म्हणाली.
मनू :काय बोलू मला जे बोलायचं नसतं तेच नेहमी बोलावं लागतं ना रिया!
आई गेल्यापासून अगदी एकटी आहे मी . बारा वर्षाची होते फक्त मी !! ती गेली तेव्हा , ज्या वयात मला तिची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हाच तिला देवाने माझ्यापासून लांब नेलं!! आणि काय blessed?
आई गेली त्याचा बाबाला काहीच फरक पडला नाही, आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या ऑफिस कलीगशी लग्न करून सहज सावरला तो. त्याच्यासाठी बायकोची जागा रिया तू भरून काढली असशील पण माझ्या आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
त्यादिवशी आई आणि बाबा मध्ये खूप वाद झाले होते तसं बरेच दिवस काहीतरी चाललं होतं त्यांच्यात , मला खात्री आहे बाबाचं आणि तुझं अफेअर होतं आणि ते आईला समजलं असणार तो धक्का ती फार दिवस सहन करू शकली नाही. खूप स्ट्रेस होता तिला मी बघत होते. त्यामुळेच मायोकार्डीअल इन्फाक्ट ने ती गेली मी इतकी पण लहान नव्हते ना? तिच्या जाण्याचं कारण मला पक्क माहिती आहे.
मोहित : मनू तुझ्या मनाने रचलेल्या कहाण्या सांगू नकोस!! नाहीतर हे सगळं आईने भरवलं असणार तुझ्या डोक्यात. तसं अजिबात नाहीये!! कितीतरी वेळा तुला सांगून झालंय , अनुला आधीपासूनच cardiac प्रॉब्लेम होता , त्याची ट्रेटमेंटही चालू होती. दुसरी गोष्ट तुला आईची उणीव भासायला नको म्हणून रिया आणि मी लग्न केलं. तेव्हा आई पुण्यात आणि आपण बंगलोरला होतो. आई तिच्या हट्टी स्वभावानुसार बंगलोरला यायला तयार नव्हती आणि लगेच पुण्यात शिफ्ट होणं मला शक्य नव्हतं. केवळ तुझ्यासाठी मला हे लग्न करावं लागलं !
रियाचं आणि अनुचं किती छान जमायचं ? त्यांच्यामध्ये किती घट्ट बॉंडिंग होतं? तुला तर माहितीच आहे ना? आणि हीच रिया घरी आली की सगळ्यात जास्त तुला आनंद व्हायचा ना?
मनू : हो व्हायचा!! ती तुझी आणि आईची मैत्रीण होती तेव्हा. तुझ्यापेक्षा आई आणि ती जास्त क्लोज होत्या अगदी मान्य. पण नंतर एकेक गोष्टींचा उलगडा झाला मला. तुमच्या अफएअर बद्दल आईला डाउट नको यायला म्हणून ते सगळं नाटक होतं, रियाचं सारखं घरी येणं , माझ्याशी गोड गोड वागणं आणि आईशी फ्रेंडशिप!
मनूचं ते बोलणं ऐकून रिया रडवेली झाली होती अगदी. कित्ती वेळा या मुलीची समजूत काढली आहे. आमच्या लग्नच कारण फक्त तू आणि तूच आहेस पण तिला विश्वासच वाटत नाहीये.
मनू : एनी वे तुम्ही लग्न केलं मला काही त्याचा इशू नाही. तसंही बाबा आयुष्यभर एकटा कसा राहिला असता? पण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस!! आपलं नातं आधी जे होत तेच राहणार . तुमच्या रिलेशनशिप बद्दल मला काही बोलायचं नाही but you will never take my mother's place .
मनूचं ते बोलणं ऐकून मोहित आत निघून गेला तर रियाचा पुतळा झाला होता.
मनू : हेच सगळं कित्येकदा झालं आहे? पुन्हा पुन्हा तेच मी बोलायचं आणि बाबा आणि तू हर्ट होणार आणि मीच गिल्टी असल्याचा मला फील देणार तुम्ही!! नॉट एक्सेप्टेबल एनी मोअर या…
रिया माझं एवढंच म्हणणं आहे, तुझं आणि माझं रीलेशन आधीपासूनच जे होतं तेच राहावं! तू माझी आई म्हणवून घेऊ नकोस स्वतःला. रिया तू माझी फ्रेंडच रहा इतकंच.
तू आणि बाबा का नाही समजू शकत? आणि आईची आठवण आली की मी आऊट ऑफ माईंड होते आणि हे सगळं घडतं!! एम सॉरी बट ट्राय अंँन अंडरस्टँड!
आता या बाबज का कोण समजावणार?
मनुच बोलणं ऐकत असलेली रिया तिला म्हणाली आय एम ओके तुझ्या बोलण्याचं मला नाही वाटत काही, अनुवर असलेलं तुझं प्रेम मी समजू शकते!
चल आत आणि बोल तुझ्या बाबाशी, आणि चल जाऊया आपण बाहेर त्या थाय फूड जॉईंटला.
मनू आत गेली आणि मोहितची समजूत काढू लागली अगदी त्याच्या गळ्यात पडून त्याला म्हणाली बाबज मी आईला खूप मिस करते रे!! रियावर आणि तुझ्यावर माझा राग नाही. पण रिया आणि माझं नातं बदलणं मला मान्य नाही कधीच. रियाने आईसारखं मला जवळ घेत बेटा, बाळा म्हंटल की माझं डोकं फिरत रे!!
मोहित मी ही गोष्ट एक्सेप्ट केलीय मला तिच्या वागण्याचं काहीच वाटत नाही, मी तिला समजू शकते! तू का दरवेळी इतकं मनाला लावून घेतोस? चल मनू थांबतीय आपण जाऊया बाहेर . रियाच्या बोलण्याने मोहित थोडा नॉर्मल झाला आणि बाहेर यायला तयारही झाला. आणि ते वादळी वातावरण शांत झालं.
बाबज ही ट्रीट माझ्याकडून हां , तिच्या बागमधून वाइन बॉटल काढत मनू म्हणाली माझी प्रीप्रमोशन पार्टी!!
मनूच्या हातातल्या wine बॉटल्स बघून रिया म्हणाली ,आपण प्लॅन थोडा चेंज करायचा का? घरीच पार्टी करूया का? मी ऑनलाइन ऑर्डर करते.
बाहेर नेक्स्ट वीकएंड ला जाऊया?
ओ sके I don't have any problem ! Let's celebrate here only.
रियाss इटालियन ऑर्डर करूया का? नाहीतर दुसरं तुम्ही सांगा!
ओके मी आजीला फोन करते आणि तिला सांगते इथे घरीच आहे, यायला उशीर होईल म्हणून.
मनू तू इथेच थांब की रात्री, उद्या सकाळी इथूनच जा ऑफिसला .
नो वे मी नाही थ
ांबू शकत ! रिया तू पुन्हा त्या विषयाकडे वळतीयस!!
ओके ओके तुला हवं ते कर .
रात्री उशिरापर्यंत तिघं वेगळ्या विषयांवर गप्पा मारत मनूने आणलेली वाइन आणि जेवण एन्जॉय करत होते.
ओके गाईज मी निघते, आजी वाट पहात असेल, मी गेल्याशिवाय झोपणार पण नाही ती.
हो निघ तू , आमच्या हट्टी मातोश्री पुन्हा जागरणाने आजारी नको पडायला!!
हट्टी नाही रे बाबज ती खूप attached आहे माझ्याबरोबर इतकंच!
ओके बाइ , सी यु इन द नेक्स्ट वीक
मनू गाडी सावकाश चालव गं, आणि घरी पोहचल्यावर मेसेज कर . पाठमोऱ्या मनूला रिया म्हणाली.
मनू गेली आणि मोहित आणि रिया पुन्हा बराच वेळ बाल्कनीत गप्पा मारत होते.
मोहित रियाला म्हणाला "रिया आता वेळ आली आहे, मनूला खरं काय आहे ते सांगण्याची, की तूच तिची बायलॉजिकल आई आहेस. आज अनु असती तर हे सत्य तिच्यापर्यंत आपण कधीच पोहोचू दिलं नसतं पण आपलं लग्न झालं आहे आता तर का लपवायचं तिच्यापासून?
मोहित ती अनुच्या बाबतीत किती हळवी आहे माहितीय ना? तिच्यासाठी हा धक्का असेल आणि ती नाही सहन करू शकणार हे!
मी तिच्याशी बोलू शकते , तिला रोज म्हंटल तरी पाहू शकते आणि काही वेळ का होईना तिचा सहवास मला लाभतो यातच मी खूप खुश आहे. आणि तिच्या मनातलं आई म्हणून अनुचं रूप तसंच असावं.
ती आता मोठी झालीय , तिची तिची काही मत आहेत ती आपण स्वीकारणच योग्य वाटतं रे मला. हो मी तिला आईच्या मायेने कधी गोंजारू शकत नाही, कधी कुशीत घेऊ शकले नाही याचं दुःख वाटतं कधीतरी पण जे आहे त्यात मी खूश आहे रे! आपली मुलगी एका मोठ्या कंपनीची डी जी एम होतीय!! हा आनंद किती मोठा आहे मोहित!!
रिया तुझ्या ममतेवर तू लगाम ठेवून जगतेस! खरंच तू ग्रेट आहेस.
लगाम नाही रे, जे आहे ते माझ्या मनाला, माझ्यातल्या आईला मान्य आहे रे!!
बरं चलाss रिया देवी खूप उशीर झालाय, उद्या ऑफिस आहे!
मोहित मला काय वाटतं मनू दोन तीन महिने आता तिकडे राहणार तर तिला बऱ्याच गोष्टी बरोबर द्याव्या लागणार म्हणून उद्या मी तिला घेऊन शॉपिंगला जाऊ का ऑफिसनंतर?
आधी विचारून घे तिला आणि मग ठरव.
ओके चला खूपच उशीर झाला रे!!
दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला पोहोचल्यावर रियाने मनूला फोन केला, हॅलो मनू आगं तू काल फोन नाही केलास पोहोचल्याचा? आणि मी ही विसरले रात्री बराच उशीर झाल्याने! बरं ऐक संध्याकाळी माझ्याबरोबर येशील का शॉपिंग ला?
मनू: रियाsss आगं आज बहुतेक नाही जमणार मला, इथेच उशीर होईल ऑफिस मध्ये आणि पुढचे दोन दिवस पण अवघडच वाटतंय आपण नंतर जाऊया का कधी?
रिया : तुझा आवाज का असा लो वाटतोय, झोप झाली नाही का? Are you ok बेटा?
मनूने काही न बोलता फोन कट करून टाकला. रियाला तिच्या आशा वागण्याची एव्हाना सवय झाली होती त्यामुळे त्याचं काहीच वाटलं नाही.
पुढचे दोन दिवस नेहमीच्या बिझी रुटीन मध्ये गेले. संध्याकाळी घरी आल्या आल्या फोनची रिंग वाजली म्हणून रियाने घाईने फोन उचलला तर पलीकडून मोहितची आई बोलत होती, "मोहित घरी आला नाही का गं अजून? जरा बोलायचं होत त्याच्याशी!
आई आज उशीर होईल मोहितला, मी काही निरोप देऊ का? नाहीतर त्याच्या मोबाईल वर कराल का?
"आगं बाई कितीवेळा फोन लावला पण एकतर एंगेज नाहीतर तो कधी उचलतच नाहीये", म्हंटल घरी पोहोचला असेल म्हणून घरी लावला.
बरं मी काय म्हणते त्याला आल्यावर मला घाईने फोन करायला सांग, उद्या अनुच्या श्राद्धाचा दिवस ना? दरवर्षी आपण अन्नदान करतो ना , देवळात आणि आश्रमात त्याची आठवण आहे ना त्याला? तेच विचारायचं होतं आणि मी मालतीला हाताशी घेऊन लाडू करून ठेवलेत तिथे वाटण्यासाठी ते तेवढे घरी येऊन घेऊन जा म्हणावं. दोन दिवस मनू पण नाहीये ना घरी नाहीतर तिच्या हाती पाठवले असते.
आई मी सांगते मोहितला फोन करायला. आई मनू घरी नाहीये म्हणजे?
आगं ती ऑफिसच्या कामासाठी गेलीय दोन दिवसांपासून! आज यायला हवी खरंतर !उद्याचा दिवस नाही विसरायची हो ती! बरं ठेवते बाई . मोहितला तेवढी लाडवाची आठवण कर सकाळी जाताना घेऊन जा म्हणावं.
बरं आई सांगते मी.
फोन बंद झाल्यावर रिया विचारात पडली की मनू अस काही बोलली नाही की बाहेरगावी जाणार आहे, ती लांब राहत असली, कितीही लहरी असली तरी तिच्या बाबाला प्रत्येक गोष्ट सांगितल्याशिवाय राहत नाही. जायच्या आधी नाही पण पोहोचल्यावर?? रिया कॉफी घेत बराच वेळ विचारात हरवलेली होती. बेल वाजली म्हणून विचारातून बाहेर आली आणि दरवाजा उघडताच समोर मोहित आणि मनू एकत्र दिसले. तिला थोडं आश्चर्यच वाटलं! मनू या वेळेला आणि अशी मधेच?
मोहित अरे मनू आणि तू आज एकत्र? आई तर म्हणत होत्या मनू कुठे बाहेर गेलीय ऑफिसच्या कामाने?
रियाsss असं म्हणत मनूने रियाला घट्ट मिठी मारली आणि कितीतरी वेळ ती तिला बिलगूनच राहिली.
रियाला खूप आश्चर्य वाटतं होतं तीच्या अशा बिलगण्याचं. तिने खुणेनेच मोहितला विचारलं काय झालं आहे?
मोहितने मला काहीच माहिती नाही असं तिला खुणेनेच सांगितलं.
रियाला बिलगलेली मनू बाजूला होत म्हणाली, आज मी राहतेय बरं का? आणि आजी पण येतीय मालती मावशी बरोबर! उद्या आपल्याला आश्रमात जायचंय ना? इथूनच जाऊ सगळे.
मोहित आणि रियाच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव वाचत मनू म्हणाली गाइज आज वाटलं मला यावं राहायला! आणि आजीलाही तयार केलं!
रिया मी खूप विचार केला आपल्या या नात्यावर आणि मला आज रिअलाइज झालं मी कशीही वागले तरी तू मला कधी स्टेप मदर सारखं वागवलं नाहीस. माझ्याशी प्रेमानेच वागत राहिलीस बाबजपेक्षाही जरा जास्तच! मनुचे असे पाणावलेले डोळे आणि रियाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून मोहित म्हणाला
मनूsss तू ठीक आहेस ना आज? काय झालंय ? आज इथे राहायला तयार झालीस?
अरे वाटलं मला!! तुला नाही आवडलं का ? नसेल तरीही मी राहणार बरं!
त्यावर मोहित म्हणाला तू इथे राहतीयस ते आवडलं मला पण ते निळे केस मात्र अजिबात आवडले नाहीत बरका. ते ऐकून बाबाला मिठी मारत मनू म्हणाली काय रे असं ? किती कॉम्प्लिमेंटस मिळाल्या मला आणि तू ?
तेवढ्यात मोहितची आई आणि मालती पोहचल्या.
अहो आश्चर्यम!! प्रत्यक्ष मातोश्री आमच्या घरी!!
आज असे धक्क्यावर धक्के?
अरे बाबा या मुलीच्या हट्टापुढे कोणी काही करू शकतं का? माझ्याबरोबर राहण्याचा निर्णयही तिने असाच हट्टाने घेतला होता आणि आता अचानक इथे कायमचं राहणार म्हणे.
रिया मात्र शांत झाली होती अगदी .
रियाकडे पहात मनू म्हणाली आता सांगते , रियाss आपण पार्टी केली त्या दिवशी ,खूप उशीर झाला म्हणून मी घाईने निघाले आणि माझ्या कीज इथेच विसरले , खाली जाऊन परत वर आले तर दरवाजा तर उघडाच राहिला होता आणि तुम्ही दोघ बाल्कनीत बोलत होतात, ते सगळं मी ऐकलं!
बाबज तू रियाला म्हणत होतास तूच तिची बायलॉजिकल मदर आहेस तिला सांगायला हवं! ते ऐकून मला तो धक्काच होता पण मी तुम्हाला कळू न देता कीज घेऊन परत फिरले. आणि खरं काय ते जाणून घेण्यासाठी मी त्याच्या दोन दिवसांनंतर बँगलोरला गेले होते. आणि तिथे जाऊन मी भावेश अंकलला भेटले आणि त्याला मी तुमचं जे बोलणं ऐकलं होतं ते सांगितलं आणि खरं काय आहे ते सांगायला सांगितलं , कारण मला माहिती होतं भावेश अंकलला नक्की माहिती असणार सगळं! कारण मी बघत आलेय तुमची किती क्लोज फ्रेंडशिप होती ते. मला माहितीय भावेश अंकल आणि रिया सोडून इतर कोणाशी इतके संबंधही नव्हते तुझे आणि आईचे.
अंकलने मला सांगितलंय सगळं आणि मी त्या गोष्टीची खात्रीही करून घेतली सर्वोदय हॉस्पिटल मध्ये जाऊन.
रिया तुझ्या आईच्या ब्रेन सर्जरीसाठी तुला पैशांची गरज होती आणि आई आणि बाबजला एका सरोगेट मदरची! कारण बरेच वर्ष तुम्हाला मूल नव्हतं, शिवाय आईला cardiac प्रॉब्लेम होता त्यामुळे तिची प्रेग्नन्सी, डिलिव्हरी खूप क्रिटिकल आणि कॉम्प्लिकेटेड झाली असती म्हणूनच डॉ राव नी तुम्हाला हा पर्याय सुचवला आणि डॉ च्या मदतीने, ओळखीने तुम्ही रियाला निवडलं!
रियाला पैसे मिळाले, सर्जरी होऊन पण तिची आई जास्त दिवस राहिली नाही. त्यानंतर रिया एकटी पडली होती अगदी त्याकाळात. आई आणि तू तिला धीर देत होतात आणि तिने जन्म दिलेल्या बाळाचा सहवासही तिला मिळू देत होतात. आता मला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. आय एम सॉरी बाबज मी वाट्टेल ते म्हणत होते तुझ्या आणि रियाच्या रिलेशनबद्दल.
अंकल ने मला हे देखील सांगितलं की रिया आणि तू लग्न करावं ही आईचीच इच्छा होती. तिच्या लेकीला आईच प्रेम मिळावं म्हणून आईने ती हॉस्पिटल मध्ये असताना तुम्हा दोघांजवळ तिची इच्छा बोलून दाखवली आणि ती गेल्यावर तुम्ही ती पूर्ण केलीत.
रिया तुझ्यापुढे तुझं आयुष्य पडलं होतं खरंतरं! वयाने इतक्या मोठ्या माणसाशी तू लग्न केलंस ते केवळ माझ्यासाठी!!
तुला सॉरी म्हणायला पण लाज वाटते आहे.
डबडबलेल्या डोळ्यांनी मनू सगळं बोलत होती. रियाचा बांध कधीच फुटला होता , आईss म्हणत मनूने तिला घट्ट मिठी मारली.
अनुच्या फोटोकडे बघत मोहितच्या डोळ्यांतून देखील अश्रू वाहू लागले.
आईने तिघांनाही जवळ घेत शांत केलं आणि रियाला सून म्हणून मनापासून स्वीकारलं.
समाप्त