खिडकी एक प्रेमकथा
खिडकी एक प्रेमकथा


शहरातल्या बाजारपेठे जवळच चिनू चे घर होते. अगदी रहदारीच्या रस्त्यावर. घराच्या खिडकीतून रस्त्यावरची रहदारी, बाजारपेठेतील दुकाने, फेरीवाले ऑफीसला जाणार् या मंडळींची धांदल अगदी सगळं अनुभवत, सगळ्यांच्या चेहर् यावरचे भाव टिपत चिनू लहान पणापासून खिडकीत बसलेली असायची. फक्त झोपेल तेवढाच काळ काय ती त्या खिडकी पासून दूर असायची.
रोज भाजीची गाडी घेऊन येणार् या राम बाबू बरोबर खिडकीतून गप्पा मारायची. काय राम बाबू आज काय काय भाजी आणलीय ? इतकी महाग का बरं? आज उशिर कसा झाला? दुध वाला भैया दुधाचे कॅन सायकललाच ठेवत वरच्या मजल्यावरच्या खिडकीत बसलेल्या चिनू ला म्हणायचा बिटिया जरा ध्यान दो बाजू मे दुध डालके आता हू. तसेच पेपर वाल्याचे देखिल. भाजीवाला राम बाबू , दुधवाला किसन चाचा, पेपर वाला बजरंग भैया सगळे तीच्याशी गप्पा मारून पुढे जायचे. वरच्या मजल्यावर खिडकीत बसून ही पण त्यांच्याशी गप्पा मारायची. कधी त्यांची मस्करी करायची.
चिनु मोठी होत होती पण खिडकी काही सुटत नव्हती. त्याच रस्त्याने वर्षा नु वर्षे ये जा करणारे इतरही लोक तीला ओळखू लागले होते. कधी तीच्याकडे बघून स्मित हास्य देखिल करत. चिनु रहात असलेल्या समोरच्याच इमारतीत एक नविन कुटुंब रहायला आलं होतं. त्या कुटुंबात साधारण चिनुच्याच वयाचा किंवा थोडा मोठा मुलगा पण होता. चिनुच्या खिडकीतून चालत असलेल्या रोजच्या गप्पा तो देखिल ऐकू लागला. आणि नकळत रोज चिनु चे निरिक्षण करू लागला. मोठे टपोरे डोळे, गोरापान रंग , कुरळे केस आणि तीची ती बडबड तो तीच्यात हरवून जाऊ लागला. तो सकाळी ऑफिसला जाताना चिनु खिडकीतच असायची आणि आल्यावर देखिल ती खिडकीत असायची. घरी आल्यावर तो त्याच्या खिडकीतून तीला निरखत असायचा. त्याला ती आवडू लागली होती. याची चिनुला कल्पना नव्हती पण एक दिवस असाच तो समोरच्या खिडकीतून तीला न्याहाळत असताना चिनु ची नजर त्याच्यावर गेली. सावळ्या रंगाचा, चेहर् यावर खुरटी दाढी उगवलेला, तरतरीत नाक असा तो स्मार्ट दिसणारा . दोघांची नजरा नजर झाली. त्याच्या अशा रोखून बघण्याने नुकत्याच तारूण्यात पदार्पण केलेल्या चिनुला लाजल्या सारखे झाले. आणि तीला हळुहळु कळले हा रोजच असे न्याहाळतोय आपल्याला. चिनुला ते नकळत आवडायला लागले होते.
काही काळाने दोघं एकमेकांकडे बघून स्मितहास्य करू लागलै. मग दोघांच्या या खिडकीतून त्या खिडकीत खुणांनी गप्पा होऊ लागल्या . चिनु ने त्याला नाव विचारले खुणेने नाव सांगता येईना त्याला मग त्याने एक युक्ती लढवली . रबरी चेंडुला एक काप दिला त्
यामधे एक चिठ्ठी अडकवली . चिठ्ठीत नाव लिहून पाठवले सुमित . मग इकडूनही चेंडूतून चिठ्ठी गेली मी चिनु . चेंडूमधिल चिठ्ठ्यांच्या फेकाफेकीत गप्पा रंगू लागल्या. एकमेकांच्या आवडी निवडी दोघांना कळाल्या अगदी सारख्याच होत्या. दोघांचे विचारही सारखेच होते. कधी तो खिडकीत आला नाही तर चिनु कासाविस होऊ लागली होती.
अलिकडे रामबाबू , किसन चाचा , बजरंग भैया पेक्षा तीची नजर सुमितला शोधत असायची. सुमितची ही अवस्था वेगळी नव्हती. तीला बघितल्या शिवाय दिवस सुरू व्हायचा नाही त्याचा.
एक दिवस सुमितने तीला चिठ्ठी लिहिली मला तुला बाहेर भेटायचय किती दिवस असं लांबून बोलणार आपण? पलिकडून चिठ्ठी आली मी नाही भेटू शकत. सुमित ने विचारले का मला उत्तर हवय . मी खुप गुंतलोय तुझ्यात . तुला भेटून मला तुला काही सांगायचय.
चिठ्ठी चिनूने वाचली तीच्या डोळ्यात पाणी तरळले.
तीने काहीच उत्तर पाठवले नाही. त्या दिवसापासून चिनुची खिडकी बंदच झाली. बरेच दिवस गेले. सुमित खुप अस्वस्थ झाला होता. तीला आवडलं नाही का? पण मी खुप प्रेम करायला लागलोय तीच्यावर नाही राहू शकणार आता तीच्या शिवाय. काय कमीय माझ्यात ? विचारतोच तीला.
बेचैन झालेला सुमित घरातून निघतो. समोरच्या इमारतीत शिरतो. तीच्या मजल्यावर पोहोचतो तीच्या घराची बेल वाजवतो. दार तीची आई उघडते तो सांगतो मी चिनुला भेटायला आलोय.
आई चिनुला हाक मारते. आतल्या खोलीतून चिनू येते व्हिल चेअर वर बसलेली. आणि त्याला उलगडा झाला ती खिडकी बंद होण्याचा .
ती त्याला विचारते का आलायस?
मी तुझ्या प्रेमाला पात्र नाही निघुन जा इथुन .मला माफ कर इथेच थांबूया आपण. कळलं तुला म्हणून हि खिडकी मी बंद केलीय कायमची. आता नाही उघडणार ती पुन्हा.
त्यावर तो उत्तरतो पण माझ्या ह्रदयाची खिडकी कायमची उघडलीय तुझ्यासाठी. फक्त तुझ्याच साठी
तीला अश्रु अनावर होतात. तो तीच्या चेअर जवळ गुडघे टेकून बसतो तीचे हात हातात घेऊन म्हणतो. माझं प्रेम इतकं कमकुवत नाही .अजुनही माझं प्रेम तेवढंच आहे.तुझ्या शरीराशी निगडीत तर मुळीच नाही. तु जशी आहेस तशी मला आवडतेस. चला पहिल्यांदा ती खिडकी उघड.