चक्रव्यूह
चक्रव्यूह


काय? एकदम निवांत बसलीयस? आज काही स्वयंपाकाची घाई नाही वाटतं? आज तुमचं पाककौशल्य ढेपाळलं की काय? दोन महिने झाले इथे येऊन रोज नवनवीन पदार्थ होतायत लाडक्या चिरंजीवांसाठी! उकडीचे मोदक काय! सांज्याच्या पोळ्या, मटार करंज्या, भाजणीची थालीपीठं, दडपे पोहे, कसल्या कसल्या खिरी, शिरे, सांजे, हलवे सगळं झालं आता काय करावं हा विचार चाललाय वाटतं! संध्याकाळचा वॉक घेऊन आलेला श्रीधर सोफ्यावर बसून कसल्याशा विचारात हरवलेल्या आणि चेहऱ्यावर गहन प्रश्न निर्माण झालेल्या अवस्थेत असलेल्या आपल्या बायकोला विचारात होता. पण इतक्या प्रश्नांच्या सरबत्ती नंतरही राधिका मात्र तिच्या विचारातून बाहेर आलीच नाही.
राधा अगं कसला विचार करतीयस इतका? आज मी करू का मुगाची खिचडी आणि चिंचेचं सार? आज आपण साधाच बेत करू काहीतरी. चल लागतो तयारीला अनिश येईल बघ इतक्यात. भूकावलेला असतो शिवाय आपण इथे आल्यापासून आज काय स्पेशल असेल या उत्सुकतेत येतो घरी!!
राधा, काय झालं? सांगशील का काहीतरी? श्रीधरने राधिकाला हलवून विचारलं तेव्हा राधिका विचारातून बाहेर पडून बोलती झाली. श्रीधर अरे नसती आफत आलीय बघ मागे आपल्या! दोन-चार महिने लेकाला सोबत म्हणून, त्याला आईच्या हातचं खायला मिळावं म्हणून आपण इथे अमेरिकेत आलो खरे, आता या लॉकडाउनमुळे मुक्काम वाढला पण अनिशला तेवढीच सोबत म्हणून वाढलेल्या मुक्कामाचा आनंदच वाटला खरं तर. लेकाच्या आनंदासाठी इथल्या हवामानाशी जुळवून घेताना फार त्रासही होत नाहीये तसा आपल्याला पण आता हे नसतं काहीतरी मागे आलं बघ!
काय ते सांगशील का? ही प्रस्तावना पुरे आता मुख्य मुद्दा बाहेर काढा!!
अरे काय सांगू!! आत्ता थोड्या वेळापूर्वी म्हणजे तू बाहेर पडला ना फिरायला तेव्हा मेधाताईंचा फोन होता पुण्याहून! म्हणत होत्या खरं तर कोणत्या तोंडाने तुमच्याशी बोलावं पण वेळच तशी आहे हो, एक विनंती आहे तुम्हाला! या लॉकडाउन मुळे शिवाय डॉक्टरांनी यांना मनाई केल्याने आम्ही पुण्यातून बाहेर पडू शकत नाही आहोत, मानसीची डिलिव्हरी जवळ आलीय, तिची प्रकृती तशी नाजूक! रोहनरावांचं वर्क फ्रॉम होम असलं तरी ऑफिसच्या कामाच्या जबाबदाऱ्या खूप आहेत. बारा तास त्या लॅपटॉपला चिकटून राहावं लागतं त्यांना. त्यांच्याकडे फक्त त्याचे वडीलच आणि तेही इथे आमच्यासारखे भारतात अडकून पडले ना! आणि आमचं दुसरं कोणीच नाही हो तिकडे मदतीसाठी हाक मारायला! खरं तर चुकीचं आहे पण माझी ही विनंती तुम्ही स्वीकारलीत तर फार उपकार होतील हो! पहिलटकरीण ना! पोर ही हळवी झालीय हो एकटेपणाने! मला कळतंय माझं हे असं विचारणं साफ चुकीचं आहे पण आशा या वेळेत तुम्हीच पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर आलात. नंदा कडून कळलं होतं तुम्ही दोघेही तिकडेच आहात ते , तिनेच नंबर दिला हो तुमचा! तुम्ही तिचं बाळंतपण करायला जाल का हो?
अरे हे सगळं असं इमोशनल बोलून घेतलं आणि आता मला प्रश्न विचारून असं चक्राव्यूहात अडकवलं बघ!! नाही म्हटल तर आपली माणुसकी उघडी पडते, या परक्या देशात आपण शत्रुलाही मदत करू असे आपले संस्कार! आणि जायचं म्हंटल तर अनिश ला काय वाटेल? त्यापेक्षा शर्वरी….? तिची काय प्रतिक्रिया असेल ?
किती तोरा होता या मेधा बाईंचा! लेकीची बाजू घेऊन कशा तावातावाने बोलायच्या !!आता अगदी केविलवाण्या होऊन विनंती करत होत्या! आणि ही बया मानसी ,स्वतः दुसरा संसार थाटून बसलीय तरी आपला पिच्छा का सोडेना अजून?
नुकतच आनीश आणि शर्वरीचं जमून येतंय तर हे लाचंड!
तेव्हढ्यात बेल वाजली म्हणून श्रीधर राधिकाला म्हणाला हे बघ आनीश आला वाटतं , लगेच त्याच्यासमोर हा विषय नको!
थोड्यावेळाने मी बोलतो त्याच्याशी.
दार उघडताच अनीश बरोबर शर्वरीही आलेली दिसली श्रीधरला.
अरे वाह वाह अरे फोन करून सांगायचस की दोघेही येताय ते. काहीतरी खास बेत केला असता!
बाबा आहो मीच तिला आयत्यावेळी बोलावून घेतलंय. जरा महत्वाचं बोलायचं होतं म्हणून.
आणि तुम्हा दोघांशीही बोलायचं आहे. मी पटकन फ्रेश होतो मग बोलू.
अनीश फ्रेश होऊन येताच श्रीधरने विषय काढला तू काय बोलणार आहेस ते बोलच पण आम्हा दोघांनाही एका महत्त्वाच्या विषयावर तुम्हा दोघांशी बोलायचं आहे. म्हणजे आम्ही मोठ्या पेचात सापडलो आहोत.
आज मेधाताईंचा फोन आला होता मुंबईहून.
बाबा हो माहितीय मला आणि त्याच विषयावर बोलायचं आहे आम्हाला.
मला मानसीचा फोन आला होता आणि तिने सांगितलं सगळं.
तीही चिडलीच थोडी तिच्या आईवर!
पण आई... मला आणि शर्वरीलाही असं वाटतंय की तू जावंस तिच्या मदतीला. खरं तर जे काही डिफ्रन्सेस होते ते मानसी आणि माझ्यात होते. तुम्हा दोघांविषयी तिचं मत नेहमीच चांगलं होतं.
आई महिनाभराचा प्रश्न आहे. तू या अडचणीत मदत करावीस तिला.
ठीक आहे तिचं आणि माझं आधीच नातं काय होतं हे विसरून, मी जाईन तिच्या मदतीला पण मी काही एकटी नाही जाणार , श्रीधरही माझ्याबरोबर येणार आहे हे तू मानसीला कळव .
ठिके मी करतो तिला फोन आणि कळवतो.
अनीशने लगेचच मानसीला फोन लावला आणि कळवलं
"हॅलो मानसी ,मी आत्ताच घरी पोहोचलो आणि बोललो , तुझ्या आईचा फोन झालाच होता इथे!
आई आणि बाबा दोघेही तुझ्याकडे येतायत सो रिलॅक्स!!
पलीकडून मानसी म्हणाली अरे खरंच खूप रिलॅक्स झाले रे हे ऐकून . या एकटेपणाचं खूप दडपण आलं होतं मला आणि रोहनला. आई लगेच तयार झाल्या यायला… मला तसं खूप गिल्टी वाटतंय की त्यांच्या चांगुलपणाचा मी फायदा घेतीय की काय?
मानसी आगं यात आपला भूतकाळ, चांगुलपणा, फायदा या गोष्टी थोड्या बाजूला ठेऊन विचार करू या. ही वेळ, तुमची अडचण महत्वाची ना?
थांब आईशी बोल..म्हणत अनीशने राधिकाकडे फोन दिला.
अरे मी काय बोलू? कशाला? असं पुटपुटत, थोडं वैतागत राधिकाने फोन घेतला.
हॅलो मानसी कशी आहेस गं? काळजी घे हो!! आता मी आणि श्रीधर कधी यायचं ते कळवा म्हणजे तयारीला लागतो.
आणि कसलाही संकोच बाळगू नको हो आणि तुझ्या आईची उणीव भासणार नाही असं सगळं करू बघ आम्ही!!
आई हो मला खात्रीय तुमच्याबद्दल म्हणूनच आशा वेळेस मदतीसाठी कसलाही विचार न करता तुम्हाला हाक मारावीशी वाटली.
आई रोहन तुम्हाला परवा घ्यायला येईल, तुम्ही तयारी करून ठेवा.
बरं बरं मी करते तयारी आणि ठेऊ का फोन आता?
हो आई, आई...खूप टेन्शन आलं होतं!! आता रिलिव्हड झाल्यासारखं वाटतंय!! खूप thanks ..म्हणणाऱ्या मानसीला तोडत राधिका म्हणाली.
मानसी आगं हक्काने बोलावसं म्हणतेस पण आणि अशी ही परक्याशी बोलतात तशी औपचारिक भाषा माझ्याशी ?
बरं बरं ठेव फोन आणि काळजी घे स्वतःची , मी आल्यावर ठेवीनच तुझी बडदास्त!!आणि तिने फोन ठेवला
राधिकाचं ते नाटकी फोनवरच बोलणं ऐकणार्या श्रीधरला हसू फुटत होतं.
त्याला पाहून राधिका म्हणाली चला श्रीधरपंत करा तयारी तुमच्या एक्स सुनेच्या बाळंतपणाला जायची! हसू कसलं येतंय? मी अडकले ना चक्राव्यहात त्याच??
राधा आता जायचं आहेच तर हे चक्रव्यूह वगैरे मनातलं काढून टाक बरं! आणि आधीचं नातं ही थोडे दिवस विसरलो आणि ती आपल्या अनी ची मैत्रीण आहे असं समजलो तर??
हो ते आहेच पण मागच्या गोष्टी इतक्या सहज मनातून जात नाहीत रे.
आई मी नाही का विसरलो सगळं आणि ती आयुष्यात पुढे गेलीय तसं मीही आता पुढचं पाऊल उचलतोय तर आता त्याच गोष्टी पुन्हा का आठवायच्या? शर्वरीने ही गोष्ट सहजतेने घेतलीय ही बाब किती महत्वाची आहे?
हो रे बाबा किती समजूतदार पोर आहे ही!!
अहो आई समजूतदार वगैरे काही नाही इथे परक्या देशात अशी अडचणीला मदत करणं ही माणुसकी आहे आणि त्यासाठी मी कशाला आडकाठी करू? इतकं सहज आहे हे!!
तो विषय आणखी वाढू नये म्हणून श्रीधर म्हणाला बरं आता जायचं ठरलंय , मानसीशी बोलणं झालं , तयारीला लागा आणि आज काही पोटापाण्याचं बघायचं आहे की नाही? का फक्त चर्चासत्रच?
हो हो चला लगेच लागते तयारीला अनी आज तुझे बाबा मुगाची खिचडी आणि चिंचेचं सार करणार आहेत!! मी मस्त पापड तळते, शरू तू जेवण करून च जा हो नाहीतर आज रहा इथेच उद्या इथूनच ऑफिसला जा.
****
दोन दिवसांनी राधिका आणि श्रीधरला रोहन घ्यायला आला. आता या एक्स सुनेच्या नव्या नवऱ्याशी काय बोलायचं आणि कसं वागायचं याच थोडं टेन्शनच आलं होतं राधिकाला! काय पाहिलं इतकं या रोहन मध्ये मानसीने? माझा अनी कितीतरी पटीने उजवाच म्हणता येईल हो याच्यापुढे!! राधिकाच्या मनात आशा स्वतःशीच चाललेल्या संवादांची चक्री फिरत होती.
पण रोहन अगदी आपले पणाने म्हणाला आई बाबा फक्त तुमचे कपडे घ्या बरोबर बाकी सगळं काही लागेल ते मी बघतो. कसलाच संकोच करू नका मला तुमचा दुसरा मुलगा समजून हक्काने काही लागलं तर सांगा. द्या तुमच्या बॅगा , गाडीत ठेवतो.
रोहन च्या आशा बोलण्याने त्यांच्यातील परकेपणा थोडा कमी झाला.
घर तसं जवळच होतं त्यामुळं लगेच ते घरी पोहोचलेही.
गाडीचा आवाज ऐकून मानसी बाहेर आली , इतक्या दिवसांनी आणि अशा अवस्थेतील मानसीला बघून राधिकाला थोडं गलबलून आलं!!
आई बाबा म्हणत ती दोघांच्या जवळ आली.
आगं आगं तू कशाला बाहेर आलीस? आणि हळू जरा!! राधिका तिला म्हणाली.
दोघं घरात पोहोचताच रोहननं त्यांना त्यांची खोली दाखवली आणि त्यांचं समान आत आणून ठेवलं.आई बाबा फ्रेश व्हा मी चहा ठेवतो म्हणत तो किचन कडे वळला. गप्पा मारत चहा झाला रोहनच्या आपुलकीच्या बोलण्याने शिवाय आपण पहिल्यांदाच भेटतोय असं न भासू देण्याने वातावरण हलकं झालं आणि राधिका आणि श्रीधरचा अवघडलेपणा थोडा कमी झाला.
पुढच्या दोन तीन दिवसात राधिका आणि श्रीधर त्या घरात रुळले. दोघांच्या आवडी निवडी जाणून काय लागेल ते रोहन ऑर्डर करून मागवत होता.
अनीशचा फोन रोज येतच होता. रोजच्या दिवसाचा वृत्तांत त्याला आई बाबांकडून समजतच होता.
राधिकाही मानसीला पौष्टिक खाऊ पिऊ घालत होती. तिला जागेवर सगळं आणून देत होती.
एक दिवस मानसीला त्रास व्हायला लागला आणि लगेचच अँब्युलन्स बोलवून तिला मॅटरनीटी हॉस्पिटला हलवण्यात आलं.घाबरलेल्या मानसीला धीर देत राधिका तिच्यासोबतच होती. अगदी लेबररम मध्ये ही रोहन न जाता राधिका तिच्या सोबत होती. दोन तीन तासात सुटका झाली आणि छान गोंडस बाळाला मानसीने जन्म दिला.
तिसऱ्या दिवशी मानसीला घरी सोडण्यात आलं आणि बाळाच्या स्वागतासाठी श्रीधरने घर अगदी सुरेख सजवून ठेवलं होतं. दोघेही आपलंच नातवंड असल्याप्रमाणे उत्साहात सगळं करत होते. आता दिवस अपुरा पडायला लागला होता त्याचं करता करता.दोन तीन दिवसातच किती लळा लावलाय या निष्पाप जिवाने आपल्याला!! तसं बघितलं तर याच आणि आपलं नातं ते काय? असा विचार करत बसलेल्या राधिकाला पाहून श्रीधर म्हणाला मला कळतंय तू काय विचार करतीयस ते आगं काहीतरी मागच्या जन्मीचे लागे बांधे असणार! त्याशिवाय हे असं घडण शक्य नव्हतं. त्याचे सख्खे आजी आजोबा असताना आपल्याकडूनच हे सुरवातीचं कोड कौतुक करून घ्यायचं होतं या गुलामाला!!
पंधरा दिवस कसे भुर्रकन उडून गेले , अनीशचा फोन आला आई आता सगळं मार्गी लागलं असेल तर तुम्ही इथे यायचं बघा.
त्यावर आई म्हणाली अरे अजून तशी ही ओली बाळंतीणच रे निदान सव्वा महिना तरी होऊ द्यावा मग आम्ही येतो तिकडे.
पोरीला व्यवस्थितपणे खाऊ पिऊ घालते , तिची आई असती तर असं सगळं केलंच असत ना? म्हणत राधिकाने आणखी थोडे दिवस मुक्काम लांबवण्याचं सांगून टाकलं.
साधारणपणे अडीच महिने झाले मानसी एकटेपणाने बाळाचं सगळं करू शकेल असा विश्वास वाटल्यावर राधिकाने आता रोहन आणि मानसी जवळ निघण्याचा विषय काढला. रोहन त्यांना म्हणाला हो मलाही आता ऑफिस कडून लिव्ह मिळतेय , प्रोजेक्ट संपत आलंय!
आई बाबा तुम्ही खूप केलंत आमच्यासाठी! कधीही विसरू शकणार नाही आम्ही. तुमची इच्छा म्हणून पण तुम्ही अजून काही दिवस इथे राहिलात तरी आवडेल आम्हाला. शिवाय पिल्लुलाही तुमची सवय झालीय!
खरं य रे पण अनी तिकडे एकटा!! त्याचा रोज फोन येतोय आणि आता त्या दोघांच्या लग्नाचं ही लवकर बघायला हवं ना?
बरं आई बाबा तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही म्हणाल तेव्हा मी येतो सोडायला तुम्हाला. अरे नको उद्या अनी येतोय घ्यायला!!
बरं मग त्याला जेवायलाच येऊ दे दुपारी इथे आणि संध्याकाळी तुम्ही निघा.
ठरल्याप्रमाणे अनीश आणि शर्वरी आई बाबांना घ्यायला आला. येताना बाळासाठी खेळणी कपडे घेऊनआले होते. दुपारचं जेवण होऊन गप्पा झाल्या संध्याकाळी निघायची वेळ झाली तेव्हा बाळाला सोडून जाताना पावलं अगदी जड झाली होती दोघांची!
रोहन ने देखील आठवणीने आई बाबांसाठी गिफ्ट्स आणली होती . आजी आजोबांसाठी पिल्लुकडून असं त्यावर लिहिलं होतं. ते वाचून राधिकाला असं पिल्लुला सोडून जाताना गहीवरूनच आलं. पण तिने लगेचच सावरलं स्वतःला.
व्यवस्थित राहा , एकमेकांची काळजी घ्या. काही अडचण असेल तर फोन करत रहा , पिल्लुला रोज घुटी द्यायला विसरू नकोस , दृष्ट काढत जा अश्या सूचना देऊन राधिका आणि श्रीधर गाडीत बसले.
गाडीत बसल्यावर राधिका विचार करत होती इथे येताना आपण चक्राव्यूहात अडकलोय आशा संभ्रमात होते मी पण आज या चक्राव्यूहातून सहजतेने सुटका झाली की माझी!! शिवाय माणुसकीला जागलो आपण या समाधानाचं पांघरूण लपेटून निघालो आहोत.
खरंच नियतीचे डाव अजब असतात मानसीच्या बाळाला या आजी आजोबांचं प्रेम मिळणं हे आधिच ठरलेलं असावं.
विचारात हरवलेल्या राधिकाला बघून श्रीधर म्हणाला कुठलाही विचार करू नकोस आणि पुन्हा कुठल्या मोहपाशात अडकायचा प्रयत्नही करू नकोस. कुठलेसे मागच्या जन्मीचे ऋण आपल्याकडून फेडले गेले आणि आपण माणुसकी जपली इतकंच खरं आहे.