रंग ओठांवर सजले...
रंग ओठांवर सजले...
" नाही...! नाही... !! मी जेवणार नाही, मला औषधी घ्यायची नाही... मला माझ्या मुलीशी बोलायचं आहे, तुम्ही आधी तिला कॉल करा. तिला सांगा मला तिच्याशी बोलायचं आहे म्हणून. प्लीज फक्त दोन मिनिट मला बोलू द्या हो माझ्या मुलीशी.. महिना झालाय तिच्याशी बोलून....!" एका आजींचा खूप गोंधळ सुरू होता.
" अहो आजी! तुम्ही आधी खाऊन घ्या नंतर करूया आपण तुमच्या मुलीला कॉल... तुम्ही औषध घेतल नाही तर ती सुद्धा रागावेल आम्हाला...! दोन दिवसांपासून तुम्ही नीट जेवल्या नाही.. अशाने तुमची प्रकृती बिघडेल.. चला आधी खाऊन घ्या आणि औषध घ्या.. नंतर करूया आपण तुमच्या मुलीला कॉल.. ओके.. !!
दोन मुली त्या आजींना समजावत होत्या.
जवळपास दोन वर्षांपूर्वीची ही गोष्ट. मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला तिच्या हॉस्टेलला गेले होते. ती एका 'ओल्ड एज होम' ला रेसिडेन्सी वर्कर होती. मी तिथेच रिसेप्शनला खाली बाकावर बसून तिची वाट बघत होते. तर हा सारा गोंधळ माझ्या कानावर आला. थोड पुढे जाऊन मी पाहिलं तर एक आजी त्यांच्या मुलीशी बोलायच म्हणून हट्टाला पेटल्या होत्या आणि दोघी मुली ज्या तिथल्या सेविका असाव्या त्या त्यांची खूप समजूत घालत होत्या. ते सगळ बघून आधी मला हसायलाच आलं. पण नंतर परिस्थिती कळल्यावर मात्र खूप वाईट वाटत होतं. त्या ओल्ड एज होमला राहणारे सगळे आजी आजोबा खूप श्रीमंत घराण्यातील होते. त्यांचे मुल मुली परदेशात नोकरी करायचे, घरी यांच्याकडे लक्ष ठेवणारे कुणीही नसल्या कारणाने ती लोक इथे राहायची. अर्थात इथेही त्यांच्या राहण्याची, खाण्या पिण्याची उत्तम व्यवस्था होती. त्यांना काय हवं नको त्याकडे विशेष लक्ष दिलं जायचं. या आजी गेल्या तीन वर्षांपासून येथे राहायला होत्या. त्यांना एकच मुलगी होती. ती अमेरिकेला एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर कार्यरत होती. अर्थात त्यांचा जावई देखील तिथेच होता. आता मुलीकडे कस राहायला जाणार म्हणून त्या आजी इथेच राहायच्या. त्यांची मुलगी आणि जावई देखील खूप छान होते. दर आठवड्याला त्या आजींना कॉल करायचे, त्यांची प्रेमाने विचारपूस करायचे आणि शिवाय इथला स्टाफ पण खूप प्रेमळ आणि काळजी घेणारा असल्याने इथल्या आजी आजोबांना कधी एकट जाणवत नव्हतं. पण ते म्हणतात ना! "आपल्या माणसांची आठवण आणि कमी कोणीही भरून काढू शकत नाहीत. "तसचं काहीस त्या आजींच्या बाबतीत झाल होत. इतक्यात अनु माझी मैत्रीण तिथे आली. मी तिला काय झालंय विचारल? तर तिने सांगितल की,
"या आजींच त्यांच्या मुलीशी गेल्या महिन्याभरात बोलणं झालेलं नाही. त्यामुळे त्या हट्ट करत आहे की मला माझ्या मुलीशी बोलायचं आहे म्हणून."
मी म्हणाले, "अग ! तर लावून द्या ना फोन त्यांना, बोलू द्या ना तिच्याशी."
"अग..! पण कस ...? आम्ही सगळेच ट्राय करतोय.., पण ती फोन घेतच नाही आहे आणि त्यात या आजींना शुगर आणि बी पी चा त्रास, जेवण नीट केलं नाही तर तब्येत बिघडेल ना त्यांची. "
अनु मला त्यांच्याविषयी सांगत होती. इतक्यात त्यांच्या ओल्ड एज होमला ऑफिस वर्क सांभाळणारी एक तरुणी तेथे आली. दिसायला खूप गोड होती, वीस एकवीस वर्षांची असावी, ओठांवर सदा प्राजक्त उमललेला, कुणालाही एका क्षणात आपलंसं करण्याची तिची तऱ्हा, तिच्या व्यक्तिमत्वातून झळकत होती. तिने एका क्षणात सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतला आणि तिथे असणाऱ्या मुलींना काहीसा इशारा करत ती त्याच बिल्डिंगच्या आठव्या माळ्याला गेली. तिथून तिने रिसेप्शनवर लॅन्डलाइनवर कॉल केला.. आणि त्या आजींशी त्यांची मुलगी होऊन बोलू लागली. त्या आजींचा चेहरा मुलीचा कॉल आल्याने इतका खुलला होता की त्यांच्या पुढे कुठलेही रंग फिके पडले असते. त्या तिच्याशी बोलण्यात स्वतःला विसरून गेल्या होत्या.. त्यांना काय हवं नको ते सगळ त्या तिला सांगत होत्या. तिनेही ते सगळ एका कागदावर उतरवून घेतल.. आणि म्हणाली,
"आई, मी जरा कामात व्यस्त होते ग, त्यामुळे मला नाही ग जमल तुला कॉल करण आणि तुला तर माहित आहेच ना आपल्या वेळा देखील खूप वेगवेगळ्या असतात. त्यामुळे मी फ्री झाली की त्या वेळेला तू झोपून असणार म्हणून या विचाराने मी कॉल केला नाही."
"हो ग बाळा, मी समजू शकते. पण मला तुझी फार आठवण आली ग.. राहवत नव्हतं तुझा आवाज ऐकल्या शिवाय.. तू ये ना मला भेटायला."
तिनेही त्यांना होकार दिला आणि फोन कट करून खाली आली. तिचा स्वभाव मनमिळावू असल्याने तिथले आजी आजोबा तिच्याशी तासनतास गप्पा मारत असायचे. तिला बघताच त्या आजी तिच्याकडे धावत गेल्या.. आणि सांगू लागल्या..,
"सुनिता,.. माझ्या मुलीचा फोन आला होता.., ती मला भेटायला येणार आहे..! "
त्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं हास्य जणू काही रंगांची उधळण वाटत होती. त्यामुळे तिथलं वातावरण पूर्णच बदलून गेलं होतं.. त्यांच्या चेहऱ्यावर ते हसू फुलवणारी सुनिता.. अगदी काहीच न केल्यासारख त्यांचं सगळ ऐकुन घेत होती. त्यांच्या हसण्यात ती ही शामील झाली होती. या जगात कुठेही सापडणार नाहीत अशा आनंदाच्या रंगांची उधळण तिने त्या आजींच्या आयुष्यात केली होती. आणि तिला बघून सहज दोन ओळी माझ्याही ओठांवर उमटल्या.
"सुगंधी फुलांपारी मन मोहणारी
नित्य उमलण्यास प्रोत्साहन देणारी
तापलेल्या दुःखास शांत करणारी
अशी ही सुनीता हवी हवीशी वाटाणारी... 😊"