अपूर्ण प्रवास
अपूर्ण प्रवास
बाहेर बरसणारा श्रावण आज पुन्हा तीची आठवण करून गेला. तस तर ती रोजच माझ्या आठवणीत असते. असा एकही क्षण नाही की जेव्हा तिची आठवण आलीच नाही. कितीही कामात स्वतः ला व्यस्त केल तरीही ती कायम आजूबाजूलाच असते. तिच्या पासून मी कधी वेगळा नव्हतोच.
आमच्या दोघाच्याही आवडी निवडी अगदी सारख्याच. स्वभाव मात्र वेगळे अगदी एकमेकींच्या विरुद्ध. पण तरीही आम्ही एकमेकींनाशिवाय राहू शकत नव्हतो. तिला पावसात भिजायला खूप आवडायच आणि मला तिला भिजताना बघायला.
मी श्रावणात सुरु असलेला ऊन पावसाचा लपंडाव एन्जॉय करायचो तर ती एखाद्या फुलपाखरासारखी इकडून तिकडे उडत सगळा पाऊस तिच्या पंखांवर झेलत आपल्याच धुंदीत बागडत असायची. मी कधीतरी आडोश्याला उभा राहून तळहातांवर श्रावणसरी झेलायचो तर ती प्रत्येक सर पिऊन तृप्त व्हायची. दारावर फुललेल्या जाईसारखी ती कायम दरवळत असायची.
"राघव, चल ना रे... मला बाईक शिकव ना!"
" अगं वेडे, पाऊस बघ ना किती सुरु आहे. पाऊस नसला की नक्की शिकवेन तुला. "
"शी
.. बाबा.. तुझं असंच असतं!! जरा म्हणून रोमँटिक नाहीस तू!!!🤨
"अगं.., इथे कुठे आलाय रोमान्स??"
"नाही तर काय? मस्त पाऊस येतोय..! पावसात भिजत भिजत गाडी चालवण्यात काय मज्जा येईल ना. मी पुढे, तू माझ्या मागे बसलेला.. त्यात या श्रावणसरी... अधे मध्ये ढगातून डोकावणारा सूर्य... वाह!! काय रोमँटिक वाटेल ना!! चल ना रे.. प्लीज!!!"
तुम्हीच सांगा, आता तिला नाही कसा म्हणू?? म्हणून गेलो तिला घेऊन. खूप खूष होती ती. पहिल्यांदा तिने बाईक चालवली होती ते ही तिच्या आवडत्या पावसात. तिच ते निखळ हसू मी प्रत्येक क्षणाला मनात साठवून घेत होतो. आणि अचानक "कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र!!!!" मोठयाने आवाज झाला. मला जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलला होतो. आणि माझी वैदू....!!!! मी शेवटलं बघितलं सुद्धा नाही तिला.
श्रावण असो वा नसो माझे डोळे मात्र कधीही भरून येतात आणि तिच्या आठवणीत बरसून जातात. मी त्या दिवशी वैदूचा हट्ट ऐकलाच नसता तर बर झालं असतं ना...?? आयुष्याचा हा प्रवास अपूर्ण राहिला नसता.