Nilesh Bamne

Drama Inspirational

3.6  

Nilesh Bamne

Drama Inspirational

एक सिगारेट ओढताना

एक सिगारेट ओढताना

5 mins
895


दोन दशकांपूर्वी एके दिवशी सहदेवच्या लग्नाची पत्रिका द्यायच्या निमित्ताने मी सहदेवसोबत कविताच्या घरी गेलो. त्यावेळी कविता घरी नसल्यामुळे तिच्या आईने आम्हाला थोडा वेळ वाट पाहायला सांगितली. जवळपास दुसरं कोणी नसल्यामुळे आम्ही कविताच्या लहान बहिणीशी गप्पा मारायला सुरुवात केली. कविताची बहिणंही कवितासारखीच हुशार आणि गप्पीष्ठ होती. तिच्यासोबत गप्पा मारण्यात वेळ बरा जात होता. इतक्यात कविताची आई लिंबाचं सरबत घेऊन आली. आम्ही तिघे सरबत पितच होतो इतक्यात कविताने घरात प्रवेश केला. आम्हाला अचानक घरी आल्याच पाहून कविताला किंचित आश्चर्याचा धक्का बसला पण स्वतःला सावरत आमच्याकडे पाहत ती म्हणाली," तुम्ही ! आज आमच्या घराचा रास्ता कसा काय चुकलात ? त्यावर मी काही बोलण्यापूर्वीच सहदेव म्हणाला, अगं ! चुकलो वगैरे नाही माझ्या लग्नाची पत्रिका घेऊन आलोय ! म्हणजे ! लवकरच अजून एक फसणार तर !! कविता हळूच म्हणाली. ते ऐकल्यावर सहदेव माझ्याकडे पाहून हसला असता विषय बदलत कविता म्हणाली, माझ्याकडे येण्यापूर्वी कोणाकडे गेला होतात ? त्यावर स्वप्नीलकडे ! मी पटकण बोलून गेलो. त्यावर कविता रागातच म्हणाली , " नाव काढू नकोस त्याच, त्या दिवशी बस-स्टॉप समोरच्या पानाच्या टपरीवर ऐटीत सिगारेट ओढत होता. आजूबाजूला कोणी असेल याचीही फिकर नव्हती त्याला. त्याला सिगारेट ओढताना पाहून मलातर त्याच्या जवळ जाऊन त्याच्या कानाखाली आवाज काढावा असं वाटत होतं. तो नक्कीच चांगला कलाकार आहे , चांगला वक्ता आहे पण एक चांगला माणूस नाही होऊ शकला, हाच स्वप्नील शाळेत असताना व्यसनाधीनतेवर मोठं मोठी भाषणे द्यायचा तेव्हा अक्का हॉल टाळ्यांनी दुमदुमायचा ! त्यावेळी त्याच्या भाषणावर किती शिक्षक आणि विद्यार्थी फिदा व्हायचे. तेच त्याच्यावर फिदा होणारे जेंव्हा रस्त्यावर त्याला सिगारेट ओढताना पाहतील तेंव्हा त्यांना काय वाटेल ? कविताने अशी स्वप्नीलवर स्तुतीसुमने उधळलेली मला असह्य होत होती कारण स्वप्नील माझा जिवलग मित्रांपैकी एक होता. कविताच्या बोलण्याचा अश्वमेघ मधेच थांबवत मी म्हणालो, " तुझं स्वप्नील पुराण आता बाजूला राहू दे ! अजून बऱ्याच जणांना पत्रिका द्यायच्यात. सहदेवने कविताला पत्रिका दिल्यावर कविता आम्हाला सोडायला तिच्या घराजवळच्या मुख्य रस्त्यापर्यत आली. सहदेव थोडा पुढे निघून गेल्यावर ती हळूच मला म्हणाली, तू दुसऱ्यांच्याच लग्नाच्या पत्रिका वाट ! त्यावर काहीही न बोलता मी हळूच तिच्या डोक्यावर चापट मारली आणि तिचा निरोप घेऊन पुढे निघालो...


    त्या रात्री काही केल्या मला झोपच येत नव्हती. न राहून सारखा माझ्या मनात विचार येत होता स्वप्नीलला सिगारेट ओढताना पाहून कविताच्या मनात त्याच्याबद्दल इतका द्वेश निर्माण झालाय चुकून एखाद्या दिवशी तिने मला सिगारेट ओढताना पाहिलं तर ! काय होईल ? कल्पनाही करवत नव्हती. स्वप्नीलप्रमाणे मलाही सिगारेटचे व्यसन जडले होते. पण ते मर्यादित स्वरूपाचे असल्यामुळे त्याची कल्पना स्वप्नील व्यतिरिक्त कोणालाच नव्हती. एका संध्याकाळी त्याच बस - स्टॉप समोरच्या पानाच्या टपरीवर मी आणि स्वप्नील सिगारेट ओढत असताना समोरून येणाऱ्या कविताकडे माझी नजर गेली. तिला पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी स्वतःला त्यातून सावरण्यापूर्वीच ती माझ्या समोर येऊन स्तब्ध उभी राहिली. क्षणभर मला वाटलं ही आता माझ्या कानाखाली आवाज काढणार पण तिने तसे काही केले नाही. माझ्या ओठातील सिगारेट ओढून आपल्या पायातील चपलेखाली चिरडून ती पाणावलेल्या डोळ्यांनी निघून गेली. मी घरी गेल्यावर तिला फोन केला असता, उचलला पण काही न बोलता ठेऊन दिला. असे चार-पाच वेळा झाल्यावर मी हार मानून शांत बसलो.


   दुसऱ्या दिवशी सकाळी ती ऑफिसला जाण्यापूर्वी तिला बस - स्टॉपवर गाठून तिची माफी मागितली असता ती म्हणाली,"मला स्वप्नातही वाटलं नव्हतं तू असा असशील म्हणून ! आज पर्यत मी तुला एक आदर्श पुरुष समजत होते पण तू माझा विश्वासघात केलास. थोडा वेळ थांबून मी काही बोलण्यापूर्वी ती पुन्हा म्हणाली,"मी तुझं सौंदर्य पाहून तुझ्या प्रेमात पडले नाही तर तुझे गुण पाहून तुझ्या प्रेमात पडले होते. प्रत्येक नाण्याला जश्या दोन बाजू असतात तशा तुझ्या गुणांमागे काही दुर्गुणही लपलेले असतील असा विचार मी स्वप्नातही केला नाही. आता तुला सिगारेट नाहीतर मी यातील एकाला सोडावं लागेल. इतक्यात तिची बस आल्यामुळे आमचं बोलणं अर्धवट सोडून ती निघून गेल्यावर मी तिथेच बस - स्टॉपवर विचार करत बसलो होतो. इतक्यात सोनल समोरून येताना दिसली. सोनल स्वप्नीलची प्रेयसी तर होतीच पण आमची वर्ग मैत्रीणही होती. ती जवळ येताच हाय ! वैगरे झाल्यावर मी तिला प्रश्न केला, स्वप्नील सिगारेट पितो याचा तुला राग येत नाही ? त्यावर ती चटकण म्हणाली," राग येतो पण काय करणार ? प्रेमात आहे ना त्याच्या ! एवढ्या लवकर तू इकडे काय करतोयस ? त्यावर मी म्हणालो, कविताला भेटायला आलो होतो. त्यावर गालात गोड हसत ती म्हणाली, "हो ! हो !! तू ही प्रेमात आहेस नाही. सोनलला बाय करून मी निघालो...


त्यांनतर जवळ- जवळ पंधरा दिवसांनी मी सहदेवच्या लग्नाला जरा लवकरच गेलो. तेव्हापासून मी कविताला भेटलो नव्हतो तिच्यासोबत मनसोक्त गप्पा मारायच्या होत्या. पण कविता कोठेच दिसत नव्हती. माझे डोळे सतत कविताला शोधत होते. थोड्याच वेळात प्रवेशद्वारात कविता दिसताच स्वप्नील आणि सोनल माझ्यापासून थोडे लांब गेले. संथ पावले टाकत कविता माझ्या समोर येऊन उभी राहिली आणि मला म्हणाली," मला वाटलं नव्हतं तुला माझ्यापेक्षाही सिगारेट जास्त प्रिय असेल म्हणून ! यापुढे मी तुला सिगारेट बद्दल एक शब्दही बोलणार नाही पण प्लिज ! मला विसरू नकोस, मी तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही.गेली पंधरा दिवस मी एकाही रात्री नीट झोपू शकले नाही. सारखी तुझी आठवण यायची. मला वाटलं नव्हतं मला न भेटता तू इतके दिवस राहू शकतोस ? माझ्या मनात नको नको ते विचार येत होते. हे बोलताना तिच्या डोळ्यात आलेले अश्रू माझ्या हृदयावर वज्रघात करत होते. तिच्या डोळ्यातील अश्रू माझ्या बोटावर जमा करत मी तिला म्हणालो, "तू काय वेडी झाली आहेस काय? सिगारेटसाठी मी तुला, आपलं इतक्या वर्षाचं प्रेम विसरू शकतो. मी इतका मुर्ख आहे का? अगं! तुझ्यासाठी सिगारेट काय मी जीवही सोडून देईन! ते ऐकताच कविताने हळूच माझ्या ओठावर तिचे बोट ठेवले.


ते बोट हळूच बाजूला सारून मी तिला म्हणालो, "ज्या दिवशी तू मला सिगारेट ओढताना पाहिलेस त्याच दिवशी मी सिगारेट ओढणे सोडून दिले. आणि राहिला प्रश्न तुला भेटण्याचा तर मी कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलो होतो, काल रात्रीच आलो. ते ऐकून कविताचा चेहरा आनंदाने फुलला. कित्येक दिवस तिच्या चेहऱ्यावरील चोरीला गेलेलं हसू तिला पुन्हा गवसलं. सहदेवला लग्नाच्या शुभेच्छा वैगरे देऊन झाल्यावर आम्ही चौघे म्हणजे मी- कविता आणि स्वप्नील - सोनल! चालताचालता आम्ही पुन्हा त्याच बसस्टॉप समोरच्या टपरीजवळ येताच स्वप्नीलने चार चॉकलेट विकत घेतली. जी चघळत आमच्या भविष्याची स्वप्ने रंगवत आम्ही पुढे चालू लागलो...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama