Sarita Sawant Bhosale

Inspirational

3  

Sarita Sawant Bhosale

Inspirational

वांझ

वांझ

5 mins
675


देवकी माहीत नाही

पण यशोदा माझी आहे

उदरी जन्म नाही घेतला तिच्या

पण माझी ती आई आहे

अस्तित्वाची माझ्या ओळख ती

असण्याला माझ्या तीच एक कारण आहे


    आरोहीच्या भाषणातले या चार ओळी ऐकून दामिनीचे डोळे पाणावले. आरोहीच्या ऑफिसमध्ये मातृदिनादिवशी सगळ्यांच्या मातांना बोलवून त्यांचा सन्मानित करण्याचा कार्यक्रम चालू होता त्यावेळी आरोहिने आईबद्दलच प्रेम शब्दात व्यक्त केलं. दामिनीला समाजाने वांझ म्हणून हिणवल असलं तरी आरोहिने तिला आईपण दिलेलं,मातृत्व दिलेलं. आरोही साठी दामिनी आणि दामिनीसाठी आरोही एकमेकींच जग होत्या.

    

आरोहीच्या चार ओळी ऐकल्यावर दामिनीच्या समोर तिचा भूतकाळ आला. लग्न होऊन दामिनी सुहासच्या घरी आली आणि सुहासचं घर उजळून गेलं. सुस्वभावी,प्रेमळ, शांत,समजूतदार अशी दामिनी उत्तम सुगरणही होती. सुरुवातीला खूप कौतुक व्हायचं तीच. वर्ष सरल गोडी गुलाबीत. वर्षभरानंतर सासरच्यांना बाळाची पाऊलं घरात पळावीत अस वाटू लागलं.


सुहास आणि दामिनीलाही आता बाळ हवं होतं. वर्षाची आता तीन वर्षे झाली तरी बाळाची चाहूल नव्हती. आता डॉक्टर कडे जाऊ हा दामिनीचा सल्ला मान्य करून सुहास तिच्यासोबत डॉक्टरकडे गेला. दोघांच्या आवश्यक त्या तपासण्या झाल्या. रिपोर्ट्स आल्यावर दामिनीतच दोष आहे असं सुहासने तिला सांगितलं. दामिनीला तर खूप मोठा गुन्हा केल्यासारखं वाटू लागलं. सुहासने खूप प्रेमाने तिची समजूत घातली आणि तो तिला कधीच सोडणार नाही असं वचनही दिल.काही दिवसांनी सामान लावताना ते रिपोर्ट्स दामिनीच्या हातात पडले आणि ते वाचून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की दोष सुहास मध्ये आहे. सुहास दामिनीशी खोटं बोलला होता. इतका मोठा विश्वास घात केला याचा जाब तिने सुहासला विचारला. सुहासने डोळ्यात अश्रू आणले, "मी घाबरलो...तू मला सोडून जाशील या भीतीने मी हे खोटं बोललो..मला माफ कर". 


ती आधीच पतिव्रता, नवऱ्यावर अतोनात विश्वास आणि प्रेम असणारी...त्याचे ते अश्रू बघून दामिनीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तिचं खूप प्रेम होतं सुहासवर आणि तितक्याच प्रामाणिकपणे तो देखील तिच्यावर प्रेम करतो अस तिला वाटत होतं. सासरच्यांनी दामिनीतच दोष आहे म्हणून आमचा वंश वाढत नाही अशी दवंडीच सगळीकडे पसरवली. दामिनीला सगळा समाज वांझ म्हणून ओळखू लागला. कोणत्या सणाला,समारंभाला, पाहुण्या रावळ्यात ती गेली की सगळे तिचा राग राग करायचे. तिला वांझ असून इथे का आलीस म्हणून हिणवायचे. दामिनी मात्र नवऱ्याच्या प्रेमापोटी सगळं सहन करायची. दोष नवऱ्यातच आहे हे सत्य तिने स्वतःच्या आई वडिलांपासूनही लपवल होत.

   

अशातच चार पाच वर्षे निघून गेली. हळूहळू सुहासच वागणही बदलत चाललेलं. तो घरी कमी आणि बाहेर जास्त असायचा. दामिनी घरी एकटीच स्वतःच्या दुःखावर फुंकर घालत बसायची. घरचे,बाहेरचे हीनवतात अशा वेळेस तिला वाटायचं की सुहासच्या कुशीत शिरून मन मोकळं करावं..चार शब्द त्याने आधाराने बोलावं पण ती त्याची वाट बघून उशींची अभ्रक ओली होईपर्यंत रडून झोपायची. सुहास आलाच घरी तर दारू पिऊन यायचा कधी दामिनीवर जोर जबरदस्ती करायचा तर कधी मारपीटही करायचा. सकाळी उठून त्याने मारलेल्या एका मिठीने दामिनी त्याचा अत्याचार सहज विसरून जायची. या तिच्या आंधळ्या प्रेमापायीच सुहासच्या बाहेरील प्रेमप्रकरणांकडे सुद्धा ती दुर्लक्ष करायची. तिच्या कानावर त्याची प्रकरण यायची पण त्याने बोललेल्या दोन प्रेमाच्या शब्दानेही ती सगळं विसरून जायची.

      

त्या दिवशी घटस्थापना होती. संध्याकाळी लवकर आल्यावर मंदिरात जाऊ देवीच्या अस सुहास दामिनीला सांगून गेला.दिवसभर उपवास करून ती त्याची वाट बघत बसली.संध्याकाळची रात्र झाली तरी सुहासचा पत्ता नाही. दामिनी त्याची वाट बघत होती न जेवता. एक वाजता दारावरची बेल वाजली... दामिनीने दरवाजा उघडला तर दारात मद्यधुंद अवस्थेत सुहास आणि त्याला सावरत घेऊन आलेली एक मुलगी...दामिनीने जरा रागातच विचारलं तू कोण आणि याच्या सोबत तू काय करतेस? ती मुलगी- "मी याच्यासोबत नाही तर हाच माझ्यासोबत असतो नेहमीच....आता दोन वर्षे होतील आमच्या नात्याला...तू त्याला कोणतंच सुख देत नाहीस ना...मुलाचही सुख नाहीस देऊ शकत कारण तू वांझ आहेस...सांगितलं मला त्याने....तू सुख देत नाहीस म्हणून तर माझ्याकडे येतो..सोडून दे ना याला म्हणजे त्याच्या मार्गाने तो जाईल ....त्याला तरी सुख मिळेल". एवढं बोलून सुहासला तिथे सोडून ती मुलगी निघुन जाते. दामिनीला जे ऐकलं त्यावर विश्वास बसत नव्हता. रात्रभर ती विचार करते की नक्की काय चुकलं तीचं?

   

सकाळी अजूनही पूर्ण शुद्धीत नसलेला सुहास नेहमीप्रमाणे तिला मिठी मारायला जातो आणि यावेळी दामिनी वीज कडाडते तशी त्याच्या अंगावर कडाडते...दोन कानशिलात लगावते ....जोराने त्याला ढकलून देते...तो जाऊन सोफ्यावर आदळतो. तिच्यातली दुर्गा आज जागृत झालेली. तो चिडून,"तू मूर्ख आहेस का ग? वेडी झालीस का? अचानक काय झालंय तुला? माझ्यावर हात उचलतेस?? दामिनी-" वेडी आतापर्यंत होते तुझ्या प्रेमात... मूर्ख बनत होते दरवेळी तुझ्या बोलण्यात...आता खरं शहाणी झाली मी. ..तुझ्या प्रेमामुळे माझ्यावर तू लादलेल खोट वांझपण आतापर्यंत सहन करत आले...समाजाच्या तुच्छ नजरा सहन करत आले....मी दत्तक मूल घे म्हणत असतानाही दुसऱ्याच मूल नको म्हणून तू नकार दिलास. माझं आईपण हिरावून घेतलंस आणि वर सगळ्याना तूच सांगतोस मी वांझ आहे...मी इथे घरात रोज तीळ तीळ तुटते आणि तू बाहेर मजा मारतोस नालायक माणसा....कधीतरी तुझा मर्दपणा दाखवायला, पुरुषार्थ गाजवायला.. हवं तेव्हा शरीरसुख उपभोगायला हक्काची बाई म्हणूनच तू मला घरात ठेवलस आजपर्यंत....बायको म्हणून काही सन्मान नाही की आदर नाही. बास आता या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात मी अडकणार नाही आता. वांझ नक्की कोण हे आता समाजाला कळेल..त्यानंतर तुझा पुरुषार्थ गाजवत बस तू हवं तिथे"...अस बोलून तो अडवायला येत असताना त्याला मागे ढकलून दामिनी बॅग घेऊन घराबाहेर पडली.

   

तिच नशीब चांगलं म्हणून सगळं सत्य समजल्यावर आई वडिलांनी तिला स्वीकारलं आणि तिच्या सोबत खंबीर उभे राहिले. वडिलांचा जो पापडांचा उद्योग होता तोच तिने पुढे वाढवला. एक वर्षाने सुहासकडून घटस्फोट घेतल्यावर तिने लग्नाचा विचारच सोडला. एकट्या स्त्रीला मुलं दत्तक घेणं म्हणजे खूप कठीण लढाई असते पण दामिनीच्या प्रबळ इच्छाशक्तीने त्या लढाईवर मात केली आणि आरोही अगदी एक वर्षाची असताना तिला दत्तक घेतल. आरोहिचा सांभाळ तिने खूप प्रेमाने केला. समाज अजूनही वांझ म्हणून हिणवत होता,नको नको ते आरोप करत होता पण दामिनी आई झालेली आणि तिच्यात वेगळी ताकद आलेली. या आईने सगळया समाजाचा सामना करून आरोहिला उच्च शिक्षण तर दिलच पण एक चांगला माणूस म्हणून घडवलं.

  

इतक्या खडतर परिस्थितीतून आईपण सिद्ध केलेल्या दामिनीला आज स्वतःचाही खुप अभिमान वाटत होता.भूतकाळासोबत अश्रूही वाहू लागले डोळ्यातून तेवढ्यात आरोही आली आईला भेटायला. नकळत ओलावलेले डोळे पाहून आरोही म्हणाली,"आनंदाने रडतेस का ग? आहे की नाही तुझी मुलगी ग्रेट😊😊. माहितीये मला "वांझ" हा शब्द अजूनही तुझ्या कानात घुमतो..तुला त्रास देतो पण तू वांझ नाहीस ग..आई आहेस माझी. आणि हा शब्दच मुळात चुकीचा आहे कोणत्याही स्त्रीसाठी... वांझ म्हणजे शरीराच व्यंग होऊ शकत पण मनाचं, आत्म्याच नाही. देवाने उपजतच स्त्रीला मातृत्व दिलेलं आहे..तो प्रत्येक ठिकाणी नाही म्हणून स्त्री मध्ये माया,ममता,काळजी,प्रेम ओतप्रोत भरलंय आणि प्रत्येक स्त्री एक आई असते. तुझ्या पोटी मी जन्म नाही घेतला एवढंच काय ते पण मला प्रेम कमी नाही दिलंस. तितक्याच मायेने आणि ताकदीने मला घडवलस,स्वतःच्या पायावर उभे केलंस आणि आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच आई. तेव्हा प्लीज "वांझ" हा शब्द डोक्यातून पुसून टाक. चूक तुझी नसताना त्याची शिक्षा भोगलीस आतापर्यंत..आता इथून पुढे फक्त हसायचं😊". 


  आरोहीचं बोलणं दामिनीला पटत आणि त्या दिवसापासून तिने त्या शब्दाला तिलांजली दिली. सुखी आणि समाधानाच आयुष्य स्वतःच्या लेकीसोबत जगते ती आज.

  

 दामिनीसारख्या अशा कितीतरी स्त्रिया हे खोटेपणाच लादलेल वांझपण घेऊन रोज संघर्ष करत असतात. त्यांच्यातली दुर्गा जागृत होऊन योग्य निर्णय त्यांनी घ्यावा. प्रत्येक स्त्री मध्ये उपजत एक आई असते हे हिणवणाऱ्या समाजालाही समजावं.


Rate this content
Log in