Sarita Sawant Bhosale

Tragedy Classics Inspirational

3  

Sarita Sawant Bhosale

Tragedy Classics Inspirational

आंटी नको म्हणू ना

आंटी नको म्हणू ना

4 mins
402


#मराठीभाषादिवस_विशेष

काही दिवसांपूर्वी एका हळदी कुंकू कार्यक्रमाला जाणं झालं. सगळ्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित बायका नटून थटून आनंदाने सोहळा साजरा करीत होत्या. आता बायका म्हंटल की त्यांची चिमुरडी लेकरही सोबत असणारच. असंच एका ओळखीतल्या चार वर्षाच्या चिमुरडीने मला पाहून हाय काकू अशी हाक मारली. तसं तिची आई तिला पटकन म्हणाली "काकू नाही ग आंटी म्हणावं बाळा". अशुद्ध मराठी शुद्ध करायला शिकवावं इतक्या सहज त्या बोलून गेल्या पण त्या वाक्याने खाडकन डोक्यात मुंग्या आल्या...पटकन आठवलं हे ज्ञान आपल्या मुलीला शिकवणाऱ्या बाई मराठी विषयाच्या शिक्षिका आहेत. मागच्याच वर्षी 'मराठी कशी जपावी' या विषयावर त्यांनी जोरदार भाषणही दिल होतं. कुठे शहरात असो की जगातही मराठी भाषा संरक्षणाची मोहीम सुरू झाली की या बाई आणि यांचा सगळा परिवारच दूरचित्रवाणी (टी व्ही) समोर बसून त्या चळवळीत भाग घेतात आणि मराठी लोकांकडूनच इतर भाषेच्या अधिक वापरामुळे मराठी भाषा कशी मागे पडत चालले यावर चर्चासत्र चालवतात. 

पण याच बाईंना आज आपण स्वतःच आपल्या लेकीला काकू वगळून आंटी बोलायला शिकवून पुढच्या पिढीकडे कशा रीतीने मराठी भाषा सुपूर्द करतोय याचा कदाचित विसर पडलेला असावा. इंग्रजीचा अभिमान आणि मराठीची लाज हे भवितव्य घडवतोय का आपण हेही जाणवण्यापलीकडे सद्सद्विवेक बुद्धी गेली होती.

   हे तर एकच उदाहरण झालं..असे हजारो आपल्यात, आपल्या आजूबाजूला, आपण स्वतः असतो जे इंग्रजी, हिंदी भाषेच्या इतक्या आहारी गेलेलो असतो की सहज सोप्पा मराठी शब्द बोलायलाही नाकारतो..काही मराठी भाषिक तर केवळ फॅशन किंवा फॅड म्हणून हिंदी,इंग्रजी बोलतात...आपल्या मुलांनाही तेच शिकवल जात. नाही इंग्रजी बोलूच नये किंवा शिकवू नये असं म्हणणं नाहीच मुळी माझं. आता बहुतांश मराठी घरातील मुलं ही इंग्रजी शाळेतच शिकतात..ती शिकवावी न शिकवावी हा खूप वेगळा विषय आहे..त्याला अनेक कंगोरे आहेत....तो इथे विषय नाही. पण मराठी आता लोप पावत चालले, हळूहळू मराठी भाषा कमी होत चालले अस म्हणणारे आपण असं का होतंय किंवा यावर काय करू शकतो याचा विचार देखील करतो का? काकू, मावशी,काका, बाबा,आई,दादा,ताई या शब्दात जे प्रेम आहे, जिव्हाळा आहे तो आंटी, अंकल, सिस,ब्रो या शब्दात जाणवतो??

    मागे दोन तीन वर्षांच्या मुलीने आई हा शब्द उच्चारला होता आणि आजोबा म्हणाले होते की हल्ली आई शब्द फार दुर्मिळ होत चाललाय.. त्यांच्या तस बोलण्यातली तगमग आणि कळकळ हळूहळू उमगत गेली. आधी आई होतं मग मम्मी झालं (मम्मी हा शब्द मराठी म्हणूनच प्रचलित झाला नव्हे तर केला गेला) आणि आता मम्मीचही मॉम आणि पप्पाच डॅडा झालं...कारण काय तर असे शब्द वापरले की वेगळं स्टेटस आणि वेगळी प्रतिष्ठा तयार होते म्हणे. "बापरे! किती well educated family आहे यांची " अशा शब्दात गणना होते म्हणे...आपली प्रतिष्ठा तयार व्हायला आपल्याच भाषेचा गळा दाबून दुसऱ्या भाषेला आपणच वरचढ ठरवणं कितपत योग्य आहे?? इंग्रजी शिकावं, बोलावं पण आपल्या मायबोलीला बाजूला सारून नक्कीच नाही. एकीकडे मुलांना चांदोमामा, येरे येरे पावसाही शिकवावं तर दुसरीकडे twinkle twinkle little little star, rain rain go away हे ही सांगावं. नाहीतर कधीतरी चांदोमामा ऐकल्यावर "what is chandomama" या मुलाच्या प्रश्नाने स्वतःचीच मान खाली जायची वेळ यायला नको. 

     शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. मराठी भाषेचा सन्मान केला. आता मराठी भाषा संवर्धनासाठीही महाराजांनीच पुन्हा जन्म घ्यावा ही अपेक्षा आहे का? त्यांचे संस्कार, त्यांची शिकवण फक्त आणि फक्त शिवजयंतीलाच आठवावी का? शिवाजी जन्मावे पण दुसऱ्याच्या घरी अगदी तसंच मराठी भाषेचही झालं असं वाटतंय..मराठी भाषा जपावी, सांभाळावी, गौरवावी पण इतरांनी....आम्ही मात्र इंग्राजलेले असल्यासारखे मराठीला मागे सारत गरज नसेल तिथेही इंग्रजी बोलत फार उच्चशिक्षितअसल्याचा, इंग्लिश फार कळत वळत असल्याचा आव बाळगतच राहणार.शिवबा घडेल, घडवेल कोणीतरी पण आपण काही जिजाऊ व्हायचंच नाही..हो ना???? शिवाजी महाराजांना आपलं आदर्श म्हणवणारेच जर मराठीला डावलून इतर भाषेला प्राधान्य देत असतील तर त्यांची शिवाजी महाराजांच नाव घेण्याचीही पात्रता नाही.

    इंग्रजी ही काळाची गरज आहे आणि आताची पिढी ते शिकतच आहे. पालक म्हणून आपली जबाबदारी ही वाढली आहे की इंग्रजी सोबत मराठी भाषा जी आपली मायबोली आहे तिचा त्यांना विसर पडू द्यायचा नाहीये. यासाठी आंटी अंकल हे शब्द महान आणि काकू, मावशी हे शब्द कमीपणाचे असतात ही भंपक समजूत स्वतःच्या मनातून काढणं अत्यावश्यक आहे तेव्हाच अभिमानाने मुलांना योग्य मराठी आपल्याकडून शिकवली जाईल. "काकू म्हणजे आंटी" हे ही योग्य पण "काकू नकोच,आंटीच म्हणायचं" हे आपणच आपल्या भाषेचा केलेला अनादर होय. मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी कला, मराठी संस्कृती टिकवायची असेल, इथून पुढेही अजरामर करायची असेल तर ते पाऊल आपल्या घरातून उचललं गेलं पाहिजे तेही नियमितपणे. फक्त मराठी राजभाषा दिवशी मराठीचा उदोउदो नको. मराठी भाषा,मराठी कविता, बालगीत, बडबडगीते, मराठी विपुल साहित्य यासोबत मराठी अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याकडून मराठी भाषेचा गर्व पुढच्या पिढीला गेला पाहिजे. 

    मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने "मराठी भाषा दिवस" साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रजांसारख्या अनेक साहित्यिकांनी मराठी भाषेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं निदान ती उंची, मराठी भाषेच ते मोठेपण टिकवायच सुकर्म तरी आपण करूया. फक्त २७ फेब्रुवारीलाच नाही तर नेहमीच हे बोलूया..वर्तनात,आचरणात आणूया-


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

मराठी जिवंत ठेवायची असेल तर मराठीला गुदमरून नाही तर मराठी सोबत आपल्यालाही मोकळा श्वास घ्यायलाच हवा.

(आशा आहे इथून पुढे कोणी मराठी भाषिक आंटी बोलल्यावर अभिमानाने म्हणाल आंटी नको काकू म्हण इतरांच्या भाषेतल्या नावाने ओळ्खण्यापेक्षा आपल्या मायबोलीतली ओळख अभिमानाने मिरवता आली पाहिजे).


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy