Sarita Sawant Bhosale

Drama Tragedy Inspirational

4.2  

Sarita Sawant Bhosale

Drama Tragedy Inspirational

विरहाचा पाऊस

विरहाचा पाऊस

6 mins
428



   आजही बाहेर धो धो पाऊस कोसळतोय आणि मी असाच लॅपटॉप वर काम करतोय पण लक्ष खिडकीच्या बाहेर त्या कोसळणाऱ्या सरींकडे. पावसाला खिडकीतूनच बघायचं हा छंद माझा लहान पणापासूनच पण पावसात भिजणं कधीच आवडलं नाही. ती चिंब भिजणं, कपडे ओले होणं,सगकीकडे चिखल होणं,घरात पाणी पाणी होणं हे मला कधी आवडलंच नाही म्हणून प्रत्यक्ष पावसात जायचं टाळून मी नेहमी खिडकीतून पाऊस बघतो. त्या सरींच्या लय, तालीत हरवून गेलं की अस वाटतं आपण भिजतोय त्या पावसात अंतर्बाह्य...ओलावा मनात रुजून गारवा पसरतोय चोहीकडे. खूप आल्हाददायक वाटतं... खरंतर वाटत होतं. आता मन सरीत भिजत की तू भेट म्हणून मागे ठेवून गेलेल्या आठवणीत रडत हे स्वतःसच उमगत नाही. इतर वेळी आठवणीला कसातरी बांध घालतो पण पावसात मात्र हा बांध उन्मळून पडतो. सरी मागे सरी बरसतात तशा तुझ्या आठवणी मागोमाग बरसू लागतात अन कसातरी सावरलेलो मी पुन्हा या पावसात कोसळून पडतो. पुन्हा तिथेच येऊन पोहचतो जिथे तू पहिल्यांदा भेटली होतीस आणि जिथे तू मला कायमच सोडून देखील गेली होतीस.

     त्यादिवशीही असाच जोरदार पाऊस पडत होता. हवामान खात्याने पूर्वसूचना दिलीच होती की पुढील चार पाच दिवस मुंबईत जोरदार पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. पण पूर्वसूचना मिळाली म्हणून मुंबई बंद पडणार होती थोडीच. मी ऑफिसमध्ये मस्त हातात कॉफीचा मग घेऊन खिडकीतून त्या जोरदार पावसाचा आस्वाद लुटत होतो. सगळं ऑफिस पाऊस वाढला तर घरी कस जायचं या टेन्शन मध्ये असताना मी मात्र कॉफीच्या प्रत्येक सिप सोबत बरसणाऱ्या सरीला मनात झेलून भिजत होतो.

तितक्यात ऑफिसमध्ये गोंधळ सुरू झाला...पावसाचं प्रमाण वाढत होतं. सगळ्यांची घरी सुरक्षित जाण्याची घाई चालली होती. मी ही सगळं पॅक अप करून ऑफिस बाहेर पडलो. बघितलं तर रस्त्यावर पाणी साचायला सुरू झालेलं. बस पकडून तर स्वतःच्या गाडीवरून तर कलीगच्या गाडीतून आपल्याला लिफ्ट मिळवण्यासाठी सगळ्यांची धडपड चालू होती. मी कसाबसा स्वतःला सावरत माझ्या बाईक जवळ पोहचलो. रेनकोटच ओझं शाळेपासून आवडत नाही म्हणूज ते कधीच जवळ बाळगल नाही पण आज वाटत होतं सकाळी आईच ऐकून घ्यायला हवा होता. हेल्मेट घालून गाडीला चावी लावणार तोच मागून सुंदर आवाज कानावर पडला.

"Excuse me.. आज मी माझी गाडी आणली नाही pls मला घरापर्यंत लिफ्ट द्याल का?? त्याच दिशेला माझं घर आहे."

   पूर्वा...client servicing डिपार्टमेंट मधली अतिशय सुंदर, हुशार,देखणी मुलगी त्यादिवशी चक्क तू माझ्यासमोर उभी होतीस. रोजच ऑफिसमध्ये आमच्या dept मधून येता जाता तुझ्याकडे चोरून बघायचो. खूपदा बोलायचा प्रयत्न केला पण तू का म्हणून माझ्यासारख्या सामान्य मुलाला भाव देशील असा विचार करून गप्पच राहिलो...पण त्यादिवशी तूच समोरून मदत मागितली होतीस मग नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. तुझ्या अचानक तिथे येण्याने माझं तत पप झालं होतं खरं पण मनात लाडू फुटत होते.क्षणाचाही विलंब न करता लगेच होकारार्थी मान हलवली आणि बाईक सुरू केली. गर्दी,धक्क्यातून बसने जाण्यापेक्षा तुला माझ्यासोबत पावसात भिजत जाणं जरा कमी तापाच वाटलं असावं. तुला माझ्या मागे बसताना किती जणांचे चेहरे लालनिळे पडले होते पण मी मात्र मनातून खुश झालो होतो. त्या जोरदार पावसातही तू मारलेल्या गप्पा, तुझा नकळत झालेला स्पर्श, जाताना मैत्रीसाठी तू पुढे केलेला हात अगदी तसच्या तस मनावर कोरून ठेवलं आहे. हळूहळू रोज ऑफिसमध्ये, कँटीन मध्ये वेळ मिळेल तस गप्पा मारणं, तुझी गाडी दुरुस्त होईपर्यंत आपण सोबतच गाडीवरून घरी जाणं, शनिवार रविवार आला की बाहेर भटकण आणि रोज तुझ्याशी फोनवर बोलून मगच मी झोपणं हे इतकं सवयीचं झालं की ही सवयीची मैत्री प्रेमात कधी बदलली कळलं देखील नाही. प्रेम सगळं बदलायला लावत म्हणतात तस मीही बदललो...पावासाचा आनंद लांबून घेणारा मी आता तुझ्यासोबत तुझ्यासाठी पावसात भिजायला शिकलो...हळूहळू त्या भिजण्याच्याही प्रेमात मी पडलो.

   जिच्यावर सगळ्यांची नजर होती तिला माझी गर्लफ्रेंड म्हणून मिरवताना माझी छाती अभिमानाने फुलत होती. तुझ्या दृष्टीने मी जितका साधा तितका सच्चा होतो...इतरांच्या नजरेपेक्षा माझी नजर प्रामाणिक होती म्हणून मी तुला आवडलो. मग त्यावेळी तुझ्या माझ्या राहणीमानात, स्टेट्समध्ये जो जमीन अस्मानाचा फरक होता त्यालाही तू दुर्लक्षित केलंस...पण स्वीकारू मात्र शकली नाहीस. मी मिडल क्लास फॅमिली मध्ये वाढलेलो...तू जन्मतःच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली. माझा क्लास तुझ्या स्टेट्सला कसातरी मॅच करण्याचा प्रयत्न मी करत होतो. पण तू वरच्या पायरीवरून खाली उतरवून माझ्यासाठी का म्हणून येशील...आठवड्याला तुझं शॉपिंग, लेट नाईट पार्टीज, शनिवार रविवार बाहेर फिरायला जाणं असे सगळे तुझे लाड घरच्या जबाबदारी सोबतच माझ्या पगारातून मी पुरेपूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो...तू कधी माझ्याकडून ती अपेक्षा केली नाहीसच पण मी पुरुष म्हणून तो एक अट्टाहास व इगोला कुरवाळण्याचा गोंडस प्रयत्न दमछाक होईपर्यंत करत होतो. तुझ्या सोबत मॉल, पब्स,मल्टिप्लेक्स सगळीकडे स्वतःला ऍडजस्ट करत गेलो पण तू कधीच माझ्यासाठी रस्त्यावर उतरून पाणीपुरी किंवा वडापाव खाल्ला नाहीस. मी तुझ्यासोबत प्रत्येक पावसात भिजलो पण तू माझ्यासाठी एकही नाटक पाहायला सोबत आली नाहीस. मी ही हट्ट नाही केला..कधीच...कसलाच...कारण तुला गमावण्याची भीती होती. तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं...त्या प्रेमाला दुखावण्याची हिंमत माझ्यात नव्हती म्हणून मी स्वतःला दुखावत गेलो पण प्रेमाला तळहातावरील फोडाप्रमाणे जपत राहिलो. कदाचित जास्तच फक्त मीच जपत राहिलो...नात्याचा दोर एकाच बाजूने मी घट्ट उराशी कवटाळून बसलो. तुझ्याकडून तो दोर हळूहळू सैल होत गेला आणि मला कळलं देखील नाही. माझ्या priorities मध्ये माझं कुटुंब, माझ्या बहिणी,माझा मित्रपरिवारही येतो हे तुला कधीच समजलं नाही. तुझ्यासाठी मी फक्त तुला तुझ्या वेळेत तुझ्यासमोर हजर हवा असायचो. सुरुवातीला ही अगदी मऊ मखमलीत मोरपीसासारखं गालावर गुदगुल्या करणारी भावना नंतर मात्र गुलाबाच्या काट्यासारखं टोचू लागली. गुलाब तर हातातून सोडवत नव्हता पण ते काट्यांच बोचणही असह्य होत होतं.

     वाद,चर्चा, अबोला वरचेवर चालायचं पण मनधरणी फक्त माझ्याकडूनच.. परत वाद,चर्चा,अबोला हे सत्र चालूच झाल. माझ्या जबाबदाऱ्यामुळे तुला द्यायला वेळ कमी पडत होता मान्य आहे पण म्हणून माझं तुझ्यावर प्रेमच नाही किंवा नव्हतंच हा तुझा आरोप मला आजही मान्य नाही. 

   एकीकडे माझी प्रेमाची परीक्षा चालू होती तर दुसरीकडे माझ्या कुटुंबावर संकटांची मालिका...... त्याच काळात अचानक बाबांना अटॅक आल्यामुळे मी पूर्णपणे हॉस्पिटल,ऑफिस आणि घर यातच बिझी राहिलो...त्यावेळी दोन शब्द तुझे आधाराचे कानी पडावे हीच अपेक्षा असायची पण तेव्हाही तुझा फोन तुझ्या वेळेत उचलला नाही म्हणून तू माझी परिस्थिती जराही समजून न घेता आरोप करत राहिलीस. कायमचे नातं तोडुया हे किती सहज बोलून गेलीस. तुझ्या प्रत्येक चांगल्या वाईट वेळेत मी तुझ्या सोबत होतो पण मला जेव्हा तू समजून घ्यायची खरी गरज होती तेव्हा तू मात्र अशाच मुसळधार पावसात मला भेटून "आपल्यात आता काहीच उरलं नाही...ना मैत्री...ना प्रेम...ना भविष्य" एवढंच बोलून निघून गेलीस. पावसाच्या थेंबाच्या आघाता पेक्षा तुझ्या तोंडून निघालेल्या त्या शब्दांचा आघात माझ्यासाठी कैक पटीने अधिक होता. कदाचित आपल्या भविष्याचा एकत्रित विचार तू कधी केलाच नाहीस म्हणून सगळंच तोडणं तुला सोपं गेलं. एका क्षणात पाच वर्षांच्या प्रत्येक भेटीचा, कॉलचा,मेसेजेसचा, एकमेकांना दिलेल्या भेटवस्तूंचा हिशोब चुकता करून निघून गेलीस पण यात गुंतलेल्या मनाचं, भावनांचं काय??? त्याचा हिशोब किती आणि कसा चुकता करणार होतीस??? तसही ते तुला जमलं नसतंच कधी. तू निघून गेलीस आणि मी जागेवरच थिजून फक्त तुझ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा होतो. नाती इतकी सोप्पी असतात जोडायला आणि तोडायलाही??? 

     त्यादिवसापासून आपलं म्हणणाऱ्या प्रत्येक नात्यावरून विश्वास उडाला. जरा माणसांपासून दुरावलो असेन पण पावसाच्या अधिक जवळ गेलो. ज्या पावसाने आपली पहिली भेट घडवली होती त्याच पावसाने शेवटच्या भेटीतही चिंब भिजवल होतं.... या पावसाशी आपसूकच एक नातं जुळलं. तू गेल्यापासून या विरहाच्या पावसात मी रोजच भिजतो...रोजच नव्याने स्वतःला पुन्हा पुन्हा सावरतो.

      असा चिंब ओला पाऊस

काळ्या नभी दाटून येतो

आठवणींचा थवा मग

टपोऱ्या थेंबासह भिजू लागतो


तू गेलीस तेव्हा

असाच तो बरसत होता

अतूट वचनाच्या नात्यात गुंतलेला

 हात हातातून सुटत होता


कडाडणाऱ्या वीजांसकट

मनातून मी ही तडफडत होतो

फाटलेल्या आभाळाखाली

थेंबा थेंबात मी ही विस्कटत होतो


वादळ वाऱ्याच्या हेलकाव्यात

उन्मळून मी पडलो होतो

तुटलेल्या त्या क्षणांना

ओंजळीत साठवत होतो


ओसरल्या पावसासहीत अशांत मनात

मीही झिरपत होतो

विरून गेल्या धारा तरीही

विरहाच्या पावसात रोजच भिजत होत



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama