Sarita Sawant Bhosale

Tragedy Inspirational

2.8  

Sarita Sawant Bhosale

Tragedy Inspirational

तिने मुक्त व्हावं

तिने मुक्त व्हावं

10 mins
368


"किती ग बाई तो गुंता?? आणि काय झालंय हे केसांचं सानु...रुक्ष आणि निर्जीव झालेत अगदी...मान्य आहे आता आईच्या घरी नसतेस..स्वतःच घर,संसार सांभाळण्यात गुंतली असशील पण म्हणून पूर्णतःच दुर्लक्ष केलयस केसांकडे आणि स्वतःकडेही. किती काळेभोर, लांबसडक आणि दाट केस आहेत तुझे. आठवतं ना कबीर ने म्हणजे तुझ्या नवऱ्याने या केसांवरच भाळून तुला बघताक्षणी पसंद केली होती".

   माहेरपणाला आलेल्या सानुच्या केसांना मालिश करत तिच्या आईची निरंतर बडबड चालूच होती. सानु म्हणजे सानिका.. प्रेमाने सगळे तिला सानुच म्हणतं... माहेरी आणि तिचा प्रिय नवरा कबीरही. सानू आणि कबीरच्या लग्नाला दीड एक वर्ष झालं असेल..अगदी रीतसर कांदेपोहे वगैरे करून अरेंज मॅरेज दोघांचं. कबीर एका नामवंत कंपनीत इंजिनिअर होता तर सानूचही फार्मसी झालं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच लग्न ठरलं त्यामुळे आता तुला पुढे नोकरी करायची, अजून शिकायचं जे काही असेल ते लग्नानंतर कर असे घरचे म्हणाले. पडत्या फळाची आज्ञा मानत सानुनेही ते मान्य केलं आणि लग्न झालं. लग्न झाल्यावर कबीरच्या प्रेमाच्या वर्षावाखाली मनातली ती सुप्त इच्छा व्यक्त करण्याची हिंमत सानुला कधीच झाली नाही. 

  "सानु बाळ तो केसांचा तुझ्या सडा नीट आवर म्हणजे बांध ग आणि जा बघ आई काय म्हणते".


   आजीचा आवाज ऐकून कुठल्याशा तंद्रीत हरवलेली सानु ते केस दोन्ही हातांनी लगबगीने घेते. डाव्या हातात पकडून उजव्या हाताने गोल वेढे घालत घालत आवेशात घट्ट अंबाडा बांधते आणि आत निघून जाणार तेवढ्यात तिचा तो आवेश पाहून आजी सुद्धा म्हणते "अग किती घट्ट बांधून ठेवशील त्या केसांना...जरातरी सैल ठेव....त्रास होईल की तुला आणि हानी होईल त्या मुलायम केसांची". 

  "नाही काही होत आजी..सवय झाले आता" - एवढंच बोलून सानु निघून जाते.

     लग्न झाल्यापासून सानु फारसं माहेरपणाला आलीच नव्हती. सुरूवातीचे नवीन दिवस संपले की कबीर आणि ती कारणा पुरते एका दिवसांत येऊन जायचे. दीड दोन तासांच्या अंतरावर माहेर असल्यामुळे राहायला कशाला जायचं? एका दिवसांत वाटेल तेव्हा भेटून यायचं..हे कबीरचं तिच्या माहेरी जाऊ का? या प्रश्नावर दरवेळी ठरलेलं उत्तर असल्याकारणाने माहेरी राहायला येण्याचा हट्ट तिनेही नाईलाजाने सोडून दिला होता. यावेळी आली तेव्हा माहेरच्याना धक्का बसला खरा पण सुखदच. दोन दिवस लेक आली राहायला म्हणून आईच काय करू नी काय नको असं झालं होतं. वडिलांचंही लेकीचे किती लाड पुरवू नी किती नको असच झालेलं. तिची लहान बहीण मात्र आता माझे लाड नाही होणार म्हणत गाल फुगवून बसलेली. आईने सानु नको म्हणत असताना केसांना मालिश केली आणि स्वतःच्या हाताने लेकीला न्हाऊ घातलं. माय लेकीचं नात किती दिवसांनी बहरत होतं पुन्हा एकदा नव्याने. केस धुऊन सानु बाहेर आली आणि टॉवेलने केसाला पीळ घालून बांधू लागली. हे बघून बहीण म्हणाली, " अग सोड आता त्यांना मोकळे...धुतलेस ना सुकतील नीट...एकतर तुझा एवढा मोठा केशसंभार...नीट काळजी नाही घेतलीस ना तर ते हवेत उडून जातील आणि मग केसांमागे लठु झालेले जिजू रडत बसतील. सोड ग ते केस...किती करकच्च आवळलयस त्यांना". सानुची बहीण हसतच म्हणाली पण सानुच्या कानात "करकच्च आवळून ठेव त्यांना" असा आवाज घुमू लागला. लग्नानंतर सानुने असेच केस धुवून माहेरच्या सवयीप्रमाणे सासरीही केस मोकळे ठेवले होते. सानुचे सासू, सासरे, दिर हे दुसऱ्या मजल्यावर तर सानु आणि नवरा तिसऱ्या मजल्यावर असे एकाच बिल्डिंग मध्ये एकत्रच राहत होते असं म्हणायला हरकत नाही. रविवारी नाश्ता जेवण सासुकडेच असतो त्यामुळे सानु तशीच मोकळ्या केसांनी खरंतर अर्धे केस मोकळे सोडून अर्ध्या केसांत क्लिप लावून ती सासूच्या घरी आली. सगळ्यांना डायनिंग टेबल वर नाश्ता द्यायचं काम ती करताना तिच्या लहान चुलत दिराने तिच्या लांबसडक केसांची आणि पुढे येणाऱ्या बटेची प्रशंसा केली. मलाही तुझ्यासारखी लांब केस असलेली बायको मिळो हे त्याच्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे तो बोलून गेला. 

     नाश्ता कसाबसा आवरून कबीर सानुला वर घरी घेऊन गेला. त्याचे डोळे,चेहरा लालबुंद झाला होता. रागात त्याने सानुचे केस जोरात ओढले आणि म्हणाला,"कोणासाठी मोकळे सोडलेस केस?? गरज काय याची? करकच्च बांधून ठेवायचे इथून पुढे ते कळलं?? आणि बट (बट हाताने ओढत म्हणाला) बाहेर काढून नखरे करतेस?? परत बाहेर नाही दिसली पाहिजे नाहीतर माझ्या सारखा वाईट कोणी नसेल." सानुला असह्य वेदना होत होत्या पण तिचं बोलणं,वेदना काहीच कबीर पर्यंत पोहचत नव्हतं. त्याने स्वतः तिच्या केसांना आवळून घट्ट अंबाडा बांधला आणि तिला तसच विव्हळत सोडून गेला. सानुचे केस खूप दुखत होते.. पिरघळलेलला हात काळा निळा पडला होता. रडायलाही तोंडातून आवाज निघत नव्हता इतकी वाईट अवस्था तिची झाली होती. कबिरचं हे रौद्र रूप तिच्यासमोर पहिल्यांदाच उघड झालेलं. लग्न झाल्यापासून तो अधून मधून रागवायचा, गोष्टी त्याच्या मनासारख्या नाही घडल्या तर चिडायचा, मी ऑफिसला जाताना आणि परत आल्यावर तू फ्रेशच दिसायला हवी, मी सांगेल तीच साडी नेसली पाहिजे, मी जस सांगेल तसच वागलं पाहिजे,मी बाहेर घेऊन जाईन तेव्हाच बाहेर पडायचं, मी सांगेन त्याच व्यक्तीसोबत बोलायच, असंच वागायचं तसंच राहायचं असे बरेच नियम त्याने सानु वर लादले होते आणि नवीन लग्न झाल्यामुळे किंवा आपल्यावरच्या अतिप्रेमामुळे तो असा वागत असेल या गैरसमजाने सानु त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण करत होती. तिच्या आयुष्यात सकाळ,संध्याकाळ, रात्र व्हायची ती फक्त आणि फक्त कबीर साठीच. पण त्याचा स्वभाव हेकेखोर, विक्षिप्त आहे हे हळूहळू तिला कळायला लागलं. प्रत्येक भांडणानंतर त्याने प्रेमाने येऊन सॉरी म्हणणं आणि घाबरुन त्याला माफ करणं हे नित्याचच झालं होतं. त्या एका प्रसंगानंतर सानुने परत कधीही केस मोकळे सोडायची हिंमत केली नाही. घरी,बाहेर,कोणता सण,कार्यक्रम काही असले तरी सानुने केस बांधलेलेच असायचे. एक दिवस कबीरचा चांगला मूड बघून सानु म्हणाली, "तुम्हाला आवडत नाही मी केस मोकळे सोडलेले मग मी कापून टाकू का? इतके सांभाळणंही मला कठीण जातं.. जास्त नाही पण थोडे तरी कापतेच." तिचं ते वाक्य ऐकून कबीरने मागचा पुढचा विचार न करता सगळी ताकद एकटवून तिच्या कानाखाली मारली..त्या फटक्याने सानु मागच्या बेड वरच आदळली. तिच्या जवळ जाऊन ते केस जोरात ओढून म्हणाला,"मी बोललो का काप मग तू म्हणालीस कशी की कापतेच...हे केस जरी तुझे असले तरी या केसांवर माझा हक्क आहे..माझं प्रेम आहे या केसांवर..तुझे केस बघूनच लग्न केलं तुझ्याशी विसरलीस आणि हे माझं प्रेमच तू नष्ट करतेस..पुन्हा असा विचार करायची हिंमत सुद्धा करू नको." रागात, आवेगात सानुच्या अश्रूंचा चुराडा करत तिच्या मर्जीविरुद्ध त्याने शरीरभूक भागवली आणि तिला पलीकडे ढकलून दिलं. रडण्याचा आवाजही नको म्हणून ती उशीत तोंड खुपसून रात्रभर रडत बसली. असे काही चांगले काही वाईट पण कबीरचच ऐकत सानुचा संसार चालू होता.

    एक दिवस कबीरची मानलेली बहीण त्याला म्हणाली, "आमच्यासोबतही बायकोला बाहेर पाठवत जा कधीतरी..नेहमी तूच तिच्या मागे पुढे असतोस......आणि सगळ्याच कार्यक्रमाला काय ती एवढे सुंदर केस बांधून असते..तू सांगत जा तिला मोकळेच छान दिसतात. जरा मोकळीकही देत जा रे तिला". त्यावर कबीर म्हणाला, "फारच मोकळीक दिली की डोक्यावर बसून मिऱ्या वाटतात ग बायका..पेक्षा हे असंच मर्यादेत ठेवायचं असत त्यांना". त्या वाक्यावरून सानुला त्याच्या विचारांची घृणा वाटायला लागली. 

  त्याच दिवशी संध्याकाळी कबीरनेसानुला तिच्या लहान चुलत दिरा सोबत तिला हसताना पाहिलं आणि त्यारात्री कबीरने ड्रिंक करून सानुच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता इतकी मारझोड केली. तिचे केस धरून तिला फरफटल. ती सोडा सोडा म्हणून विनवणी करत होती पण तो काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. तो एवढंच बडबडत होता, "तुझं हे सौंदर्य फक्त माझं आणि माझंच आहे. कोणाच्या समोर दात काढत खिदळण्याचा अधिकार तुला कोणी दिला??? तुला बाहेर जाऊ देत नाहीतर तू घरातल्याच माणसा सोबत नको ते चाळे करतेस...तू फक्त माझी आहेस एवढंच लक्षात ठेव..मी सांगेन तेव्हाच नटायचं... मी सांगेन तिथेच बोलायचं...स्वतःची अक्कल चालवायची नाही....परत तसं काही आढळलं तर जीव घेईन तुझा"

    सानुला जबरदस्त धक्का बसला होता....ज्या लहान दिराला तिने भावासासारखं मानलं त्याच्या वरून, स्वतःच्याही भावावरून या माणसाने तिच्यावर संशय घेतला याचा खूप मोठा धक्का बसला होता तिला. शरीरावर जिथे हात लावेल तिथे वेदना होतच होती पण त्याहीपेक्षा मनाच्या वेदना कितीतरी पट आत सलत होत्या. दोन दिवस असेच अबोल्यात आणि सानुला धक्क्यात गेले. तिसऱ्या दिवशी सानु 'मी माहेरी जाते' एवढंच लिहिलेली चिट्ठी घरी ठेवून माहेरी निघून आली. तिला वाटलं त्यानंतर ही कबीर चिडेल,दंगा करेल, माहेरी येऊन तमाशाही करेल पण तसं काहीच घडलं नव्हतं. त्याने तिला एकदाही फोन देखील केला नव्हता. माहेरी सानुने काहीही सांगितलं नव्हतं. हाता पायावरच्या साधारण जखमांवरून आईने प्रश्न देखील विचारले पण काही नाही घरातच काम करताना पडले अस सांगून वेळ मारून नेली. पुढे काय आणि कुठवर जायचं तिने काहीच विचार केला नव्हता. मिळालेल्या धक्क्यातून सावरायला आणि काळ गेला की सर्व ठीक होईल याच आशेवर ती काही दिवस माहेरी आली होती.

   आजूबाजूचं वातावरण प्रसन्न होतं... आई,आजी,वडील,बहीणही खूप माहेर पणाला आलेल्या सानुचे कोड कौतुक करत होते पण सानु खोट हस चेहऱ्यावर आणून त्यांच्या सोबत वावरत होती,हसत होती. जे झालं,अनुभवलं ते सांगू की नको सांगू...पुढे याचे परिणाम काय होतील..पुढे काय????? तिच्या डोळ्यासमोर फक्त प्रश्नचिन्ह उभं होतं. उत्तरादाखल तिला काही सापडत नव्हत. टीव्हीवर काहीतरी कार्यक्रम लागायचे आणि ती फक्त रिमोट हातात घेऊन बघत बसायची...स्वतःहुन हातात रिमोट घेऊन कार्यक्रम बघायची सवय देखील तिची मोडलीच होती..काही निर्णय स्वतःहून स्वतःसाठी घ्यायचे असतात हे तिच्या गावी नव्हतंच लग्न झाल्यापासून. 


   "तू कोण आहेस??? विचार एकदा हाच प्रश्न स्वतःला...एक शोभेची बाहुली की मातीची कलाकृती नाहीस की जे कोणीतरी सहज तुला नष्ट करावं...हाडामासांची माणूस आहेस माणूस....मर्यादा असतात ग चांगुल पणाला...सहनशीलतेला...आपण कोण हे विसरून जगायलाही...मर्यादा असतातच. बस झालं ऊठ आता....स्वतःवर चढवलेला बुरखा फेकून टाक आणि शोध स्वतःचा मार्ग स्वतःच तू....परावलंबनाची लक्त्तरं दे उधळून आणि जग स्वाभिमानाने...स्वतःच्या मनाला जपून"


  एकीकडे सानुच्या कानावर तिच्या बहिणीचे हे नाटकातले डायलॉग कानावर पडत होते तर दुसरीकडे टीव्ही वर पॅराशूट तेलाची जाहिरात झळकत होती. जाहिरातीतील महिला केसांना मोकळं सोडून उडू देत होत्या...प्रेमाने केसांवरून हात फिरवत म्हणत होत्या, 


"इन्हे बाल मत कहना, इनपे मेरा नाम लिखा है

  ये मेरा गुरुर है

ये बाल नहीं है, ये मैं हु

क्योकीं मेरे बाल मेरी जान है"


    आजवर कितीदा सानुने ती जाहिरात पाहिली होती पण ते मोकळे केस पाहिल्यावर कबीरचा लालबुंद चेहराच तिच्या समोर यायचा.. आज पहिल्यांदा त्या जाहिरातीतले अर्थपूर्ण शब्द सानुच्या कानापर्यंत पोहचले होते...आणि समजले होते. फोन घेऊन तिने पार्लरमध्ये अँपॉइनमेंट बुक केली. संध्याकाळी पार्लरमध्ये जाऊन तिला हवे तेवढ्या उंचीपर्यंत केस तिने कापायला सांगितले...एक एक बट कापताना आरशात ती स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघत होती. लग्न झाल्यापासून अंबाडा घालताना केसांच्या प्रत्येक पिळासोबत ती तिची इच्छा, अपेक्षा,स्वप्न यांनाच पीळ घालत होती...अंबाडाच्या घट्ट गाठीसोबत तिच्या शिक्षणाची इच्छा, नोकरीच स्वप्न,इतकंच काय तर मनमोकळं जगणं आणि हसणं सुद्धा करकचून आवळत होती...इतकं करकचून की ते पुन्हा मोकळे होऊच नयेत . आज त्यांना आणि स्वतःला श्वास घेण्याची मुभा तिने दिली होती.

आरशात स्वतःस न्याहाळून गोड हसत होती.

     तितक्यात तिचा फोन वाजला...कबीरच नाव फोनवर दिसताच क्षणभर ती घाबरली, गोंधळली...हात पाय थरथर कापायला लागले...क्षणभरात स्वतःला सावरून तिने फोन उचलला. अर्ध्या तासात कबीरने तिला भेटायला बोलवलं होतं. नेहमी सारखा याचा राग गेला असावा आणि पुन्हा तीच लाडी गोडी लावण्यासाठी भेटणार आता असा विचार करून सानु स्वतःशीच हसली. खरंतर आतून जरा घाबरली असली तरी भेटायला जाताना गमावलेला विश्वास सोबत घेऊन निघाली होती.

  कबीर अर्धा तास वाट बघत बसला होता...त्याच्या कोणत्याही फोनला उत्तर न देता सानु डायरेक्ट भेटायच्या ठिकाणीच त्याला दिसली. गुलाबी रंगाच्या ड्रेसवर मॅचिंग कानातले घालून..नाजूक ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावून..नुकतेच कापलेले केस मोकळे सोडून ती स्मित हास्य सोबत घेऊन कबीरच्या नजरेला नजर देत पूर्ण आत्मविश्वासाने मुक्तपणे त्याच्या दिशेने चालत येत होती. मनात आणि ओठांवर एकच वाक्य होतं

     

    "ये बाल नहीं है, ये मैं हु

क्योकीं मेरे बाल मेरी जान है"


   तिचं आत्मविश्वासी रूप पाहून कबीरला धक्का बसला होता. माझ्यासमोर मानही वर करून न बघणारी मुलगी आज न घाबरत, न डगमगता, केस मोकळे सोडून समोर येते म्हणजे काय??? नुसत्या या भावनेनेच कबीर चरफडला..त्याचा राग अनावर झाला होता पण आता ताणून फायदा नाही..इथे गोड बोलू मग घरी आली की आहेच आपल्या हातात सगळं असा विचार करून तो नेहमीप्रमाणे सानुशी फार प्रेमाने हळवं बोलू लागला. खूप छान दिसतेस केस मोकळे सोडून असं कौतुकही केलं...पण सानू त्याला पुरतं ओळखून होती. यावेळी याच्या गोड बोलण्यात फसायचं नाही हे तिने मनोमन ठरवलं होतं. त्याच्याकडे हसत बघत ती म्हणाली, " मी परत यावी यासाठी तुम्ही हे प्रयत्न करताय मला माहीत आहे. मलाही हे नातं तोडायचं नाहीये...मलाही संसार हवाय आणि तो सुखी हवाय ज्यात आपण दोघे एकमेकांसोबत समाधानी असू, पूरक असू..कोणी एकच हक्क गाजवतोय आणि दुसरा त्या नात्याखाली दबला जातोय असा संसार नको मला. स्पष्टच बोलते..जितका आदर मी तुमचा करते तितका तुम्हीही आपल्या नात्याचा आणि माझाही आदर करावा. मला नोकरी करायची इच्छा आहे, स्वावलंबी व्हायच आहे आणि हे तुम्ही मोठ्या मनाने मान्य करावं.. मी काय घालावं, कसं दिसावं, काय घालू नये किंवा काय करू नये, केस मोकळे सोडावे की बांधून ठेवावे, कोणाशी बोलावं, नाही बोलावं..असे बरेच महत्वाचे निर्णय माझ्याबद्दल, माझ्या आयुष्याबद्दल घेण्याचं स्वातंत्र्य मला आहे आणि मी ते घेणार..माझ्यात स्वातंत्र्याचा तुम्ही स्वीकार करावा जसं मी तुमचं स्वातंत्र्य जपते. नात्याला बांधून ठेऊन नातं घुसमटत जे आपल्या बाबतीत झालंय.. माझं प्रेम आहे तुमच्यावर..माणूस म्हणून तुम्ही खूप चांगले आहेत माहितीये पण नवरा म्हणून माझ्या बाबतीत over possesive आहात..जे मला खूप त्रासदायक होतं. मला तुम्ही हवे आहेत, हे नातं हवंय आणि सोबत मी स्वतः हवी जशी आहे तशी. हे सगळं मान्य असेल मनापासून तर मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. विचार करून उत्तर द्या.

   कबीर सानुच हे वेगळं रूप बघत होता..राग येण्याऐवजी त्याला आश्चर्य वाटतं होतं.. सानू जितकी सुंदर तितकीच तडफदार आणि आत्मविश्वासु आहे हे त्याला प्रथमच कळलं. सुरुवातीला चिडलेला पण हळूहळू तीच बदललेलं रूप त्यांना आवडू लागलं. त्याचंही खूप प्रेम होतं तिच्यावर.. आपण ती ही माणूस आहे..आपण हक्क गाजवणारी वस्तू नाही हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं आणि म्हणतात ना प्रेम भल्याभल्यांना बदलायला भाग पाडत तस सानुच्या प्रेमाने कबीरला बदलायला मदत केली आणि कबीरने सानुच्या स्वातंत्र्यासहित तिला स्वीकारलं.


समाप्त

*******

      वाचकांनो सानुने तिचा निर्णय घेतला होता..पुढे जे होईल त्याचा सामना करायला ती आता खंबीर झाली होती. कथा आहे म्हणून शेवट गोड आलाच पण वास्तवात कितीतरी अशा सानू अजूनही लढतायत आपल्या स्वातंत्त्र्यासाठी, अस्तित्वासाठी. स्त्रीने स्वतः विचाराने मुक्त झाली की तिला कोणीही थांबवू शकत नाही हे या कथेतून स्पष्ट होतं.

  कथेचा लेखिकच्या वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही पण समाजातील काही स्त्रियांच्या वास्तव आयुष्याशी नक्कीच याचा संबंध आहे. बंधन केसांपासून पायापर्यंत स्त्रीवर लादलं जात होतं आणि आताही एकविसाव्या शतकात परिस्थिती अशीच आहे हे दुर्देव आहे पण आता स्त्रीनेच यातून मुक्त होणं गरजेचं आहे. मोकळं होणं आणि मुक्त होणं यात फरक आहे...परिस्थितीला कंटाळून स्वतःलाच संपवून कित्येकदा स्वतःला मोकळं केलं जातं पण परिस्थितीचा सामना करून,अन्यायाला विरोध करून,वाचा फोडून वरून सोन्याचा जरी वाटत असला तरी आतून गडद अंधार असलेला,रोज डंख मारून हळूहळू संपवत असलेल्या विषारी,विखारी पिंजऱ्यातून स्वतःचा आत्मविश्वास जागृत करत,'स्व' जपत स्वतःला मुक्त करणं गरजेचं आहे आणि 'स्त्री' ने मोकळं नाही तर मुक्त व्हावं. सानुनेही अन्याय सहन करण्यापेक्षा किंवा अन्यायाला कंटाळून स्वतःला संपवण्यापेक्षा स्वतःला मुक्त करणं स्वीकारलं. वास्तवातही मुक्त होता येतं.. प्रयत्न महत्वाचा

    कथा कशी वाटली नक्की सांगा. शेअर करायची असेल लेखिकेच्या नावासहितच करावी. लाईक,कमेंट शेअर करायला विसरू नका


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy