Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Shubham Kadam

Abstract


4.6  

Shubham Kadam

Abstract


अभिनेत्री

अभिनेत्री

3 mins 973 3 mins 973

संध्याकाळची वेळ होती.असे भासत होते की ,दूरवर पसरलेल्या त्या हिरव्यागार माळरानावरती जणू काही एक मोठी सोनेरी शाल पांघरलीये.ती इवली इवली गवताची पाते ,वाहणाऱ्या मंद वाऱ्यासोबत इकडे तिकडे डोलत होती. तो सुंदर नजारा आपल्या नजरेमध्ये साठवत,तिकडे एका झाड़ाखाली बसून,आम्रपाली शांत चित्ताने मावळत्या सूर्याकडे पाहत होती.सूर्य आणि धरणीच्या विरहाचा तो क्षण पाहताना तिने नकळत डोळे मिटले आणि अश्रूचा एक थेंब तिच्या पापण्या ओल्या करत,हळूवार घरंगळत तिच्या गालावरती येऊन थांबला.तिने एका हाताने आपले गाल पुसले आणि उभी राहिली.त्या निरव शांततेत मनामध्ये विचारांचे काहूर माजणे साहजिकच होते.तेवढ्यात तिला एका बाजूने,तिच्यापासून थोड़सं दूर ,मेंढरांचा कळप जाताना दिसला.तिने पाहिले तर तिला ना कुणी मेंढ़पाळ दिसला नाही कुणी राखणदार.ती एक एक पाउल टाकत त्या मेंढरांच्या दिशेने निघाली.कुणीही सोबती नसताना तो कळप मात्र एकदम शिस्तबद्ध पद्धतीने पुढे जात होता.पण एक खोड़कर कोकरु मात्र आपली वाट चुकवत आम्रपालीच्या दिशेने धावत येत होते.कुणी ओळखीची व्यक्ती दिसली की जनावरं कशी धावतात,तसंच काहीतरी हे दृश्य होतं.त्याला आपल्याकड़े येताना पाहून तिला नवल वाटले,एक अनामिक ओढ़ तिला सुद्धा त्याच्या दिशेने खेचत होती.मग ती सुद्धा त्याच्या दिशेने धावू लागली.या भूमीवरती प्रत्येक जीवाशी आपलं काहीतरी नातं आहे याची अनूभूती तिला आज झाली होती.दोघेही एकमेकांच्या दिशेने धावत होते,जसे ते जवळ आले,आम्रपालीने गुड़घ्यावरती बसत अलगद त्याला आपल्या कुशीत घेतले.कुशीत घेताच ते कोकरु आपली मान तिच्या हातावरती घासत ओरडू लागले,जणू काही इतक्या दिवस भेटायला का आली नाहीस,अशी तक्रारच तो तिच्याकडे करत होता.तिने एकदा त्या कोकराकड़े पाहिले, किती निरागस डोळे होते त्याचे,मनात कसलाच स्वार्थ नाही,द्वेष नाही.त्याची ती लाडीव तक्रार ऐकून तिला हसू आले.म्हणून,ती त्याला गोंजारत गोंजारत त्याचा राग शांत करत होती.त्याला तसेच कुशीत घेऊन ती उठली आणि थोड़े पुढे जात त्या कळपासोबत चालू लागली.चालता चालता तिने एकदा चोहीकडे नजर फ़िरवली,केवढी शांतता होती आजूबाजूला,चहूबाजूंनी डोंगर वेढा असलेला तो परिसर किती विराट होता आणि त्याच्या जोडीला ते एकदम निर्मनुष्यl. वातावरण,पण तिला अजिबात भीती वाटत नव्हती.भीती कशी वाटणार?हा परिसर तिच्या ओळखीचाच तर होता.चालता चालता तिला विचार आला ती इथे कशी आली आणि आता ती कुठे जात आहे?विचारात मग्न असताना अचानक तो कळप एका ठिकाणी येऊन थांबला.ती भानावर आली आणि समोर पाहते तर काय?ती एका टेकड़ीवरती उभी होती आणि सगळीकडे लख्ख चंद्रप्रकाश पडला होता.तिच्या कानावरती झूळझूळ पाण्याचा आवाज पडत होता.तिने खाली वाकून पाहिले तर खाली एक नदी वाहत होती.चंद्रप्रकाशात टेकड़ीवरती उभी आम्रपाली आणि खाली संथ गतीने वाहत जाणारी नदी,ते दृश्यचं एकदम निराळे होते.तिच्या मनातील सुप्त इच्छेने हळूच उगम घेतला;या चांदनी निशेत नदीमध्ये उड़ी घेऊन पोहोण्याचा आनंद काही औरच.तिने उड़ी घ्यायची ठरवली.पण आपल्याला काही झाले तर?ती दोन पाऊले मागे सरकली.

पण मग तिला जाणीव झाली,भीती कसली?या जगामध्ये आपल्याला काय होणार?आपल्या शिवाय इथे दूसरे कुणी राहतं तरी का?आणि या अगोदर सुद्धा आपण समुद्राच्या तळाशी जाऊन आलोच आहोत की,दूरवर पसरलेल्या वाळवंटामध्ये क्षितिजापर्यंत चालत गेलोच आहोत की,आकाशात उडणाऱ्या असंख्य थव्यांसोबत आपण कितीतरी मैल अशीच कापली आहेत.तर मग ही गोष्ट काय अवघड आहे असा विचार करत तिने एकदा मागे पाहिले;ते कोकरु तिथेच होते, दोघांनीही एक क्षण एकमेकांकडे पाहिले,आणि त्याने सुद्धा आपल्या नजरेने होकार दिला,तेव्हा तिला आठवले की तिच्या प्रत्येक सफरी मध्ये तो नेहमी सोबती होता.कधी समुद्रातील मासा बनून तर कधी ऊंट बनून तर कधी पक्षी बनून तर कधी एखादं झाड़ बनून आणि आता या कोकराच्या रूपात.त्याचं पदार्थ रूप कधी तिने पाहिले नव्हतं पण त्याच्या सोबतच नातं ती कोणत्याही रूपात ओळखत असे. तिच्या मनात आता आत्मविश्वासाची किरणें एकदम प्रखर होत होती.नजरेत एक प्रकारची स्तब्धता होती,पायामध्ये शक्ती संचारत होती,तिने सुरुवात घेतली आणि धावत जाऊन टेकडीच्या कड्यावरुन एक ऊंच झेप घेतली.सर्व बंधने तोडून ती मुक्त झाली होती.तिची ती झेप चंद्रप्राप्तीसाठी घेतलेली झेप भासत होती........

      ........"अमू,अगं बाहेर ये गं खोलीच्या,तुझ्यासाठी गरम गरम शिरा बनवलाय,खाऊन घे तो."...."आले गं आई थांब, आवरतच होते".

    आम्रपाली ने पेन बाजूला ठेवला,समोर ठेवलेली पाने व्यवस्थीत गोळा करून,टेबलाच्या एका कोपऱ्यात ठेवली.

आजची सफर पूरे म्हणत, आपले पाय एक एक करून तीने पेडल वरती ठेवले,मग व्हीलचेयर मागे घेतली,आपल्या दोन्ही हातांनी व्हीलचेयरची चाके ढकलत ती किचनच्या दिशेने गेली.ती जाताच खिड़कीमधून हळूच एक वाऱ्याची झूळूूक़ आली,त्याच्यामुळे तिने आताच लिहीलेली पाने फड़फड़ करत होती.वारा थांबला तशी पाने शांत झाली,कितीतरी पानांचा तो गट्ठा,ज्यात कितीतरी कथानके होती,कितीतरी विश्वसफरीचे किस्से होते, मानवी मनातील कितीतरी अस्पृश्य कप्पे होते,एखाद्या व्यक्तीच्या आत्मविश्वास, ईच्छाशक्तीचा तो एक खजिना होता आणि त्याच शीर्षक होते,"अभिनेत्री" आणि त्याची राखणदार होती ,आयुष्यभर एकच पात्र का करायचं या विचाराने रोज आपल्या कल्पनाविश्वात नवीन कथानक जगणारी एक उत्तम "अभिनेत्री".


Rate this content
Log in

More marathi story from Shubham Kadam

Similar marathi story from Abstract