Nitin Pradhan

Horror

3.8  

Nitin Pradhan

Horror

नरभक्षक

नरभक्षक

11 mins
1.4K


साहेब बाहेर सरपंच आलेत ते आपल्याला भेटू इच्छितात. हवालदार राणेंनी आत डोकावत सांगितले. अमरच्या कपाळावर नापसंतीची आठी उमटली. खर तर आज त्याला कोणाचाही डिस्टबर्न्स नको होता. आज 16 ऑगस्ट.......इन्सपेक्टर सुर्याजीराव जाधवांना पंचतत्वात विलीन होऊन बरोबर एक महिना झाला होता. तरी देखील अमर आतापर्यंत या प्रकरणात तसूभर देखील प्रगती करू शकला नव्हता.

        तशी त्याने कोणतीही कसूर शिल्लक ठेवली नव्हती. गावातील सर्वंच सराईत गुंड या क्षणी तुरुंगात होते. दारूचे चारही अड्डे उध्वस्त झाले होते. चार अट्टल शिकाऱ्यांचा समावेश असलेले शोधपथक दररोज चंदनाच्या जंगलात फिरत होते. पण अमरच्या कोणत्याही प्रयत्नांना यश येत नव्हते.

        इन्सपेक्टर अमर चौहान मलंगगड पोलिस स्टेशनमध्ये स्वर्गवासी पोलीस इन्सपेक्टर सुर्याजीराव जाधवांच्या जागी नियुक्त झाले होते.

        मलंगगड........कोकण किनारपट्टीवरील अतोनात निसर्गसौंदर्याने नटलेले एक खेडेवजा शहर. मलंगगडची दोन वैशिष्ट्ये - 

        एक म्हणजे सायोनारा - - - - - नायगाराच्या खालोखाल जगातील नंबर दोनचा धबधबा, सुमारे पाच हजार फूट उंचीवरून खाली कोसळणारे निसर्गाचे रौद्रभीषण स्वरूप पाहण्यासाठी येणाऱ्या जगभराच्या पर्यटकांनी मलंगगड कायम गजबजलेल असे.

      आणि मलंगगडचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कोकणात सहसा न आढळणारे चंदनाचे जंगल. सायोनारा धबधब्याला लागूनच जवळ जवळ बाराशे एकराचे चंदनाचे जंगलच्या जंगल मलंगगडकरांच्या मालकीचे होते. भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या चंदनांपैकी जवळ जवळ वीस टक्के चंदन एकटे मलंगगड पुरवत होते. मलंगगडची सध्याची सुबत्ता या चंदनाच्या जंगलापासूनच प्राप्त झाली होती.

        अशा या नितांतसुंदर मलंगगडला जणू कोणाचीतरी नजर लागली असावी. हसत्या खेळत्या मलंगगडावर सध्या कसलीतरी भीषण अवकळा पसरली होती. संपूर्ण मलंगगडावर सध्या मृत्यूचे अनामिक सावट पसरले होते.

       पर्यटकांच्या रहदारीने जो धबधबा कायम गजबजलेला असायचा तो सध्या एकाकी निर्जन झाला होत.   

कारण उघड होते.गेल्या दोन महिन्यांपासून मलंगगड मध्ये काहीतरी भयानक अनैसर्गिक प्रकार चालू होते.

       मलंगगडवासीयांना सर्वात पहिला धक्का 7 जूनला बसला होता. त्या दिवशी अमावस्या होती. संध्याकाळपासून पाऊस भरून आला होता. विजांचा कडकडाट चालू होता. ढगांचा गडगडाट वातावरणातील भीषणता वाढवीत होता. पावसाच्या भीतीने सर्व मलंगगडकर आपाआपली कामे पटापट आटोपून गुपचूप घरात बसले होते.

       पण बावीस वर्षाच्या मंदाकिनीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. शहरातून नुकतीच ग्रॅज्युएट होऊन आलेल्या मंदाकिनीला सायोनारा धबधब्याची विलक्षण ओढ होती. गावाला आला की तासंतास धबधब्यावर जावून धबधब्याचे निरीक्षण करणं हा तिचा आवडता छंद होता. आता देखील तिला विजांच्या कडकडाटात सायोनारा कसा दिसतो ते पहायचे होते. पण या वेळेस धबधब्यावर जायला तिला कोणीही परवानगी दिली नसती.

        "आई ज्योत्स्नाकडे जावून येते ग" असे आईला सांगून ती सटकली.

        तिच्या जिवलग मैत्रीणीला ज्योत्स्नाला तीने धबधब्यावर यायचा खूप आग्रह केला. पण विजांच्या कडकडाटातून धबधब्यावर येण्यास ज्योत्स्ना ने सपशेल नकार दिला. आणि मंदाकिनी एकटीच धबधब्यावर गेली.---  - - - - जित्या जागत्या मंदाकिनीचे ज्योत्स्नाला झालेले ते शेवटचे दर्शन.

    रात्री बराच उशीर झाला तरी मंदाकिनी घरी आली नाही म्हणून तिचे वडील तिला शोधण्यासाठी ज्योत्स्नाच्या घरी आले. अशा अवेळी मंदाकिनी धबधब्याकडे गेली असल्याचे ऐकून ते पार हादरलेच. 

  ताबडतोब शेजारपाजारच्या चार पाच गावकऱ्यांना बरोबर घेऊन ते धबधब्यावर मंदाकिनीला शोधायला आले. त्यांनी बरीच शोधा शोध केली पण व्यर्थ, मंदाकिनीचा ठाव ठिकाणा लागला नाही. आणि येवढ्या अपरात्री चंदनाच्या जंगलात घुसणे धोक्याचे होते.

       दुसऱ्यादिवशी सकाळी दाट जंगलात खूप आतमध्ये मंदाकिनीचा मृतदेह अर्धवट फाडलेल्या अवस्थेत आढळला.

मंदाकिनीची कुठल्यातरी प्राण्याशी झटापट झालेली दिसत होती.

      धबधब्यापासून आतपर्यंत कुठल्यातरी प्राण्याच्या पंजाच्या खुणा होत्या.

       तपासाअंती त्या वाघाच्या पंजाच्या असल्याचे आढळून आले. अर्थ अत्यंत साफ होता. मलंगगड मध्ये नरभक्षक वाघाचे आगमन झाले होते. 

    इन्स्पेक्टर सुर्याजीराव जाधवांनी मलंगगडच्या जंगलाचा कोपरा नी कोपरा शोधून काढला पण त्यांना वाघाचे नख देखील दृष्टीला पडले नाही.

       मलंगगडच्या जंगलातील वाघ वीस - पंचवीस वर्षापुर्वीच नाम:शेष झाले ही वस्तू स्थिती होती. मलंगगडच्या रहिवाशांनी व्यापारी तत्वावर चंदनाची लागवड सुरू केली. त्यावेळेसच त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून बऱ्याचशा वाघांची शिकार केली होती. त्याशिवाय बहुसंख्य वाघ प्राणी संग्रहालयाला भेट दिले होते. "मलंगगडातील शेवटचा वाघ म्या मारला त्यावेळेस म्या फकस्त सतरा वर्साचा व्हतु बघा !" अशी फुशारकी मारत गावचे सरपंच हणमंतराव पाटील कायम आपल्या कल्लेदार मिशांना पीळ देत गावभर उंडारत असत. 

      मग हा नरभक्षक वाघ आला कुठून ?

        मंदाकिनीच्या मृत्यूचे गूढ हे अद्याप उलगडले नसताना 18 जुलैला मलंगगड पुन्हा एकदा हादरले.......         सुधा गोखले .....वय फक्त 17 वर्षे, गावातल्या गोखले मास्तरांची मुलगी. दिसायला अत्यंत सुंदर, गावातल्या ज्युनिअर कॉलेजातील मुलांनी स्वयंस्फूर्तीने घोषित केलेली "कॉलेज क्वीन" .

        पण मुलांनी हिला दुसरे नाव बहाल केले होते ते म्हणजे "कडक बिजली" नावाप्रमाणे तेज, अत्यंत धाडसी.

        एकदा ती अमावस्येच्या रात्री पैजेवर स्मशानात झोपून आली होती. तर अशी ही सुधा, तिला कोणीतरी सांगितले "मंदाकिनी भूत झाली आहे. दररोज सायंकाळी सात वाजता ती धबधब्यावर दिसते" . झालं भूत कसं असतं ते बघण्यासाठी ती एकटीच धबधब्यावर गेली तीपुन्हा दिसलीच नाही.

        धबधब्याजवळील मातीत फक्त वाघाच्या पंजाचे ठसे आढळून आले.

        मंदाकिनीचे प्रेत तरी मिळाले होते पण सुधाचे प्रेत देखील मिळाले नाही. ती जशी काही हवेतच गायब झाली.

        इन्स्पेक्टर सुर्याजीरावांनी जंग जंग पछाडले पण त्यांना नरभक्षक वाघाचा केसदेखील सापडला नाही.

         पण मलंगगडचे दुर्दैव येवढ्यारच संपले नव्हते.

         मलंगगडच्या गावाबाहेर कष्टकरी लाकुडफोड्या मजुरांची वस्ती होती. चंदनाची लाकडे फोडण्यासाठी लांबवरून आलेल्या कष्टकरी मजुरांच्या    जवळ जवळ वीस-पंचवीस झोपड्या तेथे वसलेल्या होत्या.                         

       त्यातच एक झोपडी होती, दादू चौगुलेची . दादू जेवढा काळाकुट्ट तेवढीच त्याची पोर जान्हवी गोरीपान होती. बायाबापड्या तिला कौतुकाने म्हणायच्या बये कुठच्या तरी राजाच्या पोटीस जलमाला यायचीस, चुकून दादूच्या पोटी जलमलीस.

       सोळा सतरा वर्षाच्या जान्हवीवर लाईन मारायला समस्त मलंगगडामधल्या टपोरी पोरांच्या त्या झोपडपट्टीत चकरा चालू असायच्या, 

      पंधरा ऑगस्ट - स्वातंत्र्यदिन, त्या दिवशी जान्हवी पहाटे पाच वाजता उठली. तिला कॉलेजमध्ये झेंडावंदनसाठी लवकर जायचं होतं. आंघोळीसाठी विहीरीचं पाणी काढायला म्हणून जवळच्याच विहीरीवर गेली. येवढ्या पहाटे विहीरीवर चिटपाखरू देखील नव्हतं पाणी भरायला गेलेल्या जान्हवीची करुण किंकाळी ऐकून तिचा बाप धावत आला. 

        त्याला फक्त जंगलात अदृश्य होणारा वाघ पाठमोरा दिसला.

        थोड्या वेळाने इन्स्पेक्टर सुर्याजीराव आणि समस्त गावकरी जंगलात घुसले पण वाघ किंवा जान्हवी कोणाचाही थांग लागला नाही.

        आता मात्र मलंगगड चांगलेच हादरले. दिवसा ढवळ्या देखील गावकऱ्यांनी धबधब्यावर फिरकणे बंद केले.

        चंदनाच्या जंगलातील वृक्षतोड बंद झाली. जंगल सुने पडले. आणि मलंगगडवर मृत्यूची भयाण अवकळा पसरली.

        या सर्व प्रकरणाचा तपास इन्स्पेक्टर जाधव कसोशीने करत होते पण त्यात त्यांना यश येत नव्हते.

        इन्स्पेक्टर सुर्याजीराव हे अत्यंत निधड्या छातीचे व्यक्तीमत्व होते. भीती हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ते रात्री दोन - अडीच वाजता देखील गावातून गस्त घालीत. रात्री बारा वाजता देखील एकटेच धबधब्यावर जाऊन येत. वाघाला ठार मारण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली होती.

    सोळा आॅगस्ट या दिवशी  

रविवार होता. सुर्याजीराव रात्री दीड वाजता नेहमीप्रमाणे गस्त घालायला बाहेर पडले ते परत आलेच नाहीत.

       मलंगगडला लागून असलेल्या डांबरी सडकेवरच सुर्याजीराव मृतावस्थेत आढळले. त्यांची मोटारसायकल अस्ताव्यस्तपणे पडली होती.

       पोस्टमार्टेमच्या रिपोर्टनुसार रोडवरील खड्ड्यातून मोटारसायकल अचानकपणे उडून सुर्याजीराव लांब फेकले गेले असावेत. आणि दगडावर डोके आपटून कवटी तडकल्यामुळे ते जागीच खलास झाले असावेत.

       एक मृत्यू....दोन बेपत्ता आणि आता हा तिसरा अपघात तो सुद्धा सुर्याजीरावांसारख्या कार्यकुशल इन्स्पेक्टरचा.

       कराल कालपुरुषाची वक्र नजर मलंगगडाकडे वळली होती. एका पाठोपाठ एक बळींचे चक्र चालूच होते.

        आणि या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी एका खास माणसाची सरकारकडून नियुक्ती करण्यात आली होती.

        त्याचं नाव होतं इन्स्पेक्टर अमर चौहान. इन्स्पेक्टर अमर हा जेमतेम सव्वीस वर्षाचा बलदंड तरुण होता. या प्रकरणी त्याची नियुक्ती करण्यामागे एक खास कारण होते.

        यस.... इन्स्पेक्टर अमर चौहान शार्प शूटर होता. जवळ जवळ एक किलोमीटर अंतरावरून धावत्या सावजाला तो सहज टपत शकत असे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने नेमबाजीत अनेक पदके मिळवली होती. नरभक्षक वाघाला ठार करण्यासाठी त्याच्याइतका लायक मनुष्य आख्या पोलीस खात्यात शोधून देखील सापडला नसता.

       पण अमर चौहानने गेल्या महिनाभर शर्थीचा प्रयत्न करून देखील त्याला कोणताही पुरावा मिळाला नव्हता.

       त्या दोन तरुणी जणू हवेत विरल्या होत्या. नरभक्षक वाघ देखील गेला महिनाभर कुठेतरी गायब झाला होता.

       आणि गावच्या सरपंचांनी तर रोज पोलीस स्टेशनला फेऱ्या मारून अमरचे डोके पिकवले होते.

       सरपंचांचे म्हणणे त्याला कळत होते. त्यांची अगतिकता त्याला समजत होती. पण त्याचा देखील इलाज नव्हता.

      आणि आज सोळा सप्टेंबर होती. सकाळीच सुर्याजीरावच्या घरुन त्याचे मासिक श्राद्ध आटोपून अमर चौहान पोलिस स्टेशनला आला. आज कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणाचा तपास लावण्याची त्याने जिद्दच बांधली होती.

      सकाळपासून सुर्याजीरावांची फाईल उघडून तो बसला होता. आज त्याला कोणाचाही डिस्टर्बन्स नको होता. आणि म्हणूनच आज त्याने सरपंचांची भेट घेणे देखील नाकारले होते.

       आता रात्रीचे जवळजवळ बारा वाजले होते.स्टेशन मधले दोन्ही हवालदार गावात गस्त घालायला गेले होते. अजूनही अमरच्या टेबलवर सुर्याजीरावांची फाईल होती. सकाळपासून डोके खुपसून देखील अजूनही त्याला कोणताही धागा सापडत नव्हता.

      सुर्याजीराव जाधव इन्स्पेक्टर ट्रेनिंगच्या वेळेस त्याचा रूमपार्टनर होता. जवळजवळ पूर्ण वर्ष त्यांनी एकत्र काढले होते. आणि त्या कालावधीत त्याला सुर्याजीचा एक खास पैलू समजला होता. मोटारसायकलवर त्याचा कमालीचा ताबा होता. त्यामुळेच सुर्याजीचा मोटारसायकल अ‍ॅक्सीडेंट होतो ही गोष्ट मनाला कुठेतरी खटकत होती.

       टेबलवर डोके टेकून विचार करता करता मध्येच कधीतरी त्याला झोप लागली.

    आणि अचानक - - - केबीनमधील वातावरण बर्फासारखे गार झाल्याचे त्याला जाणवले. थंडीने शहारतच तो जागा झाला. त्याने सहजच घड्याळाकडे पाहिले. घड्याळात रात्रीचे अडीच वाजले होते. बरोबर एक महिन्यापूर्वी सूर्याजी याचवेळी मृत्युमुखी पडला असेल या विचाराने तो अधिकच शहारला.

       बाहेर पावसाची पिरपिर चालूच होती. डबक्यातील बेडकांचे डरॉव - डरॉव चालू होते. जंगलातून मध्येच अभद्र कोल्हेकुई ऐकू येत होती. रात्रीच्या वेळेस धबधब्याच्या आवाज वातावरणातील भिषणता वाढवत होता आणि त्याचवेळी 

      - - - - -  बाहेरच्या   काॅरिडाॅरमधून कोणाच्यातरी बुटांचा खाड्....खाड् आवाज ऐकू येऊ लागला.

        इन्स्पेक्टर अमर चौहान एकदम सतर्क झाला. त्याचा हात रिव्हॉल्व्हरच्या होस्टरकडे गेला.

        येवढ्यात सोसाट्याचा वाऱ्याचा झोत आला. अमर चौहानच्या केबीनचा दरवाजा खाडकन उघडला गेला आणि त्या व्यक्तीने अमरच्या केबीनमध्ये प्रवेश केला.

       साडेसहा फुटाची ताडमाड उंची, उंचीला शोभेल असेच बलदंड शरीर आणि 

ओठावर पिळदार मिशा. अमरने त्या व्यक्तीला पहाता क्षणीच ओळखले आणि तो बर्फासारखा थंडगार झाला.

--- - - - तो इन्स्पेक्टर सुर्याजीराव जाधव होता.

      आणि इन्स्पेक्टर सुर्याजीराव जाधवांच्या मृत देहावर स्वतः अमरने अग्नीसंस्कार केले होते.

       तो डोळे विस्फारून त्या व्यक्तीकडे पाहू लागला.

       त्या व्यक्तीने खिशातून एक डायरी काढली ती अमरच्या टेबलवर टाकली आणि अमरला सांगितले. यातून तुला काहीतरी मार्ग सापडेल, ही माझी पर्सनल डायरी आहे. 

        आणि इन्स्पेक्टर सुर्याजीराव जसे आले तसे निघून गेले अमर भानावर आला. खोलीतले वातावरण पुन्हा पूर्वीसारखे नॉर्मल झाले होते. खोलीत कोणीही नव्हते. आणि अमरच्या टेबलवर एक लाल रंगाची डायरी पडली होती.

      डायरीवर नाव होतं इन्स्पेक्टर सुर्याजीराव जाधव, मलंगगड पोलीस स्टेशन.

      डायरीमध्ये काही ठराविक तारखांच्या नोंदी होत्या.

       8 जून 1992....का कुणास ठाऊक मंदाकीनीचे प्रेत वाघाने फाडल्यासारखे वाटत नाही. तिच्या अंगावरचे ओरखडे शक्तीशाली वाघाचे वाटत नाहीत. वाघाच्या पंजाच्या मातीत उमटलेल्या खुणा वाघाच्या पंजाच्या आहेत हे मनाला पटत नाही. सव्वाशे किलो वजनी वाघाच्या पंजाच्या खुणा खुप खोलवर उठायला पाहिजेत. पण या खुणा तेवढ्या वजनदार प्राण्याच्या वाटत नाहीत. काहीतरी पाणी मुरतय खास.....

       8 जुलै 1992....नरभक्षक वाघ गेल्या महिनाभरात फिरकला नाही. रक्ताची चटक लागलेला वाघ दर चार दिवसांनी भक्ष्य शोधायला आला पाहिजे....मग तो महिनाभर कुठे गेला ?

      18 जुलै 1992  , वाघाचे पंजे सरपंचाच्या वाड्यापर्यंत आले होते. त्या वाड्यात सध्या कोणीही राहात नाही. वाघ गेला कुठे ?

      19 जुलै 1992..... सहज म्हणून सरपंचाच्या गावातल्या वाड्यावर चक्कर टाकली. सरपंचाच्या दिवाणखान्यातल्या भिंतीवरील वाघाची अखंड कातडी न्याहाळणं हा माझा आवडीचा छंद. पण आज त्या दोन कातड्यापैकी एक कातड गायब होतं. सरपंचाला त्याबद्दल विचारलं असता सरपंच गडबडलेच. मित्राचं कसलतरी व्रत चालू आहे. त्याला पूजेसाठी आसन म्हणून कातडं दिल्याचे सांगितले.

       15 ऑगस्ट 1992.....पुन्हा एकवार वाघाच्या पंज्याचे ठसे सरपंचाच्या वाड्याकडे वळले होते. आश्चर्य म्हणजे दिवाणखान्यात वाघाची दोन्ही कातडी लावलेली होती.

      कातडं चाचपुन बघितलं. माझा अंदाज खरा ठरला. कातड पावसात भिजल्यासारख वाटत होत. कातड भिजल कसं ? बाहेर धुवांधार पाऊस चालू होता. कातडं पावसात कोणी नेलं असाव ?

       'दाल मे कुछ काला है जरुर' अजून मनामध्ये एक शंका येतेय '' सालं या वाघाला कोवळ्या तरुणीच का लागतायत "? वाड्यावर सरपंचाजवळ काही बोललो असतो तर त्यांना डाऊट आला असता. अजून थोडेसे पुरावे गोळा केले पाहिजेत आणि वॉरंट घेऊन वाड्यावर गेलं पाहिजे. वॉरंटच्या सहाय्याने जेलमध्ये डांबला की बरोबर बोलेल भडवा.

       सुर्याजीरावांची डायरी 15 ऑगस्ट 92 पर्यंत लिहिलेली होती.....16 ऑगस्ट 1992 ला सुर्याजीरावांचा मृत्यू झाला होता. सुर्याजीरावांचा खून झाला होता ? की अपघात ? 

       अमरचे डोके भणाणलेच. पिसाटल्यासारखा तो उठला होस्टरमधले रिव्हॉल्व्हर फुल लोड केले. मोटरसायकल स्टार्ट केली आणि तडक पाटलाच्या वाड्यावर निघाला. त्यावेळेस पहाटेचे तीन वाजले होते. सरपंचाला लाथांनी तुडवतच पोलीस स्टेशनला आणायचा त्याने निश्चय केला होता.

       धाडधाड करत त्याने मोटरसायकल थेट सरपंचाच्या वाड्या समोर उभी केली.

       प्रवेशद्वाराजवळील रखवालदाराच्या पेकाटात लाथ घालूनच त्याने आत प्रवेश केला. सरपंच घरात नव्हते.

       रात्री साडे तीन वाजता सरपंच कुठे गेलाय मरायला ? अमर चौहानचा बुलंद आवाज घरात घुमला. कोणीही प्रत्युत्तर दिले नाही. अमरने सहज दिवाणखान्यातील भिंतीकडे पाहिले दिवाणखान्याच्या भिंतीवर वाघाचे एकच कातडे लोंबत होते. दुसऱ्या कातड्याची जागा रिकामी होती. याचा अर्थ साफ होता.

       वाघ आपली शिकार शोधायला भटकत होता. अमरने घड्याळाकडे नजर टाकली. पहाटेचे चार वाजले होते. वाघाची टेहळणी निश्चितच चालू असणार.

      सध्या गावच्या शाळेचे बांधकाम चालु होते. त्यासाठी बरेच लमाणी लोक आले होते. शाळेजवळच तकलादू तंबू उभारुन रहात होते. त्यांच्यात काही तरण्याताठ्या स्त्रिया देखील होत्या. वाघाची नजर त्यांच्याकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

       अमरने मोटरसायकल शाळेपासून बरीच लांब पार्क केली. तो मोटरसायकलवरून गेला असता तर मोटरसायकलच्या आवाजाने वाघ सावध झाला असता. काळोखातून लपत छपत उड्या मारीत अमर शाळेच्या दिशेने सरकला आणि....

       बहि:र्दशेला गेलेल्या लमाणी बाईची आर्त किंकाळी त्याला ऐकू आली. आणि त्या दिशेने अमरने बेफाम सूर मारला. वातावरणात किंकाळ्यांवर किंकाळ्या घुमत होत्या. त्या दिशेने अमरने धाव घेतली. 

       येवढ्यात त्याच्या उजव्या कानाच्या बाजूला काहीतरी चमकून गेल्यासारखे वाटले. अमरने ओळखले कोणीतरी पाठीमागून सुरा फेकला होता. पण पाठीमागच्या सुऱ्यापेक्षा पुढे दिसणारे दृश्य महत्वाचे होते.

        अमरपासून पाचशे मिटर्स अंतरावर एक वाघ वेगाने पळत होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा वाघ चक्क दोन पायांवर पळत होता. त्याच्या हातात एक तरुणी होती आणि ती किंकाळ्या मारत होती.

       हे दृश्य पाहून पिसाळलेल्या अमरने मागचा पुढचा काहीही विचार न करता बेछूटपणे गोळी झाडली. 

       यस.....इन्स्पेक्टर अमर चौहान शार्प शूटर होता. गोळी वाघाच्या तंगडीत घुसली आणि वाघ खाली कोसळला. वाघाला जायबंदी केल्यावर अमर गर्रकन मागे वळला. काहीतरी हालचाल जाणवली होती.

       पाठीमागून पाच यमदूत हातात तलवारी घेऊन अमरला मारण्यासाठी येत होते. पण अमरला चिंता नव्हती. अमरच्या हातात पिस्तुल होते. त्याच्या पाच गोळ्या शिल्लक होत्या आणि त्यातील एकही गोळी चुकणार नव्हती. दुसऱ्याच क्षणी ते पाचही गुंड खाली कोसळले.

       त्या सकाळी मलंगगडच्या गावकऱ्यांनी एक वेगळेच दृश्य बघितले.

       शाळेपासून ते पोलिसस्टेशनपर्यंत पूर्ण रस्ताभर अमर त्या वाघाला कमरेच्या पट्ट्याने आणि बुटांनी अक्षरशः तुडवत होता. आणि वाघ चक्क माणसासारखा ओरडत होता.

       गावकऱ्यांचे लाडके सरपंच वाघाच्या कातडीतील नरभक्षक बनले होते.

      पण त्यांनी असे का केले ?

      त्याला दोन कारणे होती.

      त्यांनी मुलींना फसवून देहविक्रयास लावणाऱ्या मुंबईच्या दलालांशी संपर्क साधला होता.

एका कोवळ्या तरुणी पाठीमागे त्यांना नेट पंधरा लाख रुपये मिळणार होते....

       आणि दुसरी गोष्ट अशी की चंदनाच्या तस्करीमध्ये करोडो रुपये कमविण्याची त्यांना हाव सुटली होती. पण चंदनाच्या जंगलात अनेक वाटेकरी होते. म्हणून त्यांनी हा डाव खेळला होता.

       लोकांच्या मनात वाघाची आणि भुताटकीची दहशत बसली असती तर त्या जंगलाकडे कोणीही फिरकले नसतेआणि जंगल तोडीसाठी सरपंचाला मोकळे रान मिळाले असते.

       त्यांनी मंदाकिनीला मारले कारण वाघाने तरुणीला फाडल्याचे हुबेहुब चित्र त्यांना लोकांच्या डोळ्यासमोर उभे करायचे होते आणि त्या पायी मंदाकिनीचा जीव गेला होता.

       पण मुख्य प्रश्न असा होता की त्या तरुणी ताबडतोब गायब कुठे झाल्या ?

        सरपंचांनी त्यांची व्यवस्था करून ठेवली होती. सरपंचांच्या जंगलातल्या वाड्यातूनच एका गुप्त भुयारी मार्गाने जवळजवळ दोन कोसांवर एका गावात त्यांना नेण्यात येत असे. आणि तेथूनच त्यांची मुंबईला जायची सोय होती.

       पण सर्वात महत्वाचा प्रश्न होता की सुर्याजीरावांचा अपघात कसा झाला ?

       इन्स्पेक्टर सुर्याजीराव जाधवांना वाघाच्या कातड्याच्या संशय आल्याचे त्यांनी ओळखले होते हा इन्स्पेक्टर पुढेमागे आपल्याला पुढेमागे घातक ठरेल हे लक्षात येताच त्यांनी त्याचा काटा काढला होता.

        त्यादिवशी सुर्याजीराव रात्री 2 वाजता गस्त घालायला बाहेर पडले होते. सुर्याजीराव जाताना हळू जात पण येताना भन्नाट वेगाने मोटारसायकल पळवत हे पाटलांना माहित होते.

       त्यादिवशी त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुंना दोन खुंट्या ठोकून ठेवल्या होत्या. त्या खुंटयांना पातळ पण अत्यंत भरभक्कम तार बांधली होती. हा स्पॉट खड्ड्याजवळ होता.

        सुर्याजीराव भन्नाट वेगाने मोटारसायकलवरुन आले त्यांना मार्गातली तार दिसलीच नाही. मोटारसायकल त्या तारेला अडखळली आणि सुर्याजीराव दुसऱ्याच क्षणी भयानक वेगाने हवेत फेकले गेले. तार ताबडतोब काढली गेली. लोकांना वाटले. खड्डयातून गाडी उडाली आणि सुर्याजीरावांचा मृत्यु झाला.

      एकंदर या सर्व प्रकरणामागे सरपंच पाटलाचे सुपर डोके होते.

      इन्स्पेक्टर अमरला गोल्डमेडल मिळाले पण ते त्याने इन्स्पेक्टर सुर्याजीरावांच्या फोटोला अर्पण केले आणि तो ढसाढसा रडला.

       त्या रात्री अडीच वाजता सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर सुर्याजीरावांचा मृतात्मा जर पोलिस स्टेशनमध्ये आला नसता तर ?


(या कथेचे कथानक, पात्रे, स्थळ काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही, आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा)

© नितीन मनोहर प्रधान

रोहा रायगड 


Rate this content
Log in

More marathi story from Nitin Pradhan

Similar marathi story from Horror