Suresh Kulkarni

Horror

3.8  

Suresh Kulkarni

Horror

हाकामारी!

हाकामारी!

7 mins
12.1K


किर्रर्र अंधारात, भक्क उजेड मारत शंकर मास्तरची मोटरसायकल गावात घुसली तेव्हा, दोन्ही हात हलवत, गाडी समोर कोणीतरी त्याला थांबण्याचा इशारा करत होत. गप्पकन ब्रेक दाबून त्याने आपली फटफटी थांबवली. 

"मायला, लाईट गेली जणू! या खेड्यात एकदा का लाईट गेली की, माहेराला गेलेल्या बायकु सारखी लवकर येत नाही! " तो स्वतःशीच पुटपुटला. हेडलाईटच्या उजेडात समोरून वेडा वेताळ हातवारे करत उभा होता. गावात हा वेडा कसा आला कोणास ठाऊक? पण त्याच्या वेडाचा गावकऱ्यांना काही त्रास नव्हता, आणि भूत दयेपोटी कोणी त्याला हुसकावून लावले नव्हते. म्हणून तो येथेच स्थिरावला. याचे वास्तव्य कायम मसणवट्या जवळच्या पिंपळाखाली, म्हणून लोक याला 'वेताळ' म्हणून हाक मारत.

"काय रे वेताळा, कशाला आडवा आलास?" शंकरने खेसकून विचारले.

"तुला नेणार हाय!"

"अन कोण?"

खी- खी करून ते वेड अभद्र हसलं. शंकरने फारसे मनावर घेतले नाही. गावचा अनुभव असाच होता. मनाला काहीतरी वेडसर बोलून तो स्वतःच हसायचा. त्याने वेताळाला टाळून आपली मोटरसायकल पुढे दामटली. 

निवणुकीची मिटिंग होती म्हणून, शंकर पाड्यावरची शाळा आटोपून तालुक्याच्या गावी परस्पर गेल्याने, गावी परतायला आज उशीरच झाला होता. एरवी मावळतीला घरी येणाऱ्या शंकरला, आज मात्र रात्रीचे अकरा वाजले होते. घर कसले? एका जुन्या दगड़ी वाड्याच्या पडवीत, तो एकटाच भाड्याने राहायचा. नौकरीच्या पाड्यावर राहायची सोय नव्हती, म्हणून त्याने या जवळच्या गावात बिऱ्हाड थाटले होत. घरा समोर हेडलाईटच्या उजेडात शंकरला ओंजळभर बिड्याची थोटकं दिसली.

'दिगूअण्णा बराचवेळ बसून गेलेला दिसतोय.'

त्याचा घराच्या दाराबाहेर घडवलेल्या दगडाच्या चार पायऱ्या होत्या, चांगल्या मांडी घालून बसण्या सारख्या रुंद, आणि त्याला लागून एक, कललेला सिमेंटचा लाईटचा खांब होता. लाईट असताना म्हातारा दिगूअण्णा बिडीचा कट्टा घेऊन यायचा अन, शंकरला, ऐकलेल्या पंचक्रोशीतल्या घडामोडी सांगायचा. कोणाची बायको माहेरला गेली, कोणाची माहेरून येतच नाही, कुणाल घाटावर हडळ दिसली, शेजारच्या गावात हाकमारी फिरतीयय, असल्या बिन बुडाच्या गोष्टी तो त्याच्या कानावर घालत, चार-सहा बिड्याचा धूर काढून निघून जायचा. शंकरच्या गावात फारश्या ओळखी नव्हत्या, कश्या असणार? हा सकाळी सकाळी गावाबाहेर पडायचा आणि मावळतीला परतायचा. मग घरी स्टोव्ह वर भात - भाजीच्या मागे लागायचा. शुक्रवारी सकाळी गेला कि सोमवारी रात्रीच गावात यायचा. शनिवार -रविवार आईच्या मदतीला गावी जावं लागायचं.

त्याने झटका मारून मोटरसायकल मेन स्टॅण्डवर लावली. जडशीळ दाराच्या कडीला लावलेलं कुलूप उघडून तो आत गेला. सरावाने चापचत खुंटीवरला कंदील काढून लावला. थोडी वात वर करून उजेड वाढवला. बचकभर तांदूळ भाताच्या भांड्यात घातले, त्यात पाणी घालून, फरफऱ्या स्टोव्हवर ते भांडे चढवले. मग कोपऱ्यात असलेल्या आडोशाला जावून हातपाय धुतले. आता भाताचा हंडा शिजे पर्यंत वाट पहायची.

"मास्तर, हैती का घरात?"

एक अनोळखी हाळी शंकरच्या कानावर आली. त्याने उभ्या लोखंडी जाड काम्बी लावलेल्या बारक्या खिडकी वजा सवन्यातुन बाहेर पहिले. एक पांढर, धोतर, कोपरी अन पागोटं घातलेलं कोणी तरी उभं होत. हाती काठी पण असावी. अंधाराने फारसे स्पष्ट दिसत नव्हते. 

"कोण आहे?"

"आता नाव सांगून उपेग नाही. तुमी मला वळखत नाही, पर मी तुमासनी वळीखतो!" थरथरत्या आवाजावरून तो खेडूत वृद्ध असावा असा अंदाज त्याने केला.

" रात्रीच काय काम काढलात, काका?"

"काय नाय? जमत आसन तर घाटावर यायचं व्हतं. येता का इचारायला आल्तो."

गावाजवळून एक ओढा जात होता. त्याला गावकऱ्यांनी श्रमदानातून सुंदर घाट बांधून घेतला होता. त्याच्याच शेजार स्मशानाची जागा होती. कोणी तरी गचकल असणार.

"कोनाची मयत झाली आहे का?"

"व्हय, मयतीचंच काम हाय!

"कोण आहे?"

"हैत आपल्याच वस्तीतले."

"बाकी लोक जमलेत का?"

"समदे हेच इचारतायेत! कोन तर म्होरं निघाल्या बगर, अश्या आंदारात कोण येणार? अश्या कामाला येन पुन्याच काम असत म्हणत्यात. बगा जमत आसन तर म्या थांबतो, तुमच्या सोबतीला. नसता म्होरल्या घरी आवाज देतो."

एखाद्याला शेवटचा निरोप देणे पुण्याचे काम असत असे शंकरचा आजा पण म्हणायचा. शंकरने क्षणभर विचार केला. आणि जाण्याचा विचार पक्का केला.

"काका, पाच मिनिट थांबा. थोडा भात खाऊन घेतो मग निघू. तुमचं जेवण झालंय का? नसलं तर या, दार उघडतो."

"नका. म्या थांबतो भाहीरच. दोन घास खाऊन घ्या तुमी. तीत किती वखत लागतूया ठाव नाई! पूना कदी मिळालं खाया कोनास ठाव? "

शंकरने जेवण उरकले. शर्ट पॅन्ट अडकवली आणि तो बाहेर पडला. तो बोलावू आलेला म्हातारा तरातरा चालत पुढे निघाला. शंकर त्याच्या मागे निघाला. दोघात थोडे अंतर पडले होते. अंधारात त्या म्हाताऱ्याचे फक्त पांढरे कपडे तेव्हडे दिसत होते. त्याला बहुदा शंकरशी बोलण्यात फारसे स्वारस्य नसावे. रस्ता पायाखालचा होता म्हणून बरे नसता अंधारात काही दिसत नव्हते. समोरच्या म्हाताऱ्याच्या धुरकट पांढऱ्या आकृती मागे, शंकरची पावले पडत होती. बॅटरी घेतली असती तर बरे झाले असते असे त्याला वाटून गेले. 

आता ती दोघे गावाबाहेर पडली होती. आभाळ भरून आले असावे म्हणून चांदण्याचा कवडसा सुद्धा दिसत नव्हता. किरकिऱ्यांचा आवाज कानात घुमू लागला. मधेच एखादे कुत्रे रडत होते. वातावरण गढूळ आणि गंभीर होत होत, उगाच बेचैन करणार! शंकरने सहज मागे नजर टाकली. त्याच्या मागे पाच पंचेवीस पावलावर सात-आठ गावकरी येताना दिसत होते. समोरच्या म्हाताऱ्यासारख्याच वेशातले. त्यात शंकरला काही वावगे वाटले नाही. भडक रंगाचे कपडे गरम होतात, म्हणून लोकांचा कल पांढऱ्या रंगाकडेच असतो. म्हातारा म्हणाला ते खरे होते. कोणीतरी पुढाकार घेतल्या शिवाय, कोण अश्या अंधाऱ्या रात्री घराबाहेर पडणार? आपल्याला पाहून गावकऱ्यांना धीर आला असावा, म्हणून ते आपल्या मागे निघालेत. त्याला थोडे बरे वाटले. त्याने समोरच्या म्हाताऱ्याकडे डोळे बारीक करून पहिले. त्याला फक्त त्याचे कपडेच दिसत होते, हवेत तरंगत चालल्या भूता सारखे! या विचारसरशी त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याच वेळी कुठुन तरी घुबडाचे गंभीर ओरडणे ऐकू आले. शंकर गप्पकन जागीच थांबला. तसा समोरचा म्हातारही, पाठमोरा होता तरी, चालता चालता तसाच थांबला! शंकरने मागे वळून पहिले. त्याच्या मागे असलेल्या गावकऱ्यांचा आता चांगला तीस-चाळीस जणांचा जथा झाला होता! आणि ते सगळेच थांबले होते! अचानक कडाडून वीज चमकली. क्षणभर आसमंत प्रकाशमान झाला.  त्याची दातखीळ बसायचीच पाळी होती. त्यातील एकही गावकऱ्याला हात-पाय-डोके काहीच नव्हते! फक्त अंगावर चढवल्या सारखी कापड! 

सकाळी सहज कॅलेंडरवर नजर टाकली होती, तेव्हा आजच्या तारखे शेजारी काळ्या भरीव वर्तुळाकार चिन्हाचा उलगडा त्याला अचानक झाला. आज अमावस्या होती! पोकळ शिक्षणाने भुताखेतांवरल्या अविश्वासाला खिंडार पडले! त्याच्या घशाला कोरड पडली. हातपाय लटलटू लागले. येथून पळून जावे असे त्याला तीव्रतेने वाटू लागले. त्याने कशीबशी चार पावले झरझर टाकून पहिले. समोरचा म्हातारा आणि मागच्या जथ्याने त्याच गतीने आणि तशीच हालचाल केली! जणू त्याच्या पायाला ते बांधले होते! आता जाणार कोठे? जेथे जाईल तेथे हे सगळे असणार होते! 

अचानक समोरचा म्हातारा थांबला. एक, दोन, तीन, असंख्य दिवट्या पेटल्या गेल्या. शंकरच्या आजूबाजूला निर्जीव प्रकाश पडला. त्याला त्या उजेडाने थोडा धीर आला. त्या उजेडात त्याला दोन गोष्टी दिसल्या. एक तर व्यवस्थित रचलेल्या दोन चिता, आणि त्यातल्या एकावर पांढऱ्या मदऱ्यात लपेटून ठेवलेले प्रेत! फक्त अग्नी देणे बाकी होते! ढगांची दाटी असूनही हवेतला गारवा वाढलाच होता. असंख्य दिवट्या पेटलेल्या होत्या, तरी कोमटपणा जाणवत नव्हता. शंकरच्या बाह्य जाणिवा बधिर होत असल्या सारखे त्याला वाटू लागले. हा काय प्रकार आहे? त्याने आजूबाजूला नजर टाकली सारे जण? (माणसे कसली भूतच!,) खाली माना घालून आदबीने उभा होती. जणू कोणीतरी अधिकारी माणूस जवळच असावा!

---आणि सरणावरले ते प्रेत सावकाश उठून बसले! शंकर डोळे फाडून समोरचे दृष्य पहात होता. क्षणा क्षणाला त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती. समोर दिसणाऱ्या घटनांचा अर्थ त्याचा मेंदू लावू शकत नव्हता! ते प्रेत, एखादा महाराज जसा सिहासनावर ऐटीत बसावा, तसे ताठ त्या सरणावर बसले! त्याने हळूच आपले दोन्ही हात आभाळाकडे पसरले. डोके वरकरून हात जोडले. तसेच हात खाली आणत स्वतःच्या चेहऱ्यावरला पंधरा कपडा फाडून दिला. 

त्या प्रेताचा उघडा चेहरा शंकरच्या माहितीतील होता! एक कडाडती वीज शंकरच्या मनात चमकून गेली. सरणावर ऐटीत बसलेला, गावातला वेडा वेताळ होता!

"या मास्तर, आज आमच्या पालकीचा मान तुम्हाला देण्यात येतोय!" वेडसर वेताळाचे उच्चार कमालीचे सुसंस्कृत होते! 

"मान? कसला? तू --तू कोण?" शंकरने कसे बसे विचारले. 

"अरे, या मूर्ख माणसाला सांगा, आम्ही कोण? आणि पालखीचा मान काय असतो ते!"

तो मघाशी 'घाटावर येत का?' विचारायला आलेला माणूस- म्हणजे फक्त अंगार घातल्या सारखे कपडे!-शंकर जवळ सरकले.

"मास्टर, हे वेताळ महाराज आहेत! वेताळ महाराज म्हणजे आम्हा भुतांचे राजे! आज आमोश्या आहे, महाराजांच्या पालखी निघते आजच्या रात्री! त्या पालखी समोर आम्ही दंगल करतो. ज्याला पालखीचा मान मिळतो, त्याच्या इशाऱ्यावर सगळी भुतावळ नाचते! वेताळ महाराज खूष झाले कि पुढच्या अमोश्येला त्यांच्या सोबत गोंड्याच्या पालखीत बसता येत!"

"मला नाही कळलं. पण मी आता काय करू?"

"तुम्ही फक्त शेजारी असलेल्या सरणाला पेटवून द्या! बाकी आपोआप होईल!" शंकरच्या हाती पलिता देत त्याने सांगितले.


क्षणात ती चिंता पेटून उठली. आगीने लवकरच ती चिंता ताब्यात घेतली. अग्नीच्या ज्वाला वाट सापडेल त्या, चितेच्या फटीतून ओसंडून वाहू लागल्या. वेड्यावाकड्या ज्वाला हवेच्या तालावर नाचू लागल्या. मास जळत असल्याचा वास घाटावर आणि नदीच्या काळ्या पाण्यावर पसरू लागला. इतक्यात एखादा फुगा फुटावा तसा आवाज झाला. रसरस्त्या चितेच्या आहारातून चिलग्याचा डोह वर उसळून आला! कवटी फुटली होती! त्या आवाजासरशी शंकरला आत्ता पर्यंत वाटणारी भीती पळून गेली. तो हाड पोखरणाऱ्या गारवा कुठल्या कुठं गायब झाला होता. त्याला एकदम हलकं हलकं वाटू लागलं. अनामिक आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्याभरात तो नाचू लागला.

वेताळाने इशारा केला. कोठूनतरी एक लाल गोंड्याची पालखी हवेत तरंगत आली. त्यात वेताळ बसला. आणि हळू हळू पालखी नदीच्या कडे कडेने निघाली. ढोल ताशे कडकडू लागले. पांढऱ्या कपड्यातली ती भूत बेभान होऊन नाचत होती! आणि सगळ्यात समोर शंकर होता. वेड्यासारखा वेडावाकडा नाचताना त्याला काहीच वाटत नव्हते. काहीच कळत नव्हते. तोंडी एकाच वाक्य होते.

"ढ्यांचीक ढ्यांचीक ढिगिंग ढिगिंग, कितने बीत गये है दिन!" तो ते पुन्हा पुन्हा लयीत म्हणत होता. आणि नाचत होता.

                                                                         ००० 

सकाळी आख्खा गाव घाटावर जमला होता. एक विझलेली चिंता दिसत होती. आणि तिच्या पायथ्याशी शंकर मास्तरच्या चपला होत्या!

"म्या लयी येळ मास्तरांची वाट पाहिली. कोसावरल्या शेंडी गावात हाकामारी आल्याची वार्ता आल्याचं सांगायचं व्हतं. राती कोनी हाक मारली त, हाकला 'ओ' दिवू नका म्हनून बजवायचं व्हतं!नाय भेट झाली. नेलं नंव्ह का 'हाकमारिन' उचलून मास्तरांसनी!" दिगूआण्णा शेजारच्या माणसाला सांगत होता. पण त्या माणसाचे लक्षच नव्हते. 

पिंपळाखालचा वेडा वेताळ मात्र "ढ्यांचीक ढ्यांचीक ढिगिंग ढिगिंग, कितने बीत गये है दिन!" या ओळी आपल्या भसाड्या आवाजात दिवसभर म्हणत होता!



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror