shw2 2

Horror

4.1  

shw2 2

Horror

अबोली

अबोली

14 mins
3.8K


मी क्रिस्टीन. इथे रहायला येऊन मला वर्षभर होत आलं. सर्व गोष्टी इथे बदलल्या आहेत. किमान दिवसा तरी तसं वाटतं पण एकदा रात्र झाली की सर्व गोष्टी पुन्हा पहिल्या सारख्याच भासू लागतात. जीवघेणा काळोख, मंतरल्या सारखी रात्र, मध्येच वाऱ्याने होणारा झाडाच्या पानांचा सळसळणारा आवाज काळजाचे ठोके चुकवून जातो आणि त्या खुर्चीवर ती अजूनही बसली आहे असंच भासतं. तिची आणि माझी ओळख पाहिल्या दिवसा पासूनची.

 

      मी इथे रहायला आले तेव्हा मला भेटली होती ती. पहिल्याच नजरेत माझ्या डोळ्यात भरली. माझ्या मागच्या आयुष्याचा प्रवास खरं तर फार खडतर होता. आईबाबा लहानपणीच गेले त्यामुळे लहानपण जगलेच नाही मी. एका रात्रीत मोठी झाले आणि जबाबदाऱ्या सांभाळू लागले. आईबाबा शिवाय कोणीच नव्हतं जगात. मग भांडायचं आणि रागवायचं तरी कोणावर? असा काट्यांचा प्रवास पार पाडत मी इथपर्यंत पोचले. आज माझं स्वतःच घर मी घेतलं. शहरापासून लांब, गाड्यांमधून निघणारा तो विषारी धूर नाही, कोणाचा आवाज नाही, कोणीही कटकट करायला नाही, कोणाची गर्दी नाही, वर्दळ नाही, फक्त ही दाट झाडी, पक्षांचा किलबिलाट, माणसांच्या त्या गजबजलेल्या गर्दीपासून लांब, कसं अगदी शांत आणि निवांत. हेच बघून मी इथे घर घेतलं. घर घेताना खूप अडथळे आले. एकटी मुलगी म्हणून कोणी घर देत नव्हतं. अखेर एक दिवस वर्तमानपत्रात ही जाहिरात वाचली आणि इथले दलाल मी. डीकोस्टा ह्यांच्याशी संपर्क केला. बोलायला अतिशय प्रेमळ वाटायचे पण त्यांची बायको भेटली तेव्हा तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच भाव दिसत होते. जसं काय तिला खूप काही सांगायचं होतं मला. पण ती मुकी होती. मी. डीकोस्टा शी संपर्क केल्यावर मला घर घ्यायला इतके क्लेश झेलावे लागले नाहीत. सुरळीत सर्व झालं. अखेर मी घर घेतलं.


      घराच्या साफसफाईसाठी कामगार बोलावण्यात आले. प्रत्येकाकडे जातीने लक्ष देऊन मी त्यांच्याकडून साफसफाई करून घेत होते. त्या साफसफाईत मला ती भेटली.,"अबोली". अबोलच ती, बाहुली आहे ना म्हणून. ह्या बंगल्याचा जो पहिला मालक असेल कदाचित त्याची असावी. एका कामगाराने तिला कचऱ्यात फेकून दिली होती. मी तिला उचलून आणून व्यवस्थित स्वच्छ केली आणि माझ्या बेडरूम मधल्या आराम खुर्चीवर ठेवली. पाहता क्षणी माझ्या डोळ्यात भरली होती ती. तिच्यात एक वेगळंच आकर्षण होतं. आता ह्या जगात माझं कोणीतरी आहे असं मला वाटू लागलं. उठता, बसता, जेवता, झोपताना तिला मी माझ्या जवळच ठेवू लागले. मला प्रत्येक वेळी ती जवळ लागायची. इतकंच काय तर मी जेवायला बसले की त्यातलं पण थोडं तिला द्यायचे. प्रत्येक गोष्ट तिच्यासोबत वाटून घ्यायचे. वाचणाऱ्यांना हसू येईल, पण माझं ह्या जगात कोणी नसल्याने तिलाच मी माझं विश्व बनवलं होतं. हळूहळू मला तिच्यामध्ये थोडाफार फरक जाणवू लागला. म्हणजे एके दिवशी मला माझ्या आईवडिलांची खूप आठवण आली म्हणून मी ढसाढसा रडायला लागले आणि तिला जवळ घेऊन झोपले. रडल्यामुळे डोकं जड झालं आणि लगेच झोप लागली. पण झोपेत ती माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत आहे असं वाटत होतं. आईसुद्धा असंच कुरवाळायची. तिचा हात हातात घेऊन मी झोपले.

 

       तिच्यासोबत दिवस मजेत चालले होते. एका रात्री मी माझ्या टेबलवर बसून जरा काम करत होते, त्यावेळी नेहमीच्या सवयीप्रमाणे मी अबोलीला सोबत घेऊन बसलेले, अर्थात टेबलच्या कडेला बसली होती, तशीच रोजच्या सारखी माझ्याकडे हसत बघत होती. टेबल लॅम्प लावून माझं लिखानाचं काम मी करत होते. ती जेमतेम माझ्यापासून १ फुटाच्या अंतरावर टेबलवर बसली होती. काम करता करता एक नजर मी तिच्याकडे टाकली, तशीच हसतमुखाने माझ्याकडे बघत होती. ५ मिनिटांनी जरा डोळ्यांना थकवा जाणवू लागला म्हणून मी चष्मा काढला आणि तो स्वच्छ पुसू लागले, परत एक नजर तिच्यावर टाकली आता ती पहिल्यापेक्षा मला थोडी लांब भासत होती. आणि तिच्या चेहऱ्यावरचे हास्य बदलून त्यावर वेगळेच गंभीर भाव आले होते. सूर्य डोंगराआड मावळताना कसा तांबूस, पिवळसर, काळा दिसतो, अंधारात अगदी तिचा चेहरा तसाच वाटत होता. भयंकर... जास्त काम करून माझे डोळे थकले असावेत म्हणून मला तिचा चेहरा असा दिसत असावा आणि काम करता करता माझा हात लागून ती किंचित बाजूला सरकली असावी असा अंदाज मी लावला. तिचा एक गलगुच्चा घेतला आणि पुन्हा कामाला लागले. काम करता करता कधी झोप लागली कळलंच नाही. झोपेत काहीतरी हालचाल होण्याचा मला आवाज आला. मी डोळे उघडले,तर पाहते तो काय? मी आरामखुर्चीवर होते. मला दरदरून घाम फुटला. जीवाची भयंकर धाकधूक होऊ लागली. काळजाचे ठोके वाढले, आणि त्यात अबोली टेबलवर नव्हती ते पाहून तर आणखीनच भयाण वाटू लागलं. सबंध घरात मी तिचा शोध घेतला पण ती काही मला सापडली नाही. त्या रात्री संपूर्ण घर मला एखाद्या भल्या मोठ्या अजगरासारखं वाटू लागलं. कोणत्याही क्षणाला मला ते गिळंकृत करून टाकेन असंच वाटू लागलं. सगळीकडे शोध घेऊन मी थकले आणि जीव रडकुंडीला आला. २-४ आसवं गाळून मी पुन्हा झोपी गेले.


       सूर्याची सोनेरी किरणे अंगावर पडेपर्यंत मी सकाळी झोपलेले. जाग आला तेव्हासुद्धा मला तिला शोधायची इच्छा होती. डोकं जड झालं होतं, हातपाय क्षीण झाले होते, भयंकर थकवा जाणवत होता. त्यामुळे प्रथम फ्रेश होऊन काहीतरी खाण्याचा विचार केला. आंघोळीला निघालेच होते इतक्यात जोरजोरात कोणीतरी दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. मी दरवाजा उघडला, समोर मिसेस डिकोस्टा होत्या. नेहमीप्रमाणे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहात होत्या. त्यांच्या पाठून मिस्टर डिकोस्टा आले. रात्रीच्या घडलेल्या प्रकाराची ते शहानिशा करायला आले होते. एका निर्जीव बहुलीचा मी शोध घेत होते ही गोष्ट जर त्यांना मी सांगायला गेले असते तर ते त्यांना कधीच पटलं नसतं म्हणून माझ्या कामाचा एक पेपर हरवलाय आणि तोच मी शोधत होते इतकंच मी सांगितलं. "रात्रीचे हिंस्त्र प्राणी बाहेर फिरत असतात, तुम्ही सांभाळून राहा." इतकेच ते बोलले आणि निघाले. माझे स्नानादी विधी आटोपून मी पुन्हा तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. घरात तर ती मला कुठेच सापडली नाही. गावातली आदिवासींची पोरे टवाळ होती, त्यांना चोऱ्यामाऱ्या करायची सवय होती. त्यांनी कदाचित उचलून नेली असावी अशी कल्पना माझ्या मनात आली. म्हणून मी गावात शोध घ्यायचा विचार केला. जंगल जवळ असल्यामुळे वेळी अवेळी पावसाची बरीच शक्यता असायची म्हणून सोबत छत्री घेतली, अंगात जॅकेट चढवून निघाले.


      नोव्हेंबर महिना चालू होता. पण वनविभाग जवळ होता म्हणून अजूनही पाऊस पडायचा. मी निघाले तेव्हा रस्ते ओले होते, कदाचित आताच पाऊस येऊन गेला असावा. दुपार असूनही झाडांच्या सळसळत्या पानांमुळे आणि सुटलेल्या वाऱ्यामुळे गारवा जाणवत होता. पक्ष्यांचे किलबिलाट नादमाधुर्य पसरवत होते. अर्धनग्न आदिवासी बाया टोपल्या विणण्यात आणि मडकी घडवण्यात व्यस्त होत्या. काम करताकरता त्यांचे मंजुळ स्वर फारच गोड वाटत होते. दूर कुठूनतरी चर्चमधून घंटेचा मधूर स्वर कानी पडत होता. पण ह्या सर्वांचे मला भानच नव्हते. मी फक्त आणि फक्त अबोलीच्या शोधात होते. किती पावले मी चालले असेल कुणास ठाऊक पण नकळत मी जंगलात पोहचले. चालताचालता कधी संध्याकाळ झाली कळलंच नाही. हळूहळू सूर्य डोंगराच्या आड जाऊन अंधाराचे साम्राज्य पसरू लागले. मनुष्यवस्ती तर कोसो दूर राहिली होती. रातकिड्यांचा आणि पिंगळ्यांच्या चेकळण्याचा आवाज तितका येत होता. भयाण शांतता पसरली होती. मी चालतचालत मुख्य रस्ता शोधू लागले. पण काही केल्या तो सापडेना. अगदी चकवा लागल्यासारखं झालं. माझ्याकडे टॉर्चसुद्धा नव्हती म्हणून खूपच पंचाईत झाली होती. बिचारी कुठे असेल माझी अबोली. एखाद्या हिंस्त्र श्वापदाने तिचे तुकडे तर केले नसावेत? विचारच येऊन भीती वाटू लागली.


      चालतचालत जंगलाच्या अगदी मधोमध येऊन पोहोचले. एका मंदिरासारख्या ठिकाणी पोहोचले. तिथले भग्न झालेले अवशेष पाहून हे कदाचित १०० पेक्षा जास्त वर्षे जुनं असावं असा अंदाज मी लावला. जिथे तिथे कोळ्यांनी आपली जाळी विणून ठेवली होती, वटवाघळांचा थवा डोक्यावर धुमाकूळ घालत होता. जागोजागी शिलालेख लिहिलेले आढळले पण त्यावर भाषा आणि चित्रे वेगळीच होती. अशी चित्रे मी पहिल्या वेळेस पाहत होते आणि भाषा तर अगदी समजण्याच्या पालीकडचीच होती. मुख्य म्हणजे त्यात बायकांच्या चित्रांचाच जास्त समावेश होता. त्या छोट्या छोट्या चित्रांमध्ये बायकांचे जास्त हावभाव रेखाटले होते. पण ते हावभाव सामान्य बायकांसारखे नव्हते. त्यांच्यात काहीतरी वेगळेपणा होता पण अंधारात मी नीट त्यांचं निरीक्षण करू शकले नाही. त्या जर्जर जमिनीवर चालताना कितीतरी कीटक पायाखालून चिरडत होते, झाडाची एक फांदी त्या मंदिराच्या मुख्य द्वारावर आली होती, त्यावर अजगराचं पिल्लू झोके घेत होतं. दार भव्य होतं म्हणून मला जायला जागा होती. मी आत शिरले. मंदिराचं छत अर्धवट तुटलेलं असल्याने त्यातून चांदणं दिसत होतं. रात्रीचे ७ वाजले असतील. अजून इतकी रात्र झाली नाही म्हणून मला हायसे वाटले. मी आतमध्ये पाऊल टाकले. आत पाऊल टाकताच जवळ जवळ १०० मीटर अंतरावर एक भव्यदिव्य मूर्ती दिसली. ती ही खूप प्राचीन आणि पाषाणाची असावी. कोणत्या देवाची आहे ते लक्षात आले नाही. जंगलाच्या इतक्या मधोमध असूनसुद्धा त्या मूर्तीच्या भोवती मेणबत्त्या तेवत होत्या. माझी नजर मूर्तीच्या खाली गेली.


      एक बाई संपूर्ण नग्न अवस्थेत तिथे बसली होती आणि मेणबत्त्या पेटवत होती. ती बाई दिसायला खूपच घाण आणि विक्षिप्त होती. चेहरा तर इतका विद्रुप होता की त्यावर कोणीतरी ऍसिड फेकलं असावं असाच वाटत होता. नाक मोठं, केस कोरडे, नितंबापर्यंत, हातसुद्धा तितकेच लांब. मेणबत्त्या पेटवून झाल्यानंतर अंगात वारं भरल्याप्रमाणे चाळे करू लागली. तिच्या हातात एक कटार होती, त्याच्याने स्वतःच्याच शरीरावर घाव घालत होती. ठिकठिकाणी घाव घालून झाल्यानंतर संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं होतं. तिच्याकडे एक मानवाच्या कवटीसारखी कवटी होती, त्यात तिने रक्त साठवलं आणि त्या मूर्तीच्या चारही बाजूंना ते अर्पण करू लागली. तिने काहीतरी मंत्र पुटपुटले आणि रक्ताचं एक रिंगण तयार केलं. त्या रिंगणाच्या बाहेर पडली. तिथे आपोआप एक खड्डा तयार झाला. त्या खड्ड्यातून भयंकर आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. बघताबघता क्षणार्धात तिने त्यात झेप घेतली. पुढे काय होईल हे बघण्यासाठी मी पुढे सरसावले. पावलं टाकू लागले. थोड्या वेळाने ती बाई जशीच्या तशी खड्ड्याच्या बाहेर पडली. तिच्या अंगावर कुठेच भाजल्याचं आणि कापल्याचं निशाण नव्हतं. तिला तशी पाहून मी भलतीच घाबरले. पायाखालची जमीन सरकली. 


        त्या बाईची नजरसुद्धा माझ्यावर गेली. ती जोरात किंचाळले,"ब्लॅक फिलिप". तसा एक बारशिंगा माझ्यापाठी येऊन उभा राहिला. त्याच्या टापांच्या आवाजाने मी मागे वळून पाहिलं. तो बारशिंगा खूपच काळा आणि धिप्पाड होता. जणू काही तो माझा काळच बनून आला होता. त्याच्या तोंडात त्याने काहीतरी वस्तू पकडून ठेवल्यासारखी वाटत होती. त्याने ती माझ्या दिशेने भिरकावली. ती बरोबर माझ्या पायाशी येऊन पडली. मी उचलली आणि पाहते तो काय ती अबोली होती. माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. पण संकट माझ्या अंगावर ३ दिशांनी आलं होतं. तो बारशिंगा, ती बाई, आणि मला ह्या जंगलाचा रास्ता माहीत नव्हता. त्या बारशिंग्याने नाकपुड्या फुगवल्या. त्याच्या टोकदार खुरांनी माती उडवत तो माझ्या दिशेनं झेप घेऊ लागला. मी प्राण पणाला लावून मंदिरातून बाहेर पडले. अबोलीला उराशी कवटाळून वाट फुटेल तिथे धावत सुटले. एका मोठ्या वडाच्या झाडापाठी लपून बसले. तो आम्हाला इथे तिथे शोधू लागला. तो पुन्हा आला त्या दिशेनं वळला आणि गेला. तो गेला ह्याची खात्री करून जीव मुठीत धरून मी पुन्हा पळत सुटले.


      अखेर मुख्य रस्त्यावर आले आणि झपाझप पाऊले टाकू लागले. लांबून एका जीपमधून एक तरुण येताना दिसला. मला पाहून त्याने गाडी थांबवली. त्याने फॉरेस्ट ऑफिसर असल्याचे सांगितले. मला त्याच्यावर विश्वास नव्हता म्हणून त्याने मला त्याचं आयडी कार्ड दाखवलं. जॉनी स्मिथ असं नाव होतं त्याचं. माझी खात्री झाल्यावर मी गाडीत बसले आणि घराचा पत्ता सांगितला. त्याने इतक्या रात्री जंगलात येण्याचे कारण विचारले. तर मी रस्ता भटकले होते इतकंच सांगितलं. खूप रात्र झाली होती आणि माझं घर पण खूप लांब होतं म्हणून त्याने मला त्याच्या घरी थांबण्याचा आग्रह केला. मीसुद्धा खूप थकले होते. पोटात हत्ती, घोडे, उंदीर उड्या मारत होते आणि आणखी प्रवास करण्याची माझ्यात टाप नव्हती. म्हणून मी त्याचा आग्रह मान्य केला. फॉरेस्ट ऑफिसर असल्याने त्याचं घर जवळच होतं. घरी फक्त तो आणि आजोबा होते. त्याचे आईवडील परदेशी काम करायचे. एक मोलकरीण येऊन घरातलं सर्व काम आणि जेवण बनवून जायची. त्याने मला आंघोळीला पाणी आणि त्याचे शर्ट घालावयास दिले. आंघोळ करून मी आले आणि तो शर्ट घातला तेव्हा तो माझ्याकडे पाहून हसू लागला. तो का हसतो हे मला कळलं, मी सुद्धा हसले. त्याने खूप प्रेमाने मला जेवण वाढलं.


रात्रीचं जेवण गप्पागोष्टीत अधिकच रुचकर लागलं. आजोबा आधी मिलिटरीमध्ये होते. तिथले किस्से सांगत होते. त्यांच्या गोष्टी ऐकता ऐकता डोळ्यांवर झोपेची धुंदी येऊ लागली. त्याने मला झोपण्यासाठी त्यांचा गेस्ट रूम दिली. दिवसभरच्या धावपळीने मी खूप थकले होते. त्याने झोपताना माझ्या अंगावर ब्लॅंकेट टाकली. इतकी आपुलकी पहिल्या वेळेसच कोणीतरी माझ्यावर दाखवत होतं म्हणून मला भरून आलं. सकाळी त्याने बेड टी देऊन मला उठवलं. मी स्नान उरकलं. त्यांची मोलकरीण आली. जॉनीने तिला माझ्यासाठी पण नाश्ता बनवायला सांगितलं. ती हो म्हणून आत गेली आणि येशूच्या फोटोसमोर मेणबत्ती जाळून प्रार्थना करू लागली. मला कसेतरी होऊ लागले म्हणून मी जॉनीला तिथून मला लवकर सोडवण्यासाठी सांगितलं. त्याने गाडी काढली आणि मला घरी सोडलं. 


       त्याला मी माझ्या घरी चहा घेण्यासाठी आग्रह केला. तो बसला. चहा बनवता बनवता आमच्या गप्पा रंगात आल्या. चहा उकळल्यावर त्याला चहा दिला, मी ही घेतला आणि अबोलीला दिला. अबोलीला चहा दिलेला पाहून तो मोठमोठ्याने हसू लागला. हसता हसता अचानक चहा त्याच्या कपड्यांवर सांडला. मी लगेच उठले आणि साफ करू लागले. गरम चहा हातावर सांडल्याने हात थोडा भाजला. मी फर्स्ट एड कीट आणले आणि त्याला कापसाने औषध लावू लागले. त्याने माझ्या हातावर हात ठेवला, माझ्या डोळ्यात पाहू लागला, मी हात झटकन मागे घेतला. तो सुद्धा उठला आणि कामाला निघाला. आता रोज तो मला पाहण्यासाठी, माझी विचारपूस करण्यासाठी येऊ लागला. तो माझी खूप काळजी घ्यायचा. डिकोस्टा दाम्पत्यालासुद्धा तो खूप आवडायचा. आम्हा दोघांसाठी ते रोज काही न काही खायला घेऊन येत. आता आईवडिलांची उणीव भासत नव्हती. अबोलीला मी कपाटात बंद करून टाकली. आमच्या प्रेमाची कळी हळूहळू फुलू लागली. जशी दोघांची मन जुळली तशीच आमच्या शरीरांनाही एकमेकांशी सलगी करायला वेळ लागला नाही. त्यानंतर एके दिवशी त्याने मला लग्नासाठी मागणी घातली. माझंसुद्धा प्रेम असल्याने मी नकार देऊ शकले नाही. ही आनंदाची बातमी मी डिकोस्टानापण सांगितली.

       

अचानक लगेच दुसऱ्या दिवशी मला त्याच्या मृत्यूची बातमी आली. गाडीचे ब्रेक फेल होऊन गाडी दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवाच्या बाजूला बसून मी ढसाढसा रडू लागले. माझे संपूर्ण जगच संपल्यासारखे वाटू लागले. आजोबा माझी समजूत काढत होते. तो गेल्यानंतर त्याची खूप आठवण यायची. कधीकधी मी आजोबांना भेटायला जायचे. ते मला त्यांच्या घरी राहण्याचे सुचवायचे. पण जॉनी पहिला तिथे राहायचा, त्याच्या खूप आठवणी त्या घरात होत्या म्हणून माझं मन भरून यायचं आणि मी आजोबांना नकार द्यायचे. पुन्हा खूप एकटी झाले होती मी. माझ्या काळजावर झालेल्या जखमांचे घाव भरून काढण्यासाठी मी पुन्हा अबोलीचा आधार घेतला. तिला कपाटातून काढली. तशीच हसतमुख होती. तिला पाहून मी प्रसन्न झाले. पण मला घेरी यायला लागली, गरगरत होतं, पोटात दुखू लागलं, उलटीसारखं होऊ लागलं, बेसिनमध्ये उलटी करायचा प्रयत्न केला पण कोरड्या उलटया होऊ लागल्या. मी समजून गेले.


     मला दिवस गेले होते. मन पुन्हा खूप आनंदित झाले. श्रावणात रानावनात मोर नाचावा तसे ते हिंदोळे घेऊ लागले. जॉनीची शेवटची निशाणी तरी माझ्याकडे राहिली ह्या गोष्टीचे खूप खूप समाधान होते. पण ही गोष्ट मी कोणालाच सांगितली नाही. ह्या बाळाला मी जन्म देण्याचे ठरवले. ही गोष्ट फक्त मी डिकोस्टा आणि त्याच्या बायकोला सांगितली. त्यांनाही खूप आनंद झाला. ह्या ना त्या कारणाने त्यांचे घरी येणे वाढू लागले. ते माझी काळजी घेऊ लागले. जॉनीच्या आजोबांना खूप सांगावेसे वाटत होते पण त्यांनी त्यांच्याकडे राहण्याचा आग्रह केला असता म्हणून त्यांना सागितलं नाही.


नववा महिना संपत आला. पोट खाली गळू लागलं. कदाचित काही दिवसात बाळ येणार होतं. आता खूप उत्सुकता लागली होती. एके रात्री अबोलीला बिलगून मी झोपले होते. झोपेत काही माणसे मला उचलून नेत आहेत असे भास होत होता आणि खरंच तसंच होतं. मला कॉफीनमध्ये टाकून काळे कपडे परिधान केलेले काही लोक मला जंगलाच्या दिशेनं घेऊन चालले होते. मी ओरडण्याचा खूप प्रयत्न केला. पण नाईलाज होता. माझं तोंड आणि हातपाय त्यांनी बांधलं होतं. मला त्याच जुनाट मंदिरात नेण्यात आले जिथे मी आणि अबोली फसलो होतो. त्या काळे कपडे परिधान केलेल्या माणसांनी मला कॉफीनमधून काढलं आणि एका ठिकाणी एक रक्ताचं रिंगण बनवलं होतं तिथे झोपवलं.


      माझ्यासमोर मिस्टर डिकोस्टा आले आणि ते माझ्या पायथ्याला बसले. त्यांनीही काळे कपडे घातले होते. नेहमी ते आदर्श गृहस्थ वाटायचे पण आज त्यांचे रूप खूपच भयानक वाटत होते. ते उठले आणि माझ्या अंगावर कसले तरी पाणी शिंपडू लागले. अचानक माझ्या आजूबाजूला कुठूनतरी नग्न बाया प्रकट झाल्या आणि अंगात आल्यासारखे आढेवेढे घेऊ लागल्या. त्या बायकांमध्ये त्या दिवशीची बाईसुद्धा होती. मिस्टर डिकोस्टा पुन्हा माझ्या जवळ आला, माझ्या पायथ्याशी बसला. क्षणार्धात त्याने त्याचा संपूर्ण हात अंतरभागात घालून माझ्या पोटातला गर्भ काढून घेतला. मी जोरात किंचाळले.

हळूहळू डोळे मिटू लागले. तरी माझ्या बाळासाठी मी अजूनही तग धरुन होते. त्या नराधामने माझं बाळ उचललं आणि एका मोठमोठी नखे असलेल्या बाईकडे दिलं. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून डिकोस्टाची बायको होती. तिनेसुद्धा काळे कपडे परिधान केले होते. ती खूपच विक्षिप्त आणि भयंकर दिसत होती. तिने बाळावर काहीतरी मंत्र पुटपुटले आणि त्याचे कित्येक तुकडे करून टाकले. माझ्या काळजाचे तुकडेतुकडे होऊ लागले. तिने ते तुकडे त्या नग्न बायांच्या हातात दिले आणि त्या सर्वांमध्ये वाटू लागल्या. माझ्या बाळाचे असे हाल बघून काळीज तुटत होतं. पण मीसुद्धा मृत्यूच्या दारात होते. काहीच करू शकत नव्हते. इतक्यात मला त्या भव्य सैतानाच्या मूर्तीच्या पायथ्याशी अबोली दिसली. मरताना कोणीतरी आपलं आहे ह्याचं समाधान वाटू लागलं. पण मिसेस डिकोस्टा अबोलीच्या जवळ गेली आणि तिने त्यापुढे जे केलं ते पाहून मला मरणयातनाच बऱ्या वाटल्या.


       तिने माझ्या बाळाचं हृदय घेतलं आणि अबोलीच्या हातात दिलं आणि मला इतके दिवस निर्जीव वाटणारी ती कोमल बाहुली, तिने माझ्या बाळाचं हृदय मटणाचे लचके तोडून खावेत तसं खाल्लं. माझं काळीज अगदी तीळतीळ तुटत होतं. असं वाटत होतं त्या अबोलीचा जीव घ्यावा. पण मी तरी काय करणार? आणि ती सैतान असल्याने तिची ताकत माझ्यापेक्षा अफाट होती आणि मी मृत्यूच्या दारात होते, त्यामुळे तिच्यासमोर माझा निभाव लागला नाही. तिने माझ्या बाळाचं काळीज खाल्लं आणि काही घटका गेल्या असतील तोच तिथे सगळीकडे धुराचं साम्राज्य पसरलं आणि काही क्षणातच अबोलीचं एका काळे कपडे धारण केलेल्या बाईमध्ये रूपांतर झालं. ती बाई सैतान होती पण दिसायला खूप आकर्षक होती. जगातला कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडेल, तिच्या रुपाला भुलेल असं तिचं सौंदर्य होतं. पण ती मायावी होती.


माझ्यासमोर येऊन ती उभी राहिली. मला तिला मारताना शिव्याशाप द्यायचा होता. पण आता माझ्यात बोलण्याची ताकदसुद्धा उरली नव्हती. डोळ्यासमोर अंधारी येत होती. शरीर पूर्णपणे निकामी झालं होतं. हृदय तितकं धडधडत होतं. पण त्या चांडाळणीला माझ्याकडून तेसुद्धा हवं होतं. तिने मोठमोठी नखे असलेला तिचा हात माझ्या छातीत खुपसला आणि माझं हृदय हातात काढून घेतलं. सर्वांना दाखवत ती मोठमोठ्याने हसू लागली. संपूर्ण जंगलात घुमेल इतका प्रचंड मोठा आवाज होता तिचा. सामान्य माणसाच्या तर कानाचे पदडेच फाटले असते. मी क्षणार्धात गतप्राण झाले. माझ्या शरीराला मुक्त करून मी हवेत उडाले, मी त्यांना काही करणार इतक्यात त्या चांडाळ डिकोस्टाने माझ्या आजूबाजूला एक गोलाकार आवरण बनवलं आणि त्यात मला कैद केलं. माझा गतप्राण झालेला देह आणि माझ्या बाळाचं सांडलेलं रक्त बघून मी जोरजोरात रडायला लागले. इतक्यात त्या नग्न चेटकीणींमधली एक समोर आली. तिच्या हातात एक मोठ्या तबकासारखं ताट होतं. त्यात कसल्याशा काळ्या जादू करण्याच्या बऱ्याच वस्तू ठेवल्या होत्या. त्यात अबोलीने म्हणजेच त्या महाचेटकीणने माझं हृदय ठेवलं. ते तबक तिने आपल्या हातात घेतले आणि सर्रकन हवेत उडी मारली. ती थेट त्या सैतानाच्या मूर्तीच्या डोक्यापाशी पोचली. तिने कसलेसे मंत्र पुटपुटले, त्याला माझ्या आणि माझ्या बाळाच्या रक्ताचा अभिषेक केला. माझं हृदय हातात घेतलं. टोकदार नखांनी त्यात हात घातला आणि पाहते तो काय? अप्रतिम असा दिसणारा एक हिऱ्यासारखा खडा तिने त्यातून काढला. तो खूपच प्रकाशित होता. तिने तो त्या सैतानाच्या मुकुटावर चढवला. पण त्या मुकुटाची आणखी एक वेगळीच गोष्ट वाटली. त्यात हिऱ्यासाठी आणखी बऱ्याच जागा रिक्त होत्या. तो सैतान त्यांच्यावर प्रसन्न झाला. त्या मूर्तीने डोळे उघडले आणि त्यांना वेगळ्याच भाषेत काहीतरी वर देऊन निघून गेला. पुन्हा ती मूर्ती पूर्ववत झाली. आता त्यांनी मला एका आरश्यात कैद करून ठेवलंय. मला इथून नाही काढलं तरी चालेल पण परत ह्या जागेचा आणि खास करून तिचा कोणी बळी पडू नये इतकीच इच्छा आहे.

ती अजूनही तशीच खुर्चीवर बसली आहे, कोणत्या तरी नवीन, निष्पाप जिवाच्या शोधात....


Rate this content
Log in

More marathi story from shw2 2

Similar marathi story from Horror