SAMPADA DESHPANDE

Horror

3.7  

SAMPADA DESHPANDE

Horror

उर्वशी - भाग १

उर्वशी - भाग १

8 mins
2.0K


गावचे माजी सरपंच अण्णासाहेब देशमुख वयाने सत्तरीच्या आसपास. तरीही ताठ. कोणत्याही दुखण्याने त्यांना गाठलं नव्हतं. आज सत्तरीला येऊनही त्यांना एकही औषध घ्यावं लागत नव्हतं. अण्णा रोज गावातल्या जुन्या शंकराच्या मंदिरात जाऊन स्वतःच्या हाताने त्यांच्या अभिषेक घालत असत. ते मंदिर किती पुरातन होतं हे कोणालाच माहित नव्हतं पण स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार करून घेतला होता. मंदिराच्या आवारात लोकांनी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनवून घेतला होता. देवळात जाण्यापूर्वी लोक आदराने स्वराज्य उभारणाऱ्या या देवाला नमस्कार करूनच आत जात असत. अण्णासाहेबांच्या अनेक पिढ्यांपासून शिवशंकराला अभिषेक घालण्याची प्रथा चालू होती. त्या दिवशीही नेहिमीप्रमाणे अण्णा अभिषेक घालून ध्यानस्थ बसले. का कोणास ठाऊक शंभू महादेवाच्या देवळाच्या आसपासचे वातावरण काहीसे गढूळलेले जाणवत होते. नेहेमीप्रमाणे अण्णांचे चित्त एकाग्र होत नव्हते. मग ते बाहेर येऊन बसले. तोंडाने " शिव -शिव " असा जप चालू होता. सहजच त्यांची नजर मंदिरासमोरच्या तलावावर गेली. इतरवेळी नितळ, निळे असणारे पाणी अचानक काळे दिसू लागले. अण्णा दचकले. डोळे चोळून पाहिल्यावर पाणी परत पूर्ववत झाले. इतक्यात त्यांची नजर आभाळात गेली. गावाबाहेरून दक्षिणेकडून एक काळी सावली त्यांना गावाकडे येताना दिसली. "शिवशिव हे कोणते संकट गावावर येऊ घातले आहे? काय सुचवतो आहेस देवा?" त्यांच्या तोंडून बाहेर पडले. इतक्यात शेताकडे जाणारा शिरपा गाभाऱ्यातून दर्शन घेऊन बाहेर पडला," राम राम अन्नासाहेब ! काय म्हणता? बरे हात ना? आज काय आजारी असल्यावाणी दिसता जणू. "शिरपा अण्णासाहेबांच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला. शिरपाकडे पाहून अण्णा म्हणाले,"शिरपा ! गावावर मोठं संकट येऊ घातलंय. शंभू दाखवतोय मला. काहीतरी वाईट येणारे गावात. जे देवालाही भारी पडणारे. नीट काही कळत नाही पण मोठा धोका आहे हे नक्की." शिरपा हसून म्हणाला," अव अण्णासाहेब नवे सरपंच हायेत ना ! त्यांनी गावचा विकास कि काय म्हणतात ते कराच ठरविला हाय. आपला गाव म्हणे एका संस्थने दत्तक घेतला हाय. ते लोक आज येणार हायेत. पर बगा ना ! नेमका आजचा दिवस निवडला. आज अवस हाय. पण आपले नवीन सरपंच कुठे मानतात काय! चला निघतो म्या. काम लवकर आटोपून जायचंय कार्यक्रमाला ते लोक येणारेत ना ! राम राम." शिरपा निघून गेल्यावर परत अण्णासाहेब विचार करू लागले. आजच ती संस्थेची माणसे येणार आणि आजच हे अशुभ संकेत दिसत आहेत. माहित नाही का ते पण एक खूप वाईट शक्ती गावाच्या दिशेने येताना जाणवत आहे. “शंभू सांभाळ रे बाबा.” असे म्हणून त्यांनी गाभाऱ्याकडे पाहात हात जोडले.        


आज माधवपूरमध्ये खूप उत्साह संचारला होता. त्याचे कारण होते हे गाव एका समाजसेवी संस्थेने दत्तक घेतले होते आणि त्या संस्थेचे सदस्य गावात येऊन राहणार होते. गावकऱ्यांबरोबर. गावातल्या जुन्या हवेलीची डागडुजी करून ती राहण्यायोग्य केली होती. अगदी दहा माणसंही आरामात राहतील इतकी प्रशस्त हवेली होती ती. सगळे गावकरी जय्यत तयारीत होते. शहर जवळ असूनही या गावचा विकास झाला नव्हता. ते गावातल्या काही अधिकारी लोकांच्या आडमुठेपणामुळे. पण आता ती वेळ गेली होती. 'सहारा' या संस्थेने गावाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. गावकऱ्यांनी संस्थेतून येणाऱ्या लोकांसाठी एक छोटासा स्वागत समारंभ ठेवला होता. सगळे लगबगीने समारंभाच्या ठिकाणी जमत होते. स्वयंसेवकांची गडबड चालू होती. सगळं जागच्या जागी आहे ना हे ते बघत होते. गाव जरी लहान दिसत असला तरी मोठा होता. छोट्या छोट्या आदिवासी वाड्या एकत्र मिळून गाव बनला होता. अनेक आदिवासी पाडे तर डोंगरात लांबवर पसरलेले होते. अशा या माधवपूरचे नशीब उघडले आणि ते आता नवीन बदलासाठी सज्ज झाले होते. सगळे आतुरतेने संस्थेतल्या लोकांची वाट बघत होते . ठरल्या वेळी बरोबर संस्थेची गाडी आली एक एक सदस्य उतरू लागले. सगळे उत्सुकतेने त्यांना पाहण्यासाठी उभे राहिले. त्यांना ओवाळण्यासाठी सुवासिनी पुढे आल्या. एक एक करून सगळे उतरायला लागले. दहाजण येणार होते नऊजण उतरले. मग १० वी व्यक्ती कोण आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ती उतरली आणि तिच्या तेजाने सगळेच दिपून गेले. ती इतकी सुंदर होती की तिच्यापुढे स्वर्गातील अप्सराही फिक्या वाटाव्यात. लांबसडक काळे केस त्यांची सैलसर वेणी घातली होती. दुधासारखा गोरा रंग, गुलाबी ओठ, पांढऱ्या शुभ्र दंतपंगती, टपोरे काळेभोर डोळे, माध्यम उंची, आखीवरेखीव बांधा. काय नव्हतं तिच्यात ! ती म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य होते. तिने अगदी साधी पांढरी सुती साडी नेसली होती. तिच्या चेहऱ्यावर मंद हसू होते. सगळे तिच्या सौंदर्याने जणू मंत्रमुग्ध झाले होते. कोणालाच पुढे काय करायचे हे सुचत नव्हते. मग तिनेच हसून विचारले," कार्यक्रमाला सुरवात करायची ना?" तसे सगळे भानावर आले. मग सरपंचानी खूण करताच सगळ्या सुवासिनी त्यांना ओवाळायला पुढे आल्या. त्यांना नम्रपणे नकार देऊन ते दहाजण व्यासपीठाच्या दिशेने गेले. सरपंच आबा पाटलांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्व गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. मग सरपंच बोलायला उभे राहिले," नमस्कार लोकहो ! आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत कि आपण माधवपूर गावचे रहिवासी आहोत. आपल्या गावाला अतिशय उज्वल इतिहास लाभला आहे. आपल्या गावचा माधव निंबाळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेत फार मोलाची कामगिरी बजावली होती. त्यांच्या नावावरूनच आपल्या गावाला माधवपूर नाव पडले. मधल्या काळात गावातल्या काही लोकांच्या आपापसातल्या राजकारणामुळे या गावाचा विकास खुंटला होता. परंतु आता असे होणार नाही. मागल्या वेळेस जेंव्हा मी शहरात गेलो होतो तेंव्हा योगायोगानेच मला उर्वशीबाई भेटल्या आणि आपल्या गावाबद्दल ऐकताच त्यांनी गावाचा विकास करायची इच्छा बोलून दाखवली. मग काय शुभस्य शीघ्रम, लगेच हो म्हणून मोकळा झालो. गावातल्या लोकांनीही खूप उत्साह दाखवला. म्हणून प्रथम मी गावातल्या लोकांचे कौतुक करतो आणि आपल्या गावाविषयी काय योजना आहेत हे सांगायची मी उर्वशीबाईंना विनंती करतो." असे म्हणून टाळ्यांच्या गजरात सरपंच बसले. 


मग उर्वशीबाई बोलायला उठल्या,"नमस्कार ! सरपंच साहेबानी सांगितल्याप्रमाणे या गावाचा विकास करायचे आम्ही ठरवले आहे. हा विकास तीन टप्प्यांमध्ये होईल. प्रथम आपण शेतीला प्राधान्य देऊ. आमचं संस्थेने काढलेल्या माहितीनुसार या गावात शेती आणि बागायती हा प्रमुख व्यवसाय आहे. जवळ जवळ ९०% लोकांची रोजीरोटी या शेतीवरच अवलंबुन आहे. या गावात आजही शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते ती अर्थातच चंगली आहे. परंतु कष्टाचीही आहे. आपण सर्वप्रथम गावातल्या नदीला बांध घालून अडवणार आहोत आणि जेणेकरून शेतीसाठी लागणारे पाणी सहज उपलब्ध होईल. आम्ही पहिले आहे कि शेतीसाठी लागणारे पाणी शेतकरी किती कष्टाने आणतात ते. आपण एका जागी ते पाणी जमा करून इलेक्ट्रिक पंपाद्वारे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यासाठी प्रत्येकाच्या शेतात आपण टाक्या बांधणार आहोत. जेणेकरून शेती आणि बागायतीला पाणी देणे सोपे होईल. मग शेतीसाठी लागणारी आधुनिक साधने आपण पुरवणार आहोत. ज्यामुळे शेती करणे सोपे जाईल, तसेच आपण उत्तम प्रतीचे बियाणे,खते , पिकांवर फवारणीची औषधेही पुरवणार आहोत. आपल्याकडे निरनिराळे तज्ञ येऊन आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. इतकंच नाही तर आपल्या शेतमालाला, फळांना योग्य ती बाजारपेठ मिळवून देऊन गावातल्या लोकांचा जास्तीतजास्त फायदा कसा होईल हे आम्ही पाहू . अन्नधान्य, कडधान्य, फळे याचबरोबर आजच्या काळात फुलांच्या शेतीलाही आनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. देवळांतून देवासाठी ,लग्नसमारंभ, आणि इतर शुभकार्यांमध्ये सजावटीसाठी फुलांना अतिशय महत्व आहे. फुलांपासून उत्तरेही बनतात. मग आपण फुलांची शेती कशी करायची यासाठीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू.  


शेती तर महत्वाची आहेच, त्याचबरोबर महत्वाची आहे गावाची स्वच्छता. हा विषय आपण पहिल्या टप्प्यात घेऊया गावात स्वच्छता अभियान राबवून कचऱ्यापासून खत तयार करूया. त्याचा फायदा शेती आणि फळबागांनाही होईल. तसेच सार्वजनिक शौचालयेही बांधूया. जेणेकरून गावाच्या स्वच्छतेत हातभार लागेल. गावातल्या कलाकार मुलांना आपण भितींवर चित्रे काढायला सांगू. जेणेकरून आपला गाव स्वच्छ व सुंदर दिसेल.    

या गावात अनेक आदिवासी वाड्या आहेत. त्यांचे वेगळे असे स्वयंपूर्ण जग आहे. ते बाहेरच्या जगापासून अलिप्त आहेत. आपण त्यांनाही आपल्यात घेऊन बाहेरच्या जगाची ओळख करून देऊ. त्यांच्या अंगातील विविध कलागुणांना वाव देऊन त्यानी बनवलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देऊ. त्यांच्या मुलांना आपल्या मुलांमध्ये घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊ. आदिवासी लोकांच्या मेंढीपालन, कुकुटपालन व्यवसायाला चालना देऊन त्यांना आर्थिक मदत करू. आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याची टंचाई आहे. त्यांच्या स्त्रिया दुरवरून पाणी वाहून आणतात. त्याच्यासाठी विहिरी, तसेच बोअरवेल खोदण्याची सोय करू. “     


उर्वशी नावाप्रमाणेच सुंदर होती. तिचा आवाजही मंत्रमुग्ध करणारा होता.एखादा मुद्दा पटवून देण्यात तिचा हातखंडा होता. त्यामुळे साहजिकच तिचं बोलणं ऐकून लोक भारावून गेले होते. तिची योजना ऐकताच सर्वानी टाळ्यांचा कडकडाट केला. ती गोड हसून म्हणाली," अरे ! अरे ! अजून माझं बोलणं पूर्ण झालं नाही. दुसरा टप्पा असेल आपल्या गावातली मुले ज्यांना प्राथमिक शिक्षण इथेच मिळतं पण पुढील शिक्षणासाठी त्यांना बसनी प्रवास करून शहरात जावं लागतं. या गावात कितीतरी महिला अशा आहेत कि ज्यांना शिकण्याची इच्छा आहे परंतु त्या घरातील जबाबदाऱ्यांमुळे बाहेर पडू शकत नाहीत मग आपण या सर्वांच्या शिक्षणाची सोय इथे गावातच करणार आहोत. आपल्या माननीय सरपंच साहेबांनी मोठ्या मनाने गांवाबाहेरची विवादास्पद जागा आपल्याला शाळेची इमारत उभी करण्यासाठी दिली आहे. तिकडेही लवकरच इमारतीचं बांधकाम सुरु होईल. आपण शहरातून चांगले शिक्षक बोलवू, महिलांसाठी रात्रीचे वर्गही चालू करू.जेणेकरून शिकण्याची इच्छा असलेल्या महिला शिकू शकतील. महिलांच्या विकासासाठी आमची संस्था बांधील आहे. इथे फक्त पुस्तकी ज्ञानच मिळणार नाही तर ज्या महिलांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यांनाही मदत केली जाईल. त्यांना आवश्यक ते व्यवसायिक शिक्षण दिले जाईल. जसे पापड, लोणची बनवणे, इथे आंब्याच्या अनेक आमराया आहेत. आंब्यापासून तसेच इतरही फळांपासून जॅम, लोणची आणि इतर टिकाऊ उत्पादने बनवण्याचे प्रशिक्षण आपण महिलांना देऊ. तसेच ज्या महिलांना शिवणकाम, विणकाम, भरतकाम याची आवड असेल त्यांनाही मदत करून त्यांना विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध कशी होईल याकडे जातीने लक्ष दिले जाईल." उर्वशी जरावेळ थांबली आपल्या बोलण्याचा लोकांवर काय परिणाम झालाय हे पाहण्यासाठी. लोक तिच्या बोलण्याने भारावून गेले होते. तिने पुढे सुरवात केली," थोडक्यात आपण हे गाव स्वयंपूर्ण कसे होईल याकडे लक्ष देणार आहोत. आता तिसरा टप्पा याविषयी मी आताच बोलणार नाही. ते वेळ आल्यावरच जाहीर कारेन. मी जे बोलले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनात काही शंका असल्यास नक्की विचारा. आपण आपले गाव आमच्या ताब्यात देत आहात. त्यामुळे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही बांधील आहोत. मी आणि माझे सहकारी आपल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देतील." असे म्हणून ती बसली.  


गावातल्या लोकांना शंका असा काही नव्हत्याच. ते गावाचा विकास होणार या कल्पनेनंच हुरळून गेले होते. मग सरपंच उठले. रघुवीर उर्फ आबा पाटील नव्यानेच गावचे सरपंच म्हणून निवडून आले होते. चाळीशीच्या आसपासचे रघुवीर उंच, धिप्पाड तगडे होते. व्यायामाने शरीर कमावले होते. नजरेत एक दरारा होता. लोक त्यांना मान देण्यापेक्षा घाबरून त्यांच्यापुढे मान झुकवत असत. असं गावातल्या जेष्ठ लोकांना वाटत होतं. मग सरपंच बोलू लागले,"तर मला नाही वाटत कोणाच्याही मनात काही शंका असतील. आमच्या गावाबद्दल या संस्थेने जितका विचार केला आहे तितका आम्हीही केला नाही. तर उर्वशीबाईंना आपले पूर्ण सहकार्य आहे असे जाहीर करू ना ?" त्यांनी प्रश्न विचारला पण उत्तर "हो" असेच यावे अशा थाटात विचारला. जमलेल्या सर्व लोकांनीही हो म्हणून त्यांना साथ दिली. मग उर्वशी उठली. "बरं कोणाला शंका नाहीत ना? चंगली गोष्ट आहे. आपण उद्यापासून कामाला सुरवात करूया. फक्त आमची एक अट आहे." लोकांच्या प्रश्नार्थक चेहऱ्यांकडे बघत ती हसत म्हणाली,"आम्ही फक्त सूर्यास्तानंतरच काम करू. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आम्ही काम करणार नाही. ही अट जर मान्य असेल तर आपण उद्या सूर्यास्तानंतर काम चालू करू.मला आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे." सर्व लोकांनी चकित होऊन सरपंचांकडे पहिले. तसे ते गडबडून उभे राहिले आणि म्हणाले," हो ! हो ! का नाही. म्हणजे आम्हीही आमची कामे करून तुम्हाला हातभार लावू.मग ठरलं तर. उद्या संध्याकाळपासून कामाला सुरवात करूया .आता सगळे दमले असतील. तुम्ही हवेलीवर जाऊन आराम करा." हवेलीवर संस्थेच्या लोकांचं सामान एका टेम्पोतून आलं होतं. लोक ते उतरवत होते. त्यांचे मोठमोठाले जड पेटारे उतरवताना त्यांच्या नाकी नऊ आले होते. "च्यायला काय आहे यात? दगडं भरलीत कि काय !" हमाल वैतागून म्हणाला. इकडे आण्णासाहेब जेवून बाहेर बसले होते. आमवस्येच्या अंधाऱ्या रात्रीत एक काळोखापेक्षाही काळी वावटळ गावात भिरभिरताना त्यांना दिसत होती.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror