SAMPADA DESHPANDE

Thriller

3.3  

SAMPADA DESHPANDE

Thriller

जलपरी

जलपरी

15 mins
514


प्रोफेसर सुभाषचंद्र कुलकर्णी नाहीसे झाले हि गोष्ट त्यांच्या विदयार्थ्यांसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी धक्क्याची होती कांरण ते फक्त प्रोफेसरच नव्हते तर प्रसिद्ध आर्किओलॉजिस्ट आणि शास्त्रज्ञ होते. त्यांचे अनेक शोध भारत सरकारला उपयुक्त ठरले होते. त्याबद्दल सरकारने त्यांना पदमश्री पुरस्कारने सन्मानित केले होते.


8 जून ला कॉलेजचा वर्धापन दिनानिमित्त सर्व माजी विद्यार्थ्यांना बोलवायचं ठरलं. डेक्कन कॉलेज पुणे संपूर्ण भारतातलं प्रसिद्ध कॉलेज. प्रोफेसर सुभाष तिथेच शिकवत असत. सर्व विद्यार्थ्यांचे ते अतिशय लाडके होते. खरंतर ते एक वल्लीच मानले जायचे . कधीही त्यांनी कपड्यांकडे लक्ष दिलं नाही. वयाची चाळीशी जवळ आली तरी त्यांनी लग्नाचा विचार केला नव्हता. "मी एकटा आहे म्हणून इतकं सगळं करू शकतो." हे त्यांचं आवडतं वाक्य होतं. त्यांचे अनुभव ऐकायला मुलं नेहमीच अधीर असत.


असे हे प्रोफेसर नाहीसे झाले. ते कोणत्यातरी गुप्त प्रोजेक्टवर सरकारसाठी काम करत होते ते कुठे आहेत हे कोणालाच माहित नव्हतं. इकडे त्यांचे लाडके विद्यार्थी वर्धापनदिनाला यायची तयारी करत होते. सगळे जुने मित्र भेटणार याचा तर आनंद होताच पण खूप वर्षांनी सुभाषसरांचे अनुभव ऐकायला मिळणार याचा आनंद जास्त होता. किशोर, राम्या, अनिकेत, राज, अय्यपा हे १९९९ च्या बॅचचे सरांचे सगळ्यात लाडके विद्यार्थी. आता सगळे विखुरले होते. तरीही what`s app , फेसबुक च्या माध्यमातून सगळे एकमेकांच्या संपर्कात होते. राम्या तिच्या नवऱ्याबरोर लंडनला स्थायिक झाली होती. ती लंडन येथे ब्रिटिश म्युझियम मध्ये काम करत होती .


किशोर आणि अय्यप्पा एका रिसर्च टीमबरोबर तिबेट मध्ये होते. ते शांग्रीला या गुप्त शहराचा शोध घेत होते. त्यांना या रिसर्चमध्ये सुभाषचंद्र सर मदत करत होते. त्यांनी दिलेल्या टिप्स किशोरला अतिशय उपयुक्त ठरत होत्या. अचानक त्यांचा संपर्क तुटला किशोरसाठी हि गोष्ट नवीन नव्हती. प्रोफेसर कामात असले कि ते सर्वांशी संपर्क तोडत असत. आता वर्धापनदिनाच्या निमित्ताने त्यांना सर भेटणार होते.


अनिकेत वाइल्डलाईफ फोटोग्राफर झाला होता. पण त्यानी त्याचं पुरातत्वतज्ञाचे काम चालू ठेवलं होतं. तो सध्या आफ्रिकेच्या जंगलात काम करत होता. त्याआधी चार वर्ष तो चीनमध्ये पुरातन संस्कृतीचा अभ्यास करत होता. त्याची पत्नीही या कामात त्याची मदत करत होती. राज मोकाशी हा या सर्वांमध्ये सगळ्यात हुशार विद्यार्थी होता. तो प्राचीन सभ्यता आणि लिप्या याविषयी अभ्यास करत होता. लवकरच तो या विषयाची Ph.D. पूर्ण करणार होता. तो सध्या चीनमध्ये होता.


असे हे सगळे जिवलग मित्र भेटण्याच्या आनंदात होते. पण आपल्या पुढे किती मोठं संकट वाढून ठेवलंय याची त्यांना कल्पनासुद्धा नव्हती. सगळ्यांनी दोन दिवस आधी येऊन एन्जॉय करायचं ठरवलं. राम्याचं तर माहेरच होतं पुण्याला. मुलांनाही सुट्टी होती म्हणून ती महिनाभर राहणार होती. सगळेच सुट्टी एन्जॉय करायच्या मूड मध्ये होते. ५ जुनलाच सगळे पुण्यात आले. अय्यप्पा सोडला तर सगळ्यांची पुण्यात घरं होती. त्यामुळे तो किशोरच्या घरी राहणार होता. येण्याच्या गडबडीत कोणीच न्युज पहिल्या नाहीत. सगळे खूप एक्साईट होऊन आले होते. घरी आल्या आल्याच त्यांना सरांच्या नाहीस होण्याची बातमी मिळाली सगळे हादरलेच. असं कसं झालं? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. हे पाचहीजण त्यांच्या कॉलेजसमोरच्या नेहमीच्या कॅफेमध्ये बसले होते. मित्र भेटीचा आनंद सगळे विसरले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी होती. नक्की सर काय करत होते हे त्यानी त्यांच्या जवळच्या विद्यार्थ्यांना पण कळवले नव्हते म्हणजे ते फारच गुप्त असणार हे त्यांना कळून चुकले होते. इतक्यात कॅफेचा मालक बोलला, अरे पोरांनो ! मी गेली तीस वर्ष इथे आहे. तुमच्यासारखी कितीतरी पोरं इथे येऊन बसली आहेत तसेच तुमचे सुभाष सर पण यायचे. माझ्याशी खूप गप्पा मारायचे. त्यांच्या विद्यार्थ्यांचा त्यांना अभिमान होता. तुमचा उल्लेख त्यांच्या बोलण्यात नेहमी यायचा. तुम्ही किती यशस्वी आहात हे ते सांगायचे. " तो असे बोलल्यावर हे पाचहीजण सावध झाले. पोलिसांचं या गोष्टीकडे नक्कीच लक्ष गेलं नसणार याची त्यांना खात्री पटली.


मग अनिकेत पुढे झाला आणि बोलला, 'अंकल सर जायच्या आधी तुम्हाला कधी भेटले होते? ते तुमच्याशी काही बोलले होते का ? "अरे पोरांनो! अगदी पोलिसांसारखे प्रश्न विचारता कि, " अंकल हसत बोलले. "हो ते गायब व्हायची बातमी आली ना! त्याच्या मागल्या आठवड्यात आले होते. खूप आनंदात होते. आनंदात बोलण्यापेक्षा तुम्ही तरुण मुलं प्रेमात पडल्यावर जसे एक्सायटेड होता ना ! तसे वाटत होते. "मग त्यांच्या बोलण्यातकसला उल्लेख आला का ?" राम्यानि विचारलं. "अगदीच आठवत नाही. त्या दिवशी खूप गर्दी होती. मी त्यांचा आवडता चहा द्यायला त्यांच्या टेबलवर गेलेलो तेंव्हा त्यांच्या हातात एक चित्र होतं. मी गेल्यावर घाईनी त्यांनी ते लपवलं पण मला दुरून ते दिसलं. ते चित्र अर्ध शरीर मुलीचं आणि अर्ध शरीर माशाचं अशा प्रकारचं होतं. ते स्वतःतच दंग होते आणि “जलपरी –जलपरी “ असं काहीतरी बोलत होते.


या सर्व गोष्टी समजल्यावर मुलांच्या मनात सरांबद्दल काळजी दाटून आली. नक्की सरांना कोणत्यातरी रहस्याची चावी मिळाली असणार आणि त्यामागे ते गेले असणार पण यावेळी त्यांना सरांची खूप काळजी वाटत होती. नक्कीच काहीतरी वाईट झालं असेल असं त्यांना वाटत होतं. मग त्यांनी सरांच्या घरात शोध घ्यायचा असं ठरवलं. प्रश्न इतकाच होता कि तिकडे पोलिसांनी सील लावलं होतं. राम्याचा भाऊ पोलिसात होता. तो सुभाषचंद्र सरांच्या केसवर काम करत होता. या सर्वानी त्याची मदत घ्यायचं ठरवलं. ते सरांच्या घरात अगदी घरच्यासारखे वावरले होते. त्यामुळे सरांनी त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी हिंट ठेवली असणार असं त्यांना मनापासून वाटत होतं. राम्याचा भाऊ तयार झाला. त्यांच्यामुळे जर हि केस सॉल्व्ह झाली तर त्याला बरंच होतं.


दुसऱ्या दिवशी सकाळी राम्या सरांच्या घराची चावी घेऊन आली. सगळे तिला तिकडेच भेटणार होते. सरांच्या स्वभावाप्रमाणेच घरही पुण्याच्या बाहेर एकांतात होतं. घराच्या आसपास मोठाले वृक्ष होते. ते अस्ताव्यस्त वाढले होते. सर काही बागेकडे लक्ष देत नव्हते. त्यांच्या छंदातून त्यांना वेळ कुठला? अनिकेतच्या मनात विचार आला. पण ते असताना हि जागा कशी छान वाटायची? आता सगळीकडे एक भकास उदासपणा भरून राहिला होता. ते दार उघडून घरात आले. कॉलेजच्या कितीतरी आठवणी उफाळून आल्या. ते नेहमी जास्तीचा अभ्यास करायला सरांकडे यायचे. सर आर्किओलॉजिबद्दल त्यांना खूप गोष्टी सांगायचे," तुम्हाला एक चांगला पुरातत्वज्ञ व्हायचे असेल तर तुम्ही चांगले शोधक असायला पाहिजे. कितीतरी वेळा तुम्हाला काहीच सापडणार नाही पण तुम्ही हिंमत हारता काम नये." असं ते नेहमी सांगत. त्यासाठी ते त्यांना खजिना शोधायचा खेळ देत. जेव्हा त्यांना कुठेच खजिना सापडायचा नाही तेंव्हा ते बोलायचे कि, " मुलांनो सगळ्यात दुर्मिळ गोष्ट कधी कधी तुमच्या समोर असते पण तुम्ही दुर्गम जागी शोध घेता आधी जवळ शोधा नक्की फायदा होईल. "त्यांचा खजिना समोरच असायचा कधी एकाद्या फोटोफ्रेमच्या मागे तर कधी टेबलावर समोरच. माणूस दुर्मिळ गोष्टी कोणाला दिसणार नाही अशाच ठेवतो अशा समजुतीचा ते या खेळात फायदा करून घ्यायचे.


सगळे घरात आले. खूप दिवसांची धूळ साठली होती. मग किशोर म्हणाला," किती वर्षांनी आलो नाही इकडे? "सगळे तोच विचार करत होते, कि सरांना असं काय सापडलं कि सर तडकाफडकी निघून गेले? मग त्यांनी शोधायला सुरवात केली. आपण काय शोधतो आहोत हे पण त्यांना माहित नव्हतं. पण जे असेल ते समोरच हि त्यांना खात्री होती. सरांच्याघरी ते यायचे तेंव्हा होतं अगदी तसंच आताही होतं. तोच जुना सोफा, जुनं रायटिंग टेबल, त्याच जुन्या खुर्च्या, बुक-शेल्फ सगळं तेच. जसा काही मधला काळ गेलाच नाही असं किशोरला वाटलं. फक्त तिथे एकच बदल झाला होता जिथे सरांच्या डिग्रीज लावलेल्या होत्या ती भिंतीवरची जागा आता एका मोठ्या जलपरीच्या चित्रानी घेतली होती. सरांना चित्रकलेत अजिबात रस नव्हता हे मुलांना माहित होतं. त्यामुळेच ते या एका चित्रावर वायफ़ळ खर्च करतील हीच आश्चर्याची गोष्ट होती. राम्या त्या चित्राकडे निरखून बघत बोलली," हे चित्र अतिशय दुर्मिळ वाटतंय. माझ्या अंदाजाप्रमाणे पाच हजार वर्ष जुनं पण हा फक्त अंदाज आहे हे त्याहीपेक्षा जुनं असू शकत. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय कि सरांना इतकं जुनं पेंटिंग कुठे मिळालं ? आणि त्यांनी यावर इतका खर्च का करावा? आजमितीला या चित्राची किंमत करोडो रुपये असेल. राम्या असं बोलल्यावर सगळेच विचारात पडले. अय्यपा विचार करून म्हणाला," गडबड वाटतेय. आपण आपल्या शोधाला या चित्रापासूनच सुरवात करू या. हे खाली काढू या. "


खूप प्रयत्न करूनही ते चित्र निघालेच नाही. शेवटी राज म्हणाला, थांबा ! या चित्राखाली काहीतरी लिहिलंय खूप पुरातन भाषा वाटतेय. हि तर चित्रलिपी आहे. जी सुमारे ७००० वर्ष जुनी आहे. संस्कृतच्यापण आधीची. त्याकाळी लोक खूप हुशार होते ते चित्राच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करायचे. मी आता पीएच.डी. फायनल इयरला याचाच अभ्यास करतो आहे. आपल्याला त्याकाळी कशी संस्कृती होती हे माहित नाही. कारण त्यावेळी आता आहेत तसे देश नव्हते. हि पृथ्वी खंडांमध्ये विभागली गेली होती. म्हणून ते चित्र नक्की कुठल्या प्रदेशातलं आहे हे मी सांगू शकत नाही. फक्त यावर असं लिहिलंय कि," हे प्रिय राजा ! हि माझ्याकडून तुला सप्रेम भेट आहे. जगाच्या अंतापर्यंत मी तुझ्याबरोबर राहीन." राजने जे फोटोवरचे शब्द वाचले होते, एकूण सगळेच बुचकळ्यात पडले होते. अय्यप्पा म्हणाला," हे बघ राज, तुला जुन्या लिप्या वाचता येतात म्हणून बंडलं मारू नकोस जरा नीट वाच. " राज म्हणाला, " हि भाषा खरंच खूप जुनी आहे. तरीही यातल्या खुणांचा अर्थ जवळपास मी सांगतो तोच आहे. "अरे पण तुला असं म्हणायचं आहे कि ------" अनिकेतला पुढे काय बोलायचं हे सुचेना. " हो मला हेच म्हणायचं आहे की हा फोटो म्हणजे एका दुसऱ्या जगात जाणारं दार आहे जिथे जे आपल्या जगात नाही असं काहीतरी आहे. ज्याची सरांना भुरळ पडली आणि ते निघून गेले. त्यांना या फोटोच्या रूपात त्या जगाचा दरवाजा सापडला असावा", राज बोलला. " हो ना ! सरांना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं थ्रिलिंग असं काहीतरी करायला आवडायचं." राम्या काळजीने बोलली.


मग परत किशोर आणि अय्यप्पा तो फोटो काढायचा प्रयत्न करू लागले. खूप प्रयत्न करूनही तो त्यांना केसभरही हलवता आला नाही. जणू काही तो भिंतीचाच भाग बनला होता. मग राम्या आणि अनिकेत मिळून तो फोटो तपासू लागले. मग राम्या अचानक बोलली, "मला आधी प्रश्न पडला होता की इतकी हजार वर्षे होऊनही हा फोटो कसा टिकला? त्याचं कारण म्हणजे हा संपूर्ण धातूचा बनला आहे. खरंच! आश्चर्य आहे कि त्या काळातले लोक इतके प्रगत होते कि त्यांच्याकडे धातूंतले इतके रंग उपलब्ध होते. आपण आताच्या काळातही धातूपासून इतकी सुंदर कलाकृती बनवू शकणार नाही."


सगळेच त्या चित्राकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत राहिले. त्या फोटोत एक समुद्राचं सुंदर दृश्य होत. त्यातला तो निळा समुद्र अगदी खरा वाटत होता. समुद्रात अनेक ठिकाणी खडक वर आलेले दिसत होते. सामान्य मनुष्य जाऊच शकणार नाही अशी ती जागा वाटत होती. त्या दृश्यात एका खडकावर ती बसली होती. तिचं अर्ध शरीर एका सुंदर देखण्या तरुणीचं होत. ती इतकी सुंदर होती कि असं सौंदर्य अवघ्या पृथ्वीतलावर नसेल. तिचे केस सोनेरी लांब होते. तिचं अर्ध शरीर माशाचं होत. तिच्या त्या सोनेरी सौंदर्यावरून नजरच हटत नव्हती.


शेवटी राजच भानावर आला. नीट निरखून चित्र बघताना एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. ती कोणाकडे तरी टक लावून बघत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे निर्भय भाव पाहून ती तिच्या वास्तव्याच्या ठिकाणापासून खूप जवळ असल्यासारखी वाटत होती. तिच्या आसपासचा प्रदेश एक बेट असावा असं वाटत होती. जितकं ते चित्र निरखून पाहू तितकं त्यातलं रहस्य वाढत जाणार असं त्याच्या मनात आलं. मग त्यांनी घरात शोधाशोध सुरु केली. समोरच सुभाषसरांचा एक फोटो टेबलावर ठेवला होता. तो खूप जाड फोटो फ्रेम मध्ये लावला होता. अय्यप्पाला संशय आला सरांना स्वतःचे फोटो वगैरे काढायला आवडत नसत. मग हे कसं झालं? तो फोटो काढताच त्याच्या लक्षात आलं कि त्या फोटोफ्रेम मध्ये एक डायरी आहे.ती उघडून पाहताच त्यांच्या लक्षात आलं कि जे आपण शोधत होतो हे हेच आहे. दुसऱ्या दिवशी राम्याच्या घरी जाऊन डायरी वाचायचं ठरलं.


दुसऱ्या दिवशी सगळे राम्याच्या घरी भेटले. काय झालं हे जाणून घ्यायला सगळे अधीर झाले होते. त्यांनी त्या दिवशी असणाऱ्या कॉलेजच्या वर्धापनदिनाला न जाण्याचा निर्णय घेतला होता. राज नि वाचायला सुरवात केली ----- सन २००५ आज ५ जानेवारी हिमालयाची १७ वि ट्रिप पूर्ण झाली. तरीपण मन भरत नाही. नक्की हिमालय म्हणजे काय आहे? भौगोलिकदृष्ट्या उत्तर दिशेकडे भारताचे रक्षण करणारा बर्फाचा पर्वत. कि पुराणात सांगितल्याप्रमाणे देवी पार्वतीचा पिता. काहींच्या मते हजारो वर्षांपूर्वी हिमालय म्हणजे एक समुद्र होता. तर काहींचे असे सांगणे आहे कि या पर्वतात अनेक गुप्त शहर लपली आहेत जी उपग्रहसुद्धा दाखवू शकत नाहीत.जिथे हजारो वर्षांपासून तपश्चर्या करणारे साधू आहेत. माझं दुर्देव यांपैकी काहीच माझ्या नजरेला पडलं नाही. मला कायम असं वाटतंय कि मला एक अदभूत अनुभव येणार आहे लवकरच. मी वाट बघतोय.यानंतर डायरेक्ट सहा महिन्यापूर्वीचा मजकूर होता. इतिहास या विषयाची मला मनापासून आवड आहे. माझा त्यात अभ्यासही खूप आहे.


त्या दिवशी मनजीतचा फोन आला. तो एक आर्किओलॉजिस्ट आहे. माझी आणि त्याची एका कॉन्फरन्स मध्ये भेट झाली होती. तो माझ्यापेक्षा खूप लहान असला तरी आमची चांगली मैत्री झाली. आम्ही सतत एकमेकांच्या संपर्कात आहोत. तो काहीतरी वेगळंच अतिप्राचीन विषयाबद्दल सांगत होता. श्रीलंकेच्या किनाऱ्यावर ३० फुटी उंच त्सुनामीच्या लाटा उसळल्या होत्या. पाणी ओसरल्यावर किनाऱ्यावर अनेक मासे, समुद्री प्राणी मरून पडलेले मिळाले. त्यातच एका स्त्रीचा मृतदेह होता. जवळ जाऊन बघताच ती एक मरमेड (जलपरी) असल्याचं निदर्शनास आलं. श्रीलंकन सरकारने ती बातमी जाहीर न करताच तो देह एका रिसर्च टीमला अभ्यासासाठी दिला. त्या टीममध्ये मनजीत होता. तिचं शव-विच्छेदन केल्यावर तिच्यात मनुष्य आणि जलचर दोन्हीचे गुणधर्म आढळले होते. हे सर्व ऐकल्यावर मी आपले जुने ग्रंथ, पुस्तके वाचून काढली. इ. स. १००० पासून जगभरात जलपऱ्या पहिल्या गेल्याचे उल्लेख आहेत. पुराणांत विष्णूच्या दशावतारांमध्ये मस्तावताराचा उल्लेख आहे. रामायणाच्या थाई, कंबोडियन भाषांतरामध्ये रावणाची मुलगी सुवर्णमाचा एक जलपरी होती. रावणाने तिला हनुमानाला लंकेत येण्यापासून परावृत्त करायला सांगितले होते पण ती हनुमानाच्या प्रेमात पडली तिने त्याचा घाम गिळला आणि तिला त्याच्यापासून एक मुलगा झाला असे लिहिलेले आढळते.


सिकंदर जेंव्हा पृथ्वी जिंकायला निघाला. तेंव्हा त्याच्या जहाजातील काही खलाशांना जलपऱ्यांनी मोहात पडून समुद्रच्या तळाशी नेल्याचे लिखाण उपलब्ध आहे. मी या मिशनवर मलाही जाता यावं असा अर्ज केला. माझं नाव या क्षेत्रात प्रसिद्ध असल्याने मला ताबडतोब परवानगी मिळाली. या त्सुनामीमुळे आणि जमिनीतल्या हालचालींमुळे एक बेट समुद्रातून वर आलं होतं हे श्रीलंकेच्या हद्दीत असल्यामुळे त्यांनी त्याला त्सुनामी आयलंड असं नाव दिलं होतं. मी वेगवेगळ्या देशांतून आलेल्या रिसर्च टीममधल्या सदस्यांबरोबर बोटींनी निघालो. आमची राहायची सोय एका मोठ्या बोटीवरच करण्यात आली होती. त्या बेटावर काही जंगली प्राणी असण्याचा धोका होतं. का कोणास ठाऊक असं वाटत होतं मी माझ्या ध्येयाच्या खूप जवळ आहे. दोन दिवसांनी आम्ही त्या बेटाजवळ पोहोचलो. त्या बेटाजवळ जलपऱ्या दिसल्याचे अनेक मच्छिमारांनी सांगितले होते. बेट खरंच खूप सुंदर होते. पण आश्चर्य म्हणजे त्या बेटाच्या जवळपास पाण्यात एकही मासा दिसत नव्हता. आम्ही दुसऱ्या दिवशी पाण्यात उतरून शोध घेणार होतो. आमच्या जवळ २ तास पुरेल इतका ऑक्सिजन होता. मी उत्तम स्कुबा डायवर आहे. आम्ही १२ जण बेटाच्या वेगवेगळ्या दिशांनी पाण्यात उतरणार होतो.


मी बेटाच्या मागची बाजू निवडली. तिकडे जाताना बेटाचं निरीक्षण करत होतो. ती सगळीच वेगळ्या जातीची झाडं वाटत होती. ती कोणती आहेत याचा अजून पत्ता लागला नाही असं मनजीत म्हणाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकी दाट उंच झाडं असूनही त्यावर एकही पक्षी नव्हता. कदाचित ती जागा त्यांना सुरक्षित वाटत नसेल. आपल्यापेक्षा प्राणी-पक्षांना या गोष्टींची जाणीव असते. जाताना वाटेत एक छोटासा डोंगर लागला. संपूर्ण सपाट बेटावर तो जरा विचित्र वाटत होता. उद्या येऊन याची पाहणी करायचा विचार केला. का कोणास ठाऊक या बेटावर पाय ठेवल्यापासून मनाला एक प्रकारची शांतता मिळाली होती. हि जागा खूप ओळखीची वाटत होती. शेवटी पाण्याजवळ आलो. बोटीतून जरा पुढे जाऊन पाण्यात उतरलो. उतरताच आपोआप एका दिशेने जाण्यासाठी मनानी इशारा दिला. निघालो, जवळ जवळ ५० फूट खाली आलो होतो. जवळच एक प्रचंड खडक होता. त्याच्या मागे पाण्यातील एक खूप मोठं विवर होतं आत खूप काळोख होता. हिंमत करून निघालो. मनात आलं कि तिकडे जायलाच हवं. किती खोल गेलो माहित नाही असं वाटत होतं कि पृथ्वीच्या मध्यावर आलोय. तिकडे खूप मोठे खडक होते. जणू समुद्राखाली पर्वतांची रंग होती. अचानक मला उजेड दिसू लागला. एका खडकाआडून पाहू लागलो. आणि काय आश्यर्य ! तिकडे जलमानवांची वसाहत होती. हजारोंच्या संख्येनी जलमानव, जलपऱ्या दिसत होते. मला अतिशय आनंद झाला. पण तिकडे जायची हिम्मत झाली नाही कारण त्यांचे चेहरे अतिशय क्रूर होते. तिकडे एक सुंदर प्रकाश होता तो कदाचित पाण्यातील एखाद्या वनस्पतीचा असावा. निघायची वेळ झाली होती. हे गोष्ट कोणालाच सांगायची नाही असं ठरवलं होतं. त्यांना त्याच्या जगात सुखाने राहू देत असा विचार केला.


सगळे परत आलो कोणालाच काही सापडलं नाही मीही साळसूदपणे नकार दिला. एक मन त्या डोंगराकडे ओढ घेत होतं. दुसऱ्या दिवशी निघालो डोंगराजवळ आलो. काय शोधायचं माहित नव्हतं. पण अचानकच मला ती गुहा दिसली दाट झाडीत लपली होती. काही विचार न करता आत गेलो. खाली खाली उतार होता. त्या उतारावरून एका राजवाड्याच्या अवशेषांजवळ गेलो. फक्त एकच दालन सुरक्षित होतं. मी तिथे पाय टाकताच फुलांचा वर्षाव झाला. खाली जमिनीवर फुलांनी लिहिलं होतं "राजा समुद्रनील तुझे स्वागत असो". हे वाचताच डोक्यात आठवणींचे स्फोट झाले. समोरच एका भिंतीवर ते जलपरीच चित्र होतं. सगळं आठवत होतं मी मागील जन्मी राजा समुद्रनील होतो. हे माझा राज्य समुद्रपूर होतं. एक दिवस मी होडीतून फिरायला गेलो असताना एक सुंदर जलपरी दिसली तिचं अप्रतिम सौंदर्य पाहीन मी भारावून गेलो. तीही निर्भयपणे माझ्याकडे बघत होती. मग रोज मी तिला बघण्यासाठी जाऊ लागलो. हळूहळू ओळख झाली. ती जलपरी जलराज्याची राजकुमारी होती. तिच्या अप्रतिम सौंदर्याबरोबर तिच्यात अनेक शक्तीही होत्या. ती अमर होती. एक दिवस असेच आम्ही बोलत असताना अचानक अनेक जलमानव आले. आणि मला मारायला सरसावले.


त्यांच्या राजकुमारींनी एका बाहेरील जगातील मानवाशी संबंध ठेवणे त्यांना मान्य नव्हते. खूप भांडणे झाली शेवटी ते तिला फरफटत घेऊन गेले. मी रोज तिची वाट पाहू लागलो. एक दिवस ती आली. तिच्या हातात एक तसबीर होती. ते तिचं सुंदर चित्र होतं दिसायला ते अगदीच छोटंसं वाटत होतं. ते ती माझ्या हातात देऊन म्हणाली, " माझ्यात अलौकिक शक्ती असल्या तरी मी माझ्या समाजाविरुद्ध जाऊ शकत नाही मी मस्त्य जातीची असल्यामुळे तुमच्याबरोबर तुमच्या महालात राहू शकत नाही आणि मी तुमच्याशिवाय राहूहि शकत नाही. तुम्ही हे चित्र तुमच्या दालनात लावा. जेंव्हा तुम्हाला माझी आठवण येईल तेंव्हा फक्त रात्रीच्या वेळेस मी त्यातसबिरीत तुम्हाला भेटीन. हि जादू दिवसा चालत नाही. सूर्यप्रकाश हा आमचा शत्रू आहे. मी लवकरच अशी शक्ती मिळवीन कि तुम्हाला मी माझ्यासारखं मस्त्य-मानव करू शकीन. मग आपण अनंत कालपर्यंत एकत्र राहू शकू.


मी ते चित्र माझ्या खास दालनात लावलं. ते दिसायला जरी छोटंसं असलं तरी भिंतीवर लावल्यावर ते खूप मोठं झालं. मग रोज रात्री आम्ही भेटू लागलो. दिवसेंवदिवस ती माझ्या प्रेमात गुरफटत चालली होती. मग खूप महिन्यांनी एका रात्री ती उत्साहानी ओसंडून जात आली आणि म्हणाली, “ आता आपण कायमसाठी एक होऊ शकतो. मी तुम्हाला माझ्यासारखं बनवण्याची शक्ती मिळवली आहे. तुम्ही आत्ताच माझ्याबरोबर चला. मी विचारात पडलो. मी तिच्याकडे काही दिवसांची मुदत मागितली मला माझ्या राज्याची व्यवस्था करून मी कायमचा तुझ्याजवळ येईन अस मी तिला सांगितलं ती आनंदानी तिकडून निघून गेली. खरंतर मुदत मागणं हा एक बहाणा होता. माझं जलपरीवर मनापासून प्रेम होत. परंतु तिच्यासाठी माझं राज्य, माझी प्रिय राणी हा निसर्ग, सूर्यप्रकाश सोडून काळोख्या समुद्रात एका मस्त्य-मानवाचं आयुष्य काढायची माझी तयारी नव्हती. मी न जाण्याचा निर्णय घेतला. ते चित्र भिंतीवरून काढायच ठरवलं पण काही केल्या ते निघतच नव्हतं. खूप दिवस गेल्यावर चित्रातल्या तिचा चेहरा रागीट दिसू लागला.


मग मी ते चित्र जाळण्याचा निश्चय केला जाळण्यासाठी चित्रजवळ जाताच तिचा आवाज दालनात घुमला, " हे राजा ! तू माझा, माझ्या प्रेमाचा अपमान केलास. मला नष्ट करायला निघालास. तुला माझ्या शक्तीची कल्पना नाही मी अमर आहे. मी नष्ट होऊ शकत नाही. तू माझी फसवणूक केलीस म्हणून मी तुला शाप देत आहे कि या क्षणी तुझ्यासकट हे राज्य समुद्रच्या पोटात जाईल. माझी खात्री आहे कि एक दिवस तू माझ्याकडे येशील. माझ्याकडे येण्याचा रस्ता तुला या चित्रातूनच मिळेल. तुझं सगळं राज्य जरी नष्ट झालं तरी हे चित्र अनेक युगे तसेच राहील आणि ते नक्की तुला मिळेल." मी भानावर आलो समोरच जलपरीची तसबीर होती. ती प्रचंड मोठी होती. मी काढायचा प्रयत्न करताच ती एकदम लहान झाली माझ्या बॅगमध्ये मावेल इतकी. तो फोटो काढताच एक प्रचंड गडगडाट होऊन ते दालन कोसळायला लागलं. मी कसाबसा बाहेर आलो. संपूर्ण बेटाला भूकंपाचे हादरे बसत होते. घाईने सर्वजण बोटीत चढलो. बोट थोडी पुढे जाताच एक मोठा आवाज होऊन संपूर्ण बेटच पाण्याखाली गेलं. जणू काही ते माझ्यासाठीच थांबलं होत. मला ती तसबीर मिळताच त्याचं काम झालं .


ती तसबीर भींतीवर लावल्यापासून एक धुंदी चढली आहे. तिच्या प्रेमाची!. काही दिवसात मी तिच्याकडे जाणार आहे. मागच्या जन्माची चुक या जन्मी सुधारणार आहे. मी तिच्याकडे जाऊन मी तिच्यासारखा झाल्यावर हि तसबीर पूर्णपणे नष्ट होईल. मी या जगाचा मोह सोडला आहे. कारण मला ती सर्वाधिक प्रिय आहे. सर्वांना माझा शेवटचा रामराम.


राजनी वाचन संपवलं राम्याच्या डोळ्यांत पाणी होत. मग अचानक अय्यप्पा म्हणाला "आपण सरांना अजूनही परत आणू शकतो. "कसं काय ?" अनिकेतने विचारलं. "अरे ! या डायरीप्रमाणे मस्त्य-मानव बनण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसणार नाहीतर ते चित्र नष्ट झालं असतं. आपण सरांना परत देण्याची त्या जलपरीला विनंती करू या. या देशाला सरांची गरज आहे." अय्यप्पा बोलला. सगळे तडक सरांच्या घरी गेले. त्या चित्रासमोर उभे राहिले, त्यांच्या डोळ्यासमोर ते चित्र अंधुक होत हळू-हळू नाहीस झालं. शेवटी राजा समुद्रनील त्याच्या जलपरीकडे गेला होता. " आता काय? " राज म्हणाला." दुसरं काय? आपण आपल्या रस्त्यानी जायचं. पोलीस तपास चालू ठेवतील. काही वर्षांनी फाईल बंद होईल." “शेवटी जलपरीला तिचं प्रेम मिळालं पण आपले सर आपण गमावले" राम्या भरल्या डोळ्यांनी म्हणाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller