SAMPADA DESHPANDE

Horror

4.1  

SAMPADA DESHPANDE

Horror

मामाचा गाव

मामाचा गाव

17 mins
875


"डिजिटल वर्ल्ड ला कंटाळला आहेत का ? मग हि जाहिरात फक्त तुमच्यासाठी आहे. शहरातल्या धकाधकीपासून दूर. सुंदर निसर्गरम्य खेड्यात, डोंगराच्या कुशीत , नदीच्या काठावर खास डेव्हलप केलेल्या खेड्यात तुमचे स्वागत आहे. इथे तुम्हला बैलगाडीची सैर, ट्रेकिंग, नदीत पोहणे, करवंदे, बोरं, जांभळे, आंबे, चिंचा अगदी तुमच्या हाताने तोडून खाता येतील. तसेच चुलीवरच्या स्वादिष्ट स्वयंपाकाचा आस्वाद घेता येईल, काय सुटलं ना तोंडाला पाणी ? जे जे तुम्ही सध्याच्या आयुष्यात मिस करता आहात ते सगळं इकडे आहे. मग वाट कसली बघताय ? याच मामाच्या गावाला. टीव्ही, मोबाईल याशिवाय पूर्वी आयुष्य किती सुखी होतं हे अनुभवा."

 " मेघा ए मेघा हे बघ आपण सुट्टीसाठी डेस्टिनेशन शोधत होतो ना ? हे बघ किती छान आणि हे फोटोज सुद्धा बघ. काय सुंदर जागा आहे!" इंटरनेट वरची जाहिरात बघून हरखून गेलेला रवी म्हणाला. मेघालाही आवडले ते ठिकाण. ती म्हणाली ," हे सगळं ठीक आहे. जागा खरंच सुंदर आहे रे ! पण साहेब आपलं जमणार आहे का मोबाइलशिवाय ? पाच मिनिट दिसला नाही तरी बेचैन होतोस. आणि हे तर पाच दिवसांचं पॅकेज आहे." रवी म्हणाला ," चालेल मला. हि जागा बघून मी प्रेमातच पडलोय. एक गम्मत समजली का तुला ? हे म्हणतात कि डिजिटल वर्ल्ड पासून दूर वगैरे , तरी यांना जाहिरात करायला याच डिजिटल वर्ल्ड ची मदत घ्यावी लागली. एक काम करतो मी विक्रम आणि सायलीला विचारतो. तेही आपल्यासारखे न्यू मॅरीड आहेत. एकत्र गेलो तर धमाल येईल." मेघा खुश होऊन म्हणाली," खरंच विचार एकत्र गेलो तर बोअरिंग होणार नाही." मग रवी, विक्रम, मेघा आणि सायली मामाच्या गावासाठी निघाले. कोकणात भिमापुर नावाचं छोटंसं गाव. त्याच्यापासून वीस किलोमीटर जंगलात एक जुनी वाडी होती. तिला डेव्हलप करून त्या जागेवर आताचा मामाचा गाव वसवला होता. संपूर्ण बाहेरच्या जगापासून अलिप्त अशी ती जागा होती. विक्रम म्हणाला," रवी अरे तू म्हणणे एकेक भन्नाट जागा शोधतोस बाबा ! कसा काय शोध लागला तुला या मामाच्या गावाचा? मी खूप शोधूनही मला कुठेही दिसलं नाही ते ?" रवी हसत म्हणाला," अरे ! विकी ती जाहिरात फक्त माझ्यासाठी होती." (रवीला माहित नव्हतं कि नकळतपणे तो खरं बोलून गेला होता. ती जाहिरात फक्त त्याला दिसावी म्हणूनच होती.)

  जाताना मधेच ते चहासाठी थांबले. गाडी रवी आणि विक्रम आलटून पालटून चालवत होते तरीही ते दमले होते. त्याच्या अंदाजानुसार ते गावाच्या जवळ आले होते. तरीही त्यांनी जरा रिलॅक्स व्हायचे ठरवले. ते पहाटे निघाले होते. आता संध्यकाळचे पाच वाजत आले होते. रवी आणि मेघा चहाच्या टपरीमागे असलेल्या नदीवर फिरायला गेले. जरा पाय मोकळे होतील म्हणून. नदी पाहून रवी म्हणाला," मेघा , बघ किती सुदंर आणि स्वच्छ नदी आहे असं वाटतंय कि आता उडी मारून पोहायला जावं." मेघा घाबरून म्हणाली," तू असं काही करणार नाहीयेस. या ठिकाणची आपल्याला काही माहिती नाही आणि तसंही तिकडे गेल्यावर पोहायला मिळणारच आहे ना ! नको तो आगाऊपणा करू नकोस." इतक्यात त्यांना एका बाईच्या ओरडण्याचा आवाज आला. ते तिकडे धावतच गेले. ती बाई जोरजोरात ओरडत होती. तिचा पाच वर्षांचा मुलगा नदीत वाहून चालला होता. रवीने ते पाहिलं त्यानी इतकं मोबाईल आणि पाकीट काढून मेघाच्या हातात दिलं आणि तडक नदीत उडी मारली. तो मुलगा प्रवाहात सापडला होता. रवी पोहण्यात एक्स्पर्ट होता. लहानपणी गावच्या नदीत पोहल्यामुळे त्याला प्रवाहात पोहायचा सर्व होता. त्याने पोहत जाऊन त्या मुलाला पकडले. आणि काठावर घेऊन आला. त्याचे पोट दाबून त्यातले पाणी काढून टाकले . तो मुलगा शुद्धीवर आला. तो खूप घाबरला होता. तो जाऊन आईला बिलगला. इतक्यात त्याचे वडील म्हणजे चहाचा टपरीवाला तिकडे आला. त्याला सगळा प्रकार समजल्यावर तो रवीच्या पाया पडून म्हणाला," साहेब लै उपकार झाले तुमचे. आज तुमच्यामुळं माझ्या लेकराचा जीव वाचला. तुमचे उपकार कसे फेडू समजत नाय. एक सांगतो साहेब. मगाशी तुमी बोलत व्हता ना मामाचा गाव कि कायतरी ? एक सांगू साहेब बिलकुल जाऊ नका. लै वंगाळ जागा हाय. मागल्या महिन्यात बी तुमच्यावानी पोरं आली व्हती. जाताना इकडेच थांबलेली. जाताना दिसली पर येणार नाय दिसली. आमी गावातले लोक त्याला ठाकूरची वाडी बोलतो. भुताटकी हाय साहेब तिथं. तुमालाबी सांगितलं नसतं. पन तुमी माझ्या लेकराचा जीव वचावलाय. तुमाला सांगितल्याबिगर कसा राहू ? जाणारच असाल तर योक सांगतो, तुमचा विस्वास बसणार नाय पन काय बी संकट आला तर इकडच्या जंगलात एक बाबा हाय. बजरंगबाबा नाव हाय त्याचा. बघतो तेंव्हापासून त्यो तसाच हाय फकस्त त्याच्या नावानी हाक मारा. तुमच्या मदतीला यील त्यो. जेंव्हा पण गावातला कोणी ठाकूरच्या वाडीत अडकला तेंव्हा तेंव्हा त्याला बजरंगबाबा नी सोडवलाय. आदी तर तुम्ही जाऊच नका तिकडं मी हेच सांगीन." रवी हसत म्हणाला," अहो आमचा या भुताखेतांवर विश्वास नाही. दुसरा काही धोका म्हणून जाऊ नका म्हणत असाल तर सांगा. अहो आम्ही पाच दिवसांचे पैसे भरलेत. आता परत जाऊ शकत नाही. पण तुम्ही सांगितलं ते लक्षात ठेवीन आणि वाहिनी या छोट्याला सांभाळा. त्याला पाण्याजवळ जाऊन देऊ नका. बरं येतो आम्ही." चहावाल्याची बायको म्हणाली," काळजी घ्या साहेब. आमी तुमच्यापरीस शिकलेले नाय, पण त्या ठाकूरच्या वाडीत कायतरी हाय ते वाईट हाय. हे आमालाबी कळतंय. तुमी देवमाणूस हाईत आमच्यासाठी. जपून राहा. बेसावध राहू नका." मग मेघा म्हणाली," इतकं घाबरण्यासारखं काय आहे त्या वाडीत ?" चहावाला म्हणाला," जुनी स्टोरी हाय. आमच्या आजानी एका बामनांकडून लिहून घेतलीय. म्या देतो तुमाला. तसबी आपल्याला कुठं वाचाय येतंय!" मग तो दुकानात गेला आणि एक नीट सांभाळून ठेवलेली जुनी छोटी वही घेऊन आला. त्यावर मारुतीचं चित्र होतं. मेघा ते बघत असताना विक्रमच्या हाका ऐकू आल्या. तसा रवी मेघाला म्हणाला,” इथे काय घडलं हे त्यांना सांगू नको सायली संशयी आहे. “मग मेघानी ती वही पर्समध्ये लपवली. ते निघाले. पण त्यांचा चहावाल्याशी संवाद चालू असताना कोणीतरी ते चोरून ऐकत होतं हे त्यांना समजले सुद्धा नाही.

मग थोडा दूर गेल्यावर त्यांना एक फाटा लागला, तिथे 'मामाचा गाव' असा लिहिलेला बोर्ड दिसला. तिकडून ते आत वळले. मग जवळ जवळ अर्धा तास गाडी चालवल्यावर त्यांना गेट लागले. तोपर्यंत साडेसात वाजले होते. गेटवर मशाली होत्या. त्यांनी गेट वाजवल्यावर. एक गडी धावत आला," या साहेब ! उशीर झाला तुम्हाला ? कधीपासून मालक वाट बघत आहेत. या इकडे." ते त्याच्यामागे गेले. तिथे कुठेही विजेचे दिवे नव्हते. सगळीकडे रॉकेलचे दिवे लावले होते. ते वातावरण पाहून मेघा आणि सायली घाबरल्या होत्या. शहरात लहानाच्या मोठ्या झाल्यामुळे त्यांना अशा वातावरणाची सवय नव्हती. मग तो गडी त्यांना एका बांबूच्या गोलाकार जागेजवळ घेऊन आला. तिकडून एक उंच धिप्पाड माणूस त्यांना सामोरा आला. रवीबरोबर हात मिळवत म्हणाला," नमस्कार मी आबासाहेब ठाकूर. या मामाच्या गावाचा मालक. तुमचं सामान भिवा तुमच्या खोल्यांमध्ये ठेवेल. तुम्ही हातपाय धुवून जेवायला या." एकतर हे भयानक वातावरण आणि इतका उंच धिप्पाड माणूस पाहून मेघा, सायली खूप घाबरल्या होत्या. त्या चुपचाप जाऊन जेवायला बसल्या. गावरान मटण आणि चुलीवरच्या गरमागरम भाकरी पानात पडल्यावर सर्वानी त्यावर ताव मारला. जेवण करणाऱ्या रमाबाईंनी त्यांना आग्रहाने वाढलं. सर्वानी त्यांची तोंडभरून स्तुती केली. जेवल्यावर मग ते आपल्या खोलीत गेले.त्या सुंदर अशा बांबूच्या झोपड्या होत्या. तिथेही रॉकेलचे दिवे लावले होते. " काय मस्त वाटतंय ना ?" रवी म्हणाला." मला तर भीती वाटतेय. एक तर तो मालक ठाकूर किती डेंजरस दिसतोय ! आणि ती चहावाल्यानी सांगितलेली स्टोरी बापरे मला तर भीतीच वाटतेय. " खरंतर मला ती स्टोरी वाचायची आहे पण आता इतक्या काळोखात कसं वाचू कळत नाही. आता तू कुठे निघालास तयार होऊन?" रवी म्हणाला," अगं आलो जाऊन मगाशी गाडी अशीच लावलीय, जरा नीट लावून येतो." मेघा घाबरून म्हणाली." नाही मी पण येते मला खूप भीती वाटतेय एकटीच कुठे राहू इथे ! " रवी हसत म्हणाला," बरं चल. विकी आणि सायलीला नको हाक मारायला दमून झोपलेपण असतील. मग ते दोघे निघाले. बाहेरचे दिवे गेले होते. किट्ट काळोख पसरला होता. मेघानी निघताना अगदी शेवटच्या क्षणी म्हणून टॉर्च घेतली होती ते बरं झालं असं रवीच्या मनात आलं. मग ते निघाले. बाहेर पडून आले त्या रस्त्यानी निघाले. पण काही केल्या त्यांना गेट कोणत्या दिशेला आहे हे सापडेना. हे असं काय होतंय हेच त्यांना समजत नव्हते. गेट कुठे गेलं? त्यांनी त्यांची गाडी गेटपासून खूप लांब उभी केली होती कारण आत यायला कसा रस्ता आहे हे कळत नव्हतं.आता त्यांना सगळीकडे फक्त काळोख दिसत होता. काय झालंय हेच कळत नव्हतं. दिशा चुकत होत्या. आकाशात चंद्रही नव्हता. बहुतेक आमावस्या असावी.आल्यापासून पहिल्यांदाच रवीच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.

काहीतरी वेगळे असल्याची जाणीव झाली. पण त्याला घाबरून चालणार नव्हतं सोबत मेघा होती, तसेच विक्रम आणि सायलीलाही त्यानेच इकडे आणले होते. आता त्याला एक एक गोष्टी आठवू लागल्या, कितीही प्रयत्न करूनही विक्रमला ती साईट का सापडली नव्हती ? इकडे येताना त्या चहावाल्यानी आणि त्याच्या बायकोनी परोपरीने का समजावले होते ? त्यांच्याआधीसुद्धा एक ग्रुप आला होता तो परत गेला नाही असं तो चहावाला म्हणाला ते कुठे गेले असतील? नाही नाही मला असे वाईट विचार करून चालणार नाही त्याने स्वतःला समजावले. तो ग्रुप कदाचित रात्री गेला असेल जेंव्हा चहावाल्याने दुकान बंद केले असेल. मग त्यांनी परत आपल्या जागेत जायचे ठरवले. ते परत फिरले. मेघा तर भीतीने थरथरत होती. ते मागे फिरले इतक्यात त्यांना विक्रम आणि सायलीच्या हाका ऐकू आल्या, रवीने त्यांना प्रतिसाद देऊन त्यांच्या दिशेने बोलावले. ते दोघेही घाबरलेले दिसत होते. "अरे! कुठे होतात तुम्ही दोघे ? आम्ही शोधून आणि हाका मारून दमलो." विक्रम धापा टाकत बोलला. रवी म्हणाला," अरे काही नाही गाडी नीट लावायला निघालो होतो पण काळोखात गेट सापडेना म्हणून परत फिरत होतो. सकाळी बघू म्हटलं आणि तुम्ही बाहेर कसे ? मला वाटलं झोपला असाल म्हणून हाक मारली नाही." विक्रम म्हणाला ," अरे कसली झोप ! आमच्या खोलीत पाणी नव्हतं म्हणून आपण जेवलो ना त्या ठिकाणी पाणी मागायला गेलो तर काय दिसलं बापरे, देवा वाचव अरे रवी कोणत्या भयानक जागी आणलंस बाबा मला ?" रवी चकित होऊन म्हणाला," अरे विक्रम काय झालं नीट सांगशील का ?इथे जरा काळोख आहे, आपल्याला सवय नाही म्हणून जरा बावरायला होतंय इतकंच. "सायली थरथरत म्हणाली," काळोख आहे म्हणून ? जरा जाऊन बघ त्या जागी. तरी मी विकी ला सांगत होते अशा अनोळखी जागी नको जाऊया , त्याला मित्राचा भारी पुळका तू सांगितलंस आणि निघाला." इतक्यात मेघा पटकन म्हणाली," सायली, विक्रम आम्हाला माफ करा आणि आपण सगळेच घाबरलोत आधी आपण त्या जागेवर जाऊन पाहुयात काय आहे ते. जर हे संकट असेल तर आपण एकत्र राहून यावर मात करू शकतो, भांडण करून नाही." मग सायली आणि विक्रम यांनी माना डोलावल्या आपल्याबरोबच हे दोघेही संकटात आहेत यांची त्यांना जाणीव झाली. मग विक्रमने दाखवलेल्या दिशेनी ते निघाले. समोर एक जुनाट ताडपत्री घातलेला मांडव होता. रवीने टॉर्च मारून पहिले. तिकडे सगळीकडे जळमटं होती ,कितीतरी वर्षांमध्ये तिकडे कोणीच फिरकले नाही. मग ते जिथे जेवण बनवलं होतं त्या छोट्या खोलीकडे गेले. टॉर्च फिरवताना अचानक एक नऊवारी साडीवर प्रकाश पडला आणि बघतात तर काय ती साडी एका सांगाड्याच्या अंगावर होती. मेघा आणि सायली जोरात किंचाळल्या ते धावतच बाहेर आले. ते त्यांच्या राहायच्या जागी गेले तर तिकडेही पडीक खोल्या होत्या त्यात त्यांचे सामान पडले होते. " बापरे आता काय करायचं ?" विक्रम घाबरून म्हणाला. सायली आणि मेघा तर बेशुद्ध पडायच्या बेतात होत्या. इतक्यात त्यांना कोणीतरी आपल्यावर पाळत ठेऊन आहे असं जाणवलं. रवी जोरात ओरडला," कोण आहे तिकडे ?" आणि तो पळणाऱ्या व्यक्तीच्या मागे धावत गेला. पळणारी व्यक्ती जोरात पळू शकली नाही. रवीने पहिले तर तो त्यांना गेट उघडून आत घेतलेला म्हातारा नोकर होता. त्याला पाहून ते चिडले. विक्रमने त्याच्या दोन थोबाडात लगावून दिल्या ," बोल साल्या काय आहे हा प्रकार ? कोण आहात तुम्ही ? बोल नाहीतर तुला खलास करतो." तो घाबरून म्हणाला," बोललो तर मालक मला ठार करतील." रवी चिडून म्हणाला,"बोलतो कि आता तुझी नखं उखडून टाकू ? हाल हाल करून मारिन तुला. मी पोलिसात आहे. बोल हा काय प्रकार आहे ? तू कोण आहेस ? ठाकूर कोण ? आत असलेला सांगाडा कोणाचा आहे ? बोल लवकर." तो म्हातारा घाबरून म्हणाला," जास्त काय माहित नाय साहेब . आमच्या कितीतरी पिढ्या ठाकुरांकडे कामाला आहेत. ते आबासाहेबा लै दुष्ट जे हवे हे जबरदस्तीने मिळवणारे. त्यांना जो नडला त्याला ठार मारून इथेच पुरायचे. त्या माणसाचा कधीच पत्ता लागायचा नाय. गावातल्या पोरीबाळींवर या आबासाहेबाची वंगाळ नजर असाच एक प्रकरण महागात पडला. एका पोरीला उचलून आणली, तिच्या घरच्यांनी चिडून या आबासाहेबाला ठार मारून त्याच्याच जागेत पुरला. आमचं काम फकस्त बाहेरच्या जगातल्या बातम्या आबासाहेबांना द्यायच्या, ती जाहिरात माझा मुलगा तुमचं काय नेट असतं तिकडं टाकतो, तोच माणसांशी बोलून पैसे घेतो आणि त्यांना इकडं धाडतो. ती जाहिरात फकस्त एकाच माणसाला दिसते. दिसली कि तो जाळ्यात सापडतो. जे पैसे मिळतात ते आम्ही घेतो आणि मालकांचं काम करतो. ते सर्वाना मारून टाकतात. त्यामुळं त्यांना ताकद येते. तुमि आलात त्या चा च्या टपरीवर तेंव्हापासून तुमच्यावर नजर ठेऊन व्हतो. त्या चा वाल्यानी सांगितल्यावर मला वाटलं तुमि परत फिरणार पण तुम्ही आले आणि मालकांच्या जाळ्यात सापडले. ह्यो मामाचा गाव नाय तर मरणाचा गाव हाय आता तुमास्नी कोणी वाचवू शकत नाय. आणि ती आमची स्वयंपाकीण रमाबाई ती पण मालकांच्या सोबत हाय. मरा आता." असं बोलून तो जोरजोरात हसू लागला. त्याला हसताना पाहून विक्रम आणि रवीने त्याला रागाने तुडवायला सुरवात केली. मग सायली म्हणाली थांबा दोघे," त्याला मारून काय होणार आहे ? जाऊ दे त्याला. आपल्याला बाहेर पडायचा मार्ग शोधला पाहिजे." " ते तर आहेच सायली. पण यालाही सोडायचं नाही त्याचं जे काय होईल ते आपल्या सोबतच. त्याला इथे बांधून ठेऊ." विक्रम म्हणाला. मग त्यांनी तिथेच पडलेल्या एका जुन्या दोरीने त्या गड्याला बांधून ठेवले. मग मात्र तो घाबरला. गयावया करू लागला. जर आपण इथे राहिलो तर मालक मलाही मारून टाकतील असे बोलू लागला. मग ते त्याला बाहेर पडायचा रस्ता विचारू लागले. त्याने कोपऱ्यातल्या एका झाडाकडे बोट दाखवले.तिकडे जाऊन सगळे बघतात तर काय तिथे काहीच नव्हते. मग मात्र तो गडी घाबरला, जोरजोरात रडू लागला ," मी तुम्हाला मालकांबद्दल सांगितलं आता माझाबी रस्ता बंद झाला आता मालक मला मारून टाकणार उद्या रातीला आपण मारणार. उद्या अवस हाय. मालकांचा बळीचा दिवस. उद्या आपण मरणार." असे काहीसे बोलून तो हात वारे करू लागला. वेड्यासारखे वागू लागला. इतक्यात दिवस उजाडला.सगळे कालच्या प्रवासाने आणि रात्रीच्या प्रकाराने खूप दमले होते. त्यांनी संपूर्ण वाडी फिरून पहिली पण जसा तो भाग बाहेरच्या जगापासून वेगळा काढल्यासारखा होता. त्यांना बाहेरचे काहीच दिसत नव्हते. इतकंच काय पक्षांचे आवाजही येत नव्हते. दुपारचे बारा वाजले तरी त्यांना काहीच उपाय सापडला नाही. हताश होऊन ते त्या ताडपत्रीच्या टपरीत बसले. सायली, विक्रम, रवी, मेघा सगळ्यांनी प्रवासात सोबत घेतलेली बिस्कीट, खाकरे खाऊन घेतलं. मग आराम करण्यासाठी सगळे तिकडे आडवे झाले. विक्रम, रवी, सायली दोन मिनिटात झोपून पण गेले. मेघाला काही झोप येत नव्हती. जर रस्ता सापडला नाही तर आज ते सगळे मरणार होते. रवीला कुठून इकडे येण्याची अवदसा सुचली कोणास ठाऊक. समोरच तो गडी बसला होता. ती त्याच्याकडे जाऊन म्हणाली," बाबा आम्ही तुमच्या मुलांसारखे. आपल्या सगळ्यांवर किती मोठा संकट आलं आहे बघताय. जरा आठवा एखादा तरी मार्ग असेल ना ! यातून सुटायचा." तो माणूस रडत म्हणाला," नाय ग पोरी मार्ग असला तरी मला थोडीच समजणार ! आम्ही तर फक्त लोकांना अडकवलं. खूप मोठं पाप केलं आमच्या आजा, पणज्यानी तेच आम्हीही चालू ठेवलं, देव सोडून सैतानाची चाकरी धरली, आता त्याचीच फळं भोगणार आहे. पण पोरी म्या तुमच्यावर लक्ष ठेवत व्हतो तेंव्हा त्यो चा ची टपरीवाला तुमास्नी कायतरी सांगत व्हता ना ?बग आठवून. म्या तर लांब व्हतो नीट ऐकू आलं नाय." मग मेघाला आठवलं ती टपरीवाल्यानी दिलेली वही , तिनी तिच्या पर्स मध्ये लपवली होती. तो टपरीवाला काहीतरी म्हणत होता कि तुम्ही जर संकटात असला तर त्याला हाक मारून बोलवा.त्याचं नाव तिला आठवत नव्हतं. मग तिने तिच्या पर्स मध्ये शोधले असताना तिला हनुमानाचे चित्र असलेली एक जुनी वही दिसली तीच जी त्या टपरीवाल्याने तिला दिली होती. तिने वाचायला सुरवात केली.

" ठाकूर घराणं देवभोळं , त्यांच्याकडे सतत भजनं, कीर्तनं, पूजा चालूच असायच्या आणि त्यांचा मुख्य पुजारी होतो मी रामभट. सगळे ठाकूर शाकाहारी, सालस सोज्वळ. असे हे लोक अगदी देवमाणसं. अशा या देवमाणसांच्या घरात आबासाहेब ठाकूर हा सैतान शिरला. खरंतर हा दत्तक मुलगा. आबासाहेबांच्या वडील राजाराम ठाकूर याना मुलबाळ नसल्याने नात्यातल्याच एका मुलीचं हे बाळ त्यांनी दत्तक घेतलं. तिला गावातल्याच एका मुलाने फसवलं आणि त्यातूनच हा मुलगा झाला. राजाराम ठाकुरांनी त्याला आपलं नावच नाही तर संस्कारही देण्याचा प्रयत्न केला. पण हा लहानपणापासूनच बंडखोर, मुजोर कोणाचंही न ऐकणारा. वयात आल्यावर त्याने गावातल्या पोरीबाळींवर वाईट नजर टाकायला सुरवात केली. जे तक्रार घेऊन राजाराम ठाकुरांकडे जायचे ते आणि त्यांची मुलगी कधीच परत दिसायचे नाहीत. राजारामही आता थकले त्यांचा आबासाहेबांवर वचक राहिला नाही. मग घरातले एक एक करून सगळे लोक नाहीसे व्हायला लागले. गावात कुजबुज झाली आबासाहेब सगळ्यांना मारून त्यांच्याच शेतात पुरतो. त्यांनी म्हणे आपलं देव सोडून वेगळ्याच देवाची पूजा चालू केली होती. त्यांनी ज्या लोकांना मारून पुरलं त्यांच्याच आत्म्यांना गुलाम बनवून तो आपली कामे करून घेत होता. राजाराम हनुमानाचे भक्त होते. का कोणास ठाऊक आबासाहेब त्यांना हात लावायला घाबरत असे. मग ते गावातल्या पोरीचं प्रकरण झालं. एक ना एक दिवस होणारच होतं. गावातल्या लोकांनी आबासाहेबांना हालहाल करून मारल आणि त्याच्याच शेतात पुरल. मरताना तो खदाखदा हसत होता आणि म्हणत होता ," मी येईन परत बदला घ्यायला. मी येईन कोणालाही सोडणार नाही.' तो गेल्यावर काही दिवसात राजारामही कुठेतरी नाहीसे झाले. ते गेल्याच्या काही वर्षांनंतर जंगलात बजरंगबाबा दिसू लागले. ते हनुमानाचे भक्त होते. इकडे ठाकूरांच्या वाडीवर रात्रीचे लोक फिरताना दिसू लागले. जे लोक पूर्वी नाहीसे झाले ते दिसू लागले, आपल्या नातेवाईकांना हाक मारू लागले. जे फसून गेले त्यांची छिन्नविछिन्न झालेली प्रेतं सापडू लागली. आबासाहेब ठाकुरांचा आत्मा त्या जागेवर राज्य करू लागला. लोकांनी जंगलातल्या बजरंगबाबाला साकडं घातलं. तेंव्हा त्याने सांगितलं कि," जो कोणी आबासाहेबांच्या तावडीत सापडलेला माझं नाव पुकारेल मी त्याच्यासाठी धावून जाईन." आणि तसा तो मदतीला गेलाही, अनेकांना बजरंगबाबाने ठाकूरच्या तावडीतून सोडवलं. म्हणून जो कोणी या आबासाहेबांच्या तावडीत सापडेल त्याने बजरंगबाबाला हाक मारा त्याला संकट जाणवेल आणि तो येईल. पण त्यालाही माहित नाही कि आबासाहेबांपासून कायमची कशी सुटका करून घ्यायची. ती वेळही येईल जेंव्हा या सैतानाचा कायमचा शेवट होईल आणि हि जागा कायमची मुक्त होईल."

 वाचतावाचता डोळा कधी लागला ते मेघाला समजलंच नाही. सगळ्यांना जग आली तेंव्हा संध्याकाळ झाली होती आणि त्या जागेत एक प्रचंड हास्याचा आवाज येऊ लागला. ते ज्या जागी बसले होते. त्याच्या मागून अचानक एका बाईचा आवाज आला," कसं हैत पावन काय मटण भाकरी वाढू का ? हि हि हि ......" काल रात्री जिचा सांगाडा पहिला ती रमाबाई आता त्याच साडीत त्यांना जेवायला वाढू का विचारत होती. ते तिकडून धावत सुटले आणि समोरच्या झाडाखाली आले, तर समोरच्या झाडावर एक लांब केसवाली बाई बसली होती. उंच फांदीवर बसूनही तिचे उलटे पाय आणि केस जमिनीला लागत होते, तिचे डोळे पूर्ण पांढरे होते. हा सगळं प्रकार पाहून ते सगळेजण प्रचंड घाबरले. त्या सगळ्यांना मेघा म्हणाली," मी सांगते ते ऐका, या सर्व भुताटकीला फक्त बजरंगबाबा थांबवू शकतात. त्यांचं नाव घेऊन हाक मारा, जर इथून बाहेर पडायचं असे; तर हाक मारा." त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर जमिनीत पुरलेल्या लोकांचे प्रेतात्मे जमिनीतून निघून त्यांच्या दिशेने येत होते. त्याच्यासोबतच आबासाहेब ठाकूराचा १० फुटी देह त्याच्या दिशेने येत होता.

ते घाबरून ओरडले," बजरंगबाबा वाचवा आम्हला, वाचावा." इतक्यात एक आवाज आला, " जय बजरंगबली" एक उंच धिप्पाड तेजस्वी व्यक्ती त्यांच्या दिशेने येत होती. त्यांची दाढी जमिनीपर्यंत लांब होती. त्यांनी हातातल्या झोळीतून भस्म काढून समोर फुकलं त्याचबरोबर सगळी भुतावळ नाहीशी झाली. मग ते म्हणाले "पोरांनो ठीक आहात ना ? मी बजरंगबाबा. तुम्हाला सोडवायला आलो." सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला. मग ते म्हणाले," मी गावातल्या लोकांना सोडवले तेंव्हा सुटका सोपी होती. आजची आमावस्या खास आहे. ती १०० वर्षांमधून एकदा येते. आजच्या दिवशी प्रेतात्मे खास शक्तिशाली होतात. जर आपण त्यांचे मूळ शोधून घाव केला तरच आपण सगळे बाहेर पडू शकतो. नाहीतर तुमच्याबरोबर मीही इकडे मारून जाईन." मेघा म्हणाली," बाबा ! अहो हे काय आहे. राजाराम ठाकुरांनी कोणत्या मुलाला दत्तक घेतले ? जो सैतानाची पूजा करायचा. ते त्याला चांगले संस्कारही देऊ शकले नाहीत का? असा कसा बाप आहे जो मुलाचे सगळे चाळे बघून काहीच बोलला नाही ?आणि शेवटी कुठेतरी नाहीसा झाला? " ते बाबा दुःखानी म्हणाले," बरोबर आहे पोरी तुझं. तो बाप कुठे नाहीसा झाला नाही अजूनही शापित आयुष्य जगतो आहे. बजरंगबाबाच्या रूपाने. ( सगळ्यांच्या चकित झालेल्या चेहऱ्याकडे बघून) हो मीच आहे राजाराम ठाकूर. आणि माझ्या मुलानी कोणत्याही सैतानाची पूजा केली नाही. तोच मुळात सैतान होता, दुष्ट वृत्तीच्या माणसांना कोणत्याही सैतानाची गरज पडत नाही. मी आबासाहेबाला लोकांनी मारले तेंव्हा गावच्या घरात होतो. आजारी अंथरुणात होतो. मग कसाबसा तोंड लपवून जंगलात निघून गेलो. तिकडे आम्ही ठाकुरांनी बांधलेलं एक हनुमानाचे मंदिर आहे त्यात तप करत बसलो. अशी काही वर्ष गेली. मग एक दिवस बजरंगबलीने मला दृष्टांत दिला त्या आबासाहेबाच्या तावडीतून लोकांना सोडवण्याची शक्ती दिली पण हे शापित आयुष्यही दिलं जोपर्यंत या आबासाहेबाचा नाश करत नाही तोपर्यंत मला मुक्ती नाही." "पण त्याचा नाश कसा होईल ?" विक्रमने विचारले. " तुम्ही सांगा, एखाद्या माणसाला मुक्ती कशी मिळते ?" बजरंगबाबाने विचारले." मृत्यूपश्चात जेंव्हा त्याच्यावर विधिवत अंतिमसंस्कार होतात तेंव्हा." मेघा म्हणाली. बाबा म्हणाले," बरोबर ! मग आपण आता आबासाहेबाचा पुरलेला मृतदेह शोधून काढायचा आणि त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करायचे. हाच एक उपाय आहे. " ज्याप्रमाणे ऐकले आहे इकडे तर कितीतरी मृतदेह गाडले आहेत. त्याला कसा ओळखायचा?" " त्याच्या गळ्यात आमचं खानदानी पदक आहे. ज्या मृतदेहाच्या गळ्यात ते असेल तोच आबासाहेब. आपल्याजवळ फक्त रात्री बारापर्यंतचा वेळ आहे त्याच्या आत काम झालं पाहिजे. बारा वाजता ते शक्तिशाली होतील मग आपण काही करू शकणार नाही. जा मुलांनो शोध घ्या. तुमच्या मार्गात ती भुतावळ येणार नाही याची काळजी मी घेतो.(गड्याकडे वळून) तुही जा मूर्खा अजूनपर्यंत आबासाहेबांनी चाकरी करून खूप पाप जमा केलं आहेस आता जरा या मुलांना मदत करून पुण्याचं काम कर. " मग बाबांनी सगळ्यांच्या गळ्यात ताईत बांधले. त्यांना तिकडच्या ऐका खोलीत खोदकामाचे सामान सापडले. ते कामाला लागले. तो गडी जिथे जिथे लोकांना पुरले ती जागा दाखवत होता. इकडे राजाराम उर्फ बजरंगबाबा तिथल्या झडाच्या फांद्या तोडून एक मोठी चिता बनवत होते. इकडे विक्रम आणि रवी खोदत होते. आबासाहेबांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या दुर्दैवी जीवांना आता मुक्ती मिळणार होती. सापडलेले सांगाडे गडी चितेवर नेऊन ठेवत होता. वेळ वेगाने पुढे सरकत होती. पावणे बारा वाजले होते. मेघा आणि सायलीने रमाबाईचा सांगाडा चितेवर आणून ठेवला. सगळे आता काळजीत पडले कि आबासाहेबाचा देह कुठे असावा ? वेळ सरत चालली होती. सगळे चिंतातुर झाले होते. इतक्यात मेघा म्हणाली," आपण आलो तेंव्हा आबासाहेब त्या ताडपत्रीच्या टपरीत होते. आपण जेवलो तेंव्हाही ते तिकडेच होते बाहेर गेलेच नाहीत. आता रात्र झाल्यावर ते तिकडूनच आले. चला पटकन मला समजलंय ते कुठे आहेत ते. " मग ते रमाबाईचा सांगाडा सापडला तिकडे गेले. मेघानी त्या छोट्या खोलीत खोदायला सांगितलं. जमीन शेणाने सारवलेली होती. रवी आणि विक्रमने खोदायला सुरवात करताच, दोन फुटावर एक सांगाडा सापडला त्याच्या गळ्यात एक पदक होते. सायली मोबाईलमध्ये बघून म्हणाली" चला लवकर बारा वाजत आले." ते धावतच चितेजवळ तो सांगाडा घेऊन गेले. इतक्यात बारा वाजले. कानठळ्या बसवणारा आबासाहेबांचा आवाज आला. सगळे घाबरून तिकडे बघत असतानाच राजाराम ठाकुरांनी मंत्र म्हणून चिता पेटवली. आबासाहेब आणि इतर आत्मे एक एक करून मुक्त होऊ लागले. सरते शेवटी जाळून भस्म झाले . सगळ्यांनी राजाराम ठाकूरांना नमस्कार केला. त्यांनी हसून आशीर्वाद दिला. त्याचक्षणी त्यांच्या अंगातून एक दिव्य ज्योत निघून अनंतात विलीन झाली. रवीच्या ओरडण्याने ते भानावर आले ," अरे ती बघा आपली गाडी. चला लवकर" सगळे धावतच गाडीत जाऊन बसले. पाणी प्यायले, आता सगळ्यांनाच निघायची घाई झाली होती. कधी एकदा मुंबईला जातो असे त्यांना झाले होते. ते निघाले. जाताना चहाच्या टपरीवर थांबून त्याचे आभार मानायला ते विसरले नाहीत .


स्थळ दिल्ली ......

विकास आणि त्याची बायको माधवी हनिमून साठी हटके डेस्टिनेशन शोधत होते. इतक्यात विकासाला एक ऍड दिसली     "डिजिटल वर्ल्ड ला कंटाळला आहेत का ? मग हि जाहिरात फक्त तुमच्यासाठी आहे. शहरातल्या धकाधकीपासून दूर. सुंदर निसर्गरम्य खेड्यात, डोंगराच्या कुशीत , नदीच्या काठावर खास डेव्हलप केलेल्या खेड्यात तुमचे स्वागत आहे. इथे तुम्हला बैलगाडीची सैर, ट्रेकिंग, नदीत पोहणे, करवंदे, बोरं, जांभळे, आंबे, चिंचा अगदी तुमच्या हाताने तोडून खाता येतील. तसेच चुलीवरच्या स्वादिष्ट स्वयंपाकाचा आस्वाद घेता येईल, काय सुटलं ना तोंडाला पाणी ? जे जे तुम्ही सध्याच्या आयुष्यात मिस करता आहात ते सगळं इकडे आहे. मग वाट कसली बघताय ? याच मामाच्या गावाला. टीव्ही, मोबाईल याशिवाय पूर्वी आयुष्य किती सुखी होतं हे अनुभवा."

तो जाम खूष झाला. " ए माधवी आपण हनिमूनला कोकणात मामाच्या गावाला जायचं बरं का ?"                                                                                                                       


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror