वन नाइट स्टॅंड
वन नाइट स्टॅंड


"च्यायला, या मॅनेजमेंटच्या..... का हे लोक अशा विचित्र लोकशनला प्रोग्रॅम्स ठेवतात..... ते पण भर पावसाळ्यात?" प्रकाश त्या मुसळधार पावसात वैतागत त्याची कार चालवत होता. पावसाचा फार राग यायचा त्याला. पाऊस म्हणजे सगळा चिखल आणि अंधारलेल वातावरण यात लोकांना काय रोमँटिक वाटतं देव जाणे..... असेच काहीसे विचार त्याचे. प्रकाश एक उंचपुरा, देखणा आणि गहूवर्णी असामी. कोणीही लगेच फिदा होईल असं व्यक्तिमत्व. आणि त्याचे डोळे.... त्याच्यासोबत बोलणारा त्याच्या गहिऱ्या तपकिरी डोळ्यात हरवून जायचा. समोरच्याच्या काळजाचाच वेध घ्यायचे जणू ते. आणि मार्केटिंगमध्ये करियर केल्यामुळे आपसूक लाघवी आणि रसाळ वाणी लाभलेली. समोरच्याला नकळत आपलस करण्याची कलाच जणू अवगत होती त्याला. एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीच्या मार्केटिंग मॅनेजरच्या पदावर गेल्या चार वर्षांपासून कार्यरत होता. आज कंपनीच्या सगळ्या सिनियर लोकांचा रिवार्डस आणि रेकग्निशनचा प्रोग्रॅम होता. सगळे मॅनेजर्स, हेड्स आणि कंपनीचे डिरेक्टर्स पण स्वतः हजर होते. मागच्या क्वार्टरमध्ये दणदणीत सेल झाल्यामुळे सगळ्यांना त्या शहराबाहेरच्या फेमस रिसॉर्टमध्ये पार्टी होती. सगळ्यांची 'सो कॉल्ड' भाषण, पार्टी, दंगा मस्ती ह्या गोंधळात निघायला बराच उशीर झाला.
तसं रात्रीचे नऊ वाजलेले फक्त पण अफाट कोसळणाऱ्या त्या पावसामुळे मध्यरात्रीचा फील येत होता. प्रकाशला तसंपण पाऊस आवडायचा नाही. त्यात या अशा मुसळधार पावसात गाडी चालवायला समोर काही नीट दिसत पण नाही. शहराबाहेरच्या रस्त्यावर सगळंच बिन भरवश्याच. कधी कुठून एखादा दगड कोसळेल किंवा दरड काही सांगता नाही येत. वैतागत आणि मॅनेजमेंटला शिव्या देत तो हळू हळू गाडी चालवत होता.
पुढे दूरवर कुठेतरी एखादी स्ट्रीटलाईट मिणमिणत होती. तेवढ्याशा प्रकाशात त्याला पुढे कोणतीतरी गाडी उभी असल्याचं जाणवलं. त्याने जवळ नेत आपली गाडी थांबवली. ही गाडी कुठेतरी पाहिलीय असं विचारच करत होता तेवढ्यात त्या गाडीतून कोणीतरी युवती बाहेर आली आणि प्रकाशच्या गाडीच्या काचेवर टकटक करू लागली. आता काच खाली करण्यावाचून पर्याय नव्हता त्याच्याकडे. वैतागत, आंबट तोंड करत त्याने काच खाली केली आणि बघतो तर समोर ' बेला' त्याची सिनियर.
"माझी गाडी बंद पडलीय... प्लिज मला पुढे शहरापर्यंत लिफ्ट देऊ शकता का??? " प्रकाश तिच्याकडे बघतच राहिला. पार्टीला आज चक्क मॅडम साडी घालून आलेल्या. त्या पावसात भिजून अर्धवट मेकअप वाहून गेल्यावर पण खूप सुंदर दिसत होती. भिजलेली साडी तिच्या कमनीय बांध्यावर चिकटून तिच्या शरीराची सुंदरता अधोरेखित करत होती. पावसाचा प्रत्येक थेंब तिला स्पर्शून आज धन्य होत असेल त्याला मनाशी वाटून गेलं. ‘काश!!! हम इस बारिश कि एक बून्द होते... जमी पर गिरने से पहले उनकी होठो को तो चुम लेते..’
"मॅम... सोडतो ना तुम्हाला... त्यात काय." उतरलेला त्याचा चेहरा लगेचच फुलला. बेला त्याची बॉस आणि क्रश. सगळ्यात वाईट म्हणजे तिचं लग्न झालेलं तेपण त्यांच्याच कंपनीतल्या मार्केटिंग हेडसोबत. त्यामुळे सगळे जरा जपूनच असायचे तिच्यापासून. तशी तीही फारशी कोणाशी कामाशिवाय बोलायची नाही. पण प्रकाश मात्र तिच्याशी बोलायला मिळावं म्हणून नसलेली पण काम काढून जायचा. त्यातही ती त्याला चक्क इग्नोर करायची. त्याला इग्नोर करणारी ती आजपर्यंतची एकमेव व्यक्ती होती. त्याचा चार्म फक्त तिच्यावर चालला नव्हता. आज सकाळी प्रोग्रॅमला आल्यापासून त्याला काही त्याची ड्रिमगर्ल दिसली नव्हती म्हणून तो जास्तच वैतागला होता. पार्टीमध्ये थांबण्याचा मूडच नव्हता. तिची एक झलक दिसावी म्हणून किती प्रार्थना केली असेल त्याने देवाला हे तो जाणे आणि देवचं जाणे...
"अरे प्रकाश... तू... थँक गॉड..." समोर ओळखीचा माणूस बघून बेलाच्या जीवात जीव आला. ती पटकन गाडीत बसली.
स्वतःच्या गाडीतून प्रकाशच्या गाडीत बसेपर्यंत ती चिंब भिजून गेली. 'भिगी हसीना' त्याच्या बाजूला बसलीय याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. आता त्याला पुढचा प्रवास खूप गोड वाटायला लागला. तो, पावसाळी थंड रात्र, धो धो कोसळणारा पाऊस आणि बाजूच्या सीटवर बसलेली ती. कधी नव्हे ते त्याला आज पाऊस रोमँटिक वाटायला लागला. साथ कोई हमसफर हो तो हर सफर सुहाना लगता है..... आणि आज तर ती..... आज मंजिल येऊच नये लवकर असंच वाटत होत.. ए खुदा ये गुजरनेवाला हर लम्हा ठहरा दे... बडे अरसे बाद मेहबूब मिला है... आज थोडी गुफ्तगू तो करने दे....
"प्रकाश....." बेला प्रकाशकडे बघत होती.
"अं...." तो अजूनही एकटक तिच्याकडे बघत होता. बेलाने हसतच त्याला बोटाने समोर बघायचा इशारा केला. तिच्याकडे बघायच्या नादात त्याने कार स्टार्टच केली नव्हती.
"ओह्ह शिट्... सॉरी.... एक्सट्रीमली सॉरी..." त्याने घाबरून आपली मान वळवली. त्याची ती धांदल बघून बेलाला मात्र आपलं हसू आवरेना. प्रकाश तिला असं खळखळून हसताना पहिल्यांदाच पाहत होता. समोरचा निरस, चिखलमय रस्ता बघण्यापेक्षा तिच्या हसण्यात गुंतून जायच मन करत होत. कसाबसा तो स्वतःवर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करत होता पण मान तरीही तिच्याकडे वळायचीच.
पाऊस दणकून कोसळत होता. इतका की समोरचं दिसतच नव्हतं. कारच्या लाईटचा उजेड पण जवळपासच विरून जात होता. अगदी अंदाजानेच तो कार चालवत होता. शहराबाहेरचा रस्ता असल्याने सगळंच सुनसान होत. रस्त्यावरचा अजस्त्र अजगरासारखा पसरलेला अंधार, त्यावर तुटून बेभान पडणारा पाऊस, त्या पावसाचा बधिर करणारा आवाज.... एकूणच वातावरण काळजात धडकी भरवणारं होतं.
"मॅम, तुम्ही एवढ्या रात्री अशा एकट्याच..... आणि सर...??" काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं त्याने.
"थंडी वाजतेय. एसी कमी करशील का.... प्लिज.." नेहमीप्रमाणे आत्ताही बेलाने सरळ इग्नोर केलं त्याला. रागच आला होता तिचा पण काहीच न बोलता त्याने एसी बंद केला.
"बॅकसीटवर ब्लेझर आहे ते घालू शकता... म्हणजे थंडी थोडी कमी वाटेल."
त्याने समोर बघत बॅकसीटजवळ बोटाने इशारा केला. तसपण तिच्याकडे काही पर्याय नव्हताच तिने काही न बोलता चुपचाप ब्लेझर घातला.
मगापर्यंत हवाहवासा वाटणारा प्रवास तिच्या अशा वागण्याने नकोसा वाटायला लागला त्याला. आपला अपमान करण्यासाठी म्हणून देवाने हिची भेट घडवलीय... उगाचच त्याला वाटून गेलं. मनातल्या मनात रागावला पण देवाला तो. पुढचा बराच वेळ तो स्वतःच्याच मनात भांडत होता.
"सॉरी प्रकाश..." तिला कदाचित स्वतःच्याच वागण्याचं वाईट वाटलं असावं.
"का?" प्रकाश मात्र रागातच होता..... साहजिकच होतं त्याचं वागणं.
"मी असं इग्नोर केल्यासारखं वागली..." बेला ओशाळून बोलली.
"इट्स ओके मॅम. तो तुमचा पर्सनल मॅटर आहे." मॅम शब्दावर जोर देत प्रकाश समोर बघतच उत्तरला.
"ऑफिसच्या बाहेर मी बॉस नाहीये तुझी.... यु कॅन कॉल बेला." त्याच्याकडे बघत तिने एक नाजूक स्माईल दिली.
"नाही. 'मॅम'च ठीक आहे " प्रकाश अजूनही तिच्याकडे बघत नव्हता. त्याच्या अशा लटक्या रुसण्याचं खरंतर तिला हसू येत होत.
"बरं मग मॅमची ऑर्डर आहे कि मॅमला बेला बोलायचं "
"ओके बेला जी..." प्रकाशने हसतच रिप्लाय केला. त्याचं तसं हसणं तिच्या काळजाचा ठोका चुकवून गेलं.
"ओह्ह... सो मॅच ऑफ रिस्पेक्ट.... हा..." बेला चेहरा वाकडा करत बोलली.
"हा मी नेहमीच देतो... पण बेला जी इग्नोर करतात." प्रकाश आता खेचायच्या मूडमध्ये होता.
"यु....." बेलाने त्यांच्या खांद्यावर बुक्कीच मारली आणि हसायला लागली. मग बराच वेळ त्यांची मस्ती, चिडवाचिडवी चाललं होत.
" एक विचारू....?" प्रकाश थोडा गंभीर होत बोलला.
"उम्म... हा.... विचार ना..."
"खरीवाली बेला कोणती म्हणायची? ही आत्ता माझ्या बाजूला बसलीय ती भीगी हुई कमसीन हसिना कि ती ऑफिसवाली खडूस बॉस?" प्रकाशने हसतच तिला डोळा मारला.
"ऑ... मी खडूस बॉस काय..??" तिने अजून दोन तीन टपली ठेवून दिल्या. "आणि ऑफिसमध्ये सुंदर नाही दिसत का मी."
"सुंदर... हट्... असली माल दिसते ना.. उफ्फ...." प्रकाशने दीर्घ श्वास सोडत मागे कोसळण्याची ऍक्टिंग केली.
"लग्न झालंय म्हटलं माझं.." बेला लटकं रागावली.
"ह्म्म्म... ठीक आहे.." तो पुन्हा समोर बघत कार चालवू लागला.
"पण लाईन मारायला पर्मिशन आहे..." हसू कंट्रोल न होऊन तिने आपला ओठ दाताखाली दाबला.
"असली गोड दिसते ना तू हसताना... ऑफिसमध्ये तू फारसं हसत नाहीस पण जेव्हा केव्हा मला टेन्शन येतं ना मी तुझ्याकडे बघतो.... तुझी एखादी स्माईल पण मला एनर्जी देते..." प्रकाश एकटक पाहत तिच्या डोळ्यातील भाव वाचायचा प्रयत्न करत होता.
"खरंच..." बेला मात्र गंभीर चेहऱ्याने पापणीही न मालवता प्रकाशकडे पाहत होती.
"देवाशप्पथ..." प्रकाशने गळ्याची शप्पथ घेतली.
"अजून काय काय हरकत करत असतो... हा...??" तिने डोळे मिचकावत प्रश्न केला.
"आहे खूप काही... पण.... उद्या माझा जॉब जाणार नसेल तर सांगेन...." त्याच्या उत्तरावर ती चक्क लाजली. प्रकाशसाठी तिचं लाजणं अगदीच अनपेक्षित होत. आत्ताच तर कुठे खरी बेला उलगडत होती... ऑफिसमधील ती खडूस बॉस बेला आणि ही अल्लड बेला किती जमीन-अस्मानचा फरक होता.... त्यात तिचं असं लाजणं त्याच्या काळजावर वार करत होतं... काश!!! ती सिंगल असती.
" बेला...." त्याने हळू आवाजात तिला हाक मारली.
"हं.." त्याच्याकडे न बघताच तिने हुंकार भरला.
"तू वेड लावतेयस मला. तुझे हे ओले केस, खट्याळ पण खूप काही लपवून ठेवणारे डोळे, थरथरणारे ओठ, फुलणार नाक, तुझ्या भिजलेल्या शरीराचा गंध.... आणि त्यात हे डोळे बंद करून, ओठ दुमडून लाजणं.. वेड लावतायत मला..." प्रकाश असं काही गुंग होऊन बोलत होता की बेलाच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि तिने मान खाली घालून चेहरा आपल्या ओंजळीत लपवला. प्रकाश घाबरला तिच्या असं रडल्याने त्याच्या पोटात गोळा आला. "बेला आय अँम सॉरी... माझा वाईट हेतू नव्हता... प्लिज...तू रडू नको प्लिज... प्लिज बेला प्लिज... तू रागव... ओरड... पण रडू नको ना गं..."
बेलाने करंगळीच्या टोकाने डोळ्यातील पाणी टिपत त्याच्याकडे बघितलं, एव्हाना घाबरल्याने त्याच्या चेहऱ्यावर बऱ्याच आठ्या पडल्या होत्या. "मी रागावली नाही... रडतेय ते पश्चातापाने... पश्चाताप होतोय... आयुष्यातल्या काही निर्णयांचा... लग्न करणं या सगळ्यात मोठा चुकलेला निर्णय.... लग्नानंतर कित्येक वर्षांनी मी आज अशी मनसोक्त हसली असेन. मागचा एक - दीड तास मी मनासारखी वागली. नाहीतर नेहमीच त्याची भीती..." बेला गप्प झाली.
"सॉरी... पण मी खरंच सॉरी बेला...." प्रकाशच्या डोळ्यात नकळत मर्यादा ओलांडल्याची सल होती.
त्याला अर्ध्यावरच तोडत ती बोलली "तू मला पहिल्या दिवसापासून आवडतो प्रकाश.... फक्त त्याच्या धाकामुळे मला खडूस बॉस बनावं लागतं... नाहीतर तुझ्या या गहिऱ्या डोळ्यात मी कधीच बुडून गेलीय. कित्येकदा त्याच्या मिठीत पण मला.... तुझे नकळत झालेले स्पर्श आठवतात....आणि..." तिने लाजून मान खाली घातली. पण गुलाबी गालावर गुलाब फुलले होते तिच्या.
प्रकाशने तिच्या गालावर अलगद हात फिरवला. तिच्या मऊ गालाला नाजूकपणे खेचला आणि विचारलं "आणि काय?" त्याच्यापण ओठावर हसू पसरलं.
"आणि......" तिने अलगद आपला हात त्याच्या हातावर ठेवला आणि त्याच्या गालावर आपले ओठ टेकवले...क्षणभर त्याला जे घडलंय ते समजलं नाही. त्याच्या अंगावर रोमांच उठले. एक गोड शिरशिरी सर्वांगातून लहरत गेली. मेंदूतले सगळे विचार बंद पडले. पोटात असंख्य फुलपाखरं बागडावी असं काहीतरी झालं. धुंदीत त्याने गाडी थांबवली.
"गाडी का थांबवली..." तिने मागे सरत विचारलं.
"मी ब्लँक झालोय.... आत्ता काहीतरी झालं ना...." तिच्यापेक्षा त्याचेच गाल लाल झालेले.
तिने म्युझिक प्लेयरवर गाणं चालु केलं 'दिल.... संभल जा जरा....' त्याच्याकडे बघत ती नाजुकशी हसली. त्याने अत्यानंदाने डोळे अर्धवट मिटले. तिने पुन्हा आपले ओठ त्याच्या गालावर टेकवले. "उम्म.." नकळत त्याच्या तोंडून उद्गार निघाले. आता तिचे ओठ त्याच्या ओठांजवळ होते. त्याचे गरम श्वास तिच्या ओठांवर रुंजी घालत होते. तिच्या ओठांचा सुगंध तो आपल्या श्वासात भरुन घेत होता. किती वेळ असा गेला कोणास ठाऊक. कोणी कोणाच्या ओठाला आधी स्पर्श केला माहित नाही. पण पुढचा किती तरी वेळी ते ओठांनीच ओठांशी बोलत होते.
बऱ्याच वेळाने ते दूर झाले. पण चुंबनामध्ये चुंबकापेक्षाही ओढ असते. त्याने तिला आपल्या अंगावर ओढलं. त्याच्या सीटवर ती त्याच्या मिठीत अशा अवस्थेत होते. तिने आपले हात त्याच्या मानेभोवती गुंफले. त्याने तिच्या कमरेला आपल्या हातांचा विळखा घातला. तिची मऊशार बोट आता त्याच्या चेहऱ्यावर फिरत होती. त्याने मनातल्या मनात रंगवलेलं चित्र आज प्रत्यक्षात उतरत होतं. आज ती त्याच्या एवढ्या जवळ होती की तिच्या हृदयाची होणारी धडधड त्याला ऐकू येत होती. या क्षणी तो स्वतःलाच विसरून जात होता. त्याच्या डोळ्यावर फक्त आणि फक्त तिच्या मिठीचा असर होत होता. गाडीमधलं वातावरण आता गुलाबी गुलाबी झालेलं. अंगातून सळसळणार रक्त आता गरम होत होतं. आता ती ओढ काही शांत होणार नव्हती.
"प्रकाश..." तिचे गरम उसासे त्याच्या मनाला लागलेली ओढ अजूनच तीव्र करत होते.
"उम्म..." त्याने तिचा लाजरा चेहरा आपल्या ओंजळीत पकडला. "सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात वेडू.... काही न बोलताच समजून घ्यायच्या असतात...." त्याने तिची हनुवटी आपल्या चिमटीत पकडून तिचा चेहरा वर केला. तिच्या त्या लाजेने चिंब भिजलेल्या चेहऱ्यावर आपल्या उष्ण श्वासांची फुंकर घातली. तिच्या त्या घायाळ करणारे डोळे मिटणाऱ्या पापण्यांना ओठानी गोंजारले. तीच अंग शहारलं...
“बोलु दे कि जरा तुझ्या लवणाऱ्या पापणीसोबत
त्यानी लपवलेली गुपित ऐकायचीत
खेळू दे ना लहरणाऱ्या बटांसोबत
त्यांच्या गंधात हरवून जायचय
स्पर्शू दे तुझ्या थरथरनाऱ्या ओठांना
त्यांचं लाजणं डोळ्यात साठवायचंय...”
गोऱ्यापान पण पावसाच्या माऱ्याने लालसर झालेल्या कांतीवर हुरहुरीचा काटा चढला होता..... एकमेकांभोवती गुंतलेले मिठीचे पाश अजूनच घट्ट झाले. श्वासागणिक श्वास गुंफत गेले. लज्जेचे सारे पडदे क्षणात गळून पडले. इतक्या दिवसांची ओढ काही स्वस्थ बसू देईना. तहानलेल्या चातकानं बेचैनीने पावसाची वाट पाहत असताना अचानक आभाळ भरून यावं आणि कोसळणारा पहिला थेंब गात्र न गात्रात भरून घ्यावा तशीच ती प्रेमासाठी भुकेलेली त्याचं बरसणारं प्रेम स्वतःमध्ये साठवून घ्यायचा प्रयत्न करत होती.
भावनेचा उचंबळून आलेला बहर ओसरल्यावर एका अनोख्या तृप्तीचं समाधान तिच्या शरीरभर पसरलं होतं. स्वतःला सावरायचंही भान उरलं नव्हतं. प्रकाश खूप प्रेमाने न्याहाळत होता तिला. त्याच्या न्याहाळण्यानेदेखील तिच्या गालावर लाली चढत होती.
"जाऊया ना आता...." त्याने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. ती अजूनच त्याच्या कुशीत शिरली. जणू तिला त्याच्या मिठीतुन बाहेरच निघायचं नव्हतं. त्यानेही आवेगाने तिला कुरवाळलं....
"अय... पिल्लू...." त्याने तिच्या केसांमधून हात फिरवत विचारलं. त्याने तिच्या गालावर हात फिरवत चेहरा वरती केला. पुन्हा तिचे डोळे भरून आलेले आणि चेहऱ्यावर कशाचीतरी वेदना लपवण्याचा तिचा केविलवाणा प्रयत्न चाललेला. तिची तशी अवस्था बघून त्याला पण भरून आलं. नक्की तिला कशाचं वाईट वाटतंय हेच कळायला मार्ग नव्हता.... आत्ता तरी तिला फक्त प्रेमाने थोपटण्याची गरज होती.
तिच्या लालसर गालावरून आता डोळ्यातील पाणी ओघळून चाललं होत. प्रकाशने आपल्या बोटानी ते आसू टिपले. ती सावरुन बाजूच्या सीटवर बसली. त्यानेपण काही विचारलं नाही मग.....
"इट वॉज द मोस्ट ब्युटीफुल टाइम ऑफ माय लाईफ..." प्रकाशने वळून तिच्याकडे बघितलं. "माझं लग्न ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती. इतकी की ती चूक करताना मी आई बाबा गमावले." बेला हमसून हमसून रडायला लागली. "आमच्यात जे काही होतं त्याला मी प्रेम समजत होती आणि तो माझं प्रमोशनसाठीच स्ट्रगल समजत होता. अजूनही त्याला हेच वाटतं की लग्न करून त्याने उपकार केलेत माझ्यावर. तो नसता तर मी या पोजिशनला कधीच पोचु शकत नव्हती. त्याने माझ्याशी का लग्न केलं माहित नाही. कदाचित सौन्दर्याला भुलून असेल. प्रेम, रोमान्स, रुसवे फुगवे असं काहीच नाही रे आमच्या नात्यात.... फक्त जबरदस्ती आहे. त्याच्या मानसिक आणि शारीरिक समाधानासाठी तो मला कधीही कसाही ओरबाडले. माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून त्याला कायदेशीर परवानगी मिळालीय ना..... मी त्याची अर्ध्या रात्री लागणारी गरज आहे. बाकी दिवसभराच्या गरजा पुरवायला बाकीच्या आहेत... तुला माहितीच असेल....." इतकी वर्ष तिच्या मनात भरून राहिलेलं दुःख बाहेरच्या मुसळधार पावसासारखंच बरसत होतं. “ आय विश.... तू आधी भेटला असतास मला...”
“मी आहे न आत्ता... यू डोंट वरी...” प्रकाश तिच्या हातावर हात ठेवत बोलला.
“इट्स टू लेट....” तिने निराशेने मान डोलावली.
पुढच्या प्रवासात ती काहीच बोलली नाही. तिची शांतता त्याला अस्वस्थ करत होती परंतु तिला तिच्यासाठी वेळ देणं आवश्यक होतं.
“वी एंट एवर गेटिंग ओल्डर...” फोनच्या रिंगने त्याची झोपमोड झाली. सत्याचा, त्याच्या कलिगचा फोन होता. सुट्टीच्या दिवशी झोपमोड केली म्हणून त्याने मनातच चार शिव्या हासडत कॉल उचलला. त्याला हॅलो बोलायचा अवसर पण न देता सत्या बोलू लागला...
“प्रकाश कुठे आहेस तू आत्ता..?”
“कुठे असणार...घरी आहे...लेट आलो ना रात्री...”
“दुसरा रस्ता समजला ना तुला...जरा लाँगकट होता ना तो म्हणून...”
“दुसरा रस्ता... तू काय बोलतोयस.... सत्या..???” प्रकाश वैतागला. त्याने सवयीने टीव्ही चालू केला.
“तू कसा आलास घरी..??” पलिकडून सत्यापण वैतागलेल्या स्वरात विचारत होता.
“माझ्या कारने.. त्याच रोडने ज्या रोडने आपण गेलो होतो...” तो न्यूज चॅनेल लावत बोलला.
“आपण ज्या रस्त्याने आलो तो रस्ता पोलिसानी बंद केला होता... म्हणून तेव्हापासून तुला कॉल करतोय तर भावा तुझा फोन स्विचऑफ... किती ट्राय केला” सत्याचा सूर आता बदलला होता.
“पण का??” न्युजमध्ये ओळखीची जागा दिसली म्हणून तो थबकला. त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.
“प्रकाश तू ऐकतोयस..??” सत्या जोराने ओरडत होता.
“आँ.. हा....” प्रकाश पुतळ्यासारखा स्तब्ध होता.
“अरे तुझी बॉस बेला... तिचा...तिचा...काल ऍक्सिडेंट झाला आणि ऑन द स्पॉट डेथ झाली..... वॉट्सअप बघ जरा...समजेल तुला.... ऐकतोयस ना..... आपल्याला फ्युनेरलला जायला पाहिजे... तयार हो...” पलीकडून फोन कट पण झाला.
प्रकाशने थरथरणाऱ्या हातानी वॉट्सअप ओपन केल आणि नकळत त्याच्या तोंडुन अस्पष्ट लहानशी किंकाळी बाहेर पडली. ऍक्सिडेंटच्या डिटेल्ससोबतच ऍक्सिडेंट झालेल्या जागेचे फोटोज पण होते. समोर न्युजमधे पण तिच न्युज चालू होती. तोच रस्ता, तीच जागा, तोच मिनमिनणारा स्ट्रीटलाइट, तीच तिची बंद पडलेली कार, तीच साडी तशीच भिजून तिच्या अंगाभोवती चिपकलेली..... म्हणजे.........
समाप्त