Vrushali Thakur

Drama Tragedy Fantasy

3  

Vrushali Thakur

Drama Tragedy Fantasy

मोह

मोह

22 mins
2.0K


नदीच्या संथ वाहणाऱ्या विशाल पात्रात पाय रोवून तो मागच्या बऱ्याच काळापासून हात उंचावून उभा होता. हातातील पाणी केव्हाच नदीपात्रात विलीन होऊन गेले होते. परंतु आपल्याच विचारांत हरवलेल्या त्याला कशाचे भान उरले नव्हते. वर आलेल्या तप्त सूर्यकिरणांनी त्याचा चेहरा लाल झाला होता. शेंडीचे तलम केस उष्ण वाऱ्यासोबत भुरुभुरू उडत होते. काठावर ठेवलेला पंचा केव्हाचा उडून गेला होता. सगळ्यापासून अनभिज्ञ तो डोळे मिटून स्वतःच्याच विचारांत गुरफटून गेला होता. विचारांची शृंखला अधिकच गुंतत चाललेली वाटून त्याने डोळे उघडले. सूर्याची तप्त किरणे एखाद्या बाणासारखी त्याच्या डोळ्यात शिरली. इतका वेळ हात वर करून उभ राहिल्याने त्याच्या हाताला रग जाणवत होती.


परतीच्या वाटेवर फिरून तो आपला पंचा शोधू लागला. परंतु वाऱ्याच्या झोतासोबत तो तर आधीच उडून गेला होता. आता अश्या अवस्थेत वस्त्रविना आपल्या आश्रमात परतून जाणे अशक्य होते. त्याच्या गुरुजींनी जर असे पाहिले तर काही खर नव्हतं. आता एकमेव पर्याय उरला होता. त्याच द्विधा मन हळूच चुकचुकल. आताच थोड्या वेळापूर्वी त्याच मन एक निर्णय घेत होत परंतु आता लगेच त्याच निर्णयावर सहजरीत्या पाणी सोडावं लागणार होत.... फक्त आजचा एक दिवस... मनाशी पक्क ठरवून तो गावाबाहेर चालू लागला.


सूर्य एव्हाना बराच वर आला होता. तप्त वाळू त्याचे पाय भाजून काढत होती. परंतु पंचा महत्वाचा असल्याने बाकी कशाची पर्वा न करता तो धावतच निघाला. गावाबाहेर असलेल्या एकुलत्या एक साधारण अवस्थेतील कुटीसदृश्य घराबाहेर उभ राहून त्याने कोणाला तरी आवाज दिला. प्रतिउत्तरादाखल आतून नाजुक पैंजण किणकिणले. पाठोपाठ करकर करत मुख्य दरवाजा उघडला गेला. दरवाजात आरस्पानी सौंदर्य लाभलेली आणि साक्षात अप्सरा भासणारी नाजूक तरुणी उभी होती. अंगावरच्या सुती निळसर साडीने तिचा मुळचा गोरा रंग अजुन खुलून आला होता. तिने केसात माळलेला ताजा मोगरा तिच्याभोवती सुगंधाचे रिंगण घालत होता. खरतर तिच्या उजव्या गालावरच्या ठळक उठून दिसणाऱ्या तीळाने त्याला आकर्षित केले होते. तो तिच्याकडे पापणी लवायचे विसरून पाहतच राहिला. आपण नेमकं कोणत्या कामानिमित्त आलो हेच तो विसरला. सौंदर्याची मोहिनीच तशी असते. भल्याभल्यांची तपस्या भंग करते. शेवटी न राहवून तीच बोलू लागली.


" अहो, असे भर उन्हात बाहेर का उभे.. आत या ना.. कधी पाहिले नाही का मला ?" त्याच्या मनाची घालमेल उमजून ती गालातच हसली.


" तसे नाही. " तिची नजर चुकवत त्याने स्वतःला सावरण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला.


" बसा ना... मी तुमच्यासाठी गार दूध आणते. " त्याला बसायचा इशारा करून ती आत वळली.


त्याने नकळतपणे तिचा हात पकडला आणि दचकलेल्या तिला आपल्या दिशेने ओढली. ती भांबावली आणि क्षणार्धात तोल ढळून त्याच्या तलम कायेवर आदळली. त्या स्पर्शाने तिच्या अंगभर रोमांच उमलले. गात्र गात्रातून लज्जा पाझरू लागली. तशी तिने त्याच्या मिठीतुन सुटायचा नाजुक प्रयत्नही केला. परंतु तो क्षण त्यांच्या मिलनाचा असावा. त्यांच्या धसमुसळ्या नादात तिच्या खांद्यावरील पदर ढळला. तिच्या कंचुकीतून तिचे उभार सुष्पष्ट दिसत होते. त्याची नजर तिच्या गोऱ्यापान उघड्या अंगावर भिरभिरू लागली. स्त्रीसुलभ लज्जेने तिने आपला हात बाहेर डोकावणाऱ्या वक्षस्थळांवर ठेवला. तिच्या काळजाची होणारी धडधड त्यांच्या कानांना ऐकू येत होती.


" हा लज्जेचा पडदा का..?" त्याने तिची हनुवटी उंचावत विचारलं.


तिचं मन चलबिचल झालं आणि तिने मूकपणे लाजून पुन्हा मान खाली घातली. तिच्या लज्जाभरल्या मौनालाच होकार समजून त्याने तिला अजूनच जवळ घेत कुरवाळायला सुरुवात केली. तिच्या लज्जेच्या आणि त्याच्या पुरूषार्थाच्या क्रिडेत वस्त्रांचे बंधन गळून पडले. व दोघेही रतिक्रीडेत रत झाले. भावनेचा आवेग ओसरला आणि तो भानावर आला. काही वेळापूर्वीचा तप्त उन्हातील दृढनिश्चय पायदळी तुडवला गेला. तिच्या सौंदर्याने त्याला पुन्हा एकदा त्याच्या मार्गापासून विचलित केले होते. तो गडबडला. तिच्या डोळ्यातील प्रश्नांची उत्तरे न देताच तिच्याकडील पंचा घेऊन त्वरेने आश्रमाच्या दिशेने मार्गस्थ झाला. ती मात्र तृप्त होऊन नुकत्याच मृगाच्या सरींनी तृष्णा विझलेल्या धरणीसारखी त्याच्या वाटेकडे बघत त्या क्षणांच्या मधाळ आठवणीत गुंगून गेली.


त्या घरातून तो निघाला खरा पण डोक्यात विचारांची झुंबड घेऊनच. हेच का जीवनाचे साध्य आहे... मी तर बालब्रह्मचारी... ब्रह्मचर्याचे पालन करणे हाच माझा परम धर्म आहे. परंतु.. मग हे पाप... हे घडण्यामागे काय कारण असावं ? माझे पाऊल इतके का घसरते आहे ?... दुसरे मन म्हणे... पुरुषाच्या जीवनात स्त्रीचा प्रवेश झाल्यानंतर हे सगळे होतेच. जसे विस्तवाजवळ ठेवलेले लोणी क्षणार्धात वितळते. स्त्री पुरुषाचं मिलन हा निसर्गाचा नियम आहे. त्यापुढे माझी इंद्रिये कसा काबू ठेवतील... ब्रह्मचर्याचे व्रत मी स्वतःहून थोडीच अंगिकारले होते. ते तर जबरदस्ती.... पहिले मन पुन्हा सावध करी... त्यासाठी तुझी निवड झाली हे तुझे अहो भाग्यच. ब्रह्मचर्याची हीच तर परीक्षा असते... त्याचे मन कोणत्याही निर्णयाप्रत येईना. तो जर दिवस आयुष्यात आला नसता तर आज त्याच्या मनात हा क्लेशकारी वाद निर्माण झालाच नसता.


नेहमीप्रमाणेच आजही भल्या पहाटे त्याची निद्रा उघडली. सूर्य उदयाला अजून अवकाश होता. चारी दिशा अजूनही काळोखाच्या दुलईत गुरफटून झोपल्या होत्या. सगळं आश्रम निद्रेत बुडाला होता. तो मात्र सवयीने आपले प्रातर्विधी आटोपून, खांद्यावर उपरण घेऊन त्या काळोखात नदीची वाट चालू लागला. गावही निरागस बाळासारखं शांत निजल होत. त्याच्या चालण्याचाच काय तो आवाज त्या शांततेचा भंग करत होता.


मजल दार मजल करत तो नदीजवळ येऊन पोचला. काळोखाच्या छायेत बुडून नदीचं पाणीही काळंशार होऊन गेलं होत. नदीच्या पात्रात अजूनही चांदण्यांनी रांगोळी मांडली होती. रोज ती रांगोळी विखुरण त्याचा छंदच होता जणू. नाहीतर भल्या पहाटे इतक्या किर्र अंधारात कोणता वेडा नदीवर येईल. तो स्वतःवरच हसला. पलीकडच्या काठावरून वाहत येणारा थंडगार वारा हळूच नदीला स्पर्श करून जायचा. त्याच्या स्पर्शाने पाणी शहारून यायचं. त्या इवलुश्या लाटांवर चांदण्यांची रांगोळी मोठ्या ऐटीत हेलकावे खायची. वाऱ्याची आणि पाण्याची एक वेगळीच प्रेमकहाणी होती. आणि तो त्यांचा एकमेव साक्षीदार.


काही दिवसांपूर्वी आचार्य एका अध्यायाच्या पठणात प्रेम भावनेविषयी सांगत होते. त्याच वेळी त्याच्या मनात काहीतरी चमकून गेले. आजवर मनाच्या आसपासही न फिरकलेलं काहीतरी त्याच्या मनात घर करून गेलं. ब्रह्मचर्य पालन करताना प्रेम ह्या भावनेविषयी त्याला काही कल्पनाच नव्हती. परंतु त्या एका अध्याय पठणाने ती भावना तरारून वर आली. रोज पहाटे नदीवर येऊन वाऱ्या पाण्याचा खेळ बघत त्यांची प्रेमकहाणी रचण्यात त्याला वेगळाच आनंद मिळत असे. खरेतर आश्रमात असे विचार करणं निषिद्ध होत त्यामुळे त्याच्या मनातल्या कवीला गोंजरणारी नदीपात्र ही एकमेव जागा होती. तासनतास तो वाऱ्याच्या थंडगार झुळकिशी बोलत बसायचा. नदीकाठच्या वाळूत त्याच्या लांबसडक बोटांनी कित्येक कविता रेखाटल्या होत्या. परंतु आश्रमाच्या सोवळ्यातील वातावरणात कवितेसाठी स्त्री पुरुषातील प्रेम हा विषयच न पटण्यासारखा होता. शिष्यांनी ऋचा लिहाव्यात, स्तोत्र लिहावीत फारतर मिरेच्या तोंडून कृष्णासाठी पद लिहावीत. परंतु राधा कृष्णाचं प्रेमगीत गाणं म्हणजे आचार्यांच्या क्रोधाला निमंत्रण देण्यासारखं होत. म्हणूनच त्याच्या मनात उमलणाऱ्या प्रेमगीताना तो ह्या ब्रह्ममुहूर्तावर वाळूतच दफन करत असे.


आजही त्याला काहीतरी सुचत होत. मनातील शब्द वाळूत रेखाटण्यासाठी त्याची बोट फुरफुरत होती. परंतु नदीला भरती असल्याने पाणी बरच वरपर्यंत आल होत. लिहिण्यासाठी त्याला मनासारखी जागाच सापडेना. चालत चालत तो नेहमीच्या ठिकाणावरून बराच दूर निघून आला होता. एव्हाना मनात घोळवून त्याची कविता पाठ झाली होती. आता वाळूवर लिहायचे तरी कशाला..? जवळच्याच गुळगुळीत दगडावर तो पाय सोडून नुकतीच पाठ केलेली कविता गुणगुणू लागला.


अचानक काहीतरी आवाजाने त्याची विचारांची शृंखला तुटली. ह्या समयी कोण बरे इथे असावे ? त्याने सभोवार नजर फिरवली. परंतु काठावर कोणीच दिसत नव्हते. म्हणून त्याने नदीकडे आपला रोख वळवला. तर शांत भासणाऱ्या नदीच्या पात्रात काहीतरी तरंगताना दिसले. क्षणाचाही विलंब न करता तो चपळाईने पाण्यात शिरला. कोणीतरी स्त्री त्या पात्रात बुडत होती. आत्महत्या करणे हे पाप आहे आणि आत्महत्या करणाऱ्याला ती करू देणे हे महापाप आहे. त्याला शिकवलेली सगळी तत्व पणाला लावत तो त्या स्त्री सह काठावर परतला.


पाण्यातून बाहेर निघताच त्याने भरून श्वास घेतला. त्या श्वासाने त्याची भरदार छाती खालीवर झाली. खरतर पर स्त्री कडे पाहणे उचित नाही परंतु ती स्त्री संकटात असेल तर.... तिची विचारणा करण गरजेचं होत. त्याने तिच्या दिशेने मान वळवली. आणि मूर्च्छितावस्थेतील तिच्या सौंदर्याकडे पाहत तो स्तब्ध झाला. इतकं बावनकशी सौंदर्य त्याने आजवर ते ही इतक्या जवळून कधीच पाहिलं नव्हतं. परमेश्वराने अपार कष्ट करून तिला घडवले असावे. इतकी नितळ आणि गौर कांती की तिला हात लावला तर कुस्करून जाईल. तिचा भिजलेला चेहरा अजुनच उजळून निघाल्यासारखा वाटत होता. त्यावर चमकणारे जलबिंदू त्याला अजुनच मोहक बनवत होते. तिच्या विशाल भाळावर काही कुंतले चिकरून आरामात विराजली होती. तिचे गुलाबी ओठ उगाचच थरथरत होते. अंगावरील साडी भिजून तिच्या बाकदार वळणांवर चिकटून बसली होती. खांद्यावरून पदर केव्हाच बाजूला झाला होता. आतील घट्टसर कंचुकी तीच तारुण्य कैद करण्यास अयशस्वी होती. तीच उघड पडलेलं पोट, त्यावरून घरंगळणारे पाण्याचे टपोरे ओघळ कोणालाही आव्हान द्यायला पुरेसे होते. त्याने पाहिलेला प्रथम स्त्रीदेह... तो ही अश्या अवस्थेत. तिच्या अनावृत्त नितळ गोऱ्या पोटावरून हात फिरवायचा त्याला मोह झाला. क्षणभरासाठी आपण कोण, कुठले, इथे का आलोय साऱ्याचाच त्याला विसर पडला. तिची मोहक कांती त्याच्या पौरुषाला खुणावत होती.


स्वतःच्याच विचारांवर त्याच्या शरीराचा थरकाप उडाला. खरच तिला स्पर्श करू का...? परंतु हे चुकीचं आहे त्याच मन त्याला दटावत होत. इतक्या दाट काळोखात कोण बघणार आहे ?सद्सद्विवेक बुद्धीवर मात करत त्याचा हात पुढे सरसावला. मोह माणसाच्या मनावर हावी झाला की त्याची बुद्धी घायाळ होऊन खितपत पडते. त्याचही सावरण अशक्य होत... अनाहूतपणे त्याची बोटं तिच्या ओल्या दुधाळ कांतीवर रेंगाळली. त्याच्या अंगभर शहारा फुलला. स्त्री स्पर्श.... आजवरच्या आयुष्यात प्रथमच त्याने कोणत्यातरी स्त्रीला स्पर्श केला होता. इतकी कोमल कांती... न राहवून त्याची बोट तिच्या कोमल शरीरावर रेंगाळतच राहिली. तिची ती कोमलता त्याला आपल्या हातात सामावून घ्यावीशी वाटत होती. ज्या मनाला भावनेचा पुसटसा स्पर्शही झाला नव्हता त्या मनाच्या तारा हळुवारपणे छेडल्या जात होत्या. काहीतरी होऊ लागलं होत.... सावकाश....हळुवार... त्याच्या जाणीवा बधीर होत होत्या त्याच्याही नकळत ... एक अनामिक ओढीचा भ्रमर त्याच्या मनाला पोखरत होता…


----------------------------------------------------


" अहो..." एक अतिशय मंजुळ भेदरलेल्या किणकिणला तसा तो घाबरला. तिच्या कायेच्या स्पर्शाने बधिर झालेला हात त्याने हात खसकन मागे खेचला. परंतु भयाने पांढराफटक पडलेला त्याचा चेहरा त्याच्या चोरीची न बोलता कबुली देत होता.... आता काय... परस्त्री कडे नजर उचलूनही न पाहणारा मी.... तिच्या दुधाळ कायेत भान हरपून गेलो... त्याच्या हृदयाची धडधड चुकून तीलादेखील ऐकू गेली असावी. त्याच्याकडे पाहून ती ओशाळवाण हसली.


" क्षमा असावी ..." स्वतःच्या वागणुकीवर तोओशाळला. भयानक पश्चात्तापाने त्याने आपले हात जोडले. इतकावेळ तिच्या कांतीवर रोखलेली नजर खाली गेली. पुढील परिणामाच्या कल्पनेने पहाटेच्या थंडीतही त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला.


" क्षमा.. कशासाठी.... आपण तर माझ्या प्राणांचे रक्षण केले. माझ्यावर जन्मोजन्मीसाठी हे उपकार राहतील." तिने झुकून त्याला चरणस्पर्श केला. हे सगळं अनपेक्षित होते. तो दचकून दोन पावले मागे सरकला. आता काही काळापूर्वी मनातील उमटलेल्या वासनेच्या तरंगांचे काय..? ती तरुणी मला रक्षक म्हणून गौरविते आणि आपण सहेतुक तिच्या पवित्र कायेला कलंकित करू पाहत होतो... नाही ती वासना नव्हती केवळ तिच्या सुंदर मादक तनुला स्पर्शण्याची अभिलाषा होती. त्याच मन सत्य मान्य करण्यास कचरत होत. त्याच्या मनाला वासनेचा झालेला स्पर्श तो अमान्यही करू शकत नव्हता. परंतु मनच ते.. सतत ह्या ना त्या हिंदोळ्यावर झुलतच राहणार... एखाद्या गोष्टीकडे डोळेझाक करावीशी वाटली की नेत्रांवर अज्ञानाची झापड बांधणार. अज्ञानात सुख असते म्हणे. मनाला कोण बरे आवरू शकलय. ते तर उधळलेला अश्व. त्या अश्र्वावर काबू मिळणे महान तपस्वीशिवाय तरी इतर कोणाला शक्य नाही.


" आपण अशा वेळी, ह्या नदीकिनारी... आत्महत्या करणे शोभा नाही देत. ते महापाप आहे...." त्याच्या कंप सुटलेल्या अंगात उसन पावित्र्य दाटून आल. स्वतःच महत्व अधोरेखित करण्याची संधी जी चालून आली होती.


" आत्महत्या नाही..." ती फिकटस उदास हसली. " हत्या होती..." डोळे मिटताना सुबक बोलक्या नयानातील आसू तिच्याही नकळत चमकले. एव्हाना पहाटेला जाग आली होती. सूर्यदेव आपला रथ घेऊन नेहमीप्रमाणे फेरफटका मारायला निघाले. त्या कोवळ्या फुटलेल्या किरणांत बराच वेळ अंधारात दडून राहिलेला तिच्या चेहरा त्याच्या नजरेस पडला. साक्षात अप्सरा धरेवर अवतरली होती. पहाटेच्या दवबिंदूंनी न्हाऊन तिचं सौदर्य उमलत्या फुलासारखं मन मोहवीत होत.


" हत्या...?" तिच्या बोलण्यातील अर्थ न उमजून त्याने प्रतिप्रश्न केला.


" हो... हत्याच... तेच म्हणणे सर्वात योग्य ठरेल." तिने हताशपणे सुस्कारा सोडला. " आपल्या दैवगती फिरवल्यावर बोल तरी कुणास लावायचे. रिकाम्या ओंजळीतील सुरकुतलेल्या रेषांना दोष देत आपल्याच फुटक्या नशिबावर हसावे आणि गप्प बसावे... बस.. बायकांच्या नशिबी हे असेच जिणे "


" स्वतःस दूषण देणे असे शोभत नाही. व नशिबाचे काय घेऊन बसलात. दैवाचे फासे कसे पडतील कुणास कळले का कधी.. ? आपण प्रत्यक्षात काय घडले ते सांगाल तर मनीचा भार थोडा हलका होईल." त्याने तिला आधार देण्याचा प्रयत्न केला.


ती मात्र अनोळखी पुरुषास सगळे कथन तरी कसे करावे ह्या विवंचनेत अडकली. आपल्या जीवनाची कथा अशी कधी सांगणार ? तरीही रक्षणकर्ता ह्या नात्याने त्याला सर्व सांगणे तिने उचित समजले. पाण्यात भिजल्याने तीच ओल शरीर कंप पावत होत. त्याच थरथरत्या आवाजात तिने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली.


" मागल्या मासात माझा विवाह जवळच्या गावातील एका मातब्बर घराण्यात जुळून आला. एके ठिकाणी मी अठराविश्वे कळकटलेल्या दारिद्र्यात बरबटलेली आणि ते खानदानी घराणं. म्हणतात न तसं नशिबाने अगदी सगळे सुख न मोजताच माझ्या फाटक्या पदरात टाकले होते. मोठाले वाडे, ऐसपैस अंगण, अंगणात फुललेली सुगंधी फुलबाग, गोठ्यात हूंदडनाऱ्या गायी हे सर्व स्वप्नात पहायचा मोह झाला नाही ते सगळं मला न मागता मिळणार होत. आमच्या कपाळावरील दारिद्र्याचा टीका ह्या जन्मात पुसला जाण्याची यत्किंचितही आशा न बाळगलेली माझ्यासारखी चुडाच्या झोपडीत वाढलेली मुलगी आपल्या नशिबावर कसा भरोसा करणार..? विवाह निश्चित झाल्यापासून तर कित्येक रात्री मी तळहाताच्या रेषा चाचपडण्यात घालवल्यात. हळदी, विवाह, देवदर्शन सगळं अगदी कसं निर्विकार पार पडलं होत मात्र..... अगदी पहिल्या रात्री हे जे झोपी गेले ते पुन्हा उठलेच नाहीत. अंगावरची ओली हळद उतरवण्याआधीच सौभाग्यलंकार आणि सौभाग्य ओरबाडले गेले ते कायमचेच. केवळ एका प्रहराच संसार सुख आणि आयुष्यभराच पाठ न सोडणार वैधव्य पदरात पडलं. परक्याच धन म्हणून मायबापाने पाठ फिरवली आणि अवलक्षणी म्हणून सासरच्यांनी. सर्वांच्या खांद्यावर एक विधवा म्हणजे भारच असते ना. मग सर्वानुमते ह्या नदीच्या पोटात तो भार उतरवून आपापले खांदे मोकळे करून घेतले. तसेदेखील ह्या प्रहरी कोणी अशा जागी फिरकण्याची तसदी घेणार नाही मग मृत्यू हा एकमेव उर्वरित पर्याय. परंतु आपण का कसे कोण जाणे माझे रक्षणकर्ता बनून आलात. माझे प्राण वाचविले...." ती थांबली. मनात विचारांची वावटळ घोंघावत असावी.


" लोभ ह्या कवडीमोल प्राणांचा नाही. परंतु माझा काहीही दोष नसताना जन्मदात्यानी आणि कर्मदात्यानी नाकारून हा असा मृत्यू द्यावा याहून अधिक दुर्दैव ते काय." बोलताना तिच्या सगळ्या आठवणी उफाळून डोळ्यांच्या डोहात पाणी साचले. दुःखवियोगाने तिचा हुंदका गुदमरला. परंतु त्याच्याकडून सांत्वनाची अपेक्षा तरी कशी करणार... शेवटी तो देखील परपुरूष... अशी आभाळाखाली उघडी पडलेली ती म्हणजे स्त्री चारित्र्य लुटणाऱ्या आणि वासनेच्या आहारी गेलेल्या मनुष्यरुपी लांडग्यांची भर.


उजव्या खांद्यावर झालेल्या स्पर्शाने तिची तंद्री भंगली. त्याचा स्पर्श होता. कदाचित आधार देण्याच्या उद्देशाने त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला असावा. तिला त्या स्पर्शात आश्वासकता जाणवत होती मात्र तो स्पर्श एका पर पुरुषाचा होता. एका अनोळखी व्यक्तीचा होता. त्यावर विश्वास ठेवावा का नाही तीच मन काही कौल देईना.


" जाऊ द्या.. नको त्या कटू आठवणी... परमेश्वरानेच हे नवे आयुष्य दिलेय. भरभरून जगून घ्या. भूतकाळाची भूत मानगुटीवर बसायचीच परंतु त्यावर मात करण्यातच मनुष्य जन्माच सार्थक आहे." त्याने हलकेच तिच्या खांदयावर थोपटले.


" आता परतून त्या माणसांत जाणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण... " हताश होऊन तिने पापण्या मिटल्या. पुढचे तीच्याने बोलवेना.


'स्स्स..' पायाला बसलेल्या चटक्याने तो वर्तमानात परतला. अजूनही त्याच्या नजरेसमोर तिची तिचं पहिलीवाली ओली प्रतिमा उभी राहिली. अंगभर हट्टाने चिकटून राहिलेल्या तिच्या ओलसर सफेद वस्त्रातून तिच्या शरीराचे उभार अधोरेखित होत होते. तिच्या भरदार केशसंभारातून ओघळणारे जलबिंदू तिच्या खांद्यावरून आत निथळत तिच्या सौंदर्याच मोजमाप करण्याच्या निरर्थक प्रयत्नात होते. एव्हाना त्याला त्या जलबिंदुंचा राग येऊ लागला. तिच्या सौंदर्याने प्रथमच त्याच्या ब्रह्मचर्याला आव्हान दिले होते. ' हिच्या निर्मितीनंतर देवाचीही एकाग्रता ढळली असेल का...?' नकळत त्याच्या मनात चमकून गेले.


'पाप आहे हे...' त्याचे मन आक्रंदले. कितीही दूर पळायचा प्रयत्न केला तरीही मन फिरून तिच्याच भोवती रुंजी का घालत ? बालपणीपासून मोहावर विजय प्राप्त करायच्या उद्देशाने केलेल्या सर्व तपश्चर्या व्यर्थच झाल्या. कुठे आधार द्यावयास गेलो आणि त्याची परिणीती प्रीतीत झाली. त्यात तिचा तरी काय दोष म्हणा. अवघ्या एका रात्रीत संसारास मुकलेली ती.... तिला संसारसुखाची अपेक्षा असणारच. तिच्या भावना उफाळून आल्या तर आश्चर्य ते काय..? आणि मी... तारुण्याच रक्त सळसळत असताना आणि समोर अशी मदनिका प्रितिगिते गात असताना कोणास स्वतःस आवरता येईल ?


'का बरे आवरावे मी स्वतःस...?' त्याचे मन पुन्हा उसळले. 'कोणीतरी आश्रमात सोडले म्हणून का मी ब्रह्मचर्य आचारावे. मलाही सामान्य माणसाच्या भाव भावना आहेत. हे लादलेलं ब्रह्मचर्य निभावणं कठीण आहे. परंतु केवळ आचार्यांच्या आज्ञेमुळे राग, लोभ, सगळेच वर्षानुवर्षे मनाच्या तळाशी दडवून ठेवावे लागले. त्यांच्या भीतीने तर कित्येकदा भावनांचा निर्दयीपणे गळा घोटावा लागला. आचार्य सांगतील तेच पुण्य व उर्वरित सगळे पाप. इतकी वर्ष हेच मनावर ठसवलंय. मृत्यूनंतरचे जीवन कोणास ठावूक.... केवळ पुराण शास्त्रांच्या आधारे त्यास सत्य मानून मृत्यूनंतरच्या पाप पुण्याचा हिशोब मांडताना जिवंतपणी मात्र अज्ञात मितीतील परिघात अडकून तिथेच फिरत बसायचे ही तर अतिशयोक्ती मानावी लागेल... '


एका बाजूला त्याच्यावर सर्वस्व ओवाळून टाकलेली ती आणि दुसऱ्या बाजूला समाजाने घालून दिलेल्या रुढी परंपरा आणि त्याचा सांभाळ करणारे आश्रम आणि आचार्य. जो जो विचार करावा त्याच मन अजूनच गुरफटत जाई.... छे.... ह्या दोलायमान अवस्थेतून बाहेर पडणे अशक्य वाटतेय. तिचा स्वीकार करावा तर हा समाज जगणं असह्य करेल आणि आचार्य... त्यांच्या केवळ विचाराने तो नखशिखांत हादरला. नकोच... परंतु तिला नाकारणे म्हणजे पळपुटेपणा होय. निदान मी केलेल्या कृत्यांची तरी जबाबदारी घेणे मला भाग आहे. काय सत्य काय असत्य.... विचारांच्या तंद्रीत तो केव्हाच आश्रमात येऊन पोहोचला. मनातील चलबिचलता त्याच्या चेहऱ्यावर ठळकपणे खुणावत होती. त्याचे गुरुबंधू कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त होते. त्याला मात्र त्यांच्यात जावेसे वाटेना. आजकाल सतत असेच होत असे. त्याचे असे स्वतःच्या विचारांत बुडून जाणे सर्वानाच विचारात पडणारे होते. परंतु तो कोणत्यातरी गहन विचारात बुडालेला असावा असा समज करून कोणीही त्याला फार खोलात जाऊन विचारले नव्हते. त्यालाही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे टाळण्यासाठी त्यांना टाळणे प्रशस्त वाटत होते.


आपल्या छोट्याशा झोपडीवजा पर्णकुटीत ती स्वतःलाच न्याहाळत बसली होती. कुठे काही दिवसांपूर्वी पांढऱ्या पायाची म्हणून हिनवली गेलेली मी...आयुष्य संपता संपता अचानक परमेश्वराने कसं पसाभर सुख पदरात घातलं. ती स्वतःवरच खुदकन हसली. ती पुरेपूर सौंदर्य ल्यालेली लावण्यवती, जिच्या सौंदर्यावर भले भले लुप्त होऊन केवळ तिचीच मनीषा बाळगून असत. त्या सर्वांना टाळून घराण्याच्या प्रतिष्ठेपायी बालपणी बोलल्याप्रमाणे तिचा विवाह ठरवला गेला. कित्येक वर्ष तिच्या स्वप्नांत येऊन प्रीतक्रीडा करणारा राजकुमार व प्रत्यक्षात लाभलेला नवरा ह्यांच्यात अगदी जमीन अस्मानाच अंतर. तिच्या स्वप्नातला राजकुमार सफेद घोड्यावर भरधाव धावत येणारा उमदा तरुण, ज्याच्या पिळदार शरीरयष्टीवर आपण अवघा जीव ओवाळून टाकावा. त्याच्या घनदाट कुरळ्या केसातुन हात फिरवताना आपली लांबसडक बोटे अडकून पडावी. आपण लटकेच ' काय बाई हे केस.. मी तर पुन्हा हातच नाही लावणार ' म्हणावं आणि त्याने जोराने जवळ खेचून त्याच मस्तक माझ्या चेहऱ्यावर घासाव. ' इश्य....' केवळ विचारानेच ती पुन्हा लाजली. परंतु वडिलांच्या हट्टाने आणि तिच्यासमोर पर्याय नसल्याने तिच्या पदराची गाठ अर्धवट टक्कल पडलेल्या व बेढब वाढलेल्या माणसाच्या शेल्याशी बांधली गेली. आभाळाने कोसळून जावे अथवा धरणीने दुभंगून पोटात घ्यावे असे तिला वाटत होते. मात्र अश्या रीतीने लुप्त होण्यास ती काही सीतामाई नव्हती ना. हाच संसार पदरात घेऊन चालावं लागेल ह्या विचारात ती विधी चालू असतानाच मनसोक्त रडली आणि सप्तपदी घेताना उसळणाऱ्या ज्वालांमध्ये तिने आपल्या प्रियकराच्या स्वप्नांना कायमचा अग्नी दिला. स्वतःचा जोडीदार निवडायचा हक्क द्रौपदीनंतर कुणाला मिळाला असेल की नाही तो परमेश्र्वरच जाणे. आता ज्याच्याशी गाठ बांधली गेली तोच सर्वस्व मानून ती सासरची वाट चालू लागली.


लग्नाचे विधी इतर सोपस्कार होई तो ती आपल्या घाबरलेल्या मनाला समजावतच होती. तेवढ्यात ऐन तारुण्यात म्हातारपण ल्यालेला तिचा नवरा शयनकक्षात आला. मिलनाची अधीरता त्याच्या प्रत्येक क्रियेतून दिसून येत होती. आधीच घाबरलेली ती नववधू अजूनच बावरली. लग्नाच्या अगदी पहिल्याच रात्री तिच्यावर तुटून पडायच्या तयारीत असतानाच तिचा पती अचानक आवेग सहन न होऊन का कोण जाणे तिच्या अर्धवट उघड्या शरीरावर तो निपचित पडला. त्या प्रसंगाला घाबरून तिची शुद्ध हरपली. डोळे उघडले तेच मुळी पांढर कपाळ पाहण्यासाठी. एका नुकत्याच लग्न करून गृहप्रवेश केलेल्या नववधू साठी किती हा मोठा धक्का असावा. ज्याच्या भरवशावर ती आपल माहेर सोडून परप्रांतात आली तोच साधी ओळख होण्याआधीच देवास प्रिय व्हावा. नियतीने आपली इतकी क्रूर चेष्टा का करावी. लग्नाआधी सारे उपास सारी व्रत वैकल्ये न चुकता मनापासून केली तरीही पदरात करंटेपणाचे वाण यावे.


पतीच्या मृत्युसोबत तिने तर आपल्या जगण्याचा अधिकारही गमावला होता. अखंड वैधव्यासोबतच तिच्या वाट्याला आला तो भयंकर एकटेपणा आणि असह्यता. कुंकू पुसल गेलं आणि गावाच्या वखवखलेल्या नजरांना आयती मेजवानीच मिळाली. आधीच तीच ओझं झालेल्या घराला तिचं सौंदर्य शाप तर ठरणार नाही ना ह्या भीतीने घेरलं. आणि त्याच भीतीने तिला गंगेला अर्पण करण्यात आलं. त्यांच्या आयुष्यातील तिचा अध्याय मिटला गेला. त्याच्या हळुवार स्पर्शाने तिच्या आयुष्यात त्याचा अध्याय नव्याने उमलू लागला.


आयुष्यात प्रथमच तिने इतका आश्वासक स्पर्श अनुभवला होता, अगदी दैवी अनुभूती वाटावी असा. कोण इतका निर्मळ स्पर्शतो. त्याच्या त्या सायीसारख्या स्पर्शाने कांती कशी मोहरुन उठली. अंगाअंगावर फुलणाऱ्या रोमांचाने काळीज कस हुरळून जात. पतीचा स्पर्श असं का नव्हता ? त्याच्या तेव्हढ्याश्या ओझरत्या स्पर्शात देखील हुकूमत आणि दरारा जाणवत राहिला अगदी तो जाईपर्यंत. तो काही क्षणांचा शिसारी आणणारा स्पर्श तिने तिच्या स्मृतीतून कायमचा पुसून टाकला असला तरीही त्याच्या आठवणीने उगाचच तिला गलबलून आले. आठवणी म्हणजे विषारी नागीण असते. त्यांना कितीही विसरायचं ठरवल तरीही त्या एकांतात फणा काढतातच.


मात्र दैवाने सारी सूत्रे ठरविल्याप्रमाणे तो भेटला. निखळ प्रेम ज्याला ती पारखी झाली होती त्याच्या कुशीत तिला ते गवसल. त्यांच्या एकत्र येण्यात काळजी होती, प्रेम होत, आसही होती आणि ओढही. शारीरिक आकर्षण भलेही केंद्रबिंदू का असेना परंतु तिच्या मनात कुठलाच किंतु नव्हता. लग्नाच्या पहिल्या रात्री बहरलेला मोहोर अजूनही तसाच होता. तीच अंग प्रत्यंग फुलण्यासाठी कधीचाच आतुर होत. वैधव्याच्या काळीज चिरणाऱ्या वेदनेसारखीच प्रितीची व प्रणयाची आस तिला रात्रंदिन जाळत होती. अंगाअंगात उभारून आलेलं तारुण्य ताठरल्यावर ती तीचीदेखील राहत नसे. अशात तिला कोणीतरी तिच्या मनाला सावरणार भेटल्यावर ती कशी शांत बसणार..? तिची हतबलता चूक नव्हतीच.


चूक नसली तरीही तिला ज्ञात होत कि जे घडतंय ते सामाजिकदृष्ट्या पाप आहे. पतीच्या मृत्युपश्चात परपुरूषाचा विचार देखील अक्षम्य आहे. परंतु ज्या तरुणीने विवाहाच्या अवघ्या एका रात्रीत आपला पती गमावला. जीने तारुण्याच बहरण देखील अनुभवलं नाही तिचे आजन्म उजडलेल कपाळ का बरे मिरवीत बसावे...? अंगाच्या अणुरेणुंतून उठणाऱ्या हाकेला का बरे कानाडोळा करावे...? तिचे तर आयुष्याचं आरंभ झाले नव्हते. समाजाने काही आखाडे नेमून दिलेत परंतु त्यात प्रवेश करायच्या आधीच केवळ प्रतिस्पर्ध्याची कमतरता म्हणून हार का मानावी...? डाव तर चालू व्हायच्या आधीच मोडला होता.

----------------------------------------------------------------------------------------------------------

" कशाची चिंता सतावते आहे का ?" आचार्यांच्या आवाजाने तो भानावर आला. आपल्या हातून जे घडतंय ते चूक का बरोबर ह्या विचारांतच त्याचा दिवस सरून जात असे. अध्ययन, पाठ, ध्यान, जेवण खाण कशावरच त्याचं लक्ष नसे. सकाळची गंगासफारी आणि त्यानंतर कुठल्यातरी कोपऱ्यात बसून विचारमग्न राहणं एवढाच त्याचं दिनक्रम होता. त्याच्यासारख्या बुद्धिमान आणि एकाग्र शिष्याला अश्या अवस्थेत बघून आचार्य देखील पीडित होत. आज न राहवून त्यांनी बोलण्याचे ठरवले.


" आचार्य जी आपण..." तो दचकला परंतु लगोलग वाकून त्याने आचार्यांना विनम्र अभिवादन केले. त्याची अवस्था समजून आचार्यांनी मोठ्या प्रेमभराने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. क्षणभरासाठी त्याच्या मनात आले आपण आचार्यांना सगळे सांगून टाकावे आणि झाल्या प्रकारची क्षमा मागावी. हे असे लपवून सतत अपराधी भाव मनात ठेवण्यापेक्षा एकदाच काय ते मोकळे व्हावे आणि शिक्षा घ्यावी. परंतु... आचार्य माफ करतील का....नुसत्या विचारानेच त्याच्या पोटात गोळा उठला. नकोच....


" कशाचे चिंतन चालू आहे...?" त्याला पुन्हा विचाराधीन झालेले पाहून आचार्यांनी जरा मोठ्यानेच विचारणा केली.


" मी... ते.. काहीच नाही..." काय बोलावे ते सुचेना. त्याच्या जिभेला कापरं सुटलं. हातपाय भीतीने थरथरू लागले.


त्याची तशी गोंधळलेली मुद्रा आणि मागील काही दिवसांच्या वागण्याने आचार्य चिंतीत होते. सततच्या विचाराने व अपुऱ्या निद्रेने निस्तेज झालेले त्याचे डोळे आणि मलूल झालेला चेहरा पाहून त्यांच्या पोटात गलबलून येत असे. काहीही झाले तरी आज त्याच्याशी बोलायचेच असे ठरवून आचार्य त्याला भेटले तर खरे... परंतु त्याच्या एकूण हावभावावरून त्याच्या मनातील वादळाचा थांग लागणं त्यांच्यासाठी अशक्य होत.


" तुझ्या मनात नक्की कोणता कल्लोळ चालू हे समजण्यास मी आता तरी असमर्थ आहे. जो शिष्य अत्यंत कठीण अशा पाठांवर निसंकोच माझ्याशी चर्चा करत असे, कित्येकदा माझ्याही मनात येणाऱ्या शंकांवर विचार विनिमय करत असे त्याच्या मनात असे काय वादळ उठले असावे जे बोलावयास तुला अपुरे व्हावे..." तो अजूनही शांतच होता. आचार्यांच्या शब्दांनी त्याला मागल्या काही दिवसांचे स्मरण झाले. किती चुकीचा समज करून घेतला होता आचार्यांबद्दल. ते त्याला आपल्या जवळचा शिष्य समजायचे आणि तो मात्र...


" तुझ्यासारखा सद्गुणी आणि अत्यंत ज्ञानी शिष्य मिळाला हे माझं सौभाग्य. शिष्याच्या गुणवत्तेने तर गुरु महान बनतो. तू तर तुझ्या गुरुबंधूची प्रेरणा आहेस. माझे सगळे शिष्य थोडेफार का होईना तुझ्यासारखे गुणवान व्हावे अशी माझी फार इच्छा आहे. परंतु त्यांचे प्रेरणस्थान असलेला माझा सर्वात लाडका शिष्य अश्या परिस्थतीत पाहून माझ्या मनाला किती वेदना होत असतील...?" आचार्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. त्याने आचार्याना प्रथमच असे पाहिले आणि त्याच्या सर्वांगाला कंप सुटला. आपला वर्तणुकीचे इतके गंभीर परिणाम होतील ह्याची त्याला जाणीव नव्हती.


" आचार्य... मी चुकलो..." त्याच्या गळा भरून आला. मनातलं सगळं घडाघडा बोलून टाकावंस वाटत होत परंतु शब्द घशाला चिकटून बसले जणू. एक सत्याचा उलगडा आणि त्याच्या आजवर जपलेल्या प्रतिमेस क्षणार्धात तडा जाणार होता.


" बरे ऐक... आपण उद्याच तीर्थयात्रेस निघतोय...." आचार्यांनी जास्त खोलात न जाता तीर्थयात्रेच्या मनसुबा कथन केला.


त्याच्यासाठी अजुन एक धक्का होता. उद्याच कसं निघणार ? तिला कल्पना न देता कसं काय निघायचं ? उद्या निघायचे तर तिच्यापर्यंत निरोप कसा काय पोचवायचा ? तो पुन्हा आपल्या विचारांत गुरफटला. आचार्यांची आज्ञा डावलणे शक्यच नव्हते. आणि अचानक असे निघून जाणे म्हणजे पुन्हा भेट कधी घडेल त्याचा काय भरवसा. कदाचित हीच शेवटची भेट असावी. आपल्या एकंदर कृत्यावर त्याला भयंकर चीड येऊ लागली. आपल्या भरकटण्याने तिच्या आयुष्यात प्रचंड खळबळ माजली व आता आपल्याच सोडून जाण्याने तिचे काय होईल.....? आजवर आपल्या भरवश्यावर तिने.... नाही.... जे झाले ते चूक होते... समाज कधीही मान्य करणार नाही. पण निदान तिच्या पायावर डोके ठेवून माफी मागायची होती.


त्याचे दुसरे मन लगेच उसळले. " वाह ! समाज.... तिच्या गोऱ्यापान कायेत रत होत असताना नाही आठवला समाज, तिच्या समोर वस्त्रे सैलावताना समाजाचे सर्वच नियम झुगारून दिले मग आता... तिची जबाबदारी घेण्याची वेळ आली तर समाजाची आठवण आली. वाह रे तुझा दुटप्पीपणा "


" तयारीला लाग... या यात्रेचे प्रयोजन खरे तर तुझ्या मनशांतीसाठी आहे. प्रत्येक साधकाचे मन भरकटतेच... परंतु आपल्या प्रवासात प्रभूच्या नामस्मरणात तुला तुझ्या जीवनाचे साध्य मिळेल.... अमाप वेळ असेल तुझ्याकडे तुझ्या गुंतलेल्या विचारांचा गुंता सोडवायला " तपासाला पुन्हा हरवलेलं पाहून आचार्यांनी हलकेच त्याच्या पाठीवर थोपटले आणि हळूच डोळ्याच्या कडांवर साचलेले पाणी अंगठ्याने टिपले. " आताच तयारीस लाग... "


त्याच्या उत्तराची प्रतीक्षादेखील न करता क्षणात ते उठून चालू लागले. शांतपणे चालणाऱ्या आचार्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो पाणी भरल्या डोळ्यांनी पहातच राहिला. कोपऱ्यांत मंदपणे तेवणाऱ्या समयांच्या प्रकाशात ते अजुनच तेजस्वी भासत होते. मात्र त्याचे विचार मनाला डंख मारू लागले. 'काय सुचवायचे असेल आचार्यांना ?' आपण किती चुकीचे समजलो होतो आचार्यांना. केवळ आपल्या एका शिष्याचा इतका विचार. नाही... मी आचार्यांच्या विश्वासाचा आदर करतो. माझ्या चुकीचे पापक्षालन करेन.... परंतु ह्या मोहात अजुन फसणार नाही.


आपल्या मनातील विचारांना त्याने बळेच दूर लोटले. व प्रवासाच्या तयारीस सज्ज झाला. त्याला उत्साहाने वावरताना पाहून बाकी लोक पण उत्साहित झाले. जो तो नवीन जोमाने तयारीला लागला. उद्या भल्या पहाटे सर्वानाच निघायचे होते.


रात्रभर गोड स्वप्नात गुरफटलेल्या तिला अंमळ पहाटेच जाग आली. का कोण जाणे ही पहाट तिला काहीतरी सांगू पाहत होती. अंगभर कपडे सावरत तिने हळूच कवाडे उघडली. पूर्वेला नुकतंच तांबड फुटत होत. चहूबाजूला लालसर गुलाबी प्रकाश पसरला होता. अचानक काहीतरी जाणवलं... काहीतरी खूप वेगाने घडल... ती पळतच परसदारी आली. पोटात पिळवटून आल... काहीतरी तिच्यातून बाहेर पडू पाहत होत... परंतु... तिच्या अंगावर शहारा आला. नुसत्या जाणिवेनेच तिला नाचावस वाटत होत. स्त्री जन्माच सार्थक वाटावं असा तो क्षण.. ती पुन्हा पुन्हा स्वतःला न्याहाळू लागली. हा दिवस तिच्या आयुष्यात येईल ह्याची दुसरं आशा नव्हती. पण पहाटेचं उमलण तिच्या अंगोपांगी फुलू लागलं होत.


आपल्याच तंद्रीत विचारांच्या हिंदोळ्यावर लहरताना तिची तंद्री भंगली ती चालण्याच्या आवाजाने. या भल्या पहाटे कोणीतरी प्रवासी असावे. उगीचच धावत ती त्या प्रवाश्यास पाहण्यास दारातल्या पारिजातकामागे येऊन उभी राहिली. बहारदार डवरलेला तो पारिजातक प्रसन्न होऊन चौफेर आपल्या फुलांचा सडा टाकत होता. दवबिंदूत न्हालेली ती शुभ्र पुष्पे हळूच त्या गौरवर्णीला स्पर्शून धान्य होऊन मातीत विलीन होत होती. आधीच मोहरून गेलेली ती त्या थंडगार स्पर्शाने अजुनच मोहरत होती.


पारिजातकमागे लपूनच ती किलकिल्या डोळ्यांनी हळूच बाहेर डोकावली. शुभ्र वस्त्राधारी साधकांचा मेळाच निघाला होता. गळ्यात उपरणे, भालावर चंदनाच्या रेघोट्या, पाठीवर कापडाची चुंबळ, कुणाच्या हातात टाळ, चिपळ्या तर कुणाच्या हातात काठ्या.... सर्वच जणू दूरच्या प्रवासाला निघाल्यासारखे वाटत होते. मागे एक साधारण वयस्कर वाटणारे व गळ्यात रुद्राक्षांच्या माळा असणाऱ्या व्यक्ती कदाचित त्यांचे गुरुजन असावे आणि सोबत... ती डोळे विस्फारून पहातच राहिली. तिला नदीच्या प्रवाहातून जीवन प्रवाहात सोडणारा तिचा प्राणदाता व ज्याला तिने मनानेच वरले होते तो तिचा प्राणनाथ देखील गुरुजींसोबत निर्विकार चेहऱ्याने चालला होता. कालपर्यंत आपल्यात रत होणारा आणि सर्वस्व उधळून प्रेम करणारा तो इतका निर्विकार... इतकं सार घडून गेलं परंतु त्याला एकाही शब्दाने सांगावस वाटलं नसेल का ? त्यांच्यातील नातं समाजमान्य नव्हतंच. कधी ना कधी दूर हे व्हावंच लागणार होत. परंतु... तिच्या डोळ्यात भरभर अश्रू साचले. सर्वांगाला हलकासा कंप सुटला. तोंडातून हुंदका फुटू नये म्हणून तिने पदराचा बोळा तोंडात कोंबला. दारासमोरून सर्व घोळका निघून गेला पण त्याने साधी नजर फिरवूनदेखील तिच्या घराकडे लक्ष टाकलं नव्हतं. हि कोणत्या प्रकारची विरक्ती..? किमान निरोप तरी घ्यायचा. कोणी इतके का नाकारावे ?


परिस्थितीच भान येताच ती घाबरली... साऱ्या भावना आतल्या आत पिळवटून निघाल्या. म्हणजे कालचा निरोप शेवटचाच होता... खांबाला टेकून ती आधारानेच खाली बसली. कालची दुपार झरझर तिच्या डोळ्यापुढे आली. काल ते कुठल्याशा विवंचनेत होते... लक्षच नव्हतं त्यांचं.... अगदी मला जवळ घेतल्यावरदेखील बराच वेळ शून्यात बघत होते.... कितीदा खोदून विचारलं मी... पण नाहीच... काहीच बोलले नाहीत.... आणि कालची दुपार तर नेहमीसारखी रंगलीच नाही.... सतत त्यांच्या मनात काहीतरी खदखदत असल्याप्रमाणे ते माझ्याशी एकरूप झालेच नाहीत.... आणि जातानाही त्यांनी वळून बघितले नाही. म्हणजे.... कालच त्यांनी निरोप घेतला तर... अनाहूतपणे तिचा हात आपल्या पोटावर गेला. तिच्या घासला कोरड पडली आणि हातापायाला कापरं भरलं. भयंकर निराशेने तिने आपले डोळे मिटले. तिच्या भावना तिच्या डोळ्यांतून गालांवर ओघळू लागल्या. डोकं भणाणून उठलं. आता भविष्य काय...?


पुन्हा मागीलदारी कसलासा आवाज आला. कोणीतरी धावत होत. त्याच्यातीलच एखादा असावा. न राहवून तिने हाक मारलीच. तो दचकून जागीच थबकला. ह्या वेळेस अशा गावाबाहेरच्या ठिकाणी कोणाची हाक अपेक्षित नसल्यासारखा तो बावचळून गेला होता.


" अ... क्षमा असावी.... म्हणजे..... " ती घाबरून अडखळली. त्याची नजर तिच्यावर खिळून होती. नुकतीच पारिजातकाच्या सुवासिक दवबिंदूतून न्हाऊन तीच रूप अजुनच खुलल होत.


" हं... " तो नुसतच हुंकारला.


" पदयात्रा...." तिने उभ्या असल्या जागेवरून उजव्या दिशेला बोट दाखवले. त्याच्या नजरेला बुजून तिने आपली मान खाली घातली.


" धन्यवाद. पदयात्रा नाही तीर्थयात्रेचे प्रयोजन आहे. बरे झाले आपण मार्ग दाखविला नाहीतर आता वर्षभरानंतरच भेट झाली असती.... " त्याच्या लक्षात आले आपण चुकीच्या मार्गाने जात होतो.


" वर्षभरानंतर...?" तिच्या मोठाल्या डोळ्यात प्रश्नचिन्ह उभ राहील.


" तीर्थयात्रेच्या निमित्त आता भारतभ्रमण होईल. साधारण वर्षाचा कालावधी लागेलच पुन्हा परतायला..." तिने बोट दाखवलेल्या दिशेने त्याने पळायला सुरुवात केली.


" हं... " ती पुन्हा जागेवरच कोसळली. जे सुख ती आपल्या ओंजळीत साठवायचा प्रयत्न करत होती ते बोटाच्या फटीतून केव्हाचंच ओघळून गेलं होत.


सायंकाळ कधी झाली तिला समजलेच नाही. म्हणजे कधीपासून ती अशीच बसून होती. भूतकाळात परतून जाणं शक्य नाही आणि भविष्यकाळाचा पत्ता नाही... पुन्हा ती अश्या वळणावर होती जिथून पुढच्या वाटा कठीण तर होत्या परंतु कोणत्या वाटेने चालायचं हे पण तिलाच ठरवायचे होते. नियतीने तिचे काम चोख केले होते. तिच्या नशिबाच्या गाठीच अश्या विणल्या होत्या की सोडवताना त्या अजुनच गुंतल्या जात.


एक आयुष्य संपता संपता अचानक त्याचा हात काय मिळतो. त्याच्या स्पर्शाने तिचा पुनर्जन्म होतच होता. नशिबाच्या आगीत होरपळून गेलेल्या तिच्या मनावर प्रेमाचं अमृत शिंपडून ती तरारतच होती की अजून एक नशिबाचा खेळ मांडला गेला. नवीन मिळालेलं आयुष्यदेखील अळवावरच पाणीच निघाल. त्याने त्याचा मार्ग निवडला व निघून गेला. तीच काय...? कोण चूक कोण बरोबर हे शोधायची वेळच नव्हती. त्याच माहीत नाही पण तिच्या सुखाचा शोध बहुतेक संपलेला.


ती नशिबाच्या फेऱ्यात अडकली की मोहाच्या मृगजळात. लग्नाच्या पहिल्याच रात्री हरवलेल्या सुखाच्या शोधात तिच्याही नकळत ती अडकत गेली. समाज नियमानुसार दोघेही चूक होते परंतु स्वतःच्या शोधात, सुखाच्या शोधात ते दोन हरवलेले जीव एकमेकांना भेटले. प्रेम आणि शरिरसुखाच्या ओढीमध्ये भान हरपून डुंबून जात होते. सृष्टीच्या परिमितीमध्ये त्यांची एक वेगळीच दुनिया होती. जगरहाटीच्या नियमांना मोडीत काढत त्याची स्वप्न साकारत होती. परंतु वास्तवाच्या लाटेने त्याच्या स्वप्नांच्या वाळूच्या इमाल्यांना एका फटक्यात जमीनदोस्त केले. मागे उरला तो भावनांचा फेसाळणारा समुद्र, तुटून विखुरलेले त्यांच्या स्वप्नांचे तुकडे व त्या प्रत्येक तुकड्यांच्या टोचण्याने भळभळून वाहणाऱ्या जखमा.


" पाणी... स्वप्न.... " असच काहीस बरळत ती कधी निद्राधीन झाली तिलाच कळल नाही. तिच्या मनातील खळबळ आता शांत झाली होती. दुसऱ्याच दिवशी नदीच्या दुसऱ्या टोकाला तीच निर्जीव शरीर सापडलं. जिथून तीच नवीन आयुष्य सुरु झालेलं तिथेच येऊन तिचा अंत झाला. एक मोहाच मृगजळ आता कायमच विरून गेलं होत.


समाप्त



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama