Vrushali Thakur

Tragedy

4.0  

Vrushali Thakur

Tragedy

अलीकडे पलीकडे

अलीकडे पलीकडे

5 mins
909


नवरात्रीची तिसरी माळ. शनिवार असल्याने तसाही भाविकांमध्ये जरा जास्तच उत्साह होता. कोणाला विकेंडचे दोन्ही दिवस सुट्टी तर कोणाला रविवारी सुट्टी त्यामुळे शनिवार रात्री देवीची पूजा अर्चा आणि गरबा चांगलाच रंगणार होता. वेळ झाली तशी मंडपात साऱ्यांची गर्दी होऊ लागली. रंगबिरंगी लायटिंगच्या प्रकाशझोतात उजळून निघालेला मंडप एखाद्या नवथर लाजऱ्या नवरीसारखा अंगोपांगी तेज लेऊन गरब्याच्या घडीची आतुरतेने वाट पाहत होता. मंडपाच्या मध्यभागी देवी राखड्या रंगाच्या सोनेरी नक्षीकाम केलेल्या साडीत अजूनच सुंदर भासत होती. गळ्यातील सोन्याचे दागिने, नाकात अडकवलेली नाजूक चमकी, मुकुटात घडवलेले चमचमते हिरे, हातापायाच्या बोटात चढवलेला अंगठ्यांचा साज, दोन्ही हातात भरलेला हातभार चमचमता चुडा, कंबरेवर उठून दिसणारा सोनेरी कंबरपट्टा सारं काही लेऊन देवी लक्ष्मी तिच्या दिव्य स्वरूपात सर्वाना दर्शन देत होती. तिच्या कपाळावर लावलेलं लालभडक कुंकू साऱ्यांना एकनिष्ठतेची शिकवण देत होत. आशीर्वाद देण्यासाठी उंचावलेल्या तळहातावरील मेहंदी स्वतःच्या कर्तृत्वाचा सुगंध दाही दिशात पसरावा ह्याची प्रेरणा देत होती. देवीच्या डोळ्यांतून ओसंडून वाहणाऱ्या ममतेला आपल्याही मस्तकी घ्यावं म्हणून जो तो तिच्यासमोर साष्टांग नमस्कार घालत होता.


रस्त्याच्या जरा दूर दुसऱ्या बाजूला एका मिणमिणत्या स्ट्रीटलाईट खाली ' ती ' उभी होती. तिची राखाडी रंगाची चमचमती साडी स्ट्रीटलाईटच्या प्रकाशात जरा जास्तच चमकत होती. अंबाड्यावर माळलेले दोन तीन गजरे आणि अंगावर फवारलेल्या मोगऱ्याच्या अत्तराने तिच्या आजूबाजूचा परिसर मोगऱ्याच्या सुगंधाने गंधाळून टाकला होता. दोन्ही हातातील सोनेरी पाणी मारलेल्या बांगड्या तिच्या हिरव्या चुड्याला अजून आकर्षक बनवत होत्या. हल्लीच घेतलेली खड्यांची चेन तिने कंबरेभोवती गुंडाळली होती. दोन दिवसांआधी हातावर काढलेली मेहंदी चांगलीच रंगली होती. तिने दोन्ही हात नाकाशी धरून मेहंदी तिने तो सुगंध मनभरून श्वासात भरून घेतला. हातातील बांगड्या, पायातील पैंजण, कानातील झुमके साऱ्यांची किणकिण एक वेगळाच नाद निर्माण करत होती. दुरवरूनच का होईना ती डोळेभरून देवीला पाहत होती. दोघींचही रूप साज जवळपास सारखाच पण समाजाच्या विकृतीने दोघीना अगदी अल्याड पल्याड उभं केलं होत. हिला कितीही वाटलं तरी मंडपात जाऊन देवीच्या चरणावर डोकं ठेवू शकत नव्हती. आणि ती... तिने हीच नशीब असं का लिहिलं असाव हे तिलाच माहित.. 


" आरतीची वेळ झालेली आहे.. भाविकांनी कृपया मंडपात उपस्थित राहावे.." माईकवरून कोणीतरी घोषणा केली. आजूबाजूला पसरलेले लोक लगबगीने मंडपाच्या दिशेने येऊ लागले. इथे ' तिच्या ' धंद्याचीही वेळ झालेली होती. आरती झाली कि तिचेही फोन वाजायला सुरुवात होणार होती. देवीचा जागर उदो उदो काय ते दिवस उजेडीच... रात्र झाली कि काही भक्तांचे पाय कुंटणखान्याची वाट पकडायचे. त्यामुळे ती तयारीत उभी होती. केसातील गजरे नीट करत तिने एकदा केसावरुन हात फिरवला. पदराला जरा खाली ओढून तिने चापून चोपून नीट केले. हातातील पर्समधून लिपस्टिक काढत तिने आपल्या लालभडक ओठांवरून पुन्हा एकदा फिरवली.


आरती संपली तशी प्रसाद वाटपाला सुरुवात झाली. साजूक तुपात भरपूर सुकामेवा घालून शिजवलेल्या शिऱ्याचा सुगंध पार रस्त्याच्या त्या टोकापर्यंत पसरला. तिच्यापर्यंत पोचलेल्या सुगंधाने तिच्या पोटात भुकेने खळबळ माजली. अपमान होईल पण निदान द्रोणभर प्रसाद खायला मिळेल ह्या उद्देशाने तिने दोन पावलं मंडपाच्या दिशेने टाकली पण...


" ह्या **** आता देवीच्या मंडपासमोर उभी राहायची हिम्मत करू लागल्या..." त्या रस्त्यावरून जाणारा कोणीतरी पांढरपेशा समाजातील माणूस तिच्याकडे किळसवाण्या नजरेने पाहत उद्गारला. कदाचित मंडपातच देवीच्या दर्शनाला आले असावेत. पण देवदर्शनाला येऊनही त्याची नजर तिच्या पदराच्या आडून दिसणाऱ्या खोलगट घळीवर भिरभिरत होती.


" बाई बाई... हिम्मत तर बघा ह्यांची... बाईच्या जातीला कलंक आहेत नुसत्या..." कपाळावर कुंकू आणि गळ्यात सौभाग्यलेणं मिरवत त्याच्यासोबत चालणारी, राखाडी रंगाची सिल्कची साडी नेसून केसात गजरे माळलेली ललना त्याची बायकोच असावी हे तिने ताडलं.


त्यांचं बोलणं ऐकून तिचे पाय जागीच थबकले. पाहायला गेलं तर त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असावेत कदाचित. हिच्या झगझगीत दुनियेतील चटके तिला कधी लागलेच नसतील ना... त्यामुळे वास्तवाच्या दाहक निखाऱ्यांवरून चालताना पोळून गेलेली ही तिला कलंकच वाटणार होती. ह्या पांढरपेशा समाजाचा खोटा मुखवटा उतरायला काही वेळ बाकी होता. सभ्य समाजाचं नागडं विकृत रूप हिच्या चांगलच परिचयाच होत. त्या दोघांचे शब्द ऐकून हिच्या काळजात थोडी कालवाकालव झालीच. अश्या टोचणाऱ्या बोलण्याची हिला आधीपासून सवय होती. पण आज का कोण जाणे बिनदास्त वाटणाऱ्या हिच्या टपोऱ्या डोळ्यात पाणी तरळलं. बेंबीच्या देठापासून तिला ओरडून सांगावस वाटत होत कि मी कलंक नाहीये... खरंतर मलाच कलंकित केलंय.. ह्या समाजाने आणि वासनेने बरबटलेल्या माणसांनी. कोणालाच हौस नसते असं आयुष्य जगायची... पण ज्यांच्यासोबत नशिबानेच खेळ मांडलेत अश्याना आधार तरी कोण देणार... असते ज्याची त्याची काहीतरी मजबुरी.. जिचा अंत स्वतःच्या शरीराचा लिलाव करण्यात होतो..


पाहायला गेलं तर काहीच फरक नाहीये आपल्या तिघींत... तिघीही आपण स्त्रियाच तर आहोत... तिघीही आज राखाडी रंगाच्या साड्या नेसलोत. तिघांच्याही केसांत मोगऱ्याचा गजरा दरवळतोय. तिघींच्याही हातावर मेंदी सजलेली आहे. तिघींचही रूप अंगावरच्या दागिन्यांनी अजूनच खुललंय... पण असुरांचा संहार करून तीच रूप देवी म्हणून पुजलं जात... नवरात्रीचे नऊ दिवस तिच्या प्रत्येक प्रतिकाची मनोभावे सेवा केली जाते. समाजाने ठरवून दिल्याप्रमाणे एका पुरुषाशी लग्न करून संसाराच्या साऱ्या आघाड्यांवर लढणाऱ्या तुला देवीचं प्रतीक समजलं जातं... ओटी भरून, साडी चोळी देऊन तुझा सन्मान केला जातो...


पण माझं काय..? कोणी छंद म्हणून स्वतःच्या शरीराचा लिलाव नाही ग करत... माझ्याही भूतकाळात असं काही घडलंय ज्याची वाट केवळ ह्या देहविक्रयाच्या जगात आणून सोडते. इथे देवीच्या समोर आरती ओवाळणाऱ्या पुरुषाला माझ्यात कधी देवीचं दर्शन होत नाही... त्याला फक्त मादी दिसत असते. दिवसरात्र माझ्यावरपण बलात्कार होतोच ग.. पण त्याच्यासाठी कॅण्डल मार्च नाही होत.. कारण माझ्यासारख्या स्त्रियांवर बलात्कार करण हा ह्या समाजाचा हक्क आहे. महिन्याचे ते पाच दिवसदेखील मला सुट्टी नसतेच. तेव्हाही हे विकृत पुरुष माझ्या शरीराचे लचके तोडतंच असतात. तुला कोणाचा किळसवाणा स्पर्श झाला तर तू अंग खसखसून धूत असशील ना... मग माझ्या आयुष्यात स्पर्शाचा अर्थच किळसवाणा आहे मग मी काय करू...? खरंतर समाजातील सारी विकृतता, सारी वासना मी आणि माझ्यासारख्या कित्येकजणी स्वतःच्या शरीरात सामावून घेतात म्हणून निदान समाज काही अंशी का होईना सुरक्षित आहे. माणसांचे सारे पाप स्वतःत धुवून सामावून घेणारी गंगामाई पवित्र तर मी का अपवित्र...? माझ्या अश्या काय करण्याने स्त्री जातीवर कलंक लागलेला आहे..?


देवीच्या मंडपासमोर अश्या अवस्थेत उभं राहणं मलाही पटत नाही. पण आता देवीच्यासमोर मान मोडेस्तोवर नतमस्तक होणारे काहीच वेळाने माझ्याकडे येतील. इथे तू देवीची खणानारळाने ओटी भरशील तोवर तिकडे माझी साडी फेडलेली असेल. इथे तू देवीच्या चरणावर फुल चढवशील. तिकडे माझ्या केसातील गजरा खसकन ओढून चोळामोळा केला जाईल. इथे तू देवीसमोर नतमस्तक होशील आणि मी तिथे कोणासमोर तरी अस्ताव्यस्त निर्वस्त्र पडलेली असेन. इथे तू मनोभावे देवीचा प्रसाद ग्रहण करत असशील आणि तिथे मी कोणाचं तरी भक्ष्य बनलेली असेल. इथे तू देवीची प्रार्थना करत असशील आणि तिथे मी वेदनेने कण्हत असेन. इथे तू देवीचा जागर करत असशील तिथे मी सारं असह्य होऊन तळमळत असेन. इकडे देवीसमोर गरबा रंगात येईल. तिकडे तो माझ्या शरीरावर आरूढ होऊन स्वतःचा पुरुषार्थ सिद्ध करण्यात मग्न असेल. देवीच्या चरणावरच कुंकू लेवून तू समाजमान्य पतिव्रता सिद्ध होशील आणि त्याने माझ्या अंगावर पैसे फेकताना माझ्या कपाळावरचा ' वेश्या ' नावाचा शिक्का अजून गडद होईल.


उद्या सकाळी देवीच्या मूर्तीवर नवी साडी चढेल. तिची नव्याने पूजा होईल. तू ही नव्या रंगाची साडी नेसून पतिव्रता म्हणून आनंदाने मिरवशील... आणि मी मात्र जुनी साडी नव्यानेच नेसून पुन्हा एखादी वखवखलेली नजर शोधत कुठेतरी उभी असेन...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy