Vrushali Thakur

Drama Romance Others

4.0  

Vrushali Thakur

Drama Romance Others

निर्णय

निर्णय

29 mins
485


आपल्या भरजरी लेहेंग्याचा दुपट्टा सांभाळत आणि चेहऱ्यावर उसनं हसू आणत तिने पुन्हा नंबर डायल केला. पलीकडून पुन्हा फोन बंद असल्याची सूचना मिळाली. इतका वेळ गुलाबासारखा टवटवीत तिचा चेहरा हया फोनमुळे पार कोमेजून गेला होता. हिरमुसून तिने फोन कट केला व सभोवार नजर फिरवली. जमलेल्या सर्वांमध्ये कसलीतरी कुजबुज चालू होती. आवंढा गिळत, त्याकडे दुर्लक्ष करत स्वतःशीच उसनं हसत ती मागे वळली. मागे त्या आसू भरल्या डोळ्यांनी तिची माफी मागत होत्या. भरजरी साडीतील नेहमीचा रुबाब जाऊन एक हताश अवघडलेपण त्यांच्या चेहऱ्यावर पसरलं होत. त्यांना असं बघताच ती शरमली.

" अहो आई... अस काय करताय.... " तिने त्यांना प्रेमाने मिठीत घेतल. त्याच्या आईवरदेखील तीच अगदी स्वतःच्या आईइतकंच प्रेम होतं.

" अग काय हे.... ऐन साखरपुड्यादिवशी हा कसल्या समाजसेवा करत फिरतोय...?" इतका वेळ बांधून ठेवलेला त्यांचा संयम तुटला. बोलता बोलता त्यांना हुंदका दाटून आला. आपल्या नाजूकश्या रुमालाने त्यांनी आपले अश्रू अलगद टिपले.

" आई...... चांगलय ना... कोणी ना कोणी तरी मदत केलीच पाहिजे ना... त्यात काय..?" तिने नेहमीप्रमाणे त्याचीच बाजू उचलून धरली. तिचा जीवनसखा होता ना तो. परंतु घरच्यांची अशी अवस्था बघता आता तिचाही गळा भरून आला होता पण घसा खाकरत तिने हळूच आईच्या पाठीवर थोपटल.

" बरे भेटलायत एकमेकाना..." मनोमन तिला धन्य म्हणत आई ड्रेसिंग रूमच्या दिशेने निघून गेल्या.


खरंतर आज तिचा आणि त्याचा साखरपुडा होता. दोन वर्षांच्या त्यांच्या प्रेमाला आता एका नात्यात बांधलं जाणार होत. दोघांच्याही घरून त्यांच्या रिलेशनला मान्यता असल्याने दोघेही खुशचं होते. त्यांच्याहीपेक्षा जास्त उत्सुकता तर त्यांच्या पेरेन्ट्सला होती. साखरपुडा ठरल्यापासून दोघांच्याही आया अगदी कंबर कसून तयारीला लागल्या होत्या. दोघीनीही आपापल्या नवऱ्याना कामाच्या मागे सळो की पळो करून टाकलं होतं. त्याच्या घरी तर ती सगळ्यांच्याच मनात भरली होती. मग काय सगळ काही तिच्याच पसंतीने ठरलं होतं. जणू काही ती दोन्ही घरची मुलगी होती.

" काही कॉन्टॅक्ट झाला का ..??" लगबगीने जवळ येत तिच्या आईने विचारलं.

" नाही " तिने नकारार्थी मान हलवली. आईच्या चेहऱ्याकडे न पाहताही या क्षणी ती किती रागावलीय ह्याची तिला कल्पना होती. म्हणूनच एकाच शब्दात उत्तर देऊन ती गप्प झाली.

" काय फालतूगिरी लावलीय देव जाणे...." आई वैतागली तर होतीच.

" आई .... अस काय बोलते...? तो काही मजेत लेट झालाय का..?" ती थोडी उसळलीच.

" जगात तो एकटाच उरलाय का सर्वांची काळजी घ्यायला....? बर... ठीक आहे.... पण त्या जगात त्याच घर पण येत हे माहीत नाही का त्याला...?" आता आई चालू झाली होती. आणि आई रागावलीय म्हणजे तो तर गेलाच पण त्याच्या आधी हिला लेक्चर मिळणार होत. आईला आता थांबावण म्हणजे.....

" अगं.... आई..." तरीही तिने एक बारीकसा प्रयत्न केला.

" काही गरज नाहीये तुला त्याच्या वतीने एक्सप्लेनेशन द्यायची. आपलं सोड स्वतःच्या आई वडिलांचा तरी विचार करायचा. हे जमलेले सगळे लोक काही बाही विचार करून टोमणे मारतायत. साखरपुड्याला चक्क नवरा मुलगाच गायब... मुलाचं कुठेतरी अफेयर असेल नाहीतर मुलीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल नाहीतर तो दुसरीसोबत गेला असेल पळून एक ना दोन....... लोकांच्या टोमन्यांनी आणि पोराच्या काळजीने रडून रडून हैराण झालीय त्याची आई. आणि ह्याला मात्र जगदुनियेच पडलंय... येऊ दे त्याला बघतेच मग...." तणतणत तिची आई निघून गेली खरी पण तिच्याही डोळ्यातून नकळत हलकासा अश्रू तिच्या गालावर ओघळला. मगापासून खूप काही तिच्याही कानावर पडत होतं. कितीही इग्नोर करावं म्हटलं तरीही कान आपसूकच आवाजाचा वेध घ्यायचेच.


कालपासून किती खुश होती ती. जेव्हापासून दोघांच्याही घरच्यांनी होकार दिलाय ती जणू हवेतच होती. आणि का बर नसावी. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलय तोच जीवनसाथी बनणार होता ते ही सर्वांच्या संमतीने. त्यालाच आवडेल म्हणून अबोली रंगाचा हा भरजरी लेहंगा खास दिल्लीवरून मागवला होता. त्याला सरप्राईज म्हणून आपल्या दोन्ही हातावर अगदी कोपरापर्यंत भरगच्च मेहंदी काढून घेतलेली. रात्रभर किती स्वप्न बघितली होती तिने. फोटोग्राफरला ऍडव्हान्स मध्ये वॉर्निंग देऊन ठेवलेली. तिच्यासाईडने ती एकदम प्रिपेअर होती. पण तिला कुठे माहीत होतं उद्या काय होणार आहे.

दोन वर्षांपूर्वी कुठल्याश्या ट्रेकिंग ग्रुपमध्ये त्यांची ओळख झाली. तिची नुसती बडबड चालू असल्याने सगळेच लगेच तिचे फ्रेंड्स बनले. परंतु कोणाशी न जमणाऱ्या त्याच्याशी मात्र तिची अशी गट्टी जमली की सोबत्यांनाही विश्वास बसेना की ते कालच भेटलेत. दोन दिवस दोघांचीही अखंड बडबड चालू होती की सोबत्यानीही त्यांना एकटच सोडणं पसंत केलं होत. निघायच्या आदल्या रात्री कॅम्प फायर संपवून सगळा ग्रुप आपापल्या तंबूत झोपी गेला होता. हे दोघे मात्र पुन्हा शेकोटी पेटवून तिथेच बस्तान मांडून तारे बघत पडले होते. रात्र जशी चढत होती तसे तारे अजूनच चमकत होते. घराच्या बाल्कनीतुन कधीच नजरेस न पडलेले दृश्य पाहताना ती हरवून गेली होती. सहजच तिने त्याच्या दिशेने पाहिलं तर तो शेकोटीच्या राखेत कसल्याशा रेघोट्या ओढत बसला होता. समोर अर्धवट धुगधुगती आग, त्यातून स्पष्ट दिसणारे लालभडक निखारे, त्या लालसर पिवळ्या प्रकाशात चमकणारी त्याची विचारमग्न चर्या..... न राहवून तिने त्याचा एक फोटो काढलाच. त्या क्लीक च्या आवाजानेही त्याची समाधी हलली नव्हती. म्हणून त्याला डिस्टर्ब करण्यासाठी तिने टोकल.

" चला, उद्या पहाटे निघायचंय.... नाही..." ती.

" हं..... " तो नुसताच हुंकारला. अजूनही तो त्याच्याच तंद्रीत होता कदाचित. समोर अर्धवट जळत्या निखाऱ्यांवरून त्याची नजर काही ढळत नव्हती.

" काय झालंय.....? " त्याचा चेहरा न्याहाळत तिने विचारलं.


तो गप्पच.... उत्तरादाखल केवळ ' च्चक ' केलं. मागच्या दोन दिवसात त्याला एखाद्या खळखळणाऱ्या झऱ्यासारखं पाहिलेलं तिने परंतू आता मात्र त्याला धीरगंभीर बघून उगाचच तिच्या मनात भीती दाटली. कदाचित त्याला आता एकट सोडायची गरज होती म्हणूनच त्याला बाय करत ती आपल्या तंबूच्या दिशेने वळली.

" थँक्स.." त्याच्या आवाजसरशी ती झटकन मागे वळली. त्याचे डोळे का कोण जाणे काठोकाठ भरून आल्यासारखे जाणवले. तिने वळून त्याला एक मस्त स्माईल दिली.

" का..?" आपले डोळे मोठाले करत तिने प्रश्न टाकला.

" तुझ्यासोबत पुन्हा हसायला शिकलो मी...." अजूनही त्याची नजर निखाऱ्यांवरच होती.

" मी आहेच स्मार्ट...." आपले मोकळे केस उडवत ती उगाचच खिदळली. तो ही किंचितस हसला.

" उम्म..... बर एक सांगशील का....?" तिने त्याच्या जवळ बसत पुन्हा प्रश्न केला.

" काय?" यावेळी त्यांने मात्र तिच्याकडे बघितलं. इतक्या जवळून तिच्या डोळ्यात बघताच तो स्वतःलाच हरवत होता.

" कोण होती ती??" तिच्या थेट प्रश्नाने तो बावचळला. नकळत त्याच्या कपाळावरच्या शिरा ताणल्या गेल्या. हृदयाची धडधड तीव्र झाली.

" बोल नं...." तिने आपला हात त्याच्या हातावर ठेवला.

" जाऊदे ना..." हलकेच हसत त्याने मान हलवली. आणि एक उडी मारून तिच्या समोर बसला. "कॅन वी बी फ्रेंड्स?"

" ऑ...." ती डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत बसली.

" ओय्ये... मी प्रपोज नाही करत आहे. फ्रेंडशिपबद्दल विचारतोय." त्याच्या ह्या निरागस वाक्यावर ती मात्र खळखळून हसत सुटली. तो मात्र कन्फ्युज होऊन तिच्याकडे बघतच राहिला..... आणि बघतच राहिला.... वाऱ्याच्या झुळकीने तिच्या चेहऱ्यावर उडणारे तिचे ते निळसर केस.... खळाळून हसल्याने चेहऱ्यावर पसरलेली आणि त्या अंधुक प्रकाशात किंचित उठून दिसणारी तिच्या गालावरची लाली.... हसल्याने पाणी भरलेले तिचे मासोळी डोळे..... आह्ह !!!

जुन्या आठवणीने आताही तिचे गाल लाल झाले होते. नकळत पुन्हा त्याचाच नंबर डायल झाला. तिच्या छातीत धडधड सुरू झाली. डोळे गच्च मिटत तिने फोन कानाला लावला. परंतु आताही पलीकडून फोन बंद असल्याचीच सूचना मिळाली. ती तशीच खाली बसली. त्याचा फोन बंद असल्याने नक्की काय झालंय हे ही कळायला काही मार्ग नव्हता. निघाल्यावर रस्त्यात कुठेतरी जोरदार एक्सिडेंट झालेला. मग त्याच कनवाळू मन आपली एंगेजमेंट विसरलं आणि आई बाबांना पुढे व्हायला सांगून तो मदत करायला अपघातस्थळी धावला. खरंतर त्याच्या अशा मदतीला धावण्याच्या सवयीचं सगळ्यांना कौतूक होत. परंतु आज त्याचीच सवय सर्वांच्या उपहासाच कारण बनली होती. भर साखरपुड्याच्या समारंभात सगळे पै पाहुणे गोळा झालेले असताना मुहूर्त टळून गेलातरी मुलाचा पत्ता नव्हता. भरीस भर म्हणून मागच्या दोन तासापासून त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. नातेवाइकांना टोमणे मारायला आणि चघळायला ही एक मोठी गोष्ट मिळाली. नेहमीच सगळ्या बाबतीत पर्टीक्युलर असलेला तो आज मात्र कर्तव्य निभावताना आपल्याच परिवारासाठी बेजबाबदार ठरला होता.

" खूप वाट बघितली... निघुया आता " तिने आईकडे पाहिलं. तिचेही डोळे लालसर झाले होते. तिच्या चेहऱ्यावरचं सार तेज मावळून गेलं होतं. पडलेल्या खांद्यानी आणि थरथरत्या हातानी आईने तिला पकडलं. ह्या क्षणी तिला खुप अपराधी वाटत होतं. आपल्या आईला तिने इतक्या वर्षांत कधीच अस हतबल पाहिलं नव्हतं. ती दाखवत नसली तरीही कोपऱ्यात सर्वांपासून लपून आपले डोळे पुसुन आली होती. प्रेमाची बाजू सावरण्यात कुठेतरी आई वडील देखील दुखावले गेले होते.

" पण... आई.." तिने आईला थांबवायचा प्रयत्न केला.

" हॉलवाला मगाशीच येऊन हॉल खाली करायला सांगून गेलाय..."

"आई.. अग...."

"shhhh.... घरी जाऊन बोलूया... आता चल " आईने जवळजवळ खेचलच तिला. सकाळपर्यंत सोनेरी स्वप्न बघणारे तिचे डोळे आता आसवांनी भरले होते. चेहऱ्यावरची रया तर केव्हाचीच उतरली होती. तिच्या चमचमणाऱ्या लेहेंग्याची चमक फिकी पडली होती. हॉलभर पसरलेल्या रिकाम्या खुर्च्या बघून तिला गलबलून आलं. नक्की कोणाचं काय चुकलंय हेच कळत नव्हतं. पण एक मात्र नक्की होत की काहीतरी चुकलंय.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


खिडकीतून येणारा उन्हाचा कवडसा तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्याला स्पर्शून तिला जागवायचा प्रयत्न करत होता. रात्रभर तिचे डोळे झोपेच्या अधीन न झाल्याने एक चुरचुर डोळाभर पसरली होती. तिची ओलसर दबलेली उशी तिच्या रात्रभर जागण्याची कहाणी मूकपणे खुणावत होती. तिने सुजलेल्या डोळ्यांनी मोबाईलकडे पाहिलं. मागच्या काही वर्षांत पहिल्यांदाच तो रात्रभर शांत होता. तिने घाबरतच फोन ऑन केला. त्याचे बरेचसे मिस्डकॉल आणि मेसेजेस तिची वाट बघत होते. खरेतर ती रागातच होती आणि तिला त्याच्याशी बोलायचही नव्हतं पण त्याचे इतके सारे मिस्डकॉल्स बघून तिचा राग विरघळून गेला. लटक्या रागाने तिने त्याचा नंबर डायल केला.... आह...... द नंबर यू आर ट्राइंग इज करंटली बिजी.... सकाळी सकाळी ह्याचा नंबर बिजी....? आता तिच्या डोक्याची तारच सणकली. त्याचा राग फोन आपटण्यात निघाला.


" अग ए.... जरा बोल...." आईने धावतच येऊन तिच्या हातात आपला फोन टेकवला.


" मला नाही बोलायचं कोणाशी...." तिने फणकारून मान फिरवली.


" अरे........" आई काहीतरी बोलतच होती तोच तिची नजर स्क्रीनवर गेली.... अच्छा.. म्हणजे हा शहाणा आईला मनवत होता तर...


" हॅलो.." तिने नाराजीनेच फोन उचलला


" सॉरी " पलीकडून त्याचा मधाळ आवाज.


" आता काय आहे...?" ती अजूनही रागातच.


" अग कालसाठी सॉरी.... खूप...."


" काही गरज नाहीये तुझ्या सॉरीची... आणि मला पुन्हा कॉल पण करू नको..." तिने फोन कट केला. त्यासरशी तिला धोका देत डोळ्यातून आसू ओघळलेच. दुःखाने आपल हृदय फुटून जाईल की काय असच वाटत होतं.


'गजब का है दिन....' तिचा फोन वाजत होता. आपले सुजलेले डोळे चोळत तिने फोनच्या दिशेने पाहिलं. तिच्या बेडवर अस्ताव्यस्त पडलेल्या फोनच्या स्क्रीनवर एक अननोवन नंबर झळकत होता. तिने गडबडून बेडरूमच्या दरवाजाकडे पाहिलं. दरवाजा बंदच होता.... म्हणजे ... आई आलीच नाही काय... म्हणजे..... इतका वेळ मी स्वप्नात.....शी... निराशेने ती बसल्याच जागी पडली. मागचे काही दिवस हे असच होत होतं. जेव्हापासून एंगेजमेंट तुटलीय, ती ही आतून तुटून जात होती. आणि तो.... त्याच वागणं अचानक का कोण जाणे बदलल्यासारख वाटत होतं.... पण असं का वाटतंय देव जाणे... काही झालच तर नाहीये.... आपण उगाचच विचार करतोय.. क्षणभर ती मनाला समजावू लागली.. आताही तो दिवस तिला लख्ख आठवत होता. कितीही विसरू म्हटलं तरीही तिच्या स्मृती पटलावरून त्या आठवणी पुसट होत नव्हत्या. त्याला जशी आवडेल तशीच तयार होऊन ती केव्हाची त्याची वाट पाहत बसली होती. आज अंमळ लवकरच तयार झाली होती. स्वतःकडे बघून खुदकन लाजली. ' कोणाची नजर नको लागायला ' तिच्या आईने कडकडून दोन्ही हात तिच्या वरून फिरवून नजर काढून टाकली. सगळ्यांना बाहेर पळवून ती एकटीच आरशासमोर स्वतःशी हितगुज करत होती. आपल्या नाजूक उघडझाप करणाऱ्या पापण्याआडून स्वतःलाच न्याहाळत होती. हवेच्या झोताने कपाळावर रुळणाऱ्या बटांना सावरताना ती उगाचच वैतागत होती. कधी एकदा तो येतोय आणि आपल्याला पाहतोय अस तिला होऊन गेल होत. तसा तो नेहमीच वेळेत यायचा पण आज अर्धा तास जास्त उलटून गेला तरी काही पत्ता नव्हता.... मे बी ट्राफिक मध्ये असेल.... स्वतःशीच गोड हसत तिने आपल्या खट्याळ केसांना हळूच सावरत एका हातात सेल्फी ऑन केला. डावा डोळा मिचकावत पटकन क्लिक केलं. पहिलाच क्लिक इतका मस्त होता. ती स्वतःवरच खुश झाली. तिची डायमंड नोजरिंग सगळ्यात जास्त चमकत होती.... आज तो पुन्हा प्रेमात पडेल बघ... तिने लगेचच त्याला व्हाट्सअपला सेंड केला आणि त्याच्या सीन करण्याची वाट बघत होती....


पाचेक मिनीटात तिचा फोन वाजला. ती खुशचं झाली आणि का ना होईल, त्याचाच तर फोन होता. आता नक्कीच तारीफ करत बसेल.... बट मी आता त्याचा फोन उचलणार नाही.. लेट का केला त्याने.... आल्यावरच बघू दे..... हेहेहे.….. तिला आवडायचं त्याला अस बेचैन करायला. स्वतःचा लांबलचक घागरा सावरत ती उगाच इकडून तिकडे फेऱ्या मारत राहिली तरी तिची नजर न राहवून फोनकडे जात होती. मनात आणि पोटात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. तीच हृदय जोराने धडधड करत होत. सर्वांग एक अनामिक जाणिवेने थरथरत होत.


" काय म्हणतायत आमच्या सुनबाई...??" दरवाजातून त्याच्या आईने प्रवेश केला. हिरव्या निळसर कॉम्बिनेशनची ही सिल्कची साडी तिने मुद्दाम त्याच्या आईसाठी मागवली होती. आज त्याच साडीच उदघाटन केलं होतं तिच्या सासूबाईंनी.


" सासूबाई आणि सुनबाई दोघंही उठून दिसतायत बर का...!! " मागोमाग सासऱ्यानीही एन्ट्री घेतली. त्यांच्या मागेच त्यांचे काही नातेवाईकदेखील दाखल झाले. एवढी माणसं येऊन तिच्या भोवती भिरभिरत होती पण ज्याची एवढी वाट बघतेय त्याचा पत्ताच नाही कुठे..हुssह....


तिचा हिरमुसला चेहरा काही कोणाच्याच नजरेतून सुटला नव्हता. पण तिला त्रास होण्यापेक्षा सरळ सांगितलेलंच बर... " आई... तो कुठे आहे..?" तिच्याकडून प्रश्न आलाच.


" कसय ना... आम्ही सगळे एकत्रच निघालो होतो. परंतु वाटेत येताना कोणाचातरी एक्सिडेंट झाला होता. व हा मागचा पुढचा विचार न करता सरळ मदत करायला धावला."


" तो तर ठीक आहे ना...?" तिने काळजीने विचारलं.


" तो ठीक आहे गं... पण माहितेय ना तो कसा आहे.... आता हॉस्पिटलाईज केल्याशिवाय काही येणार नाही. तरी चांगली धमकी देऊन आलीय.."


" बस एवढंच ना.... मला वाटलं काय झालंय न काय नाही " तिचा जीव भांड्यात पडला. " येऊदे सावकाश.. मी पाहीन वाट त्याची "


तिच्या डोळ्यातून आसू घरंगळले. त्या दिवसापासून आतापर्यंत ती वाटच तर पाहतेय. कोणाच्यातरी एक्सिडेंटच्या धावपळीत की ते फक्त निमित्त मात्र काहीही का असेना तिचा ' तो ' मात्र कुठेतरी हरवला. दुसऱ्या दिवशी एक सॉरी बोलण्यासाठी आणि असेच दोन तीन जुजबी फोननंतर त्याच्याशी संपर्क असा उरलाच नव्हता. नक्की काय घडतंय ह्याचा काही अंदाजच येत नव्हता तिला... त्याला सरळ जाऊन विचारावं का.... पण विचारायला तो भेटायला तर हवा...कुठे हरवलाय कुणास ठाऊक..... पण.... के तो सोक्षमोक्ष लावायचाच आता.


तिने त्याचा नंबर डायल केला. अपेक्षेप्रमाणे बिजी होता. काही दिवसांपूर्वी आपल्यासाठी चोवीस तास अवेलेबल असणारा तो अचानक कुठे बिजी झाला हे एक कोडेच होते तिच्यासाठी. बऱ्याच वेळाने का होईना पलीकडून कॉल उचलला गेला.


" हॅलो " तोच होता पलीकडे. त्याचा नुसता आवाज ऐकून तीच काळीज पाणी पाणी झालं. खूप ठरवलं होतं तिने की बरच काही बोलायचं पण त्याचा आवाज ऐकताच तिचा राग तिच्या डोळ्यात पाणी होऊन गोळा झाला.


" हॅलो " ती स्फुंदतच बोलली.


" काय झालंय " त्याने काळजीने विचारलं.


" तुला काय झालंय... का वागतोयस असा..?? का अचानक दूर पळतोयस...??? नाही करायचं का लग्न... तर सांग ना तस.... नाही पुन्हा त्रास देणार तुला." हृदयात खदखदणार दुःख शेवटी ओठांवर आलंच.


पलीकडून तो शांतच होता.


" बोल ना रे काहीतरी...." आता तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. किती वेळ ती तरी मनातच दुःख दाबून ठेवणार.


" राधिका परत आलीय माझ्या आयुष्यात..." तो काहीश्या अपराधी स्वरात उत्तरला.


" कोण... राधिका..." ती अडखळली. मनातून एक भीतीची लहर दौडत गेली.


" तीच... जिच्याशी ब्रेकअप झाल्यावर तिला विसरण्यासाठी म्हणून ट्रिप वर आलो होतो "


" तिला विसरूनच तू माझ्या प्रेमात होतास ना.. " ती वैतागली. पोटात विरणाऱ्या भीतीच्या गोळ्याला एका हाताने गच्च दाबत ती जवळजवळ ओरडलीच.


" हो ... पण....."


" पण काय......."


"............."


" बोल ना यार.... आता काय जीव घेणार आहेस माझा....?"


" आपण भेटूया का प्लिज..... मी एक्सप्लेन करतो तुला " त्याने अजिजीने विनंती केली.


एव्हाना तिच्या हातून फोन गळून पडला होता. हे अगदी अनपेक्षित होत. ज्या मुलीचा कधी साधा उल्लेखही झाला नव्हता आज तिच्यामुळेच हिच्या आयुष्यात आग लागली होती. तो काय एक्सप्लेन करणार.... त्याने न सांगताही त्याचा निर्णय काय असेल ह्याचा अंदाज तिला आलाच होता. मग का आणि कशासाठी भेटायचं आहे त्याला...?? प्रेम ब्रीम काही नसतं ह्या जगात.... सगळी अंधश्रद्धा आहे.


--------------------------------------------------------------------------------------------------------------


घरी आल्यापासून गप्प गप्प बसलेल्या तिला बघून आईने ताडल की नक्कीच हीच काहितरी बिनसलय. रोज देवाकडे ती सगळं नीट होण्यासाठी प्रार्थना करायची पण तरीही देव काही तीच साकडं ऐकत नव्हता. आज पुन्हा काय नवीन घडलं असावं आणि का...?? आईच्या मायेपोटी तिने हळूच कानोसा घ्यायचा प्रयत्न केला.


" त्याच्याशी काही बोलणं झालं का..??" पदराला घाईघाईने हात पुसत आईने विचारलं.


ती सोफ्यावर तशीच बसून होती....हतबुद्ध..... सर्व जाणीवा हरवल्यासारखी... तिचे डोळे कुठेतरी भिंतीवर रोखलेले होते... कोणत्यातरी विचारांचं जाळं ती गुंफत होती. आईच बोलणं तर तिच्या गावीही नव्हतं.


आपल्या लेकीला अस शून्यात हरवलेलं पाहून आईच्या काळजाचाही ठोका चुकला. अशी ती कधीच नव्हती. भग्न वाड्याच्या उरलेल्या अवशेषाप्रमाणे ती आपल्या तुटक्या मनात डोकावत असावी. आईने तिच्या थकलेल्या खांद्यावर हात ठेवून तिला हलवलं. एखादा विजेचा झटका बसावा तशी ती थरारली.


" अं..." आईकडे ती पाहतच राहिली. आपल्या विचारांच्या गर्द जंगलात ती अशी हरवली होती की आईची उपस्थिती अनपेक्षित असावी.


" अग काहीतरी विचारतेय मगापासून..."


" काही नाही..... मला जरा आराम करु दे " आईपासून नजर चुकत ती बेडरूम मध्ये पळाली.


पुन्हा तोच बेडरूम... सगळ्या आठवणी एकांतातच तर छळत होत्या. त्याची आस, त्याची स्वप्न, त्यांच्या संसाराची स्वप्नं सगळं काही ह्याच बेडरूम मध्ये रंगवलेल तिने. त्याच्या विरहात देखील इथेच मनसोक्त रडली. किती तो विरोधाभास.... सगळ्या कटू गोडं आठवणी तिथेच. काल रात्री उशिरापर्यंत सकाळी त्याला भेटल्यावर कसं बोलायच ह्याची प्रॅक्टिस पण तर इथेच केली होती.


पण काय बोलायचं तेच विसरली नेमक्या वेळी. कधी नव्हे ते आज तो वेळेच्या आधी तिची वाट बघत थांबला होता. कॉफी शॉप मध्ये एंटर करायच्या आधीच तिने त्याला पाहिलं... सवयीप्रमाणे... रेड अँड ब्लॅक चेक्स मध्ये कसला क्युट दिसत होता तो. त्याच चार्मिंग स्माईल त्याच्या चेहऱ्यावर खुलून आलं होतं. त्याचे हृदयाचे ठाव घेणारे तपकिरी डोळे मोबाईल मध्ये काहीतरी शोधत होते. थ्री फोर्थ स्लीवज मधून त्याचे पिळदार दंड उठून दिसत होते. पुन्हा एकदा त्याला पाहता क्षणी तिने आपलं हृदय त्याच्याकडे गहाण ठेवलं.हाय..... हा रोजच मला असा मारतो. पण क्षणातच ती भानावर आली.... नाही... रोज तेज ज्याच्यासाठी वेडी व्हायची तो हा नव्हे....नाही... किंवा तो तोच आहे पण फक्त माझा नाहीये.... तिचे डोळे काठोकाठ भरून आले. तो आता आपला नाही हा विचारच सहन होईना. पुढे जावं की मागे ह्या तंद्रीत ती तिथेच खिळून उभी होती. काहीही होऊन का काळच गोठून जावा अथवा सर्व पूर्वस्थितीत यावं नाहीतर ह्या धरणीने मला ओढून घ्यावं पण.. पण.. काहीतरी होऊन हे पुढचं सगळं थांबावं. मी नाही देऊ शकत त्याला कोणाला... फक्त आणि फक्त माझा आहे तो.


पण त्याच्या मनाच काय. त्याला काय आवडत... मी त्याची आवड नक्कीच नाहीये. असती तर..... हे असं.... काट्याचा नायटा होणं म्हणतात ते हेच ते.... नुसत्या विचारांनीच तीच डोकं फुटायची वेळ आली. तिचा लालबुंद चेहरा कुणी पहिला असता तर तिची घालमेल न बोलताही समजली असती. एन्ट्रान्सवरच्या चेअरवर बसूनच ती त्याला एकटक पापणीही न लवता बघत होती. त्याला तर जाणीवही नव्हती की ती जवळपास असेल. जवळ गेली तर उडणाऱ्या फुलपाखराप्रमाणे तोपन उडून जाईल ह्या भीतीनं तीच काळीज धडधडू लागलं.... तो खुश तर असेल ना तिच्यासोबत.... तसही भरपूर वेडाच होता तो तिच्यासाठी. नशिबाने आता ते भेटलेत तर ....आपण नको मध्ये यायला... पण माझ्या मनाच काय... दुसरं मन लगेच उसळल.....माझं पण तर प्रेम होतं आणि त्याला ऍक्सेप्ट पण होत.... म्हणून तर लग्नाचा घाट घातला ना... अचानक कुणीतरी यावं आणि माझ्या होऊ घातलेल्या संसाराचा सारीपाट उधळून लावावा.. नाही... हे मी का सहन करू..??..... पण माझा जोडीदारच माझ्या बाजूने नाहीये इथे..... आह नको हे विचार.... नकोच काही....


त्याला न भेटताच ती आल्या वाटेने परतली. खूप काही बोलायचं होत तिला पण न बोलताच सगळं तिच्या मनातच राहील. त्यानंतर त्याचे काही फोन कॉल्स येऊन गेले. तो ही बरेचदा तिच्या घरी येऊन गेला.पण ती टाळतच राहिली.... आता ज्या गावी जायचंच नाही त्याचा रस्ता तरी का विचारायचा...????


जळणाऱ्या काळजाची धग आसू बनून तिच्या डोळ्यातून बरसत राहायची फक्त. त्याच्यासोबतच्या आठवणी तिचा मेंदू पोखरून खायच्या. उण्यापुऱ्या दोन वर्षांच रिलेशन. पण घरच्या लावलेल्या दह्यासारखं अगदी घट्ट होत. कोण कोनात मिसळून गेलं होतं हे सांगण कठीण. तीच तर अख्ख आयुष्य साखरेसारखं विरघळून गेलं होतं त्याच्यात. रुसवे, फुगवे, लटकी भांडण, प्रेमाच्या आणाभाका, एकत्र राहण्याची वचन आणि एकमेकांवर सर्वस्व उधळून द्यायची ओढ.


त्यांच्या पहिल्याच भेटीत त्याने गारुड घातलं होत तिच्या मनावर. त्यानंतरचा प्रत्येक दिवस ती त्याच्या प्रेमात भरल्याप्रमाणे त्याची सावलीच बनून गेली होती. एखाद स्वप्न बघावं तसं ते प्रेमात पडले. ट्रेकच्या ओळखीनंतर असच एकदा सहजच फेरफटका म्हणून माथेरानचीही चक्कर घडलेली. भल्या पहाटे काळोखाला चिरत त्यांची स्विफ्ट वाऱ्यावर स्वार होती. तिला काहीतरी धतींग सरप्राईज द्यायचं म्हणून अर्धवट झोपेतून उठवून तिला अक्षरशः कारमध्ये कोंबलच होत. खरंतर रात्री तिच्या स्वप्नात गुजगोष्टी करणारा तो अचानक असा घरी अवतरेल हे तिच्या स्वप्नातही नव्हतं. मग हे स्वप्न नसून सत्य आहे हे समजेपर्यंत ते आधीच अर्ध्या रस्त्यावर पोचले होते.


" तू ना....." ती चिडलीच होती.


" मी... ना... काय???" त्याने डोळे मिचकावत तिला विचारलं. अस डोळे मिचकावत गालातल्या गालात जेव्हा तो हसायचा, तिचा सगळा जीव त्याच्या गालावर उमटणाऱ्या इवल्याश्या खळीत कोसळायचा.


" हसू नको....." ती उगाचच ओरडली.


" बरं.." तिच्या बोलण्यावर मान डोलवत त्याने नजर समोर वळवली.


" मुर्खच असेल ती मुलगी जी ह्याला सोडून गेली. एवढ्या गोड मुलाला कोणी कसं बरं डीच केलं असेल..... बरंच झालं पण..... नाहीतर मला कसा सापडला असता " स्वतःच्या विचारांवर ती उगाचच हसली. " ओहह शीट, किती मूर्ख आहे मी..."


तो ही तिरक्या नजरेने तीच खट्याळ हसू टिपत होता. हसताना कशी गोड दिसते ना... अगदी काळजात खड्डा पडतो. पुन्हा पुन्हा प्रेमात पडावस वाटत तिच्या. रागावली ना की अजूनच मस्त दिसते. तिच्या त्या हक्काने रागावण्यासाठी मी आयुष्यभर गाढव बनून राहायला तयार आहे. तिला बघण्याच्या नादात तो समोर बघायला मात्र विसरला.


ऐन वळणावर समोरून अचानक जोराने गाडी आल्यावर त्याला नेमकं काय करायचं ते समजलच नाही. साईड घ्यायच्या नादात थोडी आदळलीच गाडी. समोरच्या गाडीची तशीच निघूनही गेली. ती घाबरून, गोंधळून स्तब्ध बसून होती. अवसानच गळलं सार. त्याच हृदय तर सगळ्या मर्यादा सोडून धडधडत होत. थरथरत्या हातानी त्याने तिच्या डोक्यावर हळुवार थोपटल. आणी मात्र तिला बसलेला धक्का रागाच्या स्वरूपात बरसू लागला. मधेच ओरडा, मधेच आसू, मधेच तीच स्फुंदत स्फुंदत बोलणं..... अवकाळी गारपिटीच्या गारा झेलाव्या तसा तो निश्चल ऐकत होता. त्याची तर सॉरी बोलायाची तर हिम्मतच नव्हती. सर्व शस्त्रास्त्रे तुटून हरलेल्या योध्यासारखा तो तिचे वाग्बाण किंचितही न डळमळता झेलत होता. न झेलून सांगणार तरी कोणाला. चूक त्याचीच तर होती.


अचानक.... अभावीतपणे नक्की काय झालं ते कळलेच नाही त्याला. पण स्वतःभोवती तिच्या नाजूक मिठीचा स्पर्श जाणवला. इतका मऊ, मुलायम स्पर्श. कित्येकदा स्वतःच्या विचारांतच त्याने तिला मिठीत घेतल होत. पण तो स्पर्श इतका बोलका आणि सुगंधी असेल त्याला वाटलंच नव्हतं. काय नव्हतं त्या मिठीत.... तिचा राग, त्याच्या विषयीची ओथंबून जाणारी काळजी, तिच्या धडाडणाऱ्या स्पंदनातून बाहेर ओढ, तिच्या प्रेमाचा ऊबदारपणा..... सगळं सगळं काही मिळवल्यासारखं वाटलं त्याला. तिच्या आसवांनी नुसता त्याचा खांदाच नाही भिजवला तर तिच्या प्रेमाची कबुलीही दिली. तो किंचित थरारून गेला. असाच आयुष्यभर तिच्या मिठीच्या उबदारपणात हरवून जावं.... त्याचेही हात तिच्याभोवती गुंफले गेले. किंचित जवळ ओढून त्याने तिला पाठीवर थोपटले. जणू आयुष्यभरासाठी त्याने स्वतःला तिच्या हवाली केले. कितीतरी वेळ ते तसेच बसून होते. माथेरानच्या सौंदर्यापेक्षा त्यांच्या मिठीतील सौंदर्य जास्त मोहक होत.


त्या सौंदर्याला आपल्याच मिठीत साठवून ठेवायचं होत त्याला. त्याने हलकेच तिच्या गालाना आपल्या थरथरणाऱ्या बोटांनी स्पर्श केला. ती एखाद्या नुकत्याच उमललेल्या रातराणीसारखी तरारून फुलली. तिचे ते अर्धवट उघडे डोळे, ज्याच्यात त्याला त्यांच्या भविष्याची स्वप्ने उमललेली दिसत होती. त्याने न राहवून आपले ओठ तिच्या डोळ्यांवर टेकवले. पोटात हुरहूर जाणवली एकदम. हजारो फुलपाखरं एकसाथच रुंजी घालू लागली. त्याच्या हनुवटीवर त्याला तिचे उष्ण श्वास जाणवले. हीच का ती प्रीतीची अधीरता. नुकत्याच उमललेल्या कळीने भ्रमराच्या गुंजारवाने जसे मोहरून जावे तशी ती मोहरून अधिकच त्याला बिलगली. मधुघटाने ओथंबून गेलेल्या तिच्या गुलाबी ओठांची भुरळ त्याला न पडली तर नवलच. त्याचे किंचित ओलसर ओठ आता तिच्या गुलाबी ओठांचा मागोवा घेत होते. तिचे अधिकच उष्ण होणारे श्वास त्याला आपल्या गालांवर जाणवत होते. तिचे मगापासून रागावणारे ओठ आता शांत होते. इतका वेळ त्याच्या लक्षात न आलेला तिच्या ओठांचा गुलाबीपणा आता त्याला खुणावत होता. किती ते बदलणारे रंग तिच्या ओठांचे.. मगाशी रागात लालेलाल आणि आता प्रेमात गुलाबी.....खरच की काय.... की फक्त आपल्यालाच भासतात तसे. तो तिच्याकडे पाहत तसाच स्तब्ध होता. त्याच्या स्पर्शासाठी अधीर झालेल्या मनाला तिच्या मनाची पूर्ण संमती हवी होती. त्याने डोळे भरुन तिला एकवार पाहिलं. तिच्या लाजलेल्या नजरेत आतुरता होती. त्याने हलकेच आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. आता मात्र काळ थांबला होता. त्याच्या बंद डोळ्याआड आसू जमा होऊ लागले. त्याच प्रेमच त्याच्या डोळ्यातून बरसत होत. आता तो ' तो ' नव्हता ना ती ' ती ' होती. एक प्रेमकहाणी मूकपणे चालू होतं होती.


--------------------------------------------------------------------------------------------------------


" हजार वेळा सांगून झाली माझं... मला कुठेही जायचं नाही " ती वैतागली. ' आधीच माझ्या आयुष्याचे बारा वाजले असताना, ह्या लोकांना फिरायचं सुचतय.' ती मनातच चरफडली. ' तो तसा आणि हे... हद्द झालीय.' वैतागून पाय आपटत ती आपल्या बेडरूम मध्ये निघून गेली.


" का ग छळते तू तिला..?" मगापासून तीच डोकं खाणाऱ्या तिच्या चुलत बहिणीवर आई जरा चिडलीच. " माहितेय ना तुला..." आईचा स्वर गदगदला. काळजातली धग आवंढा बनून गळ्यात दाटली.


" म्हणूनच तर तिला बाहेर न्यायचं म्हणतेय... जरा बर वाटेल ना. नुसती कोशात गुरफटून बसलीय..... मला नाही बघवत अस तिला " आईची अवस्था बघून बहिणीच अवसानच गळल. चुलत असल्या तरीही सख्या बहिणी आणि पक्क्या मैत्रिणी होत्या. त्याच गुपित तर हिलाच पहिलं सांगितलं होतं तिने. तासनतास त्याचे गुणगान ऐकणारी हीच. त्याच्याशी अर्धा तास बोलल्यावर उरला वेळ त्याबद्दल बोलून बोलून हिचेच कान खाणार ती. बरं आपली लाडकी बहीण कोणाच्यातरी प्रेमात आहे म्हणून ही देखील खुश. पण आता.... आता मात्र सतत मस्ती करत असणारी, सतत चिवचिवत असणारी ती अशी गप्प बसलेली बघून घरच्यांचं काळीज हेलावत होत. मस्ती मध्येही कोणाचं वाईट न चिंतनाऱ्या तिची नियतीने मात्र क्रूर थट्टा केली होती.


" अग काकू, तू तरी थोडं तिला मनवायला मदत कर ना...." बहिनीची पुन्हा तिच्या काकीला कळकळून विनंती होती. आईलाही दोघींची अवस्था समजत होती.


तशी ती आधीपासूनच खूप हळवी. जगाला आपण कणखर आहोत हे दाखवायचा प्रयत्न असला तरी आतून काही तिचा स्वभाव बदलत नव्हता. त्यात हा प्रसंग अगदीच तिच्या मनाला लागलेला. तिच्या मनस्थितीची कल्पना सर्वानाच होती परंतु भूतकाळातील प्रसंग उराशी बाळगून आयुष्य काढता नाही येत ना. भलेही वाईट स्वप्न समजून विसरून जाण्याइतका सोपा प्रसंग नव्हता पण तरीही...….

ती बेडरूममध्ये बसून रडून रडून हैराण झाली. त्या दिवसापासून प्रत्येक दिवशी ती रडतच तर होती. कधी त्याच्या विचारांमध्ये तर कधी स्वतःच्या हतबलतेवर. ना तिची चुक होती ना तीच प्रेम त्याला चूक ठरवत होतं. प्रेम पण कस असत ना. माणसाला किती हतबल करून टाकत. किती दिवस ती असच शोक बाळगून राहणार. कधी न कधी सगळं विसरून नवीन आयुष्य सुरुवात तर करावं लागेल. त्याच्यासाठी ती घरच्यांना मात्र दुखवत होती. ज्याचा तिला काहीच अधिकार नव्हता...... विचार करून मनावर थकव्याची जळमट चढताना तिला बाजूला बहीण बसल्याच जाणवलं. बबहिणीच्या तशा रोखून धरलेल्या नजरेला नजर मिळवणं तिच्यासाठी अशक्यच होत. तीही तशीच बसून कोणीतरी कोंडी फोडायची वाट बघत होती.


" आपल शोक पाळणं संपलं नाही का अजून??" इति तिची बहीण.


तिने थोड्या घुश्श्यातच बहिणीकडे बघीतलं. आता ही अजून किती आणि काय बोलणार ह्याचा विचार करतच ती मनातच दात ओठ खात होती.


" तू येतेयस.... मी विचारात नाहीये.…. सांगतेय " तिच्यावर बोंबलतच तिची बहीण निघाली. चला आता काही पर्याय नाहीच उरला. वैतागतच का होईना पण तिने आपली बॅग भरायला घेतली. आता भलेही कितीही कंटाळा येवो नाहीतर आणखी काही, ही बया तर घेऊन जाणारच.


तिच्या डोळ्यासमोर तो दिवस तरळू लागला. त्याने किती मस्त सरप्राईज दिल होत. उशिरा रात्री तिच्या स्वप्नात तिच्यावर प्रेम करणारा तो अचानक पहाटे तिच्या समोर उभा होता. तिला तर अजूनही स्वप्नच वाटत होतं. स्वप्नासारखाच होत सगळं. आणि आता...... त्याच ठिकाणी पुन्हा.... जिथे स्वप्नांची माळ गुंफण चालू झालेलं. परतून तिथेच जायचं भकास डोळ्यांनी आणि रित्या मनाने....आणि त्याच्या आठवणींचं काय...


सगळ्या विचारांनीच तिची झोप कधीच उडून गेली होती. पहाटेचा अलार्म वाजला तशी ती यंत्रवत उठली. खरंतर सारं अंग जडावलेलं. मन आणि शरीर दोन्ही तिच्या कृतीला साथ देत नव्हत. पण तिच्यासमोर काही चालणार नाही म्हणूनच ती मनाविरुद्ध तयार होत होती. साधारण अर्ध्या तासात बहीण तयार होऊन तिच्या रूममध्ये आली. ही मात्र बेडवर तशीच अर्धवट तयार होऊन बसून होती.


" काय हे यार अजून तयार नाही झालीस..." बहीण वैतागलीच.


" जाणं गरजेच आहे आणि ते ही..." तिने आवंढा गिळला. तिच्या बहिणीच्या नजरेतून ते सुटलं नाही पण तिने दुर्लक्ष करत तिची बॅग हातात घेतली.


" पाच मिनिटात निघतोय आपण... तू बाहेर ये "


सगळेच पर्याय संपले होते. हरलेल्या योध्याप्रमाणे झुकलेल्या खांद्यांनीच बाहेर येऊन ती गाडीच बसली. जाताना आईला साधं बाय करायचही ध्यानात नव्हतं. तिच्या बहिणीने हळूच तिच्या आईकडे बघून डोळे झुकवले. तिला बाय करून गाडी स्टार्ट केली.


तिने कारची विंडो ओपन केली. तसही तिला ए सी आवडायचाच नाही. खिडकीतून येणारी वाऱ्याची झुळुकच जास्त गार आणि मुलायम असते हा तिनेच लावलेला शोध. विंडो वर डोकं टेकवून बाहेरून स्पर्शून जाणारा वारा नेहमीच तिला सुखावत असे. आताही तो थंडगार झुळुझुळू वाहणारा वारा तिला त्याची आठवण करून देत होता. कितीही त्याच्या आठवणीपासून पळायचा प्रयत्न केला तरीही ती फिरून तिथेच यायची. आताही पुन्हा पुन्हा त्याच्याच आठवणीभोवती पतंगासारख्या गिरक्या घेत होती. कसलं एवढं नात होत देव जाणे, जे तोडूनही तुटत मात्र नव्हतं. रात्रभराच्या त्याच्या आठवणींचं जागरण हळू हळू तिच्या डोळ्यांवर पसरायला लागलं. आपण बहिणीसोबत कुठेतरी चाललोय हे आता तिच्या गावीही नव्हतं. मिटलेल्या डोळ्यांआडून खुनावणाऱ्या त्याला भेटायला ती कधीच स्वप्नांच्या दुनियेत पोचली होती.


वाऱ्याची झुळझुळ थांबल्याच जाणवलं म्हणून तिने लगेच डोळे उघडले. पहाटेच्या रेशमी उजेडात कुठेतरी त्यांची गाडी थांबली होती. झोपेच्या अंमलामुळे का दाटलेल्या धुक्यामुळे का कोण जाणे तिला काही काळासाठी ओळखच पटेना. समोर पडलेल्या टिशू बॉक्स मधले टिशू खचखच खेचत तिने डोळे पुसले. तिरक्या डोळ्याने बाहेर बघताना तिला काहितरी वेगळं जाणवलं. देवा..... बाजूला बहीण नव्हती. एव्हाना तंद्रीतून निघेपर्यंत बहीण ड्राइविंग सीट वर नाहीये हे तिच्या ध्यानातच नव्हतं आलं. काय करायला आलो होतो आणि काय झालं....? नुसत्या विचारानेच तिच्या काळजात धस्स झालं.


काहीही विचार न करता ती लगेच गाडीतून उतरली. जमिनीच्या नुसत्या स्पर्शानेच तिच्या काळजात हुरहूर दाटली. भोवतालचा परिसर अधिकच काळोखात दाटल्यासारखं वाटलं. मगपर्यंत मोरपिशी स्पर्शनारा वारा अचानक मंदावला. ही तीच जागा जिथे तिने स्वतःला त्याच्या हवाली केलं होतं. त्याच्या त्या ओलसर ओठांचा स्पर्श ह्या क्षणी ही तिच्या ओठांवर उमटला. काही काळासाठी ती बहिणीला विसरूनच गेली. अंगावर रेंगाळणाऱ्या त्याच्या स्पर्शाच्या जाणिवेने बेधुंद होऊन तिने आपले दोन्ही हात स्वतःभोवती कवटाळले. दोन्ही डोळे हलकेच मिटून ती केवळ त्याचा स्पर्श अनुभवू लागली. त्याच्या नुसत्या जाणिवेनेच अंगभर रोमांच उमटू लागले.


" अजूनही माझी आठवण येते का....?"


ती दचकली. तिचे प्राण तिने कानाशी गोळा केले. तोच आवाज होता का.... छे... भास झाला असेल..... भास पण इतका खरा... तीच सौमित्रची स्टाईल, तोच आवाजातील मधाळ गोडवा.... सगळच तर परिचित होत तिला. कशी विसरेल ती.... तो आवाज, त्या अदा, तो गंध.... ती भानावर आली. त्या आवाजाने खरतर तिच्या जाणीव बधीर झालेल्या. पण आता तिला तो गंध जाणवत होता. हो... तोच गंध जी ती श्वासात भरभरून घ्यायची..... हा.... हा भास नाहीये... ती भरकन मागे वळली. आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवू की नये तिला काहीच समजेना. तिच्या समोर तोच त्याची नेहमीची चार्मिंग स्माईल देत उभा होता.


नाही..... हे... हे शक्य नाही.... नाहीच.... मला भास होतायत.... तिने अविश्र्वासाने जोरजोरात डोळे चोळले. क्षणभरासाठी तिचे श्वास स्तब्ध झाले. मागचे कित्येक महिने ज्याच्या आठवणीपासून दूर दूर पळतेय आज नेमका तोच सामोरा यावा. तीच तिलाच कळेना नक्की काय होतंय. सर्व विसरून जाण्यासाठी म्हणे हा आऊटींग चा प्लॅन बनवलेला पण आता तर..... सावरायला पाहिजे स्वतःला... ती मनाशीच बोलत होती.


" अग बोल तर काहीतरी..." त्याने जवळ येत तिला विचारलं.


ती मात्र अजूनही त्या धक्क्यातून सावरत नव्हती. त्याच्या चेहऱ्यावरून तिची नजरच हटत नव्हती. परंतु त्याचे शब्दही तिच्या कानापर्यंत पोचत नव्हते. समोर आहे ते सत्य की आभास ह्या गोंधळातच अजूनही अडकली होती. त्यानं थोडंसं घाबरतच तिच्या खांद्याला स्पर्श केला.


"अं...." तिची तंद्री तुटली बहुदा. विस्फारलेल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहु लागली. भानावर आल्यामुळे का कदाचित तिच्या अंगावर शिरशिरी आली. कानाशिल तापून कानातून तप्त वाफा निघाव्यात तस काहीस होत होतं तिला. मन अगदी पुर आलेल्या नदी सारखं दुथडी भरून आल. बरच काही बोलायचं होत तिला परंतु तिच्या ओठांनी मात्र संप पुकारला होता. पायही जमिनीला अगदी खिळून बसले होते. जणू तिच्या शरीरातुन साऱ्या संवेदनाच निघून गेल्या होत्या. आपल्या हतबलतेवर तिला नुसता राग राग येत होता. तिला अस दगडासारख स्तब्ध बघून त्याच काळीज मात्र तुटत होत. त्याला वाटलं होत ती रागवेल काहीतरी सूनावेल परंतु तस काहीही न होता ती एखाद्या स्थितप्रज्ञासारखी निश्चल होती.


" अग बोल ना काहीतरी..... रागव, ओरड, भांड, पाहिजे तर मार..... पण काहीतरी बोल ना ग....." तो जवळजवळ ओरडलाच तिच्यावर. इतक्या वर्षांच्या सहवासात कधीच त्याचा आवाज चढला नव्हता तिच्यावर. परंतु आताच तीच अस वागणं त्याला अपेक्षित नव्हतं म्हणूनच की काय तो आजुबाजूच सार विसरून तिच्याशी बोलण्यासाठी जीवाचा आटपिटा करत होता.


" का आलायस आता...?" कसबस तिच्या तोंडून काहीतरी निघाल. तीच तिलाच आश्चर्य वाटलं. आपण अस कसं बोलू शकलो त्याला.


" आता नाही ग..... मागचे कित्येक महिने तुझ्याशी संपर्क करायचा....."


" काही गरज नाहीये तुझ्या स्पष्टीकरणाची...." त्याच बोलणं तोडतच ती मागे वळली.


तिला वळलेल बघून त्याच मात्र अवसान गळाल. धावतच त्याने तिचा हात पकडला. त्याच्या स्पर्शाने तिचा राग डोळ्यात उतरला. अंगार भरल्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे पाहिलं.


" ऐक... फक्त एकदा... बास्स.." त्याने कळकळीने तिला विनंती केली.


" पण का आता...?" ती चिडलीच.


" त्याच एकदा ऐकून तर घे..." मागून अजून एक ओळखीचा आवाज. ती मागे वळली. मागे तिची बहीण उभी होती. एवढा वेळ तिला आठवणच नव्हती की आपली बहीण गायब आहे. मनातल्या मनात तिने स्वतःलाच कोसल. आपण किती आत्ममग्न होतो की आपल्या बहिणीला विसरलो ह्या विचारांनी तिला स्वतःचीच लाज वाटत होती. पण अचानक तिची ट्यूब पेटली. इतक्या सहजासहजी गायब होणारी तर ती पोरगी नव्हती. अख्ख्या गावाला जेरीस आणनारी ती, कोणाची हिम्मत तिला त्रास द्यायची.


" तू.... म्हणजे हा तुझा प्लॅन होता." तिने आश्चर्याने बहिणीला विचारलं.


" सांगतो... तुझ्या सगळया प्रश्नांची उत्तर देतो पण जरा ऐकून घे माझं प्लीज ." पुन्हा तो कळवळून विनवत होता.


तिच्याकडे आता दुसरा काही मार्गही शिल्लक नव्हता आणि..... आणि त्याला तिला नाही म्हणता येत नव्हतं....


" ह्म्म..." ती नुसतीच हुंकारली.


" तुला माहितेय ना माझा स्वभाव...." त्याने थेट तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याचे ते निरागस डोळे तिच्या काळजाचा ठाव घेवून गेले. हेच ते डोळे, ज्याच्यात डुंबून जावस वाटायचं तिला. आताही ती स्वतःला हरवून गेली त्याच्या डोळ्यात. क्षणात भानावर येऊन तिने आपली नजर वळवली. डोळ्यांच्या कडांवर साचलेल पाणी त्याच्या नजरेत येऊ नये म्हणून तिने मानेला हलकासा झटका दिला. पण तिच्या अशा नकाराची सवय नसलेल्या त्याच्या काळजावर मात्र ते ओरखडे उमटवून गेलं. परंतु ह्या क्षणी तिला सत्य काय ते समजावणं जास्त महत्त्वाचं होत. म्हणूनच आपले पाणावलेले डोळे लपवत त्याने आपल बोलणं चालू ठेवलं.


" त्या दिवशी.... मी हि खूप खुशीत होतो. आपल प्रेम आता नात्यात गुंफल जाणार होत. काही क्षणातच मी तुझ्याशी कायमचा जोडला जाणार होतो. कसं सांगू माझ्या मनात काय चाललेलं.... कधी एकदा येऊन तुला पाहतो अस झालेलं. जीवाची नुसती बेचैनी होत होती. त्याच धुंदीत तुझ्याजवळ लवकर पोचण्यासाठी बऱ्याच लवकर निघालो. तुला लवकर येऊन सरप्राइज द्यावं म्हणून फोन करणं टाळलं. पण.... रस्त्यात अचानक एक अपघात झालेला होता. बराच गंभीर असावा पण गर्दीतून काही हालचाल दिसेना. "


" आई बाबांना पुढे पाठवून मी गर्दीच्या दिशेने निघालो. आई तर रागावली. जग दुनियेची काळजी करायचा ठेका मी एकट्यानेच घेतलाय का म्हणून ओरडली देखील. पण.... तू पण.... अश्या प्रसंगी नेहमीच मदतीला धावतेस ना... हा गुण तर सारखाच आहे ना आपला.... मी पुढे जाऊन पाहिलं तर.... तर.... माझा भूतकाळ..... ती...... रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. क्षणभर मी हादरलोच... पण लगेच भानावर आलो. तिला लगेच हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण गरजेचं होत. जमलेल्या गर्दीला फोटो काढण्याच्या आणि चर्चेच्या नादात ते भान नव्हतंच. एक दोन जणांचा मदतीने तिला गाडीत घालून भरधाव वेगात हॉस्पिटलला पोचलो. दरम्यान तुला फोन करायचा प्रयत्न केला पण तुझा नंबर लागलाच नाही. हॉस्पिटलला पोचलो पण उपचार करायला माणुसकीने नाही भागत... पोलिस कंप्लेंट, कसले कसले फॉर्म्स आणि बरच काय काय... खर सांगू का तुला....?" त्याने मोठा पॉज घेत तिच्याकडे पाहिलं. तिने मानेनेच होकार दिला.


" त्या क्षणी खरंच विसरून गेलो की माझी एंगेजमेंट आहे. कोणीतरी माझी वाट बघतय....." तिच्या चेहऱ्यावर एक सुक्ष्मशी कळ उमटली.


" पण काही वेळापूरतच... ती होती म्हणून नाही तर एका अडलेल्याला मदत करायची म्हणून.... खरंच सांगतो.... आईची शपथ.... तिच्याबद्दल काहीच भावना नव्हत्या मनात..." तिच्या निसटश्या सुटलेल्या श्र्वासाच तिलाच आश्चर्य वाटलं. त्याकडे दुर्लक्ष करत तिचे कान तो पुढे काय सांगतोय ह्याच्याकडे लागले.


" परंतु ह्या गोंधळात मी मोबाईलकडे मात्र साफ दुर्लक्ष केलं होत..... मान्य करतो ही माझी चूक होती.... पण..." ती काहीतरी बोलेल ह्या अपेक्षेने त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा तसाच निर्विकार बघून तो चपापला.


" कोणता मूर्खच अस काहीतरी वागेल जस मी वागलो. " तो आता खरंच ओशाळला होता.


" हं.... " ती हसली. त्या हसण्यात रोजची निरागसता नव्हती होती ती खिन्न विषण्णता. " काय फरक पडतोय... तुला तिच्याबद्दल काही वाटलं की नाही ते... माणूसकीसाठी मदत केलीस... बरोबर.... मग तिथे हॉलमध्ये कोणीतरी आपली वात बघतय त्याच्याबद्दल का नाही जाणवली माणुसकी...? भर मंडपात सगळेजण हसून गेले आम्हा सर्वांवर. माझं सोड तुझे स्वतःचे आई बाबा... अक्षरशः रडत परतले.... तेव्हा कुठे गेली होती तुझी माणुसकी...? तो दिवस आणि रात्र कशी गेलीय आमची आम्हाला माहीत..... त्या मुलीसाठी वेडा झालेलं मी पाहिलंय तुला. पण तुझ्यासाठी जी वेडी झाली होती तिच्याबद्दल तुला जराही दया आली नाही. एक साधा फोन करून सांगावसही वाटलं नाही.... म्हणे फोन बंद होता..... माणुसकीच्या नावाखाली परक्यासाठी तू स्वतःची एंगेजमेंट तू विसरु शकतोस पण माणूस म्हणून एक दिवस स्वतःचा स्वभाव बाजूला नाही ठेवलास ना.... तू तिला मदत केलीस चांगलच केलस पण.... त्या दिवशी न येऊन तू....." तिला आता भावना आवरेनात. इतक्या दिवसांची सल आसू बनून तिच्या डोळ्यांतून वाहत होती. आपल्या नाजूक हातांच्या ओंजळीत आपला चेहरा लपवून ती किती वेळ रडत राहिली. त्याचीही हिम्मत होईना तिला सावरायची.


" मला माफ कर खरंच.... तुला भेटायचा बोलायचा खूप प्रयत्न केला पण तू ऐकूनच घेत नव्हतीस... म्हणून शेवटी तुझ्या बहीणीमार्फत हा प्लॅन बनवावा लागला... प्लीज माफ कर... खरंच नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय..." त्याचे शब्द घश्यातच अडकले. हुंदका दाटून आल्याने त्याला पुढचे बोलणे जमेना. स्फुंदत स्फुंदत तो तिच्याकडे मोठ्या आशेने पाहत होता.


" मला माहित होत जिचा अपघात झालाय ती तीच आहे.... तुझं प्रेम... ती तुझं पहिलं प्रेम होती म्हणून केवळ तुझ्या खुशीसाठी मी बाजूला झाली..... फक्त आणि फक्त तू सुखी रहावस म्हणून... तुझ्या मनात अजूनही तिची जागा मला जाणवते... "


" पण आता मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो...."


" सांगतोय की विचारतोय.....? तस असत तर तिच्यासाठी रात्रभर थांबला नसतास... हॉस्पिटलच्या प्रक्रिया पूर्ण करून तडक माझ्याकडे आला असतास....कारण तुझं प्रेम तर मी होती ना.... प्रेम करणं आणि निभावणं खूप वेगळं आहे रे..."


" काय म्हणायचंय तुला....?" तो जरा चिडलाच.


" हेच की तुझं कन्फ्युजन क्लिअर करून घे... तिला डिस्चार्ज मिळेपर्यंत तू रोज हॉस्पिटलचे खेटे घातलेय.... आम्हा कोणालाही न सांगता दिवस दिवस भर तिच्यापाशी बसून होतास... हे समजलं नाही का मला...." ती शांतपणे उत्तरली.


" सॉरी " त्याच्या तोंडून कसेबसे हे शब्द बाहेर पडले. आपल्या चुकीच्या जाणिवेने त्याचा लालसर काळपट पडलेला चेहरा तिच्यापासून लपवण्यासाठी त्याने तिच्याकडे पाठ फिरवली.


" नक्की ठरव तुला काय पाहिजे... माझं तर नेहमीच तुझ्यावर प्रेम होत.... अजूनही आहे... आणि नेहमीच राहील. आताही तुझ्यापेक्षा महत्त्वाचं अस काहीच नाहीये आयुष्यात....पण त्या दिवशी ज्या प्रकारे अपमान झालाय ना, जी माझ्या आईवडिलांची अवहेलना झालीय ती मी नाही विसरु शकत रे. त्यासाठी तुला माफी कधीच नाही मिळणार...कारण ते सगळं करायचा तुला काहीच अधिकार नव्हता..."


तो अवाक होता. त्याला नेहमी सांभाळून घेणारी ती... त्याच्या अशा मनस्थितीत त्याला समजून घेईल हि आशा होती त्याला. पण तो तिला समजायला चुकलाच. आपल्या भावनेच्या गोंधळात तिच्या कोमल भावना कधी चुरडल्या गेल्या त्याच त्याला कळलंच नाही.


" मला वाटतं झालय आपल बोलून...." त्याच्या उत्तराची वाटही न बघता ती आपल्या गाडीत जाऊन बसली.


" तू येणार आहेस की नाही...?" मगापासून त्यांच्या संभाषणाची एकमेव साक्षीदार असलेली तिची बहिण एकाच जागी उभी बघून ती जरा ओरडली. बहिणही मग बावचळून गाडीत बसली. तो तसाच अपराधी नजरेने दूर दूर जाणाऱ्या गाडीकडे बघत स्तब्ध उभा होता......


ड्रायव्हिंग सीट वर बसून गुणगुणनाऱ्या तिच्याकडे बहीण मात्र आश्चर्याने बघत होती. मनातून उचंबळून बरेच शब्द तिच्या ओठांवर आले पण ती रागवेल म्हणून ते उच्चारण्याची तिच्यात हिंमतच नव्हती. इतका वेळ आल्हाददायक वाटणारं ते वातावरण आता झाकोळून गेलं होत.


" तू विचार करत असशील ना की मी अशी का वागली " तिने बहिणीकडे पाहत विचारलं.



" अं... हो..." बहिणीने एक दीर्घ निःश्वास सोडला.


" माझ्यासोबत एंगेजमेंट होत असताना ती समोर आली तर हा विसरून गेलं मला. माणूस आहे मी... जेलसी होते मला. सगळं विसरून त्याला भेटायला गेली तर समजलं हा हॉस्पिटल मधे आहे... बरं ते हि समजून घेतलं. हॉस्पिटल मध्ये गेल्यावर कळलं हि हा रोज येतो तिला भेटायला... आता मला सांग नाही येणार का राग मला... माझं आयुष्य म्हणजे एखादी काल्पनिक प्रेमकथा नाहीये ना की जिथे प्रियकर प्रेयसी भेटलेच पाहिजेत. खऱ्या आयुष्यात अस नाही होत. सगळेच शेवट गोड नसतात. " तिने हताशपणे एक सुस्कारा सोडला.


" पण तो तुझी माफी मागत होता.. तुझ्यावर प्रेम नसत तर तो आलाच नसता ना..." बहिणीचा प्रतिप्रश्न तयारच होता.


" माझ्यावर जीवापाड प्रेम असत तर.... तो एंगेजमेंटच्या रात्रीच आला असता.... तू पण होतीस ना माझ्यासोबत सुट्टी घेऊन ते पण तुझ्या प्रमोशनचा टाईम असताना... मग मला तर ह्याच्यासोबत आयुष्य घालवायचं होत... मग त्याला थोडीफार पण माझी काळजी नसावी का..... ??".


" मग आता काय ठरवलंय तू...." बहिणीने काळजीने विचारलं.


" त्यात काय ठरवायचं.... माझं प्रेम आहे त्याच्यावर... ते आयुष्यभर तसच राहील... भले तो माझा असू दे अथवा नसू दे... बर त्याच्या मनाच्या गोंधळातून सुटून परत आला तर माझा... नाहीतर माझ्या स्वप्नांच्या दुनियेत मी खूप खूष आहे.... पण असं तळ्यात मळ्यातवालं नातं नकोय मला.... "


तीच बोलणं बहुदा बहिणीच्या डोक्यावरून गेलं होत. पण तिच्या मनावरचा भार उतरला होता. पिसासारख शरीर एकदम हलकं हलकं झालं होत. आता ती एकाच गोष्टीची वाट बघणार होती त्याच्या दोलायमान झालेल्या मनाला स्थिर होण्याची आणि तिच्या प्रेमाला खात्री होती की त्याच्या मनाचा कौल त्याच्या खऱ्या प्रेमाच्या बाजूनेच पडेल. आपल्या हातातील फासे नियतीच्या हातात देण्याचा तिचा निर्णय किती योग्य होता हे केवळ त्या नियतीलाच माहित होत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama