' भूक ' बळी
' भूक ' बळी
" आह..." हात हवेत पसरवत अंगाला अळोखेपिळोखे देत तिने खांद्यावरून कललेल्या टॉपला वर खेचलं. डोळे किलकिले करत तिने वेळेचा अंदाज घेतला. घरात भरलेल्या काळोखावरून संध्याकाळ उतरून गेली होती. बराच वेळ लोळत पडल्याने तिचे कपडे अस्ताव्यस्त होऊन चुरगळले होते. पाठभर रुळणाऱ्या दाट कुरळ्या केसांना लावलेला रबरबँड एव्हाना घरंगळून केसांच्या टोकांपाशी जेमतेम अडकून पडला होता. पुन्हा आळस देत तिने एका हाताने केसांचा रबर खसकन खेचला. त्यात निबरपणे अडकलेले चार पाच केस तिने ओढूनच काढून फेकून दिले. साऱ्या केसांना दोन्ही तळव्यांत गच्च पकडून रबराच्या साहाय्याने तिने घट्ट अंबाडा बांधला. डोळ्यावरची झोप किंचितशी उतरल्यावर तिला वेळेचं भान आलं. मागे सरकून बसत तिने खिडकीचा पडदा जरासा बाजूला केला. लॉकडाऊन असल्यामुळे निदान आतातरी सगळे घरात बसले असतील ही तिची पोकळ अपेक्षा बाहेरून भसकन नाकात शिरलेल्या सिगारेटच्या वासाने फोल ठरवली. ' सदानकदा नुसते फुकट पडलेले असतात..' स्वतःशीच नाक मुरडत तिने पडदा खेचून पुन्हा होता तसाच बंद केला.
स्वतःशीच निश्वास सोडत ती मागेच भिंतीला टेकून बसली. आपल्या निराश नजर तिचे एकवेळ घरातल्या अंधारावरून फिरवली. बऱ्याच वर्षांपासून राहत असलेल्या त्या चाळीच्या छोट्याश्या खोलीत पाहण्यासारखं असं काहीच नव्हतं. साधारण दहा वर्षांपूर्वी माप ओलांडून ती ह्याच एवढुश्या घरात आली होती. तीच अर्ध आयुष्य तर गावातल्या कुडाच्या झोपडीत अगदी गरिबीत गेलेलं. सकाळी असलं तर दुपारच्या भ्रांत व्हावी अशी परिस्थिती. कधी कोणी काही दिल तरीही आधी ते तिच्या भावांच्या पुढ्यात पडायचं आणि मग उरलंच तर तिच्या... कित्येक रात्री तर घोटभर पाणी घशाखाली रिचवून आणि ओढणी पोटाला बांधून सरल्या. पोटात उठणाऱ्या कळांसरशी तिच्या मेंदूत मात्र प्रश्न भिरभिरू लागत. असं काय झालं असेल तिच्या हातून कि तिला इतक्या दारिद्र्यात जन्म मिळाला. घरात अठरा विश्वे दारिद्र्य असूनही वंशाच्या दिव्याच्या नावाखाली तिच्यापाठी चार भाऊ जन्मले पण अजूनही गरिबीचा अंधकार काही संपला नव्हता... विचारांत ती तशीच हसली... वर्षानुवर्षे वापरवुन खिळखिळ्या झालेल्या लाकडी खाटेवर तितकाच जुना फाटलेला बिछाना अंथरला होता. आधी आधी ती त्याला ठिगळ जोडायची पण एका जागी जोडावं तर खेचून अजून दोन तीन बाजूनी उसवायचं शेवटी तिने त्याचा नाद सोडून दिला. ' चला आता उठायला हवं..' आळस झटकून उठत आधी तिने खाटेवरची चादर सरळ केली. मोरीत जाऊन बादलीतील पाणी उपसत खसाखसा चेहरा धुतला. मोरीच्या कोपऱ्यातल्या चीर गेलेल्या साबणाच्या भांड्यात छोटीशीच वडी उरली होती जेमतेम दोन दिवस पुरेल इतकी. त्यामुळे चेहरा धुवायला साबणाची उधळपट्टी तिला परवडणार नव्हती. तांब्याभर पाणी पायावर ओतून ती तशीच ओल्या पावलांनी बाहेर आली.
एव्हाना बाहेरूनही अंधारून आलं होत. पण तिची लाईट लावायची हिम्मत झाली नाही. मागच्या महिन्यातील बिलाचे आकडे पाहून तिची बुबुळ पांढरी झाली होती. तेव्हापासून तिने विजेची काटकसर सुरु केली होती. आपल्यात घराला ती आधीच परिचित होती आणि आता अंधारात वावरायला सरसावली होती. ह्याक्षणी तिला चहा प्यायची तीव्र इच्छा झाली होती. परंतु स्वयंपाकघरातील रिकामे डब्बे तिला तितक्या अंधारातही सत्याची जाणीव करून देत होते. मनातच हिरमुसत तिने फळीवरील मोठा ग्लास घेतला. ओट्यावर ठेवलेल्या माठातून चांगले दोन ग्लास पाणी पोटात रिचवून ती पुन्हा तिच्या लाडक्या खाटेकडे वळली. ह्या घरात पाऊल पडल्यापासून ते आतापासून ती खाटच सगळ्याची साक्षी होती.
' तुझे कितना चाहने लगे हम..' तिचा फोन जीव तोडून वाजत होता. थोड्याशा निराशेनेच तीने फोन हातात घेतला. स्क्रीनवरील ' हबी ' नाव बघून तिचे डोळे आनंदाने लकाकले. दहा वर्षांआधी अशा एका वैतागलेल्या संध्याकाळी अण्णा मात्र आनंदात नाचत घरी आले होते. अण्णा म्हणजे तिच्या वडिलांचे काका. त्यांच्या बाजूच्याच झोपडीत राहत. गरीब असले तरीपण दोन्ही घरात बरंच सख्य होत. तिच्या आईवडिलांपेक्षा तिच्यावर कोणी जीव लावला असेल तर तो अण्णांनी. त्यांच्या घरात गेल्यावर स्वतःच्या ताटातील दोन घास ते जबरदस्ती तिला भरवत. म्हणून जेव्हा केव्हा पोटातील भूक वेदनेत परिवर्तित होई, ती मुद्दाम काही कारण काढून त्यांच्या घरी जात असे. तिला प्रेमाने भरवताना पाहून काकूंच्या नजरेत फुललेले अंगार एकदा तिच्या दृष्टीस पडले आणि त्यांनतर मात्र तिच्या स्वाभिमानाने सदैव तिला त्यांच्या उंबऱ्याबाहेर थांबवलं.
अण्णा नाचत आले ते तिच्या लग्नाची बातमी घेऊन. त्यांच्या ओळखीत कोणाच्या तरी कोणाचा मुलगा लग्नाचा होता. आल्यापासून ते बराच काहीबाही बोलत होते. ' मुलगा मुंबईला राहतो ' आणि ' हुंडा नकोय...केवळ नारळ आणि मुलगी द्या..' ही दोन वाक्य तिच्या आईवडिलांच्या कानात पडली आणि त्यांनी एक श्वासही न घेता तात्काळ होकार भरला. जितक्या जलद होकार झाला त्याहीपेक्षा जलद अवघ्या दोन दिवसांत त्यांचा विवाह पार पडला. आपलं लग्न छान वाजतगाजत व्हावं, मैत्रिणींनी केळवणाला बोलवावं, दोन्ही हात भरभरून मेहंदी काढावी, उमललेल्या केतकीच्या रंगासारखी पिवळी साडी नेसावी, आजूबाजूच्यांना उगाचच येताजाता नवऱ्याच्या नावाने चिडवावं असं बराच काही विचार करत तिने स्वतःच्या लग्नाची स्वप्न रंगवली होती. परंतु तीच स्वप्न ते स्वप्नच राहील. आजकाल तर त्यातील रंगही उडून गेले होते.
अंतरपाट उतरताच तिने प्रथमच आपल्या झालेल्या नवऱ्याला पाहिलं. तिच्या लखलखीत गोऱ्यापान सौंदर्यासमोर तिला काळासावळा, बसक्या नाकाचा आणि टक्कल पडत असलेला नवरा अगदी नकोनकोसा वाटला. पण तिच्या वाटण्याला तिथे काही किंमत नव्हतीच आणि वेळही टळून गेलेली होती. घुसमटल्या मनाने आणि गुदमरल्या जिवाने तिने त्याच्यासोबत मुंबई गाठली. आणि तिथेही तिच्या पदरात निराशा पडली. सिनेमातल्या पडद्यावरील दिसणाऱ्या मुंबईला लागून बांडगुळासारख्या वाढणाऱ्या झोपडपट्ट्या कधीच तिच्या नजरेत आल्या नव्हत्या. तीच नशीब तिला अशाच एका नाल्याच्या आधाराने उभ्या असणाऱ्या वस्तीतल्या काही फुटांच्या घरात घेऊन आलं. इथेही जमेची बाजू इतकीच होती कि घरात त्या दोघांशिवाय अजून कोणी नव्हतं आणि नवरा कुठे का होईना नोकरी करत होता त्यामुळे दोन वेळा पोटाला मिळण्याची सोय झाली होती. रात्री उशिरा शहरात पोचली तरीही गर्दीत आंबलेल्या अंगावर बादलीभर पाणी ओतून ती जरा तरतरीत झाली. इतक्या रात्री स्वयंपाक कुठे करणार म्हणून तिच्या नवऱ्याने बाजूच्याच गाडीवरून चायनीजच पार्सल आणलं होत. बापाघरी भाकरीला महाग झालेल्या तिला असं भन्नाट काहीतरी ते ही पोट फुटेस्तोवर मिळालं होत. दोन्ही हातानी जेवत वर्षानुवर्षे ज्वालामुखी बनून फुटत असणाऱ्या भुकेला तिने आधी शांत केलं. मन तृप्त झाल्यावर तीच लक्ष नवऱ्याकडे गेलं. तिचा नवरा अनिमिष नेत्रांनी तीच फुलारलेलं सौंदर्य पाहत होता. तिला त्याच्या डोळ्यात मात्र भूक दिसली... ही भूक पोटाची नव्हती... ती तेव्हाही स्वतःशीच हसली. तिच्या पोटाची भूक भागवायची असेल तर त्याच्या डोळ्यात दाटलेली भूक मिटवायचं कर्तव्य तिला पार पाडाव लागणार होतंच. गळ्यातल्या बेन्टेक्सच्या मंगळसूत्राने त्याला तो परवाना देऊन टाकला होता. खांद्यावरचा पदर खाली पडत तिने त्याला परवानगी देऊन टाकली. रात्रीच्या अंधारात तो तिच्या स्त्रीत्वात हरवून स्वतःच पौरुषत्व मात्र शोधतच राहिला. तो मोकळा होऊन बाजूला सरकला आणि ती मात्र पुन्हा घामेजल्या अंगाने रात्रभर काहीतरी अधूर राहिलेलं चाचपडत राहिली.
सकाळ होतंच त्याची दिनचर्या चालू झाली. ती तशीच विस्कटलेली साडी सावरत त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागच्या भावनांचा ठाव घ्यायचा प्रयत्न करत होती. मात्र तो आपल्या विजयाच्या उन्मादात मग्न होता. लग्नाच्या काही वर्षांनंतर मात्र तिला सत्य उमजलं. बरेच उपासतापास, गंडेदोरे, डॉक्टरी उपचार केल्यावर तीच रुसलेलं मातृत्व हे त्याच्या व्यंधत्वाची देणं आहे हे कळलं आणि बिना हुंड्याच्या लग्नाचं रहस्य आपोआप उलगडलं. परंतु आताही तिचा नाइलाज होता. आयुष्यातील उमेदीची वर्ष आणि हुरहुरत घालवलेल्या रात्री सरल्यानंतरच सत्य समजूनही तिने मौन धारण केलं. मागे परतून पुन्हा उपासमार वाट्याला येण्यापेक्षा आपल्या पोटातल्या भुकेशी तिने त्याच्या शरीराच्या भुकेचा सौदा केला.
त्या दोघांच्याही जीवनाचे सूर काही फारसे जुळलेच नाही. बेसूर निरस आयुष्य जगायची सवय असणाऱ्या तिनेही दुसरा सूर शोधायचाही कधी प्रयत्न केला नाही.आहे त्यातच जुळवून घेत बिघडलेल्या सुरतरंगावर डोलायला सुरुवात केली. तसा तिचा नवराही गरिबीत वाढलेला. त्यामुळे बाकी कसले फुकटचे चोचले त्याचेही नव्हते. दोन वेळच गरम जेवण आणि रात्रीचा सौदा त्याच्यासाठी पुरेसा होता अन्यथा इतकी रूपवान पोरगी कधी त्याच्या स्वप्नातही आली नव्हती. दोघेही आपापल्या विश्वात खुश होते. मात्र मार्च महिना उजाडला आणि लॉकडाऊन झाल. कोरोनाच्या बातम्यांशी तीच काही घेणंदेणं नव्हतं पण अचानक सगळं बंद झाल्याने आणि घरातला किराणा संपत आल्याने तिचे धाबे दणाणले. नेमकं त्यातच साहेबांसोबत कामासाठ
ी बाहेरगावी गेलेला तिचा नवरा तिथेच अडकून पडला. घरात साठवलेल्या काही पैशांत तिने कसातरी मार्च आणि एप्रिल घालवला. मात्र मे महिना उजाडला तरी हे लॉकडाऊन काही संपायचं नाव घेईना. तिचा नवरा अश्या शहरात अडकून बसला होता जिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम. कशाचीच काही खबर नव्हती. हिच्या इथल्या अवस्थेची तिला काही खबरही नसावी. आज इतक्या महिन्यांनी तिचा फोन वाजला होता. तिने घाईने फोन उचलला.
" हॅलो " तिच्या शब्दांतून तिला होणारा आनंद ओसंडत होता.
" ऐक.. इथे नेटवर्क नाहीये. साहेबांचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्यामुळे अजून दोन महिने तरी मी इथून निघू नाही शकत.. या... अं..." खरखर करत फोन बंदही झाला. तिने पुन्हा पुन्हा तो नंबर डायल केला. ' आपके खाते मे पर्याप्त..' तिने वैतागून फोन कट केला. फोनचा बॅलन्स तर दोन महिन्यांआधीच संपला होता. तिच्या हातात काहीच नव्हतं. अख्ख्या मे महिन्याची उपासमार तिच्या डोळ्यांसमोर फिरू लागली... अजून दोन महिने... फोन हातात पकडून ती तशीच खाटेवर बसली. सुकलेल्या तिच्या डोळ्यांत पाणी भरून आले. रिकाम्या पोटात काहीतरी डुचमळून आलं. पण उलटी झाली तर अजून भूक लागेल म्हणून ती तशीच पाय पोटाशी घेत डोळे बंद करून बसून राहिली.
संध्याकाळची रात्र झाली होती. मागच्या कित्येक दिवसांत क्वचितच स्टोव्ह पेटला होता. आता तर बाटलीतील रॉकेलही तळाला गेलं होत. कोणाकडून मागावं तर आजूबाजूची मंडळीही तिच्यापेक्षाही गरीब. त्यातही अर्धेअधिक गावी पळालेले. नाही म्हणायला तिच्या गल्लीच्या दुसऱ्या टोकावर राहणारा कोणीतरी अजून इथेच होता. त्यांची तशी फारशी ओळख नव्हती. केवळ सार्वजानिक शौचालयाचा मार्ग त्यांच्या दरवाजातून जायचा म्हणून केवळ तोंडदेखली ओळख. त्यातही तिच्या भरलेल्या अंगावरून फिरणारी नजर तिला नेहमीच बोचायची. लॉकडाऊन झाल्यानंतर त्याच कुटुंब तिला दिसलं नव्हतं, कदाचित गावी गेले असावे. तिला एकटीच पाहून त्याने बरेचदा लाळघोटेपणा करत तिची चौकशी केली होती. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट व्यक्त होणारे भाव वाचून तिने नेहमीच त्याला नकार दिला होता. आतापर्यंत तिला आपला नवरा परतून येण्याची आशा होती परंतु संध्याकाळच्या फोननंतर तीही मावळली. अजून दोन महिने उपाशी काढणे तिच्यासाठी अशक्य होते. तीच काय तर तिच्या जागी अजून कोणी असत तर कदाचित इतका काही तग धरून राहील नसत. बाजारात जाऊन खरेदी करावी तर गाठीला शंभर रुपयेही नव्हते. उसने घ्यायला कोणी शेजारी नव्हता. विकायला गळ्यातलं मंगळसूत्र आणि हातातल्या दोन पातळ बांगड्यांव्यतिरिक्त काहीच नव्हतं. त्या वस्तीच्या आसपास सोनाराच्या काय तर साधा भंगारवालाही नव्हता. गल्लीच्या टोकाला राहणाऱ्या त्या माणसाकडे मदत मागण्यावाचून काही पर्याय उरला नव्हता... पण तो मदत का करेल... त्याच्या नजरेतील अपेक्षा ओळखूनही त्याच्याकडे मदत मागणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं होत.. न मागितली तर असच उपासमारीत जगन अशक्य होत... काय करावं... आपल्या शीलाच्या संरक्षणार्थ उपाशी मरण अथवा त्याला शरण जात जगन... ती स्वतःच्याच विचारांत गुरफटली. तसही उपाशी राहायची तिला सवय होती परंतु ह्या प्रकारची उपासमार ती प्रथमच अनुभवत होती.
समोरच्या भिंतीवर ती एकटक नजर फिरवत राहिली. गरम झाल तस खिडकीचा पडदा जरासा किलकिला केला. एक थंडगार वाऱ्याची झुळूक तिच्या घामाने भिजलेल्या शरीराला थंडावून गेली. तेवढ्याशा गारव्यानेही तीच अंग शहारलं. ती थरथरली तस सोबतीला म्हणून भिंतीवरच कॅलेंडर उगाच फडफडलं. त्या आवाजाने तिची तंद्री भंग झाली. काहीतरी आठवलं म्हणून मोबाईलच्या बॅटरीचा प्रकाश फेकत कॅलेंडरच पान परतलं. चार दिवसांनी वटपौर्णिमा होती. मागच्या वर्षी ती किती नटली होती. बाजूच्या मिश्रा वहिनींनी तर दोन वेळा तिची नजर काढली होती. नुसत्या त्या आठवणीनेच ती मोहरली. क्षणभर आपल्या विचारांचाच तिला वैषम्य वाटलं. इतक्या खालच्या पातळीचा विचार कसा शिवू शकतो मनाला. कॅलेंडर तसंच भिंतीला लटकवत ती तिथेच भिंतीला पाठ लावून बसली. वाऱ्याने नुकत्याच थंड झालेल्या भिंतींच्या स्पर्शाने तिच्या पाठीवर शिरशिरी उमटली. एक ती सावित्री चक्क यमाशी सामना करायला गेली होती... आणि मी.. शी.. तिला स्वतःचीच किळस आली.
आपले पाय ओढून पोटाशी घेत तिने त्यावर आपली हनुवटी टेकवली. पोटातील घुरघुर तिला स्पष्ट ऐकू येत होती. आतडं पिळवटून टाकणारी भूक तिला पोटतिडकीने हाक मारत होती. ह्याक्षणी धरणी दुभंगून जावी आणि तिला पोटात घ्यावं मग सगळाच गुंता सुटून जाईल. तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले. पोटातून छातीपर्यंत एक तीव्र सणक उमटली. हात पाय भुकेनं आणि भीतीने थरथरू लागले. डोक्यात उफाळणाऱ्या विचारांनी तीच डोकं भणाणून निघालं होत. क्षणभर तिला घरी पैसे न ठेवून जाणाऱ्या नवऱ्याचा राग आला. बाहेरगावी चाललंय तर साधी बायकोची काळजी नसावी का..? काळजी.. हा शब्दच तीच काळीज चिरत गेला... ती कधी होती...? दैनंदिन व्यवहाराची जुजबी माहिती देऊन झाल्यानंतर लाईन रेशनची असो वा रॉकेलसाठी दिवसभर भर उन्हात तीच तर उभी राहायची. साधी दमलीस का म्हणून पण कधी तिची विचारपूस केली नाही का आजारपणात तिला आराम दिला नाही. नवरेपणाची कर्तव्ये क्वचितच पार पडली असतील पण हक्क मात्र न चुकता जवळजवळ रोजच. त्यात वावगं असं काहीच नव्हतं. हजारो जोडप्यांची हीच कहाणी असेल पण काही योग्यही तर नव्हतं. दिवसभर काम करायचं, आल्यावर भरपेट खायचं आणि तिच्यात झोकून द्यायचं... तिची इच्छा असेल नसेल तरीही. त्या व्यतिरिक्त असं काहीच नव्हतं त्यांच्यात. त्याचा कार्यभाग झाल्यावर तिच्याकडे पाठ करून तो पुन्हा त्याच्याच विश्वात रममाण असायचा. ' मी सावित्री व्हायला हवं...पण तो सत्यवान आहे का..? पावित्र्याची कसोटी तर सीतामाईची पण लावली होती परंतु तिच्यासमोर राम होता. मी ज्याच्यासाठी माझं पावित्र्य राखायचा प्रयत्न करतेय त्याने माझा विचार तरी केलाय का... मागचे दोन महिने घरात पैसे नाहीत.. काही सामान भरलेलं नाही अश्या परिस्थिती मी कशी जगले असेल त्याची साधी विचारपूसही नाही... दोन महिने अजून येणार नाही एवढं सांगून सरळ फोन बंद.' तिच्याही नकळत दोन आसू ठिबकले तिच्या डोळ्यांतून. आज इतकी अगतिकता का भरून राहावी..? इतकी वर्ष रेटलीत ना... मग आताच हा भावनांचा गुंता का बनावा..? का अपेक्षा केली जावी. मागच्या दहा वर्षांत एक दिवसही कधी वेगळा गेला नाही तिथे आज काही वेगळं घडावं ह्याची का अपेक्षा केली जावी. माझ्या विचारांत गुंगून मी इथेच मारून जाईन. दोन महिन्यानंतर माझ्या हाडांचा सापळा निघेल कदाचित. त्यावर त्या माणसाच्या डोळ्यातून दोन आसू कदाचित निघतीलही... हक्काची मादी गेल्याचे....
पोटातील दुखणं वाढू लागलं तस तिचा जीव कळवळला. विचारांनी मेंदू पोखरायला सुरुवात केली. आता काही खाल्लं नाही तर हे शरीर कदाचित स्वतःचेच लचके तोडील... ती भीतीने शहारली. पोटातील भूक तिला अस्वस्थ करू लागली. इतका वेळ तिला मागे खेचणार मन आता तिला घराच्या बाहेर ओढू लागलं. नैतिक आणि अनैतिक गोष्टींच्या पलीकडे असणारी पोटाची भूक तिला विवश करत होती. दुखणार डोकं आणि जडावलेलं अंग बळजबरीने उचलत तिने स्वतःला कसाबसा तयार केलं. खाटेच्या लाकडी हातावर पडून असणारी ओढणी उगाचच अंगभर लपेटली. तेवढ्याही वेळात घरातल्या अंधारात कोणीतरी तिला पाहत असल्याचा भास झाला. थरथरणाऱ्या हातानी तिने दरवाजाची कडी उघडली. बाहेरचा अक्राळविक्राळ अंधार तिच्या घरातल्या अंधारात मिसळून गेला. हळूच कानोसा घेत तिने दार लोटलं. हवेतील किंचित थंडाव्यानेही ती थरारली. पुढे काय वाढून ठेवलय त्या कल्पनेने तिचा ऊर धपापू लागला. डोळे बंद करत तिने एक दीर्घ श्वास घेतला. इतक्या दिवसांच्या उपासाने तसही अंगातील त्राण सरलच होत. त्यात मनातल्या भीतीने तिला पुढे पाऊल उचलणंही जमेना. चूक की बरोबर... ती थबकली. गटारावरच्या किड्यांची किरकिर तिला अस्वस्थ करत होती. मध्येच उद्या मारत एक बेडूक तिच्या पायातून पुढे सरकला. भीतीने ती अस्फुटशी किंचाळली. पण तिचा आवाज घशातच विरला. गल्लीच्या टोकावर जायची तिची हिम्मत होईना. सावित्री, सत्यवान, यम... साऱ्या आकृत्या तिला अंधारात दिसू लागल्या. जणू रिकाम्या गल्लीतील पसरलेला अंधार तिला गिळू पाहत होता... तिला पळायचं होत... पण कुणापासून... तिची भूक तिला पुढे ढकलत होती आणि भीती पाठी खेचत होती. तिच्या फुललेल्या नाकपुड्या ताठरल्या. भीतीने विस्फारलेल्या डोळ्यात रक्त उतरलं. मागे वळायचं का पुढे जायचं...तिचे पाय जागीच गोठले. मानेवरून घामाचा ओघळ अगदी संथपणे उतरला. पण तेवढयात काहीतरी झाल. पाठीच्या मणक्यातून एक सणक वरती चढली... वेदनेची की भीतीची... तिला आधार हवा होता पण तीच घर तिच्यापासून दूर जात होत. आधारासाठी ती घराच्या दिशेने वळली पण तिच्यात तेवढी ताकदच नव्हती. तिचा शक्तिहीन देह तसाच जमिनीवर आदळला. सर्वांगातून वेदनेचा लोळ उठून शांत होत गेला. जमीन हालत होती की फक्त तिचा भास होता... गल्लीतला अंधार आता तिच्यात सामावू लागला होता. अर्धवट मिटत जाणाऱ्या निष्प्राण डोळ्यांसमोर आता फक्त आणि फक्त अंधार होता...