Vrushali Thakur

Action Thriller Others

4  

Vrushali Thakur

Action Thriller Others

तृष्णा-अजूनही अतृप्त - भाग ११

तृष्णा-अजूनही अतृप्त - भाग ११

7 mins
642


आणि तो स्वतः...स्वतः... गंगेच्या काठावर पोचला होता... भगवान शंकरांनी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे त्याच्या हातात काही चमकदार दगड होते... त्यातील एका दगडाचे मंत्रोच्चार करताच आपोआप सात खड्यांत रूपांतर झाले... त्यात खुद्द भगवान शंकरांनी दैवी ऊर्जेचे स्त्रोत निद्रिस्त अवस्थेत बांधून ठेवले होते... भगवान शंकरांच्या वरदानानुसार जेव्हा ह्या सृष्टीला मदतीची गरज असेल तेव्हा हे सातही खडे एकत्र येऊन त्यातील सुप्त ऊर्जा जागवल्यावर येणाऱ्या संकटापासून वाचविण्यासाठी सहकार्य करतील... सहा खडे तर होते.. मात्र त्यातील एक कुठेतरी हरवला होता... एक खडा तर तिला दिला होता... त्या झाडाखाली... आपली योजना समजावून सांगताना.. आणि त्यावर तिने केलेलं उदासवाणं फिकट हास्य... ह्या जन्मातही त्याला जसंच्या तसं आठवत होतं.. तो एक खडा तिच्याकडे असला पाहिजे... परंतु ह्या जन्मात तिच्याजवळ असेल का... तिला वाचविण्यासाठी हा एक शेवटचा प्रयत्न केला पाहिजे...

त्याला झरझर त्याच्या पूर्वजन्माच स्मरण झालं.... तो विश्वनाथ शास्त्रींचा केवळ वारस नसून त्यांचा पुनर्जन्म होता.. मागच्या जन्मातील सगळं ज्ञान सुदैवाने त्याच्या स्मृतीत होत. ह्या खड्यांना केवळ त्याचेच मंत्र जागृत करू शकत होते... कारण त्या मंत्राची गुंफण तशीच केली होती. त्याने दुखरी बुबुळं आकाशाकडे सरकवली... आकाशात व पृथ्वीवर अंधाराशिवाय काहीच नव्हतं.. कितीही डोळे फाडून बघितलं तरी दिसणारा केवळ काळाकुट्ट अंधार.. चंद्र आता कायमचा ग्रहणात गेला होता... 

त्याचं शरीर जवळपास मरूनच गेलं होतं. गोठलेल्या अंगातील प्राणही गोठून जात होते. अंगावर मणामणांचा बर्फाचा थर जमा झाला होता. काही वेळातच त्याची कबर त्या बर्फात बनली जाणार होती. त्याच्या पापण्यावरही बर्फाचे थेंब जमा होऊ लागले. अंगातील त्राण केव्हाच निघून गेले होते... त्याने मनातच ईश्वराच्या नामस्मरणाला सुरुवात केली... सर्व काही परमेश्र्वराच्या हातात होतं... सातवा खडा नसेल तर बाकीच्या खड्यांतील शक्ती कार्यान्वित होऊ शकणार नव्हती... त्याच्या डोळ्यावर झापड येत होती... थंडी त्याच्या शरीरातील प्राणही शोषून घेत होती. पण मनात अजुनही सर्वांना वाचवायची इच्छा जागृत होती... 

भरल्या ग्लानीतही ओमने मंत्रोच्चार थांबवले नव्हते...मध्येच शुद्ध हरपली तर तेवढ्या वेळापुरत तो मूर्च्छित होई व साधारण शुद्ध येताच पुन्हा मंत्रोच्चार चालू करे.... मागे गुरुजी मिटल्या डोळ्यांनी स्वतःवर चरफडत मृत्यूची वाट पाहत होते... आपल्या इतक्या वर्षांची तपश्चर्या.. ह्या शक्तींपासून पृथ्वीला वाचविण्याच्या मनसुब्याने घरा दारापासून सर्वांपासून लपून केलेली ध्यानसाधना... ते सर्वच त्यांच्या डोळ्यासमोर मातीत मिसळून गेलं आणि काही वेळात हे निर्जीव होत जाणार शरीरही ह्याच मातीत मिसळून जाईल... एक चुकीची चाल... का... का त्या ओमच ऐकलं.... कदाचित काहीतरी वेगळं करता आल असतं... मनातच कुढत त्यांनी देवाची आळवणी सुरू केली... शेवटचा आधार तोच होता. अचानक त्यांच्या कानावर अगम्य असे बीजमंत्र ऐकू आले. अर्धवट बेशुद्ध असल्याने त्यांना काही नीट समजत नव्हते. मात्र त्यांचे कान त्याही स्थितीत आवाजाच्या दिशेने रोखले... मंत्राचा शब्द समजत नव्हता पण नुसत्या ऐकण्यानेच आत काहीतरी वेगळच जाणवत होत जणू त्यांच्या गोठलेल्या शरीरात नवचैतन्य जागृत होत आहे...नकळत त्यांनीही सोबत त्या मंत्राचा उच्चार चालू केला... कोणती भाषा होती.. काय अर्थ होता.. त्यांना कसं काय ते आठवलं... काहीच उमजत नव्हते.. परंतु... जे काही होत ते त्यांना पुन्हा उठून सज्ज व्हायची ऊर्जा देत होत. 

शरीरात सळसळणाऱ्या नवचैतन्याने ओमच्या सुकलेल्या चेहऱ्यावर सूक्ष्म हसू उमटले... नक्कीच सातवा खडा जवळपासच कुठेतरी होता. शक्य तितका जीव एकवटून त्याने आपल लक्ष बीजमंत्रावर केंद्रित केले.. शब्दागणिक त्याचे ओठही आपोआप थरथरू लागले. फडफडणाऱ्या डोळ्यांतील ग्लानी कमी होऊ लागली. थंडीने गारठलेल्या नाकाला पुन्हा श्वास घेता येऊ लागला. गोठलेल्या शरीरात गरम रक्त पुन्हा खेळू लागले. इतका वेळ त्यांची तडफड पाहणाऱ्या चांद्रहासला मध्येच काहीतरी वेगळं घडत असल्याचं जाणवलं... आपल्या भयानक शक्तींच्या जोरावर इतका वेळ दोघांना खेळवत त्यांच्या पुजेमध्ये येण्यापासून अडवल होत... आतमध्ये करालची पूजा संपत आली होती. एकदा का त्याची पूजा संपन्न झाली की ही पंचमहाभूत त्याचे दास होणार होते. सर्व प्रकारच्या शक्तींचा तो एकमेव स्वामी बनणार होता... जोवर त्याची पूजा संपत नाही तोवर हे ग्रहण संपणार नव्हते.. शेवटची काही आवर्तनं उरली होती... आणि आता नेमक काहीतरी घडत होते.. कुठल्याशा अज्ञात शक्तीची त्याला जाणीव होऊ लागली... त्याला आपले मायाजाळ अजुन पसरायचे होते.. आपला अदृश्य धुक्यासारखा आकार गरागरा फिरवत तो आकाशाच्या दिशेने लुप्त झाला. इतका वेळ समोर असणारा चांद्रहास अचानक कुठे गायब झाला असेल.. नुकत्याच जिवंत झालेल्या शरीराची हालचाल करत ओम त्याला शोधण्याचा प्रयत्न करत होता..त्याला काही समजायच्या आत एक कडाक्याची वीज चमकुन तितक्याच वेगात जमिनीवर कोसळली. सर्वत्र थंडीची अजुन एक जोरदार लाट पसरली. आकाशातून काहीतरी खूप जोराने येऊन ओमच्या डोक्यावर आदळल. त्या वेदनेची एक तीव्र सणक त्याच्या मस्तकात गेली. डोक्यातून काहीतरी गरम ओघळत होत. काय आहे ते बघायला हाताची हालचाल जमत नव्हती. थोडीफार दुखरी मान वाकडी करत त्याने पहायचा प्रयत्न केला. तेवढ्यात अजुन काहीतरी अंगावर पडल. आणि एका मागोमाग एक असा बर्फाच्या गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला... ओम निदान तरुण असल्याने झाल्या प्रकारानंतर त्याच्यात थोडीफार ताकद शिल्लक होती. मात्र गुरुजी पुन्हा घायाळ होऊन जखमी अवस्थेत पडले. त्यांच सर्वांग पुन्हा त्या बर्फाने आच्छादल. 


अजुन वेळ घालवून उपयोग नव्हता... ओमने डोळ्याच्या कोपऱ्यातून सगळीकडे नजर फिरवली. जखमी अवस्थेत बर्फाखाली पडलेले गुरुजी पाणीभरल्या डोळ्यांत जणू आपली हार पाहत होते...वेळ निघून चालला होता... आतून करालचे मंत्रही संपत आले होते... काही क्षणांतच सगळ संपणार होतं. ओमला विचार करायला ना वेळ होता ना ताकद... आपल शेवटचं ताकदवान अस्त्र त्याला वापरावं लागणार होत... विश्वनाथ शास्त्रींनी नमूद करून ठेवलेले दिव्य मंत्र... त्याला त्या दिव्य मंत्रांचा वापर करावाच लागणार होता. त्या मंत्रांचा वापर एकदाच करणं शक्य होत व म्हणूनच ओमने त्या शक्तींना संपवण्यासाठी ते दिव्यमंत्र राखीव ठेवले होते... परंतु समोरची परिस्थिती पाहता त्या शक्तींना रोखण आवश्यक होत... त्याने मनाशी निर्णय घेतला...

ओम डोळे मिटत मोठ्या कष्टाने बोलायचा प्रयत्न करू पाहत होता. मात्र थंडीने गोठलेले व बर्फाच्या माराने तुटून गेलेलं त्याच सर्वांग त्याला साथ देईना... प्रचंड अगतिकतेने त्याच काळीज भरून आल... जे होईल ते होईल... त्याने एक खोल दीर्घ श्वास घेतला... एकवार पुन्हा नजर फिरवून गुरुजींना पाहिलं... ते अजूनही त्याच गलितगात्र अवस्थेत पडले होते. नजरेनेच त्यांना वंदन करत तो ते दिव्य मंत्र मनातच बोलू लागला... जपाची दोन आवर्तने पूर्ण होताच.. अचानक हवेतील थंडावा झपाट्याने कमी होऊ लागला. सर्वांगाभोवती धुक्याचे आवळलेले फास आपोआप सैलावू लागले. इतकेच नाही तर त्यांच्या शरीराभोवती गोठलेला बर्फ वितळू लागला... अचानक होत असलेले बदल पाहून चांद्रहास गडबडला.. का होतंय हे सगळं... व कसं... त्याच्या शक्तींनी आवाहन.... वितळलेल्या बर्फात काहीतरी चमकत होत... चांद्रहास काय ते जाणून घेण्यासाठी पुढे सरकला मात्र डोळ्यावर पडलेल्या चमकदार प्रकाशाने जागीच थबकला.... दिव्य मंत्रांच्या प्रभावाने सर्व खड्यांमधील दैवी ऊर्जा ही कार्यान्वित झाली. त्याच ऊर्जेचा प्रभाव प्रकाश बनून अंधाराला नष्ट करण्यासाठी सर्वत्र पसरू लागला. त्या प्रकाशाची तीव्रता बघता बघता प्रचंड वाढली. त्या प्रकाशाचा स्पर्श होताच गूढ काळोखाने भरलेले वातावरण निवळू लागले..... ते पाहून चांद्रहास अजुनच वैतागला.. आपल्या धुराच्या हातापायानी आकांडतांडव करत कर्कश्य आवाजात ओरडत होता. आपल्या सगळ्या शक्ती वापरून पाहिल्या पण त्याने काहीच बदल होत नव्हते...

  घरातून पुन्हा एकदा करालची भयानक किंकाळी ऐकु आली... चांद्रहासने चमकून मागे बघितले... खरतर एव्हाना पूजा संपन्न होऊन त्याच्या आनंदाचे चित्कार घुमले पाहिजे होते... घरातून सुद्धा बाहेर सारखाच तीव्र चमकदार प्रकाश पसरला होता... त्या आवाजाने दिशेने ओमने रोखून पाहिलं... त्याच्या चेहऱ्यावर अस्पष्ट पसरलेली हास्य रेषा स्पष्ट झाली... एक खडा कदाचित आत.. तिच्याजवळ होता... सातही खडे एकत्र येऊन त्यातील ऊर्जा कार्यान्वित झाली होती. त्या ऊर्जेत भगवान शंकरांचा आशीर्वाद सामावला होता. खड्यांच्या वाढत्या प्रकाशासोबत कराल व चांद्रहासच्या शक्तींचा प्रभाव कमी होऊ लागला.

----------------------------------------------

"तू.... पुन्हा आलास...?" दरवाजातून थयथयाट करत आपली जळजळीत नजर रोखत कराल विचारत होता.

  एव्हाना बराचसा सावरलेल्या ओमने त्याच्या लालभडक डोळ्यांत आपले डोळे घालून रोखून पाहिलं. त्याच्या रक्तवर्णी डोळ्यांत साऱ्या ब्रह्मांडाची क्रूरता उतरलेली होती. त्याच्या अंगार फुलल्या डोळ्यांवरून व थयथयाटावरून ओम जे समजायचं ते समजून गेला. करालची पूजा भंग झाली होती व सोबतच सगळे मनसुबे जळून राख झाले होते..... 

  ओमने करालच्या नजरेतून नजर न हटवता एक मोठा श्वास घेतला. ओमची हिम्मत पाहून क्षणभर कराल बावरला. हा त्रिखंडात एकमेव प्राणी होता ज्याने करालशी नजर भिडवण्याची हिम्मत केली होती. आणि त्याच्या त्या हिमतीला करालच्या राज्यात माफी नव्हती. आपले दोन्ही हात आपल्या महाकाय खडबडीत छातीवर आपटत त्याने पुन्हा किंचाळत आक्रोश करायला सुरुवात केली. ओमने केलेल्या मंत्रचमत्काराने कराल व चांद्रहासच्या शक्ती शिथिल पडत चालल्या होत्या. आणि भरीस भर म्हणून चंद्रग्रहण संपायच्या टप्प्यात येऊन पोचले होते. इतका वेळ कोणाच्याही नजरेस न पडलेलं चंद्राचं एक काहीस धीट किरण सावकाश आपले हात पाय पसरत होत. आकाशाकडे नजर जाताच कराल अजुनच बिथरला. ज्या सृष्टीवर कब्जा करून त्याने मितीची गती थांबवून ठेवली होती तेच सृष्टीचक्र त्याला न जुमानता पुन्हा त्याच्याच वेगाने फिरू लागले होते. हे सगळं फक्त आणि फक्त समोर जखमी अवस्थेत पडलेल्या दोन माणसांमुळे होत होत...पूजा तर भंग झालीच होती आणि त्यांना थांबवलं नाही तर त्यांना पुन्हा आपल्या मितीत परतून जावं लागणार होत आणि पुन्हा वाट पहावी लागणार होती अशाच एखाद्या खास चंद्रग्रहणाची... जे शेकडो वर्षांत कधीतरी एकदा येईल... त्याच्या डोळ्यांसमोर त्याने वाट पहात घालवलेली शेकडो वर्ष कोलांट्या मारू लागली. पूजेच्या ऐन टप्प्यात त्याचा काम उफाळून आल्याने झालेला घात जशाचा तसा त्याच्या नजरेसमोर तरळत होता.. त्यामुळे त्याच्या सर्व शक्तींचा झालेला ऱ्हास... कमजोर पडताच त्याच्याच गुलाम शक्तींनी त्याच्यावर चढविलेला हल्ला... त्यात त्याचा झालेला मृत्यू... मृत्यूच्या वेळी कडाडून घेतलेली पुन्हा परतायची शपथ... स्वर्ग ना मार्ग मिळता दीनवाणा भटकत राहिलेला त्याचा आत्मा... उपद्रव नको म्हणून त्या सर्वांची दुसऱ्या मितीत केलेली पाठवणी.... पसंत नसतानाही केवळ सर्व शक्ती मिळविण्यासाठी धारण करावा लागलेला हा ओंगळवाणा देह आणि शक्तिमान बनण्यासाठी केलेली कट्टर तपश्चर्या.... सर्व काही आता घडल्यासारख त्याच्यासमोर उभ होत. इतकी वर्ष तडफडणाऱ्या त्याच्या जीवाला आज मोका मिळताच त्यात तडमडणाऱ्या ओमला थांबवण्यासाठी त्याच्या शक्ती तर नाकाम होत्या त्यामुळे त्याला शारीरिक बलाचा वापर करण्याशिवाय पर्याय नव्हता. चांद्रहासच शरीरचं नसल्याने व ह्याक्षणी त्याची कोणतीही शक्ती काम करत नसल्याने केवळ कराललाच मैदानात उतराव लागणार होतं... (क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Action