झुंज........
झुंज........
दहा भावंडं मधून अण्णासाहेबांनी मलाच उचललं. सहाजिकच आहे मी दिसायला फारच स्मार्ट, पांढरी स्वच्छ फर, काळेभोर डोळे, दृष्ट नको लागायला म्हणून मध्येमध्ये काळे ठिपके, तपकिरी रंगाची शेपटी.
अण्णासाहेबांनी माझ्याकडे बोट दाखवले, आणी म्हणाले, "ही आमची कोमल."
चला माझं नामकरण झालं, “कोमल”!
खरं म्हणजे आमच्या जर्मन शेफर्ड जातीमध्ये असलं कोमल वगैरे नाव कोणालाही ठेवत नाही. अण्णा साहेबांबरोबर घरी आले, घर कसलं! प्रचंड वाडा, अण्णांची दोन मुले, रवी, आणि श्री आल्याबरोबर माझ्याशी खेळू लागले. श्रीने मला गोठ्यात नेले, तिथे जय आणि विरू अशी खिल्लारी बैलांची जोडी उभी होती, बघताक्षणी मला दोघेजण खूप आवडले. म्हणजे मी किती छोटी, पण जयने मला चाटून माझ्याशी दोस्ती केली. विरू पण म्हणाला, ये ये, तुझ आमच्याकडे स्वागत आहे.
दिवस फार मजेत जाऊ लागले, जशी मी वर्षाची झाले, तसेच अण्णांनी बसंती, जया, रेखा, कालिंदी, अशा चार गाई पण घेतल्या. आता गोठ्यामध्ये फारच मजा यायला लागली. विरू कायम बसंती कडे रोखून बघत असायचा, त्यामुळे कालिंदी फार् नाराज व्हायची.
जय मात्र कोणाकडेही बघत नसेल, त्यामुळे जया रेखा, यांना काय करावे कळत नसे. जय म्हणजे आपलं आपण बरं आणि आपलं काम बरं. कुठून तरी एक काळसर रंगाचा घाणेरडे पिल्लू पण आमच्याकडे आल. पहिल्या दिवशी त्यानी माझ्याच वाटीतलं दूध पिऊन घेतला, माझ्या भोवतीभोवती घोटाळायला लागलं.
मी तर बाई जर्मन शेफर्ड, हा कोण कुठल्या जातीचा, नाही राहायचं याच्या बरोबर? पण रवी आणि श्री न त्याला पण ठेवून घेतले, त्याचं नाव ठेवलं " वाघ्या."
कशाचा “वाघ्या?” मी जोरात भुंकले, तर चक्क तो पायामध्ये मध्ये शेपूट घालून पळून जायचा.
एकदाचा तो वीरूच्या शेपटीला लटकला, वीरू नुसती शेपूट झटकली तर दहा फूट दूर उडून पडला. दिवसभर रडत राहिला. शेवटी मलाच दया आली. त्याला समजलं, आणि सांगितलं की माझ्या बरोबरच थांब. वाघ्या ने तर एकदा मधमाशांच्या पोळ्या वरती मारले होते डोके, सगळ्या मधमाशा पोळ्यातून उठल्या, त्याला नांगी
मारून चावल्या. बावळट मूर्ख वाघ्या दिवसभर केविलवाणे रडत राहिला. तेव्हा मात्र मीच त्याला समजावले.
अण्णा, वहिनी, श्री दादा, रवी दादा, सगळे आमच्यावर फार माया करतात. अण्णा आणि श्री दादा कुठेही जाताना मला मात्र बरोबर घेऊन जातात. त्यांच्याबरोबर गाडीतून जाताना फार मजा वाटते. कधी आम्ही सगळे शेतावरच्या तळ्यामध्ये पोहायला देखील जातो. जय-वीरू अतिशय उत्तम पोहतात, आम्ही सगळ्यांनी मिळून वाघ्याला पण पोहायला शिकवले आहे. मला तर बाई जन्मजात सगळं काही येत.
वीरू
फारच नखरे दाखवते बसंती आज-काल. आता दसऱ्याच्या वेळेला बैलगाडीच्या शर्यती मध्ये आमची बैलगाडी पहिली आली की मी तिला दाखवून देईन,” वीरू “ म्हणजे काय आहे.
सध्या शेतावरती काही काम नाही, म्हणून मी आणि जय, गोठ्यात असतो. म्हणून दादा आमची दोघांची ही चांगली मालीश करतो. आठ दिवसानंतर बैलगाड्यांच्या शर्यत आहे, त्याच्यासाठी आम्ही तयारी करतोय.
मी आणि जय, खरं म्हणजे चुलत भाऊ, आमचे दोघांचेही वडील सख्खे भाऊ आमची जमात खिल्लारी बैलांची, पांढऱ्या स्वच्छ रंग, निमुळता चेहरा, , टोकदार, शानदार सिंग. मोठे डोळे, काजळ घातलेले. आम्ही दोघे जेव्हा शेपटी उडवत, आणि गळ्यातल्या घंटेचा आवाज करीत चालतो तेव्हा आजूबाजूचे लोक आमच्याकडे बघतात.
अण्णाचे शेत, गावाच्या बाहेरच आहे, सध्या ऊस फार जोमात वाढत आहे. सगळे रान नुसत हिरवागार झालेला आहे. आता फक्त आम्ही दोघं विहिरीच्या मोटेवर पाणी काढायचं काम करतो. सध्या आराम आहे. कोमल आणि वाघ्या देखील आमच्याबरोबर शेतावर येत असतात. आम्हाला कोमल फार आवडते, रात्रीची तिची राखण एकदम जागरूक असते. थोडा जरी आवाज झाला, तरी ती पण भुंकायला सुरुवात करते. वाघ्या त्यामानाने आळशी आहे. मागे नाही, गोठ्यात शिरलेल्या सापाला कोमल न तर मारले होते.
जय तिच्यावर फार प्रेम करतो.
अण्णा
आज जरा उशीर झाला, उसाला पाणी देण्यामध्ये फार वेळ गेला. गर्द दाट झालं आहे शिवार फार.
आज तर सूर्यास्त पण होऊन गेला. अंधार लवकर पडेल त्याच्या आत घरी गेले पाहिजे. बैलगाडीची शर्यत आहे त्याची तयारी करायला पाहिजे.
जय, वीरू, वाघ्या, कोमल आणि मी घराकडे चाललोय. जय आणि विरू नेहमी माझ्या बाजूने चालतात. कोमल नेहमी माझ्या पुढे चालते आणि वाघ्या या सगळ्यांच्या मागे. कोमल एखाद्या डिटेक्टीव सारखी रस्त्याचा वास घेत, तिकडे सावध नजरेनी बघत आधी पुढे जाते. जय आणि विरू ,कायम माझी काळजी वाटत असते म्हणून ते दोघेही जण माझ्या बाजूने चालतात, जसं काही माझा एक सुरक्षा कवच. गावांमध्ये मला काय होणार आहे? शेतापासून घर जास्तीत जास्त अर्धा किलोमीटर अंतर आहे.
जय
आज एवढा का उशीर झाला? आता अंधार पडेल, आज अण्णांना शेतावरती फारच काम पुरलं.
आज बैलगाडी पण नाही म्हणून पायीच जावे लागणार आहे अण्णांना. शर्यतीसाठी बैलगाडी वंगण लावून तयार ठेवली आहे.
वाघ्या.
आज फारच उशीर झालाय मला तर बाबा भीती वाटते. आणि ही कोमल का अशी मागेपुढे करते आहे. कोमलचा रुबाब नेहमी औरच असतो, जर्मन शेफर्ड जातीचे म्हणून फारच शान मारत असते. ते पण खरं आहे की तिला पटकन वास येतो आणि तिचे कान अतिशय तीक्ष्ण आहेत.
आम्ही सगळे हळूहळू घराकडे चाललो आहे, सूर्य मावळला आ
हे, संधीप्रकाश दाटला आहे. लवकरच अंधार पडेल.
अचानक कोमल थांबली, सावध नजरेने बघत तिने कसलातरी वास घेण्याचा प्रयत्न केला,.
आधी ती हळूहळू भुंकली, तिच्या तोंडातून नुसता गुरु गुरु करण्याचा आवाज येत होता.
जय वीरू एकदम सावध झाले, मागच्या बाजूने मोठी काळी आकृती येऊन ही अण्णांच्या अंगावर कोसळली. अण्णांची पोटरी तिने तोंडात पकडले. बिबट्याने खाटकन पंजा मारून अण्णांच्या पाठीवरती, डावीकडून उजवीकडे , भयंकर मोठी जखम केली होती.
आता कोमलच्या लक्षात सगळा प्रकार आला. काळा बिबट्या अण्णांना ओढत होता.
जय आणि विरू ने ताबडतोब सिंग रोखून बिबट्या वर त्यावर चाल केली. बिबट्याने अण्णांना सोडले आणि जय वरती उडी मारली. बिबट्याने जयच्या खालच्या भागाला चावले. जय च्या तोंडातून हंबरडा बाहेर पडली. कोमल नी बिबट्यावर उडी मारली. आणि त्याचे लक्ष स्वतःकडे वळवले., विरू नये आपली सिंग रोखून
बिबट्या वरती हल्ला केला. चपळाईने बिबट्या बाजूला झाला. कोमल ओरडली ,"वाघ्या घरी जा दादाला बोलावून आण." वाघ्याला तेच पाहिजे होतं कारण की त्याला भयंकर भीती वाटत होती. बिबट्या आणि त्याच्याबरोबर चाललेली झुंज त्याला बघवत नव्हती., वाघ्या सुसाट धावत धावत धावत घराच्या दिशांनी गेला, तो जाताना केविलवाणं भुंकत चालला होता .
अण्णांची पोटरी चे लचके तोडले होते. अण्णांच्या मांडीचा चावा घेऊन, तिथेही खोलवर जखम केली होती. एकदम झालेल्या हल्ल्यामुळे, एवढे धडधाकट अण्णा, गांगरून , घाबरून गेले, बिबळ्याच्या एका धक्क्याने, तोंडावर खाली पडले, आणि , आणि अण्णा बेहोश झाले.
अण्णा खाली पडले होते, त्यांच्या पायातून रक्ताची धार लागली होती, जय आणि वीरू दोघेही बिबट्यांशी प्राणपणाने झुंजत होते. कोमल आपले चारही पाय अण्णांवरती ठेवून उभी होती आणि ती बिबट्याला अण्णां पर्यंत येऊ देत नव्हती. सावध गिरक्या घेत बिबट्या भराभर हल्ले करत होता.
जसे अण्णा खाली पडले, कोमल त्यांच्या दोन्ही बाजूला आपले पाय ठेवून उभी राहिली, बिबळ्या उडी मारून तिचेही लचके तोडत होता. ती पण त्याच्यावर जोरात भुंकून, पंजाने वार करत होती. जय आणि विरू देखील सिंग रोखून बिबट्या वर हल्ला करत होते, जेणेकरून तो अण्णांपासून दूर राहील.
आणि जय आणि विरू दोघंही जण त्याच्याशी जबरदस्त झुंज देत होते. आता बिबट्या जय च्या मानेवरती लटकला, मानेचा भाग त्याने पकडून ठेवला. जय ला खाली पाडून मग बिबट्या अण्णां पर्यंत पोहोचू शकत होता. अण्णा बेशुद्ध पडले होते. ते हलत नव्हते. आता वीरू सिंग रोखून बिबट्या वरती चाल करून गेला, पण बैलाची ताकद आणि बिबट्या चपळपणा तोडीस तोड होता. बिबट्या भुकेलेला होता. त्याला जय नाहीतर अण्णा, कोणाला तरी एकाला घेऊन जायचे होते. तो सारखा अण्णांवरती हमला करण्यासाठी पोहोचत होता. पण अण्णांच्या चारी बाजूला पाय ठेवून कोमल ठामपणे उभी होती. तो प्रयत्न करत होता.
तोंडाला फेस येत वाघ्या घरी पोहोचला, अतिशय करुण आवाज करून श्री ची पॅन्ट पकडली, आणि शेताच्या दिशेने तोंड करून भुंकायला सुरूवात केली. ताबडतोब रवि आणि श्री हातात काठ्या घेऊन मोटरसायकलवरून शेताच्या दिशेने निघाले.
पाचच मिनिटात दोघेहीजण शेता पाशी पोहोचले बघतात तो काय, जय वीरू आणि कोमल बिबट्याची ठामपणे झुंज देत होते. मोटर सायकल चा आवाज, आणि त्याच्या प्रकाशामुळे बिबट्या उडी मारून शेतामध्ये नाहीसा झाला.
जखमी अण्णांना घेऊन रवी हॉस्पिटलच्या दिशेने निघाला, त्यांनी फोन करून ट्रॅक्टर शेताच्या दिशेने पाठवला. श्रीने जखमी जय, कोमल आणि वीरूला हळूहळू ट्रॅक्टरमध्ये चढवले आणि त्यांना घेऊन तो व्हेटर्नरी डॉक्टर कडे निघाला. बिबट्याच्या चावण्यामुळे जय, कोमल आणि अण्णांना वर इन्फेक्शन होण्याचा धोका होता. ताबडतोब डॉक्टर आणि औषधोपचारांची आवश्यकता होती.
जखमी कोमल आणि जय जिवंत राहण्याची शक्यता कमी होती. जाताना कोमल सारखी जय च्या जखमा चाटत होती. विरूपण तिच्या जखमा चाटत होता. जय च्या पायातून भरपूर रक्तस्त्राव होत होता.
जखमेमुळे आलेल्या ग्लानीने जय जवळजवळ बेशुद्ध पडला होता, कोमल त्याच्या कानापाशी जाऊन म्हणाली," जर्मनीमध्ये प्राणी मरत असताना. त्याच्या कानापाशी जाऊन ज्या प्राण्याचे नाव घेतले जाते त्याच्यामध्ये त्याचा पुनर्जन्म होतो. जय, तू आणि मी जर मेलो, पुढच्या जन्मी पण परत एक सारखेच जन्म घेऊ आणि एकमेकां सोबतच राहू. जगलो तर बरोबर, मेलो तर बरोबर."
कोमलच्या जखमा चाटत, वीरू म्हणाला," मी पण तुमच्या बरोबरच राहणार."
डॉक्टरांनी जखमा स्वच्छ करून, त्याच्यावरती टाके घातले. औषधोपचार झाल्यावरती कोमल जय आणि विरू ला घेऊन श्री घरी परत आला, तोपर्यंत घरच्यांनी जय, वीरू आणि कोमल साठी मऊ बिछाने तयार ठेवले होते.
अण्णांच्या पायाचे मांडीचे लचके तोडल्यामुळे त्यांच्या जखमा फार गंभीर होत्या. त्यांना ताबडतोब शहरांमध्ये पाठवण्यात आले. . बिबट्याचे हल्ल्याचा प्रकार ताबडतोब पंचक्रोशी मध्ये पसरला. गावोगावी उसाची शेती असल्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी भरपूर जागा होती. वन खात्याच्या लोकांना बोलावून बिबट्याला पकडण्यासाठी सापळा तयार करण्यात आला.
जय आणि कोमल दोन दिवस बेशुद्धावस्थेत होते, ते दोन-तीन दिवस घरच्या कोणीही अन्नाचा कण देखील घेतला नाही. गाई ,वासरे, वाघ्या, वीरू, कोणीही अन्नाला स्पर्श केला नाही. तिसऱ्या दिवशी कोमल उठून बसली. आणि चौथ्या दिवशी जय ने डोळे उघडले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे खाणेपिणेऔषध उपचार घरच्यांनी व्यवस्थित ठेवले.
दोन आठवड्यानंतर अण्णा घरी आले. आल्या आल्या अण्णा पहिले गोठ्यामध्ये आले. जय कोमल यांना मिठी मारून त्यांच्या अंगावरून हात फिरवत , गोठ्या मध्येच बसले. अण्णा म्हणाले ,"त्यादिवशी जर जय बिरू आणि कोमल नसते तर नक्कीच बिबट्या ओढून घेऊन गेला असता."
कोमलचे धडाडी तर वाखाणण्याजोगी होती, ज्या धडाडीने, एखाद्या वाघिणी सारखे, अण्णांवरती उभी राहून त्यांचे संरक्षण केले होते तसेच कोणीही करू शकले नसते.
मुक्या जनावरांनी आपल्या मालकां प्रती प्रेम अशा रितीने व्यक्त केले होते. त्या तिघांनी आपल्या जीवावर खेळून अण्णांचे रक्षण केले होते. अण्णांवर काळ आला होता पण त्यांच्या मुक्या साथीदारांनी काळाला पळवून लावले.