Gajendra Dhavlapurikar

Action

2.5  

Gajendra Dhavlapurikar

Action

जुळवे

जुळवे

23 mins
16.2K


     रोहित. असाधारण व्यक्तिमत्व असलेला मुलगा, सामान्य माणसांच्या तुलनेत त्याचा मेंदू दुप्पट वेगाने काम करत होता. सिक्स्थ सेन्स सुद्धा समोरच्या माणसाच्या दुप्पट वेळ आधी सूचित करणारा आणि या उलट मोहित शांत सोज्वळ पण बालीश बुद्धी असलेला मुलगा. अभ्यासातही ''ढ'' दोघं सख्खे आणि जुळे भाऊ. 

           पण एक पूर्व तर एक पश्चिम. असं असलं तरी मेरीने मात्र दोघांना सारखं प्रेम दिलं, वाढवलं, शाळेत घातलं. पण बिचारा मोहित ''ढ'' तो ढच.

           मेरी डिसूजा रोहित-मोहित या जुळ्या बाळांची आई. शाळेत रोहित हुशार तर होताच पण हुडदंग घालायलाही कमी नव्हता. त्याचे मित्रही खूप होते. त्याला नेहमी वाटे मोहितने आपल्या सोबत खेळावं, अभ्यास करावा पण दुर्दैव बिचाऱ्याचं डोकं चालतच नव्हतं तर तो तरी काय करणार?

            बरे, शासनाने आठवी पर्यंत ढकलगाडी ठेवलीय नाही तर त्याचं काय झालं असतं विधात्यालाच माहित!

         यामुळेच रोहित नेहमी घरी आला म्हणजे मेरीचे कान भरत असे. मेरी त्याला पुचकारुन पाचकारुन समज देई. पण ती तितक्यापुरतीच मर्यादित असे. रोहितच्या मित्र मैत्रिणी मध्ये तसे खूपजण होते, पण रोहितची गट्टी मात्र रिंकूशी जास्त.... ती नेहमी त्याच्या आजूबाजूला असे. सोबत डब्बा पार्टी करणे, मौजमस्तीत सोबत, अभ्यासात सोबत, आणि विशेष म्हणजे ती रोहित सोबत मोहितची ही काळजी घेत असे. आणि रोहितला त्याची काळजी घेण्यास भाग पाडत असे. आणि म्हणूनच मेरीलाही रिंकू खूप आवडत असे. गरिबीतून हळूहळू वर आलेली मेरी आपल्या परीनं त्या गोंडस पोरीची काळजी घेत असे, पण रिंकूच्या आईला मात्र रिंकूचं या मुलांशी मैत्री करणं अजिबात आवडत नव्हतं, त्यामुळे ती नेहमी रिंकूला त्यांच्या पासून दूर राहण्याची ताकीद देत असे. परंतु रिंकूचे वडील मिस्टर रवीकांत मात्र या बाबतीत पोरीला कधी काहीच बोलत नसत. रवीकांत उर्फ आर. के. हे व्यावसायिकां मधलं अग्रगण्य नाव

         पैसा चिक्कार पण जराही अंहकार नसलेला माणूस. बस बायको मात्र घंमडी. हो पण रिंकूनं मात्र सारे गुण वडिलांचे घेतले होते. आणि म्हणूनच की काय रिंकू नेहमी मोहितचं भलं पहात रोहितला समजवायची. असंच एके दिवशी सायन्सच्या पिरियडला काव्या मॅडम मोहितला प्रश्न विचारून बोलतं करण्याचा प्रयत्न करत होत्या. तशा त्या नेहमीच प्रयत्न करत असत, पण चांगूलपणा पेक्षा त्यात खोडसाळपणाच जास्त असे. रिंकू रोहितला बऱ्याचदा सांगत असे कि तू मॅडमला  सांग की त्याला त्रास देऊ नका. पण रोहित मात्र काही बोलत नसे. आजही नेमकं तसंच चाललं असतांना, रिंकूनं रोहितला हटकलं, “रोहीत आता आपण लहान नाहीये. आपल्याला थोडी का होईना समज आहे. अरे तुम्ही दोघं भाऊ जुळे, एकाच आईच्या उदरात वाढलेले, पण तू सबळ तो दुर्बळ.... याला कुठेना कुठे तू जबाबदार आहेच ना? आईच्या गर्भात जे तत्त्व दोघांना समान मिळावे, ते तुला जास्त आणि त्याला कमी मिळालेय. त्याचा हक्क तू तिथे खाल्लास मग त्या खाल्ल्याला तरी जाग.” रिंकू भर तासात आक्रमक झाली होती, काव्या मॅडम मोहितला छेडत असल्यानं सगळा वर्ग टिंगल टवाळीत अडकला होता. त्यामुळे तिच्याकडे रोहितखेरिज कुणाचंच लक्ष नव्हतं. रोहितलाही तिचे बोल टोचू लागले होते, त्यांने डोळे बंद केले कानावर हात ठेवले आणि रागावर नियंत्रण करू लागला. रिंकूला वाटलं तो आज मॅडमला काही तरी सुनावणार पण तो त्याच मुद्रेत गप्प बसून होता. तिकडे मॅडम ने मोहितला इंग्लिश मधून प्रश्न विचारला आणि जोर देऊन त्याच्यावर खेकसल्या. मराठीही धड न समजणारा मोहित धांदरला. तरी मोहितनं मॅडमचे खेकसणं बघून वर पाहिलं, आज त्याच्या डोळ्यांत आज वेगळीच चमक होती. मोहितनं पटरपटर इंग्लिश मधून उत्तर द्यायला सुरवात केली. सारा वर्ग शांत होऊन ऐकू लागला. प्रत्येकाला आश्चर्य वाटू लागलं आठ वर्षापासून ढकलगाडीवर पास होणारा मोहित एकदम कसं बोलू शकतो आणि तेही बरोबर उत्तर देत....

         रिंकू आ वासून उभी राहिली. रोहित अजूनही तसाच बसून होता वर्गात काय चाललंय त्याला काहीच कल्पना नसावी बहुधा.....

        रिंकूनं त्याच्या खांद्यावर हात ठेऊन त्याला हलवलं तसा तो भानावर आला. मोहित खाली बसला होता. काव्या मॅडम अवाक होऊन खुर्चीत जाऊन बसल्या व पुढे शिकवायला सुरवात केली. त्या दिवशी दिवसभर शाळेत हीच चर्चा होती, पण हे कसं झालं कुणालाच काही कळलं नाही. रोहितनं मेरीला सारी हकीकत सांगितली. तिलाही काही कळलं नाही पण या घटनेनं तिला थोडा आनंद झाला होता. मोहित नॉर्मल जीवन जगण्याचा किरण तिला दिसू लागला होता. आता हे रोजचच झालं. मोहित खेळू लागला, बागडू लागला, उत्तरं देऊ लागला, अभ्यास करू लागला. सगळं नॉर्मल वाटत होतं पण मध्येच पूर्वीसारखं वातावरण दिसून येत होतं. त्या मुळे रिंकूला भीती वाटत असे. रोहित मात्र काहीच बोलत नव्हता तो नेहमी सारखा वागत होता. भावात झालेल्या बदला बद्दल ही तो फारसा आश्चर्य दाखवत नसे. त्यामुळे काही मुलांना वाटे याला मोहितचं नार्मल होणं खटकतयं कि काय?

          एके दिवशी रिंकू आणि रोहित एका कोपऱ्यात गप्पा मारत बसले होते कसल्या तरी गंभीर विषयावर ते बोलत होते. तितक्यात तेथे मोहितही आला. त्यांनी त्याला ही जवळ बसवून घेतलं. त्या तिघात काय शिजलं हे कुणाला काही कळलं नाही.

          रोज नवनवीन हूडदंग शाळेत होत होता. रोहित काव्याचा आवडता विद्यार्थी म्हणून ती बरीच कामे रोहीत कडून करून घेत असे. बऱ्याचदा घरी बोलावून सुद्धा काही कामं करून घेत असे. रोहितही निसंकोच त्यांचे कामे करीत असे. असाच एके दिवशी एक गमतीदार प्रसंग घडला. रोहित शाळेत जाण्याअगोदर काव्या मॅम कडे गेला होता. मॅडम घरात एकटीच होती आणि शाळेत जाण्याची तयारी करत होती. रोहित नॉक न करताच आत शिरला. काव्या मॅडम कपडे बदलत होती हे बघून रोहित मागे वळला, पण काव्यानं त्याला थांबवलं. लगबगीन कपडे बदलले. तशी काव्या सुंदर होतीच पण आज ती जरा जास्तच सुंदर भासत होती. तिने अंतरवस्त्रापासून साडी ब्लाऊजच काय तर नेल पॉलिश लिपस्टिक सुद्धा एकाच कलरची वापरली होती. रोहितच्याही हे लक्षात आलं होतं, पण तो काही बोलला नाही. काव्यानं रोहितला वीज बिल भरायला पाठवलं आणि स्वतः थेट शाळा गाठली. तिथं मुलं अगोदरच जमली होती. मोहित, रिंकू, टिना, रवी असे अनेक जण होते. काव्याला पाहून सारे आवक होऊन तिच्याकडे बघू लागले. काव्या जवळ आली तशी रिंकू उद्गारली मॅम आज खूप सुंदर दिसताय! काव्या गालातच हसली. तसा मोहित ही बोलला खालपासून वर पर्यंत सगळं मॅचिंग म्हटल्यावर सुंदरता वाढणारच की......

“काय मॅडम?” मोहितनं मिस्किल हसत काव्याला हटकलं. मॅमची बिंदी, लिपस्टिक, नेल पॉलिश, बांगड्या, साडी, ब्लाऊजच काय तर मॅमची प..... म्हणून पुढे बोलणार तितक्यात काव्यानं त्याला गप्प केलं. सारी मुलं खो खो हसू लागली. काव्या लाजेनं चूर झाली होती. मग मोहित हळूच काव्याच्या कानात काहीतरी पुटपुटला. काव्या विस्मयानं त्याच्याकडे पाहू लागली. समोरुन रोहितही येत होता, बहुधा बिल भरून आला असावा. एकदा रोहित कडे एकदा मोहित कडे बघून ती विचारात पडली घरी तर रोहित आला होता, मग कपडे बदलतांना रोहितनं जे पाहिलं ते मोहितला कसं कळलं?

रोहितनं जवळ येऊन काव्याला बिल आणि उरलेले पैसे परत केले. बेल वाजली तसे सारे मुलं आत गेले. काव्याचा पहिला पिरियड असल्यानं तिला वर्गावर यावच लागलं. पण आज ती मोहितच्या डोळ्यांत डोळे टाकून बोलू शकत नव्हती, आणि त्यानं बोललेली गोष्टच डोक्यात फिरत होती. मोहित ही मधून मधून भुवई उचकवून तिला चिडवत होता. असेच प्रसंग बऱ्याचदा घडू लागले जे रोहितला माहीत आहे ते मोहितला कसं कळतं कुणास ठाऊक..... दिवसामागून दिवस वर्षा मागून वर्ष जात होते , शाळा संपत आली. दहावीची परीक्षा जवळ आल्यामुळे मुलं जोमानं अभ्यास करायला लागली. आणि एकदाची परीक्षा आटोपली. रोहितनं देशाभरातला उच्चांक मोडीत काढला. संपूर्ण विषयात पैकी चे पैकी मार्क मिळवले. टिव्ही पेपर सगळीकडे रोहित रोहीत होत होती. बऱ्याच प्रसार माध्यमांनी रोहितचे इंटरव्ह्यू घेतले. त्यातही त्याची प्रतिभा शक्ती अद्वितिय दिसत होती. वैज्ञानिक, डॉक्टर, इंजिनियर आणि बरीच मंडळी रोहितला भेटू इच्छीत होती तर काही मंडळी त्याच्या मेंदूची तपासणी करू इच्छीत होती. 4-5 दिवस रोहितला क्षणाचीही सवड मिळाली नाही. रात्री उशिरा झोप, सकाळी परत कुणी तरी हजर...... रोहितची आई मेरी खूप आनंदात होती. पण तो आनंद जास्त काळ टिकला नाही. रोहित रिंकूशी गप्पा मारत टेरिसवर बसला होता. रात्र बरीच झाली होती. मोहित आणि मेरी आत झोपले होते. तशा अचानक चार पाच गाड्या येऊन त्याच्या अंगणात थांबल्या. आणि क्षणाचाही विलंब नकरता त्यांनी मोहित व मेरीला जबरदस्ती गाडीत कोंबलं आणि अपहरण केलं. मेरीनं प्रतिकार केला पण मोहित शांत होता. रोहितला हा प्रकार दिसताच रोहित व रिंकू तिकडे धावले. पण तोवर गाड्या धूर उडवत निघून गेल्या. रोहित डोळे गच्च बंद करून जमिनीवर बसला. इकडे गाडीत शांत बसलेला मोहित अचानक आक्रमक होऊन अपहरण कर्त्यांना प्रतिकार करू लागला. अगोदर त्यांनी त्याला दाबण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा प्रतिकार वाढला तसा एका अपहरण कर्त्यानं हातातील पिस्तूलानं मोहितच्या डोक्यावर वार केला. तसा मोहित शांत झाला. मेरीला बांधून तोंडात बोळा कोंबून रस्त्यातच फेकून दिलं गेलं.

दुसऱ्या दिवशी पोलिसांना मेरीचं प्रेत सापडलं. मेरी आणि रोहितच्या अपहरणाने आणि नंतर मेरीच्या मृत्यूने सगळीकडे खळबड माजली. चार आठ दिवस पोलिस प्रसारमाध्यमांचा हो हल्ला झाला आणि नंतर वातावरण शांत झालं. या नंतर शहर त्याच्या गतीने चालत होते. छोट्या मोठ्या घटना घडत होत्या. तब्बल 15 वर्षाचा कालावधी लोटला गेला होता. शहरात अपहरणाचे प्रमाण वाढले होते. पोलिसांनी शहराच्या बाहेर चहूबाजूने नाकाबंदी करूनही सुगावा लागत नव्हता. अपहरण कर्ते शहरातच नेमके कुठे गायब होतात कळत नव्हते. आज ही एक अपहरण झालं होतं, आणि ते झालं शहरातील एक नामी मेंदू तज्ज्ञ जे काही दिवसापूर्वीच अमेरिकेतून मायदेशी आले होते. त्या डॉक्टर शेळकरांचे......

दोन महिन्यापूर्वी शेळकरांच्या नातीचं अपहरण झालं होतं आणि आता डॉक्टरांचे त्यामुळे प्रकरण जास्तच चिघळलं जनता रस्त्यावर उतरली. त्यामुळे पोलिस प्रशासनाला नाईलाजाने, ए टी एस ऑफिसर आर आर पाटील यांना पाचारण करावं लागलं. आर आर पाटील विदेशात शिकलेले एक ब्रिलियंट आणि बहादूर अधिकारी.....

    देशाबद्दलचं प्रेम त्यांना भारतात खेचून घेऊन आलं होतं. आणि स्वतःच प्रेम ही त्याला निमित्त होतंच म्हणा ! कारण या शहरातील आर के. गृपचे सर्वेसर्वा प्रसिध्द बिजनेसमन आर. के. सोनी यांची एकूलती एक कन्या डॉक्टर रिंकू सोनी ही त्यांची प्रेमिका होती. लवकरच ते दोघं विवाह बद्ध होणार होते लहानपणा पासूनच हे दोघं सोबत शिकत होते. 

आर आर पाटील येताच कामावर रुजू झाले आननफानन मध्ये त्यांनी सर्व जेष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून घेतली. आणि अपहरणकर्त्यांवर चर्चा सत्राला सुरवात केली. चर्चेत असं दिसून आलं की अपहरण कर्ते अपहरणानंतर खंडणी मागत नाहीत आणि प्रेतही पुन्हा आढळून येत नाही. बऱ्याच जणांनी बऱ्याच शंका मांडल्या. त्यातली एक शंका कदाचित अपहरणकर्ते मानवी शरीराचे पार्ट काढून विकत असावे आणि ते ही देशाबाहेर आणि म्हणूनच हे कुणाला काही माहित नसावं. अपहरण कर्त्यांना ज्यांनी पाहिलं त्यांच्या माहितीनुसार, बरेचसे अपहरणकर्ते विदेशी असल्याची माहिती मिळाली. आज ज्या वेळेस डॉक्टर शेळकरांचं अपहरण झालं तेव्हा एका पोलिस पेट्रोल गाडीनं त्यांचा पाठलाग केला होता. पण ती गाडी शहरात गोलगोल फिरली आणि नंतर आर्यन इंटर नॅशनल फिश सप्लायर कंपनी लगतच्या टोलनाक्याचे बॅरियर तोडून भूमिगत पुलाखालून निघून गेली बॅरियर तुटल्यानं तिथे अफरातफरी झाल्यामुळे पोलिस व्हॅन पुढे जाऊ शकली नाही आणि पुन्हा कुणी ती गाडी पाहिली ही नाही.

तिकडे अपहरणकर्त्याने डॉक्टर शेळकरांना एका अंडर ग्राऊंड रुम मध्ये डोळ्यावर पट्टी बांधून आणण्यात आलं. तिथे एक डोक्यावर जखमेची खून असलेला काळा चष्माधारी सोफ्यात बसून होता. डॉक्टर येताच त्याने डॉक्टरांचे स्वागत केले वेलकम डॉक्टर शेळकर.... डॉक्टरांसोबत आणखी एक जण होता. कदाचित त्याचं काही दिवस अगोदर अपहरण केलं गेलं असावं. डोळ्यावरची पट्टी काढतात ती व्यक्ती किंचाळून म्हणाली. कोण आहात तुम्ही आणि मला का आणलं इथं आणि वाटेल तशा शिव्या हासडायला लागला. समोर बसलेल्या माणसानं त्याच्या कंठातून गोळी आरपार केली. तो तिथेच शांत झाला, त्याच्या साथीदारांनी त्याला तत्काळ हलवलं. एव्हाना डॉक्टरांच्या डोळ्यावरची पट्टी काढली गेली होती. डॉक्टरांनीही तोच पण नम्रपणे प्रश्न केला. समोर बसलेला माणूस किंचित हसला, व म्हणाला, “सेम प्रश्न पण विचारण्याची पद्धत मात्र डिफरंट, आवडलं आपल्याला डॉक्टर!”

“तर ऐका, डॉक्टर मी पंधरा वर्षापासून एका मेंदूवर रिसर्च करतोय. बरेच डॉक्टर आले गेले पण सगळे फेल. काही दिवसापूर्वी आपण अमेरिकेतून परत आलात हे कळलं आणि म्हणून तुम्हाला उर्वरित रिसर्च साठी पाचारण केलं गेलंय”. “आणि मी नाही केलं तर?” डॉक्टरांनी संक्षिप्त प्रश्न केला.

“तुम्ही तसं करणार नाही.”

“का?” पुन्हा डॉक्टर बोलले

“कारण तुमची राणी! तुमची नात डॉक्टर तुमची नात.”

“आर एन! आर एन म्हणतात डॉक्टर मला. तुमची नात फक्त इतक्यासाठीच उचली होती मी.”

डॉक्टरांना झटका बसला , ते बोलणार त्या आधीच तो इसम बोलला.

सध्या तरी सुखरुप आहे पण नंतर सांगता येत नाही. अपेक्षा करतो तुम्ही मदद कराल.” आणि मग डॉक्टरांना एका रुम मध्ये नेण्यात आले. तिथे दाढी मिशा केस वाढलेली व्यक्ती झोपून होती त्याच्या डोक्यावर टाक्यांच्या खुणा होत्या कदाचित रिसर्च साठी मेंदू जवळून अभ्यासण्यासाठी ऑपरेशन केलं असावं. डॉक्टरांना कामाला लाऊन आणि डॉक्टरांना काय हवं नको ची ताकिद देऊन तो व्यक्ती निघून गेला.

        तिकडे आर आर पाटलांची यंत्रणा जोरदार हालचाली करायला लागली होती. तोल नाक्यावर चार संदिग्ध पकडण्यात आले होते ज्यांनी सी सी टिव्ही फुटेज वरून मुद्दाम बॅरियर आणि अपहरणकर्त्याच्या गाडीत टक्कर घडवून आणली होती. चौघांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. तीन जण अगदी ब्र शब्द ही काढत नव्हते तर एक घाबरून बोलू शकणार होता. पण पोलिस सब इन्स्पेक्टर माडकर्णीच्या टॉर्चर मुळे त्यांने दम तोडला होता. हे प्रकरण पार गृहमंत्र्या पर्यंत गेलं. सर्वांना वाटलं माडकर्णी संस्पेंड होणार, पण प्रकरण दाबलं गेलं आणि त्याला या प्रकरणापासून अलिप्त राहण्याचे आदेश दिले गेले. आणि त्या उलट केस आर आर पाटील यांच्या हातात असल्यानं त्यांना वार्निंग देण्यात आली, की जर पुन्हा गफलत झाली तर केस त्यांच्या हातातून काढून घेण्यात येईल. हे असं होणार हे पाटलांना अगोदरच कळलं होतं, कारण माडकर्णी च्या चेहऱ्यावरचं स्मित त्यांच्या चाणाक्ष नजरेनं हेरलं होतं. उरलेल्या तीन जणांची ही टोल नाका मालकानं जमानत केली होती. आणि त्याच क्षणी त्यांना कामावरुन काढून टाकलं होतं. हा सगळा प्रकार पोलिस मुख्यालया समोरच घडला होता, आणि हे पाटलांच्या नजरेतून सुटलं नव्हतं. पाटलांची सुई टोल मालकाकडे वळली, कुठेतरी याचा संबंध या प्रकरणाशी आहे यात शंका नाही. हे हेरुन त्यांनी आपल्या खास सहकाऱ्याला त्याची माहिती काढायच्या कामाला लावलं......

त्याचे तसे पॉजिटिव्ह रिझल्टस पण आले, टोल नाका धारक काही वर्षापूर्वी चेन्नईत टपोरीगिरी करायचा आणि मागील काही महिन्यापासून टोलनाक्याचा कॉन्ट्रक्ट त्याच्याकडे आला होता. हा टोल नाका ब्रिज निर्मितीमुळे इथं बनला होता, आणि ते काम केलं होतं आर्यन इंटरनॅशनल फिश सप्लायर कंपनीच्या माध्यमातून एका विदेशी कंपनीनं, त्या वेळेस कुठला ही लोकल कामगार तिथे वापरला गेला नव्हता. त्यामुळे तेव्हा कामगार संघटनेनं आंदोलन ही केलं होतं. पण होममिनिस्टर च्या हस्तक्षेपाने ते आंदोलन चिरडून टाकण्यात आलं होतं. पाटलांचा सिक्स्थ सेन्स आता आर्यन फिश सप्लायर कंपनी, टोलनाका धारक आणि सब-इन्सपेक्टर माडकर्णीसोबत गृहमंत्र्याच्या हस्तक्षेपाची ही यात लिकं असल्याचा संकेत करत होता. तिकडे डॉक्टर नातीचा जीव वाचवण्यासाठी आर एन साठी त्या माणसावर रिसर्च साठी दिवसरात्र एक करू लागले. डॉक्टरांना दिवसातून एकदा राणीला भेटू दिलं जात होतं. जेव्हा डॉक्टर शेळकरांना थकल्यासारखं वाटे तेव्हा ते विचार करत खूर्चीत बसत, परत उठून कामाला लागत असत. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आर एन चे कॅमेरे नजर ठेऊन होते. जेव्हा आर एन ला वाटलं काहीतरी अडचण आहे पण डॉक्टर बोलू इच्छीत नाही, तेव्हा त्यानं स्वतःच विचारलं, “डॉक्टर काही अडचण?”

“मला एका सहकाऱ्याशी या संबंधी सल्ला मसलत करायची आहे म्हणजे पुढचं काम जरा सोईस्कर होईल.” 

“सॉरी डॉक्टर फोन करणे शक्य नाही. पण हो तुम्ही म्हणाल तर तुमच्या त्या सहकाऱ्याला उचलून आणू शकतो.”

“नाही, ते शक्य नाही, कारण ती एका पोलिस अधिकाऱ्याची होणारी पत्नी आहे आणि ती सद्या अमेरिकेत आहे.

“कोण? नाव सांगा आम्ही तिला भारतात यायला भाग पाडू, आणि मग उचलू हवं तर” 

प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉ रिंकू सोनी.

बिजनेसमन आर के सोनी ची कन्या डॉक्टर ने नाव सांगितले.

तसा आर एन हसत हसत म्हणाला, “म्हणजे त्या एटीएस अधिकारी आर आर पाटलाची मंगेतर तर.” 

“हो, पण तुम्ही कसं ओळखता आर आर पाटलांना?”

“त्याच्या दूर्दैवाने आणि आमच्या सुदैवाने तो तुमच्या अपहरणाच्या केस मुळे याच शहरात आलाय. आम्ही तिला उचलणार.”

डॉक्टर म्हणाले “असं अजिबात करू नका तिला उचलने इतके सोपे नाही. तुमच्या कामात व्यत्यय येऊ शकतो.

“पण डॉक्टर तुम्हाला आमची इतकी काळजी का? “

“कारण माझी नात तुमच्या ताब्यात आहे आणि तिच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.

ठीक आहे डॉक्टर उद्या तुम्हाला सोडून दिलं जाईल. 3 दिवस तुम्ही बाहेर रहाल आणि चवथ्या दिवशी तुम्हाला पुन्हा उचललं जाईल या तीन दिवसात तुम्ही त्या डॉक्टरशी हवी ती सल्ला मसलत करुन या आणि जर गोष्ट लिक केली. किंवा बाहेर जाऊनही काम पूर्ण नाही झालं तर राणी संपलीच म्हणून समजा. आणि बाहेर स्वतःला लपवून कसं ठेवायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं.”

 इतकं बोलून आर एन निघून गेला.

            आर एन च्या सांगण्यावरुन डॉक्टर शेळकरांना वेगळा गेटअप दिला गेला, जेनेकरून त्यांना बाहेर कुणी ओळखणार नाही. डॉक्टर शेळकरांना गाडीत बसवून गाडी सुसाट वेगाने बाहेर पडली. समोर ही त्याच वेगात दुसरी गाडी धावत होती. इकडे डॉक्टर रिंकू सोनी नुकतीच आपल्या गाडीने घराबाहेर पडली होती, दोन्ही गाड्यांनी आपला स्पिड थोडा कमी केला हळूच रिंकू सोनीच्या गाडीला ओवर टेक करून त्या दोन्ही गाड्या पुढे गेल्या आणि पुढच्या क्षणी धडाम्.....

       दोघं गाड्या आपापसात भिडल्या रिंकूला अचानक ब्रेक लावावे लागले. पुढच्या गाडीतून एक वयोवृद्ध जखमी अवस्थेत बाहेर आला. दोघं गाड्यांचे ड्रायव्हर आपापसात भाडायला लागले. तितक्यात सब-इन्स्पेक्टर माडकर्णीची गाडी तिथे आली. पोलिसांना पाहून दोन्ही ड्रायव्हरांनी सिट सांभाळून पळ काढला. तोवर डॉक्टर रिंकू तिथे पोहचली होती. तिनं तत्काळ जखमी आजोबाला गाडीत घेतलं आणि हॉस्पिटल कडे जायला गाडी चालवायला सुरवात केली. तसा मागील सिटवर बसलेली व्यक्ती बोलली. “हॉस्पिटल पेक्षा गाडी घरीच घे डॉक्टर रिंकू.” आपलं नाव अनपेक्षीत पणे घेतलं गेल्याने ती थोडी भांबावली. पण पुढच्या क्षणी स्वतःला सावरत तिनं प्रश्न केला “कोण आपण?”

“सगळं सांगतो रिंकू. आधी तुझ्या घरी चल. मी डॉक्टर शेळकर!” रिंकूला हा दुसरा झटका बसला. रिंकू डॉक्टर शेळकरांची अमेरिकेतील शिष्य असल्यानं ती काही न बोलता घरी आली गाडी सरळ गॅरेजला पार्क करून शेळकरांना घेऊन मागच्या दरवाज्याने आत गेली. डॉक्टरांना गेटअप न उतरण्याचे आदेश होते. तसेच फक्त कामाबद्दलच बोलावे ही ताकिद दिली गेली होती. त्यामुळे डॉक्टर काहीच बोलले नाही. आणि त्यांनी मेंदूवर चाललेल्या रिसर्च बद्दलच्या अडचणी विचारायला सुरवात केली. रिंकूला काय करावे काही कळेना तिनं बाहेर जाऊन पाटलांना फोन लावून बोलावून घेतलं, सारी हकीकत सांगितली. गेटअप न उतण्याचा आदेशावरून पाटलांनी तत्काळ ताळलं कुठे तरी माईक किंवा हिडन कॅमेरा यात सेट असावा असा अंदाज घेतला. रिंकूला योग्य त्या सूचना देऊन तिच्या करवी डॉक्टरांना आराम करायला सांगितले. आणि माझ्या बद्दल काही बोलू नको हे ही लक्षात ठेवण्यास सांगितले. रिंकूने तसंच केलं, सायंकाळी डॉक्टर शेळकर डॉक्टर रिंकू आणि रिंकूचे एक डॉक्टर मित्र मिळून या विषयावर चर्चा करू लागले. अचानक दिवे मालवले रुम मध्ये काळोख पसरला.

“हे काय झालं?”

लाईट गेली असावी बहुधा रिंकूनं उत्तर दिलं. लाईट गेल्याचा फायदा घेत रिंकूच्या डॉक्टर मित्राने जे वास्तविक ए टी एस ऑफिसर पाटील होते शेळकरांच्या तोंडावर टेप लावली आणि एका भल्यामोठया ठोकळ्यात त्यांना झाकलं गेलं. जेव्हा रुम मध्ये उजेड पसरला तेव्हा डॉक्टर शेळकरांचे फक्त डोळे ठोकळ्याबाहेर होते. आता डॉक्टर सारं पाहू शकत होते पण त्यांच्या शरिरावरच्या कॅमेऱ्यासाठी मात्र बाहेर अजून काळोख होता. आर आर पाटलांनी तत्काळ समोर ब्लॅक बोर्ड वर लिहून डॉक्टरांना सर्व हकीकत कळवली. व डॉक्टरांच्या नातीला वाचवण्याचे आश्वासन देऊन, कोऑपरेट करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी डोळ्याच्या पापण्या मिटवून स्विकृती दिली. पुन्हा दिवे घालवले गेले. डॉक्टरांचे तोंड आणि हात मोकळे केले गेले. आता डॉक्टरांनाही सारा माजरा कळला होता. डॉक्टरांच्या डोळ्यांबरोबर हातांनाही बाहेर येण्यासाठी सोय केली गेली. तोंडाने लाईटचा घोळ झाला असं दर्शवून मिटिंग उद्यावर ढकलण्यात आली. पण लिहून वाचून बऱ्याच वेळ त्याची मिटींग सुरु होती. डॉक्टर घामाघूम झाले होते. रुमची लाईट घालवून डॉक्टरांना मोकळे केले गेले शरीराला थोडा थंडावा दिला गेला सारं नॉर्मल झाल्यानंतर उजेड केला गेला. आता तिथे डॉक्टरा खेरिज कुणीच नव्हतं. डॉक्टर निवांत झोपी गेले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार शंका घेत आर आर पाटलांनी गृहमंत्र्यांना मदत मागू केली पण त्यांनी साफ नकार दिला. आणि असले बिनबुडाचे आरोप करून केस भटकवण्या पेक्षा ही केस माडकर्णीला द्या म्हणून आदेश दिले. दुसऱ्या दिवशी रिंकू आणि डॉक्टर शेळकरांमध्ये औपचारिक चर्चा झाली आणि शेळकर आर एन च्या प्लान नुसार सायंकाळी घराबाहेर फेरफटका मारायला बाहेर पडले. डॉक्टर बाहेर पडताच त्यांचे पुन्हा अपहरण झाले आणि ते पुन्हा त्या लॅब मध्ये पोहचवले गेले. डॉक्टरांनी पुन्हा आपल्या कामाला सुरवात केली. अगोदर त्या माणसाला चालतं फिरतं केलं. काही जरुरी तपासण्या केल्या. तपासाअंती डॉक्टरांनी जे सांगितले त्यावर आर एनचा ही विश्वास बसत नव्हता. 

          “मिस्टर आर एन उर्फ रंगा आपल्याला जरा 30 वर्षे मागे जावं लागेल.” 30 वर्षे अगोदर आर एन एक सुपारी किलर रंग्या होता. त्यामुळे तो थोडा विव्हळला. डॉक्टरांनी पुढे बोलायला सुरवात केली.

पंधरा वर्षापासून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवलात. कारण वास्तवात तुम्हाला ज्या मेंदूचा रिसर्च करायचाय तो हा नव्हेच.

“काय?” तो जवळ जवळ किंचाळलाच.

डॉक्टर तुम्ही पळवाट शोधत आहात, तो दम देऊन म्हणाला.

पळवाट नाही म्हणून म्हणतोय तीस वर्ष मागे जा. मी अमेरिकेत जाण्याआधी इथेच प्रॅक्टिस करायचो आणि तुम्ही छोट्या मोठ्या सुपाऱ्या घ्यायचे, कुणाला भुलवून किडणी विकायची लालच द्यायचे त्यातलीच तुमची एक शिकार भेळवाला रस्तोगी आठवतो. ज्याच्या पत्नीचे ऑपरेशन मी केले होते आणि फिस तुम्ही आणून दिली होती. मला रस्तोगीला भेटायचं होतं पण तुम्ही ते टाळलं ऑपरेशन च्या खर्चापेक्षा जास्त रक्कम देऊन निघून गेला. त्या दिवशी रस्तोगीला दोन मुलं झाली होती. मुलं जुळी तर जुळी पण जुळलेली सुद्धा होती. आणि त्यांना वेगळं करणं थोडं चिंताजनक होतं त्यांच्या मेंदूवर परिणाम होणारं ते ऑपरेशन होतं. रस्तोगी परत आला नाही मेरी शुद्धीत नव्हती. म्हणून आम्ही आमच्या रिक्सवर ते ऑपरेशन केलं. ऑपरेशन यशस्वी ही झालं, पण त्या ऑपरेशन मुळे जुळलेले असतांना जे दोन मेंदू सारखे काम करत होते त्यात बदल झाला. एकाचा मेंदू 30 टक्के काम करू लागला तर दुसऱ्याचा चक्क 170 टक्के. लहान असतांना ते फारसे जाणवले नाही. पण 15 वर्षानंतर त्या मुलाच्या घवघवीत यशानंतर तो हाईलाईट झाला. आणि तुम्हांला त्याला उचलायची दुर्बूद्धी सुचली. आणि तुम्ही तसं केलं ही

पण नेम चुकला तुम्ही रोहीत ऐवजी मोहितला उचललं आणि पंधरा वर्षापासून ज्या डोक्यात काहीच नाही त्यावर परिक्षण करत बसले. आर एन एखाद्या जबरदस्त मात खाल्लेल्या बुद्धीबळ खेळाडू प्रमाणे गपकन खाली बसला. आणि एका क्षणात त्याने मोहितवर पिस्तोल ताणली. डॉक्टरांनी प्रसंगावधान राखून त्याचा हात बाजूला केला. त्याच वेळी गृहमंत्री आणि माडकर्णीने आत प्रवेश केला. आणि मोहितवर झाडलेली गोळी माडकर्णीला जाऊन लागली आणि तो गतप्राण झाला. शांतपणे विचार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी आर एन ला दिला. गृहमंत्री भडकला होता. तो बरडायला लागला “रंग्या विसरू नकोस मी तुला रंग्याचा आर एन केलाय तू मूळ धंदा सोडून या मेंदू परिक्षणाच्या नादात तुझा आणि माझा जीव गमावून बसशील. आता या माडकर्णीला मारून एक कामं अजून वाढवून ठेवलंस, याचं काय करु?”

डोकं खाऊ नकोस माझ्या जिवावर करोडो कमवतोय तू. जा तुझ्या फार्म हाऊस वर एक माणूस घेऊन त्याला उडव, कारण तो तुला मारायला आला होता. आणि तुला वाचवतांना माडकर्णी ने त्याला मारलं पण स्वत: सुद्धा मारला गेला हे शो कर. उरला तपास पोलिस करतीलच. आणि माडकर्णी आपल्या सोबत मिळालाय हा समज जो त्या पाटलाचा झालाय तो ही मिटेल. निघा लवकर......

आर एन चा इशारा मिळताच एक डेडबॉडी आणून माडकर्णी च्या बॉडीसोबत गाडीत टाकून गृहमंत्री रवाना केला गेला. तसा आर एन डॉक्टरांशी मुखातीब झाला. मग डॉक्टर रोहित कुठे गेला?

त्या वेळी मी अमेरिकेत होतो. त्यामुळे रोहितचं काय झालं मला माहीत नाही. 

हे तर तुम्हाला माहीत असायला हवं होतं. डॉक्टरांनी आर एन ला म्हटलं.

ते मुलं जुळे होते याची मला कल्पनाच नव्हती, आणि मी मात्र अपहरण करताना त्याच्या डोक्यावर केलेला आघातच त्याच्या मंदपनाचं कारण घेऊन बसलो होतो. 

आता याचं काय करायचं डॉक्टर?

पंधरा वर्षापासून हा कालकोठरीत असल्या सारखाच आहे. बाहेर सोडून जरी दिला तरी काय बिघडणार...... 

तितकेच पुण्य पडेल झोळीत! डॉक्टरांनी समजवण्याचा प्रयत्न केला. आणि समजा याला कुणी ओळखलं ही तर कदाचित आपल्याला रोहित ही भेटू शकण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

थोडं थांबून डॉक्टर म्हणाले..... 

“तुमचं काम झालंय साहेब, आता मला आणि माझ्या नातीला तर सोडा.”

“सॉरी डॉक्टर!

“तुम्ही जर बाहेर गेलात, तर मी जाईल जेलात! म्हणून आता तुम्ही माझा पाहूनचार घ्या कायमचा”. आणि हसत हसत निघून गेला.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मोहितला बाहेर तर नाही सोडलं पण आतल्या आत तो कुठेही जाऊ येऊ शकत होता. मोहितने आता सगळ्या मार्गांचं, इथल्या कारभाराचं अवलोकन केलं होतं. डॉक्टर आणि राणी ही अशीच आतल्या आत फिरत असत. 

     एक दिवस अचानक एका ड्रायव्हरनं मोहितला गन पॉईंटवर घेऊन गाडीतून पळ काढला. गाडी शहरात सुसाट धावू लागली. अचानक गाडी येऊन रिंकूच्या गॅरेजात शिरली आणि परत काही वेगळाच पुन्हा आली तिकडेच सुसाट निघाली.

       एक ड्रायव्हर मोहितला घेऊन बाहेर पडला हे कळताच आर एन ने सारी यंत्रणा कामाला लावली. पण त्या आधीच ती गाडी पुन्हा आत आली. आता गन मोहितच्या हातात होती गाडी थांबताच त्यानं ड्रायव्हरला धक्का देऊन बाहेर ढकललं आणि दुसऱ्या बाजूनं बाहेर पडत त्या ड्रायव्हरच्या डोक्यात बरोबर मध्यभागी गोळी मारून शूट केलं. हा कुठे गेला का गेला कुणालाही काही कळलं नाही. रागाच्या भरात त्या ड्रायव्हरचे तुकडे करून माशांना टाकायचं फरमान आर एन ने सुनावलं. आणि त्या दिवसापासून मोहित आणि डॉक्टर शेळकरांना एका रुममध्ये बंद करण्यात आलं. फक्त राणी तेव्हडी बाहेर कुठेही हिंडू फिरू शकत होती. ती कधी बाहेर तर कधी या दोघांजवळ राहात असे. डॉक्टरांना वाटलं याने स्वतःचे स्वातंत्र्य तर हिरावलेच पण माझं स्वातंत्र्य ही हिरावून घेतलयं. बाहेर गृहमंत्र्यावर झालेल्या हल्ल्यामुळे वातावरण तापलं होतं. आर आर पाटलांकडची केस माडकर्णीला दिल्यानं पाटील 10 दिवसाच्या सुटीवर गेले होते. पण माडकर्णी मारला गेल्याने त्यांना पुन्हा पाचारण करण्याची मांग होऊ लागली. तब्बेतीचा बहाणा बनवून पाटील सुटी पूर्ण करूनच ड्युटीवर हजर झाले. सदा तत्पर असणारा अधिकारी आता थोडा नरमला होता. त्यांनी केसची सूत्र पुन्हा हाती घेतली. गृहमंत्री हमला प्रकरण ही याच प्रकरणातील एक हिस्सा म्हणून तेही स्वत:च्या हाती घेतलं. गृहमंत्र्यांनी ती केस स्वतंत्रपणे हाताळली जावी असे आदेश दिले, पण आता पाटील ऐकायला तयार नव्हते. पाटील आता दिवसेंदिवस जास्त सक्रिय होत चालले होते. आर एन च्या गुहेत घुसायचं कसं आत काय चाललंय, त्यात असणाराच्या मुस्क्या कशा आवळायच्या हे ते बखूबी निस्तारून नेत होते. गृहमंत्र्याची दाळ पातळ होत होती, पण तो साव असल्याचा आव आणत होता.

          असचं एक दिवस मोहित आणि डॉक्टर बसले होते. आजूबाजूला कुणी नाही असं पाहून मोहित म्हणाला, “काय डॉक्टर कसल्या चिंतेत पडलाय?”

“चिंता हीच की इथून बाहेर कसं पडावं ? एक आर आर पाटलांची आशा होती पण ती पण मावळतांना दिसतेय. तू बाहेर गेल्या दिवसापासून सिक्यूरिटी जास्तच कडक झालीय. माझं ठीक आहे पण या मुलीचं काय ?”

“मोहित मंद हसला आणि म्हणाला सगळं ठीक होईल डॉक्टर, बस थोडा धीर धरा. “

मोहित राणीशी तासंतास गप्पा मारत असे. बाकी बराच काळ डोळे बंद करून नुसता पडून राहत असे तो का पडून असतो हे डॉक्टरांना ही कळेना.

        दुसऱ्या दिवशी सकाळी सगळीकडे अफरातफर होऊ लागली. गोळी बार सुरु झाला. कुठे काय चाललयं काहीच कळत नव्हतं. ए टी एस अधिकारी आर आर पाटलांच्या नेतृत्वात आर्यन इंटरनॅशनल फिश सप्लायर कंपनीवर रेड करण्यात आली होती. कंपनीला छावनीचं रूप आलं होतं. आर आर पाटील आणि त्याचा एक सहकारी खुफिया मार्गाने एका भुयारात शिरले. ते दोघं असे जात होते जसे त्यांना इथला काना कोपरा माहित असावा. हा हा म्हणत ते आर एन उर्फ रंगनाथ राव यांच्या समोर दत्त म्हणून उभे ठाकले. गन पॉईंट वर रंगनाथ राव होते, समोर आर आर पाटील उभे होते. अचानक त्यांच्या मागून गृहमंत्र्यानं येऊन पाटलांच्या डोक्यावर पिस्तूल रोखलं. पाटलांनी हसत हसत स्वतःच रिव्हाल्वर कमरेत खोवले. आणि आर एन म्हटलं, “मी तुम्हाला एक ऑफर देतो.”

तसे गृहमंत्री हसायला लागले आणि म्हणाले, “गन पॉईंट वर तू आहेस भल्यामाणसा आणि तूच आम्हाला ऑफर देतोयस.”

मग डोक्याला लागलेली पिस्तोल बाजूला सारत पाटील म्हणाले, कारण तुमच्या पिस्तूलात गोळ्याच नाहीयेत. गृहमंत्री हडबडून पिस्तूल बघू लागला तितक्यात पाटलांनी खिशातलं पिस्तूल काढून गृहमंत्र्यावर रोखलं. त्यांच्या हातातलं पिस्तूल खाली पडलं. ही सारी घटना समोरून डॉक्टर शेळकर पहात होते. छोटी राणीही तिथंच न घाबरता उभी होती. मोहित मात्र डोळे बंद करून शांत पडला होता. आता बाजी पाटलांच्या हातात आली होती. त्यामुळे गृहमंत्री ऑफर ऐकायला तयार झाला.

मग पाटील बोलायला लागले, तुम्ही दोघांनी आज पर्यंत जितका माल कमवलाय तितका पूर्ण माझ्या खात्यात ट्रान्सफर करायचा. त्या बदल्यात मी तुम्हा दोघांना यातून क्लिन चीट देणार. आणि तुम्ही दोघं आताच प्रायव्हेट विमानानं दुबईला प्रस्थान करावं तशी सूचना गृहमंत्री महोदय तुम्ही तुमच्या पी ए ला द्या आणि लगेच उडा. रेड मध्ये काहीच सापडलं नाही असं सिद्ध करत केस क्लोज. 

चालेल ! मंत्री महोदय लगेच तयार झाले. पण आधी आम्हाला क्लिन चिट दे.

स्वारी बाजी माझ्या हातात आहे आधी फंड ट्रान्सफ़र करा दोघं. 

मरता क्या न करता लगेचच नेट बॅंकीग चा वापर करून करोडो रुपयाचं ट्रान्झाक्शन पाटलांनी दिलेल्या अकाऊंटवर करण्यात आलं. 

त्यावर मंत्री महोदयाने प्रश्न निर्माण केला या डॉक्टरांच काय?

त्यावर क्षणाचा ही विलंब न करता पाटलांनी डॉक्टरांवर गोळी झाडली. छोट्या राणीजवळ जाऊन डोक्याला गण लावली, तशी राणी डोळे बंद करत खाली कोसळली पाटलांनी तिला सहारा देत जमिनीवर लेटवली. आता सहकाऱ्याकडे येत विचारलं तुझा काय विचार आहे.

जिकडे तुम्ही तिकडे मी ! त्याने ही जीव वाचवणं योग्य समजून त्या सर्वांना सामील होणं पसंत केलं. पाटलांचा इशारा मिळताच डॉक्टर आणि राणीचं शव गाडीत टाकून बाहेर पाठवलं गेलं. पाटील गृहमंत्री आणि रंगनाथ सोबत मागच्या दाराने बाहेर पडत कंपनीच्या हवाई पट्टीकडे आले. तितक्यात तिथे एक प्रायव्हेट विमान येऊन उभे राहिले. जणू त्याला अगोदरच सूचना मिळाली असावी. ते दोघे लगबगीनं आत शिरले. दरवाजे बंद झाले. विमान धावपट्टीवर धावू लागले. पाटील खालीच हात हलवत उभे होते सोबत राणी आणि डॉक्टर पण उभे होते. एव्हाना विनानानं उडान भरली होती. डॉक्टर जिवंत कसा या विचारात दोघं एकदुसऱ्याकडे पाहू लागले. पण आता उशीर झाला होता. विमान हवेत उडत होतं.तशी दोघांनी पायलट कडे धाव घेतली. पण हे काय पायलटाच्या जागेवर मोहित बसला होता. विमान उडलं होतं खरं पण उतरणार की नाही याची शास्वती नव्हती. विमान समुद्रावरून उडत होतं तसा मोहित पायलट सिटवरून उठून आत आला. तसे मंत्री महोदय किंचाळले... अरे विमान कोण चालवतय? आपण मरु ना ! तसा मोहित म्हणाला मरणार तर आपण आहोतच. 

पण का ?

आणि तू इथं कसा?

हा असे प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. कारण मरतांना सस्पेंस मध्ये मरु नये माणसानं......

तुझ्या आयचा तुला तर मी..... आर एन त्याच्यावर ओरडत धावून गेला.

मोहितनं एक टोला नाकावर जडवून त्याला पुन्हा सिटच्या हवाली केला. आणि वरच्या ड्रावर मधून एक टाईम बॉम्ब काढला त्यावर 10 मिनिटे टाईम सेट केला आणि त्यांना दाखवून म्हटला. तुमच्या शंका कुशंका असतील तर बोला तुमचा उलटा टाईम सुरू झालाय टिक टॉक टिक टॉक 10,9,8,

तुमचा प्रश्न मी इथं कसा अरे मी 10 दिवसापासून तुमच्या सोबतच आहे. आणि त्यानं गालावरची दाढी डोक्यावरचा विग उतरवला. दोघं शॉक्ड झाले.

मंत्री बोलला आर आर पाटील ! मग तो खाली कोण होता ?

तो मोहित ! यानं संक्षिप्त उत्तर दिलं.

दोघं सेम म्हणजे भाऊ भाऊ मंत्री वैतागल्यागत करत बोलला.

बरोबर .......! म्हणून रोहित पुढे बोलू लागला.

मी आर आर पाटील अर्थात रोहित रस्तोगी-पाटील त्याच रस्तोगीचा मुलगा ज्यांना तू 30 वर्षापूर्वी म्हणजे माझ्या जन्माच्या दिवशी संपवलं. ही पहिली चूक

दुसरी मोहितला उचललं माझ्या आईला मारलं.

तिसरी मला जिवंत ठेवलं

चौथी डॉक्टर शेळकर नात आजल्यांचे अपहरण

अरे किती चुका करतोस आणि सर्वात मोठी चूक घाई खूप करतो 

डॉक्टरांना बाहेर सोडण्याची घाई

मोहितला मोकळे सोडण्याची घाई 

मोहित बाहेरून परत आल्यावर जो ड्रायव्हर मी मारला त्याला न चेक करताच विल्हेवाट लावायची घाई 

म्हणजे तो ड्रायव्हर ? आर एन चा प्रश्न....

दुसरा ,...... बाहेर जातांना माझ्या मर्जीतला आत येतांना तुझा गुर्गा

बाहेर मोहित गेला आत रोहित आला. हे ही तुला कळलं नाही. अरे मी ड्रायव्हरच्या कपाळावर मधोमध गोळी मारली तरी तुला कळलं नाही. 15 वर्षाचा पोरगा तू पंधरा वर्ष डांबून ठेवला. मग तो पिस्तूल चालवणं कुठे शिकला? विमान चालवायला कसा शिकला ?

मग तू आत येऊन काय केलं ? हे तर तू बाहेरून ही करू शकला असता, जसं मोहितने केलं. आता मंत्री बोलला

इथंच तर खरी गोम आहे टाळी वाजवत रोहित म्हणाला. व पुढे बोलू लागला.... लहान असतांना जे ऑपरेशन झालं होतं त्यात जरी आमच्या मेंदूची कार्यक्षमता वाटली गेली असली तरी एक गॉड गिप्ट मात्र आम्हाला मिळालं होतं. आणि ते मला 8 व्या वर्गात असतांना कळलं होतं. ते असं जे ही मी आत्मसात करेल पाहिल ते मोहितला आपोआप कळेल आणि याच्याच जोरावर मी मोहितला 10 पर्यंत ढकललं पुढेही त्याला मदत करणार होतो पण तू संगळा घोळ केला.

पण तू तर आत येऊन नुसता गप्प पडून होता मग आतली माहिती गोळा कशी केली ?

गुड क्वेश्चन .....! 

राणी ! आतली माहिती राणी नं कलेक्ट केली तिच्या फ्रॉकला मी हिडन कॅमेरा सेट केला होता आणि ती सगळी कडे फिरून माहिती गोळा करायला माझी मदत करत होती आणि तिला माहीत ही नव्हतं.

आणि डॉक्टरला तर तू गोळी मारली होती. तो जिवंत कसा ?

तुम्हा दोघांशी बोलतांना मी गन चेंज केली होती रबर बुलेट गन ज्या बुलेट मध्ये ऑलरेडी लाल रंग भरलेला होता. आणि सोबत हलका बेशुद्धीचा झटका ही, म्हणून तर माझ्या सहकाऱ्यानं त्यांना लवकर बाहेर नेलं. अन्यथा ते शुद्धीवर आले असते तर घोळ झाला असता.

ओहो ! मंत्री उद्गारला.... 

आम्हाला खालीच का नाही मारलंस ?

खाली मारता आलं नसतं , इन्क्वायरी मग कोर्ट, आणि तारखां वर तारखा 

म्हणून मी तुम्ही दोघं विनानानं पळून गेल्याची बातमी मिडियाला दिलीय 

विमान तुम्हीच उडवून नेलं हे ही सांगितलेय. कारण तुमचे सगळे पायलट पोलिसांनी पकडून नेलेय. 

तू ही मरणार आमच्या सोबत तरी आलास. मंत्री म्हणाला 

मी नाही मरणार मित्रांनो माझ्या कडे पॅराशूट आहे आणि पूर्ण विमानात एकच आहे असं म्हणत त्याने पॅरॅशूट दाखवलं. आता तिघात पॅरॅशूट साठी मारामारी सुरू झाली. विमान अॅटो मोडवर आकाशात गोल गोल घिरट्या घेत होतं. ओढाताणीत कसंबसं पॅरॅशूट रंगनाथ च्या हाती लागलं तसा त्यानं ते शरीरावर अडकवलं एमरजेन्सी विंडो उघडली आणि बाहेर उडी घेतली. अरे हे काय ! पॅरॅशूटचा वरचा कपडाच फाटकाय आणि तो वेगात खाली येऊन समुद्रात कोसळला.

मंत्री पार घाबरला होता घड्याळाची टिक टिक संपत आली होती रोहितनं पुन्हा दुसरं पॅरॅशूट काढलं शरीरावर लटकवलं. आणि मंत्री कॅबिन मध्ये ढकलला बाहेरून दरवाजा लॉक केला टाईम बॉम्ब दरवाजावर लटकवला आणि एमरजेन्सी विंडोतून बाहेर उडी घेतली, थोड्या अंतरावर जाऊन पॅरॅशूट उघडलं. तोवर विमान ही गिरकी घेत पुढे सरकलं होतं वेळ संपली होती आकाशात जबरदस्त विस्फोट झाला. विमानाचा मलबा समुद्रात विसर्जीत होण्यासाठी साठी हळू हळू खाली जात होता. रोहितनं एक दीर्घ श्वास सोडला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action