Sarita Sawant Bhosale

Tragedy Action

2.3  

Sarita Sawant Bhosale

Tragedy Action

मी शहीद जवानाची आई

मी शहीद जवानाची आई

7 mins
2.0K


धैर्यशील बाळा आज तुझ्यासाठी लिहिण्याचं कारणही तस खासच आहे रे. आता १५ऑगस्ट येतोय ना. आपल्या सोसायटी मधील लोकांनी आम्हाला म्हणजे मला,तुझे बाबा,स्पृहा आणि साहसलाही झेंडावंदनाचा यावर्षीचा मान द्यायचं ठरवलंय. अभिमान वाटतोय बघ आज तुझी आई असल्याचा. आज तुझ्यामुळेच आम्हाला एवढा मान मिळतोय,समाजात प्रतिष्ठा मिळते. सारं काही तुझ्यामुळेच आहे बघ. तुझं नाव तसं आम्ही काही ठरवून धैर्यशील नव्हतं ठेवलं पण वाटायचं धैर्याचच काहीतरी करशील म्हणून ठेवलं. पुढे जाऊन तू ते नाव सार्थ केलसच. मला आठवतं तुला कळत होत तस तू फक्त ते सैन्याचे,पोलिसांचे कपडे घ्यायला सांगायचा. तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला तरी तसेच कपडे तुला हवे असायचे. शाळेतही १५ ऑगस्ट,२६जानेवारीला तुझं भाषण ठरलेलंच असायचं. खूप छान भाषण करायचास आणि बक्षिसेही मिळवायचास. तू आठवीत असताना पहिली कविताही "आपला सैनिक" हीच केली होतीस. तुला पोलीस,सैनिक,आर्मी याच आधीपासूनच खूप आकर्षण होत. कोण होणार अस विचारलं की तू नेहमी सांगायचास "मला सैनिक होऊन देशसेवा करायची आहे आणि ती मी करणार". कणखर आवाज आणि तो आत्मविश्वास बघून मला कुठेतरी वाटलेलं की तू सैन्यदलात जाशील. माझी आणि तुझ्या बाबांची तू डॉक्टर होऊन समाजसेवा करावी अशी इच्छा होती पण आमच्यापेक्षा मोठं स्वप्न तू उराशी बाळगून वाढत होतास. आमची इच्छा आम्ही कधी तुझ्यावर लादली नाही. तू तुझा निर्णय १२वी नंतर आम्हाला सांगितलास आणि आम्ही तो मोठ्या मनाने मान्यही केला. तस आपल्या घरात कोणीच सैन्यात नव्हतं पण तुला जायचंच होत. तू त्याशिवाय वेगळ्या करिअरचा कधी विचारच केला नाहीस. आठवतं का तुला आपल्या शेजारी एकदा आग लागलेली आणि कोणीच आत शिरायला तयार नव्हते तेव्हा तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आगीत उडी मारलीस आणि त्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढलंस. आणि आपण एकदा गावी गेलो सुट्टीत तेव्हा नदीकडिल गावांत पुर आलेला तेव्हाही तू मागचा पुढचा विचार न करता जमेल ती मदत करायला तिथे पोहचला होतास. मला तेव्हाच माहीत झालेलं की तू सैन्यात भरती होऊन देशसेवाच करणार. तू भरती झालास हे जेव्हा कळलं तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. तुझ्या प्रयत्नांना यश मिळालेलं. तू तर आनंदाने नाचत मला सांगत आलेलास "आई माझ स्वप्न पूर्ण झालं. मी उठता बसता, जागेपणी, झोपेत हेच स्वप्न बघायचो आणि आज ते पूर्ण झालं. आई पण मी आता ड्युटीवर जाणार म्हणजे घरापासून लांब राहावं लागेल. तू please रडू नकोस हं, आनंदाने निरोप दे आणि तू,बाबा हसत खेळत मजेत राहा. आता मी सैन्यात जातोय म्हणजे तुम्हीही खंबीर व्हा. कधी काहीही होऊ शकत, तशी मनाची तयारी ठेवा. डोळ्यात पाणी नको आणू आई, आता मी देशाचा मुलगा आधी आणि मग तुझा. काही झालं तरी रडू नका आणि नेहमी खुश राहा." अस बोलून तुझा ड्युटीवर हजर व्हायचा दिवस उजाडलापण. तू खुश होतास जातोय म्हणून. चेहऱ्यावर त्यादिवशी वेगळीच चमक दिसत होती. आम्ही जड अंतःकरणाने तुला निरोप दिला. तुझ्यासमोर अश्रूंना सांगितलेलं बाहेर नका येऊ,माझा बाळ देशसेवेसाठी निघालाय. रोज तुझा फोन यायचा तेव्हा हायस वाटायचं आणि मगच आम्ही दोघे जेवायचो. आता तुझ्या फोनची वाट बघणं एवढच काम असायचं आम्हाला.सुट्टीला आलास तरी कोणाची तरी मदत करण्यातच तुझी सुट्टी संपायची. मी रोज नवीन पदार्थ करून खाऊ घालायचे तुला. तेवढंच माझ्या हातांना काम होत. तू आलास की दिवस पुरायचा नाही आणि नसायचास तेव्हा घर खायला उठायचं. यावेळी मी सुट्टीत तुझे दोनाचे चार हात करून द्यायचे ठरवलेलंच. मुलीपण बघायला सुरू केलेलं, सैन्यात मुलगा आहे म्हंटल की मुली तयार नाही व्हायच्या. अशिक्षित असला तरी चालेल पण सैन्यात असलेला मुलगा नको ही या भूमिका असायची. मला आश्चर्य वाटायचं सुशिक्षित मुलीही असा विचार करतात आता.कीव यायची मला त्यांची की एक कर्तृत्ववान, देशसेवेत स्वतःला झोकून दिलेला जोडीदार त्यांना नको असायचा. तुम्ही स्वतःसाठी न जगता आमच्या सारख्या सामान्यांसाठी जीव धोक्यात घालून जगता हेच कस कळत नाही मुलींना या विचाराने डोकं बधिर पण व्हायचं. अखेर तुझीच बालमैत्रीण स्पृहा जिला तू लहानपणापासून आवडायचास पण ते तुला कधी कळलंच नाही. तिच्या डोळ्यातलं प्रेम मी वाचल आणि तिला विचारलं. ती मुलगी लगेच हो पण म्हणाली,तिला तेव्हाच सगळ्या परिस्थितीची जाणीव करून दिलेली, तिला बोललेले,"परत विचार कर हवं तर, एका सैनिकाची बायको होणं म्हणजे रात्र दिवस डोक्यावर टांगती तलवार असल्यासारखं असतं. मनात नेहमी धाकधूक लागून राहते. उद्याचा दिवस कसा असेल सांगता येत नाही. प्रत्येक क्षणाला मन खंबीर करूनच जगाव लागत बघ." त्यावर ती म्हणालेली," मी तयार आहे सगळ्यासाठी. मी पूर्ण विचार करूनच निर्णय घेतलाय. उलट मी अभिमानाने सगळ्यांना सांगेन की माझा नवरा देशसेवा करतो. तो सैनिक आहे." तेव्हाच मला कळलेलं ही पोरगी तुझा संसार सुखाचा करेल. तिने तिच्या घरच्यांना पण तयार केलं आणि थाटामाटात लग्न पार पडलं. लग्नाचा आनंदही तुला जास्त वेळ घेता आला नाही बाळा. दोन दिवसातच महत्वाच्या मिशन साठी तुला बोलावणं आलं आणि तू गेलास. स्पृहाने ही परिस्थितीही छान सांभाळून घेतली. ती ना रडली ना चिडली तुझ्यावर. उलट आनंदाने म्हणाली मी इथे सांभाळते तुम्ही तिथे सांभाळा. खूप मोठं आणि खंबीर मन असावं लागतं सैनिकाच्या बायकोच. खरी लढाई तर त्या पण लढत असतात. महिनोमहिने तूमच्यापासून लांब राहून संसार सांभाळायचा असतो. खूप धाडस लागत यासाठी पण. मिशन संपून तू आलास तेव्हा जास्त दिवस सुट्टी होती. तेव्हा ते दिवस आपण खूप आनंदाने घालवले. स्पृहाच्या येण्याने घरात चैतन्य आलं होतं. नजर लागू नये असा छान तुमचा संसार चालू होता. त्यातच अजून आंनदाची भर पडली. काही दिवसांनी तुमच्या संसाराच्या वेलीवर "साहस" नावाचं फुल उमलल. खूप खुश होते सगळे इथे पण तो क्षण अनुभवायला तू इथे नव्हतास. बाळाला डोळे भरून पाहायला तू इथे नव्हतास. तुला फोनवर ही बातमी सांगितल्यावर तुला आनंदही झालेला आणि बाळाला भेटायला येता येत नाही म्हणून दुःखही वाटत होतं. साहस एक महिन्याचा झाल्यावर तू आलेलास. तोपर्यंत या फोनमुळे video calls नी तुझी आणि त्याची ओळख झालेली. बर झालं आता फोन पण असे आहेत की माणूस दूर असलं तरी जवळच वाटत. बाळाला पहिल्यांदा पाहून डोळे पाणावलेले तुझे. आणि त्यालाही सैनिकच बनवणार अस तू जाहीरही केलेलंस. सुट्टी संपेपर्यंत बाळाला सगळे बाळकडू पाजून गेलास. त्याला बोलायला यायला लागल्यावर तोही बोलायचं की मी माझ्या बाबासारखं शूरवीर होणार. तो शत्रूंना मारतो तस मी पण मारणार. त्याच्या त्या बोबड्या बोलण्यावर आम्ही खूप हसायचो. पुन्हा तू त्याच्या पहिल्या वाढदिवसालाच आलास आणि तेही त्याला सैनिक गणवेशच घेऊन. त्याच्याही नसानसांत सैनिक च व्हायचं अस भिनवत होतास. तुझंच रक्त होत ते मागे कस पडेल. तो झाल्यापासून मात्र तू हळवा झालेलास जरा. सुट्टी संपल्यावर निघताना पाय घुटमळायचे तुझे त्याच्या भोवती. पाय निघायचा नाही तुझा पण तू काढायचास. शेवटी देशसेवा आधी मग कुटुंब. त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला यायचास तू. साहस चा काहीतरी वेगळाच तोरा असायचा आणि तेव्हा. यावेळीही त्याच्या तिसऱ्या वाढदिवसाला तू येणार म्हणालेलास आणि यावेळी त्याचा वाढदिवस अनाथ आश्रम मध्ये करायच ठरलेलं. सगळी तयारी झालेली फक्त तू यायचा बाकी होतास. एक आठवडा आधी नेहमीसारखा सकाळी फोन वाजला स्पृहाने उचलला आणि समोरून काय सांगितलं माहीत नाही तिच्या हातातून फोनच निसटला. ती मटकन खाली बसली. साहस म्हणाला,"आई बाबाचा फोन आहे ना, बोलना मग". स्पृहा शांतपणे त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली," तुझा बाबा शहीद झाला बाळा". हे ऐकून आम्हा दोघा म्हाताऱ्यांचे अवसानच गळून पडले बघ. एकुलता एक आधार होतास आमचा तोही गेला. तुला वचन दिलेलं की रडणार नाही पण ते शक्यच नव्हतं रे. तुझ्या रोजच्या फोनची वाट बघण्यात तर आयुष्य पुढे सरकत होत आमचं आता ते थांबलेलं. आभाळ फाटलेलं त्यादिवशी. स्पृहाने खूप धीराने आम्हा दोघाना सावरलं. साहसला शहीद म्हणजे काय कळत नाही पण ती त्याला सांगते की तू आता खूप लांब लढायला गेलायस जिथून तू कधी येशील ते माहीत नाही. फार रडत बसलेलं तुला आवडायचं नाही म्हणून तिघांनी स्वतःला सावरून ठरल्या दिवशी साहसचा वाढदिवस अनाथ आश्रमात साजरा केला. तुझ्या इच्छे प्रमाणे त्यांना शाळेची पुस्तके,वह्या,गणवेश अशा गरजेच्या वस्तू भेट म्हणून दिल्या. साहस तुझ्या येण्याच्या रस्त्याकडे डोळे लावून बसलेला. नादान पोर ते,आशा असते त्याला की तू येशील. आम्ही त्याच्याकडे बघून जगतो आता. तू भरती झालास तेव्हा खूप जण मला म्हणायचे "काय तुमचा मुलगा एवढा हुशार तर डॉक्टर, इंजिनीअर नक्की होईल. ते सोडून सैन्यात काय जातोय तो. तुम्ही पण का त्याला नाही समजावत? किती कठीण असत आणि भरोसा नसतो तिकडे जीवाचा." पण मला फरक नव्हता पडत. मला अभिमान वाटायचा माझा मुलगा देशसेवा करणार. बोलणाऱ्यांची मुलं कुठेतरी उनाडकी,टवाळकी करत फिरायची. कसली नको ती व्यसनंही त्यांना लागलेली. तू त्यात नव्हतास. त्या वयात मूल मुलींच्या मागे लागतात तू देशसेवेच्या मागे लागून स्वतःला समर्पित केलेलंस देशासाठी तेव्हा.तू मिळवलेल्या मेडल्सनी, दहशतवाद्यांना घातलेल्या कंठस्नानानी, वरिष्ठांच्या प्रशंसेनेच सडेतोड उत्तरं तुझ्याकडे बोट दाखवणाऱ्यांना दिली. गर्व होता मला तुझा. तुझे बाबा तर छाती फुगवून सगळ्यांना सांगायचे, "मुलगा देशाचं रक्षण करतोय. त्याच्यासारखे हजारो जवान तिथे सीमेवर आहेत म्हणून आज आपण रात्री शांततेत इथे झोपतोय." तेही तू गेल्यावर थोडे शांत झालेत पण होईल हळूहळू सगळं नीट. तू काळजी नको करुस. साहसला आम्ही शूरवीर सैनिकच करु.

आम्हाला सर्वांना तुझा खुप अभिमान आहे. सगळ्यांना तुझ्यासारख तिरंगा मध्ये लपेटून मरण नाही येत रे. नशीबच लागत त्यासाठी. "मरावे परी किर्तीरूपी उरावे" हे वाक्य सार्थ केलस. माझी तर हीच इच्छा आहे की पुढचा जन्म पण तू माझ्याच पोटी जन्म घ्यावास आणि तेव्हाही एका शूर जवानाची आईच होण्याचं भाग्य मला मिळो. तू सुखी राहा बाळा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy