फिरकी
फिरकी
खूप जुन्या काळची गोष्ट आहे. जेव्हा शेती करतांना पारंपरिक पद्धतीनेच करावी लागत होती. बैल, लाकडाची औजारे, बारा बलुतेदार, शेत मजूर हे सर्व घटक शेतीसाठी उपयोगात यायचे. आजच्या सारखे तंत्रज्ञान त्या काळी उपलब्ध नव्हते. मात्र माणसं एकमेकांच्या उपयोगी पडायची, एकमेकांच्या साथीने कामं करायची. माणसांचं मन मात्र फार मोठ्ठ होतं. शेतात निघालेल्या प्रत्येक पिकांचा हिस्सा देवाला, गावाला, आलेल्या वाटेच्या वाटसरूला दिला जायचा. त्या काळची ही गोष्ट.
ज्वारीचे खळे सुरू होते. खळे म्हणजे काय हे आता कदाचित समजणार देखील नाही. ज्वारीची कणसे तयार झाली, काढणीला आली की, एका जागीचे गवत काढून तिथे पाणी शिंपडून ओले करायचे, त्याच्या मध्यभागी एक लाकूड रोवायचे, नंतर त्या लाकडा भोवती चारपाच बैलांना एका दोराने बांधून फिरवायचे. म्हणजे ती जागा एकदम टणक व्हायची. त्यानंतर त्या जागेला बैलाच्या, गायीच्या शेणाने घट्ट सारवायचे. वाळल्या नंतर स्वच्छ झाडून घ्यायचे. ती जी जागा असेल त्या जागेला खळे म्हटले जायचे. त्या खळ्यावर ज्वारीची काढलेली कणसे वाळत घालायची. वाळलेल्या कणसांवर पुन्हा बैलाची पात धरायची, बैलांना एका दोरात बांधून लाकडा भोवती फिरवायचे. कणसं बारीक झाली की त्यातून धान्य बाहेर पडायचे, मात्र त्यात असलेला कचरा वेगळा करण्यासाठी तिव्ह्याच्या (तिपाई) सहाय्याने ते वाऱ्याच्या दिशेने उफणून स्वच्छ करायचे. त्या तिव्ह्यावर उभे राहून एकजण ते उफणायचा, त्याच्या हातात पाटी भरून द्यायला आणि उफणतांना त्या धान्याच्या राशी वरील कचरा वेगळा करायला एक जण असायचा.
अशाच एका खळ्या वर पंकज आणि त्याची आई ज्वारी तयार करत होते. हवा चांगली सुटली होती. त्यामुळे काम जोरात सुरू होते. बाजूला ज्वारीची तयार झालेली रास दिसत होती, दिवस मावळतीला चालला होता, आभाळ भरून यायचा अंदाज दिसत होता. लवकर काम उरकावे म्हणून पंकज घाई करत होता. आणि तेवढ्यात पाच स्मशान जोगी येतांना दिसले. पंकजची आई घाबरली. या लोकांच्या बाबतीत तिने बऱ्याच काही उलट सुलट गोष्टी ऐकलेल्या होत्या. म्हणून तिला भीती वाटत होती. 'या लोकांच्या नादाला न लागलेले बरे' असे तिला वाटत होते. 'ते आल्या बरोबर त्यांच्या झोळीत पायली भर धान्य टाकून त्यांना वाटेला लावायचे' ठरवून तिने तसे पंकजलाही सांगितले. त्यामुळे ते आल्यावर त्याने लगेच एक टोपलीभर ज्वारी त्यांच्यातील एकाच्या झोळीत घातले.
"बेटा! भगवान तेरा भला करे." म्हणत त्याने पंकजला आशीर्वाद दिला. लगेच दुसरा जोगी पुढे आला आणि त्यानेही झोळी पुढे पसरली.
"महाराज, मैने जो जो देना था वो बाबा के झोली मे डाल दिया है। आप सभी का हिस्सा उसी मे है।" पंकज बोलला.
"नही बेटा! मेरा हिस्सा मुझे अलग से होना। उसके झोली से हम नही ले सकते।"
"तो बाबा! मेरा भी सून लो, मैने भगवान के नाम पर एक बार दिया है, दोबारा हम भी नही दे सकते।"
"बेटा! जिद नही करते, जो भी देना है दे दे हम चूप चाप चले जायेंगे।"
"बाबा! मैने एक बार दे दिया। आप अभी चुपचाप निकल जाये तो अच्छा होगा।"
इकडे पंकजची आई खूप घाबरली होती. तिला मागच्या वर्षीचा नर्मदे सोबत घडलेला प्रसंग आठवला,....
नर्मदा. गणपत रावांची पत्नी दुपारच्या वेळी एकटीच घरी होती आणि स्मशान जोगी दारावर आला. तिने त्याला भिक्षा वाढली पण तिच्या अंगावरचे दागिने बघून असामी श्रीमंत आहे हे जोग्याने ओळखले आणि नवऱ्याचा एखादा दागिना असेल तो दे म्हणाला. तिने नकार देताच, 'तुझ्या कुंकवाला धोका आहे' असे सांगून तिने आणलेल्या कुंकवाच्या डबीतले चिमूटभर कुंकू तिच्या हातावर टाकले, ते काळे झालेले होते. नर्मदा घाबरली. ती दागिना देणारही होती पण तेवढ्यात गणपत राव येतांना दिसले आणि तिने हात आखडला. जोगीही निघून गेला. पण जातांना गळ्यातल्या कवटीच्या माळे तील एका कवटी तून विचित्र आवाज काढून गेला. तेव्हा पासून नर्मदा वेड्या सारखेच करू लागली होती.
पंकजच्या आईला ते आठवले आणि ती आणखीच घाबरली. पंकजला म्हणाली,
"बाळा! देऊन टाक जे द्यायचे ते. साऱ्यांच्या झोळीत थोडे थोडे दे."
"आई! घाबरू नकोस. या
लोकांना घाबरायचे काहीच कारण नाही. आपण कुणाचे कधीच काही वाईट केलेले नाही. देव आपले काही वाईट करणार नाही." पंकज धीर देत बोलला.
"बेटा! तू अपने हाथोसे अपनी बुराई को बुला रहा है। तेरे इस करतुद का बुरा फल तुझे जरूर मिलेंगा। तेरे सभी ग्रह मै उलटे घुमा देता हुं। जरा इधर तो आना।" असे म्हणत जोग्याने एक बिडी तोंडात धरून शिलगावली आणि झुरके घेत झोळी मधून एक छोटीशी मुळी बाहेर काढली. पंकजला ज्वारीची रास तयार करायला सांगितली. एका ग्लासात पाणी घ्यायला सांगीतलं. आईचं काळीज फडफड करत होतं. पंकजला मात्र गंमत वाटत होती, त्याच्या जवळ त्या खेळाचं उत्तर होतं. आणि म्हणूनच तो बिनधास्त होता.
"देख बेटा! मै अभी मंतर पढुंगा तब तक तुने ये गिलास मे का पाणी धीरेसे ये बिडीके उपर डालना है।" असं म्हणत जोग्याने बिडीचा जोराचा झुरका मारला, ती मुळी त्या राशी वर उभी केली आणि बिडीचे थोटुक मुळीवर आडवे ठेवले.
जोगी मंत्र म्हणत होता, पंकज बिडीवर पाणी टाकत होता आणि बिडी उलट्या बाजूने फिरायला लागली. तशी पंकजची आई घाबरली. म्हणाली, "बाळा, अरे देऊन टाक. या लोकांच्या नादाला लागणं चांगलं नसतं."
"आई, काळजी करू नको. त्याला काय करायचे ते करू दे. त्याचे झाल्यावर मी बघ त्याचे ग्रह कसे उलटे फिरवतो ते." पंकज.
एवढ्यात मंत्र संपला, आणि पाणी टाकणे थांबवले तशी बिडी पण फिरायची थांबली. पंकजने थोडीशी माती जमा केली. आपल्या खिशातून एक मुळीचा तुकडा काढला. त्या मातीवर उभा केला.
"महाराज! आपने तो मंतर पढके घुमाया, मै बगर मंतर के ही घुमाता हूँ।" असे म्हणून त्या जोग्याकडून एक बिडी घेतली अन् त्या मुळीवर आडवी ठेवली. हळूहळू पाणी ओतायला सुरुवात केली तशी ती बिडीही उलटी फिरायला लागली. मग मात्र जोग्याला कळले, 'बच्चा पहूंचा हुआ लगता है' काही थोडेफार मिळेल तेवढे बघावे म्हणून तो आईला म्हणाला,
"माँ जी! बच्चा अभी नादान है। आपही कुछ दे दो।"
" बाबाजी! आपकी झोळी मे जो डाला है वो भी वापस कर दो और जलदी से यहासे खिसको नाही तो मुझे ये तिव्हे पैर निकलना पडेगा।" पंकज बोलला. तसे ते सर्व जोगी उठून चालते झाले. पंकजच्या आईला अजूनही भीती वाटत होती. ते जोगी निघूम गेल्यावर आईने बाजूच्या खळ्यावरून रामरावांना आवाज दिला.
थोड्याच वेळात रामराव तेथे हजर झाले. पंकजच्या आईचा घाबरलेला चेहरा बघून त्यांनी विचारले,
"का हो वहिनी, काय झालं?"
"भावोजी, बघा ना या पंकजने काय करून ठेवलं ते. त्या जोग्यांच्या नादाला लागू नको म्हटलं तरी ऐकलं नाही. त्यांना काही द्यायच्या ऐवजी हाकलून दिलं. आता त्यांनी काही केलं म्हणजे?" आईचा काळजीचा प्रश्न.
"काय पंकज! आई म्हणते ते खरं आहे का?"
"हो काका! पण घाबरू नका. काही म्हणता काही होणार नाही. त्यांचा बंदोबस्त केला मी ही."
"काय केलंस तू?" रामराव.
"मी त्याचे ग्रह उलटे फिरवले."
"ते कसे काय?"
यावर पंकजने झालेली घटना सविस्तर सांगितली.
"पण तुला कसं सुचलं हे असं करायला?"
"काका! आपल्या शेतात कुसळे गवत आहे ना, त्या गवताच्या कुसळाला पीळ पडलेला असतो वाळतांना. अन् मग जेव्हा त्यावर पाणी पडते, तेव्हा तो पीळ उकलतो त्यामुळे ते फिरते. हे पाहिलं अन् मला प्रयोग करून पहावासा वाटला. मी लगेच आराटीची लांब मुळी काढली, तिला पीळ देऊन वाळवली आणि तिचे छोटे छोटे तुकडे करू खिशात ठेवले. आज ते कामी आले. त्या जोगड्याची जिरवता आली."
"शाब्बास! पंकज, आमच्याही डोळ्यावरचा पडदा हटला बघ. या लोकांची खूप भीती वाटत होती आम्हाला, त्याचा हे लोकं फायदा घेत होते. आता भ्यायचं काही कारणच राहिलं नाही." असं म्हणून पुन्हा एकदा पंकजच्या पाठीवर मस्तपैकी शाब्बासकीची थाप मारून रामराव निघून गेले.
पंकजच्या आईने त्याला जवळ घेतलं, तोंडावरून मायेनं हात फिरवला आपल्या डोक्यावर बोटं मोडली, त्याची पदरानं दृष्टही काढली.
**********