Pandit Warade

Drama Tragedy

3  

Pandit Warade

Drama Tragedy

घुसमट-११ (दिव्याखाली अंधार)

घुसमट-११ (दिव्याखाली अंधार)

4 mins
18


  "काय केलं काय आयुष्यत आमच्या साठी?" विठ्ठल महाराजांची रखमा तावतावाने बोलत होती. 


  कारण फारसं काही नव्हतं. भाजी चविष्ट झाली नाही म्हणून म्हणून दोघांमध्ये वादावादी सुरू होती.


   "मी एवढे पैसे आणून देतो घरात, ते कुठे जातात? साधी भाजीही नीट करता येत नाही का?" महाराज म्हणत होते. 


  "हो ना! तेवढाच खर्च आहे ना. घरात आणखी लागतं दुसरं? मुलाच्या शाळेचा खर्च, पुस्तकांचा खर्च, कपडे लत्ते, पाव्हणा रावळा, कशा कशालाच खर्च लागत नाही. सारं वरच्यावर वरच होतं ना! कधी घातलं घरात डोकं? कधी विचारलं काय करतीये? कशी करतीये? कधी मुलाच्या अभ्यासाचं पाहिलं? कपड्यालत्त्याचं पाह्यलं?" रखमाचा उपरोधिक सवाल


  "अरे, घरदार सोडून आठ आठ दिवस, कधी कधी महिना महिना बाहेर राहिलो. लोकांच्या घरी तुकडे मोडले. ते कोणासाठी?" विठ्ठल महाराज चिडून विचारत होते. 


  "चांगलं चुंगलं खायला मिळतं, राहण्याची सोय होते, मानसन्मान मिळतो, आणि वरून पैसाही. म्हणून हिंडता टाळ कुटत." महाराजांचा मुलगा संतोष देखील पतीपत्नीच्या भांडणात सामील झाला. 


  "व्हय नाही तर काय? कुठं हरिनाम सप्ताह तर कुठे पारायण, पायी वारी काय? दिंडी काय? सकाळी नाश्ता, दुपारी भोजन, रात्री मिष्टान्न भोजन. असं असल्यावर घरच्या जेवणाची काय चव लागणार? मग घरी करायची चीडचीड." मुलाची साथ मिळताच रखमाच्या बोलण्याला आणखीच धार चढली.


   हे असं अधून मधून रोजच घडायला लागलं. आणि महाराजांचा जीव वैतागायला लागला. कधी कधी तर संन्यास घेऊन कुठंतरी निघून जावंसंही वाटू लागलं. परंतु घराचा मोह मात्र सुटत नव्हता. आणि म्हणून आतल्या आत कुढत बसण्या शिवाय गत्यंतर नव्हतं. बाहेर कितीही मान सन्मान मिळत असला तरी तो एका ठराविक काळापर्यंतच मिळणार आहे हे त्यांना चांगलं ठाऊक होतं. वय झालं, हिंडता फिरता येईनासं झालं की मग घराशिवाय पर्याय राहणार नाही. राग राग करून का होईना बायको आणि मुलगाच आपला सांभाळ करणार आहे हे त्यांना चांगलं ठाऊक होतं.


    विठ्ठल महाराज! आपल्या आई वडिलांचं एकुलतं एक अपत्य. लाडात वाढलेलं. त्यामुळं कष्टाचं काम कधीच केलं नाही. शाळा अन् घर याशिवाय दुसरं काही माहीत नाही.


   आई वडील बिचारे मेहनत करून स्वतःचं आणि मुलाचं पोट भरत होते. मात्र विठ्ठलला चांगले शिक्षण देण्यासाठी धडपडत होते. त्यातच विठ्ठलला भजनाची खूपच आवड होती. कुठंही भजनाचा कार्यक्रम असला की विठ्ठल तिथं हमखास हजर असायचाच. शाळेतही १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला विठ्ठलचं देशभक्तीपर गीत लोकांच्या हृदयाला हात घालायचं. विठ्ठलाच्या या गुणांमुळं तो शिक्षक वृंदाचा लाडका, आवडता विद्यार्थी. प्रत्येक वर्षी त्याचा वर्गातला पहिला क्रमांक कधी चुकला नाही. तीच परंपरा त्याने दहावीतही जपली. दहावीच्या परीक्षेत त्यानं गुण मिळवले. शाळेतून तर पहिला आलाच आला परंतु तालुक्यातूनही सर्वप्रथम आला. एकुलता एक मुलगा, शिक्षणासाठी बाहेरगावी कसा ठेवायचा? बरं नाही बाहेर पाठवला तर त्याचं शिक्षण कसं व्हायचं? आईबापांच्या जीवाला काळजी वाटू लागली. परंतु मुलाच्या भवितव्यासाठी त्यांनी काळजावर दगड ठेवला. त्याला तालुक्याच्या कॉलेजमध्ये पाठवलं. विठ्ठलाचं उच्च शिक्षण सुरू झालं. परंतु त्याचं मन काही तिथं रमत नव्हतं. गावात त्याला भजनाची आवड होती. इथं तसं काही नव्हतं. त्याचं मन लागेना. तो उदास उदास राहू लागला. त्याचे एक दोन मित्र त्याचे मन वळवण्याचे प्रयत्न करत होतेच. अशातच त्याच्या कॉलेजचे स्नेह संमेलन ठरले. मित्रांनी या संधीचे सोने करायचे ठरवले. त्यांनी स्नेह संमेलनच्या प्रभारी प्राध्यापकांना भेटून विठ्ठलचं नांव संगीत संध्या मध्ये समाविष्ट करायला सांगितले. संगीताच्या प्राध्यापकांनी पंधरा दिवस अगोदरच प्रॅक्टिस सुरु केली. त्यालाही त्याच्या आवडीच्या क्षेत्रात काम करतांना मजा येऊ लागली. 


   स्नेह संमेलनात संगीत संध्या चांगलीच गाजली. त्यातही विठ्ठलचं देशभक्तीपर गीताचे गायन खूपच चांगले झाले. रसिकांनी त्याला भरभरून टाळ्यांचा प्रतिसाद दिला. आणि विठ्ठल कॉलेजमध्ये रमायला लागला. 


  लागोपाठ दोन वर्षे (अकरावी आणि बारावी) स्नेह संमेलन विठ्ठलनं गाजवलं. मात्र तिसऱ्या वर्षी स्नेह संमेलन प्रभारी प्राध्यापक बदलले. त्यांनी विठ्ठलचं प्रभुत्व कमी करण्या साठी वेळेचं कारण देऊन 'संगीत संध्या' वगळली. त्या जागी परिसंवाद ठेवला. त्यानं विठ्ठलचा इगो (अहं) दुखावला आणि त्याने तडकाफडकी कॉलेज सोडलं. त्याच्या मित्रांनी त्याला खूप समजावलं परंतु त्याने कॉलेजमध्ये शिकायचं नाकारलं. त्याच ते पदवीचे पहिलं वर्ष असंच वाया गेलं.  


   एक वर्ष वाया घालवून विठ्ठलनं दुसऱ्या एका कॉलेजात प्रवेश घेतला आणि तिथं संगीत हा विषय घेऊनच शिकायला सुरुवात केली. मुळचीच आवड असल्यामुळे तो सहजच संगीत विशारद झाला.  


   संगीत विशारद होऊन विठ्ठल गावी आला. गावानं त्याचा सत्कार केला. त्या सत्कारा साठी त्याचे मामाही आलेले होते. त्यांनी रात्री जेवण झाल्यावर विठ्ठलच्या लग्नाचा विषय काढला. विठ्ठल नाही नाही म्हणत असताही आई वडिलांच्या आग्रहामुळे त्याला रखमा सोबत लग्न करावे लागले. 


   विठ्ठलचं मन फार काळ संसारात रमलं नाही. संतोषच्या जन्मानंतर विठ्ठल अध्यात्माकडे वळला. एका नावाजलेल्या महाराजांसोबत तो वादक म्हणून जाऊ लागला. थोड्याच दिवसात तो चांगलाच प्रख्यात झाला. काही दिवसात विठ्ठलचा विठ्ठल महाराज झाला. कार्यक्रमाच्या निमित्तानं गावोगाव फिरणं होऊ लागलं. मान सन्मान आणि बऱ्यापैकी मानधनही मिळू लागलं. आठ पंधरा दिवसात महाराज घरी यायचे. मानधनात मिळालेले पैसे घरी द्यायचे. रखमा त्या पैशात घर चालवायची तसेच मुलाचं संगोपन करायची. बऱ्यापैकी घर चालत होते. 


  कालांतराने विठ्ठल महाराज जास्तीत जास्त वेळ बाहेरच राहू लागले. घराकडे दुर्लक्ष होऊ लागले. पती सहवासा साठी आसुसलेली रखमाचा स्वभाव चिडचिडा व्हायला लागला. महाराज घरी आले की, तिची चिडचिड वाढायची. घरात कुरबुर व्हायला लागली. महाराज जास्तीत जास्त बाहेर राहू लागले. बाहेरच्या माणसांना अध्यात्म समजावणाऱ्या महाराजांना घरच्या लोकांना मात्र समजावता आले नाही. जगात जीवन जगताना प्रेमाने जगायला सांगणाऱ्या विठ्ठल महाराजांना घरी मात्र प्रेम करता आले नाही किंवा समजावता आले नाही. त्याचाच परिणाम आता त्यांना भोगावे लागत होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama