Pandit Warade

Comedy Tragedy Inspirational

3  

Pandit Warade

Comedy Tragedy Inspirational

सरिता-५ (गंगूचं लग्न)

सरिता-५ (गंगूचं लग्न)

5 mins
164


  एक दिवस जामखेडचे सरपंच, सज्जनराव आपल्या चार पाच साथीदारां साहित, मुलाला घेऊन लाडक्या चिरंजीवा साठी गंगूला मागणी घालायला आले. गावचे सरपंच, पन्नास एकर जमिनीचे धनी, मुलगा एकुलता एक, घरी नोकर चाकर, एवढी तगडी असामी स्वतः होऊन चालत आली, नकार द्यायला काही कारण नव्हतं. बरं मुलगाही काही वाईट नव्हता. दिसायला सुंदर. गव्हाळ रंगाचा, भरदार छाती, पिळदार शरीरयष्टी, पाहता क्षणीच कुणाच्याही नजरेत भरावा असा. गंगूलाही तो आवडला होता. हो म्हणजे काय तो ही आला होता ना आपल्या वडिलांच्या, काकांच्या, मामांच्या सोबत मुलगी बघायला. त्या काळी जरी ती पद्धत नव्हती तरीही. त्या काळात काका, मामा, वडील, इत्यादी जायचे, मुलगी बघायचे. पसंती ठरली की वरात घेऊन यायचे आणि लग्न लावून मुलगी घरी घेऊन यायचे. परंतु मोठ्या लोकांच्या साऱ्याच गोष्टी मोठ्या असतात. त्यांनी काही केलं तरी चालतं. इथेही नवरा मुलगा बघायला आला याचं कुणालाच काही वाटलं नाही. दुसरा कुणी असता तर त्याला किती नावं ठेवली असती. कदाचित मुलगी द्यायलाही नकार दिला असता. परंतु संपत्तीच्या जोरावर सारे दोष झाकले जातात म्हणतात ना तसेच इथे झालं. लग्नाची देण्या घेण्याची बोलणी झाली. एवढे श्रीमंत स्थळ असूनही 'हुंडा नको'चा सज्जनरावचा आग्रह होता. म्हणून हुंड्याच्या ऐवजी पाच तोळ्याचे लॉकेट नवरदेवाच्या गळ्यात घालून द्यायचे ठरले. अशा तऱ्हेने गंगूच्या लग्नाचा मुहूर्तही ठरला. 


   मग काय सारीच धावपळ. एक दिवस मुला कडचे दोन क्रूझर भरून माणसे आली. कुंकवाचा कार्यक्रम ठरला होता. भव्य मंडप घातला गेला. डेकोरेशनही खूप छान केलेले होते. पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था शाळेच्या व्हरांड्यात केलेली होती. मंडपात सारे पाहुणे जमले, गावकरी जमले. देवबाप्पाला बोलावले गेले. ते आले. आसन सजवलं. आणि लगेच नवऱ्या मुलीला बोलावलं गेलं. मंत्रांच्या जयघोषात गंगूचे वधू पूजन झाले. तिच्या ओटीत कर्णफुले, मोत्याची नथ, पायातले चैन, पाटल्या इत्यादी दागिने मिळाले. साऱ्या बायका तिच्या भाग्याचा हेवा करत होत्या. तिला सासरच असे श्रीमंत मिळाले होते. गंगू कुंकवाची साडी नेसून, दागिने घालून मांडवात आली तिचे पूजन करून तिच्यावर अक्षता टाकल्या गेल्या. ती उठून गेल्यावर सर्व मंडळीने शाळेच्या व्हरांड्यात सुग्रास भोजनावर ताव मारला. जेवण झाल्यावर पानसुपारी झाली. आलेल्या पाहुण्यांचा रुमाल टोपी आणि नारळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळेस काही आताच्या सारखे डबे द्यायची प्रथा नव्हती. केवळ पुरणपोळी आणि त्यावर भजे किंवा रव्याचे लाडू बांधून दिले जात असत. इथेही पुरणपोळी आणि लाडूंची शिदोरी बांधून दिली. टिळ्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करून जामखेडची मंडळी परत गेली.


  ठरल्या प्रमाणे टिळा घेऊन जांभूळखेडची मंडळी जामखेडला गेली अन् तिथली व्यवस्था, तो बडेजाव, सज्जनरावांचा वाडा सारे काही बघून भारावून गेली. पाच हजार स्केअर फुटाचा भव्य वाडा त्यांची श्रीमंती दाखवत उभा होता. समोरच्या बाजूला मोठ्ठे प्रवेशद्वार, प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला बैठका. एक स्वतः सज्जनरावांची बैठक किंवा सरपंच कार्यालयच म्हणा ना. त्यात एका बाजूला एका छोट्या खोलीत त्यांचे एक कपाट होते ज्यात महत्वाचे दस्तऐवज ठेवलेले असायचे. दुसऱ्या बाजूच्या खोलीत छत्रपती शिवरायांचे एक भव्य तैलचित्र लावलेले होते. तेथेच तुळजा भवानी मातेची मूर्ती स्थापन केली होती. मूर्तीवर मंद दिव्यांचा प्रकाश झोत टाकलेला होता. सज्जनराव रोज त्या मूर्तीची आणि जाणत्या राजांच्या प्रतिमेची पूजा करूनच आपल्या दिवसाची सुरुवात करत असत. ती मूर्ती समोरच्या बैठकीतील लोकांनाही सहजतेने दिसत होती. याच बैठकीत मध्यभागी एक नक्षीदार गालिचा अंथरलेला होता त्यावर एक भव्य असे आसन होते. ज्यावर तिनही बाजूला टेकण्यासाठी रेशमी लोड होते. बैठकीच्या दोन्ही कोपऱ्यात त्या आसनावर हवा मारत असलेले पंखे बसवलेले होते. त्यांचे बटन मात्र त्या आसना जवळच होते. त्याच्या दुसऱ्या बाजूच्या बैठकीत गावातील शे दीडशे माणसं सहजतेने बसू शकतील एवढी भव्य जागा. त्यांना बसण्यासाठी टाकता येतील एवढ्या गाद्या बाजूला घड्या करून रचून ठेवलेल्या होत्या. खाली मलमली गालिचा अंथरलेला होता. जांभुळखेडच्या मंडळींना मुद्दामच चहापाना साठी या बैठकीत आणले गेले होते.


  वाड्यात मध्यभागी भव्य असे मैदान होते. प्रवेश द्वाराच्या अगदी समोरच्या बाजूला मोठ्ठा डायनिंग हॉल होता. ज्याच्या मध्ये मोठ्ठा डायनिंग टेबल, बाजूला नक्षीदार खुर्च्या, मंद प्रकाशाचे दिवे, वरती सुंदर असे झुंबर, खोलीच्या चारही कोपऱ्यात कोकिळेच्या मुर्त्या बसवलेल्या होत्या ज्यात स्पीकर बसवलेले होते. त्यावर मंद असे संगीत सुरू असायचे असे वाटायचे कोकिळाच गात आहेत. डायनिंग हॉलच्या एक बाजूला किचन रूम तर दुसऱ्या बाजूला स्टोअर रूम होते. मैदानाच्या दोन्ही बाजूंनी तीन तीन सारख्याच दिसणाऱ्या खोल्या होत्या. एका बाजूच्या मधल्या खोलीत भव्य असे स्नानगृह होते. बाजूच्या एका खोलीत पुरुषांचे तर दुसऱ्या खोलीत महिलांचे कपडे असलेले कपाटं होते. कपडे बदलण्यासाठी ऐसपैस जागा, संपूर्ण भिंत व्यापून असलेले आरसे दोन्ही खोल्यां मध्ये होते. दुसऱ्या बाजूला असलेल्या तीन खोल्या या शयन गृह होत्या. हे सारे वैभव गंगूचे वडील संपतराव आणि त्यांचे सख्खे आणि चुलत भाऊ, तसेच आणखी दोघे तिघे या सर्वांनी आपल्या डोळ्यांनी बघितले आणि त्यांना भरून पावल्या सारखे झाले. बैठकीतून उठून मंडळी परत मांडवात येऊन बसली तेव्हा आपापसात या वैभवाचीच चर्चा सुरू होती. 


  जांभुळखेडच्या मंडळीत एक दोघे जण जरा जास्तच हुशार किंवा आडव्यात शिरणारे होते. तसे ते सर्वच ठिकाणी असतात म्हणा. हे तिघे जण गुलाबराव, माणिकराव, आणि रावसाहेब लघुशंकेच्या निमित्ताने बाहेर गेले. तिकडे एका झाडाखाली जामखेडचे दोघेजण मद्यपान करत बसलेले दिसले. गुलाब रावनेही आपल्या सोबत आणलेली दारूची बाटली काढली. त्या पाच जणांची लगेच मैत्री जमली. _'एवढ्या वैभवाचा धनी असलेला सज्जनराव पाच तोळे सोन्यावर कसा काय राजी झाला असेल?'_ ही शंका गुलाबरावच्या डोक्यात होतीच, ती इथे निरसन करून घेण्याची संधी आयतीच चालून आली होती. नशेतल्या गप्पांमध्ये सज्जनरावांचा मुलगा जरासा नशेबाज आणि मित्रांच्या गराड्यात वहावलेला असल्याचे समजले. पण श्रीमंतांचे चोचले असेच असतात म्हणून या तिघांनी फारसे मनावर घेतले नाही. टिळ्याचा कार्यक्रम संपला. पान सुपारी झाली आणि बस्त्याचा दिवस ठरला. त्या दिवशी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन बस्ता बांधायचा असं ठरलं. शिदोरी घेऊन मंडळी परत फिरली.


   बस्त्याला जाणंही त्या काळी फारसं सोप्प नव्हतं. भावकीतल्या प्रत्येक घरातल्या एका माणसाला तसेच मामा, मावसे यांना घेऊन जावे लागायचे. या साऱ्यांना तिथे चहापाणी, जेवण खाण इत्यादी सारे काही व्यवस्थित असावे लागायांचे. दुकानात गेल्यावर एवढ्या साऱ्यांना बघूनच दुकानदार यांच्या चहाची आणि पाण्याचीही सोय करायचा. परंतु या साऱ्यांची वसुली तो त्या बीलात करून घेत असे. हे सारे कळत असूनही करावेच लागत होते. नाहीतर भावकी रुसायची. तर या सर्वांना घेऊन एक दिवस दोन्ही कडची मंडळी एकेक टेम्पो भरून जिल्ह्याला गेले. गेल्या बरोबर पहिल्या प्रथम एका हॉटेल मध्ये चहापान करण्यासाठी थांबले असता, जामखेड कडील एक जण म्हणाला. 


  आपल्याला चहा नको बुवा, सकाळी घरून निघायची फारच घाई केली. मी काही खाल्ल्या शिवाय घरच सोडत नसतो. पहिली बार आज भुकेलाच आलो. आपल्याला काही तरी खायला पाहिजे."


   दुसऱ्यानेही त्याचीच री ओढली. "हो! हो! मलाही नाश्त्या शिवाय दम धरवत नाही आता."


   जांभूळखेडची मंडळी तरी कशाला मागे राहतील? गुलाबराव म्हणालेच,


  "शुभकार्याला आलो काही तरी गोड व्हायलाच पाह्यजे."


  असं सर्वांच्याच मनात होतं. फक्त कुणी तरी वाचा फोडणं महत्वाचं होतं. ते झालं. चिवडा, बर्फी आणि चिवडा मागवून सर्वांचा नाश्ता झाला. पान, सुपारी झाली. दोन्हीकडच्या निवडक पाच पाच लोकं कापडाच्या दुकानात शिरले आणि बाकीचे दरडोई दोन रुपये भरून (अर्थातच दोन्ही यजमानांकडून) एका खोलीत बिडी, सिगारेटच्या धुराचे वलय सोडत गप्पा मारत बसले. अर्थातच गप्पांना काही विषयाचे बंधन नव्हते. कुठलाही विषय चालायचा, तसा इथेही चालला. म्हणतात ना, _'निंदा स्तुती जणांची, वार्ता वधू धनाची'_ या न्यायाने गप्पा सुरु झाल्या. आतील मंडळी बस्त्याचे आपापले केसरी रंगाच्या कापडात बांधलेले गाठोडे घेऊन बाहेर आले आणि आपापल्या टेम्पोत ठेऊन बसले. या सर्वांना टेम्पोत घेतले आणि घराच्या रस्त्याला लागले. अशा रीतीने गंगूच्या लग्नाचा बस्ता बांधून झाला.


  आणि बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy