घुसमट-१० (अनिता)
घुसमट-१० (अनिता)
सज्जन हो आज आपण या सभागृहा मध्ये एका अशा व्यक्तीचा सत्कार करतो आहोत, की ज्या व्यक्तीच्या कर्तृत्वामुळे आपल्या गावाचं नाव सर्व दूर पसरते आहे. अनिता हे एक अनमोल असं रत्न या गावाला मिळालं आहे. या गावाचं भाग्य खरोखर थोरच म्हणावं लागेल. चिखलातून सुर्य तेजाची अभिलाषा धरत वर येणाऱ्या कमळा प्रमाणे अतिशय गरीब घराण्यात जन्म घेऊन, हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन अनिता आज संस्कृती संवर्धन या शिक्षण संस्थेत नीतिशास्त्र विभाग सांभाळणारी प्रमुख व्यक्ती बनलेली आहे.
बालपणी बापाची छत्र छाया हरवलेली अनिता आईबरोबर दुसऱ्याच्या शेतात जाऊन रोज मजुरी करत असे. घरच्या धुण्या भांड्याचं काम करत ती शिक्षण घेत होती. रोज मजुरीच्या पैशातून घरखर्च भागवून शाळेची फीस अन् वह्या पुस्तकांचा खर्च भागवत होती. अत्यंत हलाखीच्या अशा परिस्थितीत उच्च शिक्षण घेतले. चारच दिवसां पूर्वी आपणा सर्वांच्या साक्षीने तिचे लग्न पार पडले. या ठिकाणी तिचे पती, आपल्या गावाचे जावई, श्री. रमेश पाटीलही हजर आहेत. तिच्या सोबत आपण त्यांचाही सत्कार करत आहोत. या जोडीने मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे. त्यांचा सत्कार आपल्या गावचे पोलीस पाटील सखाराम पंत यांनी करावा. अशी मी त्यांना विनंती करतो.
अनिताने अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी, त्या साठी तिला ईश्वर सदबुद्धी आणि शक्ती देवो. हीच माझ्या आणि माझ्या, परिवारा तर्फे, तसेच संपूर्ण गावाच्या वतीने ईश्वर चरणी प्रार्थना करतो." असं म्हणत सरपंच आपल्या जागेवर जाऊन बसले.
"आमच्या भगिनी अनिता ताई आणि त्यांचे मिस्टर श्री. रमेश पाटील यांनी मंचावर यायचं आहे. तसेच त्यांचा सत्कार करण्यासाठी आपले आबा, गावचे पोलीस पाटील श्री. सखाराम पंत यांना विनंती करतो की, या जोडीचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करावा. आपण सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं." सूत्र संचालकाचे शब्द टाळ्यांच्या गजरात लुप्त झाले.
आबांनी अनिता आणि रमेशचा सत्कार केला. जवळपास दहा मिनिटं नुसत्या टाळ्याच वाजत होत्या.
"यानंतर ज्या शाळेत अनिता ताईनं शिक्षण घेतलं त्या शाळेचे हेडमास्तर, गुरुवर्य करकरे गुरुजींनी आपली शिष्योत्तमा अनिता ताईंना मानपत्र बहाल करावे आणि आशीर्वादपर दोन शब्द सांगावे. अशी मी त्यांना विनंती करतो" सूत्र संचालकाच्या या वक्तव्या वर करकरे गुरुजी उठून मंचाकडे निघाले. आज त्यांच्या चाली मध्ये सर्वांना वेगळेपण जाणवत होते. त्यांची छाती अभिमानानं फुलून आली होती. त्यांनी अभिमानानं ते मानपत्र अनिताला प्रदान केले. आणि डोळे पुसत बोलायला सुरुवात केली,
"गावकरी मंडळींनो, मी आज अतिशय खुश आहे, एवढा खुश आहे की, माझं हृदय अत्यानंदानं भरून आलेलं असल्यामुळं मला बोलणं कठीण होत आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत अनिता पुढं पुढं जात राहिली. अनेक गहन संकटांवर मात करत तिनं यशाची पायरी गाठली. तिच्या या यशात तिच्या आईचा तसेच तिच्या एका चुलत मेहुण्याचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. उच्च शिक्षणा साठी तिला तिच्या चुलत मेहुण्याचा आधार घ्यावा लागला. त्यांनीही तो स्वखुशीनं नि मोकळ्या मनानं दिला. म्हणून अनिताचं उच्च शिक्षण होऊ शकलं. त्यांनाही आज इथं बोलावलं असतं तर फार बरं झालं असतं. त्यांचाही सत्कार व्हायला पाहिजे. समाजा मध्ये असे लोकं तयार व्हायला पाहिजेत. 'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ.' या वचना प्रमाणे अशा गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार कुणी तरी उचलला पाहिजे. मी करकरे गुरूजी अत्यंत अभिमानाने सांगतो की, येत्या काळात असे सज्जन पुरुष लाभत राहतील आणि अशा गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भर उचलतील. अनिताच्या हाती मुलीच्या शिक्षणाचे सूत्र असणार आहे. 'संस्कृती संवर्धन' ही संस्था मुलींचे शिक्षण आणि संस्काराचे काम करत आहे. त्यातील अत्यंत महत्वाचा असा विभाग म्हणजे 'नीतिशास्त्र विभाग' आजपासून अनिताच्या हातात असणार आहे. ती तो अगदी मनापासून सांभाळील यात शंकाच नाही. तिच्या हातून चांगल्या मुली घडतील याबद्दलही शंका घेण्याचे कारण नाही.
अनिताच्या कार्यासाठी या करकरे गुरुजीचे मनापासून आशीर्वाद आहेत. देव तिला सद्बुद्धी आणि दीर्घ आयुष्य देवो. ही परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो." असं म्हणत गुरुजी बोलायचे थांबले. धोतराच्या सोग्यांनी त्यांनी आपले डोळे पुसले आणि आपली जागा घेतली.
गर्दीतून कुणी तरी, अनिताचे मेहुणे प्रकाश हजर असल्या बद्दल सूचित केले. म्हणून त्यांनाही मंचावर बोलावून त्यांचाही सत्कार केला गेला.
प्रकाशचा सत्कार होतांना अनिताच्या चेहऱ्या वर मात्र आनंद दिसत नव्हता, निर्विकार चेहऱ्याने तिने तो सत्कार बघितला. अशा माणसाचा सत्कार करण्याची खरंच गरज आहे का? तिला मनातून वाटत होतं. शिक्षणाच्या खर्चाच्या बदल्यात तिला खूप काही करावं लागलं होतं. खूप काही भोगावं लागलं. ती भूतकाळात शिरली.
अनिता! कलावती आणि किसनरावची लाडकी एकुलती एक मुलगी. घरची परिस्थिती अगदीच गरिबीची. रोज मजुरी करून त्यांचं पोट भरायचे. अशातच अनिताच्या पाचवीच्या दिवशीच वडील किसनरावचा अचानक मृत्यू झाला. कलावती वर दुःखाचा डोंगर कोसळला. जगण्यात काही अर्थ उरला नव्हता. पण अनिताच्या गोंडस चेहऱ्या कडे पाहून तिने जीवाला उभारी दिली.
अनिता लहानची मोठी होत होती. कलावती जमेल तसं तिला सांभाळत स्वतःच पोट भरत होती. त्या बरोबरच अनिताचं शिक्षणही सुरू होतं. गावात दहावी पर्यंत शाळा होती. तो पर्यंत कुठल्याही परिस्थितीत तिनं अनिताच्या शिक्षणात कमी पडू दिलं नाही. अनिताला लवकरच समज आली. तशी तीही आईच्या कामात हातभार लावायला लागली. परिस्थिती सारखी शाळा जगाच्या पाठीवर दुसरी कुठेच नसेल. अनिताचं शिक्षण अनुभवाच्या शाळेतच होऊ लागलं. आई सोबत दुसऱ्याच्या शेतात निंदन,
खुरपण करत करत अनिता दहावीपर्यंत शाळा शिकली. दहावी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली आता पुढच्या शिक्षणासाठी काय करावे? कुठे जावं? असा प्रश्न तिच्या समोर उभा राहिला. आई काळजी करत होती.
'पुढे शिकायला पाठवावं की नाही? पाठवावं तर पैसा कुठून आणावा? तिची राहण्याची व्यवस्था कुठे करावी? असे प्रश्न कलावतीला सतावत होते. अशातच कलावतीची पुतणी सुषमा जी पुण्याला राहत होती. ती तिच्या मिस्टरांसोबत, प्रकाश सोबत माहेरी आलेली होती. प्रकाशची नजर अनिता वर पडली. अनिताच्या आईची परिस्थिती बघून त्याने मदतीचा हात पुढे केला. पुढच्या शिक्षणासाठी अनिता पुण्याला गेली.
आई दर महिन्याला पैसे पाठवा पाठवायची. अनिता बहिणीला घरात काम करू लागायची. अनिता आल्यापासून त्यांच्या घरातली मोलकरीण परत कामाला आलीच नाही. कदाचित प्रकाशनेच ती व्यवस्था केलेली असावी. तिच्या पगारावरचा पैसा अनिता साठी वापरला जायचा.
अनिताचं शिक्षण सुरू झालं. बहिणीच्या घरी खायला प्यायला कमी नव्हती. प्रकाश खायला खूप काही आणायचा. वर्षभरातच अनिताची तब्येत बऱ्यापैकी सुधारली. वयाबरोबर शरीरही फुलायला लागलं. ती जस जशी वयात येत गेली, तशी प्रकाशाची नजर बदलत बदलत गेली.
प्रकाशची एक बहीण गीता मुंबईला राहायची. ती एकाएकी आजारी पडली. तिला दवाखान्यात ऍडमिट करावे लागले. तिच्या जवळ थांबायला कोणी बाई माणूस नव्हतं. म्हणून सुषमाला मुंबईला जावं लागलं.
सुषमा मुंबईला गेल्यानंतर प्रकाश आणि अनिता दोघेच घरी होते. प्रकाश ड्युटीला जायचा. अनिता कॉलेजला जायची. संध्याकाळी आल्यावर मात्र तिला प्रकाशची भीती वाटायची. कारण त्याच्या नजरेतला भाव तिला समजायला लागला होता. प्रकाश सुद्धा जास्तीत जास्त वेळ घरात घालवायला लागला. तिच्या भोवती राहायला लागला. शेजारच्या ताईच्या मुलीला, अनिता झोपायला सोबत घेऊन येऊ लागली. प्रकाशला ते नको होतं. परंतु अनिता साठी त्याला नाही म्हणता येत नव्हतं.
एक दिवस ती शेजारची ताई तिच्या माहेरी गेली. मुलीलाही सोबत घेऊन गेलेली होती. त्या मुळं आज घरात प्रकाश आणि अनिता दोघेच होते. जेवण झाले. अनितानं मुद्दाम भांडे घासायचं काम मागं ठेवलं होतं. तिला वाटत होतं, माझी सर्व कामे आटपे पर्यंत प्रकाश झोपून जाईल. तोवर प्रकाशनंही झोपेचं सोंग घेतलं. पण त्याच्या मनात आज काही वेगळंच होतं. प्रकाश पलंगावर झोपला होता. बाजूलाच अनिता खाली अंथरून टाकलं होतं. आणि ती झोपेची आराधना करू लागली. तिला झोप येत नव्हती. मनात काहूर माजलं होतं. भीती वाटत होती.
बऱ्याच वेळा नंतर तिला झोप लागली. किती वेळ गेला माहित नाही. अचानक तिला जाणवलं, की आपल्या अंगावरून कुणीतरी हात फिरवतोय. ती एकदम दचकली. ओरडणार एवढ्यात तिच्या तोंडावर प्रकाशनं हात ठेवला.
"ओरडू नकोस. एवढ्या रात्री तुझ्या मदतीला कोणी येणार नाही. माझं म्हणणं गुपचूप ऐक, तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. नाही ऐकलं तर तुझी बदनामी करायला मला वेळ लागणार नाही. तुझ्या शिक्षणासाठी एवढी मदत करतोय. त्या बदल्यात माझे एवढंसं काम करणार नाहीस का?" प्रकाशनं तिला चांगलंच अडकवलं होतं.
"पण दाजी, हे बरोबर नाही. मला गरीबाळा असं फसवणं तुम्हाला शोभत नाही. आईनं किती विश्वासानं तुमच्या हातात सोपवलं मला. तिचा असा विश्वासघात करणं चांगलं नाही." ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. वासनांधाला चूक किंवा बरोबरचा विचार येणारच कुठून? आपण करतोय तेच बरोबर आहे असं त्याला सदा वाटत असतं.
"तुला माहीत आहे ना तुझ्या आईचा किती विश्वास आहे माझ्यावर ते? तू जर तिला काही सांगितलंस तर ती विश्वास ठेवणार नाही. उलट तुझीच बदनामी होईल. हे बघ माझ्या जवळ तुझ्या नि तुझ्या मित्राचा सोबत असलेला फोटो आहे. तो दाखवल्यावर तुझीच बदनामी होईल." असं म्हणत प्रकाशनं त्याच्या जवळचा फोटो दाखवला. तिला आठवलं, कॉलेजची फिस भरण्या साठी प्रकाश पैसे घेऊन कॉलेज मध्ये गेला. सुटे पैसे नव्हते म्हणून तिने एका विद्यार्थ्या कडून सुटे घेतले. त्याच्या हातून पैसे घेतानाच प्रकाशने गुलचुप फोटो काढला होता.
"बऱ्या बोलानं तयार हो. मला बाकी काही माहीत नाही. मला जे हवंय ते मी मिळवल्या शिवाय राहत नसतो. मला जबरदस्ती करायला लावू नकोस." त्यानं सरळ सरळ धमकीच दिली होती.
तिला समजून चुकलं, की या राक्षसा समोर आपलं काहीही चालणार नाही. आपली आई तिकडे मरमर काम करते. पैसा पाठवते. आणि आपल्या शिक्षणा मध्ये असा अडथळा आला. मात्र आपण प्रकाश बद्दल आईला सांगितलं. तर कुणीही विश्वास ठेवणार नाही. उलट प्रकाशनं जर आपल्या विषयी काही सांगितलं तर, 'कॉलेजला जाऊन पोरगी बिघडली', असं सारे जण म्हणत राहतील.
तिचा नाईलाज झाला. प्रकाशच्या वासनापूर्ती साठी तिचं कौमार्य भंग झालं. तिथून पुढं अधून मधून असे प्रकार घडतच गेले. मात्र या संबंधाचा काही परिणाम होऊ नये, यासाठी प्रकाश काळजी घ्यायचा. त्यासाठी कंडोम वापरायचा. अनिताला बंड करणं शक्य नव्हतं. ती तशीच शिकत राहिली. शिक्षण झालं. चांगलासा मुलगा बघून आईने तिचं लग्न करून दिलं, आणि आज तिला चांगली नोकरी सुद्धा मिळाली. 'संस्कृती संवर्धन' या संस्थेत नीतीशास्त्र विभागाची जबाबदारी तिच्या वर येऊन पडली.
गावानं तिचा सत्कारही केला. गावाच्या प्रेमानं ती भारावली होती. तिला वाटायचं, 'आपण गावच्या लोकांशी, नवऱ्याशी प्रतारणा करतोय. मी स्वतःच भ्रष्ट झालेली आहे. माझी नीती भ्रष्ट झालेली आहे. मी काय या मुलींना नीती, अनीती शिकवणार?' परंतु तिला हे जाहीर करणं शक्य नव्हतं. मनातली घुसमट मोकळी करणं शक्य नव्हतं. आलेल्या प्रसंगाला सामोरं जाणं, एवढंच तिच्या हातात होतं. झालेला प्रकार आतल्या दडपून तिला जीवन जगावं लागणार होतं.