Pandit Warade

Drama Tragedy Thriller

3  

Pandit Warade

Drama Tragedy Thriller

सरिता - भाग ६ (लग्नात विघ्न)

सरिता - भाग ६ (लग्नात विघ्न)

6 mins
144


  गंगू वयात आली. तशी लग्नाची तयारी सुरू झाली. जामखेडच्या श्रीमंत तरुणा सोबत लग्न ठरले. कुंकू, टिळा, बस्ता सारे काही नियोजना नुसार पार पडले. लग्नाचा दिवस उजाडे पर्यंत त्या तरुणाच्या अनेक सुरस कथा कानावर येऊ लागल्या. तो व्यसन करतो, नेहमी मित्रांच्या गराड्यात राहतो. रोज शेतातल्या बंगल्यावर नवीन नवीन लोकांसोबत पार्ट्या होतात. अशा काही गोष्टी कानावर आल्या की गंगू नाराज व्हायची. आईला सांगायची. अली सुद्धा नाराज व्हायची. मात्र मनाची समजूत करून घ्यायची आणि गंगूलाही समजवायची की, ' _पैसा आहे म्हणून खर्च करतो. लाडका आहे. अजून हुडपणा आहे. लग्न झाल्या वर होईल व्यवस्थित.'_  


  बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. मंदिरा समोरच्या पटांगणात भव्य मंडप टाकला गेला. सकाळ पासूनच लाऊड स्पीकर लावलेला होता. त्यावर ग्रामोफोनच्या तबकडीवर गाणे वाजत होते.


  रुणझुण वाजंत्री वाजती

  म्होरं कळवातनी नाचती


  उद्या जाईल मी माझ्या गावा

  माझ्या अंगाला हाळद लावा


  असे लग्नाचे गाणे त्या काळात वाजायचे. मध्येच त्या तबकडी वर खरचटले असेल किंवा खराब झाली असेल तर तबकडी फिरायची परंतु सुई जागे वरच रहायची आणि गाण्याचा एखादा शब्द पुन्हा पुन्हा ऐकायला मिळायचा. मग ग्रामोफोन वाला हळूच ती सुई उचलून पुढे सरकवायचा आणि गाणे तिथून पुढे वाजायला लागायचे. 


  गावातील लहान मुले आज लग्नाच्या पंगतीत जेवायला मिळेल म्हणून आनंदाने उड्या मारत होते. अतिशय हलाखीचा काळ होता तो. गव्हाची पोळी म्हणजे केवळ सणावाराला मिळणारी मेजवानी असायची. एरव्ही एखादा पाहुणा आलाच तर त्याच्या साठी पाहूणचार केला जायचा परंतु त्याच्या सोबत घरातील केवळ एकच पुरुष जेवायचा. त्यानंतर उरलंच काही तर मुलांना मिळायचं. म्हणून लग्नाच्या पंगतीचं लहान मुलांना फार अप्रूप वाटायचं. इथे येणारी मंडळी एकदम श्रीमंत मंडळी असल्यामुळे त्यांच्या साठी खास असे पदार्थ बनवले जात होते. त्याच्या वासाने मुलांच्या तोंडाला पाणी सुटत होते. परंतु पाहुणे मंडळी आल्या शिवाय आणि त्यांचे जेवण झाल्या शिवाय गावातल्या कुणालाच जेवायला मिळणार नव्हते. मुलं मंडपाच्या अवती भवती घोटाळत होती. 


  एकदाचे जामखेडचे पाहुणे आले. भेटीगाठीचा कार्यक्रम झाला. नवरदेवाला मारुतीच्या मंदिराच्या ओट्यावर सावलीत बसवून मंडळी मांडवा कडे आली. मांडवाच्या बाजूला पाहुण्यांच्या हात पाय धुण्या साठी पाण्याच्या बादल्या भरून ठेवलेल्या होत्या. पाहुणे आले, हात पाय धुवून मांडवात स्थानापन्न झाले. त्यांना पाणी आणि सरबत देण्या साठी लहान मुलांची झुंबड उडाली. उरलेले सरबत प्यायला मिळावे ही एक सुप्त अपेक्षा मनात होतीच. 


  मारुतीच्या मंदिरावर बसलेल्या नवरदेवाचे स्वागत म्हणून नवरीच्या दोन करवल्या पाण्याचे भांडे आणि शेवयाच्या भाताचे ताट साजूक तूप घालून वाजत गाजत घेऊन आल्या. नवरदेवा सोबत असलेल्या सर्व जणांनी भातावर ताव मारला. करवल्या परत गेल्या. नवरदेवाचे मित्र थोडे पाय मोकळे करायला गेले. 


  इकडे मांडवात पाहुण्यांना पाणी, सरबत देऊन झाले. थोड्या गप्पा झाल्या आणि लगेच लाऊडस्पीकर वर सूचना झाली. _'पाहुण्यांनी लगेच जेवायला बसून घ्यावे. वाढेकरी मंडळी आपापले वाढायचे साहित्य घेऊन तयार राहावे लगेच पंगतीला सुरुवात होत आहे. आटपा लवकर. चटया अंथरून घ्या. पत्रावळ्या द्रोण आणा लवकर.'_


  चटया अंथरल्या गेल्या. पाहुण्यांची पंगत सुरू झाली. पहिल्या पंगतीत पाहुण्यांच्या व्यतिरिक्त गावातले कुणीच जेवायला बसत नसत. पाहुण्यांची एक पंगत उठली, दुसरी उठली, तिसरीही उठली आणि मग कुणाला तरी नवरदेवाच्या मिरवणुकीची आठवण झाली. 


  "अरे शेवंतीचे कपडे आणा लवकर. नवरदेवाला शेवंती चढवा आणि जाऊद्या लवकर मिरवायला." 


   "हो हो! अरे पांडबा, जा तेवढे शेवंतीचे कपडे आण बरं लवकर."


   तसा पांडबा लग्न घराकडे धावला. पूजेचे ताट, शेवंतीचे कपडे आणि भटजी बुवाला सोबत घेऊन मंदिरा कडे आला. मंदिरावर नवरदेवाच्या बरोबर असलेले त्याचे मित्र लगेच तेथून पसार झाले. दूर जाऊन उभे राहिले. भटजी बुवांनी नवरदेवाला कपडे चढवण्या साठी आणलेल्या कपड्यांना अभिमंत्रित करायला सुरुवात केली. तसे नवरदेवाने थांबायला सांगितले. कारण विचारले असता, "मला मुलगी बघायची आहे." म्हणून सांगितले. 


  आता आली का पंचाईत? नवरदेवाला शेवंती चढवल्या शिवाय मंदिरा जवळून उठता येत नाही. तसेच हळद लागलेल्या नवरीला मारुतीच्या मंदिराच्या ओट्यावर येता येत नाही. काय करायचे? पांडबा आणि भटजी बुवांनी समजावून पाहिले परंतु नवरदेव ऐकायलाच तयार होईना. 


   हा हा म्हणता ही बातमी लग्न घरापर्यंत पोहोचली. वधुपिता मंदिरा कडे आला. त्यानेही समजावून सांगितले पण परिणाम शून्य. वरपिता सज्जनराव स्वतः मुलाला समजवण्या साठी आले. पण नवरदेवाची एकच मागणी होती. लग्न लावायच्या अगोदर मुलगी पहायची. नवरदेवाच्या या हट्टा पायी 'काय करावे?' हे कुणालाच कळेना. प्रतिष्ठीतां पैकी सर्वच जण येऊन नवरदेवाला समजावत होते. परंतु त्याचा एकच हेका होता, तो सोडायला तयार नव्हता.


  बाकीच्या मंडळींचे, ज्यांना यातली काहीच कल्पना नव्हती त्यांचे जेवण वगैरे व्यवस्थित सुरू होते. पंगती वर पंगती उठत होत्या. नवरदेवाची मिरवणूक निघाली नाही याचे कुणाला सोयर सुतक वाटत नव्हते.  


  नवरीच्या आईच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर तर ती रडायलाच लागली. तिला बघून मावश्या, माम्या आणि जवळच्या इतर बायकाही रडायला लागल्या.


  नवरदेवाला हट्ट धरण्याचे कारण असे होते की, नवरदेव मंदिराच्या ओट्यावर बसल्या नंतर तिथे त्यांचे स्वागत शेवयाच्या भाताने झाले होते. त्याचे मित्र आणि त्याने भात खाल्ला. नंतर त्याचे मित्र फेरफटका मारून आले. त्यातल्या एकदोन मित्रांना त्याची थट्टा करण्याची लहर आली. ते आल्यानंतर नवरदेवा सोबत त्यांची चर्चा झाली. 


  "का रे, तू तर मुलगी बघायला आलेला होतास ना? मग मुलगी नीट बघितली नाहीस का?" एक मित्र म्हणाला. 


   "हो ! मी स्वतः आलो होतो मुलगी बघायला. मुलगी पसंत झाल्यावरच होकार दिला होता मी." नवरदेवाचे उत्तर.


   "अरे, तू मुलगी बघायला आला होतास हे बरोबर असेलही परंतु सोबत तुझे वडील, काका, मामा हे सुद्धा असतीलच ना. आणि हे सारे जण समोर असतांना तू काय मुलीला न्याहाळत बसला असशील का? पाहिलं ना पाहिलं केलं असशील." दुसऱ्या मित्राचा तर्क. 


  "हो. काका, मामा सोबत असल्यावर जास्त वेळ थोडंच पाहता येतं एखाद्या मुलीला. अरे, माझे वडील माझं ऐकतात म्हणून तर त्यांनी मुलगी बघायला सोबत येऊ दिलं. नाही तर कोण नेतं नवरदेवाला सोबत?" नवरदेव.


  "हां. इथेच तर खरी गोम आहे. हात झटकून मोकळे होता यावे म्हणून तर तुला मुलगी बघायला नेलं त्यांनी. 'तू स्वतः मुलगी बघितली आहेस' असं म्हणून ते मोकळे होऊ शकतात आता." तिसरा एक मित्र.


  "अरे पण असं झालं काय एवढं? मी मुलगी नीट बघितली. नंतरच होकार दिला." नवरदेव.


  "मग नक्की तुझ्या सोबत धोका झालाय." पहिला मित्र.


  "असं झालंय तरी काय?" नवरदेव आता खरंच काकुळतीला आला होता.


  "एक तर तुझ्या पाहण्यात काही तरी गडबड झाली असावी. नाही तर तुला दाखवतांना एक मुलगी दाखवली आणि आता लग्नासाठी दुसरीच उभी केलेली दिसत्येय." एका मित्राचा तर्क. 


  "अरे, आम्ही आता फेरफटका मारायला गेलो होतो ना तिकडे. तर नवऱ्या मुलीला तिच्या मैत्रिणी सजवत होत्या. तेव्हा अचानक माझे लक्ष तिकडे गेले. नवरी एका डोळ्याने तिरळी आहे. आता तुला दाखवलेली तीच आहे की दुसरी आहे? याची तूच खात्री करून घेऊ शकतोस. आमचं काय? जे दिसलं ते तुला कथन केलं. तुझं तू आता बघून घे." पुन्हा एका मित्राने सारी घटना सविस्तरपणे समजावली.


  मग मात्र नवरदेवाची मनःस्थिती द्विधा झाली. म्हणूनच त्याने पुन्हा मुलगी बघायचा हट्ट धरला.


  इकडे नवरी आणि तिच्या करवल्या नवरदेवाच्या मिरवणुकीचा कानोसा घेत असतांना तिकडे अजून सामसूम असल्याचे जाणवले. गंगूने वडिलां जवळ अजून मिरवणूक का निघाली नाही? याची विचारणा केली असता वडिलांनी सारे सविस्तर सांगितले. यातून काय मार्ग काढावा? याचाच विचार करतोय म्हणून सांगितले.


  गंगूने थोडा विचार केला. आणि वडिलांना म्हणाली,


  "बाबा, मला आशीर्वाद द्या आणि मंदिरावर जाण्याची परवानगीही. त्याला मला जीवनभर सांभाळायचे आहे. त्याला नीट पाहून घेऊ द्या. मी आत्ता त्याच्या समोर जाऊन उभी राहते."


   "बाळे, अशी कशी परवानगी देऊ तुला? हळदीच्या अंगानं असं मंदिरावर जाता येत नसतं. जनरीत कशी मोडायची आपण?" गंगूचे वडील म्हणाले.


  "बाबा, त्यांनीही तर जनरीत मोडलीच आहे. आपल्याकडे नवरा मुलगा मुलगी पाहायला जात नसतो तरी तो आलाच ना मला बघायला? ज्या जनरीती मुळे जन्मभर पश्चाताप करायची वेळ येईल ती रीत मोडायला काय हरकत आहे. या रीती काही लिखित नियम नाहीत. त्या त्या काळात आवश्यक असेल त्या प्रमाणे या चाली रीती सुरू झाल्या आहेत. काळाच्या प्रवाहात त्या बदलल्याही पाहिजेत. ते काही नाही मी जाणार त्याच्या समोर. त्याची होणारी पत्नी त्याला एकदा नीट नेटकी पाहून घेऊ द्या." असं म्हणत गंगूने आपल्या करवल्यांना सूचना केली,


  "चला गं, आपल्याला आत्ताच मंदिराच्या ओट्यावर जायचे आहे. पाण्याची कळशी आणि भाताचे तबक घ्या. चला." ती ताडकन उठली अन् पायात चप्पल सरकवली.


(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama