Pandit Warade

Drama Inspirational Others

3  

Pandit Warade

Drama Inspirational Others

सरिता-९ (देवदर्शन)

सरिता-९ (देवदर्शन)

5 mins
189



    गंगूच्या लग्न सोहळ्याची कशी गंमत झाली ते आपण पाहिले. हळद फेडण्याच्या कार्यक्रमात सर्वांनीच खूप मजा अनुभवली. नवरीचा चुलत भाऊ संजू, याने नकली नवरी बनून नवरदेवाची केलेली फजिती सर्वांना लक्षात राहील अशीच होती. हळद फेडून झाल्यावर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि ते दोघांच्या करवल्यांसहित देव दर्शना साठी घराबाहेर पडले.

   सर्वात आधी ते उमा महेश्वर मंदिरात गेले. त्यानंतर विठ्ठलाचे मंदिर, हनुमान मंदिर, भवानी मातेचे मंदिर, असे करत ते खंडोबाच्या मंदिरात गेले. त्या मंदिरात जातांना नवरदेवाने नवरीला उचलून घेऊन जायची परंपरा होती. करवल्यांनी गणपतलाही आग्रह केला, गंगूला उचलून घ्यायचा. थोडे आढेवेढे घेतच गणपतने गंगूला आपल्या हातावर उचलून घेतले. एक एक पायरी चढत मंदिराच्या प्रवेश द्वारात आणून खाली टेकवले. अशा प्रकारचा तो पहिलाच पुरुषस्पर्श तिला सुखावून गेला. त्याच्या दणकट बाहूत आपण सुरक्षित आणि सुखात राहू याची मनोमन खात्री पटली. मंदिरात खंडोबाच्या बाजूला असलेल्या म्हाळसा आणि बानूबाईच्या मूर्तीकडे पाहून सरला गंगूची चुलत बहीण गंगूच्या कानात काही कुजबुजली,

   'बघ गं बाई, खंडोबाचा आशीर्वाद घेताहेत भावोजी. त्याच्या सारखी दुसरी एखादी बानू आणतील बरं का नाही तर.' तिच्या या चेष्टेच्या सुराने गंगू क्षणभर दचकली, पण लगेच सावरली अन् एक चोरटा कटाक्ष गणपतकडे टाकला. जणू सांगत असावी, 'मी एवढं प्रेम देईल की त्यांना दुसरीकडे जावेच वाटणार नाही.'

    खंडोबाचे दर्शन झाल्यावर ते गावातील एका अतिशय वयस्कर अशा, वयाची शंभरी उलटून गेली तरी ठणठणीत असलेल्या बायजा आज्जीच्या घरी गेले.

    ही बायजा म्हातारी म्हणजे गावातली सर्वात वयस्कर व्यक्ती. वयाचं शतक केव्हाच पार केलेलं. तिच्या जवळ अनुभवाची शिदोरी असल्यामुळे गावातील प्रत्येक वयस्कर व्यक्ती तिच्या जवळून जीवनात ऊर्जा मिळवायची. आपापल्या जीवनातल्या समस्या तिच्या समोर मांडायची. आज्जीही आपल्या कडे आलेल्या प्रत्येकाच्या प्रश्नाची उकल जशी जमेल तशी सांगायची. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेस सुद्धा जो उमेदवार आधी तिचा आशीर्वाद घ्यायचा, तिचा सल्ला घ्यायचा तो हमखास निवडूनच यायचा. जीवनातले खाच खळगे कसे पार करायचे? आलेल्या संकटांना कसे सामोरे जायचे? याचा खूप अभ्यास झालेला होता तिचा. माणसाच्या चेहऱ्याचाही अभ्यास होता तिच्या जवळ. चेहरा पाहिल्या पाहिल्या त्याच्या चारित्र्याचा ताळेबंद तिच्या डोळ्या समोर उभा राहायचा. आणि तिने एखाद्या व्यक्ती बद्दल काही भाकीत सांगितले तर ते खरेच ठरायचे.

    गंगू आणि गणपत बायजा दोघेही आज्जीच्या पायावर झुकले. आज्जीने त्यांना "सुखानं राहा, मोठ्ठं व्हा,, माह्या वनी म्हतारे व्हा." असा तोंडभरून आशीर्वाद दिला आणि आपल्या जवळ बसवून घेतलं.

   "गणपा, संभाळून राहाय रं माज्या राज्या, न्हायतर ही बया तुला बी धडा शिकविल चांगलाच." गंगूचं कौतुक करत बायजा म्हातारी म्हणाली.

  "आज्जेsss" असं लडिवाळ पणे म्हणत गंगूने म्हातारी कडे रोखून बघितले. म्हातारीने हसत हसतच तिला आपल्या कुशीत ओढलं, प्रेमाने तोंडावरून हात फिरवला. दोघांच्याही तोंडात गुळाचा खडा घातला.

   ते एक एक गल्ली करत प्रत्येक घरात वडीलधाऱ्यांच्या पाया पडत चालले होते. त्या सर्वांचे आशीर्वाद घेत होते. प्रत्येक घरात गंगूच्या धाडसाचे कौतुक होत होते. कुठे कुठे चेष्टा मस्करीही व्हायची. कुठे साखर, कुठे चहा, तर कुठे गुळाचा खडा देऊन त्यांच्या संसारात असाच गोडवा निर्माण व्हायचा आशीर्वाद मिळायचा.

   दर्शन घेत घेत ते गंगूचे माहेर असलेल्या गल्लीत आले. जावई पहिल्यांदा सासुरवाडीत आला म्हणून गणपतचे सर्व घरांमध्ये जंगी स्वागत झाले. गंगूच्या काकूंच्या घरी तर फारच जंगी स्वागत झाले. काकूंनी दोघांचे औक्षण केले. त्यांच्या स्वागता साठी फुलांची आरास केलेली होती. बैठकीच्या खोलीत ते आल्या बरोबर वनिताने सिलिंग फॅनचे बटन दाबले. फॅन सुरू झाल्या बरोबर नवदांम्पत्याच्या अंगावर गुलाबाची सुगंधी फुले उधळली गेली. गणपत तर अगदीच भारावून गेला. त्याच्या मामाचेच घर असले तरी या घरात तो फारसा कधी येत नसे, आला तरी बैठकी शिवाय इतर खोल्यांत जायचे कधीच काम पडले नाही. त्याच्या मामीचे, गंगूच्या काकूंचे प्रेम कशामुळे एवढे उफाळून आले होते? ते कुणालाच कळत नव्हते. काकूने स्वतःहून गणपतला सर्व घरभर फिरवून घर दाखवले. गंगू तिच्या आणि गणपतच्या करवल्यां सोबत बैठकीतच बसलेली होती. बैठकीत लावलेले फोटो, तिथल्या आठवणी सांगत त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. मात्र इकडे काकू गणपतला घर दाखवण्याचा निमित्ताने मागच्या परसदारी घेऊन आली. त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या.

   "जावायबा, तुम्ही जावाय आता झाले त्या अगुदर तर भाचेच हायेत ना? तवा म्या तुम्हाला गणपा म्हन्लं तं चालन ना?" सारजा बाईनं गणपतला विचारलं.

  "मामी, तुमचा अधिकारच आहे तो. मला त्यात काहीच वाईट वाटणार नाही. उलट चांगलंच वाटंल." गणपत खुश होऊन म्हणाला.

   "बरं झालं. एकदाचं लगीन पार पल्डं. लै ताण झाल्ता आम्हाला साऱ्यायला. त्या पोरानं आईन येळला न्हाई म्हणून लई घोर लावला हुता आमच्या जीवाला. शेवटाला आपलंच माणूस कामाला यीतं. तुमी न्हाई म्हनला आस्ता तं काय झालं आस्तं आमच्या गंगीचं?" सारजा बाई जरा जास्तच पाणी लावून बोलत होती.

    वनिता गंगूला घेऊन मागच्या शयन खोलीत बसली होती. त्यांच्या मस्त गप्पा आणि हसणं खिदळणं चालू होतं. म्हणून या सासू जावयाच्या गप्पा त्यांना ऐकू जाणं शक्यच नव्हतं.

    "शांताबाईनं आधी म्हन्लं व्हतं तवाच हे लगीन व्हया पाह्यजे हुतं. पण न्हाय आयकलं. शेवटाला थीतंच येवा लागलं ना?" सारजाबाईचं बोलणं सुरूच होत. गणपा शांतपणे ऐकत होता.

   "चालायचंच मामी, नशिबात आसल तसंच घडतं." गणपाचा समजुतीचा सूर.

   "कसलं नशीब घिऊन बसला गणपा. जवा मागितली तवा देल्ली न्हाई. जवा तिकडचं ईस्कटलं तवा बरं तुमचंच ध्यान आलं?"

   "केव्हा का होईना आलं ना आमचं ध्यान? झालं ना एकदाचं मनासारखं?" गणपत शक्य तितका हा विषय टाळू पहात होता. हे बोलणं त्याला फारसं आवडलं नव्हतं.

    "आवं कश्याचं ध्यान? येळ आली म्हून आले तुमच्या कडं. तुम्हालाच द्याची आस्ती तं पह्यलंच देली आस्ती. इक्त शिरिमंत घर कोण्ही आसंच सोडतं व्हय? पर त्या पोराला काय तरी कळालं तवा बिनसलं हे सारं. तुमाला म्हायती हाय का काहून बिनसलं त्ये?" सारजा बाईनं हळूच खडा टाकून पाहिला.

   "नाही बा. काय झालं?" गणपतची उत्सुकता ताणली गेली.

    "जाव द्या आता सांगून काय उपेग? पदरी पल्डं आन पईत्र झालं म्हणायचं आन गप गुमान ऱ्हायचं." सारजा बाईनं गणपतला चांगलंच कोड्यात टाकलं. आता त्याची उत्सुकता आणखीच ताणली गेली.

    "मामी, असं कोड्यात का बोलता? काय झालं ते नीट सांगा ना." त्यालाही आणखी जाणून घ्यावसं वाटंत होतं.

   "आवं त्या पोराला कायतरी म्हायती झालं म्हून न्हाय म्हनला त्यो. पर त्येला चांगलं म्हनलं पाह्यजेल. लोकाच्या लेकराची बदनामी व्हवू न्हाई म्हून सवतावर वाढून घितलं. जाव द्या गणपा. म्या काय तुमाला सांगलं न्हाई आन तुमि बी काई आयकलं न्हाई. काय ध्येनात ऱ्हाईल ना? न्हायतर करसाल मह्या नावाचा बोभाटा." सारजा बाई करून सवरून हात झटकून मोकळी झाली.

  "येत जावा कंदीमंदी. त्येवढं ध्येनात ठिवा." सारजा बाईनं गणपतच्या हातावर गुळाचा खडा ठेवला अन गंगूला बाहेर बोलावण्या साठी वनिताला आवाज दिला.

   "वनिता, आगं झालं का न्हाई तुमचं खिदळणं? जावं दे आता. ती सासरवाशीन झालीय. आता जेची तेनं मरीदा पाळली फायजे. आजून लई घरात जायचं आसंन तेह्यला. या आता भाईर "

   सारजा बाईच्या आवाजानं वनिता गंगूला घिऊन बाहेर आली.  

   "दाजी, नीट सांभाळा बरं आमच्या बहिणीला. जराशी तापट स्वभावाची आहे काही चुकलं माकलं तर पदरात घ्या." वनिता म्हणाली तसं सारजा बाई मध्येच म्हणाली,

  "आगं, त्ये लई मोठ्या मनाचं हायेत म्हून तर आसं आईन येळला पदरात घेतलं त्याह्यनी. जा सुखानं सौंसार करा." असा आशीर्वाद देऊन, त्यांच्या हातावर खडीसाखरेचे खडे ठेवले आणि त्या दोघांना निरोप दिला.

  त्यानंतर आणखी दोन चार घरी दर्शन घेण्याचे सोपस्कार पार पाडत नवदाम्पत्य आपल्या घरी आले. शांताबाईनं त्या दोघांची मीठ मिरचीनं दृष्ट काढली. त्या दोघांच्या वरून भाकर तुकडा ओवाळून फेकला. त्यांना घरात घेतले.

   "जा बाळांनो, लवकर कपडे बदलून या. भुका लागल्या असतील. लवकर या. सारेजण थांबले आहेत जेवायला."

    नवरदेव नवरी आणि करवल्या आपापल्या खोलीत जाऊन कपडे बदलून आले. सर्वांनी सोबत जेवण केलं. जेवणं झाल्यावर नवरदेव, नवरी, करवल्या आपापल्या खोलीत आराम करण्या साठी गेले तर बाकीची मंडळी आपल्या आवरा आवरीच्या कामाला निघून गेली. दुसऱ्या दिवशी सत्य नारायणाची पूजा करायची होती, काही जण त्या तयारीला लागले.



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama