धरलं तर चावतं
धरलं तर चावतं
घुसमट-८ (धरलं तर चावतं)
"मास्तर, ओsss मास्तर." बालचंद गुरुजींना जातांना बघून बबन्याने आवाज दिला.
बालचंद गुरुजी आणि बबन एकाच वर्गात शिकणारे विद्यार्थी. बालचंद पैसे भरून एका खाजगी विना अनुदानित शाळेवर शिक्षक बनला आणि बबन मात्र आपल्या वडिलोपार्जित शेती कडे वळला. बालचंद गेल्या पाच वर्षांपासून बिनपगारी शिक्षक म्हणून नोकरी करत होता, वैतागला होता.
"अरे! काय मित्रा बबन, तू ही माझी खिल्ली उडवायला लागलास का यार? तू जिगरी दोस्त ना माझा?" इति बालचंद.
"अरे, यात खिल्ली उडवण्या सारखं असं काय बोललो मी? जे खरं आहे तेच बोललो की." बबन मनापासून सत्य तेच बोलत होता.
मात्र बालचंद गुरुजींना बबनचे हे बोलणे एखाद्या शिवीप्रमाणेच वाटत होते. बालचंद गुरुजी शिक्षक होतेच परंतु त्यांची परिस्थिती एखाद्या सालगड्या पेक्षा वेगळी नव्हती. होय! ते खरेच होते. संस्थाचालकांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून, ते सांगतील ते काम निमूटपणे बालचंद गुरुजींना करावे लागत होते.
बालचंद! आपल्या आईवडिलांचा तीन बहिणीच्या नंतर झालेला एकुलता एक मुलगा. लाडात वाढलेला. सखाराम पाटलांची (बापाची) दहा एकर शेती. बऱ्या पैकी पाण्याची सोय असलेली, बागायती शेती. परंतु काम करायला माणसे नसल्यामुळे शेतीच्या उत्पन्नाचा बराचसा भाग मजुरांनाच जायचा. तरीही घरातील सर्वांच्या पोटापुरतं उरायचं.
परंतु लागोपाठ दोन वर्षे दुष्काळ पडला. शेतातली पीके पावसा अभावी सुकून गेलीत. पीकांवर केलेला खर्च वाया गेला. शेतकऱ्यांची स्थितीच अशी असते की, एक वर्ष दुष्काळ पडला तरी पुढची पाच वर्षे त्याला बरोबरी करण्यातच जातात. अशातच बहिणी लग्नाला आल्यात. वडिलांनी मुलींच्या लग्नासाठी एकेक एकर जमीन विकून लग्नातल्या हुंड्याची बरोबरी केली. मुलींचे लग्न केले म्हणजे संपत नाही, तर खर्चाचे तोंड उघडे होत असते. दुसऱ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेसच पहिल्या मुलीचे बाळंतपण आले. हॉस्पिटलचा खर्च बापालाच करावा लागला. तेच पुन्हा तिसऱ्या मुलीच्या लग्नाच्या वेळी घडले. दुसऱ्या मुलीच्या बाळंतपण बरेच खर्चिक झाले. सीझर करावे लागले. जवळपास एक लाखाच्या आसपास खर्च करावा लागला. दिवसेंदिवस खर्च वाढत गेला. लग्नाची धावपळ, दवाखाना, इत्यादींमुळे शेतीच्या कामाकडे लक्ष देता न आल्याने उत्पन्न कमी होत गेले. परिणामी परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. तरीही बालचंदच्या शिक्षणासाठी कमी पडू नये म्हणून आणखी दोन एकर जमीन विकली गेली. बालचंदच्या दहावीनंतर शिक्षण थांबवून त्याने शेतीत लक्ष घालावे असे बापाला वाटत होते, परंतु बालचंद आणि त्याच्या आईच्या आग्रहास्तव पुढचे शिक्षणाचा खर्च करत रहावा लागला. परिस्थिती आणखी बिकट होत गेली.
बालचंदने लग्न करून घर संसार बघावा ही साखरामची इच्छा होती. परंतु उच्च शिक्षण होऊन कुठे तरी नोकरी स्वीकारून मगच लग्न करावे या साठी बालचंदचा आग्रह होता. अशा परिस्थितीतच बालचंदची बारावी झाली. त्याने डी एड साठी प्रवेश घेतला. डी एड झाल्यावर पुन्हा बी ए केले. नंतर एम ए करून बी एड सुद्धा केले. दरम्यानच्या काळात शिक्षण क्षेत्रात बरीच उलथापालथ झाली. खाजगी शिक्षण संस्थांचे पेव फुटले. सरकारी शाळा मध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्या कमी होऊ लागली. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांना दुसरेच सरकारी कामे करावी लागू लागली. पर्यायाने शिक्षक भरती थंडावली. डी एड, बी एड झालेल्या विद्यार्थ्यांना खाजगी संस्थांमध्ये नोकरीसाठी वळावे लागले. चढाओढ सुरू झाल्याने संस्था चालकांनी तुंबडी भरण्याचे काम सुरू केले. एका एका पदासाठी वीस ते पंचवीस लाखां पर्यंत पैसे द्यावे लागू लागले. बालचंदनेही वडिलांकडे पैशासाठी आग्रह धरला. पुन्हा एकरभर जमीन विकून पंचवीस लाख रुपये जवळच्याच एका संस्था चालका कडे भरले आणि बालचंद मास्तर झाला. करारा प्रमाणे पहिले पाच वर्षे पगार मिळणार नव्हता त्यामुळे घरूनच खर्च करून नोकरी सुरू झाली.
पोराला नोकरी लागली. त्याने आता तरी लग्न करावे यासाठी सखाराम आग्रह करू लागले. लग्नासाठी स्थळ पाहणे सुरू झाले.
डी एड ला असतांना संस्था चालकाच्या मुलीने, काजलने बालचंदला लग्नासाठी आग्रह धरला होता. परंत
ु बालचंदने तिला अपमानित करून नाकारले होते. 'शिक्षण झाल्या शिवाय लग्नच करणार नाही.' असे त्याने ठणकावून सांगितले होते. अपमानित झालेल्या काजलने खूप आकांडतांडव केले होते. 'बघतेच कुठली मुलगी तुला पसंत करते ते, माझा अपमान केलास ना मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही' असे म्हणत ती रागाने निघून गेली होती.
नोकरी खाजगी असल्या मुळे मुलीकडचे मुलगी द्यायला तयार होईना. एखादी न शिकलेली, गरीब घरची मुलगी करावी तरी जमीन कमी असल्या मुळे कुणी मुलगी देईना. 'एकुलता एक मुलगा, तरी मुलगी मिळत नाही' या चिंतेने बाप झुरू लागला. शेवटी एक तोडगा निघालाच.
संस्था चालक रंगरावांनी काजलचे लग्न जुळवायला सुरुवात केली. चांगले चांगले स्थळ काजलने नाकारले. काही मुलांनी काजलला नापसंत केले. एक अतिशय हुशार आणि श्रीमंत मुलगा काजलला बघून गेला, त्याला ती पसंतही पडली होती. परंतु कॉलेजमधील तिचे वर्तन फारसे बरोबर नसल्याचे समजल्यामुळे त्याने स्पष्ट शब्दात नकार दिला. रंगराव नाराज झाले. शेवटी रंगरावांनी बालचंदच्या गळ्यात काजलला बांधण्याचे निश्चित केले. दूरच्या नातेवाईका कडून बालचंदच्या वडिलांना, सखारामला राजी करून घेतले. परिस्थितीने गांजलेल्या सखारामला हे स्थळ म्हणजे लॉटरी लागल्या सारखेच वाटले. त्यांनी बालचंदचा विचार न घेताच होकार दिला. काजल खुश झाली. तिला आता तिच्या मनाप्रमाणे त्याच्या कडून झालेल्या अपमानाचा बदला घेता येणार होता. बालचंद नाखुषीनेच तयार झाला. वडिलांच्या परिस्थितीपुढे त्याला झुकावे लागले. शिवाय लग्न झाल्यावर ती सुधारेल असेही त्यास वाटले होते.
लग्न झाल्यावर मुलगी आणि जावई सुखात राहावेत म्हणून रंगराव बालचंदचा पगार सुरू करू इच्छित होते परंतु काजलने तसे करू दिले नाही.
"पप्पा, बालचंदचा पगार वाढविल्यास इतर सदस्य नाराज होतील. जावयासाठी कराराचा भंग केला असे म्हणतील. ठरल्या प्रमाणेच चालू द्या, तोवर मी सहन करेन गरिबीत राहणे" काजलने असे म्हटल्यावर रंगरावांना आपल्या मुलीचा अभिमानच वाटला. परंतु आपली मुलगी आतल्या गाठीची आहे हे त्यांना समजलेच नाही.
लग्नानंतर सहा महिन्यातच काजलने बालचंदला आई वडिलां पासून वेगळे केले आणि ते दोघे तालुक्याच्या ठिकाणी खोली करून राहायला गेले. आता दोघांचा संसार सुखाचा होईल असे वाटत असतांनाच बालचंदचा अपेक्षाभंग झाला. काजलच्या वागण्याने तो पुरता त्रासला. तिच्या मित्र, मैत्रिणींचा वापर त्यांच्या खोलीवर वाढला. कधी गेट टुगेदर, कधी कुणाचा वाढदिवस, कुणाच्या यशाचे सेलिब्रेशन यांच्याच खोलीवर होऊ लागले. वालचंद घरी आल्यावर त्याला अस्ताव्यस्त झालेली त्याची खोली त्याची त्यालाच आवरून घ्यावी लागत होती. कधी कधी तर त्याचा स्वयंपाक त्यालाच करावा लागत असे. अपवाद फक्त सासरे आल्यानंतरच. तेव्हा काजल स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून आपल्या वडिलांच्या सोबत गुरुजींनाही जेवायला लावत असे.
संसार सुख म्हणून फारसे त्याच्या वाट्याला येतच नसे. काजलला त्याच्या विषयी प्रेमच नसल्यामुळे संसार सुखचा आनंद नव्हता. काजलची इच्छा होईल तेव्हाच ते दोघे एकत्र येत असत. गुरुजींच्या इच्छेला काही किंमतच नव्हती. त्यामुळे मूळ बाळ होईल कसे? काजल सोबत एकदोन वेळेस चर्चाही केली, परंतु त्याचा परिणाम उलटाच झाला. 'सध्या मला मूल नको आहे. जास्त वाच्यता केलीस तर, तुझ्या पुरुषत्वा बाबतीत खोट्या वावड्या उठवायला मला वेळ लागणार नाही. निमूटपणे सहन केलेस तर कधी तरी ठीक राहील.' असा तिने दमही भरला होता. बरे याबाबतीत कुठे बोलायचीही सोय नव्हती. एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या मुली संबंधी काही बोलले तरी कुणी खरे मानणार नव्हतेच. मग उगाच आपले हसे करून घेण्यात काय अर्थ आहे. बरे काडीमोड घेऊन दुसरा संसार थाटायची इच्छा असूनही तेवढी धमक नव्हती. मुलबाळ होत नसल्यामुळे आणि आर्थिक परिस्थिती मुले आई वडील आधीच खचले होते. त्यांना आणखी चिंतेत टाकावेसे वाटत नव्हते. कधी कधी त्यांच्या कडूनच खर्चायला पैसे मागावे लागत होते. ते ही प्रेमापोटी देत होते. त्यांना आणखी किती त्रास द्यावा?
धरून ठेवलं तर चावणं सुरूच होतं, सोडायची इच्छा असूनही सोडता येत नव्हतं.
बालचंद गुरुजींची ही अवस्था ऐकून बाबनलाही हळहळण्या शिवाय काय करता येणार होते?