सरिता-७ दूरदर्शी गंगू
सरिता-७ दूरदर्शी गंगू
'लग्नाच्या मंडपात उभे राहण्या अगोदर नवरी मुलगी पुन्हा एकदा बघायची' म्हणून हट्ट धरून बसलेल्या हट्टी नवरदेवाची समजूत काढून सारे जण थकले. लग्नघरी तर रडारड सुरू झाली. नवरीच्या कानावर हे सारे जेव्हा गेले, तिने त्याच्या समोर जाण्याचा निर्णय घेतला. हे जरी जन- रीतीला सोडून होते, तरी तसे करणे भाग होते. ती आता काय करते? हे पाहण्या साठी वधुपिता आणि वरपिता दोघेही पाठी मागून तिथे आले.
तिने दोन करवल्या सोबत घेतल्या. एका कळशीत पाणी घेतले. साजूक तूप घालून शेवयाचा गरम गरम भात एका सुबक ताटात नक्षीदार पडद्याने झाकून घेतले. आणि हे सर्व घेऊन ती मंदिराच्या ओट्यावर नवरदेव बसलेला होता तिथे जाऊन उभी राहिली. भाताचे ताट, पाण्याची कळशी खाली ठेवली.
"तुम्हाला जन्मभर जिला सांभाळायचं आहे, ती तुमच्या समोर उभी आहे. नीट बघून घ्या. पहिल्या वेळी व्यवस्थित पाहिली नव्हती, म्हणून ही वेळ आली. आता चांगलं बघून घ्या. नाही तर पश्चातापाची वेळ यायची." असं म्हणत तिने तोंडावरचा पदर दूर केला.
ती ओट्यावर आल्या बरोबर नवरदेवाचे मित्र तेथून पसार झाले होते. नवरदेवाने नजर वर करून नवरीला बघितले आणि तो बघतच राहिला. बघण्याच्या कार्यक्रमात बघितली त्यापेक्षा किती तरी पटीने ती सुंदर दिसत होती. अंगाला हळद लावलेली असल्या मुळे आणि नवरीचे दागिने अंगावर ल्यायल्या मुळे तिचे बावनकशी सौंदर्य आणखीच खुलून दिसत होते. मात्र तिच्या चेहऱ्यावरचा करारीपणा पाहून त्याला ओशाळल्यागत झाले. मित्रांच्या सांगण्यावरून आपण फार मोठी चूक केल्याचे त्याला कळून चुकले. त्याने गुपचूप मान खाली घातली.
"बघितली का नीट?" तिने विचारले.
"हो!बघितली." अपराधी पणाच्या सुरातले त्याचे उत्तर.
"पसंत आहे का?" पुन्हा तोच करारी स्वर.
"हो." तो फक्त एवढंच बोलू शकला.
"बरं झालं. पसंत पडले. मात्र आता माझं ऐका. मला तुम्ही बिलकुल पसंत नाही. गुपचूप इथून उठायचं आणि कपाळाचं बाशिंग सोडून खाली मांडवात मंडळीत जाऊन बसायचं. पुढे काय करायचं ते मी बघून घेते." तिने असं म्हणताच सज्जनराव घाई घाईने ओट्यावर आले.
"मुली, आमची फार मोठी चूक झाली. चूक जरी त्याने केली असली तरी बाप म्हणून मी हात जोडून तुझी माफी मागतो. मला क्षमा कर. एवढी मोठी शिक्षा आम्हाला देऊ नकोस." अगतिक स्वरात जामखेडचा सरपंच, धनाढ्य सज्जनराव गंगू समोर हात जोडून बोलत होते.
"आबा, असे हात जोडून मला लाजवू नका. तुमच्या सारख्या सज्जन माणसाच्या नशिबात असा पुत्र यावा हे खरेच दुर्दैव म्हणावे लागेल. तुमच्या सारख्या सज्जन माणसाच्या चांगुल पणाला पाहूनच मी एवढया सौम्य भाषेत बोलत आहे. तुम्ही मला वडीला समान आहात. मला माझा पुढचा निर्णय घ्यायला आशीर्वाद द्या आबा." ती आत्यंतिक भावनिक होऊन बोलत होती.
"बाळे, झालं गेलं विसरून जा. त्याला बघायची होती, बघितली आता तो तयार आहे तर त्याला शेवंतीची कापडं घालून मिरवणुकीला निघू दे. तू पण तुझी तयारी कर." संपतराव म्हणाले.
"नाही बाबा, हे आता कदापि शक्य नाही. या असल्या लांब कानाच्या माणसाच्या सोबत मी लग्न करू शकत नाही. याच्या बरोबर लग्न करून मी कधीही सुखी होऊ शकणार नाही. जो स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवतो असा एखादा गरीब मुलगा असला तरी मी त्याच्या सोबत लग्न करायला तयार आहे." गंगू बोलत होती आणि इतर सर्वजण स्थंभीत होऊन ऐकत होते.
"आबा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या सारखा सरळ मनाचा सासरा मिळणे माझ्या प्रारब्धात नसावे कदाचित. त्यामुळे मी स्वतःला दुर्दैवी समजते. दुसऱ्या बाजूने विचार करता तेवढीच भाग्यशाली मानते की, हे सारे योग्य वेळी लक्षात आले. लग्न झाल्यावर मी स्वतः आयुष्यभर रडत राहिले असते आणि आई वडिलांनाही रडवत राहिले असते."
"पण बाळे, आता पुढे काय करायचे? काय तुझ्या मनात आहे? ते तरी सांग एकदा." संपतराव म्हणाले.
"पुढे तुमचे तुम्ही बघा. तुम्ही जो मुलगा ठरवाल त्याच्या सोबत मी मोकळ्या मनाने लग्न करीन. तुम्हाला बिलकुल त्रास होऊ देणार नाही. तुमचे नाव, तुमची कीर्ती अबाधित राहील बाबा, तुम्ही निश्चिंत रहा. ज्या माणसाचा स्वतःवर, स्वतःच्या डोळ्यावर विहवास नाही. जो स्वतःच्या डोळ्याने मुलगी पाहून पसंत करून होकार देतो आणि मित्रांच्या सांगण्या वरून पुन्हा मुलगी बघायची म्हणतो. त्याच्या सोबत संसार कसा नीट चालेल माझा? उद्या यातल्याच एखाद्या मित्राने माझ्या विषयी टिंगल म्हणून जरी काही बरे वाईट सांगितले आणि याने ऐकून घेतले तर माझ्या संसाराची वाट नाही का लागणार? त्यावेळेस मी काय करू शकणार आहे? तुम्ही काय करू शकणार आहात? पाश्चातापा शिवाय आपल्या हातात काय उरणार आहे? तेव्हा आताच सावध व्हा. दुसरा नवरदेव बघा. मी तयार आहे. आबा, मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते. माझे लग्न लागे पर्यंत आपण थांबावे. मला तुमच्या सारख्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. तुमच्या मुलीला तुम्ही आशीर्वाद देणार नाही का?" म्हणत तिने सज्जनरावांच्या पायावर हात ठेवून डोके टेकवले.
सज्जनरावांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. आपल्या मुलाने केवढा मोठा मूर्खपणा केला आहे, याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी तिच्या पाठीवर प्रेमपूर्वक हात फिरवला. 'आयुष्यमान भव' चा आशीर्वाद दिला. आणि डोळे पुसत म्हणाले,...
"मुली, माझ्या सारख्या कपाळ करंट्याचा काय आशीर्वाद घेतीस. लक्ष्मी येऊन कुंकू लावून गेली पण मी जाऊन लगेच कपाळ धुवून आलो. आमच्या हाती हिरा सापडला होता परंतु गारगोटी समजून त्याला आम्ही कपाळ करट्यांनी फेकून दिले. मुली, तू मला वडिलांची पदवी दिलीस, मी थांबणार तुझ्या लग्नाला. जा मुली, तू तुझी पुढची पायरी कर." असं म्हणत त्यांनी तोंड बाजूला करून धोतराच्या सोग्याने आपले डोळे पुसले.
"चला बाबा, तयारीला लागा." असं म्हणत गंगू तिथून खाली उतरली आणि घराच्या रस्त्याला लागली. पाठोपाठ संपतरावसुद्धा निघाले. घरी आल्यावर...
"मुली, तू तुझा निर्णय घेतलास पण आता पुढे काय करायचं? कोण मुलगा उभा करायचा लग्नासाठी?" संपतराव विचारू लागले.
"बाबा, शांता आत्याकडे जा." गंगूने उत्तर दिले.
"पण आजोबांनी अगोदरच तिला नकार दिला आहे. आता ती कशी तयार होईल लग्नासाठी? तिला आपला स्वतःचा अपमान झाल्या सारखे नाही का वाटणार?" संपतराव म्हणाले.
"बाबा, आम्हा स्त्रियांचं मन अजून ओळखलं नाही तुम्ही. किती झालं तरी बहिणीचं भावावर निरतिशय प्रेम असतं. भाऊ कसा ही असला तरी त्याच्या संकटाच्या काळात तिचंच काळीज तुटतं सर्वांच्या आधी. भावासाठी तीच रडत पडत येते. तुम्ही जा." गंगूने सांगितल्यावर संपतरावांनी शांताला बोलावले.
आता घरात फक्त संपतराव, सखुबाई, गंगू, शांताबाई, शांताबाईचा मुलगा गणपत आणि सज्जनराव एवढेच जण बसलेले होते. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा? यावर चर्चा सुरू होती.
"आक्का, या परिस्थितीत केवळ तूच मला मदत करू शकतेस." संपतराव म्हणाले.
"पण दादू, अरे बाबांची इच्छा नव्हती गंगू माझ्या घरात द्यायची. मी तर मागणीही घातली होती. पण बाबा नाही म्हणाले. आता---"
"आक्का, आता न्हाई म्हणू नोका. माह्या गंगूला पदरात घ्या. बाबा म्हंन्ले आसतील म्हाई म्हून. पण भावाच्या तोंडा कडं पाहून तरी न्हाई म्हणू नोका. म्या पदर पसरते तुमच्या म्होरं." सखू रडत रडत विनवणी करत होती.
"दादू, माझं काही म्हणणं नाही. गणपा, तुझं काय मत आहे? तुला पसंत आहे का मुलगी?" शांताने आपल्या मुलाला, गणपतला विचारले.
"गंगूला मान्य असेल तर माझी काही हरकत नाही. मी तयार आहे. मला दुसरीकडे मुलगी मिळणार नाही असे नाही, परंतु अशा परिस्थितीत आपणच आपल्यां साठी उपयोगी पडायला पाहिजे. नाही का गंगू?" गणपतच्या होकाराने सर्वांच्या चेहऱ्यावरील चिंता कमी झाली.
"हो ना. माझीही काहीच हरकत नाही. मी तर आधीच बाशिंग बांधून बसलेली आहे. आता ते बाशिंग अक्षता पडल्या शिवाय सोडायला लावू नका. तुम्हा सर्वांना पसंत असेल तर मी सुद्धा लग्ना साठी तयार आहे." गंगूनेही गणपतच्या सूरात सूर मिसळला.
झटपट जामखेडच्या नवरदेवा साठी शिवलेले शेवंतीचे कपडे गणपतच्या अंगावर चढवण्यात आले. आणि नवीन नवरदेवाची मिरवणूक वाजत गाजत मांडवात आली. वर ओवाळणी होऊन गणपत स्टेजवर जाऊन खुर्चीत बसला. थोड्याच वेळात नवरीला मांडवात आणले गेले. अक्षता वाटल्या गेल्या. सर्वजण सावध होऊन बसले. 'शुभमंगल सावधान!' च्या गजरात भटजींनी मंगलाष्टके म्हणून लग्न लावले. अशा थाटात गंगू वडीलधा ऱ्यांच्या पाया पडत सासरला निघाली.
क्रमशः