Pandit Warade

Comedy Drama Classics

4.5  

Pandit Warade

Comedy Drama Classics

सरिता-८ गंगू सासरी जाते

सरिता-८ गंगू सासरी जाते

6 mins
356


मित्रांचे ऐकून नवरी मुलगी पुन्हा बघण्याचा हट्ट धरून बसलेल्या श्रीमंत नवरदेवाला बाजूला सारून आत्याच्या गरीब मुलाशी लग्न लावायचा निर्णय घेऊन आपल्या गंगूने त्या काळातले असे फार मोठे धाडस केले. आत्याची मनधरणी करायला लावले. आत्याचा मुलगा गणपतला लग्नासाठी तयार केले.

   गंगू आणि गणपतचे लग्न थोडे धावपळीतच लागले. जामखेडचे सरपंच सज्जनराव सुद्धा आपला अपमान विसरून स्वतःच्या मुलीच्या लग्नाप्रमाणे या लग्नासाठी झिजले. त्यांनी खूप धावपळ केली. लग्न पार पडल्यावर नवरदेव नवरी जेष्ठांच्या पाया पडायला आल्यावर गंगूने सज्जनरावांच्या पायावर माथा टेकवला. तेव्हा तर त्यांना आणखीच भरून आले. वाटले, 'आपल्या मुलाने फार मोठी चूक केलीय. सोन्यासारखी मुलगी हातची सोडली. मुला ऐवजी अशी मुलगी जन्माला आली असती तर? या सज्जनरावाची मान जगात उंचावली असती. मात्र या मुलाने आपल्याला मान खाली घालायला लावली. या मुलीने मात्र आपल्याला वडिलांचा मान देऊन शान राखली.' गंगू त्यांच्या गळ्यात पडून बराच वेळ रडत राहिली. संपतराव, सखुबाई, यांच्या गळ्यात पडून गंगू बराच वेळ रडली. रडारड झाल्यावर एका सजवलेल्या बैलगाडीत नवरदेव नवरीला बसवण्यात आले. बैलांच्या अंगावर नक्षीदार झुली घातलेल्या होत्या. त्या बैलगाडीला फुलांनी सजवलेले होते. नवरदेव नवरी गाडीत बसल्या नंतर दोन करवल्याही आपापल्या पिशव्या घेऊन गाडीत बसल्या. गाडी गावच्या वेशीत आली. सर्व जेष्ठ मंडळी पुन्हा एकदा समोरा समोर आले. हात जोडून सर्वांनी एकमेकांना 'राम राम' केला, एकमेकांचा निरोप घेतला. गाडी शांता आत्याच्या घराकडे निघाली.

    शांता आत्या जरी लग्नासाठी आपल्या भावाकडे आलेली असली तरी गणपतच्या चुलत भावांनी आणि बहिणींनी अतिशय सुरेख पद्धतीने गंगूच्या स्वागताची तयारी केलेली होती. गल्लीच्या प्रवेशा पासून रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी रेखाटली होती. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या आणि झेंडूच्या फुलांनी दारात गालिचा तयार केला होता. उंबरठ्यात धान्याने भरलेले मापटे सजवून ठेवलेले होते. घरातल्या देव्हाऱ्या पर्यंत फुलांची रांगोळी काढून ठेवलेली होती.

   वरात वाजत गाजत शांता आत्याच्या दारात आली. फटाके फोडून नवदंपत्तीचे स्वागत झाले. दारात गणपतची चुलत बहीण वनिता आपले दोन्ही हात पसरून, हातात मुसळ घेऊन दार अडवून उभी होती. चाली रीती प्रमाणे तिने नवदंपत्तीला सून म्हणून मुलगी मागीतली, या दोघांनी पहिली मुलगी झाली की तुलाच देऊ म्हणून कबूल केले. तिने या दोघांनाही उखाणे घ्यायला लावले. उखाणे घेऊन झाल्या वरच त्यांना घरात प्रवेश करायला परवानगी मिळाली. आपल्या नाजूक चरण स्पर्शाने माप लवंडून गंगूने गृह प्रवेश केला. शांता आत्याच्या घरात खऱ्या अर्थाने लक्ष्मीने प्रवेश केल्याचा भास सर्वांना झाला.

   "अगं काकू, काय पण नाटक केलंय वहिनीनं, मला माहितीय, तिला आपल्या इथंच यायचं होतं. हो की नाही हो वहिनी?" वनिता म्हणाली.

  "मग आमचा गणपा दादा आहेच तसा देखणा सुबाणा राजबिंडा. लहान पणा पासून तिनं दादाला पाहिलेलंच आहे." रंजना, गणपाची दुसरी चुलत बहीण म्हणाली. तशी गंगूनं खालच्या मानेनंच गणपत कडे एक नजर टाकली आणि लाजली.

  "चला आता पुढं या. राशी मध्ये अंगठी शोधायची आहे. चला." वनिता त्यांना घरातल्या देव्हाऱ्या जवळ घेऊन गेली. गणपाने सासुरवाडीहून आणलेला देव देव्हाऱ्यात ठेवला. देव्हाऱ्या समोर धान्याची रास ठेवलेली होती. त्या राशी जवळ त्या दोघांना बसवल्या गेले. रंजनाने आपल्या बोटातली अंगठी त्या राशीत खुपसून ठेवली. त्या दोघांना ती शोधायला सांगितली. राशीत हात घातल्यावर गंगूच्या कोमल हाताचा स्पर्श होताच गणपा अंगठी शोधायची विसरूनच गेला. क्षणभरा साठी गंगूही त्या पाहिल्याच पुरुष स्पर्शाने मोहरून गेली होती. पण? क्षणभरासाठीच! दुसऱ्याच क्षणी तिने स्वतःला सावरले. 'आपल्या जीवनात असे अनेक प्रसंग येतील. मोहरण्याचे, गांगरण्याचे. म्हणून काय जीवन मार्गावरून चालणे थांबवायचे? नाही हीच वेळ आहे पुढे चालायची.' तिने लगेच त्याच्या हातातला आपला हात सोडवून घेतला आणि अंगठी शोधून काढली. हा प्रयोग पाच वेळेला केला गेला. पाचही वेळेला अंगठी गंगूच्याच हाती लागली.

   दुसरा खेळ होता, भाकरींचा. दोघांच्याही डोळ्या वर रुमालाची पट्टी बांधून डोळे झाकले गेले आणि त्यांना भाकरीच्या राशी जवळ आणले गेले. 'एक, दोन, तीन.' रंजनाने आकडे मोजले. तीन म्हणताच दोघांनी भाकरीच्या राशिकडे हात केले. गणपतच्या हातात मात्र एकच भाकरी मिळाली, तर गंगूच्या हाती पाच भाकरी मिळाल्या. तिथेही गणपतच्या भाग्यात कमतरताच लाभली.

  नंतर लग्नातील खास असा मजेशीर कार्यक्रम म्हणजे हळद फेडण्याचा कार्यक्रम. दोघांना खास सोबत अंघोळ घातल्या जाते. त्यात एकमेकांच्या अंगावर पाण्याच्या गुळण्या टाकणे, कांकणाची गाठ सोडणे, सुपारी सोडणे इत्यादी कार्यक्रमांनी त्यात रंजकता येते. या कार्यक्रमाचा सर्वच जण आनंद घेतात.

   गंगू आणि गणपतच्या हळद फेडण्याचा कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. बाहेर मोकळ्या प्रांगणात एक खाट टाकली. दोन घंगाळ्यात गरम पाणी काढले. गणपत त्याच्या करवल्या वनिता आणि रंजना यांच्या सहित आला नि खाटेवर बसला. प्रतीक्षा होती नवरीची, गंगूची.

  नवरी आली. हळदीची पिवळी धमक अशी साडी नेसून. डोक्या वरून पदर घेऊन, किंचितही अंग उघडं दिसणार नाही असं अंग झाकून. लाजत, मुरडत, हळुवार चालीने आली, खाटेवर गणपत पासून थोडेसे अंतर राखून बसली.

   दोन्ही कडच्या करवल्यांनी घंगाळ्यांमध्ये हात घालून, 'पाणी जास्त कडक नाही ना?' याची नीट खात्री करून घेतली. नवरदेवाच्या करवलीने घंगाळ्यातून ग्लास भरून नवरदेवाच्या हातात दिला आणि नवरीच्या अंगावर पाणी ओतायला सांगितला. त्याने सांगितल्या प्रमाणे केले. पाच ग्लास पाणी ओतून झाल्यावर नवरीने पाच ग्लास पाणी नवरदेवाच्या अंगावर ओतले. नंतर गुळण्या सुरू झाल्या. तोंडात पाणी घ्यायचे आणि एकमेकांच्या अंगावर गुळणी टाकायची. यात नवरदेव नवरीने परस्परांच्या करवल्यांच्या अंगावर गुळण्या फेकून चांगलेच मनोरंजन केले. कुणी तरी खोबरे चावून पाण्या बरोबर त्याचीही गुळणी टाकली. आणि मग जवळपास साऱ्यांचीच तोंडात खोबरे चावणे सुरू झाले.

    गुळणा गुळणी नंतर खास कार्यक्रम होता, सुपारी सोडण्याचा. सुपारी सोडतांना नवरदेवाने एका हातात सुपारी पकडायची अन नवरीने ती सोडवून घ्यायची. तसेच नवरीने दोन्ही हाताच्या तळाव्यात सुपारी घ्यायची आणि नवरदेवाने ती एकाच हाताने सोडवायची. नवरीने सुपारी पकडली. गणपतने ती सोडवायचा प्रयत्न केल्या बरोबर नवरीने सोडून दिली. असे पाच वेळेस झाले. बघणाऱ्यांना त्यात मजा नाही आली म्हणून सर्वांनी गणपतला सुपारी घट्ट पकडायला सांगितली. गणपतने सुपारी घट्ट पकडली तेव्हा नवरीने सुपारी सोडायला हात घातला तेव्हा गणपत दचकला. तो हात स्त्रीचा नाजूक हात नसून एका राकट पुरुषाचा हात आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने हळूच नवरीच्या तोंडावरचा पदर एका हाताने दूर केला. आणि सर्वजण हास्य कल्लोळात बुडाले. ती गंगू नसून गंगूचा चुलत भाऊ संजू होता. त्याने नवरी सारखीच साडी नेसून गणपतची चांगलीच चेष्टा केली होती. नंतर खरोखर नवरी गंगू आली. पुढील कार्यक्रम खेळी मेळीच्या वातावरणात, हसत खेळत व्यवस्थित पणे पार पडला. एवढंच की पुन्हा पहिल्या पासून सर्व कार्यक्रम साजरा करावा लागला. गुळणा गुळणी, अंगावर पाणी ओतणे, कांकणाची गाठ सोडणे, सुपारी सोडणे हे सर्व कार्यक्रम पुन्हा पहिल्या पासून करावे लागले. सुपारी सोडतांना पुन्हा कुणी तरी मध्ये बोललेच,

    "अरे, गणपत बघ बरं. पुन्हा कुणी तरी एखादा रूप बदलून चेष्टा करायचा."

   या वाक्यावर पुन्हा एकदा हास्याचा कल्लोळ उसळला.

   कधी कधी उगाच वाटत राहतं की, 'लग्नात हे सर्व करणं आवश्यक असेल का? हे नाही केलं तर? काय होईल? आपले पूर्वज काही तरी खुळचट कल्पना मनात ठेवून असले उद्योग करत असतील का?'

    पण विचार करता असे लक्षात येते की, ते अगदीच काही खुळचट नव्हते. किंवा अज्ञानीही नव्हते. ऋषींनी समाजाच्या व्यवस्थित पणा साठी जो विवाह संस्कार घालून दिला. त्याच्या मागे ऋषींचे समाजाप्रती असलेले आपुलकीचे, कृतज्ञतेचे भाव दर्शन दिसते. समाजात नीट नेटके पणा असावा. म्हणून विवाह संस्था निर्माण झाली. एक नर आणि मादी एकत्र आले, त्यांच्यात मिलन झाले तर संतती विस्तार होतो. परंतु विवाह करून झालेला संतती विस्तार हा व्यवस्थित समाज घटक बनत असते. त्या संततीच्या पालन पोषणाची जबाबदारी त्या दोघांवर येते. त्यासाठीचे प्रेम, वात्सल्य त्या दोघात निर्माण होते. विवाहात स्त्रीला लग्न करून दुसऱ्या पुरुषाच्या घरी जायचे असते. मुळातच स्त्रीला घडवतांना देवाने स्त्रीसुलभ लज्जा भावना, प्रेम भावना, समर्पण भावना पुरुषांपेक्षा जास्त दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याकाळची स्त्री आपली भावना वाचेद्वारे सहजा सहजी प्रकट करत नसे. विवाह, पती, या गोष्टींची चर्चा निघाली की, कुमारिका स्त्री लाजून चूप बसायची. आई, वडील, भाऊ, बहिणी, यांना सोडून एकदम परक्या घरात जायचं, तेही कायम साठी. तिथे कसं होईल? या विचाराचा ताण तिच्या मनावर असायचा. त्यात ती दबून जाऊ नये. तिचं हसतं खेळतं, निरागस असं शैशव कोमेजून जाऊ नये. म्हणून असे मजेशीर, खेळकर कार्यक्रम या वैवाहिक सोहळ्याचे अविभाज्य अंग बनले. राशीत अंगठी शोधणे, भाकरी मिळवणे, नणंदेला मुलगी देण्याचे वचन देणे, या सर्व गोष्टी तिच्या मनावरचे दडपण दूर करण्यास मदत करतात. परस्परांच्या स्वभावाचे दर्शन करून देतात.

   गंगूच्या लग्नातही असे सर्व कार्यक्रम हसत खेळत पार पडले. तिच्या वैवाहिक जीवनातला पहिल्या दिवसाचा हा पहिला प्रहर पार पडला. त्यानंतर वडील धाऱ्यांचे दर्शन, देव दर्शन हे कार्यक्रम बाकी राहतात. हळद फेडण्याचा कार्यक्रम पार पडला. नवरदेव नवरी सोबत सर्वच सदस्य जेवायला बसले. हळद फेडतांना घडलेल्या मजेशीर अशा प्रसंगाची चर्चा करत करत सर्वजण जेवणाचा आस्वाद घेत होते, पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवत होते.

......



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy