फेसबुक अंकल
फेसबुक अंकल
विनायकराव जोशी, एक रिटायर ऑफिसर तेही सरकारी नोकरीतून रिटायर झालेले. परंतु त्यांच्या वागण्या-बोलण्यात मधून कुठेही उगाचच सरकारी ऑफिसरचा रुबाब, शिष्टपणा किंवा खडूसपणा नव्हता.त्यांच्या वागण्यात एकदम नम्रता होती. आयुष्यभर सर्वांना समजावून घेतले होते.घरच्या आणि दाराच्या दोन्ही आघाडीवर ते व्यवस्थित होते. कामावरती देखील ते जिथे-जिथे बदलून गेले तिथे तिथे त्यांनी लोकसंग्रह केला. ते बदलून जाताना लोकांनी त्यांच्याबद्दल प्रशंसा उद्गार काढले. ते बदलून जाताना लोकांना गदगदून आले आणि असा अधिकारी पुन्हा होणार नाही असेच उद्गार लोकांनी काढले. आयुष्यातले दिवस किती भरकन गेले हे त्यांचे त्यांना देखील कळले नाही. दोन्ही मुले हुशार होती, मुलांचे शिक्षण पूर्ण होऊन चांगल्या नोकऱ्या लागल्या. रिटायरमेंटच्या आधी दोन्ही मुलांची लग्ने झाली.मुलगी अमेरिकेत, तर मुलगा ऑस्ट्रेलियात दोघेही व्यवस्थित सेटल झाले. आता रिटायरमेंटचे आयुष्य मजेमजेने जगायचे असे त्यांनी ठरवले.पुण्यासारख्या ठिकाणी सिंहगड रोडवर एक चांगला तीन गुंठे प्लॉट वरती मस्त बंगला बांधला. आयुष्यभर सतत बदल्या होत गेल्यामुळे एका जागी राहण्याचा स्थिर पणा मिळालाच नाही.आणि आता एवढे मोठे घर आहे पण घरात दोघेच.तरीपण त्यांनी पुन्हा एकदा नवे आयुष्य जगण्याचे ठरवले.त्यानुसार काही दिवस दोघेही मुलाकडे वर्षभर, मुलीकडे वर्षभर राहून आले. पण तिथले एकंदरित जीवन त्यांना काही आवडले नव्हते.शेवटी "गड्या आपला देश बरा" हे त्यांनी ठरवले.
त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. तशी ती बंगल्यांची कॉलनी होती, परंतु सगळेच क्लास वन वगैरे असल्यामुळे एकमेकांच्या घरांमध्ये कोणी डोकावत नसत. मात्र सीनियर सिटीजन ग्रुप, हास्य क्लब, जिम, तिथे एकत्र भेटत असत. दोघे पती-पत्नी सकाळी उठून फिरायला जात, मग हास्यक्लब, जॉईन करत. घरी येऊन हलकासा नाश्ता, दुपारी जेवण, पुन्हा संध्याकाळी क्लबला जाणे नाहीतर जिमला जाणे. आता या वयात जिमला जाऊन करणार काय? पण हलकाफुलका व्यायाम करत होते. संध्याकाळी हलकेफुलके भोजन किंवा कधीकधी नुसती खिचडी. घरात कामाला 24 तास एक पुरुष आणि स्वयंपाकाला एक बाई होती. त्यामुळे जीवन अगदी सुखात चाललेले. परंतु नियतीला फार दिवस हे बघवले नाही. कसेतरी चार-पाच वर्षे गेली आणि एक दिवशी झोपेतच पत्नी निवर्तली. इतके दिवस दोघे एकमेकांना असल्यामुळे त्यांना जास्त कोणाची गरज पडत नव्हती. आता सकाळचा मॉर्निंग वाॅक करायला देखील त्यांचे मन धजावत नव्हते. पदोपदी अर्धांगी ची आठवण येत होती. गेल्या पन्नास वर्षाचे सहचारी होते. घरात बसून बसून टीव्ही तरी किती बघणार? शिवाय नातेवाईकांना फोन तरी किती करणार?मुले एवढ्या लांब की त्यांना फोन करायचा तर आधी दिवसाचे किती वाजले? रात्रीचे किती वाजले? हे बघावे लागे. त्यांच्या कामाची वेळ बघावी लागे आणि एवढे करून कधीकधी मुलांना खरोखरी वेळ नसे. दोन्ही मुलांनी त्यांना स्वतःकडे येऊन राहण्याचा आग्रह केला होता, पण जेव्हा हे दोघे होते तेव्हादेखील त्यांना ऑस्ट्रेलिया, अमेरिकेसारख्या, देशात करमले नव्हते. शेवटी जन्मापासून भारतातील राहण्याच्या, जगण्याच्या सवयी वेगळ्या होत्या. त्या अंगात भिनलेल्या होत्या. तेव्हा सोबतीला मालतीबाई तरी असत. काही नाहीतर तिच्याशी एखादं लुटुपुटीचा भांडण तरी करता येत असे. पण आता काय करणार? म्हणून त्यांनी मुलाकडे किंवा मुलीकडे जाण्याचे साफ नाकारले.जोपर्यंत माझे हात पाय चालू आहेत तोपर्यंत मी कोणाकडे राहणार नाही. हा त्यांचा बाणा होता आणि तो खोटा देखील नव्हता. कारण काळाच्या स्पर्धेत ते आता मागे पडलेले होते. जोपर्यंत तुम्ही इतरांबरोबर धावू शकता तोपर्यंत त्यांना तुमची अडचण नसते, पण तुम्ही मागे पडायला लागल्या नंतर तुमच्यासाठी थांबणे त्यांना जमत नाही. हा काळाचा नियम आहे.
नातेवाईक देखील आता यांचा फोन उचलत नाहीत ,वर उचलताना आता हा म्हातारा रिटायर झालाय त्याला काही काम ना धंदा असे पुटपुटत. याच कित्येक नातेवाईकांना विनायक रावांनी सढळ मदत केलेली होती.पण असो, "कालाय तस्मै नमः" जसा यांच्या मुलांना वेळ नव्हता तसाच नातेवाईकांना देखील वेळ नव्हता.मग यावरती विनायक रावांनी नामी शक्कल शोधून काढली.ते स्मार्टफोन शिकले, असाही पूर्वी त्यांना स्मार्टफोन येत होता परंतु ते कामापुरता वापरत असत. पूर्वीचा काळ नोकरीमध्ये आणि उरलेला घरांमध्ये कसा जाई ते समजत नसे.शिवाय थोडी देवदेव करणारे वृत्ती पण होती.म्हणजे अगदी काही जपजाप्य करीत बसत नसत, परंतु देवापुढे थोडेफार नतमस्तक होत होते.अर्धा तास तरी देवासाठी देत होते.त्यामध्ये पूजाअर्चा वगैरे गोष्टी नाही.ते सगळं मालतीबाई यांच डिपार्टमेंट.पण आता ते रस घेऊन पूजा-अर्चा देखील करू लागले.बागेत जाऊ लागले, देवळात जाऊ लागले, सीनियर सिटीजन ग्रुप मध्ये बसू लागले, मुळात ते मितभाषी होते.आयुष्यभर बायकोच मैत्रीण होती.पण आता कोणाशी जास्त खुलून बोलता येत नव्हते.त्यांचा एकाएकी पणा त्यांना खायला उठत होता. सर्वांमध्ये असून देखील ते एकाएकी होते. त्यांना कोणत्याही ग्रुप मध्ये जास्त मिसळता येत नव्हते.मग त्यांनी मोबाईलला आपला मित्र बनवला.आणि आता ते खूप उत्तम रीतीने स्मार्टफोन हाताळू लागले .व्हाट्सअप, फेसबूक, इन्स्टाग्राम, गुगल या सर्वात ते आपली उपस्थिती रोजच्या रोज दाखवू लागले.जे प्रत्यक्ष बसून लोकांशी बोलता येत नव्हते ते मोबाईलवर मात्र खूप बोलू लागले.आणि त्यांना त्यांच्या सारखेच खूप मित्र मिळाले. रोज काहीना काही स्टेटस अपडेट करणे, प्रोफाइल पिक्चर अपडेट करणे, फेसबुक ला स्टोरीज मध्ये काही ना काही टाकणे, आपल्या जुन्या आठवणी, जुने फोटो, यात ते छान रमून गेले.बऱ्याच लोकांमध्ये फेसबूक अंकल म्हणून ते प्रसिद्ध झाले.असाही त्यांचा स्वभाव लोकांना मदत करण्याचा होता. जिथे शक्य असेल तिथे आपल्या ओळखी वापरून आपले जुने अनुभव सांगून लोकांना ते सल्ले पण देत असत. शिवाय सगळ्यांचे वाढदिवस, न चुकता त्यांना विश करणे.हे सारे त्यांचे चालू असे. सोळा वर्षाच्या मुलापासून ते सत्तर वर्षाच्या म्हातारी पर्यंत सगळे जण त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये होते. असो आयुष्य छान चालले होते.
त्यांनी गंमत म्हणून एकदा टाकले "ज्यादिवशी तुम्हाला फेसबुकवर, व्हाट्सअपवर, माझे दर्शन होणार नाही, तेव्हा खुशाल समजा मला बोलावणे आले. माझ्यासाठी स्वर्गाचे दार उघडले गेले आणि किमान RIP तरी टाका. प्रत्यक्षात फेसबुक काका एकदम शांत, मितभाषी, परंतु सोशल मीडियावर मात्र नेहमी त्यांचा खोडकरपणा चालू असे. अर्थात त्यांचे हे मिश्किल चिमटे कोणत्या राजकीय पक्षाविरुद्ध, जाती धर्माविरुद्ध नसत. त्यामुळे कोणाला ते चिमटे झोंबत नसत. लोक त्यांचीदेखील मजा घेत. आज फेसबुक अंकलचा एखादा मीम आला नाही तर लोकांना चुकल्यासारखे वाटे. मग लगेच फोन करून किंवा मेसेज टाकून त्यांचे विचारणा केली जाई.
एकदा काय झाले टॉयलेट मधून उठताना काकांचा फोन खिशातून खाली पडला, तो डायरेक्ट संडास मध्ये गेला. बर तो काही दिसतपण नव्हता की हात घालून काढता येईल. काकांनी अजून फ्लशिंग केले तर फोन पुढे वाहूनच गेला. लगेच ताबडतोब त्या सिमवरती दुसरा हँडसेट घेणे शक्य नव्हते. त्यांनी ऑनलाइन हँडसेट मागवायचा म्हटले तरी घरात फोन नाही. मुलाला फोन करायचे म्हटले तरी, दुसरा फोन नाही. त्यांना तर एकदम चुकल्यासारखे झाले. घरात काही सुचेना, खाणेपिणेदेखील गोड लागेना. त्यांच्या जिवाचा जिवलग, त्यांचा सखा, मित्र टॉयलेटमधून वाहून गेला होता. आता काय करावे? काका घरभर चकरा मारू लागले. रिक्षा करून ताबडतोब एखाद्या दुकानात जावे, तर त्यांना फोनमधले जास्त काही समजत नव्हते. बहुदा त्यांचे हँडसेट मुलांनी गिफ्ट केलेले असत. आता आली का पंचाईत? मग त्यांना मालतीच्या हँडसेटची आठवण झाली. अरे मालतीने कुठे ठेवला तेच माहीत नाही. आपण आपल्यातच मशगुल होतो आणि आपल्या दुःखातच चूर होतो. मग त्यांना आठवले की मालतीचा हँडसेट नात घेऊन गेली होती. ग्रँडपा मला आजीची आठवण म्हणून, मी आजीचा मोबाईल घेऊन जाते. आता बाहेर दुकानात जाऊन मुलांना फोन करायचा तर त्यांचा नंबर पाठ नाही. मुले नेहमी म्हणत असत, महत्वाचे नंबर डायरीमध्ये नोटिंग करून ठेवा. कधी काही प्रॉब्लेम झाला मोबाईल हरवला तर, डायरी तरी कामाला येते. पण यांचा स्वतःवरती भारी आत्मविश्वास. माझा मोबाईल हरवणार नाही, मी रोज व्यवस्थित आठवणीने चार्जिंग करतो, मी त्याला व्यवस्थित जपतो.
ओके, आता काय करायचे बर! मालतीला सवय होती डायरी लिहिण्याची. तिने कुठल्यातरी वर्षाच्या डायरीत पाठीमागे नंबर नोंद केले असणार. आता त्या डायऱ्या शोधायला हव्या. असे करता करता तो दिवस संपला. शेवटी टीव्ही बघितला, आपल्या जुन्या पुस्तकांवरची धूळ झटकली आणि पुस्तके वाचायला सुरुवात केली. पुस्तके वाचतावाचता त्यांना गोडी लागली. अरे! किती दिवसात आपण हातात पुस्तक धरले नाही. पूर्वी आपण किती वाचायचो, आपल्याला वाचनाचा किती छंद होता. आपण किती कादंबऱ्यांचा पूर्वी फडशा पाडला. असे ते मनात म्हणत होते. मग आज जाऊ, उद्या जाऊ, करत करत दोन दिवस गेले. असे ते घराच्या बाहेर पडायचा कंटाळा करत होते. आता वयानुसार गाडी चालवणे होत नाही, म्हणून त्यांनी फोर व्हीलर गाडी केव्हा काढून टाकली होती. त्यामुळे ड्रायव्हरदेखील काढून टाकलेला. घरात मात्र स्वयंपाकीण बाई आणि 24 तासाचा घरगडी होते. ते त्याच्या मागे लागले.
मुकुंदा, पायाखाली शिडी घेऊन वरची कपाटे उघड त्यामधून तुझ्या मालकीण बाईंच्या डायऱ्या काढ. तुला माहित आहे ना? माझा मोबाईल पडलाय म्हणून. मला काही एक नंबरदेखील पाठ नाही. फक्त तिचा पाठ होता.पण तो आता स्वर्गात लागणार नाही. मालकीण बाईंच्या डायऱ्यांमध्ये असेल, तो शोधून बाहेर जाऊन मुलांना फोन करायला पाहिजे. गडी पण आता हो मालक, हो मालक, म्हणत जरा टाळाटाळ करीत होता. त्याला पण एवढ्या वर्षांचा इथल्या कामाचा अनुभव असल्यामुळे, मालक काही रागावणार नाहीत. जेव्हा जास्त चिडतील तेव्हा बघू असा विचार त्याने केला. मुकुंदा गेली दहा वर्षे यांच्याकडे काम करत होता. मुले जशी बाहेरगावी गेली तसा त्याने 24 तासात साठी एक हरकाम्या माणूस घरात ठेवला होता. प्रश्न पैशांचा नव्हता तर मनुष्यबळाचा होता. बाहेर जाण्यासाठी रिक्षा बोलावून आणून मग त्यांना बाहेर जाता आले असते, मग हँडसेट खरेदी करता आला असता तर शेवटी पैसा सगळ्या गोष्टीमध्ये मॅटर करत नाही. तर माणूसदेखील लागतो. मनुष्यबळ देखील लागते.
मुकुंदा तुझा मोबाईल कुठे आहे? त्यांनी विचारले.
माझा मोबाईल रिपेरिंगला दिलाय. मुकुंदा उत्तरला.
सध्या तोच मालकांचा मोबाईल चोरून वापरत होता. असो.
दोन दिवस असेच गेले आणि इकडे मात्र सोशल मीडियावर धमाल उडाली. दोन दिवसांमध्ये फेसबुक अंकलचा एकही फोटो नाही, एकही स्टेट्स नाही. मीम नाही. ना फेसबुकवर, ना व्हाट्सअपवर, कुठेच नाही. शिवाय त्यांचा लास्ट सीन दोन दिवसांपूर्वीचा दाखवत होता. त्यामुळे जवळच्या मित्रमंडळींना शंका आली. मागे त्यांनी एकदा स्टेटस टाकले होते ,"ज्या दिवशी मी फेसबुकवर दिसणार नाही! त्या दिवशी मला स्वर्गाचा दरवाजा उघडला असे खुशाल समजा! अरे बापरे काकांना वरचे बोलावणे आले की काय? कोणीतरी शंका काढली. त्यानंतर खूप मंडळी त्यांना फोन करू लागली. रिंगा वाजत आहे परंतु फोन उचलला जात नाही, म्हणजे काकांचे काहीतरी बरेवाईट झाले की काय? त्यांच्या घरी फोन उचलायला पण कोणी नाही. कोणीतरी फेसबुक वर अशी शंका बोलून दाखवली आणि झाले.
बात का बतंगड बनायला कितीसा वेळ लागणार? कोणीतरी काकांचा आपल्या मोबाईल वरून चांगला फोटो शोधून काढला आणि RIp टाकून मोकळा झाला.एकाने Rip टाकल्यानंतर पुढे RIP/RIP, अशी होडच लागली. मग काका किती चांगले होते! सगळ्या वयोगटाची कसे मिळून मिसळून रहात होते! त्यांच्या एकटेपणावर त्यांनी कशी मात केली होती. वगैरे वगैरे काकांची भलावण सुरु झाली .हळूहळू मोबाईल वरूनच बातमी पसरत गेली.तेव्हा कुठे कॉलनीच्या लोकांना माहिती पडले. आधी सगळेजण दरवाज्यात जमले, पण उच्चभ्रू माणसे असं डायरेक्ट कोणाचे दार कसं काय वाजवणार? म्हणून दरवाजातच थांबले. मग अर्ध्या एक तासाने घराचा दरवाजा वाजवला तर घरातील नोकराने मुकुंदाने दार उघडले. विनायकराव कोठे आहेत विचारले असता त्याला काही माहीत नव्हते. आहेत ना घरामध्येच आहेत तो चाचरत बोलला. मग त्याच्या पाठीमागे कॉलनीतली मंडळी घुसली. विनायकराव बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून झोपले. रात्री बराच वेळ शिवाजी सावंत यांची मृत्युंजय वाचत राहिले शिवाय म्हातारपणामुळे रात्री झोप लागत नाही त्यामुळे त्यांना पहाटे पहाटे गाढ झोप लागली. दरवाजावरती पडलेल्या धाडधाड थापांनी काकांनी दार उघडले. बघतात तर, दरवाजामध्ये आपल्या कॉलनीतील सर्व पंधरा-वीस पुरुष मंडळी जमा झालेली.
काय झाले? काकांनीच उलट प्रश्न विचारला.कुठे आग लागली आहे का? घरात चोर घुसला आहे का? घरात साप शिरला आहे का? असे विचार काकांच्या मनात आले आणि त्यांनी समोरच्या माणसांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. जमलेली माणसे एकमेकांचे तोंड बघू लागली. आता यांना कसे काय सांगायचे की तुम्ही मेला ते आम्हाला समजले म्हणून आम्ही आलो. तुम्ही तर आमच्या समोर उभे आहात. मग हळूच कोणीतरी भीत-भीत काकांना तुमचा मोबाईल कुठे आहे? असे विचारले. मग काकांनी घडलेली घटना सांगितली, आणि दोन दिवस मोबाईल विना, मी कसेबसे दिवस काढतोय हे माझे मलाच माहीत अशी पुस्तीदेखील जोडली. तेव्हा त्यांनी काकांच्या पुढे आपला मोबाईल धरला. स्वतःच्या फोटोला श्रद्धांजली वाहिलेली पाहून काकांना काही सुधारले नाही. मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की, आपण मागे असा स्टेटस ठेवला होता की, मी जर दोन दिवस सोशल मीडियावर दिसलो नाही तर ,खुशाल माझ्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडले आहेत समजा. आणि कोणाला तरी ही गोष्ट खरी वाटली. त्यावर काका खो-खो हसू लागले. अहो मी साक्षात तुमच्यासमोर उभा आहे, भूत नाही. जो तो आता गोरामोरा होऊन एकमेकांचे तोंड बघू लागला. मंडळी हळूच काढता पाय घेऊ लागली. काकांनी सर्वांना थांबवले. बसा हो! माझ्या मरण्याची बातमी ऐकून का होईना आज सारेजण एकत्र आलात, काही हरकत नाही. माझे आयुष्य वाढले. आता आपण सेलिब्रेट करूया! मुकुंदा !जा कोपऱ्यावरील हॉटेलमधून गरमागरम सामोसे, जिलेबी, फाफडा, ढोकळा सगळे काही घेऊन ये आणि हो चहा मात्र घरातच ठेव. त्यावर मंडळींची चुळबुळ झाली. आता एवढं काही नाश्ता मध्ये मिळणार आहे ते खावं की इथून निघून जावं, हे काय कोणाला समजेना.
अरे! विचार कसला करता? आता आपले किती दिवस राहिले? एक दिवस काय पथ्य असेल ते सोडा आणि आज माझ्याकडून पार्टी, मी पुन्हा जिवंत झाल्याची. आता कुठे सगळी मंडळी मनावरचा दगड उतरवून हॉलमध्ये आली. कोणी खुर्च्यांमध्ये, कोणी सोप्यावर, तर कोणी खाली बसून घेतले. एवढ्यात मुलाचा मेव्हणा घरी येऊन धडकला. काकांना समोर मित्रमंडळीत खोखो हसताना बघून, तो पण अचंबित झाला .वडिलांना फोन लागत नाही असे कळल्याबरोबर मुलाने आपल्या मेव्हण्याला फोन लावला आणि घरी जाऊन काय आहे ते बघ. असे सांगितले कारण Rip वाली पोस्ट सगळ्या जगभर फिरलेली, मुलाने आणि मुलीनेदेखील परदेशात बघितली. आताची पिढी थोडी प्रॅक्टिकल असली तरी, अचानक वडिलांच्या मृत्युची अशी बातमी ऐकून दोघांनाही काही सुचत नव्हते. म्हणून मुलाने आपल्या मेव्हण्याला पाठवले.
कोणीतरी म्हणले काका आता तुम्ही जिवंत आहे ते टाका. नाहीतर तुमच्या दारात भरपूर नातेवाईक मंडळी जमा होतील. काका म्हणाले फक्त मुलाला आणि मुलीला फोन करून खरे ते कळवा. एवढ्या लांब त्यांच्या जिवाला घोर नको. बाकी जरा बघतो कोणाचं खरंच माझ्यावर किती किती प्रेम होतं. बाकी काही पोस्ट पुढे टाकू नका आणि माझा मोबाईल यायला दोन-तीन दिवस तरी लागतील. मुलाला आणि मुलीला खरं काय ते कळून गेलं पण हळूहळू जवळपास राहणारे सर्व नातेवाईक त्यांच्या घरात जमा झाले. प्रत्येकाला काकांना समोर बघून आश्चर्याचा धक्काच बसला होता. मग काका त्यांना बसायचे निमंत्रण देत असत आणि हॉटेलला फोन करून खायला मागवत असत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हाच दिनक्रम चालला. काकांना एकदम कृतकृत्य वाटलं. खरोखर आपल्या जिवंतपणी त्यांनी स्वतःचा मरणसोहळा पाहिला. आपल्या माघारी किती लोक आपल्याविषयी चांगले बोलतील, कोणाला खरंच किती वाईट वाटेल हे पण त्यांना जोखायला मिळालं. अर्थात त्याने कोणाला काही फरक पडणार नव्हता.
नवा मोबाईल आल्यानंतर काकांनी खालील प्रमाणे पोस्ट टाकली. तोपर्यंत इतरांनी घडलेली खरी घटना, घडलेली मजा मजा, काकांचा सर्वांसोबत बसलेला नाष्टा करतानाचा फोटो शेअर केला होता.
माझ्या सोशल मीडियावरील परमप्रिय मित्रांनो, काल तुमच्या दिसलेल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. मला वाटत होते, ही एक आभासी दुनिया आहे येथे कोणी कोणाचा नाही. परंतु ना ओळखीच्यांना पाळखीच्या अशा कित्येक लोकांनी काल माझी चौकशी केली. मला फोन केले आणि याची देही याची डोळा माझे मरण मी बघितले .आत्ता मी कृतकृत्य आहे फक्त एकच विनंती करतो एकाने आर आय पी टाकले म्हणून प्रत्येकाने डोळे झाकून कसे काय टाकले जरा डोळे उघडून पोस्ट बघत जा अशा न बघता केलेल्या फॉरवर्ड पोस्टमुळे कित्येक वेळा जातीजातीमध्ये विषारी मेसेज संदेश जातो कधी यातूनच दंगे भडकतात आणि मी स्वतः देखील आता सोशल मीडिया पासून थोडीशी निवृत्ती घेत आहे. कारण म्हणतात ना! "अती तेथे माती" या दोन दिवसात माझा मोबाईल अचानक वॉशरूम मध्ये पडल्यामुळे मी सैरभैर झालो होतो खरा, परंतु अशा वेळी माझ्या जुन्या छंदाने मला आधार दिला. आणि माझी पुस्तक वाचण्याची आवड पुन्हा एकदा निर्माण झाली. असो जगाच्या घडामोडी काय चालू आहेत बघितल्याच पाहिजेत,पण अतिरेक नको. आपले जुने छंद सांभाळा. अर्थात मी दिवसातून एकदा तुम्हाला सोशल मीडियावर दिसणारच आहे.
तुमचा
फेसबुक काका