नकुल
नकुल


नकुल उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आजोळी आला होता, त्याचे आजोळ कोकणात होते. तो कधी एकदा सुट्ट्या लागतात आणि आपण मामाकडे जातो याची वाटच पाहत असायचा. आंबे फणस यांची बागच असल्यामुळे खाण्याची तर खूपच मजाच असायची. शिवाय आजी आंब्याचीअढी लावायची. सकाळी उठल्यावर बच्चे कंपनी तोंड नाही धुतलं की लगेचच ज्या खोलीमध्ये आंबे ठेवलेले असायचे त्या रूम मध्ये जाऊन बसायचे. पूर्वीची ती बाळंतपणाची खोली, तेव्हा घरात एक ना एक बाळंतीण कायम असायची, तिच्यासाठी एक प्रकारे आयसोलेशनच असायचे. आता मात्र आजी आजोबा दोघेच एवढ्या मोठ्या वाड्यात राहत असल्यामुळे, एरवी त्या खोल्या उघडल्या जायच्याच नाहीत फक्त आंब्याचा सिझन आला की अढी लावण्यासाठी गड्याकडून साफसफाई करून घेतली जायची. नकुल त्याची बहीण गार्गी, रेखा मावशीच्या दोन मुली नंदू आणि वंदू नंदिनी आणि वंदना, आणि मामाची दोन मुले आदित्य आणि मंदार, अशी सहा जणांचे टीम धुडगूस घालत असायची. आजोबा बागेमध्ये झोपाळा बांधून घ्यायचे, मुलांसाठी छोटीशी झोपडी तयार करायचे, ऐन उन्हाच्या वेळेत मुलं घरात न थांबता त्या झोपडीत जाऊन लोळत पडायची. बागेच्या पाठीमागेच समुद्र असल्याने समुद्राची गाज ऐकण्याची त्यांना मजा वाटायची. त्या दिवशी सकाळी सकाळीच नेहमीप्रमाणे बच्चेकंपनी तोंड धुवून आंब्याच्या आढीपाशी बसायला निघाली. मी पुढे, की तू पुढे अशी सगळ्यांची शर्यतच होती, मुले आधी जाऊन बसत, नंतर आजोबा मागून येत. आंब्याची आढी वर खाली करत त्यातील थोडेसे खराब होऊ घातलेले आंबे बाहेर काढायचे, आणि कापून कापून मुलांच्या प्रत्येकाच्या डिशमध्ये थर लावायचा. त्यानेच मुलांचे पोट गच्च भरत असे, सकाळचा वेगळा नाश्ता करण्याची गरजच नसायची, कलमांची बागच असल्यामुळे, अगदी दुबई पर्यंत आंबा पाठवला तरी घरात भरपूर राहायचा. शिवाय रायवळ आंबे देखील होतेच, त्यामुळे आजी आजोबा पण नातवंडांची आतुरतेने वाट पाहत असायचे. त्या खोलीत एक मिणमिणता मंद असा बल्ब असायचा. सगळे खोलीत जाऊन बसले, मागून हसत हसत आजोबा आले, आधी मला, आधी मला, असा नातवंडांचा गोंधळ चालू होता. अरे गाढवांनो! रोज तर आंबे खाताय आणि तरी मला मला करताय आजोबा लटक्या रागाने म्हणाले. सर्वांना मिळणार शांत बसा! आजोबांनी आदेश दिला, त्याबरोबर सगळी नातवंडे शांत बसली, आणि अचानक नकुल ने कान टवकारले, त्याला कुठून तरी फुस् फुस् 🪱🪱 असा आवाज येत होता. आता आजोबा आढीवरील गवताला हात घालणार तेवढ्यात नकुल आजोबा थांबा! असे जोरात ओरडला, त्याबरोबर आजोबांनी आपला हात एकदम मागे घेतला, बाकी देखील शांत झाले. आणि खरोखर गवतामध्ये खसफस होऊ लागली. आता मात्र आजोबांना पण कसली तरी शंका आली आणि पहिले त्यांनी सर्व नातवंडांना त्या खोलीतून बाहेर काढले. रामजी जल्दी आओ कोकणात पण आता अनेक ठिकाणी भैय्या लोक, सालगडी म्हणून राहत होते. रामजीला काय समजायचं ते समजलं आणि तो हातामध्ये चार्जिंग बॅटरी आणि काठी घेऊनच आला. पाहतात तर त्या आंब्याच्या आढीवर गवतात एक नागोबा आपला फणा काढून बसलेला होता. कुठून आला? कसा आला? माहित नाही पण तो तिथे अंधारी जागा आणि गवत पाहून येऊन बसला होता. "अरे लोक म्हणतात हा धनावर जाऊन बसतो, पण हा तर आंब्यांवर येऊन बसला आहे. याच्या खाली काय पूर्वजांनी काही धन लपवले आहे की काय? आजोबा विनोदाने म्हणाले, त्यात पण त्यांचे विनोद बुद्धी जागृत होती. अहो आंबा म्हणजे धनच आहे की आपण दुबईला पाठवतो ना येतात ना पैसे आजी म्हणाली. साबजी अब इसका क्या करनेका रामजी ने विचारले, आजोबा त्याला मारू नका! नकुल म्हणाला, नुकतेच त्यांना शाळेमध्ये सर्पां विषयी माहिती दिली होती. आणि सगळेच साप विषारी नसतात आणि ते शेतकऱ्याचे मित्र असतात याबाबत नुकतच ताजं ताजं ज्ञान त्याला मिळालं होतं. अरे बाळा मी त्याला नाही मारणार! तुला माहित आहे का मी एग्रीकल्चर मधला पदवीधर आहे. माझ्याकडे सर्प मित्राचा फोन नंबर आहे. आजोबांनी तालुक्याच्या गावी राहणाऱ्या सर्प मित्राला फोन केला आणि रूम बंद करून घेतली. आजी आज नाश्त्याला आंबे नाहीत, आज उकडपेंड कर बरं आजोबांनी ऑर्डर दिली. आजोबा उकडपेंड म्हणजे काय ? अरे नव्या पिढीला माहितीच नाही आजी काय मस्त बनवते बघा. +++++++++++++++ सर्पमित्र मंगेश आणि त्याचा मित्र मोटरसायकल वरती आले, आणि त्या नागराजाला घेऊन गेले त्याला पकडण्याचा थरार, सारे कुतूहलाने खोलीच्या बाहेरून पाहत होते. पण आजोबा तो एवढी मोटरसायकल घेऊन आला स्वतःचा वेळ दिला त्याला काहीतरी दिले पाहिजे ना, सर्पमित्र घेत नाहीत पण मी स्वतःहून त्याला काही पैसे जिपे केले आहेत आजोबा म्हणाले. ते मॉडर्न आजोबा होते. सगळी मंडळी ओसरीवरती कोंडाळ करून बसली. नाश्ता करता करता त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. नकुल तू आजोबांचा जीव आज वाचवला आहेस! खरंच बाळा तुझ्यासाठी काय करू? जीव ओवाळून टाकला तरी कमी आहे तुला काय पाहिजे ते माग यावेळी तुला स्पेशल गिफ्ट. आजी म्हणाली आणि तुम्हाला कसं समजत नाही हो! आयुष्य गेलं कोकणामध्ये, आणि तुम्ही म्हणे कृषी पदवीधर डायरेक्ट त्या अंधारामध्ये तुम्ही गवतात हात कसा काय घालता? आजी आजोबांना ओरडली, आजोबा खाली मान घालून बसले सगळे नातवंडे हसू लागली. अगं ह्या पोरांच्या गोंधळात मला आवाज आला नाही आजोबा नरम आवाजात बोलले. पण नकुल तुला मात्र मानलं पाहिजे बुवा! तुझं नावच नकुल आहे. तू बरोबर सर्पाचा आवाज ऐकलास, नकुल म्हणजे काय माहिती का तुला? हो आजोबा नकुल म्हणजे मुंगूस आणि दुसरा नकुल तुला माहित आहे का? हो आजोबा आम्ही टीव्ही वरती महाभारत पाहिल्यामुळे नकुल माहित आहे. पण तुम्हाला फक्त नकुलच नाव माहित आहे. नकुल याचा अर्थ साहसी, सुंदर, ताकतवर, आणि न्यायी असा होतो आजोबा म्हणाले. आहेच माझा नकुल साहसी आणि सुंदर आजी म्हणाली. पण नकुल तुला कळलं कसं की तिथे काहीतरी आहे किंवा सर्प आहे. आजोबा नुकतंच आम्हाला शाळेमध्ये सर्पांची माहिती दिली होती. त्यात विषारी आणि बिनविषारी सापाबद्दल आणि त्यांच्या सवयीं बद्दल सांगितले होते. शिवाय काही सर्पमित्रांनी शाळेत येऊन आम्हाला विविध जाती आणि त्यांची प्रात्यक्षिक देखील दाखवली होती. त्यामुळे माझ्या हे ताबडतोब लक्षात आले. सांग बरं विषारी आणि बिनविषारी साप तुझ्या बाकीच्या भावंडांना पण माहिती दे आजोबा म्हणाले. मग नकुल ने वर्गात शिकवल्याप्रमाणे जे काही त्याच्या लक्षात होते ते सांगितले. विषारी सापांमध्ये नाग, फण्या (कोब्रा), घोणस, मण्यार आणि龙 (क्राईट) यांचा समावेश होतो. बिनविषारी सापांमध्ये अजगर, धामण, दिवड, गवता, वाळा सर्प, तस्कर, पाणसाप, हरणटोळ, उंदीर साप, इत्यादींचा समावेश होतो. त्यांना कसे ओळखायचे आणि सावध कसे राहायचे हे सांगितले. मग आजोबांनी पण, कोकणातील माणसे हातात काठी घेऊन पाय आपटत का चालतात ते सांगितले, सापांना कान नसतात परंतु पाय आपटल्यानंतर त्या व्हायब्रेशनने ते आपल्या रस्त्यातून घाबरून बाजूला जातात. चला आता साप पुराण बास झालं, पोरांना नाश्ता करू द्या! आणि उगाच नाव घेतलं तर रात्रीचे घरात येतील. मुलांना घाबरून झोप लागायचे नाही आणि पुन्हा पोरं इकडे यायला पाहणार नाहीत आजी ओरडली. तिने नव नागाचे स्तोत्र सुरू केले अनंत, वासुकी, शेषं, पद्मनाभं च कम्वलं शंखपालं, धृतराष्ट्रकंच, तक्षकं, कालियं तथा एतानि नवनामानि नागानाम् च महात्मना सायंकाले पठेन्नित्यम् प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयं नास्ति, सर्वत्र विजयी भवेत् । काय ग आजी तू स्तोत्र म्हणण्याने साप येणार नाहीत का? बाळा साप येतील पण आपल्याला भीती वाटणार नाही न घाबरण्याबद्दल एक मानसिक बळ मिळेल, माणसाने सजग राहिलंच पाहिजे, पण आपल्या स्तोत्रमंत्रात पण शक्ती आहे ती पण विसरायची नसते आजी म्हणाली. थांबा मी आता मंत्रच टाकते म्हणजे हे पुन्हा येणार नाहीत. *अस्तिक अस्तिक तुला रामाची शपथ* शेवटी आजीने आपला राममंत्र सोडलाच. 🪱🪱🪱🪱🪱🪱