पण अहंकार आडवा आला
पण अहंकार आडवा आला


14 मे 2025
पण अहंकार आडवा आला
त्यादिवशी एका नातेवाईकांचे लग्न होत, त्या लग्नामध्ये बेबी येणार हे निश्चित,
बेबी माझी छोटी बहीण.
खरंतर अगदी लाडकी, शाळेत पण माझ्या बोटाला धरून यायची, उशीर झाल्याबद्दल तिच्या ऐवजी च्या छड्या मी खाल्लेल्या आहेत,
पण कुठे काय बीनसलं माहित नाही.
खरे तर दोघी पण सुखी संसारात होतो, दोघींची मुलं पण तशी यशस्वी होती.
पण सुरुवातीच्या काळात उगाचच एकमेकीशी स्पर्धा व्हायची.
बेबीचा रमेश माझ्या राजेश पेक्षा हुशार निघाला, आणि चांगल्या मार्कांनी पास होऊन तो डॉक्टर झाला, आणि परदेशात गेला.
तिथे कुठेतरी असूयेची ठिणगी पडली. उगाचच दोन बहिणींमध्ये दुरावा निर्माण झाला, त्यातच अजून आग लावणारे नातेवाईक असतात. मला सांगायचे बेबी तुझ्याबद्दल असं बोलत होती, तिला सांगायचे ताई तुझ्याबद्दल असं सांगत होती. तेव्हा ते दोघींनाही कळत नव्हतं पण माझ्यापेक्षा तशी बेबी समंजस होती.
अगदी लहानपणापासून बऱ्याच वेळा मी मोठी असून देखील मी दादागिरीने वागायची आणि माझ्यात समंजसपणा नव्हताच.
पण माझ्यासाठी बेबी माघार घ्यायची.
माझा मुलगा इथेच शिकून ,इथेच नोकरीला लागला. तोही चांगल्या पदावर होता, पण माझ्या मनात तिच्याबद्दल जी काही अढी निर्माण झाली ती अनेक वर्ष टिकली.
खरे तर आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते, दोघीही साठीच्या पुढे गेलो होतो .
"संध्या छाया भिवविती हृदया" असे म्हणण्याचे वय होते.
गेले दहा ते पंधरा वर्षे दोघींमध्ये अबोला होता, एकमेकीच्या घरी येणं जाणंही नव्हतं, अशीच आडून आडून एकमेकीची खाली खुशाली विचारायचो कोणीतरी सांगायचं तोच आमच्या दोघींमधला दुवा .
पण या लग्नाला मात्र बेबीचं दोन्हीकडून नातं होतं. त्यामुळे ती येणार, खूप दिवसांनी आपली बहीण दिसणार म्हणून मनात आनंद झाला.
मी अगदी यावेळी ठरवून ठेवलं होतं झालं गेलं विसरून जायचं चूक कोणाची का असेना! शेवटी आपण मोठे आहोत ना आणि आता आयुष्याचे राहिले कितीसे दिवस? कोणाला माहिती.
तरी पण एक मन बेबीला जळवायच्या गोष्टी करत होत.
मी भारीतली भारी साडी नेसायला काढली. शिवाय अगदी नखाशिकांत दागिन्याने मढले.
अगं आई लग्न दुसऱ्याच आहे, नवरीपेक्षा जास्त तर तूच नटलेली आहेस शेवटी मुलगा म्हणाला
जाऊ दे रे तुला काय कळतंय त्यातलं !
आई मला सगळं कळतंय, तुला बेबी मावशीला सगळं दाखवायच आहे.
मुलाने माझ्या दुखत्या नसे वरती बोट ठेवलं .
असू दे असू दे तुला काय करायचंय ?
असेल ती तिच्या घरची मोठी, तिचा पोरगा फॉरेनला आहे ना तो तिला रग्गड पैसा पाठवत असेल.
ती माझ्यासमोर येईल नटून थटून मला कमीपणा दाखवायला.
मी कशाला कमी राहू? ती काय देऊन घेऊन थकली आहे.
आई मावशी खूप चांगली आहे तिच्या मनात असलं काही नसतं, ते तुझ्याच मनात असतं.
राजेश बोलला
हो रे बाबा तुम्ही पण मावशीला धार्जिणे, जसं काय आईच वाईट आहे.
**""""***""""****
त्या लग्नात बेबी मात्र अगदी साधेपणाने आली होती. एखाद्या सरस्वती सारखी पांढऱ्या रंगाची सोनेरी काठाची पैठणी, त्यावर ठसठशीत चार मोत्याचे दागिने. आणि एक मोठ मंगळसूत्र बस!
ते बघून माझ्या जिवाचा अजून
जळ फळाट झाला . काय हे मुद्दामच अशी वागते. एवढा पैसा असून मी किती साधी आहे हे लोकांना दाखवायला.
आहे ना हिच्याकडे रगड, यावं की घालून.
नंतर मात्र माझी मला शरम वाटू लागली खरंच आपल्या अंगी मोठेपणा नाही ,
बेबी अशी विनाकारण कोणाला जळवण्यासाठी वागणारी नाही.
आपण तिला लहानपणापासून ओळखतो.
आपलंच चुकतंय
जाऊदे झालं गेलं विसरून जावं .
पण ती समोर आली की माझा अहंकार फणा काढून उभा राहत होता. मीच का स्वतःहून बोलायचं असं वाटत होतं.
ती दोनदा माझ्याकडे पाहून हसली सुद्धा
पण मी जणू पाहिलंच नाही अशी वागले.
मग नंतर बेबी पण माझ्याजवळ आली नाही माझ्यापासून लांब लांबच राहू लागली.
नंतर जेवण झाली आणि शेवटी निघण्याची वेळ आली. दहा वेळा माझ्या मनात येत होतं की आपलं चुकतंय! आपण जाऊन बेबी शी बोलायला पाहिजे.
मनात वाईटही वाटत होतं, असं वाटत होतं जवळ जावं , धाकट्या बहिणीला जवळ घ्यावं मागचं झालं गेलं सोडून द्यावं सुखा दुखाच्या दोन गोष्टी कराव्या.
पण अहंकार आडवा येत होता.
शेवटी बेबी माझ्याकडे पहात पहात कार मध्ये बसली आणि निघून गेली
आणि माझ्या मनातला अहंकाराचा फणा अजूनही ताठ उभा होता .