Jyoti gosavi

Classics Inspirational Children

3.8  

Jyoti gosavi

Classics Inspirational Children

लेक वाचवा

लेक वाचवा

7 mins
617


एका रेडिओ केंद्रावरती बातम्या चालू आहेत...

आकाशवाणीचे हे मुंबई केंद्र आहे.आजच्या ठळक महत्त्वाच्या बातम्या , स्त्री आणि पुरुष यांच्या जन्मदरात कमालीची तफावत पडलेली असून त्यांचा रेशो एक हजार पुरुषांमागे पाचशे स्त्रिया असा झाला आहे.सरकारने याचा गांभीर्याने विचार केला असून त्यासाठी उपाययोजना म्हणून तातडीची पावले उचलली आहेत .माननीय मुख्यमंत्री यांनी आज चार ठिकाणी पुरुष भ्रुणहत्या गर्भपात केंद्रे ऊभारलेली असून, आज त्यांचे उद्घाटन केलेले आहे.त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले नसून गरजूनी त्याचा त्वरित लाभ घ्यावा .


दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे ,सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांना अत्यंत डोकेदुखीची गोष्ट असून, त्यांच्या स्त्रियांना पळवण्याचा धोका निर्माण झालेला आहे.त्यासाठी आताच हाती आलेल्या गुप्त बातमीनुसार, या गोष्टीसाठी आणि टोळ्या सक्रीय झाल्या असून, शक्यतो स्त्रियांनी आपल्या घराच्या बाहेर पडू नये.बाहेरील गरजेची सर्व कामे पुरुषांनी उरकावी.आपल्या घराला तीन-तीन सेफ्टी डोअर लावून घ्यावीत.सीसीटीव्ही कॅमेरा लावून ठेवावा.तसेच तुमच्या सोसायटीचे वाॅचमन देखील त्यांना सामील असू शकतात .त्यामुळे कोणी अनोळखी मंडळींना घेऊन वाॅचमन जरी आला तरी दरवाजा उघडू नये.

जनहितार्थ जारी

*********************


स्थळ दुसरे (विवाह मंगल कार्यालय) 

लग्नाची घटिका भरलेली आहे.सर्वजण हातामध्ये अक्षदा घेऊन वरांची वाट पहात आहेत.सर्व असे दचकू नका, तुम्ही बरोबर ऐकलेले आहे. सर्व मंडळी एका वराची नव्हे तर अनेक वरांची वाट बघत आहे. वधू केव्हाच तयार होऊन पाटावर येऊन बसलेली आहे. आणि एकामागून एक एकामागून एक असे पाच वर हातात वरमाला घेऊन येतात .ते आले की टाळ्यांचा कडकडाट होतो. जिंकलस बेटा! तुला बायको तरी मिळाली. आम्हाला कधी मिळेल ते देवालाच ठाऊक वरांचे मित्र स्वतःचीच बडबडत होते. आणि वराचे अभिनंदन पण करत होते. अक्षदा पडण्याआधी प्रत्येक वराकडून एग्रीमेंट साईन करून घेतले जात होते. त्या एग्रीमेंट मधील मसुदा खालील प्रमाणे. 


करारनामा

ईप्रथम पक्षीय श्रीमती चारुलता मानकापे यांच्याशी आपण स्वखुषीने विवाह प्रस्ताव ठेवलेला असून, तो त्यांनी खालील अटी आणि शर्ती नुसार मंजूर केलेला आहे. जर आपल्या कडून त्याचा भंग झाला तर आपोआप हा विवाह रद्द समजला जाईल. 

1) वधूला आपण जर महा दहा हजार रुपये वर खर्चासाठी द्यावयाचे आहेत. 

2) मेकअप, पावडर, लिपस्टिक, महिन्यातून एकदा ब्युटीपार्लर, इत्यादी खर्च करावयाचा आहे. 

3) मुलगी स्वयंपाक घरात पाऊल देखील ठेवणार नाही. त्याची व्यवस्था वरालाच करावयाची आहे. 

4) स्त्रीधन म्हणून दिलेले दागिने परत मिळणार नाहीत. 

5) मुलगी एका वेळी पाच पुरुषांशी विवाह करीत असून, प्रत्येकाकडे दोन दोन महिने राहील. उरलेले दोन महिने तिच्या स्वतःच्या मालकीचे असून तिने ते स्वतःसाठी राखून ठेवलेले आहेत. 

6) एका पतीकडून दुसऱ्या पतीकडे जाताना ती द्रोपदी प्रमाणे अग्निदिव्य वगैरे करणार नाही. याउलट जर एखादा पती तिला आवडला असेल तर त्याच्याकडे हवा तेवढा वेळ, आणि हवे तेवढे दिवस राहण्याचा अधिकार ती राखून ठेवत आहे. 

तसेच एखादा पती आवडला नसेल तरीदेखील त्याच्याकडे दोन महिन्याचा कालावधी ती पुर्ण करेल. 


7) मूल जन्माला घालणं हे तिच्या इच्छेवर अवलंबून असून त्याबाबत कोणीही तिच्यावर जबरदस्ती करू नये. 

8) एखाद्या पुरुषाला मुल हवे असेल आणि स्त्रीची देखील संमती असेल तरी मूल जन्माला घातल्यानंतर त्याचे पालन पोषण, त्याला लहानाचे मोठे करणे याबाबतीत पत्नी जबाबदार राहणार नाही आणि जबाबदारी देखील देणार नाही. 

वरील सर्व मुद्दे जर आपणास मान्य असतील तरच आपण या विवाहास उभे रहावे अन्यथा आपण आपल्या मार्गाने जाऊ शकता. 

______*****______****


भाग तिसरा

(वेळ रात्रीची सुनसान रस्ता)

एका गाडीत एक कुटुंब चाललेले आहे. नवरा-बायको आणि दोन आठ ते दहा वयोगटातील मुले .पुरुष गाडी चालवत आहे स्त्री आणि मुले मागे बसलेली आहेत. हातात बंदुका घेतलेले चार बुरखाधारी तरुण त्या गाडीत पुढे येतात ,पुरुष घाबरून गाडी थांबवतो. ते तरुण गाडीतील स्त्रीला खाली खेचू लागतात. मुले आई -आई करून ओरडत असतात. तो तरुण गाडीतून खाली उतरतो, व त्या गुंडां पुढे हात जोडून गयावया करू लागतो. तुम्हाला काय पाहिजे ते घ्या पण आम्हाला सोडा. घड्याळ, अंगठी, मोबाईल तिचे मंगळसूत्र सर्व काही घ्या, पण आम्हाला सोडा. त्यांच्यातील एक तरुण बोलतो "ओ साहेब! आम्हाला यातलं काहीच नको. ते तुमचं तुम्हालाच लखलाभ. आम्हाला फक्त तुमची बायको पाहिजे . पाया पडतो पण तिला हात देखील लावू नका . 

 हे बघा माझं पैशाचं पाकीट, त्यामध्ये पन्नास हजार आहेत. हवे तर अजून एक लाख देतो पण तिला हात लावू नका. पाहिजे तर गाडी पण घेऊन जा, पण मला , माझ्या बायकोला, माझ्या कुटुंबाला सोडा. 

अरे तुला आम्ही काहीच करत नाही. तुझी पोरं घेऊन तू चालला जा.आम्हाला फक्त बायको पाहिजे .

नका हो! तुमच्या पाया पडतो. 

ये फुकणीच्या तुला काय मराठी भाषा समजत नाही. तुला काय मराठी कळत नाही. तुझा पैसा तुलाच ठेव! आम्हाला फक्त तुझी बायको पाहिजे. तुला बायको मिळाली, तू तिच्याबरोबर सुखाचा दहा वर्ष संसार केला, बास की आता! 

आता आम्हाला पण दे ना बायको. आम्ही काय असच राहायचं? आम्हाला पण बायको पाहिजे. अहो माझी दोन लहान पोरं आहेत. त्यांचं काय? त्यांना कोण बघेल? 

तू मस्त दहा पंधरा वर्ष संसार केलास ना? दोन पोरं पण झाली ना? 

ती आता आमच्या बरोबर लगीन करणार .आणि आम्ही पण तिच्याबरोबर संसार करणार. 

म्हणत असशील तर, तुझी दोन्ही पोरं पण बरोबर नेतो.

तो तरूण नको नको म्हणतो आणि दोन्ही हाताने आपली मुले कवटाळतो. बायको त्याच्या नावाने आक्रोश करत राहते. मुले देखील आईसाठी टाहो फोडत असतात. पण ते गुंड तिला ओढून नेतात

*****+++++*****++++

प्रसंग चौथा


नवरा धावत धावत पोलिस स्टेशनला जातो आणि पोलिसांना आपली बायको गुंडाने पळवून नेल्याची तक्रार नोंदवण्यात सांगतो. त्यावर पोलिस त्याला सांगतो, "अहो! ही सकाळपासून पन्नासावी केस आहे. गुंडांनी बायको पळवून नेल्याची.  आता बायकाच उरलेल्या नाहीत तर गरीब लोकांनी तरी कुठे जायचं? हे आता असच चालणार. 

अहो पोलीस दादा म्हणून काय त्यांनी आमच्या लग्नाच्या बायका पळवायच्या? 

आता! गरीबांना बायका नाही त्याला आम्ही काय करावं? 

पोलीस -आम्ही तरी कुठे कुठे शोधणार? आता आमच्या बायका सुरक्षित राहिल्या म्हणजे नशीब.

 का रे माने! बरोबर आहे ना? 

 हा!हा! हा! आपल्या कॉन्स्टेबल मानेकडे पहात पोलीस विकृतपणे हसला. 

होय साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. गरिबांनी तरी कुठे जायचं?  

पैसेवाल्यांकडे आज बायका आहेत. पण बाकीच्यांनी काय करायचं?

 नवरा- साहेब काय पाहिजे तर चहापाणी घ्या? पण माझी बायको शोधा हो साहेब! तुमच्या पाया पडतो.

 पोलीस अरे वा रे वा! बायको सारखी गोष्ट काय फक्त चहा पाण्याने सापडते का? त्याला जेवण द्यावे लागते, जेवण! कळले का?

 नवरा- साहेब किती रुपयाचे ताट पाहिजे ते फक्त सांगा! माझी बायको मला मिळवून द्या साहेब, माझे दोन लहान मुलं पण आहेत. 

हे बघा एका ताटाला 50000 पडतात. आता तसे आम्ही दोघे आहोत. म्हणजे दोन ताटांचे पैसे द्या. संध्याकाळी तुमची बायको घरात येईल बघा! 

तो माणूस दोन ताटांचे पैसे हातात देऊ लागतो. वो साहेब! आम्हाला काय करायचे पैसे? पोलिस वाला त्याच्यावरच डाफरतो.

हे बघा समोर ते हॉटेल "झोलझाल" झाल दिसते आहे ना! तिथे जा आणि दोन जेवणाची ऑर्डर द्या. आम्ही जनतेचे शेवक आम्ही पैशाला हात देखील लावत नाही. 

जा जा जेवणाची ऑर्डर द्या लई भूक लागली. 

तो माणूस समोर झोलझाल मध्ये ऑर्डर द्यायला जातो

-----+++++-----++++---

प्रसंग पाचवा

सकाळी त्याची कंप्लेंट घेणारे दोन पोलीस दादा, बाईला पळवणारे ते चार गुंड, आणि हॉटेल "झोल झाल" चा मालक एका टेबलभोवती बसून हसत-खिदळत एकमेकांना टाळ्या देत चहा पीत असतात.

काय रे शिवा! आज-काल बारक्या सारखा चोऱ्या करण्यापेक्षा हा धंदा लई बरा आहे. दिवसाकाठी दहा-पंधरा हजाराला मरण नाही. शिवाचा साथीदार बोलतो. 

अरे बाबा सगळं खरं आहे पण जरा जपून एकच बाईला पुन्हा पुन्हा पळवू नका. ते परवा तर तुम्ही नगरसेवकाची बायकोच पळवली. नशीब थोडक्यात प्रकरण रफादफा केलं. नाहीतर उद्या एखादं प्रकरण आपल्या अंगावर शेकल जायचं. 

अहो साहेब! आम्हाला काय माहित ती नगरसेवकाची बायको आहे म्हणून. 

बरं बरं चला, जपून राहा. उगाच कोणीतरी बघेल. एक तर हा आता नेटचा जमाना. कोणीतरी व्हिडिओ बनवेल, आणि नेटवर टाकेल. आपलं सगळंच पितळ उघडे पडेल. 

आणि हो बंड्या! दारू पिताना जास्त तराट होऊ नको .नाहीतर नशेच्या च्या नादात काहीतरी बडबड करशील आणि सगळ्यांनाच आत मध्ये घालशील. 


---------++++++---------

प्रसंग सहावा


कवी संमेलन


 विषय अर्थात स्त्री/ बायको


पहिला कवी-

 मिस्टर स. दा. रडे (फ्युजन सादर करतो) 

असेल कशीही तरी, 

 चालेल मेरेको'

 देवा मला हवी

 फक्त एक बायको'

असुदे काळी ,असुदे गोरी

 असुदे शहाणी वा सायको

देवा मला हवी, फक्त एक बायको. 

 अगर मिली मुझे परी

 तो तुम जलता है कायको? देवा मला हवी 

फक्त बायको


2) दुसरा कवी (पारंपरिक गीत) 


देवा मला दे एक बायको अशी

 साडी, ड्रेस रोज देईन नवा

 दर दिवशी -दर दिवशी 

देवा मला दे एक बायको अशी 


 लाडकोड तिचे पुरवीन सारे

लागू नाही देणार तीला 

ऊन पाऊस वारे 

ठेवीन तिला थाटामध्ये

 राणी जशी, राणी जशी

देवा मला दे एक बायको अशी. 

तिच्यासाठी करेल मी

 स्वयंपाक पाणी

 केरवारे करीन, सारी भांडी धुणी

 बिछाने ही मीच टाकीन (गद्य) 

बिछाने ही मीच टाकेन

 देईन रेशमी उशी, रेशमी उशी

 देवा मला दे एक बायको अशी

 नाही करणार नवरे शाही, 

नाही करणार जाचं 

 तिच्या तालावरती मी करेन नाच

 तिच्यासमोर पिळणार नाही

 कधी मी मिशी, कधी मी मिशी

 देवा मला दे एक बायको अशी


3) तिसरी कविता( गद्य प्रकार मुक्त काव्य) 

 सोबत कोरस

 कवी उठून उभा राहतो. अंगामध्ये जॅकेट, खांद्याला झोळी

गोरी असो वा काळी असो पण प्रत्येकाला एक

 बायको पाहिजे

 मुकी बहिरी चालेल? कोरस -हो चालेल! 

कवी-लंगडी लुळी चालेल? 

कोरस हो हो चालेल! 

तोतरी -मोतरी चालेल?

 कोरस_ हो चालेल! 

ठेंगणी ठुसकी चालेल? 

कोरस- हो चालेल! 

जाडीभरडी चालेल? 

कोरस- हो चालेल! 

काळीपिवळी चालेल?

 कोरसमधील एक जण म्हणतो, अहो काय टॅक्सी आहे का? 

कवी- अहो तसं नाही, काळी म्हणजे आफ्रिकन, पिवळी म्हणजे चिनी ,

कोरस मधील एक जण अहो चिनी वस्तूंवर बॅन आहे ना ?नको नको पिवळी नको. 

दुसरा एक जण बोलतो, नाही नाही बाकीच्या चिनी वस्तूवर बयान आहे, बायकोवर नाही. 

तेव्हा चिनी, जपानी, आफ्रिकन, अमेरिकन, युरोपियन ,इतकेच काय मंगोलियन देखील चालेल. 

पण फक्त बायको मिळाली म्हणजे झालं. 

"बोला पुंडलिक वरदा, हारी विठ्ठल 

आमच्या लग्नाचं कधी जमल? 

पंढरीनाथ महाराज की जय. 


4) चौथा कवी

 (विद्रोही कवी)

 किती दिवस आम्ही उपाशीच राहायच? 

हे खातात तुपाशी, आम्ही मात्र उपाशी. 

 काळ्या- बेंद्र्या बायका, आम्हालाच का म्हणून? 

गोऱ्या गोऱ्या बायका तुम्हालाच का म्हणून? 

 आता आम्ही हे सहन नाही करणार

 तुमच्या बायका आम्ही पळूवूनच आणणार

आम्हाला देखील वाटते बायको असावी सुंदर

 जरी तिच्यापुढे आम्ही दिसतो बंदर

 कोण म्हणतो देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही? 

तेवढ्या मध्ये एक खरोखरीची सुंदर स्त्री कविसंमेलनात येते ,आणि सर्व कवी तिच्या मागे मॅडम इथे बसा, मॅडम तिथे बसा, मॅडम चहा आणू का? मॅडम कॉफी आणू का? असे म्हणून तिच्या मागे मागे धावत असतात, आणि बिचारा हा विद्रोही कवी बेंबीच्या देठापासून एकटाच ओरडत राहतो. 


तर मंडळी काळाची पावले ओळखा, वेळेत सावध व्हा. नाहीतर स्त्री ही चित्रात किंवा आरशात बघण्याची गोष्ट होईल .समाज व्यवस्था कोसळून पडेल. सगळीकडे अराजक माजेल. कोणतीच स्त्री सुखाने जगू शकणार नाही .रस्त्यावर वावरू शकणार नाही. कथेत सांगितल्याप्रमाणे खरोखरी तिची पळवापळवी होईल. किंवा स्त्रीसत्ताक पद्धत येऊन एका स्त्रीला पाच पाच नवरे करावे लागतील. तुम्हाला मुलगी, आई, काकी, मामी, आत्या, प्रिया,

मैत्रीण, बायको ही सारी गोड नाती निभावण्यासाठी तरी मुलगी हवी आहे ना? तर मग मुलीचा जन्म स्वीकारा. 


मुलापेक्षा मुलगी बरी। प्रकाश देते दोन्ही घरी।।

+++++++++++++++++


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics