Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

गुढीपाडव्याची आठवण

गुढीपाडव्याची आठवण

2 mins
22


23 मार्च 1966 आस्मादिकांचा जन्मदिवस, त्यादिवशी चैत्रशुद्ध प्रतिपदा हा दिवस होता म्हणजेच गुढीपाडवा, 

त्यामुळे माझा वाढदिवस दोनदा होतो .

पूर्वी तर माझे आई-वडील गुढीपाडव्या दिवशीच माझा वाढदिवस करत असत, नंतर मी लग्न झाल्यावर तारखेनुसार करू लागले , आजही माझ्या बहिणी गुढीपाडव्यालाच मला फोन करतात आणि वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करतात.

 कारण गुढीपाडव्याला गृहिणीला वाढदिवस म्हणून स्वतःच्या जीवाची मुंबई करता येत नाही, तर घर कामात आणि नैवेद्यात लक्ष द्यावे लागते.


पण लहानपणीच्या अनेक आठवणी आहेत. त्यातीलच *गुढीपाडव्याची आठवण*

 आई मला आदल्या दिवशी विचारणार "*आसोबा*" उद्या तुझ्या वाढदिवसाला काय करायचं?

आणि माझं ठरलेलं उत्तर

 पाकातल्या पुऱ्या,.

 जगापेक्षा नेहमी मला काहीतरी वेगळंच आवडायचं ,तेव्हा असेही मिठाईचे पदार्थ किंवा त्याची रेलचेल नव्हती, श्रीखंड सुद्धा खेडेगावापर्यंत पोहोचलेलं नव्हतं, कधीतरी चक्का लावून केलं तर केलं !

पुरणपोळी प्रत्येक सणालाच होत असायची, त्यामुळे मला काहीतरी वेगळा ॲटम पाहिजे असायचा.

 तो म्हणजे आईच्या हाताच्या खुसखुशीत गोड गोड पाकातल्या पुऱ्या.

 दरवर्षी बहुदा पाडव्याच्या निमित्ताने पाकातल्या पुऱ्या माझ्यासाठी व्हायच्या,

 दुसरी गोष्ट आहे "साखर माळा" इकडे आल्यावर तिला साखर माळ म्हणतात हे माहिती झाले. आमच्याकडे तिला *गाठी* हा शब्द आहे .त्यामुळे एक गाठी गुढीसाठी आणि दुसरी गाठी आसोबासाठी, अर्थात माझ्यासाठी.

 मग ती अगदी कौतुकाने माझ्या गळ्यात बांधली जायची, मी पण कमीत कमी तीन चार तास ती गळ्यात घालून मिरवायचे, आणि नंतर एक एक पदक खायचे.

 खेळात कधी पदक मिळाले नाही, पण साखर माळेचे पदक मात्र दर पाडव्याला मिळालेले आहे. 


वडील जोडधंदा म्हणून शिलाई मशीन चालवत असत, तेव्हा नवीन कपडा म्हणजे मोठ्या अपूर्वाईची गोष्ट. गावठी भाषेत *आप्रुकीची गोष्ट* पण बहुदा मी धाकट, शेंडेफळ असल्यामुळे, गुढीपाडव्या दिवशी मला नवीन फ्रॉक मिळायचा.

 अगदी मी अंघोळ करून यायचे, आणि टॉवेल गुंडाळून वडिलांसमोर तशीच जाऊन बसायची, आणि ते घाईघाईने मशीनवर माझा फ्रॉक शिवत असायचे, कित्येक वेळा मी आंघोळ करून बाहेर आल्या आल्या नवीन फ्रॉक माझ्या वडिलांनी मशीन वरून पटकन धागे तोडून माझ्या अंगावर फेकलेला आहे.

 तो आनंद आमच्या दोघांसाठी देखील अतिशय अवर्णनीय असायचा. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये आपल्या मुलीसाठी तिच्या वाढदिवसाला एक फ्रॉक शिवणे तसे त्यांना जिकिरीचेच असायचे, काय करायचे माहित नाही पण मला 99 टक्के वेळा फ्रॉक मिळालेला आहे. 

आणि मला लाडाने म्हणायचे 


 आसोबा फसोबा कणकीचा गोळा 

 हिरवा पापड तिरका डोळा


त्यानंतर अनेक वाढदिवस आले/ गेले. अगदी भारी भारी हॉटेलमध्ये पार्टी केली, चांगल्या चांगल्या भारी साड्या मिळाल्या, कपडे मिळाले, सोन्याचे दागिने झाले, पण त्या काळात आईच्या हातच्या पाकातील पुऱ्या, आणि वडिलांनी घाईघाईत मशीन वरून शेवटचा धागा तोडून माझ्या अंगावर टाकलेला फ्रॉक याची सर कशालाच येणार नाही. आता मीच पार आयुष्याच्या तिसऱ्या इनिंगला पोहोचले आहे पण पाडव्याला त्या आठवणी येतातच.

 आई काका कुठे असाल तेथे तुम्हाला माझा नमस्कार

 कायम आशीर्वाद असू द्यावा.


Rate this content
Log in