Jyoti gosavi

Tragedy

3  

Jyoti gosavi

Tragedy

आणि महिला दिन संपला

आणि महिला दिन संपला

6 mins
23


साडेपाच चा गजर झाला, पण आज काही मंगलाला उठायची इच्छा होईना ,अंग थोडंसं दुखतच होतं.

 एक तर काल एका मालकीण बाईकडे घराची पुरी साफसफाई करायची होती, जास्तीच काम करावं लागलं .अर्थात त्या जास्ती काम केल्याचे नेहमी पैसे देतात, वर खाणं, पिणं, कपडा लत्ता असं काही त्यांच्याकडून नेहमी मिळतं असतं, तिने पण बारकीची फी भरायची होती म्हणून काल नेटाने काम केलं.

 खरे तर रोजची दहा घरची धुणं भांडी, तीन घरचा स्वयंपाक, पाच घरची नुसती लादी, आणि घरातली काम करताना ती थकून जायची.


 तिच्या सगळ्या मालकीणी तशा चांगल्या होत्या, कुठल्या ना कुठल्या घरी खायला मिळायचं. पण घरात नवरा आणि तीन पोरी त्यांच्यासाठी स्वयंपाक करावाच लागायचा. शिवाय नवरा दारुडा, काम धंदा न करणारा, हिच्या जीवावर बसून खाणारा ,आणि हिलाच मारहाण करणारा, असा तिचा संसार आनंदात चालू होता.

 तिकडे कामाला उशीर झाला,

 मग इकडे घरी यायला उशीर झाला, 

स्वयंपाकाला उशीर झाला,

 नवऱ्याला जेवण मिळायला उशीर झाला 

आणि त्याला कारणच भेटलं.

 त्याने नेहमीप्रमाणे तिच्यावरती हात टाकून घेतला ,आता तिला ते नित्याचं झालं होतं. पण त्यामुळे आज सकाळी उठवत नव्हतं.

 गजर झाला तो बंद केला, आणि पुन्हा डोळा लागला.

 जाग आली ती मोबाईलच्या रिंगने मालकिन बाईंचा कॉल होता.


 अगं काय मंगला! कुठे आहेस? मी तुझी इकडं वाट बघते आहे ,तुझं नेहमीचच आहे बाबा!

 सणावाराला, कुठल्या कार्यक्रमाला नेहमीच उशीर ,नाहीतर दांडी.

येणार आहेस ना आज?


 होय होय ताई निघाले बघा! ती बिछाना आवरता आवरता म्हणाली.


 लवकर ये बरं, मला महिला मंडळात आज महिला दिनानिमित्ताने प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रण आहे. पण तू काम करून गेल्याशिवाय मला बाहेर पडता येत नाही .


आले आले पाच मिनिटात आले, बस स्टॉप वर आहे तिथे खोटं सांगितलं.


आजच कसा डोळा लागला, काल मालकिन बाईंनी सांगितलं होतं उद्या लवकर ये मला बाहेर जायचं आहे, माझा कार्यक्रम आहे .

अगदी घाईत उठली, कसं तरी तोंड धुतलं, चाळीत लाईन लावून संडासला जाऊन येणे पण मोठी कसरत असायची .कारण तिथे लाईन ,नंबर असायचेच .

जाऊ दे मालकिन बाई बाहेर पडल्यावर त्यांच्याच घरी जाता येईल, असा विचार करून ती धावत पळत बाहेर पडणार! तेवढ्यात दोन नंबरची उठली .

आई आज मला शाळेत महिला दिनावर भाषण करायच आहे.

 मला चांगले कपडे पाहिजेत ,मोठी म्हणाली.

 आई मला जिजामाता चा वेश करायचा आहे, मला साडी नेसव, मला साडी ,नथ सगळं पाहिजे.


 काय ग तुम्हाला काल सांगता येत नाही का ?आता एक तर मला उशीर झालाय ,मालकिन बाई तिकडून ओरडत आहे, आणि मी का तुमच आता आवरत बसू.


 आई काल कधी सांगणार?

 काल तर आल्यावर बाबाची आणि तुमची भांडण चालू होती, आणि बाबा तुला मारत होता. आम्ही मध्ये आलो असतो तर आम्हाला पण मार पडला असता, म्हणून आम्ही घाबरून गपचूप झोपलो.


 एवढ्या गडबडीत पोरींचं मन मोडवेना, तिने दोघींचे पण आवरून दिले. एकीची वेणी फणी करून त्यातल्या त्यात चांगले ठेवणीतले, पेटीत असलेले कपडे काढून दिले.


 दुसरीला गेल्यावर्षी मालकीण बाईंनी दिलेली चांगली साडी नेसवली .नाकातली नथ मात्र घरात नव्हती ,कारण तिची तारेची नथ पेटीत होती ,ती पोरीच्या नाकात जाणार जाणं शक्य नव्हतं.

 चापाची नथ काय तिच्याकडे नव्हती, 


बाई त्याची व्यवस्था तू शाळेत कर, कोण घालून आल असेल तर त्याची पाच मिनिटांसाठी मागून घे. नाहीतर तुझ्या बाईंना सांग.

 धाकटी तर अजून झोपलेलीच होती. तिला शेजारच्या पारुला, तिच्याकडे लक्ष ठेव म्हणून सांगितले .

पारू तशी 17/ 18 वर्षाची नाकेडोळी निटस, तिच्यासारखेच दोन घरी काम करणारी ,पण तिला स्वतःला लग्न होऊन दोन वर्ष झाली तरी मुलगा नव्हतं, त्यामुळे तिलाही घरातून त्रास दिला जात होता.

 पण ती तिच्या मुलीला जीव लावायची, बारकीला माझी मुलगीच म्हणायची,

 ताई !तुम्ही बिनघोर जावा मी तिचे सगळं करून देईन .

अग माझ्या मालकिणीचा सारखा फोन येत आहे, लवकर ये !लवकर ये! त्यांचा कुठेतरी कार्यक्रम आहे. मी आता जाते .


नेहमीची बस निघून गेली मग तिने रिक्षा केली, आणि आपल्या मालकिणीच्या घरी गेली.

 तिने घरात पाऊल टाकल्याबरोबर मालकिन बाईच्या तोंडाचा पट्टा सुटला,

 काय ग! तुझा नेहमीच झालंय, एवढं तुला नेहमी सगळ देते ,पण वेळेला येशील तर शपथ !


त्या पण तशा चांगल्याच होत्या, त्याही खाणं पिणं, वर्षाला दोन साड्या, अधून मधून मागितले तर दहा वीस रुपये देत असत. शिवाय त्यांच्यामुळेच तिला चार कामे मिळालेली होती.

 तिने काही न बोलता खाली मान घालून घरात प्रवेश केला आणि अर्ध्या पाऊण तासात त्यांची कामे उरकून दिली.


स्वयंपाक राहू दे माझे खाणं बाहेर होईल, साहेब देखील त्यांच्या ऑफिसमधून खाऊन येतील.

" अग आज महिला दिन आहे ना" मग 

*आजची भारतीय महिला, महिला तीच स्वातंत्र्य, तिला होणाऱ्या अडचणी*

 या सगळ्यावर मला प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करायच आहे .

अर्थात तुला यातलं काय कळणार म्हणा! जाऊ दे.

 आज तुझी मालकीण बाई कुठेतरी प्रमुख पाहुणे आहे, एवढं लक्षात ठेव.

 आज माझा सत्कार समारंभ होणार .

ताई तुमचा नेहमीच होतो, तुम्ही हुशार आहात, ती म्हणाली .

ती नववी शिकलेली होती आणि शिक्षणापेक्षा देखील तिची बुद्धिमत्ता प्रगल्भ होती.

 बाहेरच्या जगात काय चाललंय याच तिला ज्ञान होतं. शिवाय सगळ्यांप्रमाणे तिच्या हातात देखील मोबाईल होता, घरात टीव्ही होता,

 पण तिचा सगळा दिवस खराब गेला, कारण एकीकडे उशीर झाल्यामुळे पुढच्या प्रत्येक मालकिणीकडे उशीर होत गेला. आणि त्यांचे दोन शब्द ऐकून घेत अख्खा दिवस गेला.

 संध्याकाळी दमून थकून घरी गेली, बहुतेक वेळा तिला कुणाकडे तरी जेवण मिळत असे, पण आज बहुतेक मालकीणी कुठे ना कुठे कार्यक्रमाला जायच्या होत्या. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घरात स्वयंपाक पाणी करायचेच नव्हते. पण त्याऐवजी इतर काहीतरी जास्तीचे काम काढून ठेवले होते.

 आज तशी ती उपाशीच होती, घरी आली , काही करायला देखील जीव नव्हता, तीन मुलीच्या पाठीवर मुलगा पाहिजेच या हट्टाने पोटात चौथे पोर होते.

 भूक तर कडकडून लागलेली ,ती तशीच आडवी झाली आणि डोळ्यावर आडवा हात ठेवून पडली.


 पोटात उंदीर पळत होते

 डोळ्यातून अश्रू ढळत होते


 थोड्यावेळात दार वाजले म्हणून उठली,

 आई! मला वेशभूषा मध्ये नंबर मिळाला, आमच्या मॅडमनी मला नथ दिली ,आणि काय वागायचं कसं बोलायचं ते पण शिकवलं.

 मी जिजाऊंची काही वाक्य बोलले, सर्वांना आवडले ,प्रमुख पाहुण्यांनी माझे कौतुक केले आणि हे बघ सर्टिफिकेट पण मिळालं ,

मुलीच्या यशात ती खुश झाली.


 मधली आली आई मला भाषणात नंबर मिळाला, हे बघ सर्टिफिकेट. तुझ्याच एक मालकीणबाई प्रमुख पाहुण्या होत्या, त्यांनी माझं कौतुक पण केलं ,"पण सगळ्यांसमोर म्हणाल्या बघा आमच्या कामवालीची मुलगी पण किती हुशार आहे"


 तोच शेजारची पारू धाकटीला घेऊन आली

 काय झालं ताई ?डोळ्यात का पाणी ?

काही नाही ग, आज उशीर झाला, घरात काय बनवलं नाही .

भूक लागली पण करायची पण इच्छा नाही, आणि जीव पण नाही, "कंटाळले ग रोजच्या या आयुष्याला"

 ताई असं म्हणून कसं चालेल?

 आता आपल्यासाठी नाही आपल्या पोरींसाठी जगायचं, त्या बघ शाळेतून कसं काय काय घेऊन आनंदात आल्या आहेत.

 माझ्याकडे एक भाकरी आहे ,भाजी पण आहे तू आधी खाऊन घे, आणि मग कामाला लाग. 

एरवी मंगलने आडवेढे घेतले असते, पण आज भूक लागलीच होती .

तिने भाजी भाकर खाल्ली तेव्हा तिला जीवाला बरं वाटलं, मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली .

रॉकेल संपलं होतं त्यामुळे चुल पेटवून आज नवरा आणि पोरींसाठी डाळ भातच केला., चुलीवर भाकरी तिला देखील जमत नव्हत्या.

 तसंच वय लहानच होतं ,चौथ पोर पोटात असेल तरी अजून ती जेमतेम 25 वर्षाची होती.

 नेहमी प्रमाणे नवरा संध्याकाळी पिऊन आला, आल्या आल्या जेवण मागू लागला. त्याला नेहमी दारू बरोबर वशाट (नॉनव्हेज )लागायचे.


 काय ग रांडे, कुत्रे लोकांच्या घरी जाऊन काम करतेस ,तिथं खाऊन पिऊन येतेस, नवऱ्याला मात्र नुसता डाळ भात! तुला वषाट करायला काय हातावर रोग येतो?

 बरोबर आहे ,तुझं सगळं बाहेर भागतोय ना! त्याने शेवटी विषारी शब्द काढलेच .तुला कशाला नवरा लागेल?

 आता दारुड्या माणसांची खासियतच असते की ,त्यांना स्वतःला काही जमत नाही आणि ते बायकोवर संशय खात राहतात.


 तिला सुरुवातीला खूप राग यायचा, पण आता सवय झाली होती.

 तिने काही लक्ष दिलं नाही, त्याच्यापुढे डाळ भात ठेवला, "खायचं तर खा! आणि पोरींना जेवण वाढू लागली,

तेवढ्यात पाठीमागून तिच्या कंबरड्यात लाथ बसली, 


माजलीय, माजली आहे रांड, नवऱ्याची किंमत नाही, पण लक्षात ठेव, माझ्या जीवावर कपाळाला कुंकू लावतेस, म्हणून तू इकडे तिकडे फिरू शकतेस !तुला कोणी हात लावत नाही तुला कोणी काही वाईट पद्धतीने बघत नाही, बोलत नाही समजलं का?

 आधी माझी सेवा करायची, आधी मला खायला प्यायला द्यायचं समजलं! असे म्हणून तो तिला लाथा घालत राहिला, बडवत राहिला ,

आणि त्या दिवशीचा महिला दिन संपला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy