चाफा
चाफा
तिने लवकर उठून नेहमीप्रमाणे सडा, रांगोळी केली.. तुळशीला दिवा लावून नमस्कार केला, घरातल्या देवाला अंगणातली फुले वाहिली... तरीही तिचे लक्ष त्या दारासमोर पडलेल्या चाफ्याच्या फुलांकडे गेले नाही. ती तिच्याच कामात मग्न होती. जिमवरून आलेला तो तिला म्हणतो.. आज दारात पडलेल्या या पिवळ्या चाफ्याच्या फुलांनी जणू तू काढलेल्या रांगोळीभोवती एक सुंदर वर्तुळ रेखाटले आहे ..सगळ्या अंगणाची शोभा आज माझ्यामुळेच आहे ,असं ती फुलं आपल्याला सांगत आहे..
रोजचचं जरी असले तरी त्याच्या त्या बोलण्याने तिला आज तिचे अंगण वेगळे भासत होते.. आज घरावर, तुळशी वृंदावनावर पिवळ्या रंगाची बरसात झाली होती. सूर्याच्या किरणांमध्ये आज सगळे अंगण न्हाऊन निघाले होते. मनोमन सुखावलेली ती पुढच्या कामासाठी परत घरात जायला वळली, तिच्या पाठोपाठ तो ही आत गेला...